भाग १ : https://www.maayboli.com/node/84239#comment-4949314
... .. .. ..
या लेखात आपण हृदयाचे आपल्या शरीरातील स्थान, त्याची बाह्य व अंतर्गत रचना आणि त्याचे रक्ताभिसरणातील मध्यवर्ती स्थान यांचा आढावा घेऊ.
मूलभूत रचना व कार्य
हृदय आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये मधोमध वसलेले असून ते थोडेसे डाव्या बाजूस झुकलेले आहे. एखाद्या बलदंड पैलवानाच्या एका मुठीत मावेल एवढाच त्याचा आकार आणि वजनही जेमतेम 300 ग्रॅम.
खालील चित्रात हृदयाची अंतर्गत रचना दाखवलेली आहे. ती आपल्याला ढोबळ मानाने शालेय अभ्यासक्रमातून माहित झालेली असते.
चित्रात दाखवल्यानुसार हृदयाचे चार कप्पे असतात- दोन वरचे तर दोन खालचे. वरच्या दोन कप्प्याना कर्णिका (atria) तर खालच्या दोन कप्प्यांना जवनिका (ventricles) असे म्हणतात.
हृदयाच्या मधोमध एक उभा पडदा असल्यामुळे त्याच्या कप्प्यांची उजवी आणि डावी अशी विभागणी झालेली आहे. अशा प्रकारे या चार कप्प्यांना खालील अधिकृत नावे आहेत :
1. उजवी कर्णिका
2. उजवी जवनिका
3. डावी कर्णिका
4. डावी जवनिका
(टीप : चित्र पाहताना जी गोष्ट वाचकाच्या डावीकडे असते ती प्रत्यक्ष शरीरातील उजवी बाजू असते).
दोन्ही उजवे कप्पे दोन्ही डाव्या संबंधित कप्प्यांपासून मधल्या पडद्यामुळे विभाजित असतात. परंतु कुठल्याही एका बाजूचे एकाखाली एक असलेले कप्पे एकमेकांपासून वेगळे असले तरी एका छिद्राने संपर्कात असतात. त्या छिद्रात विशिष्ट प्रकारच्या झडपा(valves) असतात. हृदयातला रक्तप्रवाह फक्त एकाच दिशेने वाहण्याच्या दृष्टीने या झडपा आवश्यक असतात.
उजव्या जवनिकेपासून फुफ्फुस-रोहिणीचा उगम होतो तर डाव्या जवनिकेपासून महारोहिणीचा (aorta) उगम होतो.
आता हृदय आणि रक्ताभिसरणातील एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यावी. संपूर्ण शरीराकडून आलेले ऑक्सिजनन्यून रक्त उजव्या कर्णिकेत महानीलांद्वारे पोहोचते. तिथून ते उजव्या जवनिकेत येते. इथून पुढे ते फुफ्फुस-रोहिणी मार्फत फुफ्फुसांना पाठवले जाते. फुफ्फुसांमध्ये श्वसनामधून मिळालेला ऑक्सिजन पोचलेला असतो. तो इथे आलेल्या वरील रक्ताला समृद्ध करतो. अशा प्रकारे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनसमृद्ध झालेले रक्त फुफुसनीलांच्या मार्फत डाव्या कर्णिकेत पोहोचते. तिथून ते डाव्या जवानिकेत उतरते. यानंतर ते महारोहिणीत शिरून पुढे तिच्या शाखांच्याद्वारे सर्व शरीराला पुरवले जाते. दोन्ही जवनिका आणि त्यांच्यापासून निघणाऱ्या मोठ्या रोहिणींच्या उगमापाशी देखील झडपा असतात. त्यांच्यामुळे रक्ताचा प्रवाह एका दिशेने राहतो.
वर वर्णन केलेल्या झडपांचे एक वैशिष्ट्य आहे. हृदयाच्या आकुंचन आणि प्रसारणाबरोबर या झडपांची सतत उघडझाप होत असते. त्यांच्या उघडण्याची प्रक्रिया हळुवार असते, परंतु बंद होताना मात्र त्या झटकन बंद होतात. त्या झटकन बंद झाल्यामुळे काही कंपने निर्माण होतात आणि त्यातूनच हृदयाचे ध्वनी निर्माण होतात. आपण जर छातीवर स्टेथोस्कोप ठेवला तर आपल्याला सातत्याने हृदयाचे दोन ध्वनी एका पाठोपाठ ऐकू येतात. त्यातला पहिला ध्वनी कर्णिका आणि जवनिकेच्या मधल्या झडपांशी संबंधित असतो तर दुसरा ध्वनी जवनिका व मोठ्या रोहिणी यांच्यामधील झडपांशी संबंधित असतो.
