बऱ्याच महिन्यांपूर्वी, आमच्या चिरंजीवांना एक अतिशय कृश झालेले मांजरचे पिल्ले रस्त्याकडेला एका पडक्या बांधकामात धडपडताना दिसले. ते इतरांचे लक्ष वेधून कोणाची मदत मिळते का पाहत होते. पण कुणीच तिकडे लक्ष देत नव्हते. याला दया आली आणि त्यास घरी घेऊन आला. मला याआधी शहरात (पुण्यात) मांजर पाळण्याचा फारसा चांगला अनुभव नव्हता. त्यात आणि ती मांजरी असेल तर तिला दर चार महिन्यांनी पिल्लं होतात. त्यासाठी आपले घर हाच एक तिला आधार असतो. आणि एकदा मांजरीला घरात पिल्लं झाली कि आपले हाल कुत्रे खात नाहीत! आणि नेमके हि नवीन आलेले पिल्ले सुद्धा मांजरीच निघाली! तिचे नामकरण बेरी असे केले. तिचे ऑपरेशन करून घ्या हा उपाय अनेकदा अनेकांनी सुचवला. पण इतर कामांच्या प्राधान्यामुळे त्याची टाळाटाळ होत राहिली, आणि अखेर जे व्हायचे तेच झाले. बेरी मार्जरमातेने घरातच चार पिल्ले घातली!
मग काय ज्याची भीती होती तेच पुढे घडत गेले. बेरी आणि तिच्या चार पिल्लांना पाळणे काही दिवसांनंतर प्रचंड म्हणजे प्रचंड जिकीरीचे होऊन बसले होते. घरात माणसांपेक्षा मांजरांची संख्या जास्त झाली होती दिवसातला माझा बराच वेळ आणि श्रम त्यांच्याभोवतीच जात होते. याला कारण, त्यांचा वावर मला अनेक कारणांमुळे घरापुरताच मर्यादित ठेवावा लागला होता, हे होते. सर्वात मुख्य कारण म्हणजे सोसायटीत अर्ध-पाळीव (किंवा अर्ध-भटके) कुत्रे खूप आहेत. मध्यंतरी एकदा या पिलांची व मांजरीची घराबाहेर खाली पार्किंगमध्ये सोय केली होती. पण कुत्र्यांनी डाव साधलाच आणि एक दोन नव्हे, तब्बल चार धडधाकट कुत्र्यांनी मिळून भीषण हल्ला केला. त्यात नशिबाने हि सगळी पिल्ली आणि मांजरी कशीबशी वाचली. एक पिल्ले गायब झालेले. आम्हाला वाटले, गेले! पण अनेक तासांनी कुठूनसे बाहेर आले. लपून बसले होते. पण या घटनेनंतर पिलांची रवानगी पुन्हा घरात झाली. थोडक्यात काय, तर पिल्लांना बाहेर सोडणे म्हणजे जाणूनबुजून मरणाच्या दारात सोडल्यासारखेच होते. शिवाय, अजून एक मुख्य कारण म्हणजे आमच्या शेजारीपाजारी कुणालाच मांजर आवडत नसल्याने सुद्धा मांजराना बाहेर सोडून चालत नव्हते. कारण बाहेर सोडले कि ती आसपास जायचीच. आणि मांजराना भूभू सारखे घरात चोवीस तास डांबून ठेवणे मला अजिबात पटत नव्हते. मांजर हा आपल्याच मस्तीत जगणारा प्रचंड स्वातंत्र्यप्रिय प्राणी आहे. कोंडून ठेवल्यास मांजरं अतिशय बेचैन होते.
या सर्व गोष्टींमुळे बेरी सहित तिच्या पिल्लांना (बेरी कुटुंब) कुणालातरी देऊन टाकणे हाच एक उत्तम पर्याय माझ्यासमोर उपलब्ध होता. मी फेसबुक, व्हाट्सप, मायबोलीवर सगळीकडे फोटो टाकले. आपल्या मायबोलीवरून अनया यांचा प्रतिसाद आला होता कि त्या बेरी कुटुंब पाळू शकतात. पण सध्या त्या पुण्यात नसल्याने व त्यांना येण्यास अजून दोन-तीन आठवडे लागणार होते. आणि मला तर या मार्जर कुटुंबाला कधी एकदाचे कोणी घेऊन जातेय असे झालेले होते. एक एक दिवस अक्षरशः मोजून काढत होतो. दिवसेंदिवस अशक्यच होत चालले होते.
