! अत्तर कांड !

Submitted by Nagesh Dattatra... on 30 September, 2023 - 14:20

गावात बालवाडी पासून ते डीएड पर्यंतच सगळं शिक्षण उपलब्ध होतं. पण तरीही मला माहीत नाही वडिलांच्या मनात काय आलं आन त्यांनी पहिलं मला पहिली ते चौथी बोर्डिंग, मौजे खामगाव नंतर पाचवी ते सातवी मौजे चारे आणि परत आठवीला तालुका बार्शी जिंदाबाद ! नशिबात आई-बाप हायेत तरी च्यामायला रांडंच पोर बोडकच ! मी सोलापुरी आणि शिव्या अस्सल कोल्हापुरी भले शाब्बास ! असोत , नाही म्हणलं तरी साला आनंद आणि दुःख एकाच वेळेस झालेलं. आनंदी या साठी कि तालुक्याचं ठिकाण , मोट्ठी शाळा , एका एका वर्गाला आठ आठ तुकड्या , नवा गणवेश , नवं दप्तर पण दुःख यासाठी कि परत बोर्डिंग ! मंझी बोडकंपन संपायलाच तयार नाही. सकाळी बरोबर साडे नऊच्या एस. टी. ने आमचे थोरले बंधू चिरंजीव दादूस बरोबर पांढरी पेटी घेऊन अमासनी श्री शिवाजी बोर्डिंग बार्शीला सोडायला आले. ना निघताना आईच्या डोळ्यात पाणी ना बापाला शाळेत जायला उशीर होईल म्हणून घाई. आईनं दिलेलं जेवणानं चिरगुट तेवढं बहिणीनं दप्तरात टाकलं. तेवढंच आजच घरचं जेवण. परत हाय कि म्हणावं परातीतलं जेवण ! पसर भाजी , कर काला अन हाण जी वढ !
शाळेतल्या जिंदगीत अजून एक सुख म्हणजे शाळा सुरु होऊन एक डिड महिना झाला कि आला माझा वाढदिवस ! लहानपणीचा वाढदिवस म्हणजे एक दिवसाचं एक वेगळचं आयुष्य. सकाळी उठा. अंघोळ करा.देव कधी पुजलं नसलं तरी देव्हाऱ्या पुढं जाऊन लोटांगण घाला. आई - वडिलांच्या पाया पडा . आज्जी - आजोबांच्या पाया पडा मग आई ओवाळणार मग ताई ओवाळणार मग तांब्यात सकाळ च्या चुलीतला इस्तू ठेऊन आवडता ड्रेस इस्त्री करायचा कारण त्यादिवशी अखिल भारतीय वाढदिवस संघटनातील मुलांनी आणि मुलींनी गणवेशा ला सुट्टी जाहीर केलेली. नाही मनलं तरी त्या दिवशीचं केसावरच खोबरेल तेल जरा जास्तच चमकायचं ! पाय पडताना हातात पडलेली पाच किंवा दहा रुपयाची नोट स्पेशल असायची. चकचकीत घडी घालून वरच्या खिश्यात ठेवायची. त्या दिवशी माराला सुट्टी. ना आई सांडस(चिमटा) फेकुन मारणार ना वडील लबाड लांडगा म्हूणन तुडवणार ना बहीण डोक्यात खवडे मारणार ! त्या दिवशी नानाच्या दुकानावरून उधारीवर आणलेली ३०-४० पार्लेजीची चॉकलेटं डब्यात भरायचची आणि मग थेट शाळा. त्यादिशीच शाळेतलं वेलकम म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजराची दुसरी लावणीचं ! पहिल्या घंटेला राष्ट्रगीत झालं कि वर्ग शिक्षक वर्गात येणार. गणवेश घातला नाही म्हणून छडी खायच्या आत मॉनिटर त्या शिक्षकाला माझा वाढदिवस आहे म्हणून सांगणार . मग सर मला उभारायला सांगणार . स्वतः शुभेच्या देणार आणि मग माघून सारा वर्ग एका सुरात हैप्पी बर्थडे म्हणणार. मग मी वर्गात सर्वांना ती आणलेली पार्लेजीची चॉकलेटं एक एक करत वाटतं जाणार . मग हळूच तिचा डेस्क येणार .आवडणारी म्हणून मी तिला एक चॉकलेट जास्तीच देणार. बाकीच्या पेक्षा आपल्याला एक चॉकलेट जास्तीच मिळालं म्हणून ती हसणार. कोणी केलं नसलं म्हणून सगळ्या वर्गाच्या समोर ती हातात हात घेऊन मला विष करणार. हे सगळं पाहून सगळी विरोधी पोरं चाट पडणार मी मात्र जोमात ! त्या दिवशी गृहपाठ केला नाही म्हणून छडी पण माफ असनार. शाळा सुटणार घरी येणार मग खेळायला जाणार कारण आज अभ्यासाला पण सुट्टी. मास्टर शेफ नसली तरी खूप मेहनतीने बाहिनेने बनवलेला शिर्याचा केक संघ्याकाळी शेजार-पाजाऱ्यांबरोबर कापून खायचा सोबत आईने बनवलेला भडंग-चिवडा ! ओवाळून झाल्यावर मिळालेले ५-१० रुपये गल्ल्यात टाकायचे आणि मिळालेले पार्ले बिस्कीट पुढचे काही दिवस सकाळी चहाबरोबर मनसोक्त पोहायला ठेवायचे. एकंदरीत त्या दिवशी आनंदाबरोबर बिजनेस पण चांगला होयचा !! पण,यावेळेस असं काहीच घडणार नव्हतं.ना मास्टर शेफ बहिणी च्या हातचा शिर्याचा केक ना आईच्या हातचा भडंग-चिवडा ना सकाळी वडिलांच्या पाया पडताना मिळणारी पाच-दहाची नोट ना पार्ले बिस्कीट पुड्याचा ढीग. होणार होत ते फक्त अत्तर कांड !!!!
