दिवाळी

Submitted by तुषार विष्णू खांबल on 4 November, 2023 - 08:39

दिवाळी
शब्दांकन : तुषार खांबल
१. धनत्रयोदशी
घरात अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या रमेशला आज त्याच्या मुलांनी दिवाळीच्या खरेदीसाठी भंडावून सोडले होते. “संध्याकाळपर्यंत सर्व काही सुरळीत होईल” असे खोटे आश्वासन देऊन रमेश घराबाहेर पडला खरा; पण परत कधीही घरी न जाण्याचा निर्णय घेऊनच. आपल्या कुटुंबाच्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही, काय करायचे असे जगणे, हा विचार आज सतत त्याच्या डोक्यात घोळत होता आणि तसाच तो मिळेल त्या मार्गाने पुढे जात होता.
वडिलांच्या निधनानंतर रमेशने त्याची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली होती. अपार मेहनत करून भावंडांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांची लग्ने लावून दिली. यात त्याने कोणतीही तडजोड केली नाही. पण हे करत असताना आपल्या कुटुंबाचे भविष्य अंधकारमय होईल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. आयुष्यात व्यवस्थित स्थिरावर झाल्यानंतर आपली भावंडे आपल्याला साथ देतील हि त्याची अपेक्षा फोल ठरली. मदत करणे तर सोडाच परंतु वडिलोपार्जित संपत्तीमधील आपला हिस्सा घेऊन ते कायमचे वेगळे झाले आणि इथेच रमेशच्या कुटुंबाची वाताहत सुरु झाली. उरलेल्या जागेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता श्यक्य होत नव्हते म्हणून रमेशने सरळ मुंबई गाठली. शिक्षणाअभावी त्याला एका कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करावे लागत होते. भाड्याचे घर आणि महिन्याचा खर्च याची सांगड घालता घालता अक्षरशः जीव मेटाकुटीला येत होता. परंतु कसे तरी दिवस ढकलत आयुष्य चालवत होते. यात त्याला त्याच्या पत्नीने आणि मुलांनी मोलाची साथ दिली. परंतु लहान मुले ती. आपल्या इच्छा किती मारणार. आज त्यांनी रमेशकडे दिवाळीच्या खरेदीसाठी तगादा लावला होता. आणि याच गोष्टीच्या विचाराअंती रमेश घराबाहेर पडला.
चालत चालत तो कधी रेल्वेस्टेशनला पोचला हे त्याला देखील कळले नाही. तिथे असलेल्या बाकड्यांवर तो बराच वेळ बसून होता. शेवटी त्याने आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. एव्हाना त्याच्या घशाला कोरड पडली होती. सार्वजनिक नळावरचे पाणी पिऊन तो चालू लागला.
फलाट उतरून आता तो थेट रुळावर चालत होता. कोणताही आवाज त्याला आता ऐकू येत नव्हता. त्याची पावले हळूहळू पुढे सरकत होती. इतक्यात त्याला बाजूच्या रुळावर ट्रेन येताना दिसली. त्याने वर आकाशाकडे पाहून देवाची क्षमा मागितली. आपण खूप प्रयत्न केले पण आपल्या कुटुंबाला सुख देऊ शकलो नाही याबद्दल त्याच्या मनातील सल आता क्षणोक्षणाला वाढत होती. तो ट्रॅक क्रॉस करून समोरच्या रुळावर जाणार इतक्यात त्याच्या फोन ची रिंग वाजली. गावावरून शेजारच्या नितीनचा फोन आला होता. उचलावा कि न उचलावा अश्या संभ्रमात असताना शेवटी त्याने फोन उचलला.
"हॅलो"
"हॅलो रम्या, अरे नितीन बोलतोय"
"हा बोल"
"अरे अभिनंदन, तू लखपती झालास"
"उगाच कशाला चेष्टा करतोय, काय काम आहे ते सांग माझ्याकडे वेळ नाहीय"(थोडा त्रासिक आवाजात रमेश उत्तरला)
"अरे खरंच सांगतोय, सरकारने काढलेल्या धरणं प्रकल्पामध्ये तुझ्या नावाची जमीन जाणार आहे आणि त्याच्या बदल्यात तुला भरपूर पैसे मिळणार आहेत. तू ताबडतोब गावी निघून ये"
रमेशचा त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. आपलं नशीब असे पालटेल असं त्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्याने समोर पहिले. ट्रेन फलाटावरून पुढील प्रवासासाठी निघून गेली होती. त्रासलेल्या रमेशच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसत होता. आत्महत्येच्या विचारांची जागा आता दिवाळीच्या खरेदीने घेतली होती. घरी गेल्यावर त्याने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबाला दिली. मुलांच्या शाळेला सुट्टी असल्याने सर्व लगेचच गावी जाण्यास निघाले. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर बरोब्बर धनत्रयोदशीच्या दिवशी २५ लाख रुपयांचा धनादेश त्याच्या हाती पडला. कित्येक वर्षानंतर यंदा त्याच्या कुटुंबाची दिवाळी आता सुखमय होणार होती.

