हृदयसंवाद (२) : हृदयरचना आणि कार्य

Submitted by हेमंतकुमार on 10 October, 2023 - 23:40

भाग १ : https://www.maayboli.com/node/84239#comment-4949314
... .. .. ..

या लेखात आपण हृदयाचे आपल्या शरीरातील स्थान, त्याची बाह्य व अंतर्गत रचना आणि त्याचे रक्ताभिसरणातील मध्यवर्ती स्थान यांचा आढावा घेऊ.

मूलभूत रचना व कार्य
हृदय आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये मधोमध वसलेले असून ते थोडेसे डाव्या बाजूस झुकलेले आहे. एखाद्या बलदंड पैलवानाच्या एका मुठीत मावेल एवढाच त्याचा आकार आणि वजनही जेमतेम 300 ग्रॅम.
खालील चित्रात हृदयाची अंतर्गत रचना दाखवलेली आहे. ती आपल्याला ढोबळ मानाने शालेय अभ्यासक्रमातून माहित झालेली असते.

Heart chambers lekh2.png

चित्रात दाखवल्यानुसार हृदयाचे चार कप्पे असतात- दोन वरचे तर दोन खालचे. वरच्या दोन कप्प्याना कर्णिका (atria) तर खालच्या दोन कप्प्यांना जवनिका (ventricles) असे म्हणतात.
हृदयाच्या मधोमध एक उभा पडदा असल्यामुळे त्याच्या कप्प्यांची उजवी आणि डावी अशी विभागणी झालेली आहे. अशा प्रकारे या चार कप्प्यांना खालील अधिकृत नावे आहेत :
1. उजवी कर्णिका
2. उजवी जवनिका
3. डावी कर्णिका
4. डावी जवनिका
(टीप : चित्र पाहताना जी गोष्ट वाचकाच्या डावीकडे असते ती प्रत्यक्ष शरीरातील उजवी बाजू असते).

दोन्ही उजवे कप्पे दोन्ही डाव्या संबंधित कप्प्यांपासून मधल्या पडद्यामुळे विभाजित असतात. परंतु कुठल्याही एका बाजूचे एकाखाली एक असलेले कप्पे एकमेकांपासून वेगळे असले तरी एका छिद्राने संपर्कात असतात. त्या छिद्रात विशिष्ट प्रकारच्या झडपा(valves) असतात. हृदयातला रक्तप्रवाह फक्त एकाच दिशेने वाहण्याच्या दृष्टीने या झडपा आवश्यक असतात.

उजव्या जवनिकेपासून फुफ्फुस-रोहिणीचा उगम होतो तर डाव्या जवनिकेपासून महारोहिणीचा (aorta) उगम होतो.

आता हृदय आणि रक्ताभिसरणातील एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यावी. संपूर्ण शरीराकडून आलेले ऑक्सिजनन्यून रक्त उजव्या कर्णिकेत महानीलांद्वारे पोहोचते. तिथून ते उजव्या जवनिकेत येते. इथून पुढे ते फुफ्फुस-रोहिणी मार्फत फुफ्फुसांना पाठवले जाते. फुफ्फुसांमध्ये श्वसनामधून मिळालेला ऑक्सिजन पोचलेला असतो. तो इथे आलेल्या वरील रक्ताला समृद्ध करतो. अशा प्रकारे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनसमृद्ध झालेले रक्त फुफुसनीलांच्या मार्फत डाव्या कर्णिकेत पोहोचते. तिथून ते डाव्या जवानिकेत उतरते. यानंतर ते महारोहिणीत शिरून पुढे तिच्या शाखांच्याद्वारे सर्व शरीराला पुरवले जाते. दोन्ही जवनिका आणि त्यांच्यापासून निघणाऱ्या मोठ्या रोहिणींच्या उगमापाशी देखील झडपा असतात. त्यांच्यामुळे रक्ताचा प्रवाह एका दिशेने राहतो.

वर वर्णन केलेल्या झडपांचे एक वैशिष्ट्य आहे. हृदयाच्या आकुंचन आणि प्रसारणाबरोबर या झडपांची सतत उघडझाप होत असते. त्यांच्या उघडण्याची प्रक्रिया हळुवार असते, परंतु बंद होताना मात्र त्या झटकन बंद होतात. त्या झटकन बंद झाल्यामुळे काही कंपने निर्माण होतात आणि त्यातूनच हृदयाचे ध्वनी निर्माण होतात. आपण जर छातीवर स्टेथोस्कोप ठेवला तर आपल्याला सातत्याने हृदयाचे दोन ध्वनी एका पाठोपाठ ऐकू येतात. त्यातला पहिला ध्वनी कर्णिका आणि जवनिकेच्या मधल्या झडपांशी संबंधित असतो तर दुसरा ध्वनी जवनिका व मोठ्या रोहिणी यांच्यामधील झडपांशी संबंधित असतो.

