दरवर्षी दिवाळीत!

Submitted by छन्दिफन्दि on 29 October, 2023 - 00:42

आमची दिवाळी ३ plots वर होत असे.
एक गावाला, बिनाफटाके बिनारोषणाई बिनामित्रमंडळींची दिवाळी. आमची अगदी नावडतीच म्हणा ना! एखाद् दोन दिवळीचं तिकडे गेलो असू. म्हणजे आम्हाला ( मी आणि बहीण) गणपती गावाला अगदी साग्रसंगीत आवडे पण दिवाळीची मजा मात्र शहरातच येई, ठाण्याला आणि आजोळी पनवेलला.
सहामाही संपल्यावर लगेच बेत ठरत किल्ला करायचे. प्लास्टिकचे, मातीचे मावळे, दगड माती जमवाजमव करायची. दोन गट, त्यात आमचा मुलींची मेजोरटी वाला एक गट. बाजुच्या बिल्डिंग मधला मोठ्या मुलांचा दुसरा. त्यांचा किल्ला फारच दिमाखदार होई, पण आमचा जेमतेम उभा राहिलेला किल्ला कधीतरी रात्री-पहाटे ती (दुष्ट) मुलं सुतळी बॉम्ब लावून फोडून टाकत. अनुषंगाने मग थोडी भांडाभांडी, कावाकावी.
तेव्हा फटाक्यांचे भारी महत्व.
आधीच्या वर्षीचे फटाके चुकुन जर कोणाचे राहीलेले असतील तर ते उन्हात ठेवायला बाहेर निघत. फुलबाज्या, तडतडी, भुईनळे, भुईचक्र, बाण, लवंगी माळ, लक्ष्मीबार, ताजमहाल, सुतळी (अटॉम्) बॉम्ब (तो मात्र आम्ही नाही फोडला कधी) सगळी सामग्री जमा होई.
घराघरांतून बेसनाचे लाडू, चकल्या यांचे खमंग सुवास दरवळू लागे.
इकडे आमचे चार दिवसांचे नवीन कपडे, साड्या हे प्लानिंग सुरू होई. आकाश कंदील, पणत्या, उटणे, कार्टूं सगळं कसं एकदम व्यवस्थित.
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकरात लवकर उठायचं. पहिला फटाका कोण फोडतो ही एक छुपी स्पर्धा. तो तर पहाटे चारलाच शत्रू पक्षातील मुलं फोडत हे सांगणे न लगे. मुंबई-ठाण्याकडे हेच थोडे दिवस काय तो गारवा! उटणे वगैरे लावून कार्टं फोडून मोती साबणाने अभ्यंगस्नान उरकायचे. (किशोर वयात) साडी नेसून छान तयार व्हायचं. तोपर्यंत साडेसहा सात वाजत. मग सगळ्या मुली आम्ही कौपिनेश्वराला जायचो. कौपिनेश्वर मंदिर, तलाव पाळी, घंटाळी मंदिर छान सजून धजून आलेल्या तरुणाईने फुललेलं असे. (कोण किती भक्ती भावाने कुठल्या देवी देवतांच दर्शन घेई हे चाणाक्षांच्या लक्षात आलचं असेल) मग तळ्याला एक राऊंड मारायची, सागरकडे पावभाजी चापायची साडेआठ नऊ पर्यंत घरी.
घरी गेल्यावर सहाजिकच फराळाचा आग्रह होई तो यशस्वीपणे मोडून काढण्यात येई. कारण आई बनवत असताना लाडू, चिवडा, चकल्यांचे बोकाणे भरलेलेच असत. त्यामुळे नाविन्य संपलेलं असे.
सात वाजता अंधार पडला की फटाक्यांना सुरूवात होई. सुती साधे कपडे घालून फटाके फोडायचे. फटाक्यांची वात काढायची, उदबत्ती घेऊन हात जास्तीत जास्त ताणून फटाक्याला लावायची. वातीची सुरसूर झाली, एखाद् ठिणगी पेटली की सुसाट पळायचं कानात बोटं घालून "फट्फट्.." फुटत असलेला फटाका बघायचा. झाड हातावर नाही ना येत आहे, भुईचक्राचं टोक आपल्या कडे तर नाही ना सगळं भान ठेवावे लागे. तरी घोळ होतंच, जसं बाणाची दिशा चुकून कधी कोणाच्या गॅलरीतच घुसे. मग परत आरडाओरडा. दुसऱ्या दिवशी आदल्या रात्री न फुटलेले फटाके गोळा करायचे आणि ते फोडायचे.
