मान्यता !.. (एक अंकी नाटक )
प्रवेश पहिला
स्थळ : ( कै. अरविंद जातेगावकरांचा बंगला , जुन्या पद्धतीने सजवलेल्या भल्या मोठ्या दिवाणखान्यात पितळी कड्या असलेल्या झोपाळ्यावर जातेगावकरांची धाकटी मुलगी मयूरी हलके हलके झोके घेता घेता पुस्तक वाचते आहे , तिच्याच समोर त्याच झोपाळ्याच्या पितळी कडयांना टेकून ,पाय लांब करून बसलेली तिची वाहिनी ईशा लॅपटॉप वर काही कामे करते आहे ,तिच्या गोऱ्यापान नाजूक पायातले पैंजण तिच्या हालचाली बरोबर मध्येच किणकिणत आहेत )
मयूरी : “वाहिनी यंदा दिवाळीला मी तुझी ती सोनेरी बुट्टे असलेली डाळिंबी रंगाची पैठणी घालू ? “मयूरी पुस्तका आडून डोकावत लाडिक आवाजात ईशा ला विचारते तसा ईशा मनातल्या मनात सुटकेचा नि:श्वास टाकते , ‘हुश्श !.गाडी आली म्हणायची रुळावर ” मग मोठ्याने म्हणते “हो नेस की विचारायचं काय त्यात?आणि मयु साडी नेसतात , घालत नाहीत ” तितक्यात किचन मधून नॅपकिन ला हात पुसत रमा बाहेर येते ,चेहेऱ्यावर थोडेसे दबलेले भाव (रमा ही मयूरीची आई व ईशाची सासू आणि कै अरविंद जातेगावकरांची पत्नी )
रमा : नाही हा मयू , तिच्या वस्तू मागायच्या नाहीत, तिला आवडत नाही कोणी तिच्या वस्तूंना हात लावलेलं .
ईशा : “अहो आई असू देत , मागितली म्हणूं काय झालं ? प्रत्येकाचे व्हायब्रेशन्स त्याच्या वापरातल्या वस्तूंवर सेट झालेले असतात म्हणून मला स्वतः:च्या वस्तू कुणाला द्यायला आवडत नाही, पण मयू कुठे परकी आहे आपलीच नाही का ? आपल्या माणसांचं चालतं “ असं म्हणत ती लॅपटॉपवरून मान वर करून मयूरी कडे एक कौतुकाचा कटाक्ष टाकते तशी खूष झालेली मयूरी झोपाळ्यावरून उठते आणि एक गोल गिरकी घेऊन ईशा ला “ Love You Isha !.. ‘ असं म्हणून गाणं गुणगुणत तिच्या रूम मध्ये जाते , ती गेली त्या दिशेने बघत रमा तिच्या रिकाम्या झालेल्या जागेवर येऊन बसते .
रमा : आल्या म्हणायच्या बाईसाहेब जागेवर , चक्क तुझी पैठणी नेसू का म्हणून विचारतेय “
ईशा : “ हो ना मी ही मघाशी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला , हे वयच असं असतं ना आई , कुठल्यातरी विचारांनी प्रभावित होऊन वाहवत जायचं “
रमा : खरंय बाई ,ऐन तारुण्यात संन्यासिनी व्हायचं म्हणते , तु आहेस म्हणून बरं ,रोज समाजवतेस तिला त्याचाच परिणाम असणार हा , नाहीतर मला तरी काय बोलायचं काही कळलं नसतं बघ, अशा विचित्र हट्टाला काय करणार ! “ असं म्हणत रमा उठते आणि आत जाऊन टेबलवर जेवण मांडायच्या तयारीला लागते . ईशा तिचे WFH चालू ठेवते .
तितक्यात दारातून ‘शाल्व ‘ची एंट्री होते . (शाल्व हा रमाचा मोठा मुलगा आणि ईशाचा नवरा , शाल्वच्या उंचपुऱ्या देखण्या थोड्याशा स्थूल आणि रूबाबदार पर्सनालिटीकडे बघून कोणीही सांगेल की हा एका प्रतिष्ठीत श्रीमंत घराण्यातला उद्योगपतींचा कर्तबगार मुलगा आहे . तो घाईघाईने आत येतो आणि थेट झोपाळ्यावर काम करत बसलेल्या ईशाच्या मागे जाऊन तिला एक टपली मारतो , मग दोघांची एक गोड कुरबुर होते , टेबलावर मांडामांड करणारी रमा उगीचच कानकोंडंली होते . तितक्यांत शाल्व आई च्या दिशेने वळत जेवण्याच्या टेबलवर जाऊन बसतो आणि पानात मांडलेली अळूची वडी खायला सुरुवात करतो .