हृदय-आवरणे
हृदयाच्या चारही कप्प्यांना आतल्या बाजूने एक पातळसे अस्तर असते त्याला endocardium म्हणतात.
त्याच्यानंतरचा बाहेरील थर म्हणजे हृदयाचे स्नायू अर्थात myocardium. सर्वात बाहेरचा थर म्हणजे pericardium, जी एक दुपदरी पिशवी असते. त्या पिशवीच्या दोन थरांमध्ये एक द्रव पदार्थ असतो, जो वंगणाचे काम करतो आणि हृदयाला बाहेरील धक्क्यांपासून संरक्षण देतो.
हृदयचेतना
हृदयाची धडधड आणि पर्यायाने कार्य सतत चालू राहण्यासाठी एका चेतनेची (impulse) गरज असते. अशी चेतना हृदयातील काही विशेष टिशूत निर्माण होते. अशा टिशू चार ठिकाणी असून त्यातील प्रमुख केंद्राला SA node असे नाव आहे. त्यामध्ये P नावाच्या पेशी असतात ज्यांच्यामधून मूलभूत चेतना निर्माण होते. या केंद्राला हृदयाचा पेसमेकर म्हटले जाते.
हृदयस्पंदन
जेव्हा डावी जवनिका आकुंचन पावते तेव्हा तिच्यातील रक्त महारोहिणी मार्फत शरीरातील सर्व रोहिणींमध्ये एका दाबाने सोडले जाते. यातूनच या रक्तवाहिन्यांमधून सतत एक स्पंदन पुढे जात राहते. यालाच आपण नाडी (pulse) म्हणतो. या नाडीच्या ठोक्यांची विशिष्ट गती असते. प्रौढावस्थेत हे ठोके एका मिनिटाला 70 ते 80 इतके असतात. परंतु आयुष्याच्या विविध टप्प्यांवर या ठोक्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे ते असे :
• गर्भावस्था 140 ते 150 प्रति मिनिट
• जन्मतः 130 ते 140
• वयाच्या 12व्या वर्षापर्यंत 100 पर्यंत
• प्रौढ व्यक्ती 70 ते 80
• म्हातारपण 100 पर्यंत
पुरुषांशी तुलना करतात स्त्रियांमध्ये या ठोक्यांची गती थोडी जास्त असते. हृदयाला चेतविणाऱ्या काही चेतातंतूच्या टोनमधील फरकामुळे ठोक्यांमध्ये वरीलप्रमाणे गतीबदल होतात.
हृदयाचा रक्तपुरवठा
हृदय जरी संपूर्ण शरीराला रक्त पंप करीत असले तरी खुद्द त्याच्या पेशींना सतत कार्यरत राहण्यासाठी शिस्तबद्ध रक्तपुरवठ्याची गरज असते. हे काम करणाऱ्या रक्तवाहिन्यांना करोनरी असे नाव आहे.
वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे महारोहीणीतून दोन प्रमुख करोनरी रोहिणींचा उगम होतो. त्यांना उजवी आणि डावी अशी नावे आहेत. डाव्या करोनरीला लगेचच दोन उपशाखा फुटतात. या मुख्य करोनरी वाहिन्यांपासून पुढे छोट्याछोट्या शाखा निर्माण होतात आणि त्या खालवर पसरतात.
हृदयस्नायूंना (myocardium) होणाऱ्या रक्तपुरवठ्याचे एक वैशिष्ट्य आहे. या स्नायूंचा प्रमुख रक्तपुरवठा विशिष्ट करोनरी वाहिन्यांमधून होतो. परंतु या संदर्भात माणसामाणसात फरक आहेत ते असे :
1. सुमारे 50% लोकांमध्ये हा रक्तपुरवठा मुख्यत्वे उजव्या करोनरीतून होतो.
2. 30% टक्के लोकांत तो उजव्या आणि डाव्या करोनरीतून समसमान प्रमाणात होतो.
3. 20% लोकांमध्ये तो मुख्यत्वे डाव्या करोनरीतून होतो.