२. पहिली अंघोळ (नरकचतुर्दशी)
दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होणार होती म्हणून सर्व बच्चे कंपनी खुश होती. पण त्यांचा हा आनंद फार काळ काही टिकला नाही. सोसायटीचे सर्वात जुने रहिवाशी आणि अध्यक्ष प्रकाश काका यांनी सोसायटीच्या आवारात कोणीही फटाके वाजवू नयेत असा वटहुकूम काढला आणि सर्वांच्या आनंदावर पाणी फेरले.
क्षणार्धात सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली. ऐन सुट्टीत मुलांचा कलकलाट असणारी सोसायटी आता निरव शांततेमुळे भकास वाटत होती. सर्वांनाच त्यांच्या या एकतर्फी निर्णयाचा रागच आला होता. परंतु सदैव तिरसट बोलणे आणि नेहमी वाद करत राहणारे व्यक्तिमत्व म्हणून सहजासहजी कोणीही त्यांच्या वाटेल जात नसे; आणि याच गोष्टीचा ते सदैव फायदा घेत आले होते.
अखेर दिवाळीचा दिवस उजाडला. पहाटेपासून फटाक्यांच्या आवाजाने जागी होणारी सोसायटी आज शांतपणे उभी दिसत होती. प्रकाशकाका आता घराच्या बाहेर पडले. नियमाचे कोणी उल्लंघन करणार नाही याची ते जातीने पडताळणी करणार होते. त्यांची जणू हि खोडच होती असे म्हणायला काही हरकत नाही. खाली उतरत असताना काही मंडळी त्यांच्या समोरून जात होती. त्यांच्या नजरेतील राग हा त्यांना स्पष्टपणे जाणवत होता; परंतु त्यांना याचा काहीही फरक पडत नव्हता. हळूहळू सर्व पाहणी करत ते आता ते शेवटच्या मजल्यावर उतरत होते. लहान मुले भीतीयुक्त चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत होती. काकांनी एक रागीट कटाक्ष त्यांच्याकडे टाकला. परंतु नेमका याचवेळी त्यांचा तोल गेला आणि ते सरळ पायऱ्यांवरून घसरत खाली कोसळले. कसला आवाज आला म्हणून सर्व घराच्या बाहेर आले. समोर काकांना बेशुद्ध अवस्थेत पडले होते. काय घडले कोणालाच काही समाजात नव्हते. शेवटी मुलांनी पुढे येऊन सर्व घटना सांगितली.
हळूहळू सर्वजण काकांभोवती जमा झाले. दोन तरुण मुलांनी जाऊन रिक्षा बोलावून आणली. त्यांना घेऊन सर्व हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाले. सोसायटीतील जवळपास सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये होते. काकांवरील रागाची जागा आता त्यांच्याविषयीच्या काळजीने घेतली होती. डॉक्टरांनी तपासणी करून काळजीचे कारण नसल्याचे सांगितले. वयोमानानुसार आणि अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आली. तसेच त्यांना काहीवेळाने घरी घेऊन जाऊ शकता असे सांगितले. सर्वांचा जीव आता भांड्यात पडला होता. काही मंडळी आता घरी निघाली. उर्वरीत ४-५ जण देखील थोड्यावेळाने काकांना घेऊन घरी निघाले.
प्रकाशकाकांच्या मुलाने म्हणजे प्रतीकने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले परंतु एकुलता एक मुलगा होता म्हणून काकांनी कसलाही विरोध केला नाही. दोनच महिन्यात त्यांच्या सुनेने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. दररोज काही ना काही कारणांनी ती घरात भांडणे करू लागली आणि या सर्वांचे खापर ती तिच्या सासूवर फोडत होती. शेवटी तिने वेगळं राहण्यासाठीचा निर्णय आपल्या नवऱ्याला सांगितला आणि काही दिवसातच त्यांनी काका आणि काकुंसोबतचे संबंध कायमचे संपवून आपल्या नवीन घरात राहायला निघून गेले. त्यांच्या अश्या वागण्याचा काकूंनी धसका घेतला. काही महिन्यातच त्यांची प्राणज्योत मालवली; आणि काका कायमचे एकटे पडले. शेजारी तरी किती लक्ष देणार. सर्व जण आपापल्या व्यापात. त्यामुळे आपलं या जगात कोणी नाही. सर्व मतलबी आहेत अशी समजूत करून घेतली आणि सर्वांशी तिरसटपणे वागू लागले.
काही वेळात सोसायटीच्या पटांगणात रिक्षा उभी राहिली. काका सोबतच्या मुलांचा आधार घेत रिक्षातून खाली उतरले. समोर सर्व सोसायटीतील मंडळी त्यांना पाहण्यासाठी आतुर झाली होती. त्यांना बरे होऊन आलेले पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. काकांना खाली खुर्चीवर बसविण्यात आले. पुष्कळ काही बोलायचे होते. पण कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता. शेवटी लहान मुले पुढे झाली आणि म्हणाली
"आजोबा तुम्ही काळजी करू नका. आम्ही कोणीही फटाके वाजवणार नाही. तुम्हाला त्रास होईल असे आम्ही कधीच वागणार नाही. पण तुम्ही असे एकटे एकटे राहू नका. तुम्ही रोज आमच्या सोबत खेळात चला. मग तुम्हाला असं डॉक्टरकडे जावं लागणार नाही."
इवल्याश्या मुलांकडे हा इतका समजूतदारपणा कुठून आला याचाच विचार सर्वजण करत होते. पहिल्यांदाच काका कोणासमोर तरी अनुत्तरित झाले होते. मुलांच्या या बोलण्याने सरळ त्यांच्या हृदयाला स्पर्श केला होता. मुलाच्या आणि नातवाच्या आठवणी ज्या त्यांनी इतके वर्ष दाबून ठेवल्या होत्या त्याचा बांध आज फुटला होता. त्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये आज खऱ्या अर्थाने त्यांची पहिली अंघोळ साजरी होत होती.