तालुका म्हणलं कि शिकवणी आली कारण तालुक्यातली मास्तरं शाळेत कमी अन शिकवणीतच जास्त शिकवतेत हे आजतागायत त्रिकाल बादि सत्य आहे ! त्याप्रमाणे इयत्ता आठवी २०१ १, पावसाळा ते दिवाळी ,पाहिलं सत्र ,पाचशे रुपये भरून बार्शीच्या उपळाई रोडला जगताप क्लास जॉईन केला. थोरले बंधू डिप्लोमा इन मॅकेनिकल संपून लागलीच आले होते त्या बरोबर त्यांची रेंजर सायकल पण आली होती जी योगा योगाने मला मिळाली. दररोज शाळा सुटली कि गणवेश पेटिट फेकायचा. हात पाय तोंड नुसतं म्हणायला म्हणून धोयचं आणि बरोबर संघ्याकाळी ६ ला जगतापांचा बीजगणित तास गाठायचा. नाही मनलं तर नटायची लय भारी हौस. भले दोन दिवस अंघोळ करायची नाही पण क्लास ला रुबाबातच.कारण तालुक्याला मी ज्या तुकडीत शिकत होतो ती ड तुकडी. अ ब क करत गाळून उरलेली अठरा पगड जातीतली सगळी काळवंडलेली पोरं माझ्याच तुकडीत.तालुक्यातला सगळा राडा-रोडा माझ्याच वर्गात. एकपण बाप्पी नाही. सगळे बाप्पेच ! आक्खी शाळा जरी आमच्या वर्गाला ड वरून ढ म्हणत असली या सगळ्या धतुर्यात एक गुलाबराव होता मोरे सर ! जाम मिश्किल आणि सुहासिक माणूस ! दररोज इन केलेली. फॉर्मल ब्लॅक शूज विथ व्हाईट सॉक्स. बेल्टला सतत नोकिया हँडसेट अडकवलेला विथ कव्हर अन दररोज वेगळा परफ्युम ! मोरे सर वर्गात आले कि सगळी पोरं पळवा-पळवीतली वासाड्या होयची.सर वर्गाच्या बाहेर असोत किंवा खाली, पोरांना कळून जायचं मोरेश्वर आसपास कुठेतरी आहेत. त्यामुळे वर्गातहि परफ्युम युद्द सुरु झालं. जो चांगला परफ्युम मारून येईल त्याला शॉलिड रिस्पेक्ट ! मोरेश्वरांमुळे वर्गात परफ्युम ची स्पर्धा लागली अन त्यामुळेच कदाचित माझं परफ्युम आणि अत्तर वर जरा जास्तच लक्ष्य केंद्रित होयला लागलं. मोठ्या बापाचे मग कधी कोब्रा मार तर कधी के.एस. मार करायला लागले. आम्ही बोर्डिंग ची पोरं ,आम्हाला डोक्यावर चकचकीत तेल मिळायचं तेच खूप असायचं. तरी आमच्यात एक बनकर नावाच बेणं होत. चांगलच चमकायचं . पार कपाळावर वगुळ येईपरेंत तेल लावायचा. तोंड चमकावं म्हणून तोंडाला सदा वेस्लीन फासलेलं त्यामुळं बनकर तोंडानी चांगलाच चमकायचा . आपण पण सुहासिक स्पर्धेत असावं म्हणून अगदी भाबड्या आशेनं सगळी पॉंड्स ची पावडर गणवेश्याच्या शर्टात आणि अंगावर पालथी करायचा.पाटीवर कुणी मुद्दाम बदका टाकला तर मारणाऱ्याचा हात अन शेजाऱ्याचं तोंड दोनीबी पांढरी होयची. त्यामुळं सगळी ड तुकडी पोरं त्याला पांढरी पाठ म्हणून म्हूऊन चिडवायची.
जस जसा माझा वाढदिवस जवळ येत गेला तस तसा या स्पर्धेत आपण नक्की उतरायचं नक्की केलं. मग विचार केला साला एक के. एस. घ्यायचा तर १२० रुपये(त्या वेळेची किंमत) . आपला बापूस काय एवढं पैशे देणार नाय आन आपल्याला कमवायची अक्कल नाय. मग कोब्रा घ्यायचा ठरवला तर महिन्याला बापूस १०० रुपये खर्चायला द्यायचा.कोब्रा ५६ रुपयाचा राहिले ४४ रुपये. हेच ४४ रुपये ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला घालवायचे तर राहिलेला महिन्यात आपला चाना-चुना (आमच्या इकडे याला चटपटीत खाणे किंवा गाड्यावरच किंवा बाह्येरच खान म्हणतात) ,साबण ,तेल, पावडर कसं भागवायच. हा यक्ष प्रश्न ! त्यामुळे कोब्रा चा विषय पण मी बेस्ट ऑफ फाईव्ह मधून बाहेर काढला. राहीलं फक्त अत्तर ! शेवटी या सुहासिक प्रश्नाचं उत्तर मला अत्तर नावाच्या उत्तरांन मिळालं. लो बजेट का होईना पण शनिवार दिनांक ६ ऑगस्ट २०११ ला बरोबर संद्याकाळी जगतापांचा क्लास सुटल्यानांतर तब्बल २० रुपये खर्च करून