पु. लं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. काही पुस्तके, कादंबऱ्या भावनिक करतात. अंतर्मुख करतात, तर काही खळखळून हसवतात. मात्र पु. लं हे असे लेखक होते. ज्यांची पुस्तके, कादंबऱ्या वाचताना कधी हसता हसता डोळ्यांतून अश्रू येतात. कधी एका क्षणी त्यांच्याच शब्दांनी गंभीर, जरासं अस्वस्थ झालेलं मन पुढच्याच क्षणी त्यांच्याच शब्दांनी हलकं होऊन जातं, आणि ओठांवर हलकंसं स्मित उमटतं.
•••••••
साहित्यिक पु. लं
' असा मी असामी ' हे पु. ल. देशपांडे यांचं माझ्या वाचनात आलेलं पहिले पुस्तक. किंबहुना या पुस्तकाद्वारेच माझा त्यांच्याशी परिचय झाला.
धोंडो भिकाजी कडमडेकर - जोशी नावाच्या एका मध्यमवर्गीय, सामान्य माणसाचे ' असामी ' म्हणजे काल्पनिक आत्मचरित्रच आहे. धोंडोपंत ऋषींच्या जोशींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना येणारी अनुभव नानाविध अनुभव, त्यांतून होणाऱ्या गमतीजमती, पुढे या धोंडो भिकाजी कडमडेकर जोशींच डी. बी. जोशींत रूपांतर होऊन त्यांच्या आयुष्यात झालेले लक्षणीय बदल हे सगळं काही ' असा मी असामी ' या पुस्तकात आपल्या खास स्टाईल मध्ये अत्यंत सुंदररीत्या चित्रित केले आहे.
त्यांच्या ' बटाट्याच्या चाळी ' तील सोनाजी त्रिलोकेकर, म्हाळसाकांत पोंबुर्पेकर, मंगेशराव हट्टंगडी, जनोबा रेगे यांच्या सारख्या अंतरंगी व नमुनेदार पात्रांनी आपल्याला भरपूर हसवल्यानंतर शेवटी खुद्द बटाट्याची चाळ मात्र आपल्या मनोगतातून वाचकाला काही क्षण स्तब्ध करून जाते.
' अघळपघळ ' हे पु. लं च्या सर्वोत्तम विनोदी साहित्यांमधील एक असे म्हटले तर गैर ठरणार नाही.
' मी आणि माझे पत्रकार ' या पहिल्याच प्रकरणात पु. लं ना वाचक, प्रेक्षक इ. च्या येणाऱ्या विविध आशयांच्या एक से एक पत्रांचे, त्यातील काहींना त्यांनी पाठवलेल्या उत्तरांचे, तर काही पत्रांवर उमटलेल्या त्यांच्या प्रतिक्रियांचे किस्से सांगितले आहेत. काही किस्से अत्यंत मनोरंजक, गमतीदार आहेत. तर काही भावनिक.
' माझा एक अकारण वैरी ' या प्रकरणात साध्यासरळ धोंडोपंतांचे आणि देशी वा इराणी हॉटेलातील वेटर यांमधील परस्परसंबंधांचे भन्नाट चित्रण केले आहे.
यांसोबत ' काही साहित्यिक भोग,' ' ललित आत्मपरिचय कसे लिहावे,' ' काही ( बे ) ताल चित्रे,' ' विनोदी लेखन हे साहित्य ? ' ही प्रकरणे ही अप्रतिम, वाचनीय आहेत.
•••••••
कथाकथनकार पु. लं
पु. लं चे साहित्य तर ग्रेट आहेच. मात्र त्यांची कथाकथनेही अप्रतिम व श्रवणीय आहेत. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे अनेक एकापेक्षा एक, अजरामर पात्रे निर्माण केली. आणि कथाकथनांतून आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याची चुणूक दाखवत, निरनिराळ्या आवाजांतून हीच पात्रे आपल्यासमोर जीवंत उभी केली.