३. बलिप्रतिपदा (पाडवा)
प्रज्वल आज जरा जास्तच अस्वस्थ वाटत होता. एरव्ही दिवाळी म्हणजे त्याचा उत्साह काही औरच असायचा. कंदील बनवणे, घराला रोषणाई करणे, रंगरंगोटी करणे, आईला फराळात मदत करणे, सर्वात पुढे पुढे. पण आज मात्र त्याचा तो उत्साह कुठे दिसत नव्हता.
मे महिन्यात त्याच लग्न झालं. त्याची पत्नी प्रेरणा मुंबईत एका नामांकित कंपनीत जॉब करत होती. प्रज्वल तालुक्याला एका छोट्याश्या कारखान्यात काम करीत असला तरी व्यवस्थित कमावता होता. प्रेरणाला तिचा जॉब सोडता येणार नव्हता कारण असा जॉब पुन्हा मिळणे शक्य नव्हते. म्हणून तिने आपल्या बॉसशी बोलून प्रज्वलसाठी मुंबईत एका नोकरीची व्यवस्था केली आणि तो तिच्यासोबत मुंबईला निघून आला.
यापूर्वी तो अनेक वेळा मुंबईला आला असला तरी पहिल्यांदाच असं आईवडिलांपासून दूर राहिला नव्हता. खास करून दिवाळीत तर त्याला त्यांची प्रकर्षाने आठवण येत होती. रोज फोन करून चौकशी होत होती. पण जी मज्जा प्रत्यक्ष सहवासात होती ती या फोन वरच्या संभाषणात नव्हती.
इकडे प्रेरणा मात्र भलतीच खुश होती. प्रज्वलचा त्रासलेला चेहरा मात्र तिच्या आनंदावर विरजण घालत होता. तिने सतत त्याला हसवण्याचा प्रयत्न केला. परंतु उसने हसू आणून तो वेळ टाळण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी न राहून तिने त्याला आजच्या दिवसाची (दिवाळी पाडवा) आठवण करून दिली. तिने त्याला अंघोळीसाठी तयार राहण्यास सांगितले. नाखुशीने तो बाथरूम मध्ये गेला. प्रेरणाने त्याला सुगंधी तेल आणि उटणे लावून अंघोळ घातली. तिने खास त्याच्यासाठी आणलेला नवीन कुर्ता त्याला घालायला दिला. त्याचबरोबर आज पाडव्यानिमित्त त्या दोघांना तिच्या माहेरी जायचं आहे, तिकडे त्याच्या पाडव्यासाठी काहीतरी भेट तिच्या आईवडिलांनी आणली आहे असे सांगितले. तिने तिच्या आईवडिलांविषयी बोलताच पुन्हा याला आपल्या आई वडिलांची आठवण आली. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने ते तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही.
संध्याकाळी ६:०० वाजता ते दोघे तिच्या माहेरी जाण्यास निघाले. तो अजूनही अबोलच होता. ती त्याला समजावण्याचा असफल प्रयत्न करत होती. शेवटी ते तिच्या घरी पोचले. प्रज्वलच्या सासू-सासऱ्यांनी त्याचे चांगले आदरतिथ्य केले. पहिलाच पाडवा असल्याने सर्वजण खूप आनंदी होते. प्रज्वल देखील आनंदी असण्याचा दिखावा करत होता. जेवणे वैगरे झाल्यावर सासूबाईंनी जावयाला ओवाळले. आता सासऱ्यांनी जावयाला पाडव्याची भेट द्यायची आहे असे सांगितले. थोडावेळ थांबा तुमच्यासाठी आणलेली भेट घेऊन येतो असे म्हणून ते घराबाहेर पडले.
फटाक्यांच्या होणाऱ्या आवाजामुळे प्रेरणाने दरवाजा बंद केला. पुढील पाचच मिनिटांमध्ये दरवाजाची बेल वाजली. प्रेरणाने प्रज्वलला त्याची भेट अली असेल म्हणून दरवाजा उघडण्यास सांगितले. प्रज्वलने थोडासा चिडतच दरवाजा उघडला. पाहतो तर समोर त्याचे आईवडील उभे. समोरचे दृश्य पाहून त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याने स्वतःला चिमटा काढून हे स्वप्न नाही ना याची खात्री करून घेतली. इतक्यात पाठीमागून प्रेरणाच्या वडिलांनी घरात प्रवेश केला आणि प्रज्वलला विचारले "काय जावईबापू.... कशी वाटली पाडव्याची भेट??????" प्रज्वलकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. प्रेरणाने तिच्या सासूसाऱ्याना आदराने घरात घेतले. आणि बोलायला सुरुवात केली.
"प्रज्वल मला माहित आहे तुझं तुझ्या आई-वडिलांवर किती प्रेम आहे. परंतु काम सोडून मला गावी राहणे जमणार नव्हते. म्हणून मी मुंबईला परत येण्याचा निर्णय घेतला. तुझ्या जीवाची घालमेल मला स्पष्ट जाणवत होती. परंतु काय करावे याचा उलगडा मला होत नव्हता. मी नोकरी सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतला सुद्धा होता, आणि तसं गावी बाबांना कळवलं पण होत. यावर त्यांनी तसे न करण्याचा सल्ला मला दिला; परंतु तुझ्या होणाऱ्या त्रासाबद्दल काय करता येईल हे मात्र मला समाजात नव्हते. शेवटी पप्पांनी आई-बाबांशी बोलून त्यांना मुंबईला येण्यास तयार केले. आता ते कायम आपल्या सोबत राहतील. हीच तुझी दिवाळी पाडव्याची भेट त्यांच्यातर्फे तुला."
पाडव्यानिमित्त मिळालेल्या या सरप्राईज भेटीनंतर आजवरच्या दिवाळीपैकी हि दिवाळी प्रज्वलसाठी आयुष्यभर आनंद देणारी ठरली होती.