ईशा : अरे SSS शूज काढले नाहीत , हात धुतले नाहीत , तसंच खायला सुरुवात , शी !.. कित्ती वेळा सांगायच्या त्याच त्याच गोष्टी ? आई अहो तुम्ही तरी काही तरी बोला त्याला ?
शाल्व : (चेहेऱ्यावर नापसंती दर्शक भाव येतात ) झालं का सुरु तुझं ? पुढच्या दहा मिनिटात जेवण उरकून मला परत मीटिंगला जायचे आहे , I have no time for all this bullshit .आज बाबांचं श्राद्ध आहे ,आणि मला त्या सगळ्या भाज्या, पंचामृत , खीर वडे आवडतं म्हणून घरी जेवायला आलो , मग रमा कडे बघत तो म्हणतो ,” आता वाढ पटापट नाही तर जे वाढलयस तेवढं खाऊन जाईन .
बघता बघता शाल्वचा चेहेरा लालबुंद झालेला पाहून रमा कावरी बावरी होत पट्कन पोळी भाजी ताटात वाढते , पण आता ईशाने टोकल्यामुळे त्याचा जेवणाचा मूड गेला आहे , पानात जेवढं वाढलंय तेवढंच खाऊन तो उठतो आणि जेवढ्या वेगात आला होता त्यापेक्षा जास्त वेगात निघून जातो .
रमा दारात जाऊन त्याच्या गेलेल्या गाडीच्या दिशेने पाहत बराचवेळ उभी रहाते . ..मग एक सुस्कारा टाकून आत येते . ती आत आल्याचे बघताच ईशा लॅपटॉप खाली ठेऊन उठते , आणि डायनींग टेबलापाशी जाऊन तिघींची पानं मांडायला घेते .
ईशा : पाहिलंत ना आई , आला काय गेला काय बाबांच्या फोटो ला साधा नमस्कार सुद्धा केला नाही .
रमा : अगं महत्वाची मिटिंग असेल , वेळ नसेल , मुद्दाम कशाला करेल काही . त्याचा किती जीव होता त्याच्या बाबा वर.
ईशा : नुसता जीव असून चालत नाही ,तो आहे हे दाखवावं लागतं , माणूस असेपर्यंत आणि गेल्यावर देखील !.
यावर रमा एक सुस्कारा सोडते ( मनातून रमा ला म्हणायचं असतं की तु टोकलंस म्हणून गेला तो न जेवता ) . ईशाला रमाच्या या पडखाऊ वृत्तीचा नेहेमी प्रमाणे राग येतो पण ती वरकरणी दाखवत नाही . स्वतः: मुलाला कधी वळण लावलं नाही आणि मी लावतेय तर मला सपोर्टही करत नाहीत असे तिला वाटत असते .
प्रवेश दुसरा
दुसऱ्या दिवशीची सकाळ , रमा किचन मध्ये शाल्व चा आवडता मटार , गाजर वैगेरे घालून केलेला सरसरीत उपमा करायच्या गडबडीत आहे . काल दुपारी गेल्यानंतर थेट आत्ताच त्याची आणि रमाची भेट होते आहे . तो आत येऊन टेबल जवळ बसतो , रमा भराभर डिश भरते ,ओलं खोबरं , कोथिंबीर पेरून त्याच्या पुढ्यात ठेवते त्याला आलं -वेलदोडे घातलेला गरम आणि स्ट्रॉंग चहा लागतो , तसा गाळून त्याच्यापुढे त्याचा मग ठेवते . एक चमचा उपम्याचा आणि एक घोट वाफाळत्या चहाचा असं घेत मायलेकांच्या गप्पा सुरू होतात तितक्यात ईशा आत येते ,
ईशा : गुड मॉर्निग !.. अरे वा , उपमा ?
रमा : अगं बस ना , तुझीही डिश भरते , तुझाही चहा ठेवते थांब .
ईशा : आई तुम्ही बसा , मी ठेवते .
ईशा चहा करायला लागते, पण आता त्या दोघांच्या गप्पा बंद होतात , तिला ते खटकते . ती वरकरणी दाखवत नाही . चहाचा मग घेऊन ती शाल्वच्या शेजारी बसते , त्या बरोबर लगेचच शाल्व “मला लवकर जायचंय कंपनीत मिटिंग आहे महत्वाची ‘असं म्हणत पट्कन उठतो आणि अंघोळीला निघतो . ईशाला वाईट वाटतं . रमा हे सर्व बघत असते पण काहीच न बोलता तो गेला त्या दिशेने दोन सेकंद बघत म्हणते ,
रमा : सॉरी ईशू , लहानपणापासून तो असाच आहे ,छोट्याशा गोष्टीने देखील मन चट्कन दुखावत त्याचं ,दोन दिवस गेले की येईल पुन्हा ताळ्यावर .