दाढी रंगवलेल्या आत्तार शेठ कडून अर्ध्या करंगळी एवढी अत्तराची कुपी आपल्या स्वतःला वाढदिवसाची सप्रेम भेट म्हणून घेऊन आलो. चेहऱ्यावर एक वेगळच हास्य होत. एक वेगळाच रुबाब अंगात फिनला होता. नाही म्हणलं तरी या सुहासिक दरवळीच्या स्पर्धेत अजून एक सुवास दरवळणारा होता. पण शेतकरी जसा आपली पिढीजात जमीन विकून मालामाल होतो पण ते पैसे रुपी अत्तर कुठं वापरायच याची अक्कल त्याला नसते तसचं थोडंसं काहीतरी २० रुपयाची का होईना मला ती अत्तराची कुपी कशी वापरायची हेच माहित नव्हत. ना मी लटकत मुरडत जायला कलावंतीण होतो ना मी कानात अत्तराच्या कापसाचा बोळा टाकायला मुसलमान होतो. कारण कधीही नं पाहिलेली ,कधी नं मिळालेली अशी भूतोना भविष्यती ती अत्तराची कुपी मी कडकडीत इस्त्रीच्या लाल बावट्यावर (शर्टावर)उपडी केली.
दिनांक ७ ऑगस्ट २०११ माझा वाढदिवस ! रविवार असल्या कारणानं संद्याकाळचा जगतापांचा क्लास आज सकाळी दहाला भरला होता. दररोज ४०-५० असलेली गाबडी आज जवळ जवळ १००-१२५ घरात होती कारण सरांनी सकाळ आणि संद्याकाळचा दोनी क्लास ची पोर आणि पोरी एकाच वेळी क्लास मध्ये बसवलेली होती. आज सगळ्यांनी आपल्याला पाहावे. हा दिवटा लाल बावट्या मध्ये कसा दिसतो हे सुहासिक मनांनी आणि डोळ्यांनी पाहावे अशी भाबडी आशा घेऊन मी आज मुद्दामच लेट आलो. कारण ह्या लाल बावट्यातल्या दिवट्याला बरोबर माहिती होत कि उशिरा आलं कि पोरीच्या साईड ला बसावं लागायचं म्हणून हा लाल बावटा पोरीच्या शेजारी येऊन बसला. बसतो ना बसतोच तोच जवळची पोरगी मनातल्या मनात जा होईना यमुनाबाई डुब्बे बोलून थोडीशी ऍडजस्ट करून बाजूला सरकली. क्लास सुरु झाला आणि सरांनी समोर दोर्यांनी काढलेल्या वर्तुळावर पोरं कंमेंट पास करत होती नेमकं त्याच वेळी माझ्या मागची पोरगी एकदम बेशुद्ध पडली आणि सगळ्या पोरींनी एकच चिवचिवाट सुरु केला. सरांना पण समजत नव्हतं काय झालाय. कारण आमच्या लाल बावट्यावरचा अत्तराचा वास एव्हाना सगळ्या क्लास मध्ये घुमत होता.मी पट्टे बहाद्दर सगळी अत्तराची बॉटल कपड्यावर उपडी करून आलो होतो हे कोणाला माहित नव्हतं . मग सगळ्या पोरी ओरडायला लागल्या खूप उग्र वास येतोय आणि हेच एव्हाना सरांना पण हळू हळू जाणवायला लागलं होत. साला दोन मिनिट पण सुहासिक आयुष्य या पोरीनं जगू दिल नाही. पुढच्याच क्षणी म्हणजे ७ ऑगस्ट २०११ श्रावण , शालिवाहन शके १९३३, शिवशक ३५०, विक्रम सवंत २०६६ सौर वर्षा, शरद ऋतू ,दक्षिणायन ,बरोबर १०. १३ मिनिटांनी जगताप सरांनी मला बाहेर हाकललं. मला बाहेर काढल्यानांतर सर आतमध्ये येताच दुसरी पोरगी पण बेशुद्द पडली आणि झालं सगळा क्लास आता पोरीसकट कोकलायला लागला. सरांना तर पळता भुई थोडी झाली.कारण मी बाहेर होतो वास बंद झाला होता तरीहि अजून एका पोरीला चक्कर आली होती. सर ताबोडतोब माघे आले आणि त्यांना कळून चुकलं कि हा वास अत्तराचा नाही तर दुसरा आहे. पुढं आलं तर वास नाही. वास फक्त मागेच आहे हे सरांनी ओळखलं आणि मागच्या सगळ्या पोरांच्या बॅगा चेक केल्या आणि घावला मासा जाळ्यात घावला !
दत्तया, माझ्याच वर्गातला ड तुकडीचा. हाय नाय तेवढा सगळा व्हाईटनर या पोरानं रुमालावर ओतून हुक्का ओढल्यागत माघे भिंतीला टेकून ओढत बसला होता. डोळे लाल बुंद झालेले. बोलता हि नीट येत नव्हतं. त्याला स्वतःच सुद्धा भान नव्हतं. मला मात्र चांगलंचं भान आलेलं. त्या दिवसापासून आजतागायत मी त्या कधीच सुहासिक अत्तराच्या दरवळीच्या स्पर्धेत पडलो नाही किंवा कधी अत्तर विकत घेतल नाही ते कायमचचं....!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol स्टोरी आणि स्टोरीटेलिंग दोन्ही भारी. वातावरण निर्मिती फारच मस्त. सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.