आता त्याच वयाची भाचे मंडळी पोक्तपणे प्रदूषण होतं म्हणून फटाके नाही वाजवायचे म्हणतात तेव्हा त्यांच्या समूजदार पणाच कौतुक वाटतं पण काही अंशी आपणच हि परिस्थिती तर नाही ना ओढवून आणली ह्या जाणिवेने अस्वस्थ होतं
आमच्या घरी रांगोळी डिपार्टमेंट आईकडे! ती तीन चार तास खपून फार सुंदर गालिचासारखी रांगोळी काढे.
लक्ष्मी पूजनाला आमचा दौरा आजोळी पनवेलला!
तेथे लक्ष्मी पूजन दणक्यात होई. आजीचा हात भारी सढळ. पूर्वी पोस्टमन तेलाचे मोठे चौकोनी डबे असतं, तिच्याकडे तसे रंगवलेले डबे होते. ते भरून ती चिवडा, चकल्या, करंज्या करत असे. साजुक तुपात थबथबलेले बेसनाचे खमंग लाडू ही तर तिची स्पेशालिटी होती. दुपारी जेवणे आटोपली की ती मोठ्या कढईत ओट्यावर बसून मंद आचेवर बेसन भाजत बसे. आता वाट्या मोजून बेसन (लाडू) भाजताना हात भरुन आला की तिची हमखास आठवण येते. "इतके डबा भरुन लाडू करायला तिचे हात किती दुखत असतील?"
मी जेवढा फराळ बनवते त्यांच्या पटींनी ती वाटत असे.
असो! ते आजोळचं टुमदार बंगला वजा घर होतं. दोन मोठे थाळे भरुन मातीच्या (40-50) पणत्या तयार असत. दिवेलागणीला अंगणातल्या तुळशीला एक पणती ठेवायची आणि एकेक करून घराच्या कंपाऊंडच्या भिंतीवर दिव्याची आवली तयार व्हायची. रात्रीच्या त्या गडद अंधारातील मिणमिणत्या तरीही तेजस्वी पणत्यांची ती आरास म्हणजे दिपावलीचं सात्विक रुपच जणू, अजुनही दरवर्षी डोळ्यासमोर तरळतं.
आज ते अप्रूप वाटतंय आणि तेव्हाही आवडत होतं. मधल्या शिंग फुटांयच्या काळात त्यावरुन झालेली (किंवा मी उकरुन काढलेली) नोकझोकही हटकून आठवते.
"अग आजी साजुक तूपाचा दिवा का लावतेस? आणि येवढ्या पणत्या, ते ही रिफाईंड तेलात? "
"अग पण काय देवालाच करत्ये ना?"
माझी मुक्ताफळं, " मग ते गरीबाला दे, देव माणसात असतो."
"माझं झालंय तसं करुन. आता हे देवाचंच आहे."
एकदम मान्य अडल्या नडल्याला ती करायची पण तितक्याच सढळपणे.
मग मात्र पाडवा,भाऊबीज कधी ठाण्याला कधी आजोळी करत पार पडे.
तर एकंदर दिवाळीला आमची जबाबदारी पुस्तकांचा फडशा पाडणे, फराळ करणे ( म्हणजे आईने बनवलेला संपविणे), लहानपणी किल्ला करणे तर मोठेपणी शॉपिंग करणे, नटणे मुरडणे, मैत्रीणी बरोबर भटकणे. आणि हे अगदी कॉलेजच नव्हे तर नोकरी , लग्न करेपर्यंत असंच चालू राहिलं.
माझं लग्न ठरलेलं, ऑफिस मधून डायरेक्ट सासरी फराळाला गेले. सासूबाईंनी विचारलं," काय गं आई दिवाळीचं सगळं घरी करते?" " हो, पण सगळं नाही. लाडू, करंजी, चिवडा आणि चकल्या एवढंच करते." ( इकडे माझ्या डोक्यात चिरोटे, कडबोळी, शंकरपाळी झालंच तर शेव पिंगा घालत होते)
"पण मग झालं की सगळंच. एकटी करते सगळं?"
आता मात्र मनातल्या मनात खजील झाले. येवढ्या वर्षांत आईला आपण फराळात (संपवण्या पलीकडे) काहीच मदत केली नाही ही टोचणी लागली.
आणि दरवर्षी ती टोचते.
दरवर्षी दिवाळीच्या तयारीला लागताना मनाला स्पर्शून जाणाऱ्या ह्या गोष्टी यावर्षी मात्र लिहून काढल्या. तुम्हाला पण आठवतायत का दरवर्षीच्या तुमच्या गोष्टी ?