ईशा : आई मला सॉरी म्हणण्यापेक्षा स्वतः:च्या मुलाला जर समजावून सांगता आलं तर बघा “लहानपणीच त्याला वळण लावलं असतं तर मला या वयात त्याला वळण लावायची वेळ आली नसती .
ईशा फणकाऱ्याने तिथून निघून जाते . तितक्यात शाल्व चे आई ssss टॉवेल असे ओरडणे सुरू होते आणि रमा लगबगीने त्याच्या रूम मध्ये जाते .
प्रवेश तिसरा !..
स्थळ :
(ईशाच्या आईचे घर ,पेठेतला एक जुना वाडा त्यातलेच एक जरा ऐसपैस घर )
बाबा : ईशाशी बोललीस का तु मालती ? काल एकाएकी घरी आली तेव्हापासून एक शब्दही बोलत नाहीये , तिकडे काही झालं असेल का?
आई : तिकडे काय होणार ? त्या रमा ताई , मुंगी सुद्धा वाटेत आली तर आधी मुंगीला जाऊ देतील , तिला ओलांडून पुढे जायच्या नाहीत . आणि शाल्व सुद्धा आई सारखाच वाटतो स्वभावाने . आपली ईशाच जरा फटकळ आहे बोलायला , जरा म्हणून जिभेला धरबंद नाही . तिनेच काहीतरी केलं असणार . एक -दोन दिवस जाऊ देत जरा ताळ्यावर आली की , आपण होऊन सांगेल .
बाबा : “ मी काय म्हणतो पण विचार ना तुच ,कशाला वाट बघतेस तिने आपण होऊन बोलण्याची ? “ यावर आई काही न बोलता ऑफिसला जायच्या तयारीला लागते , ईशा चे वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे तिच्या खोलीत ती लॅपटॉप पुढे बसलेली असते . बाबांना शेवटी रहावत नाही ते तिच्या जवळ जाऊन बसतात ,
बाबा : ईशा बेटा , काल आल्यापासून , तु एक शब्दही बोलली नाहीस ,ना तिकडच्या कुणाचा फोन तुला आला , तिकडे सगळं ठीक आहे ना ?
ईशा : मी घर सोडून आलेय बाबा !!
बाबा : (डोळे विस्फारून ) काय ???.... एवढ्या शांतपणे कशी सांगतेयस ? वेडी आहेस की काय ? असं घर सोडण्याएवढं काय एवढं आभाळ कोसळलंय ?
ईशा : बाबा हाच प्रश्न मी तुम्हाला विचारू शकते , मी घर सोडलंय म्हटल्यावर तुम्ही तरी एवढं आभाळ कोसळल्यासारखं एक्स्प्रेशन का देताय ? तिथे काही गोष्टी अशा आहेत ज्या मला पटत नाहीत , उगाच एकमेकांना आवडत नसताना एकत्र राहायचं मला पटत नाही . म्हणून आले निघून .
बाबा : रमा ताईंना सांगितलंयस ?आणि शाल्वला ?
ईशा : हो , दोघांनाही रीतसर सांगून आले
बाबा : मग ? ते हो म्हणाले ?
ईशा : हो कसे म्हणतील ते ? आईंनी चक्कर आल्याचं नाटक केलं आणि शाल्व ‘ही कशी सनकी आहे, माझ्या आईला किती त्रास देतेय ‘अशा चेहेऱ्याने आईला सावरत राहिला ,माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही त्याने .
बाबा : (मान हलवत.. ) हे बरोबर नाही केलंस तु ईशा , तुला काही प्रॉब्लेम येत होता तर निदान आधी फोन करायचा मी आणि तुझी आई आणि आपली काळ्यांची लोकं आली असती काही तोडगा निघाला असता , अशी कशी एकदम तु फट्कन निर्णय घेतेस ? काय भातुकली आहे का ही ? मनात येईल तेव्हा मोडायला ?
ईशा : पण का करायचा मी तुम्हाला फोन बाबा , मी आता कमावती आहे ,कायद्याने सज्ञान आहे माझे निर्णय मी घेऊन शकते , आणि तसंही मला कुठेही अड्जस्ट करायचं नाही आणि कॉम्प्रोमाइज तर मुळीच करायचं नाही , मन मारून जगायचं नाहीये मला , बाबा तुमची आख्खी पिढी मी पहिलीये ,कॉम्प्रोमाइजच्या नावाखाली कुढत जगता तुम्ही , एनी वे मला आत्ता क्लाएंट कॉल आहे ,आपण बोलू रात्री निवांत . यावर बाबा खांदे पडलेल्या अवस्थेत बाहेर जातात ,आणि ईशा तिच्या कॉल वर बिझी होते .