हृदय-आवरणे

हृदयाच्या चारही कप्प्यांना आतल्या बाजूने एक पातळसे अस्तर असते त्याला endocardium म्हणतात.
त्याच्यानंतरचा बाहेरील थर म्हणजे हृदयाचे स्नायू अर्थात myocardium. सर्वात बाहेरचा थर म्हणजे pericardium, जी एक दुपदरी पिशवी असते. त्या पिशवीच्या दोन थरांमध्ये एक द्रव पदार्थ असतो, जो वंगणाचे काम करतो आणि हृदयाला बाहेरील धक्क्यांपासून संरक्षण देतो.

हृदयचेतना
हृदयाची धडधड आणि पर्यायाने कार्य सतत चालू राहण्यासाठी एका चेतनेची (impulse) गरज असते. अशी चेतना हृदयातील काही विशेष टिशूत निर्माण होते. अशा टिशू चार ठिकाणी असून त्यातील प्रमुख केंद्राला SA node असे नाव आहे. त्यामध्ये P नावाच्या पेशी असतात ज्यांच्यामधून मूलभूत चेतना निर्माण होते. या केंद्राला हृदयाचा पेसमेकर म्हटले जाते.

हृदयस्पंदन
जेव्हा डावी जवनिका आकुंचन पावते तेव्हा तिच्यातील रक्त महारोहिणी मार्फत शरीरातील सर्व रोहिणींमध्ये एका दाबाने सोडले जाते. यातूनच या रक्तवाहिन्यांमधून सतत एक स्पंदन पुढे जात राहते. यालाच आपण नाडी (pulse) म्हणतो. या नाडीच्या ठोक्यांची विशिष्ट गती असते. प्रौढावस्थेत हे ठोके एका मिनिटाला 70 ते 80 इतके असतात. परंतु आयुष्याच्या विविध टप्प्यांवर या ठोक्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे ते असे :
• गर्भावस्था 140 ते 150 प्रति मिनिट
• जन्मतः 130 ते 140
• वयाच्या 12व्या वर्षापर्यंत 100 पर्यंत
प्रौढ व्यक्ती 70 ते 80
• म्हातारपण 100 पर्यंत
पुरुषांशी तुलना करतात स्त्रियांमध्ये या ठोक्यांची गती थोडी जास्त असते. हृदयाला चेतविणाऱ्या काही चेतातंतूच्या टोनमधील फरकामुळे ठोक्यांमध्ये वरीलप्रमाणे गतीबदल होतात.

हृदयाचा रक्तपुरवठा
हृदय जरी संपूर्ण शरीराला रक्त पंप करीत असले तरी खुद्द त्याच्या पेशींना सतत कार्यरत राहण्यासाठी शिस्तबद्ध रक्तपुरवठ्याची गरज असते. हे काम करणाऱ्या रक्तवाहिन्यांना करोनरी असे नाव आहे.
Coronary_arteries.lekh2_.png

वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे महारोहीणीतून दोन प्रमुख करोनरी रोहिणींचा उगम होतो. त्यांना उजवी आणि डावी अशी नावे आहेत. डाव्या करोनरीला लगेचच दोन उपशाखा फुटतात. या मुख्य करोनरी वाहिन्यांपासून पुढे छोट्याछोट्या शाखा निर्माण होतात आणि त्या खालवर पसरतात.
हृदयस्नायूंना (myocardium) होणाऱ्या रक्तपुरवठ्याचे एक वैशिष्ट्य आहे. या स्नायूंचा प्रमुख रक्तपुरवठा विशिष्ट करोनरी वाहिन्यांमधून होतो. परंतु या संदर्भात माणसामाणसात फरक आहेत ते असे :
1. सुमारे 50% लोकांमध्ये हा रक्तपुरवठा मुख्यत्वे उजव्या करोनरीतून होतो.
2. 30% टक्के लोकांत तो उजव्या आणि डाव्या करोनरीतून समसमान प्रमाणात होतो.
3. 20% लोकांमध्ये तो मुख्यत्वे डाव्या करोनरीतून होतो.

