चाळीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जायचा. सेक्रेटरी गोडसे काकांच्या घरी गणपतीची मूर्ती स्थापन केली जाई. पण यावेळी काही कारणाने त्यांच्या इकडे गणपती बसवता येऊ शकणार नव्हते. आता काय करावे ? कुणाच्या घरी श्री गणेशाची मूर्ती स्थापन करावी ? असा प्रश्न उपस्थित झाला. प्रत्येक चांगल्या कामासाठी नेहमी पुढे असणाऱ्या ओंकारने तयारी दर्शवली. अर्थात इतरही जण तयार झाले. मात्र गोडसे काकांनी ओंकारच्या घरी गणपती बसवण्याचा निर्णय घेतला.
ओंकारची स्वतःची खरंतर देवावर फारशी श्रद्धा नव्हती ; पण सर्वांना सहकार्य करावे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागावं असा त्याचा स्वभाव. ही सर्वांच्या आनंदाची गोष्ट, म्हणून तो तयार झाला होता. झालं. ओंकारच्या घरी गणपतीची मूर्ती स्थापित केली गेली. तो एकटाच राहत असल्यामुळे घरची सारी कामे त्यालाच करावी लागत. आणि आता गणपती घरी आल्यावर सहाजिकच त्याचंही सगळं ओंकार स्वतःच करणार होता. तो मग स्वभावाप्रमाणे प्रामाणिकपणे गणपतीची सेवा करू लागला. देवासाठी रोज नवे फुलांचे हार स्वतःच्या हाताने बनवून गणपतीच्या गळ्यात घालू लागला. आरती साठी रोज पेढे आणून त्यांच्या समोर ठेवू लागला. हे सगळ करताना त्याच्या मनात प्रसन्नता निर्माण व्हायची. शरीरात आपोआपच एक उत्साह संचारायचा. आपल्याच व्यक्तीसाठी आपण काही तरी करतोय अशी काहीशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होऊ लागली होती. हार घालून, पेढे ठेवल्यावर क्षणभर तो गणपतीच्या सुंदर मुर्तीकडे एकटक पाहू लागला. पुढे पुढे मिनिटे, दोन मिनिटे तो गणेशाकडे पाहण्यात मग्न व्हायचा. हळूहळू त्याच्याकडे पाहताना आपसूकच हात जोडू लागले. स्वतःतील या बदलांच त्यालाच आश्चर्य वाटले ; पण त्याने या बदलांना विरोध केला नाही.
अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडला. आज गणपतीची मूर्ती विसर्जित करायची होती. सर्व तयारी झाली. शेवटची आरती झाली. जेव्हा तो गणेशमूर्ती पुढे येऊन उभा राहिला, त्याच्या गोंडस रूपाकडे पाहताना त्याच्या काळजात गलबलून आलं. जड अंतःकरणाने त्याने मूर्ती विसर्जित केली. घरी आला. मग मात्र त्याच्या भावनांचा बांध फुटला. तो ढसाढसा रडू लागला. आपला सुखदुःखाचा कुणी साथीदार सोडून गेल्याची, भयाण एकटेपणाची विचित्र जाणीव त्याला बोचू लागली होती. तो आतापर्यंत एकटाच राहत होता ; पण बाप्पा गेल्यामुळे जाणवणारा हा एकटेपणा त्याला भयानक असह्य होत होता.
अचानक त्याच्या खांद्यावर हाताचा स्पर्श झाला. त्याने बघितल. ते गोडसे काका होते. ते म्हणाले -
" मला माहित आहे तू का रडतोस ते. अरे वेड्या, गणपतीची फक्त मूर्ती विसर्जित झाली आहे. तो स्वतः आपल्या जवळच आहे. अर्थात त्यानं साथ सोडली तर आपण जगणार कसे म्हणा. तो आपल्या प्रत्येक श्वासात आहे, हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात आहे."
" तुला माहित आहे, मी गणपतीची मूर्ती तुझ्या घरी बसवण्याचा निर्णय का घेतला ? कारण तू प्रामाणिक आहेस. आपल्या घरात मूर्ती बसवली म्हटल्यावर तो मनोभावे त्याची सेवा करणार, हे मला माहीत होते. त्याच्या सहवासात राहून, त्याची सेवा करताना तुझ्यातील नास्तिकता पूर्णपणे जाऊन तुही त्याचा भक्त होशील, असा मला विश्वास होता म्हणून मी हा निर्णय घेतला."
तो नि: शब्द पणे ऐकत होता. त्याला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता.
" हे घे." त्यांनी गणेशाची छोटीशी मूर्ती त्याला दिली. " आता कायम श्री गणेशाची मनोभावे सेवा करत जा."
त्याने गणपतीला नमस्कार केला. काकांचा आशिर्वाद घेतला. मूर्ती हातात घेऊन तो गणेशाकडे बघू लागला. आता तो त्याची आधीसारखीच सेवा करणार होता ; पण आता हे कर्तव्य नाही, भक्ती असणार होती
|| श्री गणेशाय नमः ||
समाप्त
© प्रथमेश काटे
खुप छान वाटली कथा.
खुप छान वाटली कथा.
थॅंक्यू मॅम. खूप आभार.
थॅंक्यू मॅम. खूप आभार.
समाप्त
समाप्त@ प्रथमेश काटे
समाप्त
© प्रथमेश काटे
अत्यंत महत्त्वपूर्ण चूक
अत्यंत महत्त्वपूर्ण चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान
खुप छान