ईशाचे काम दिवसभर चालू असते , शिवाय रात्रीही ती लॅपटॉप पुढेच बसलेली असते , बाबा दोन वेळा उठून बघतात , मध्यरात्रीही तिच्या खोलीतला लाईट चालूच असतो , पहाटे पहाटे तो बंद होतो .
आई : हे बघा तुम्ही असं टेन्शन घेऊ नका , ईशू फटकळ असली तरी समजूतदार आहे , आत्ता रागाच्या भरात आली असेल पण नंतर विचार करेल ती यावर नक्कीच . डोकं थंड झालं की जाईल परत .
बाबा : आणि नाही गेली तर ?
यावर आई एकदम स्तब्ध होते , दोघेही हताश चेहेऱ्याने बसतात .
प्रवेश चौथा !..
आई आणि बाबा आणि रमा ताई चिंतातुर अवस्थेत बसले आहेत ,
रमा ताई : नक्की काय खटकतं तिला हेच मला कळत नाही , तरी तिला परकं वाटू नये , एकटं वाटू नये याची मी सतत काळजी घेते , तिचं हे असं निघून येणं फार लागलंय हो मला , असं वाटतं की मीच अपराधी आहे .
रमाताई खाली मान घालून रडू लागतात तशी ईशाची आई त्यांच्याजवळ जाऊन बसते आणि हातात हात घेत म्हणते ,
आई : चुक तुमची नाही , आमची आहे ,एकुलती एक मुलगी म्हणून ईशाला आम्ही खूप लाडात आणि स्वातंत्र्य देऊन वाढवलं आहे , तसंही आजकाल घरोघरी हीच परिस्थिती आहे , मुली ईतक्या स्वतंत्रपणे वाढवलेल्या असतात की स्वैर वागायला लागतात .
बाबा : मला पटत नाही , आपली ईशा वैचारिक स्वातंत्र्य घेते , फटकळ हि आहे , आततायी आहे , पण स्वैर नक्कीच नाही . जे स्वैर असतात त्यांना परिणामांची आणि दुसऱ्यांची मुळीच काळजी नसते . ईशू चं तसं नाही तिला काही गोष्टी खटकत असतील त्या तिने तिच्या पद्धतीने सांगून पण पाहिलं असेल पण योग्य तो परिणाम मिळत नाही म्हणून हे निर्वाणीचं पाऊल उचललं असेल तिने .
रमा ताई : अहो पण खटकत असेल जरी काही तरी त्यावर हा उपाय नाही ना , खरं तर मी म्हटलंही ईशाला की मयुरी आणि मी आम्ही दुसरीकडे राहू किंवा तिला इथे राहायचं नसेल तर त्या दोघांना स्वतंत्र राहू देत , पण ती कुठल्याच ऑप्शन ला नाही म्हणतेय .
आई : शाल्व चं काय म्हणणं आहे यावर ?
रमा : तो काय म्हणणार ? तो तिच्यापेक्षा जास्त हट्टी आहे , ती गेली आहे तर तिने आपण होऊन परत यावं म्हणतो , मी तिला जा म्हणालो नाही आणि ये हि म्हणणार नाही .
यावर तिघे जण आपल्या वेळी असं नव्हतं आणि आजकालची मुलं , लोक काय म्हणतील किती नावं ठेवतील , घराण्याची अब्रू वगैरे विषयावर चर्चा करत बसतात , मूळ मुद्दा बाजूला राहतो .
प्रवेश पाचवा !.
ईशाला माहेरी येऊन काही महिने झाले आहेत , लग्नापूर्वीच तिचं रूटीन पुन्हा चालू झालं आहे , तिच्या कामात ती तल्लख आहेच त्यामुळे कंपनीने तिला वरच्या पोस्ट वर घेतलेले आहे ,शिवाय तिला परदेशातही कंपनी तर्फे पाठवणार आहेत ,त्यामुळे आता ती अधिकच यशस्वी झाली आहे , शाल्वचा आणि तिचा अजून घटस्फोट झाला नाहीये , रमा आणि मयुरी अधून मधून ईशाला भेटायला येत असतात , तिला घरी चलायचा आग्रह करत असतात पण जोवर शाल्व ला त्याची चूक कळत नाही आणि तो माफी मागत नाही तोवर मी येणार नाही हे धोरण ईशा ठेवते , त्यांच्या संसाराचे असे भरीत झालेले बघून मयुरी आपला संन्यास घेण्याचा विचार पक्का करते .
मयूरी : आई येत्या ‘गुरु पौर्णिमेला ‘ मला संन्यास दीक्षा मिळणार आहे पण त्यापूर्वी तुझी परवानगी लागेल मला असं गुरुजींनी सांगतिलंय .