मग फेसबुकवरच्या पोस्टीला अजून एका ताईंचा प्रतिसाद आला. पण त्या दूर दूर कोकणात एका गावात राहत होत्या. त्यांनी आपल्या घराचे आणि परिसराचे फोटो पाठवले. त्यांचे घर खूप प्रशस्त होते. अगदी मांजरांना हवा तसा निवास व अधिवास (habitat) दिसत होता. पण तिकडे इतक्या दूर यांना कोण व कसे सोडणार? हा प्रश्न होताच. पण सकारात्मक बाब म्हणजे त्यांना अखंड मार्जर कुटुंब हवे होते. आणि माझे प्राधान्य सुद्धा तेच होते जेणेकरून त्यांची ताटातूट होऊ नये. म्हणून मी सुद्धा यांना तिकडे कसे सोडता येईल यावर मार्ग शोधू लागलो. सुदैवाने त्यांनीच एक मार्ग काढला. त्यांच्या ओळखीचे कोणी पुण्याहून कोकणात यायला निघाले होते. त्यांच्यासोबत मांजरीला व पिलांना पाठवणे हा पर्याय त्यांनी सुचवला. पण त्यात सुद्धा अनेक अडथळे आले. सर्वात मुख्य म्हणजे तुफान पाऊस. कोकणात मुसळधार पाऊस सुरु झाल्याने, जे तिकडे जाणार होते त्यांनी तो प्रवास पुढे ढकलला. झाले! म्हणजे अजून काही दिवस मांजरांचा मुक्काम घरात वाढणार? Noooo wayyy! मला तर ते केवळ अशक्य वाटू लागले. पण सुदैवाने पाऊस कमी झाला आणि त्यांचा फोन आला कि दुसर्या दिवशी सकाळी लवकर येत आहेत. मला हायसे वाटले. पण हाय रे कर्मा! नेमके आदल्या रात्री मांजरीने घराबाहेर जाण्यासाठी इतका त्रास दिला कि बोलता सोय नाही. तसे ती अनेकदा रात्री उशिरा बाहेर जायची. पण मांजरच ते! सकाळी वेळेत येईलच कशावरून? म्हणून मला तिला सोडायचे नव्हते. पण ओरडून आणि धडपडून तिने अक्षरशः त्राही भगवान करून सोडले! अखेर रात्री दीड वाजता तिला नाईलाजाने बाहेर सोडावे लागले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेच घडले जे घडण्याची रात्री शक्यता वाटत होती. चार पिल्ले घरात आणि बराच वेळ झाला तरी मांजरी गायब. कुठे कुठे शोधली हाका मारल्या. तरी एक ना दोन. आता जर ते न्यायला आले तर काय नुसती पिल्ले द्यायची? पण नशिबाने पुन्हा एकदा साथ दिली आणि नाटकाच्या शेवटच्या घंटेला मुख्य कलाकार हजर व्हावा तशी बेरीबाई अचानक कुठूनशी वेळेत हजर झाली.
मग त्या सर्वाना खायला घातले. दही खाल्य्याने त्यांना झोप येते असे निरीक्षण होते. त्यामुळे, दही खायला घातले. जेणेकरून पुढचे सात-आठ तास प्रवासात पिंजऱ्यात (खास मांजरांसाठीच बनवलेले असते ते बंदिस्त क्रेट) निवांत झोपून जातील हा हेतू. पण मी आतून प्रचंड बेचैन होतो. कारण मांजरीने व पिलानी याआधी कधीच प्रवास केला नव्हता. त्यातही अशा बंद पिंजऱ्यात तर पहिल्यांदाच (केवळ त्यांना तिकडे पाठवण्यासाठीच मी तो खरेदी केला होता), आणि शिवाय अखंड प्रवासाच्या सात-आठ तासांच्या काळात मी किंवा चिरंजीव कोणीही आसपास असणार नव्हते. आणि जे न्यायला आले होते ते मध्ये कुठेही यांना थोड्या वेळासाठी वगैरे पिंजऱ्याबाहेर सोडूही शकणार नव्हते (तसे करणेही योग्य नव्हते). या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम होऊन मांजरी कदाचित बिथरेल व अखंड प्रवासात काही अनुचित प्रकार घडू शकेल याचा मला प्रचंड तणाव आला होता. काही झाले तरी अखेर ती कॅट फॅमिलीच!