' व्यक्ती आणि वल्ली ' मधील भलताच अॅटीट्यूड आणि कोडगेपणा असलेला त्यांचा ' नामू परीट ' आपलं भरपूर मनोरंजन करतो. त्याच्या निरनिराळ्या मजेशीर अॅक्शन्स, एक्सप्रेशन्स तर भन्नाटच. सखाराम गटणेचे शुद्ध मराठी ऐकून आणि त्याचा व्यासंग पाहून हसून हसून मुरकुंडी वळते. आपल्या ' ढ ' विद्यार्थ्यांच्या निर्बुद्धपणाची भरपूर चेष्टा करणारे ; पण तितकीच सगळ्या विद्यार्थ्यांवर माया करणारे, त्यांच्या पुढील भविष्याची चिंता करणारे, तिखट जिभेचे ; पण मायाळू चितळे मास्तर मनात घर करून जातात. हे पात्र कथाकथनातून सादर करीत असताना मास्तरांच्या तोंडी असलेला रघुवंश श्लोक पु. लं नी इतका सुंदररित्या गायला आहे, की तो पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.
भरभक्कम आवाजाचे ; पण मिष्कील असे पेस्तन काकाही मोठे मजेदार पात्रं आहेत.
चहात दूध कमी पाहून " रत्नागिरीच्या समस्त म्हशी तूर्तास गाभण काय रे झंप्या ? " असा तिरकस शेरा मारणारे, " अहो रत्नागिरीस थंड हवा असती, तर शिमला म्हटले नसते ? " " दामू नेना ? अहो तो चैनीत आहे. वर रंभा त्याच्या टकलावर तेल थापते." " बाई ? अहो कसला तो आवाज आणि कसले ते दिसणे. मनात आणील, तर कडेवर घेईल त्या सुधाकरास." अशा आपल्या तिरकस, व्यंगात्मक कोट्यांनी पोट धरून हसवणारे कोकणातील फणसासारखे अंतू बर्वा जेव्हा " अहो उद्या प्रकाश आला तरी बघायचे दारिद्र्यच ना. पोपडे उडालेल्या भिंती, नि गळकी कौले बघायला वीज कशाला ? आमचं दारिद्र्य अंधारातच दडलेले बरे," " आमची ही गेली, आणि तेव्हापासून दारचा हापूस मोहरला नाही." अशा शब्दांत आपल्या मनातील भावना व्यक्त करतात, तेव्हा कसेसेच होते .
मी आणि माझा शत्रुपक्ष मधील आपले घर दाखवण्यास उत्सुक असलेल्या कुळकर्ण्याच्या बोलण्यातून, एक्सप्रेशन्स व देहबोलीतून त्याचा इरसालपणा प्रकट होतो.
आपल्या बेधडक स्वभावाप्रमाणेच बेधडक, सरळसोट बोलण्यातून ' रावसाहेब ' धमाल उडवून देतात.
' काही नव्या ग्रहयोगां ' ची, आणि त्यांच्या फलितांची पु. लं. नी दिलेली मजेशीर माहिती पोट दुखेपर्यंत हसायला भाग पाडते.
•••••••
संगीतकार पु. लं
पु. लं हे एक उत्कृष्ट संगीतकारही होते, हे मात्र मला जरा उशीराच समजले. ' इंद्रायणी काठी ' सारखे रसाळ, अप्रतिम असे भक्तीगीत असो, माझे जीवन गाणे ' सारखे सुखात असो वा दु:खात, मनामध्ये प्रसन्नता, समाधान बाळगून आनंदाने जगण्याचा संदेश देणारे गीत असो, किंवा ' ही कुणी छेडिली तार, शब्दावाचून कळले सारे ' सारखे सुंदर भावगीत असो ही विविध प्रकारातील, नितांतसुंदर गाणी त्यांच्यातील संगीतकाराची प्रतिभा दाखवून देतात.
एक थोर साहित्यिक, ब्रिलियंट कथाकथनकार आणि प्रतिभावान संगीतकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या पु. लं. देशपांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद.
@ प्रथमेश काटे
उत्तम परिचय आणि लिखाण
उत्तम परिचय आणि लिखाण
Thank you
Thank you
अरे यार , नटसम्राट पुल
अरे यार , नटसम्राट पुल विसरलात काय? "गुळाचा गणपति."