काही रंजक पैलू
आपल्या हृदयाची धडधड (अर्थात दिल की धडकन) अगदी गर्भावस्थेपासून ते थेट मृत्यूपर्यंत आयुष्यभर आपली सतत सोबत करते. रक्ताभिसरणाचे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे हृदय आयुष्यभर क्षणभर देखील विश्रांती घेत नाही. हे काम करताना त्याच्या स्नायूंना किती आणि कसे कष्ट पडतात याचे थोडे कल्पनारंजन :
१ दर २४ तासांत हृदयाचे तब्बल एक लाख ठोके पडतात.
२ रक्त सतत पंप करीत असताना हृदयाला किती बरे कष्ट पडत असतील, हे समजून घेण्यासाठी आपण एखादा टेनिसचा चेंडू जीव खाऊन पूर्णपणे दाबून पहावा. या कृतीसाठी आपल्या हाताला जेवढे कष्ट पडतात तेवढेच कष्ट हृदय ठोक्यागणिक घेत असते.
३ . हृदयाच्या या सततच्या कार्यातून जबरदस्त ऊर्जानिर्मिती होत असते. एखाद्या संपूर्ण दिवसाची ही ऊर्जा जर मोजली, तर त्या ऊर्जेत एखादा ट्रक 32 किलोमीटर अंतर पळवता येईल. म्हणजे, सरासरी 70 वर्षांच्या एखाद्याच्या आयुष्यात हृदयातून निर्माण झालेल्या ऊर्जेतून हाच ट्रक चक्क पृथ्वी-चंद्र-पृथ्वी इतके अंतर पार करू शकेल !
४ . हृदयाच्या शारीरिक तपासणीमध्ये छातीवर स्टेथोस्कोप ठेवून त्याचे ठोके लक्षपूर्वक ऐकणे डॉक्टरांसाठी खूप महत्त्वपूर्ण असते. या स्टेथोस्कोपचा शोध मोठा रंजक आहे. तो प्रसिद्ध फ्रेंच डॉक्टर Rene Laënnec यांनी लावला. त्याची कथा थोडक्यात पाहू. हा शोध लागण्यापूर्वी डॉक्टर मंडळी गरजेनुसार रुग्णाच्या थेट छातीलाच आपला कान लावून हृदयठोके ऐकत. परंतु तो अनुभव समाधानकारक नसे.
एकदा Laënnec यांच्या दवाखान्यात एक तरुण टंचनिका ‘छातीच्या दुखण्यासाठी’ आली होती. Laënnec यांनी नेहमीप्रमाणे थोडीफार हाताने तपासणी केली परंतु त्यातून चित्र स्पष्ट होणार नव्हते. आता हृदयाचे ठोके ऐकणेही आवश्यक होते. परंतु एकंदरीत त्या मादक सौंदर्यवतीकडे पाहिल्यावर त्यांना तिच्या छातीला कान लावायला भयंकर अडखळल्यासारखे झाले ! मग त्यांनी एक युक्ती केली. पटकन टेबलावरचा कागद उचलून त्याची सुरनळी केली. मग सुरनळीचे एक टोक तिच्या छातीला आणि दुसरे टोक स्वतःच्या कानाला लावले आणि काय आश्चर्य ! त्यांना ठोके चांगल्यापैकी ऐकू आले. पुढे या कल्पनेवर सखोल विचार करून त्यांनी प्राथमिक अवस्थेतील स्टेथोस्कोपचा शोध लावला.
...
असा आहे आपला आयुष्यभराचा हृदयप्रपंच !
******************************************************************************************************************************
क्रमशः
संदर्भ: 1.https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1570491/#:~:text=Rene%20The...(1781%E2%80%931826)%20was%20a%20French,the%20observations%20made%20during%20autopsies.
छान लेख! शाळेत शिकलेल्या काही
छान लेख! शाळेत शिकलेल्या काही गोष्टी आठवल्या. बर्याच नव्याने समजल्या. महारोहिणीसाठी आधी नीला ही संज्ञा होती का?
aorta हा शब्द शब्दकोड्यांत वरचेवर येतो.
करोनरी हा शब्द नेहमी ऐकतो. त्याचा अर्थ माहीत नव्हता.
करोडोंत एखाद्या व्यक्तीचे हृदय उजव्या बाजूला असते असे वाचले आहे.
<हृदयाच्या शारीरिक तपासणीमध्ये छातीवर स्टेथोस्कोप ठेवून त्याचे ठोके लक्षपूर्वक ऐकणे डॉक्टरांसाठी खूप महत्त्वपूर्ण असते. > यात नक्की काय ऐकतात? दोन ठोक्यांतलं अंतर? ठोक्यांची तीव्रता?
