आमचे धोत्रे गुरुजी (भाग २)

Submitted by मिरिंडा on 3 November, 2023 - 05:42

माझे विचार थांबेनात.ज्याअर्थी गुरुजींना इथे नसलेला सदाशिव दिसला आणि ते त्याच्याशी बोलत होते. याचा अर्थ त्यांना भास होत होते. खरंच दिशाचं म्हणणं ठीकच आहे.पण मानसोपचार तज्ज्ञ माहिती असणं आणि डॉक्टर माहिती असणं यात फरक आहे.तरीही मी चवकशी करायचं ठरवलं.ऑफिसला गेलो.जाताना गुरुजींना प्रेमाने झापून गेलो आणि वेळेवर जेवण्याचं वचन घेऊन गेलो.कामात दिवस कसा गेला कळलं नाही.संध्याकाळ झाली.काम चालूच होतं.आज तरी मी नऊच्या आत घरी जाणार नसल्याचं जाणवलं.एका मिटिंगसाठी बसलो होतो.चर्चा रंगात आली होती.अचानक दिशाचा फोन आला.मी बाजूला जाऊन वैतागून घेतला." काय आहे ? मला उशीर होणार आहे.तुम्ही जेऊन घ्या. गूरूजी जेवले ? " ..." मी काय सांगते ते ऐकून तरी घ्या." पण मी घाईघाईने म्हणालो, " मला वेळ नाही फोन ठेवून दे." ती काहीतरी बोलत होती. पण मी फोन डिस्कनेक्ट केला. पुन्हा मिटिंगमध्ये बसलो. दहा मिनिटांनंतर पुन्हा फोन आला. मी‌ काय आहे असं तिरसटासारखं विचारणार तेवढ्यात दिशा घाईघाईने म्हणाली, " अहो गुरुजी गेले .कळलं का गुरुजी गेले. " आणि तिला हुंदका फुटला. मी बॉसला थोडक्यात सांगितलं . माझं जाणं महत्त्वाचं आहे,हे पटवलं. त्यावर बॉस चिडून म्हणाला ," अरे यार प्रदीप , तुम सोडते नही. ये Important Meeting है." तरीही मी त्याचा रोष ओढवून घेऊन तात्काळ निघालो. माझी छाती धडधडू लागली. " गुरुजी गेले ?". गेले,? असे कसे गेले ?कुठे आणि कधी गेले? प्रश्नच प्रश्न !!! माझ्या मेहनतीवर पाणी फिरवलं गेलं. आता मी त्यांच्या अमेरिकेतल्या मुलाला काय सांगणार होतो ? जसा काही त्याचा मला फोन येणार होता. वास्तविक आम्हाला एकमेकांचे नंबर माहीत नव्हते.दिशाने नीट शोधलं होतं का ?. मी कसा तरी गाडी पकडून घरी पोहोचलो.
दरवाजा उघडाच होता. दिशा अस्वस्थपणे येरझारा घालत होती.मी आत शिरल्याबरोबर तिला हुंदका फुटला. मी बॅग भिरकावली आणि लिफ्टने खाली आलो. वॉचमनला विचारलं . पण त्याला कोण गुरुजी माहीत नव्हतं. कारण मी गुरुजी आल्याचं सेक्रेटरी सोडून कोणालाच सांगितलं नव्हतं. खाली काही निवृत्त लोक बसले होते पण त्यांना विचारण्यात अर्थ नव्हता.आता राहिले पोलिस ,ते सुद्धा कितपत प्रतिसाद देतील ही शंकाच होती. खरंतर मी खाली यायलाच नको होतं. घरी गेलो आणि हतबुद्ध पणे सोफ्यावर बसलो. त्यावर दिशा म्हणाली," अहो नुसते काय बसलात ? आपल्याला पो.स्टेशनला जायला हवं. कीर्ती आणि रचना घाबरून एका ठिकाणी बसले होते. मग माझ्या मनात काय आलं कोण जाणे. गुरुजी बाहेर जातीलच कसे ? त्यांना इथली काहीच माहिती नाही. मी त्यांच्या खोलीत शिरलो.मागोमाग दिशाही आली. मी बाथरूममध्ये पाहिलं पण ते रिकामं होतं.सहज म्हणून मी सगळीकडे नजर फिरवीत होतो.अचानक मी पलंगाखाली वाकून पाहिलं. गुरुजी तिथे त्यांचं पांघरुण पडलं होतं. मी सहज म्हणून पांघरूण ओढलं तर गुरुजी दिसले.ते अंगाची जुडी करून पडले होते.ते थरथरत होते. मी त्यांना बाहेर यायला सांगितलं. पण ते अडखळत म्हणाले," मी...मी बाहेर नाही येणार. सदाशिव मला मारील रे. मला मारु नका. ...मला मारु नका.त्यांच्या हातात जेवणाचं ताट होतं. अर्ध अन्न खाली सांडले होतं. त्यांचे हात आणि तोंड अन्नाने करवडले होते. मी दिशाला ते खाली असल्याचं सांगितलं. त्यावर तिने खाली पाहिलं होतं असं ती म्हणाली. त्यावरून आमच्यात थोडी बाचाबाची झाली. त्याचा अंदाज कोणालाही येऊ शकतो. त्यामुळे त्यात वेळ घालवीत नाही.