रमा हताश चेहेऱ्याने ) कुठली आई आपल्या तरुण आणि देखण्या मुलीला अशी परवानगी देईल ? हे गेल्यानंतर तुम्हा दोघांकडे बघून दिवस काढायचे ठरवलं होतं मी ,शाल्व च लग्न करून दिलं , वाटलं होतं नातवंडात रमेन , पण त्याची बायको अशी घर सोडून गेली , आता तु ही चाललीस , अशा वेळी मी काय करायचं ? ईशा ला सुद्धा मी माझ्या मुलीसारखं मानलं , मलाच नाही नाही ते बोलून गेली , काय करू माझ्या हाताला यश च नाही .(रडायला लागते )
मयुरी : आई प्लिज रडू नकोस , तुझी ईच्छा नसेल तर नाही घेत मी संन्यास , तुला दुखावुन काहीही मिळणार असेल तर मला ते नको . फक्त एक विनंती आहे पुढे कधीही मला लग्नाचा मात्र आग्रह करू नकोस . आणि मी काही दिवस मरकळ ला जाते आहे , गुरुजींच्या आश्रमात निदान त्याला तरी नाही म्हणू नकोस .
रमा : बरं तुला हवे ते कर. मी काय आज आहे उद्या नाही ,माझ्या डोळ्यादेखत तुमचं चांगलं व्हावं एव्हढंच वाटतं मला , ईशा अशी निघून गेली त्याची मनाला फार खंत लागलीये गं ,कशातही मन रमत नाही ,आला दिवस ढकलायचा असं चाललं आहे माझं .” यावर मयुरीला वाईट वाटते ती रमा जवळ येऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणते .
मयुरी : आई अगं ती तुझ्यामुळे गेली नाहीये , दादा आणि तिच्यात काही वाद आहेत , तिने घर सोडल्यापासून दादाने एकदाही फोन केला नाही तिला त्याचंही वाईट वाटत असेलच ना ?
रमा : हो ना , शाल्व ने असं करायला नकोय , जावं भेटावं आणि तिचा काय तो राग -रुसवा असेल तो काढून यावा त्याने , मला नाही पटत त्याचं हे वागणं
मयुरी : आई तु का नाहीस बोलत दादाशी , एकदा खडसावून विचार ना त्याला .
रमा : मी ? नाही गं बाई , माझ्यावर ओरडला म्हणजे ?
मयुरी : अगं आई कशाला ओरडेल ? आणि जर ओरडलाच तर समजून सांग त्याला , आणि तुझ्या ओरडा खाण्यामुळे जर त्याचं घर पुन्हा उभं राहिलं तर ते नको आहे का तुला ?
रमा : तु जा बरं तुझ्या कामाला , उगीच माझ्या मागे लागू नका , एकतर हे गेल्यापासून मी एकटी पडलेय ,तुमच्या दोघांना वाढवता वाढवता म्हातारपण कधी आलं ते ही कळलं नाही , त्यात हे गुडघ्याचं दुखणं , माझं मलाच झेपेनासं झालंय , (गुडघ्यावर हा ठेवत, आत निघून जाते )
ती गेली त्या दिशेने मयुरी हताश होऊन बघत राहते .
प्रवेश सहावा !.
ईशा आणि मयुरी एका कॅफे मध्ये बसल्या आहेत , दोघींचेही चेहेरे गंभीर आहेत , समोरच्या खाद्य पदार्थांकडे त्यांचे लक्ष नाहीये ,
मयुरी : अगं वहिनी सुरुवात कर , गार झालेला गिळगिळीत पास्ता खाण्यात काय पॉईंट आहे ?
ईशा : हो खाते , मयुरी मला एक सांग आपण ईथे का आलोय ? तु माझ्याशी ‘घरी चल ‘ या विषयावर बोलयला आली असशील तर मी जाते . माझा वीक एन्ड मला एन्जॉय करायचा आहे . मनस्ताप नको आहे मला .
मयुरी : तिच्या हातावर हात ठेवत , ईशू चील ! !.. मी तुला घरी चल म्हणायला नाही आले , मात्र एक मैत्रीण म्हणून , एक सखी म्हणून तुझ्या वेदना समजून घ्यायला आलेय , कारण माझ्याशिवाय त्या कोणी समजावून घेऊ शकेल असं मला वाटत नाही .
ईशा : असं काही नाही भ्रम आहे तुझा , माणूस पक्षपाती असतो , आपल्या माणसांबद्दल सत्य पचवायला तयार होत नाही त्यापेक्षा दुसऱ्यावर आरोप करणं त्याला सोपं वाटतं .
मयुरी : मान्य आहे , पण मग एक नणंद म्हणून तरी मला अधिकार आहे का तुला जाब विचारण्याचा , की आपलं घर सोडून तु का आलीस ?
ईशा : तो जाब तुझ्या भावाला आणि आईला का नाही विचारतेस ?