४. भाऊबीज
नुकतीच पंचाहत्तरी साजरी केलेले एकनाथराव यंदाच्या दिवाळीत थोडे गडबडीतच होते. दिवाळी संपल्यानंतर त्यांना त्यांचे राहते घर खाली करायचे होते. चाळ पुनर्विकास प्रकल्पात गेल्याने यंदाची दिवाळी हि या चाळीतील सर्वांचीच शेवटची दिवाळी होती. नवीन घरे मिळणार याचा आनंद आणि चाळ सोडण्याचे दुःख सर्वांच्याच चेहेऱ्यावर दिसत होते. काहीजण आधीच घरे खाली करून गेले होते तर काही करायच्या तयारीत होते. एकनाथराव आणि वत्सला काकू आपल्या घरातील सामानाची बांधाबांध करत होते. मदतीला त्यांची मुलगी आली होती.
यांची हि वडिलोपार्जीत संपत्ती. तीदेखील दक्षिण मुंबईत मोक्याच्या ठिकाणी. एकनाथरावांचे वडील जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी घेतलेली. एकनाथराव सर्वात मोठे चिरंजीव आणि त्यांच्या मागच्या दोन मुली असे सुखी कुटुंब जवळपास ४०-४५ वर्षे या चाळीत राहत होते.
काळ पुढे सरकत होता. बहिणींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या. एकनाथरावांचे देखील लग्न होऊन त्यांचा सुखी संसार आता या घरात गुण्यागोविंदाने सुरु होता. कालांतराने एकनाथरावांचे आई-वडिलांचे छत्र हरपले. हे घर आता एकनाथरावांच्या नावे झाले. वर्षे सारत होती तशी चाळीची अवस्था देखील बिकट होत होती. अखेर शासनाकडून चाळीच्या पुनर्विकासाची नोटीस आली. चाळीत आता रोज मिटिंग होऊ लागल्या. अखेर सर्वानुमते चाळीचा पुनर्विकास करायचे ठरले. जशी पुनर्विकासाची खबर आली तशी अनेक घरात वाटणीवरून भावंडा-भावंडांमध्ये वाद होताना दिसू लागले. याकारणास्तव अनेक बिऱ्हाडे आपली घरे विकून जाताना एकनाथरावांच्या दृष्टीस पडत होती.
एक दिवस अचानक एकनाथरावांना त्यांच्या बहिणीचा फोन आला. तिला देखील चाळीच्या पुनर्विकासाची बातमी मिळाली होती. जुजबी चौकशीनंतर तिने सरळ विषयाला हात घातला आणि घराचे पुढे काय करायचे ठरविले असे विचारले. एकनाथरावांना या गोष्टीची सर्वसाधारण कल्पना होतीच. त्यांनी देखील ते कोणालाच नाराज करणार नाहीत असे आश्वासन देऊन फोन ठेऊन दिला. आता सतत त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या घराचे तुकडे होताना दिसत होते. पण परिस्थितीसमोर ते हतबल होते.
दिवाळीचा दिवस उजाडला. सर्व काही सुरळीत असले तरी एकनाथरावांच्या चेहऱ्यावर ते तेज दिसत नव्हते. संध्याकाळी लक्षमीपूजनाचा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी वत्सला काकूंना आपण हे घर बिल्डरला विकून त्याचे ३ हिस्से करूया आणि बहिणींना त्यांचा हिस्सा देऊन आपण बाहेरगावी निघून जाऊया असे सांगितले. भरल्या घरात तेदेखील सणासुदीला असे काय अभद्र बोलत आहेत म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना सुचवले आणि विषय त्याठिकाणी बंद झाला.