काही रंजक पैलू
आपल्या हृदयाची धडधड (अर्थात दिल की धडकन) अगदी गर्भावस्थेपासून ते थेट मृत्यूपर्यंत आयुष्यभर आपली सतत सोबत करते. रक्ताभिसरणाचे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे हृदय आयुष्यभर क्षणभर देखील विश्रांती घेत नाही. हे काम करताना त्याच्या स्नायूंना किती आणि कसे कष्ट पडतात याचे थोडे कल्पनारंजन :
१ दर २४ तासांत हृदयाचे तब्बल एक लाख ठोके पडतात.
२ रक्त सतत पंप करीत असताना हृदयाला किती बरे कष्ट पडत असतील, हे समजून घेण्यासाठी आपण एखादा टेनिसचा चेंडू जीव खाऊन पूर्णपणे दाबून पहावा. या कृतीसाठी आपल्या हाताला जेवढे कष्ट पडतात तेवढेच कष्ट हृदय ठोक्यागणिक घेत असते.

३ . हृदयाच्या या सततच्या कार्यातून जबरदस्त ऊर्जानिर्मिती होत असते. एखाद्या संपूर्ण दिवसाची ही ऊर्जा जर मोजली, तर त्या ऊर्जेत एखादा ट्रक 32 किलोमीटर अंतर पळवता येईल. म्हणजे, सरासरी 70 वर्षांच्या एखाद्याच्या आयुष्यात हृदयातून निर्माण झालेल्या ऊर्जेतून हाच ट्रक चक्क पृथ्वी-चंद्र-पृथ्वी इतके अंतर पार करू शकेल !

४ . हृदयाच्या शारीरिक तपासणीमध्ये छातीवर स्टेथोस्कोप ठेवून त्याचे ठोके लक्षपूर्वक ऐकणे डॉक्टरांसाठी खूप महत्त्वपूर्ण असते. या स्टेथोस्कोपचा शोध मोठा रंजक आहे. तो प्रसिद्ध फ्रेंच डॉक्टर Rene Laënnec यांनी लावला. त्याची कथा थोडक्यात पाहू. हा शोध लागण्यापूर्वी डॉक्टर मंडळी गरजेनुसार रुग्णाच्या थेट छातीलाच आपला कान लावून हृदयठोके ऐकत. परंतु तो अनुभव समाधानकारक नसे.
Laennec_-_Théobald_Chartran.jpg

एकदा Laënnec यांच्या दवाखान्यात एक तरुण टंचनिका ‘छातीच्या दुखण्यासाठी’ आली होती. Laënnec यांनी नेहमीप्रमाणे थोडीफार हाताने तपासणी केली परंतु त्यातून चित्र स्पष्ट होणार नव्हते. आता हृदयाचे ठोके ऐकणेही आवश्यक होते. परंतु एकंदरीत त्या मादक सौंदर्यवतीकडे पाहिल्यावर त्यांना तिच्या छातीला कान लावायला भयंकर अडखळल्यासारखे झाले ! मग त्यांनी एक युक्ती केली. पटकन टेबलावरचा कागद उचलून त्याची सुरनळी केली. मग सुरनळीचे एक टोक तिच्या छातीला आणि दुसरे टोक स्वतःच्या कानाला लावले आणि काय आश्चर्य ! त्यांना ठोके चांगल्यापैकी ऐकू आले. पुढे या कल्पनेवर सखोल विचार करून त्यांनी प्राथमिक अवस्थेतील स्टेथोस्कोपचा शोध लावला.
...
असा आहे आपला आयुष्यभराचा हृदयप्रपंच !
******************************************************************************************************************************
क्रमशः
संदर्भ: 1.https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1570491/#:~:text=Rene%20The...(1781%E2%80%931826)%20was%20a%20French,the%20observations%20made%20during%20autopsies.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !
..
हृदय चेतनेत कधी काही बिघाड होऊन धडधड वाढते का? >>>
होय वाढू शकते.

या प्रकाराला Sinus Node Dysfunction असे म्हणतात.
अधिकतर हा आजार वृद्धापकाळी होतो. या व्यतिरिक्त हृदयाच्या अन्य काही आजारांमध्येही ही समस्या उद्भवू शकते. काही समस्या आनुवंशिक असतात.
पेसमेकरच्या निरोगी पेशी कडक (fibrosis) झाल्यामुळे असे होते.

ऋदय स्वतचं सतत धडधडत असते त्याच्या स्नायूंची हालचाल सतत होत असते.
म्हणजे त्या स्नायू ना व्यायाम मिळत असतो.
मग व्यायाम करताना आपण अजून त्याच्या वर कामाचा ताण देतो .
त्याची धडकण्याच वेग वाढवतो.
मग हा अतिरिक्त ताण त्याच्या साठी चांगला की वाईट आहे.