मयुरी : झालंय माझं विचारून ,त्यांना तेवढी समज आहे असं मला वाटत नाही , तु मान्य कर किंवा करू नकोस पण तुझा कोंडमारा झालेला आहे हे मला कळतंय . तु कितीही आधुनिक असलीस आणि कर्तृत्ववान असलीस , फायनान्शिअली इंडिपेंडंन्ट असलीस तरीही कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं यासाठी आसुसलेली आहेस , कोणीतरी कशाला? दादानेच समजून घ्यावं असं तुला वाटतं आहे हो ना ?
(ईशाचे डोळे पाण्याने भरतात ) तशा अवस्थेतच खाली मान घालून ती पास्ता खाऊ लागते .
मयुरी : वाहिनी बोल ना गं काहीतरी .
ईशा : (आता थोडी सावरली आहे ) तुला काय वाटतं ? या सगळ्याला कोण जबाबदार आहे ? आमचे दोघांचे ईगो ? की माझा ईगो ? माझं कर्तृत्व ? माझे आई बाबा ? यापैकी कोण जबाबदार आहे ?
मयुरी : कोणतीही एक गोष्ट जबाबदार आहे असं वाटत नाहीये मला . पण येस या संगळ्यांपैकी थोडी थोडी प्रत्येक गोष्ट .
ईशा : बघ मी म्हटलं ना , तु ही लोकांच्याच सुरात सूर मिसळलास ना ?
मयुरी : मला नाही समजलं तर तु सांग , तुला काय वाटतं , कुठली गोष्ट जबाबदार आहे ?
ईशा : तुझी आई !!!!..
मयुरी : (ताड दिशी उठून उभी राहत) , मला वाटलंच माझ्या आईवर कशी घसरली नाही, तुमच्या दोघांच्या भांडणांशी तिचा काडीचा तरी संबंध आहे का ? एवढी साधी भोळी माझी आई ,दिवस रात्र तुमच्या दोघांच्या सुखासाठी धडपडते बिचारी आणि तु तर तिच्यावरच आरोपपत्र दाखल केलंस , कितीही शिकलीस तरी तु सुद्धा टिपिकल निघालीस की .
ईशा : हळू , बैस खाली , लोक आपल्याकडे बघतायत .
मयुरी तणतणत खाली बसते ,पण दोघींमध्ये काही सुसंवाद होत नाही , दोघी आपापल्या मार्गाने निघून जातात .
प्रवेश सातवा !.
मरकळ येथील आश्रमात मयुरी तिच्या वयाच्या ईतर मुलींबरोबर काम करता करता गप्पा मारते आहे , काही मुली बागकाम करतायत तर काही झाडलोट , आश्रमातील सेवकांची गडबड चालू आहे ,पहाटे चार वाजता उठून ध्यानधारणा ,मग सात्विक नाश्ता , त्यानंतर प्रवचन आणि सत्सन्ग , दुपारी भोजनोत्तर विश्रांती किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी त्यानंतर प्रार्थना आणि रात्री नऊ वाजताच झोपी जाणे. असा एकंदरीत दिनक्रम आहे , दहा दिवस शांत आणि छान वाटल्यामुळे मयुरी काही महिने ईथेच राहायचे ठरवते.
मयुरी : शिवप्रया तु ईथे किती दिवसांपासून आहेस ? मी पण राहणार आहे ईथे काही दिवस . हा निसर्गरम्य परिसर , गुरुजींचं प्रवचन , तुमच्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर असलेलं समाधान आणि मुख्य म्हणजे ईथे गॉसिप , हेवे-दावे , माझं -तुझं , चढा -ओढ यापैकी काही नाही . त्यामुळे मला खूप आवडलाय हा आश्रम .
शिवप्रिया : हसत.. हो SSS रहा ना , तुझी ईच्छा असेल तितके दिवस रहा ..
काही कालावधी उलटल्यानंतर …
रमा : हॅलो हॅलो , मरकळ च्या आश्रमाचाच फोन आहे ना हा ?मयुरी जातेगावकर ला बोलवता का जरा ? हो तिच्याशी बोलायचंय , मी आई आहे तिची . अहो काय काम म्हणून काय विचारता ? माझ्याच मुलीशी बोलायचंय ते तुम्हाला का सांगू मी ? बोलवा तिला .. मयुरी फोन वर येते .. हॅलो मयुरी अगं किती दिवस राहणार आहेस अजून ? घरी नाही यायचं का बेटा ? अगं बाई हो का ? आजच निघणार आहेस का ? बरं बरं ...ये ये .. मी वाट बघतेय …
संध्याकाळी शाल्व येतो ,
रमा : अरे आजच येतेय म्हणतेय मयुरी , बरं झालं बाई घर कसं अगदी खायला उठलं होतं .
शाल्व : (शूज काढतो सॉक्स आणि शूज रॅक मध्ये ठेवत) हं ..आधीच ईशा नाही त्यामुळे घर कसं उदास वाटतंय , आता ही येतेय ते तरी बरं .