पु ल संगीतकार असलेलं अजरामर
पु ल संगीतकार असलेलं अजरामर गाणं - नाच रे मोरा. हे तुम्ही सर्वांत आधी ऐकलं असेल.
पुल चित्रपट निर्मितीच्या अनेक अंगांशीही संबंधित होते - दिग्दर्शन, अभिनय, पटकथा, कथा , संगीतदिग्दर्शक. वर केशवकुल यांनी म्हटलेला गुळाचा गणपती म्हणजे सबकुछ पुलं.
तुम्ही ज्याला कथाकथन म्हणताय ते एकपात्री कार्यक्रम होते. मराठीत तरी पु लं ना त्याचे जनक म्हणता येईल.
ते दूरदर्शनच्या पहिल्या निर्मात्यांपैकी एक होते.
ते गायक होते, हार्मोनियम वाजवत.
पु ल नाटककार होते.
व्यक्तिचित्रणे - काल्पनिक म्हणवणारी आणि अस्स्ल व्यक्तिमत्त्वांची अशी दोन्ही आणि प्रवासवर्णने या साहित्यप्रकारांवर त्यांचा अमिट ठसा आहे.
उगाच नाही त्यांना महाराष्ट्राचं लाडकं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणत. इतकं लिहिलं तरी अजून काहीतरी सुटलंच असेल.
>>> मात्र पु. लं हे असे लेखक
>>> मात्र पु. लं हे असे लेखक होते. ज्यांची पुस्तके, कादंबऱ्या वाचताना कधी हसता हसता डोळ्यांतून अश्रू येतात.
कादंबर्या कुठल्या?
एका कोळियाने
एका कोळियाने
असामी असामी पुस्तकांला काय
असामी असामी पुस्तकांला काय म्हणावं? किंवा even बटाट्याची चाळ.. कोणत्या प्रकारात मोडते?
इंग्लिश मध्ये नक्कीच fiction मध्ये जाईल.
मराठीत?
विरंगुळा
विरंगुळा
नाही साहित्य प्रकार..
नाही साहित्य प्रकार..
कथा संग्रह, कादंबरी .... वगैरे.
कादंबरी??
ललित वाड्मय (हा शब्द कसा
ललित वाड्मय (हा शब्द कसा लिहायचा इथे? मी संपूर्ण चुकीचा लिहिलाय).
वाङ्मय vaaGmaya
वाङ्मय
vaaGmaya
वाङ्मय!! - जमलं. धन्यवाद!!
वाङ्मय!! - जमलं.
धन्यवाद!!
वाङ्मय असे वाचले कि हा
वाङ्मय असे वाचले कि हा वांग्याचा काही प्रकार असावा असे वाटते. सिंहगडावर वाडग्यात वांग्याचे भरीत मिळते. ते वाडगं वांगंमय झालेले असते. चुलीवर खरपूस भाजले गेल्याने मस्त चव आलेली असते. मंद सुवास देखील दरवळत असतो. वाडगं घेऊन ती माऊली आणखीही भुकेलेल्यांना वांगं वाढत असते. भाकरी ताटात टाकत असते. तेव्हांच दही वाली येऊन दह्याचे कुल्ह्ड ठेवून जाते . नेहमीच्या दहीवाली ऐवजी भलतीच आलेली पाहून वांगंमाऊलीचं आणि दहीकरीचं भांडण चालू असतं. आपल्या ताटातलं वांग संपल्याने "वांग वाढ ग माये" अशी हाळी द्यावी लागते.
तेव्हां तिची प्रभाकर आणि जतीन ही मुले ऐकून न ऐकल्यासारखी करतात. ललित मात्र चटकन उठून त्याच्या आईला वाडगं वाढ गं माय म्हणतो. तेव्हां पासून वांगं, वाडग, माई सोबत ललित हे नाव जोडले गेलेले आहे.
ताक : पुश पुल ट्रेन आणि या देशपांड्यांचा काही संबंध आहे का ?
जुयेरे
जुयेरे
रघू आचार्य
रघू आचार्य
तेव्हां पासून वांगं, वाडग,
तेव्हां पासून वांगं, वाडग, माई सोबत ललित हे नाव >>> _/\_
तुम्ही पण फॅन की काय, आचार्य?