****
हा लेख दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रकाशित केलेला.

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख छान आठवणी !

दिवाळीच्या आठवणी लिहायच्या तर काय लिहू आणि काय नाही असे होऊन जाईल Happy

छान.

पहिले खरेच घर भरलेली असायची खूप मजा यायची.
दिवाळी असू किंवा कोणताही सण जोशात.
प्रतेक घरात तीनचार पोर असायची.
नातेवाईक लोकांशी प्रेमाचे संबंध असायचे .
त्या मुळे सण मध्ये सहभागी खूप लोक असायची...
आता घर च ओसाड पडली आहेत.
करोडपती आहेत पण शेजारचा पण ओळखत नाही.
घरात एक मुल ते पण अती लाडवलेल.
घराचे घर पण संपले आहे.
नवरा बायको मध्ये एक मत नसते.
सर्व च एकटे पडले आहेत.
सण तेच आहेत पण तो वीस तीस वर्षे पूर्वीचा चार्म नाही.
दिवाळी फराळ पण बाहेरून विकत घेणारी लोक काय सण साजरे करणार

हो सर त्यात मोबाईलला ही घ्या नाती केवळ ऑनलाइन राहिली आहेत, शुभेच्छा दिल्या की झालं ,प्रत्यक्ष भेट घेणं वगैरे नाहीच, सगळं औपचारिक झालंय. पूर्वी कुणाच्या घरातला फराळ करताना कुठल्या घरातील मुलं खाऊन येतायत हेही समजायचं नाही ,करतानाच मुलं फराळ इतका खायची की जेवायची देखील नाहीत.घरांची दारं सणासुदीला नव्हे तर कायम उघडी.

लेख छान आहे.
रुन्मेष लिही रे बऱ्याच दिवसात तुझा धागा नाही आला ,तुझे आठवणींचे धागे बरे असतात .

छान लेख.

बरंच रिलेट झालं. आईला मदत करायचे. आमच्यावेळी फडके रोडला मैत्रिणींनी भेटायचं वगैरे नव्हतं त्यामुळे फराळ घेऊन जवळच्या विठोबाच्या देवळात जायचं, मग घरी येऊन फराळ खायचा असं होतं. आता फडके रोड एकदम फेमस.

दिवाळीत पहाटे फटाके फोडण्यात आम्ही पुढे असायचो, डोंबिवलीत बऱ्यापैकी लवकर उठतात, फटाके वाजवतात, नालासोपारा इथे मी सोसायटीत खाली फटाके वाजवायचे तेव्हा सगळे गाढ झोपलेले असायचे. बॉम्ब वगैरे फोडायचे, आता मागे वळून पाहताना माझं चुकत होतं असं वाटत. आता पाऊस, भुईचक्र जास्त आवडतात. बॉम्ब नको वाटतात.