मायबोलीवर स्वागत.

>>>>पुढच्याच क्षणी म्हणजे ७ ऑगस्ट २०११ श्रावण , शालिवाहन शके १९३३, शिवशक ३५०, विक्रम सवंत २०६६ सौर वर्षा, शरद ऋतू ,दक्षिणायन ,बरोबर १०. १३ मिनिटांनी जगताप सरांनी मला बाहेर हाकललं.>>>

कडक...

Lol
छान लिहिलंय. (आधी मला अवस्थांतराच्या डायरीचं विडंबन वगैरे आहे की काय अशी शंका आली Happy )
कोब्रा आणि के.एस. ही परफ्यूमची नावं आहेत का?

छान कथा. मी परफ्युम्स च्या टेक्निकल डाटा भागात काम करते. इथे नाके फारच सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे कामानिमित्त लोक रूम मध्ये आत येतात तेव्हा त्यांच्या घामचे/ ते काम करत असलेल्या केमिक लचे वास येउन खरेच चक्कर येते किंवा निदान अन कंफर्टेबल वाटतेच. काही काही केमिकल चे तेलाचे वास फारच स्ट्रॉन्ग असतात. लिफ्ट मध्ये सुद्धा लोकांनी खाल्लेल्या गुट क्याचे वास त्रास दायक वाटतात, काही स्ट्राँग डिओ मारून असतात ते गेल्यावरही वास शिल्लक राहतात. बंद दाराआड लोकां नी काय स्वयंपाक केला असेल त्याचे वास नाकावर आदळतात.
त्यामुळे मी घरी कधीच अगरबत्ती, सें टेड मेणबत्ती लावत नाही. मोजकीच परफ्युम्स आवडीची आहेत.

छान लिहीले आहे!
मायबोलीवर स्वागत.

खाल्लेल्या गुटक्याचे वास त्रासदायक वाटतात >> सहमत

छान लिहिलंय... भगवंतनगरी भारी शहर आहे.. ती कुर्डुवाडी लातूर मिनी ट्रेन मस्त होती- आता बहुतेक बंद आहे वीस वर्षांपासून... खूप आधी जाणे झाले होते..

छान

@च्रप्स हो कुर्डवाडी लातूर ट्रेन मस्त होती. साधारणतः २००३ किंवा २००४ च्या आसपास बंद झाली. मी सिशू संस्कार केंद्रात असताना शाळेच्या ग्राउंड वरून पहायचो खूप आनंद यायचा...