वाङमय!!! (हे पण जमलं) वाङमय
वाङमय!!! (हे पण जमलं) वाङमय (परत एकदा लिहून पाहिलं)
तुम्ही पण फॅन की काय, आचार्य?
तुम्ही पण फॅन की काय, आचार्य? >> नाही नाही. मी आपला एक "सरळमार्गी" मनुष्य !
@केशवकूल - अरे हो की. खरंतर
@केशवकूल - अरे हो की. खरंतर या चित्रपटाबद्दल ही मला ठाऊक होतं ; पण लिहीताना नेमकं विसरून गेलो.
उगाच नाही त्यांना महाराष्ट्राचं लाडकं अष्टपैलू
व्यक्तिमत्त्व म्हणत. इतकं लिहिलं तरी अजून
काहीतरी सुटलंच असेल. >> मी या लेखात त्यांच्या समग्र कारकिर्दीचा आढावा घेतलेला नाही. ते शक्यही नाही. लेखाचं नावच 'मी' वाचलेले, पाहिलेले आणि ऐकलेले पु. ल. देशपांडे असं आहे, हे लक्षात घ्या. " नाच रे मोरा " या बालगीताबद्दल म्हणालात ते खरे आहे. ते राहून गेलं.
तुम्ही ज्याला कथाकथन म्हणताय ते एकपात्री
कार्यक्रम होते. >> मग ? त्याचे काय ? त्या कार्यक्रमासाठी ' कथाकथन ' हाच शब्द सर्वश्रुत आहे.
@केशवकूल - अरे हो की. खरंतर
@ छन्दिफन्दि - प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. असा मी असा मी या पुस्तकाला काल्पनिक आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणता येईल का ? नाव जरासं मोठं आहे नाही. मलातरी हेच सुचलं
कथाकथनात आणि एकपात्री
कथाकथनात आणि एकपात्री प्रयोगात फरक आहे. कथाकथन हे कथेचं केलं जातं. पुलं जे सादर करीत त्याला कथा म्हटलं जात नाही ( नव्हतं).
पण आता तुम्ही पुलंकडून कथा आणि कादंबर्याही लिहून घेतल्यात , इथली चर्चा (!) वाचून शोधलं तर नेटवर बटाट्याच्या चाळीत लोकांनी कादंबरी वसवलेली दिसली.
<'मी' वाचलेले, पाहिलेले आणि ऐकलेले> एक कुमार गंधर्व होते. ते मला उमजलेले बालगंधर्व असा कार्यक्रम करीत. याहून स्पष्ट लिहू का?
एक कुमार गंधर्व होते. ते मला
एक कुमार गंधर्व होते. ते मला उमजलेले बालगंधर्व असा कार्यक्रम करीत. >>
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/82619
मी ह्यात आढावा घ्यायचा थोडा फार प्रयत्न केला आहे.
काल्पनिक आत्मचरित्रात्मक
काल्पनिक आत्मचरित्रात्मक कादंबरी >>> ???
बाप रे
कथाकथनात आणि एकपात्री
कथाकथनात आणि एकपात्री प्रयोगात फरक आहे. >> नक्कीच आहे. चार्ली चॅप्लिन करायचे ते एकपात्री प्रयोग आणि पु. ल. देशपांडे करायचे ते कथाकथन.
कथाकथन हे कथेचं केलं जातं. पुलं जे सादर करीत
त्याला कथा म्हटलं जात नाही >> तुम्ही म्हणत नसाल ; पण मग त्यांचं नारायण, चितळे मास्तर, बिगरी ते मॅट्रिक, मी आणि माझा शत्रुपक्ष इ. लेखन कुठल्या प्रकारात मोडतं हे आपणच सांगा.
बटाट्याची चाळ , असामी असामी
बटाट्याची चाळ , असामी असामी हे एकपात्री प्रयोग म्हणूनच ओळखले जातात.
तसेच मराठीत अजुन वर्हाड निघालाय लंडनला, रामनगरी (?)हे ही काही लोकप्रिय एकपात्री प्रयोग आहेत
नारायण, चितळे मास्तर हे
नारायण, चितळे मास्तर हे व्यक्तिचित्रण. बिगरी ते मॅट्रिक, मी आणि माझा शत्रुपक्ष हे विनोदी लेखन.