अखेर बेरी आणि तिच्या चार पिल्लांचा तो पिंजरा मी त्यांच्या गाडीत ठेवला. तो तिथे ठेवेपर्यंत ती नुसती सौम्य म्यांव म्यांव करत होती. बाहेर पडायचा हलकासा प्रयत्न करत होती. पण जसा मी पिंजरा त्यांच्या कार मध्ये ठेवला बाजूला झालो व 'बाय बाय' करण्यासाठी तिला पाहिले, तसे ती थोडी बिथरली. तिला आता कदाचित कळून चुकले असावे. ते तिच्या नजरेत स्पष्ट जाणवत होते "हे काय? आम्हाला सोडून चाललात? कुठे चाललात? नक्की काय सुरु आहे इथे?" त्यात आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसून येत होता. त्या एका क्षणात तिची नजर खूप काही सांगून गेली. मी आतून हललो. मुक्या प्राण्याला कसे सांगावे कि हे सगळे तुझ्या चांगल्यासाठीच सुरु आहे? माझ्याच्याने पुन्हा तिकडे पाहवले गेले नाही. ती कार जागची हलेपर्यत मी काळजावर दगड ठेऊन नजर वळवून भलतीकडेच पाहू लागलो. अखेर एकदाची ती कार हलली. बेरी कोकणात रवाना झाली. सकाळी अकराच्या दरम्यान त्यांचा हा अनेक तासांचा शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरु झाला.
त्यानंतरचे सात-आठ तास म्हणजे दिवसभर मी अस्वस्थ होतो. त्यांना सतत फोन करून विचारणे पण योग्य नव्हते. ड्रायव्हींग करतील का ते माझे फोन घेतील? तशीच काही इमर्जन्सी आलीच तर त्यांनीच फोन केला असताच ना? म्हणून फोन करणे मी टाळत राहिलो. न राहवून मध्ये एकदा दोनदा फोन केला पण लागला नाही. घाटात कुठेतरी कव्हरेज मध्ये नसावेत. अखेर सायंकाळी सहा वाजता त्या ताईंना मेसेज करून विचारले कि बेरी पोहोचली का? तर "अजून अर्धा तास लागेल" असे त्यांचे उत्तर आले. आणि त्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा मेसेज आला कि आताच गाडी आली आहे. त्यांना घरात घेऊन पिंजरा उघडून तुम्हाला लगेच मेसेज करते. मला थोडे हायसे वाटले. पण त्याचबरोबर मी त्यांना थोडी सावधानता बाळगण्याचा सल्लाही द्यायला विसरलो नाही. घरी मुले असतील व भोवती जमली, तर ते सगळे अनोळखी चेहरे पाहून मांजरी आक्रमक होऊ शकते. आधीच प्रवासाने व भुकेने त्रागा झालेला असेल. त्यामुळे ती व पिल्ले बाहेर पडून सेटल होई तोवर काळजी घ्यायला सांगितले.
पण त्यानंतर बराच काळ त्यांचा काहीच मेसेज नाही. नक्की काय झाले असेल? सर्वकाही ठीक तर असेल ना? न राहवून मीच पुन्हा मेसेज केला. "Is everything alright?"
मग त्यांचा रिप्लाय आला... "हो. घरात सगळीकडे फिरून पहायचे सुरु आहे व सेटल झाली सुद्धा नवीन घरात" त्या पाठोपाठ तिथले फोटो सुद्धा पाठवले.