दोन दिवसांनी भाऊबीज होती. यंदा एकनाथराव त्यांच्या बहिणींकडे जाण्यास उत्सुक दिसत नव्हते. आदल्या दिवशीच त्यांनी सामान आवरल्यामुळे थकवा जाणवत असें तब्येत देखील ठीक वाटत नसल्याचे वत्सला काकूंना सांगितले. वत्सलाकाकूंनी तोच संदेश आपल्या नंदांना दिला. आपला भाऊ यावर्षी आपल्याकडे का येत नाही हे त्या दोघींना आता समजले होते.
भाऊबीजेचा दिवस उजाडला. आज एकनाथराव झोपूनच होते. त्यांच्या फोनच्या आवाजाने त्यांना जग आली. पाहिलं तर पुन्हा बहिणीचा फोन होता. त्यांनी सरळ तो फोन काकूंकडे दिला आणि त्यांना बोलण्यास सांगितले. बोलून झाल्यावर दोन्ही बहिणी यंदा भाऊबीजेला आपल्या घरी येत असल्याचे काकूंनी एकनाथरावांना सांगितले. असे ऐकल्यावर एकनाथराव थोडे त्रस्त झाले. असो आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचे असा निर्णय मनाशी करून ते घराबाहेर पडले. बाजारात जाऊन त्यांनी चिकन आणून घरी दिले आणि बाहेर पेपर वाचत बसले.
साधारण ११.३०-१२.०० च्या सुमारास दोन्ही बहिणी त्यांच्या नवऱ्यांसोबत समोरून येताना दिसल्या. त्याजवळ आल्या तसे एकनाथराव उठले आणि आत जाऊन त्यांच्या सोबत बसले. साधारण गप्पा सुरु होत्या. थोड्या वेळाने काकूंनी सर्वांना जेवणे वाढली. सर्व आवरल्यानंतर काकूंनी ओवाळणीची तयारी केली. बहिणींनी एकनाथरावांना पाटावर बसविले. दोघींनी त्यांना ओवाळले. काकूंनी आणून ठेवलेल्या साडया एकनाथरावांनी दोन्ही बहिणींना दिल्या. एकनाथराव उठून बसणार तोच धाकट्या बहिणीने त्यांना पाटावर बसण्यास सांगितले. आपल्या सोबत आणलेला छान शर्ट तिने त्यांना भेट दिला. इतक्यात थोरल्या बहिणीने एक पिशवी त्यांच्या हातात दिली आणि ती उघडून पाहण्यास सांगितले. आत कोर्टाची कागदपत्रे होती. एकनाथरावांच्या सर्वांगाला घाम फुटला होता. हात थरथर कापत होते. ते काही बोलणार इतक्यात त्यांच्या बहिणींनी बोलण्यास सुरुवात केली.
"दादा आपल्या बाबांचे हे घर. याचा प्रत्येक कोपरा अन कोपरा तू आणि वहिनीने किती प्रेमाने सांभाळलाय हे आम्ही पहिले आहे. आम्ही आमच्या संसारात सुखी आहोत रे. आम्हाला पुष्कळ दिलंय देवाने. नवरा, मुले तर आहेतच. पण आई-वडिलांसारखी माया करणारा दादा आणि वाहिनी सुद्धा आहेत. आणि हे घर म्हणजे आमचं हक्काचं माहेर आहे. आमच्या मुलांचं आजोळ आहे. असं असताना आम्ही या घराचा हिस्सा मागू असं तुला कसं वाटलं रे. हाच का तुझा आमच्यावरचा विश्वास???? हि जी कागदपत्रे आहेत ना ती आम्ही आमचा हिस्सा मागण्यासाठी नाही तर आम्ही आमचा हिस्सा स्वखुशीने सोडत आहोत हे सांगण्यासाठी आहेत. ह्या संपूर्ण घराचा आजपासून तू एकटा मालक आहेस. आम्हाला फक्त तुझं प्रेम हवंय. बाकी काहीही नको. एक भाऊ म्हणून सदैव आम्हाला तुझा आधारच राहिला आहे आणि तो असाच यापुढेही असावा असे वचन आम्हाला या वर्षीची ओवाळणी म्हणून दे."
एकनाथराव आणि वत्सलाकाकू दोघांचेही डोळे पाणावले होते. मी चुकलो मला माफ करा असे म्हणून एकनाथरावांनी कडकडून आपल्या बहिणींना मिठी मारली. चाळीतली शेवटची भाऊबीज यासर्वांसाठी एक अविस्मरणीय आनंद देत होती.