सर, सर, तुमच्या मते कथेची व्याख्या, लक्षणे काय?
तुम्ही या वाङ्मयप्रकारांच्या व्याख्या स्वतः ठरवल्यात (जसे मला दिसलेले पुल, मला ऐकू आलेले चित्रपट संगीत) की त्यांच्या प्रचलित व्याख्या तुम्हांला मान्य आहेत?
माझ्या लहानपणी घरी असलेल्या
माझ्या लहानपणी घरी असलेल्या पुलंच्या बर्याचश्या कॅसेटींवर कथाकथन असं छापलेलं होतं. (छापणारे काय, द्याल ते छापतील! दामू नेना कसला प्रेमळ? ... )
पुलंनी वाचलेल्या त्यांच्या वाङ्मयाचं असं वर्णन कर्ता येईल:
म्हैस - कथाकथन (ह्यात मी आहे)
नारायण, चितळे मास्तर, अंतु बर्वा, पानवाला वगैरे - अभिवाचन
बटाट्याची चाळ - एकपात्री प्रयोग (कारण हे थोडंसं नाट्यरूपांतर आहे. त्यात साभिनय सादरीकरण आहे, नुसतं वाचन नाही, किंबहुना वाचन अजिबात नाही. पाठ करून सादर केलं आहे .. पुलंनीच त्याचं वर्णन एकपात्री प्रयोग असं केलं आहे)
असा मी असामी हे कारकुनाचं आत्मचरित्र असलं तरी ती एक कथा म्हणून घेतल्यास कथाकथन होईल.
सर, तुमच्या मते कथेची
सर, तुमच्या मते कथेची व्याख्या, लक्षणे काय?
तुम्ही या वाङ्मयप्रकारांच्या व्याख्या स्वतः
ठरवल्यात (जसे मला दिसलेले पुल, मला ऐकू आलेले
चित्रपट संगीत) की त्यांच्या प्रचलित व्याख्या
तुम्हांला मान्य आहेत? >>> च्यायला. जेव्हा चित्रपट संगीताचा प्रवास अशा टायटलने लेख लिहिला, तेव्हाही टायटल बद्दल प्रॉब्लेम, टायटल व्यापक स्वरूपाचं होतं मान्य आहे ; पण आता जेव्हा मी वाचलेले, पाहिलेले, ऐकलेले पु लं असा सब्जेक्टिव टायटल दिलाय तर त्यातही प्रॉब्लेम. मी तुमच्यासारखा स्वयंघोषित विद्वान नाही, त्यामुळे कथा या साहित्य प्रकाराबाबत माझी स्वतःच्या मतांवर आधारित अशी व्याख्या नाही. आणि मी पाहिलेले, वाचलेले, ऐकलेले... या शब्दात तुम्हाला कसली व्याख्या वैगेरे आढळली. साधी गोष्ट आहे, वाचलेले म्हणजे - पु. लं च्या माझ्या वाचनात आलेल्या साहित्याबद्दल, पाहिलेले म्हणजे मी त्यांचे कथाकथनाचे व्हिडिओ पाहिले आहेत, ऐकलेले म्हणजे लेखात नमूद केलेली त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी जी माझ्या ऐकण्यात आली अन् मला भावली. आता एवढं स्पष्टीकरण देण्याइतकं महत्व तुमच्या कमेंट्सना देण्याचं मला काही कारण नाही. कारण या कमेंट्स मध्ये चुका वाटल्या ( आढळल्या नाही, वाटल्या ) म्हणून लिहिल्या आहेत, त्या खरंच तशा आहेत का ? किंवा एखाद्या दोन असल्याचं तर त्या महत्त्वाच्या आहेत का या कशाचाही विचार केलेला नाही.
°°°°°°°
@ हरचंद पालव - बरोबर आहे.
ठीक आहे, कुणी चकोल्या म्हणतात
ठीक आहे, कुणी चकोल्या म्हणतात तर कुणी वरणफळे. तुम्हाला आनंद मिळाला ना ? बास !
Pages