रमा : ईशाच्या नसण्याची सवय झालीय आता , तिचं काही वाटत नाही . नाही येत तेच बरंय .
शाल्व : आई हे काय बोलतेयस तु ?
रमा : (चेहेऱ्यावर एकदम भेदरलेले भाव आणून ) नाही नाही ,अरे म्हणजे चुकून बोलले मी , तसं काही म्हणायचं नव्हतं मला . म्हातारपणामुळे काही सुचत नाही बघ एकदम काहीही बोललं जातं .
शाल्व : आई तुझं नेहेमीचंच आहे हे ,आधी फट्कन काही तरी बोलायचं आणि मग नंतर सारवासारव करायची.
रमा : माझ्याकडे लक्ष नको देऊस रे तु , माझे काय दहा गेले आणि पाच राहिले , आज उद्या कधी पण जाईन .
शाल्व : मॉमी प्लिज स्टॉप दिस नॉन्सेन्स .. च्यायला सगळेच सोडून जायची भाषा का करतात कळत नाही . तु जेवायला वाढतेस का मला ? मी पट्कन हात पाय धुवून आलोच .
प्रवेश आठवा !.
मयुरी : काका ईशा वाहिनी आहे का ? मी मयुरी बोलतेय , कालपासून फोन ट्राय करतेय पण उचलत नाहीये ती , म्हणून तुम्हाला लावला .
ईशाचे बाबा : हो हो आहे हा , ईथेच आहे , देतो ..
मयुरी : ईशू बोलायचं होतं तुझ्याशी , प्लिज नाही म्हणून नकोस , मला माझी चूक कळली आहे , तुझी माफी मागायची आहे ,तु आहेस ना घरी , मी येतेय तासाभरात . जाऊ नकोस कुठे .
प्रवेश नववा !..
स्थळ : ( ईशाचे घर , .. ईशाचे बाबा अस्वस्थ पणे फेऱ्या घालतायत , ईशा शांतपणे हेड फोन लावून गाणी ऐकते आहे . तितक्यात बेल वाजते , मयुरी आलेली आहे , बाबा लगबगीने जाऊन दार उघडतात, मयुरी आत ईशाजवळ जाते )
मयुरी : हाय ! ...काय सुदंर दिसतेयस , डोळे बंद करून गाणी ऐकताना , मार डाला !!!...
ईशा : ए चावट … तुझ्या बॉयफ्रेंड शी बोल असं …
मयुरी : बोलीन की त्याच्याशी पण , मिळायला पाहिजे ना ..
ईशा : Don ’t tell me ..मयुरी माता आणि चक्क बॉयफ्रेंड ?
यावर दोघीही खळखळून हसतात .
ईशा : बोला , आज काय काम काढलं ?
मयुरी : काही नाही एक गंमत सांगायची होती तुला
ईशा : कसली गंमत ?
मयुरी : ईशू , दादा तुला खूप खूप मिस करतोय .
ईशा : असं तो म्हणाला तुला ?
मयुरी : नाही , मी ओळखलं .
ईशा : कसं ? काय ड्रिंक्स ,स्मोकिंग वाढवलंय की काय त्याने ?
मयुरी : नाही ,तीच तर गंमत आहे , ड्रिंक्स तर आजीबात नाही घेत , स्मोकिंग खूप कमी झालंय , आणि आजकाल दादा ना ,घरी आल्यावर शूज -सॉक्स मध्ये घालून ते व्यवस्थित रॅक मध्ये ठेवतो, हात -पाय धुवून जेवायला बसतो , ओला टॉवेल बेड वर टाकत नाही , सारखा आई हे दे ,आई ते दे असं म्हणत नाही , सगळं आपलं आपण घेतो . एकंदरीत शहाण्या मुलासारखा वागतो .
ईशाच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव येतात .
मयुरी : माझ्यावर विश्वास नसेल तर आपल्या लताबाईंना विचार , त्या सुद्धा साफसफाई करताना खुदु खुदु हसत म्हणत होत्या “रमाताईंना जमलं न्हाई पण ईशाताईंनी वळण लावलं साहेबास्नी “
ईशा : असं म्हटल्या ? बऱ्याच लक्ष ठेऊन असतात की , बघितलं तर नाकावरची माशी पण हलत नाही . ते सोड , तु कुठे गायब होतीस ईतके दिवस ?त्या दिवशी तणतणत निघून गेलीस , मला वाटलं संपलं सगळं आता तु ही दुरावलीस .