छान लेख! शाळेत शिकलेल्या काही
.
छान सुरुवात.
छान सुरुवात.
मराठीतले शास्त्रीय शब्द वाचून छान वाटले, पटकन समजले नाहीत तरी
भरत धन्यवाद ! चांगले प्रश्न
भरत व अनिंद्य धन्यवाद !
चांगले प्रश्न आणि मुद्दे.
१. महारोहिणीसाठी आधी नीला ही संज्ञा होती का?
>>>
नाही. रोहिणी म्हणजे artery व
नीला म्हणजे vein . तिच्यातले रक्त ऑक्सिजनन्यून असल्यामुळे तिला असे नाव मिळालेले आहे.
* artery हृदयापासून दूर जाते.
* vein हृदयाकडे येते.
..
२. यात नक्की काय ऐकतात? >>
हृदयाच्या ठोक्यांसंबंधी सविस्तर माहिती पुढच्या भागात असणार आहे..
बरं.
बरं.
तो ऑक्सिजनन्यून हा शब्द मी कितीतरी वेळ ऑक्सिजनयुक्त असाच वाचत होतो आणि तुम्ही असं चुकीचं कसं लिहिलं असा विचार करत होतो.
ऑक्सिजनसमृद्ध आणि न्यून.
ऑक्सिजनसमृद्ध आणि न्यून.
एकेकाळी शालेय अभ्यासात शुद्ध आणि अशुद्ध रक्त असे शब्द होते. मला ते तितके बरोबर वाटत नाहीत.
तरुण टंचनिका किती अपेक्षेने
तरुण टंचनिका किती अपेक्षेने आली होती! पण निराशाच झाली.
असो. चालायचेच.
चालायचेच...... तो जमाना
चालायचेच...... तो जमाना वेगळा होता
शाळेत कॉलेजमध्ये शिकलेले
शाळेत कॉलेजमध्ये शिकलेले पुन्हा आठवले, उजळणी झाली.
खूप मस्त, माहितीपूर्ण लेख
आम्हाला शाळेत हृदय म्हणजे घर..
घरात बाहेरून येते ती सून म्हणजे नीला, व्हेन (सगळे दोन अक्षरी)
घरातून बाहेर जाते ती मुलगी म्हणजे रोहिणी, आर्टरी (सगळे तीन अक्षरी) असे काहीसे शिकवले होते.
एखादा टेनिसचा चेंडू जीव खाऊन पूर्णपणे दाबून पहावा. या कृतीसाठी आपल्या हाताला जेवढे कष्ट पडतात तेवढेच कष्ट हृदय ठोक्यागणिक घेत असते.>>>>>> बापरे. बरीच ताकद लागते म्हणजे.
मस्त माहिती .
मस्त माहिती .
आमच्या शहरातल्या फ्रॅंक्लिन ईन्स्टिट्युट्मधे हृदयाचे मोठे मॉडेल आहे. लहान मुलेच नव्हे तर मोठी माणसे देखील डाव्या व्हेंट्रिकल मधून आत शिरून रक्ताचा प्रवाह फॉलो करु शकतात. बाय कस्पिड आणि ट्राय कस्पिड व्हाल्व्ह सुद्धा मस्त बनवलेले आहेत. त्या मॉडेलमधून फिरताना हृदयाचे ठोके एकवणारं रेकॉर्डिंग चालू असतं. लहान थोर सर्वांना आवडणारं मॉडेल आहे.
https://www.fi.edu/en/exhibits-and-experiences/giant-heart
एखाद्या व्यक्तीचे हृदय शरीरात उजव्या बाजूला असू शकते या वर आधारित एक बंगाली रहस्य कथा वाचली होती अनेक वर्षांपूर्वी.
ऋतुराज,बाहेरून येते ती सून
ऋतुराज,
बाहेरून येते ती सून म्हणजे नीला, व्हेन (सगळे दोन अक्षरी) >>>> झकास !
यात अजून एक भर होती.
हृदयाच्या उजव्या बाजूची झडप तीन पदरी असते तर डाव्या बाजूची दोन पदरी.