आणि मी एक सुटकेचा दीर्घ नि:श्वास सोडला. काल रात्रीपासून झोप लागली नव्हती. दोन तास झोप काढली. उठलो तेंव्हा त्यांचा मेसेज आला होता. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती त्याचा स्क्रीनशॉट मला त्यांनी पाठवला होता. त्यात त्यांनी लिहिले होते कि,
त्यांच्या आधीच्या एका मांजरीची पिले दगावली होती. त्यामुळे त्या त्यांच्या आठवणीत उदास असायच्या. अनेक ठिकाणी शोधाशोध सुरु असता बेरी आणि तिची पिल्ले देण्याची माझी पोस्ट त्यांना दिसली. पण आणणार कशी? हा प्रश्न होता. सहा-सात तासांचा प्रवास. पण जणू देवाचेच पाठबळ होते. तोच मदतीला धावून आला व ती पिल्ले व त्यांची आई सुखरूप पोचली. आणि अखेर त्यांनी लिहिले होते "जणू माझे जिवलगच मला परत मिळाले!"
ते वाचताच मला एका जुन्या गाण्यातील ओळ आठवली. "धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास गले" सासरी जाणाऱ्या मुलीसाठी लिहिलेली ओळ. इथे मात्र बेरी आणि तिच्या पिल्लांच्या संदर्भात किती चपखलपणाने लागू झाली होती
मार्जर कुटुंब दुजाचे, ज्याचे तयास गेले
जो ज्यांचा अधिवास आहे, ते तिथेच पोहोचले. ज्यांना त्यांची ओढ होती, त्यांना ते मिळाले
आणि इकडे, लग्न झालेली मुलगी सासरी सुखात आहे कळल्यावर वधूपिता आणि कुटुंब जसे धन्य होतात तसे आम्ही धन्य झालो आहोत. कालपासून एक मोकळा श्वास आम्हीही घेत आहोत. आणि हो.... शेजारी सुद्धा खुश झाले आहेत
खूप छान लेखन
खूप छान लेखन
खूप संवेदनशील लेखन
तुमची घालमेल समजली रिलेट झाली
पण शेवट गोड तर सारं गोड !
मला रिलेट झालं कारण -
मला रिलेट झालं कारण -
माझ्याकडे एक VANCAT जातीची , तीन वर्षांची मांजर आहे . पूर्ण पांढरीशुभ्र . आम्हाला तिचा खूप लळा आहे . तिला माझा जास्त लळा आहे .
पण - ती सतत घरात असते . बंदिस्त . ती खूप भित्री आहे . तसेच तुम्ही जी सांगितली ती कारणं तर आहेतच . त्यामुळे ती बाहेर जात नाही . तिला बाहेरचं जग माहिती नाही . पण तेही ठीक आहे . तिला मोकळं फिरायला मिळावं असं वाटतं . जसं आता तुमच्या मांजर कुटुंबाला चान्स मिळाला . पण त्याहीपेक्षा जास्त - तिला एका पार्टनरची गरज आहे . मला याचं सतत वाईट वाटत राहतं . कदाचित मला नीट मांडता येत नसेल . समजून घ्या . तिची सकाळ अन रात्र किंवा माझी सकाळ अन माझी रात्र तिच्या बरोबरच असते , तरीही मला तिला अशा कोणाला द्यायची इच्छा आहे की ज्यांच्याकडे बोका असेल . जिथे तिला मोकळं मिळेल .
कोणी असेल तर कृपया कळवावे
आभारी आहे आणि क्षमाही
इथे मांडलं कारण वेदना एकच आहे .
सर्व प्रतिक्रिया समर्पक.
सर्व प्रतिक्रिया समर्पक. मनाला भिडणारा अनुभव. किती गोड पिल्ले आहेत.
छान चित्रदर्शी, हृदयस्पर्शी
छान चित्रदर्शी, हृदयस्पर्शी लेखन. सुस्थळी गेली.
कोकण आणि मांजरे हे समीकरण परफेक्ट, माझे दिर खूप रमतात, घरात खूप मांजरे आहेत. मागे दोन तीन वर्षांपूर्वी इथेच मायबोलीवर कुठल्या तरी उपक्रमात मी एकसारख्या दिसणाऱ्या मांजराचे फोटो टाकलेले. ती आता या जगात नाहीत, कुठलातरी आजार आला आणि गावातली बरीच मांजरे गेली, काही बिबट्याने नेली त्यामुळे दिर उदास होते थोडे पण नंतर परत कुठून मांजरे आली, मार्जार फॅमिली वाढत गेली. त्यामुळे ते खुश आहेत.