कस़ंतरी चुचकारुन गुरुजींना बाहेर काढलं . त्यांना स्वच्छ केलं. ते बहुतेक जेवायच्या वेळेपासून म्हणजे पाचसहा तास तरी पलंगाखाली असावेत. मला दिशाचा चांगलाच राग आला. स्वतःचे आईवडील असते तर तू नीट शोधलंच असतंस ना. असं मी तिला म्हंटल्यावर ती काहीच बोलली नाही.पण तिच्या मनात काय आलं असावं, हे मी ओळखलं. ते माझे सुद्धा वडील नव्ह्ते. तरी मी इतकी काळजी का करीत होतो ...? का ...? कारण त्यांची मला घडवण्यातली निस्वार्थ सचोटी, दया, त्यांच्याबद्दल वाटणारी कळकळ ,त्यांच्याकडे न बघणारा त्यांचा मुलगा आणि त्यांच्या बद्दलची कणव . नाहीतर मी त्यांना घरी आणलंच नसतं. मी अर्थातच तिला काही बोललो नाही.पण एक नक्की त्यांच्यावर एकूण झालेला आघात,हे माझ्यासाठी महत्वाचं होतं.आता मात्र मला मानसोपचार तज्ज्ञ शोधणं भाग होतं. मी आमच्या ऑफिसमधल्या डिसूझाला विचारण्याचं ठरवलं. कारण त्याची आई मनोरुग्ण होती. नंतरचे दोन दिवस मी उशिराच ऑफिसला गेलो. त्या अवधीत गुरूजींना समजावून व नाश्ता वगैरे खायला घालून मी कामावर जात असे. मात्र मला आठवडाभर तरी डिसूझा भेटलाच नाही. तो कामावर दिसलाच नाही. एक दिवस संध्याकाळी घरी निघताना मात्र डिसूझा दिसला. त्याला भेटल्यावर त्याने त्याची आई गेल्याचं सांगितलं. मला जरा धक्काच बसला. आता त्याच्या डॉक्टरला भेटावं की नाही मला कळेना. मी दुसरा तज्ज्ञ शोधला. त्यांचं नाव होतं, " डॉक्टर मिराशी " मी त्यांच्या येणाऱ्या शनिवारची दुपारी चारची वेळ ठरवली.मला पहिलीत असताना मिराशी बाईंची आठवण झाली. त्याही वेळेस मला ते नाव विचित्र वाटलं होतं. माझ्या डोक्यात मिराशी नावाशी निगडित एक कल्पना होती. मिराशी म्हणजे भुस्कारलेली टोपी घातलेला, बंद गळ्याचा कोट घालणारा, खाली रेशमी पायजमा, अत्तराचा फाया कानात बाळगणारा,व गळ्यात सोन्या मोत्याच्या माळा घालणारा, गोल चेहऱ्याचा जाड मिशी राखलेला माणूस येतो. अर्थातच डॉक्टर मिराशी अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले उंचेपुरे, तोंडावर मिश्किल हास्य असलेले, साठीकडे झुकलेले गृहस्थ होते, ते वेगळं. हे अर्थातच मी त्यांना पाहिल्यावर कळलं.
शनिवार दुपार उजाडली. आम्ही तिघे डॉक्टर मिराशींच्या क्लिनिकमधे बसलो होतो. तुरळक गर्दी होती. जवळपास एक तास झाला.आतला पेशंट बाहेर येईना. मी स्वागतिकेला खुणेनेच किती वेळ लागेल ते विचारले. तिने सुद्धा खुणेनेच काय माहीत अशा अर्थी हात हालवले.दहा मिनिटांनंतर आतला पेशंट बाहेर आला. मग आमचा नंबर लागला. डॉ. मिराशींची केबीन बऱ्यापैकी मोठी होती. एका बाजूला चेकिंग साठी बेड होता.एका अर्थ वर्तुळाकार टेबलामागे डॉ. मिराशी बसले होते.वर उल्लेख केल्याप्रमाणे ते इंम्प्रेसिव्ह गृहस्थ होते.
गोड हसून ते म्हणाले," बोला , काय प्रॉब्लेम आहे ?
" मी गुरुजींची जमली तेवढी सगळी कथा सांगितली. त्यांना तपासून झाल्यावर डॉ. म्हणाले," बऱ्याच वर्षांपासून हेवी डिप्रेशन आणि अवहेलना झाल्यामुळे असं झालंय. त्यांनी गुरुजींना जुजबी प्रश्न विचारले. गुरुजी घाबरल्याने त्या प्रश्नांची उत्तरं अतिशय असंबद्ध रितीने दिली.मग डॉक्टरांनी फक्त स्वस्थ झोप लागण्याच्या गोळ्या दिल्या आणि पुढची तारीख देऊन आम्हाला निरोप दिला. आता पुढच्याच शनिवारी आम्डाला जायचं होतं . थोहाशा निराशेतच आम्ही घरी आलो.माझी अपेक्षा ते तपशीलवार चर्चा करून गुरुजींना नक्की काय झालंय ते सांगतील अशी होती.
असो. आम्ही रात्री आठ वाजेपर्यंत घरी आलो. येताना गुरुजी मधे मधे नशेत असल्या सारखे वागत होते.हे कोडं लवकर सुटणार नसल्याचे माझ्या लक्षात आलं.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Back to top