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान आहेत कथा...अशा सकारात्मक कथा वाचायला नेहमीच आवडतं ....एकदम पाॅजिटिव्ह वाटतं...

छान

सर्वांचे मनःपूर्वक आभार..... यंदाच्या दिवाळीला अशीच सकारात्मक ऊर्जा आपल्याही आयुष्यात येवो ही शुभेच्छा

'पलभर के लिये कोई हमे प्यार कर ले झुठा ही सही'
हे गाणे आठवले.

काल्पनिक कथा आहेत माहीत असले तरी छान वाटले.

सर्व कथा पॉजीटीव आणि छान. भाषेचा ओघ पण छान.

(जरा भाऊबिजे ला चिकन अडखळायला झाले पण चालायचच Happy )
पुढील लेखनास शुभेच्छा!

चारही कथा आवडल्या. पॉजीटीव आणि छान

जरा भाऊबिजे ला चिकन अडखळायला झाले पण चालायचच >>> आमच्याकडे तर नॉनव्हेजच असते. उलट शाकाहार खाण्याचा वार असला की सगळे नाराज होतात.

सर्वांचे मनःपूर्वक आभार..... यंदाच्या दिवाळीला अशीच सकारात्मक ऊर्जा आपल्याही आयुष्यात येवो ही शुभेच्छा

Pages