मी भू भू, माऊंना लांबून हाय हॅलो करणाऱ्या गटातली.
मस्त सोय झाली मांजराची... आता
मस्त सोय झाली मांजराची... आता रुळली का ती तिथे ?
वा, छान वाटले वाचुन. कौतुक
वा, छान वाटले वाचुन. कौतुक आहे तुमचे इतके कष्ट घेऊन पाठवणी केलीत.
किती छान अनुभव
किती छान अनुभव
खूप छान लिहिलं आहे.
खूप छान लिहिलं आहे.
मांजरांना योग्य घर मिळावे म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न, ती सोडून जाताना तुमची आणि त्यांची झालेली घालमेल सगळ डोळ्यासमोर आलं. मी प्राणी प्रेमी नसून ही शेवट तिकडे रुळली हे वाचून बरं ही वाटलं.
सुंदर लिहिलंय!
सुंदर लिहिलंय!
आणि फोटो तर खूपच गोड!
तुमचं, तुमच्या मुलाचं आणि त्या कोकणातल्या काकूंचं कौतुक वाटतं!
सर्व प्रतिसादकर्त्यांचे अगदी
सर्व प्रतिसादकर्त्यांचे अगदी मन:पूर्वक धन्यवाद _/\_
सारेच प्रतिसाद किती सुंदर व वाचनीय आहेत. समर्पक आहेत. प्रतिसादांतून आलेले भाव व काही अनुभव सुद्धा स्पर्शून जाताहेत खरंच तुम्हा सर्व प्रतिसादकांना खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा.
वास्तविक "हे कुटुंब सुदैवाने कोकणात एकाच घरी गेले" इतक्याच अर्थाचा प्रतिसाद त्या धाग्यावर लिहायला गेलो होतो. तर लिहिता लिहिता वेगळा लेखच तयार झाला. बेरी आणि पिल्लांची भावनिक गरज ज्यांना आहे त्यांच्याकडेच त्यांचे जाणे हे मलाच खूप भावले. खरंच, तंत्रज्ञानाचा आणि सोशल नेटवर्किंगचा किती सुंदर वापर झाला. त्यातूनच हा लेख लिहिला गेला. बंदिस्त जागेतली कुचंबणा सुटून बागडायला ऐसपैस जागेत गेल्या. खरंच, बेरी ने खरंच नशीब काढले ('पोरीने नशीब काढले' च्या टोन मध्ये ) होय, पुढे केंव्हा कोकणात सहकुटुंब जाऊ तेंव्हा धावती भेट द्यायचा विचार आहे. ताईने सुद्धा सांगितले आहे.
अनया, सॉरी तुम्ही येईपर्यंत थांबू शकलो नाही. पण तुम्हाला एक विपु केली आहे. या निमित्ताने मला त्या मांजर कुटुंबाची माहिती मिळाली. जर शक्य असेल तर तसे कळवा.
छान अनुभव आणि खूप छान लिहिले
छान अनुभव आणि खूप छान लिहिले आहे.
मी मांजर किंवा कुठल्याही पाळीव प्राण्यापासून चार हात दूर राहणारा जीव. पण मुले टोटल विरुद्ध. त्यामुळे हल्ली मलाही मांजरी जरा बऱ्या वाटू लागल्या आहेत
वरचा फोटो खूप मस्त आहे.
बिपीनजी, आमची माऊ पण एकदम
बिपीनजी, आमची माऊ पण एकदम अशीच आहे - सशासारखी पांढरीशुभ्र आणि सशाच्या काळजाची... अतिशय घाबरट आणि कमालीची लाजाळू.. आजिबात बाहेर पडत नाही. आणि मलाच वाईट वाटते की ती पण खूप एकटी आहे. तिला सोबत म्हणून अजून एक माऊ आणावे असे खूप खूप वाटते. पण नवर्याने सांगितलंय की अजून एक मांजर आणलेस तर दोन्ही मांजरे तुझ्याबरोबर कंपनीत घेऊन जायचे.
माझी माऊ शेजारांच्या बाल्कनीत जाते पण घरात जात नाही. दुसरे माऊ त्यांच्या घरात गेले तर त्यांना आजिबात नाही चालणार हे पण एक मोठे कारण आहे.