मग हा अतिरिक्त ताण त्याच्या साठी चांगला की वाईट >>>

रक्त पंप करण्यासाठी हृदय जे ‘काम’ करते ते आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रत्येक मिनिटाला हृदय जेवढे रक्त पंप करते त्याला cardiac output असे म्हणतात. आता निसर्गाची किमया बघा.

विश्रांती अवस्थेत हृदयाची पंप करण्याची जेवढी क्षमता असते त्याच्या चार ते पाच पट रक्त पंप करण्याची क्षमता प्रत्येक (सामान्य) निरोगी माणसामध्ये राखीव स्वरूपात (cardiac reserve) असते. त्यामुळे श्रम अथवा (नेहमीचा/ सवयीचा) व्यायाम केला असता हृदयावर अतिरिक्त ‘ताण’ येत नाही; ते अतिरिक्त काम करणे हा त्याचा अंगभूत गुणधर्म आहे.

कसरतपटूंच्या बाबतीत हीच राखीव क्षमता सात ते आठपट असते.

हृदय स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या करोनरी वाहिन्या आहेत त्यांच्यामध्येच रक्तमेद गुठळी होते. हाच तो ब्लॉक. परिणामी त्या रक्तवाहिनीच्या कार्यक्षेत्रात येणारे स्नायू बाधित होतात.

करोनरी वाहिन्यांची विशिष्ट भौमितिक रचना आणि त्यांना हृदयाच्या कार्यामुळे सतत बसणारा पीळ या कारणांमुळे या वाहिन्यांमध्ये ब्लॉक होण्याची प्रक्रिया अन्य वाहिन्यांच्या तुलनेत अधिक होते.

Heart सुरू होताना त्याचे पहिले धडकने सायंटिस्ट लोकांनी शोधले आहे असे अंधुक्से वाचले आहे.
तेव्हा मात्र त्याचा आकार वेगळा असतो का?
ह्या लेख मालेची सुरुवात डॉक्टर कुमार खरे तर तेथून च करायला हवी होती.
Heart च आकार गर्भात कसा बदलत जातो .
ते पहिल्या वेळेस रक्त कधी पंप करते.
तेव्हा त्याचा आकार कसा असतो.
कारण ही माहिती दुर्मिळ आहे सहज खात्री ची माहिती मिळत नाही.

Heart सुरू होताना >>>
म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ?
प्रत्येकाचे हृदय स्वतःच्या गर्भावस्थेतच सुरू होते तेव्हा ?

गर्भावस्थेच्या दुसऱ्या आठवड्यात एक हृदयनळी असते. पुढे त्याचा विकास कसा होतो हे या चित्रात दिसेल :
heart embryonic.jpg

हेमंत,
तुमची सूचना एक विज्ञान अभ्यासक म्हणून चांगली आहे. तसं पाहायला गेलं तर हा अवाढव्य विषय आहे. परंतु माझा दृष्टिकोन भली मोठी लेखमाला करण्याचा नाही.
सामान्य माणसाला हृदयाच्या कार्य आणि आजारासंबंधी फक्त मूलभूत आणि व्यवहारात उपयुक्त माहिती मिळावी या उद्देशाने ही मर्यादित लेखमाला आखलेली आहे.

धन्यवाद डॉक्टर .
Heart बदलत असताना स्टेप wise त्यांची माहिती दिल्या बद्धल.
खरे तर ह्या विषयात खूप कमी लिखाण आहे.त्या मुळे ही माहिती खूप कमी लोकांना आहे.
म्हणून तुम्हाला विनंती केली होती.

इतक्या महत्वाच्या विषयात कोणालाच काहीच प्रश्न नाहीत.
पण तुमच्या ह्या लेख मुळे माझे अनेक प्रश्न सुटले.
Blockages हे heart ल रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिण्यातच च होतात.
मला वाटतं ते पुढे .
१) हार्ट कडून शरीरातील कोणत्या ही भागा कडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्त वहिनी मध्ये अडथळा आला तर हार्ट अटॅक येत नाही पण तो विशिष्ट भाग
बाधित होतो.
तुमचा लेख वाचून असे मी मत बनवले आहे.
योग्य आहे का?
आणि दुसरे.
जेव्हा आपण शारीरिक मेहनत करतो.
तेव्हा heart वेगाने पंप होते.
ऑक्सिजन युक्त रक्त ची गरज वाढते आणि lungs pan वेगाने काम करतात.
त्या मुळे धावताना दम लागतो.
हे पण माझे मत झाले आहे तुमचा हा लेख वाचून हे मत योग्य आहे का?

*वरील प्रश्न क्रमांक 1 मध्ये काही जर.. तर आहेत. त्याचे सविस्तर विवेचन सहाव्या भागात येईल

*क्रमांक 2 चे मत बरोबर आहे.

Pages