मग हे लक्षात ठेवण्यासाठी
उजवी = तीन
डावी = दोन
मेधा,
मेधा,
**हृदय शरीरात उजव्या बाजूला असू शकते या वर आधारित
>>> एकंदरीत हा लोकांच्या उत्सुकतेचा विषय आहे ! यामध्ये दोन प्रकार असतात :
एकामध्ये फक्त हृदयाचीच बाजू बदललेली असते तर दुसऱ्या मोठ्या बिघाडात छाती व पोटातील सर्व अवयव बरोबर विरुद्ध दिशेस असतात (situs inversus totalis) :
एखाद्या व्यक्तीचे हृदय शरीरात
एखाद्या व्यक्तीचे हृदय शरीरात उजव्या बाजूला असू शकते, हे माहीत न्हवते. रोचक आहे.
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख डॉक्टर...!
((एखाद्या व्यक्तीचे हृदय शरीरात उजव्या बाजूला असू शकते, हे माहीत न्हवते. रोचक आहे.)))))
'साही का काटा' असे त्या व्योमकेश बक्षीच्या रहास्यकथेचे नाव आहे.।..फारच रोचक कथा आहे
https://youtu.be/fudbHt3zAzE?si=7i_5uKpCOT21etKp
नेहमीप्रमाणे एक सुंदर लेख!
नेहमीप्रमाणे एक सुंदर लेख!
मराठीतले शास्त्रीय शब्द वाचून छान वाटले, पटकन समजले नाहीत तरी ......
+१.
<< पटकन समजले नाहीत तरी >>
<< पटकन समजले नाहीत तरी >>
प्रामाणिक मत आवडले.
छान लेख
छान लेख
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !
किती सोपे साधे करून लिहिता हो
किती सोपे साधे करून लिहिता हो तुम्ही!
मस्त वाटते वाचायला.
टेनिस बॉल आणि ट्रक पळवता येईल इतकी ऊर्जा ह्या दोन्ही गोष्टी मला एकदम नवीन आहेत.
पुढच्या भागासाठी शुभेच्छा.
(situs inversus totalis) >>>>
(situs inversus totalis) >>>> हे नविनच समजले...
अभ्यासपूर्ण, सुरेख लेख....
खूप मस्त, माहितीपूर्ण लेख.
खूप मस्त, माहितीपूर्ण लेख.
>>>ऑक्सिजनसमृद्ध आणि न्यून>>>
रोहिणी व निले मधील ऑक्सिजन प्रमाणात किती फरक असतो?
खूप मस्त, माहितीपूर्ण लेख.
ड पो
सर्वांना धन्यवाद !रोहिणी व
सर्वांना धन्यवाद !
रोहिणी व नीलेमधील ऑक्सिजन प्रमाणात किती फरक असतो?
>>
विश्रांती अवस्थेत हा फरक 5mL/100mL रक्त इतका ,
तर जोरदार व्यायाम करत असताना तो फरक 16 mL/100mL पर्यंत जाऊ शकतो.
धन्यवाद डॉ.
धन्यवाद डॉ.
स्वासु, धन्यवाद !'साही का
स्वासु, धन्यवाद !
'साही का काटा' असे त्या व्योमकेश बक्षीच्या रहास्यकथेचे नाव आहे
>>>
हा भाग पाहिला. कित्येक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर ही संपूर्ण मालिका पाहिली होती. सुंदरच आहे. या निमित्ताने उजळणी झाली.
सर्व कलाकार सुंदर दिसहेत. सुचित्रा बांदेकर लग्नापूर्वीची गुडेकर आहे हे समजले. सुकन्या तर ओळखू येणार नाही इतकी बारीक आहे !
साही म्हणजे साळींदर याची पण उजळणी झाली.
सहज व सोप्या भाषेतला लेख !!!
सहज व सोप्या भाषेतला लेख !!! त्यानिमित्ताने शाळेतील रोहिणी , नीला हे मराठी शब्द वाचले गेले .
अश्विनी११,
अश्विनी११,
धन्स.
पुन्हा संपर्क केला आहे. तुम्ही स्पॅममध्ये बघा. मागची मेल पण मिळायला हरकत नाही
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख डॉक्टर!
छान लेख....
छान लेख....
रंजक पैलू विशेष आवडले....
यात अजून एक भर होती.>>>> हो
यात अजून एक भर होती.>>>> हो आठवलं
हृदय चेतनेत कधी काही बिघाड होऊन धडधड वाढते का?
हे पुढील भागात येणार असल्यास तेव्हा सांगितलं तरी चालेल.
Pages