मला तुमची काळजी समजतेय..
क्युटनेस ओव्हरलोड आहे तो फोटो
क्युटनेस ओव्हरलोड आहे तो फोटो...
किती हृद्य लिहिलत अगदी
किती हृद्य लिहिलत अगदी टडोपा आलं
छानच लेख. मी पहिल्या पासून
छानच लेख. मी पहिल्या पासून ही स्टोरी फॉलो करत होते. माझ्याकडे पण सेम टु सेम प्रॉब्लेम आहे. इथले वाचून धडा घेतला.
मी डॉग ओनर व पर्सन पण मांजराशी काहीच वैर नाही. आमच्या मजल्या वरचे एक शेजारी एम्प्टी नेस्टर आहेत. ते सारखे इथे तिथे फिरत असतात. व घर बंद असते. ह्यांना मांजराला घरात घेउन खायला घालायची सवय आहे. पण ते नसले की माउ बिचारे दारापाशी रड त बसतात. ते न ऐकवून मी कॅट फूड घेउन त्यांना खायला द्या ला सुरू केले. हे फूड आता माझा कुत्रा पण खातो. ते ही आव्डीने.
ह्यात एक माउ प्रेग्नंट आहे
ह्यात एक माउ प्रेग्नंट आहे फारच हेवीली. पण ती घरात घुसाय्ला बघते. तिला घरा बाहेर खायला देत होते. पण ते तमीळ शेजार्यांना आवडले नाही.
आमचे कुत्रे बघितले की तिच्यावर धावून जाते व ती बचावा साठी त्यांच्या शू रॅक वर बसते. आता बसली तर ह्यांचे काय आम्ही चोरतो का पण नाही.
लुंगी जस्ट हेट्स इट. अँ ड माय डॉग अल्सो. हिचे बाळंत पण मी केले असते पण एकतर घरी कुत्रा आहे व मुलीने साफ नकार दिला त्यामुळे ती बाहेरच बसते. कुत्र्याने ती तरुण असताना किटन्स वर हल्ला केलेला आहे. हॉरिबल मेमरीज. सध्या कॉमन एंट रन्स जो जिन्याक डे उघडतो तो बंद आहे. म्हणा जे प्राणी यायचे नावच नको. ह्या शेजार्यांना बघून माझ्यातला अगदी आंध्रा रेड्डी जागा होतो. पण सध्या गुड बिहे विअर वर आहे.
सुंदर लेखन..!
सुंदर लेखन..!
मांजर आणि तिच्या पिल्लांचा किस्सा डोळ्यांसमोर उभा राहिला.
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
एकदम पुण्याचं काम केलंत तुम्ही.
मनसे ला बोलवा.. मराठी
मनसे ला बोलवा.. मराठी मांजरांना त्रास देतोय तामिळ शेजारी म्हणून...
छान लिहिलंय! आमच्याकडे गोष्टी
छान लिहिलंय! आमच्याकडे गोष्टी ऐकुन वय वर्ष ३ म्हणे - आपण एखाद पिल्लु आणुया ना .. काय हवय विचारल तर वासरु ते फिश टन्क अशी लिस्ट मूड प्रमाणे बदलत आहे
वाह वाह वासरू
वाह वाह
वासरू
चना@12 >>> वय वर्षे तीनला
चना@12 >>> वय वर्षे तीनला गेंडा, हत्ती दाखवा बागेत नेऊन.
कोकणात पाठवल्याने तुम्हाला
कोकणात पाठवल्याने तुम्हाला extra दुवा देतील मांजरं असे वाटतेय.
>>> आता काय बाबा ! मज्जा आहे एका (मार्जार) कुटुंबाची, रोजच मच्छाहार, तो ही ताज्या ताज्या माश्यांचा !
वाह ! चांगले केले तुम्ही,
वाह ! चांगले केले तुम्ही, त्यांची छान सोय बघितली.
छान लिहिलयं! बेरी आणि तिच्या
छान लिहिलयं! बेरी आणि तिच्या बाळांना योग्य घर मिळण्यासाठी किती तळमळीने प्रयत्न केलेत! तुमचे आणि तुमच्या मुलाचे खूप कौतुक वाटले.
Pages