मयुरी : हो खरं तर त्या दिवशी आपण कॅफे मध्ये भेटलो त्यावेळेला मला तुझा खूप राग आला होता तु आईचं नाव घेतलं म्हणून ,त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी मरकळ ला आश्रमात गेले , थोडे दिवस मला छान वाटलं पण तिथेही गुरुजींच्या शिष्यांमध्ये चढाओढ बघितली आणि हळू हळू मला कळून चुकलं की आपण फँटसी मध्ये जगतोय , जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी भेद भाव हेवे दावे , द्वेष मत्सर हे असणारच आहे कारण हा मानवी स्वभाव आहे . फक्त विचारांनी आपण तो कंट्रोल करू शकतो एवढंच . त्यामुळे माझी आई असो किंवा कोणीही असो ते सगळे असेच आहेत . फक्त माझी आई आहे म्हणून ती महान आहे असं नाही . आई म्हणून तिने खूप त्याग केला असेल आमच्यासाठी पण म्हणून सासू म्हणून ती तशीच असेल हा समज चुकीचा आहे .तिच्या वरच्या अति प्रेमापोटी आम्ही नकळत तुझ्यावर अन्याय करत होतो . आम्हाला जे वाटत तिच्याबद्दल तेच तुलाही वाटायला हवं याचा अट्टहास करत होतो . हे माझ्या लक्षात आलं . मग मी ज्या दिवशी घरी आले त्याच दिवशी त्या दोघांचा संवाद ऐकला तुझ्याबाबतीतला आणि मग माझ्या मनाची खात्री झाली की तू म्हणालीस तेच बरोबर होतं . ईशा : काय ? (ईशाचे डोळे आता आनंदाने चमकत आहेत )
मयुरी : हेच की तुमच्या दोघांतल्या तणावाचं कारण आई आहे . तिने मनाने अजून दादाला स्वतः:शीच बांधून ठेवलाय , आणि त्याला किंवा तिला दोघांनाही ते कळत नाहीये . शाल्वची बायको म्हणून तिने तुला जरी accept केलं तरी त्याच्या सर्वात जवळचं माणूस तु असावंस हे तिला मान्य नाही . आणि हे तिचे गुपित बाहेर पडले की ती मग बचावासाठी म्हातारपण , एकटेपण , असहायता या ढालींचा वापर करते ज्यामुळे दादा आणि मी तिला हवे तसे वागतो ,आणि हे आमच्या लक्षातही आले नव्हते ईतके दिवस कारण मायेचा पडदा ,दुसरं काय ?
ईशा : एक सुस्कारा सोडत , मयु i miss him very much !..
मयुरी : तिच्या हातावर हात ठेवत , ईशू चल ना आपल्या घरी , मला आणि दादाला तु हवी आहेस . आईचं मनावर घेऊ नकोस ती बदलणार नाही . पण दादा बदलला आहे तेवढं पुरेसं नाही का तुला ?
ईशा : मग तो स्वतः:हुन एकही फोन किंवा मेसेज का नाही करत ?
मयुरी : ईशू तु करून टाक ना माफ यार , त्याने काही फार मोठा गुन्हा केला नाहीये .
ईशा : बरं , तू एवढ्या काकुळतीला आली आहेस , तर केलं तुझ्या दादाला माफ . चल तु भी क्या याद करेगी …
मयुरी : थँक्स गं , माझी लाडकी ईशू ,!..
असं म्हणूंन ईशाला मिठी मारते आणि दोघी आनंदाने हसतात .
समाप्त !
तरीही shalv ने एकतरी फोन
तरीही shalv ने एकतरी फोन करायला हवा होता, मगच तिने जायला हवं होतं
छान लिहिलंय
वीस पंचवीस दिवस आमरण उपोषण
वीस पंचवीस दिवस आमरण उपोषण केल्यावर मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोपऱ्यावर पोचलेले असताना शिळा वडापाव खाऊन उपोषण तोडण्यासारखा फील आला शेवटी !!
किल्ली , राजा मनाचा :
किल्ली , राजा मनाचा : प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार , शाल्व ने सॉरी म्हटलं नाही हे मी सहेतुक टाकलेलं आहे कारण आजकाल सॉरी या शब्दाला फार महत्व आलं आहे , त्याने होत काहीच नाही ,फक्त समोरचा माणूस आपल्यापुढे झुकला याचं समाधान मिळत म्हणजेच आपला अहंकार सुखावला जातो , पण त्यापेक्षा ज्या अर्थी समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागते आहे त्याचाच अर्थ तिचे आपल्यावर प्रेम आहे आणि आपला पटल आहे असा होऊ शकतो आणि तो समजून घेतला तर नातं कुठलीही भेग न पडता अखंड प्रेमाचं राहू शकतं असा माझा विचार आहे कारण व्यक्ती तितक्या प्रकृती , प्रत्येकाला express होणे जमतेच असं नाही ,म्हणून त्याला सोडून द्यावे असे मला वाटते , बाकी प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते .