नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आलेय. मागच्या जन्मात आल्यासारखं वाटतंय अगदी. कसे आहात सगळे?
२०२० मध्ये खरडलेलं हे सापडलं, तर वाटलं माबोवर सादर करुया. अभिप्राय जरुर कळवा. आवडलं तर स्वतःची पाठ थोपटून घेईन आणि नाही आवडलं तर स्वतःला धपाटा मारण्याचं नाटक करेन. :इमोजी टाकणं विसरलेली बाहुली:
******************************
हिऱ्या
ती नेहमीचीच दुपार होती. टळटळीत ऊन पडलं होतं. वरती सूर्य आग ओकत होता, तर खाली चारपदरी रस्त्यावर मुंग्यांच्या रांगेसारख्या चाललेल्या ह्या गाड्या धूर ओकत होत्या. फाटकी कळकट ठिगळलेली बनियान, तशीच खाकी हाफ चड्डी, खांद्यावर टाकलेलं मळकं फडकं, रापलेला काळा चेहरा, काटक्या झालेले हातपाय, घामात बुचकळून काढल्यासारखं वाटणारं अंग, आणि या मळक्या ध्यानातून त्यातल्या त्यात उठून दिसणारी डोक्यावरची वाढलेली, अस्ताव्यस्त झालेली तपकिरी रंगाची झुलपं, असा अवतार असलेला हिऱ्या रस्त्याच्या मधल्या पार्टीशनजवळ उभा होता, सिग्नल लागायची वाट बघत. त्याने मध्येच टाळूला हात लावला. सूर्यामुळे डोकं भलतंच तापलं होतं. ' हे डोकं अस्संच्या अस्सं बुढीबायकडं घेऊन गेलो, तर ती कसलीच कुरबुर न करता आपल्याला डोक्यावर रोट्या भाजून देईल', असा विचार त्याच्या डोक्यात आला अन् तो खुदकन हसला. तेरा वर्षांच्या हिऱ्याला तो वरचा लालभडक रागीट सूर्य आणि या दिमाखात चाललेल्या भारी भारी विशाल गाड्या यांचं फार अप्रूप वाटायचं. एकतर या दोन्ही गोष्टी त्याच्या आवाक्याच्या अगदी शेकडो मैल लांब होत्या आणि या दोहोंमधली भावशून्यता त्याला सहन व्हायची नाही. या दोहोंचं रुप त्याला बस्तीबाहेरच्या टपरीवर बसणाऱ्या चंदूचाचासारखं वाटायचं. मख्ख, रागीट, भावनाशून्य चेहऱ्याचं, चेहर्यावरची माशीही हलू न देणारं. सूर्यानं कधी हिऱ्याला होरपळून काढणं सोडलं नव्हतं, तर या गाड्यांनी कधी त्याला गरीबश्रीमंतांची दरी दाखवणं सोडलं नव्हतं. दोहो याला तुच्छ लेखत आहेत, कुत्सितपणे हसत आहेत असं त्याला तीव्रतेने वाटायचं. अशावेळी त्याला वाटायचं, की शहराच्या अगदी मधोमध एखादी दिमाखदार इमारत बनून जावं, जिला मोजण्यापलिकडे मजले असतील, काचेचे स्लायडिंग असतील, चमकदार रंगांच्या भिंती असतील! काचेच्या स्लायडिंगला उन्हाचा काहीच फरक पडणार नाही, उलट जितकं जास्त ऊन तितक्या काचा चमकतील, अन् या गर्विष्ठ सूर्याचा किती जळफळाट होईल! आपल्या चमकदार विशाल भिंती पाहून या गाड्यांचं अंगच हेव्यानं काळवंडेल! कश्शी जिरेल यांची!
कानाजवळच मोठ्ठ्याने हाॅर्न वाजल्याने हिऱ्याची तंंद्री भंग पावली. त्यानं पाहिलं, लाल सिग्नल पडायला पाचसहा सेकंदांचांच अवकाश होता. त्याने मान फिरवली आणि लगोलग सिग्नलच्या विरुद्ध दिशेला दूरवर धावणाऱ्या गाड्यांकडे मान उंचावून पाहिलं. कुठल्या गाड्या सिग्नलला थांबल्या, की लगेच गाठता येतील, याचा त्यानं अंदाज बांधला. इतक्यात सिग्नल लागला. काही बाईकस्वार सिग्नलला न जुमानता क्षणाभरातच सटकले, वेळ वाचवायला. टॅक्सी, कार्स, रिक्षा, बाईक, स्कुटी यांची न संपणारी रांगच सिग्नलला थांबली होती. हिऱ्या सफाईदारपणे झटपट गाड्यांच्या गर्दीत शिरला, आणि अंगात आल्यासारखं अगदी वेगात एका गाडीपाशी गेला, हिऱ्याला अंदाज आला होताच! त्याने मग काहीच क्षणांत आपल्या फडक्याने कारवरची धूळ स्वच्छ केली, आणि फडकं खांद्यावर टाकत गाडी चालवणाऱ्याच्या काचेपाशी हात पसरुन आर्जवं करू लागला, " साब दो ना.. दो ना.. कार चमकरेलीय.. दो ना "
मग गाडी चालवणाऱ्या मध्यमवर्गीय, टक्कल पडलेल्या त्रासिक चेहऱ्याच्या माणसाने काहीशा अनिच्छेनेच खिशात हात घातला, आणि बराच वेळ खिशात हात घोळवत पैसे शोधत असल्याचं नाटक केलं. हिऱ्या आशाळभूत नजरेनं त्याच्या चेहर्याकडे आणि खिशाकडे आळीपाळीने बघत होता. अखेर त्याने खिशातून हाताशी आलेली चिल्लर हिऱ्याच्या हातात खळ्ळकन टाकली आणि झर्रकन काच वर ओढून घेतली. एकाच क्षणात हिऱ्याने ओळखलं, की हातात फक्त सात रुपये आले आहेत. त्याने ते घट्ट मुठीत धरले आणि बंद खिडकीच्या काचेवर हाताने थापा मारत ओरडू लागला, " साब और दो ना.. और.. दसईच.. दस.... " आतल्या माणसाने एव्हाना मान फिरवली होती, तो समोर बघत होता, आणि हिऱ्याकडे लक्ष नसल्याचं दाखवत होता. अखेर हिऱ्या बाजूला झाला, सिग्नल पडायला चारेक सेकंद बाकी होते. सिग्नलवरचे लाल आकडे मिचमिचत होते. हिऱ्या गाड्यांमधून वाट काढत सफाईदारपणे पलिकडे गेला, अन् लगेच गाड्या सुरु झाल्या.
हिऱ्या मनातून चरफडला. या सिग्नलला फक्त सात रुपये मिळाले होते.. फक्त सात रुपये! त्याने खिशातून मळकं, बांधलेलं पुडकं काढलं. सांभाळून कठड्यावर ठेवलं आणि गाठ सोडली . त्या पुडक्यात त्याचे आज मिळालेले पैसे होते. चिल्लरच जास्त होती, अन् एखाददोन नोटा होत्या, पाच- दहा रुपयांच्या. आता मिळालेल्या सात रुपयांना फडक्यात ओतलं, आणि तो पैसे मोजू लागला. ' एक.. दो.. तीन.. छै... दस.. दो दस- बीस.. बीस तीन. बीस और तीन. ' एवढेसेच पैसे बघून हिऱ्याचं तोंड कनकुसं झालं. तेवीस रुपयांना परत फडक्यात बांधलं आणि खिशात सांभाळून ठेवून तो सिग्नल लागायची वाट पाहू लागला. हेच तर रोजचं आयुष्य, रोजचं जगणं होतं त्याचं. तो रहायचा, त्या बस्तीपासून जवळ असलेल्या सिग्नलला जास्त वेळाचा सिग्नल पडायचा. त्यामुळे बस्तीतले काहीजण सिग्नल लागल्यावर खेळणी, फुगे, वृत्तपत्र, सटरफटर खाऊच्या पुड्या, टोप्या, गजरे, फुलं, टिकल्या अशा वस्तू विकायचे. सिग्नलला या वस्तू विकत बस्तीतले काही लोक पोट भरत. दोनतीन मुलंही होती. त्यातला हिऱ्या एक. हिऱ्या बिनभांडवली काम करायचा, गाड्या पुसण्याचं. स्वच्छ गाड्या, अतिशय महागड्या गाड्या यांच्या वाटेला तो जायचा नाही. मळकट, स्क्रॅचेस गेलेल्या, धूळ बसलेल्या मध्यमवर्गीयांच्या गाड्या तो हेरायचा, आणि पुसायला लागायचा. तरी काही लोकं त्याला अडवायची, काही नाही. काही लोकं तर कार पुसून झाल्यावर खिडकीच बंद करुन घ्यायची आणि एकही रुपया द्यायची नाहीत. अशा लोकांचा हिऱ्याला प्रचंड राग यायचा. मनोमन शिव्यांची लाखोली वाहतच तो रस्त्याच्या कडेला पोहोचायचा. कधीमधी काही लोक पैशांऐवजी संत्रं, सफरचंद, केळं, बिस्किटचा पूडा, असं काहीतरी द्यायचे. हे खरंतर हिऱ्याला हे आवडत नसलं, तरी पोटात पेटलेल्या आगीत हा खाऊ वितळून जायचा, तात्पुरतं सुख द्यायला.
कधीकधी काही लोकं त्याला आपणहून बोलवायची. असं कधीकधीच व्हायचं. काही कनवाळू लोकं पन्नास रुपयेही द्यायची. पण असं अगदी क्वचित व्हायचं. ट्रॅफिक जॅम झाला, की हिऱ्या मनोमन खूश व्हायचा. सिग्नलची वाट न बघता तेवढ्या जास्तीच्या गाड्या पुसता यायच्या ना! मागे एकदा कुठल्याशा भागात कोणतरी बाबा येणार होते. त्यांच्या किर्तनासाठी गाड्यांचे लोंढेच्या लोंढे जात असत. काही गाड्यांवर बाबांचे स्टिकर लावलेले असत, आतल्या माणसांच्या कपाळाला गंधाची रेष, अंगात भगवे सदरे,पांढरी पॅंट असे. अशा गाड्या हेरुन हिऱ्या समोरची काच पुसायचा, आणि गाडी चालवणाऱ्याजवळ मोठ्याने " बाबा की जय! " बोलायचा. ते ऐकून काही श्रद्धाळू माणसं खूश होऊन हिऱ्याला डायरेक्ट पन्नासची नोट देत असत. तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होई. त्याला काहीतरी मोठ्ठं घबाड हाती लागल्यासारखं वाटे. पण हाही आनंद जास्तवेळ टिकायचा नाही. भाईला नियमित हप्ता द्यावा लागायचा, नाहीतर तो सरळ पोलिसांच्या ताब्यात देत असे. तशा भाईच्या पोलिसांसोबत ओळखी होत्या, भाईमुळेच पोलिस या वस्तूविक्रेत्यांना काही करायचे नाहीत, म्हणून भाईशी पंगा म्हणजे जेल असं समीकरण बनलं होतं.
पण कधीकधी पोलिस हिऱ्या आणि इतर विक्रेत्यांना हुसकावून लावायचे. जेव्हा कोणीतरी बडी हस्ती शहरात या मार्गाने येणार असली, तर पोलिस या विक्रेत्यांना बजावायचे, हुसकावून लावायचे, तरीही कोणी दिसला तर मारायचेही. अशा दिवसांत अर्थात हिऱ्याला काही काम नसायचं. साहजिक बुढीबायची भांडी जोरात आदळायची, आणि हिऱ्याला करपलेल्या रोट्या, बुरशी आलेली कसलीशी पातळ भाजी खावी लागायची. त्यामुळे कधीकधी तो दोन दोन दिवस उपाशी रहायचा. पण भूकेपुढे कोणाचं चालतं? भाजक्या मातीच्या चवीची रोटी, आणि आंबट वासाचा भपकारा मारणारी ती लिपलिपीत भाजी तो नाकडोळे बंद करुन गिळायचा, आणि वरुन घशात पेलाभर पाणी ओतायचा. पोटातली आग तात्पुरती तरी शमायची.
आजचा दिवस असा भर्रकन गेला. शनिवार असल्याने गाड्यांच्या गर्दीत हिऱ्याला जराही फुरसत मिळाली नाही. हिऱ्याने खिशातून पुडकं काढलं, कठड्यावर ठेवलं, गाठ सोडली, आणि आतले पैसे मोजू लागला. आज दिवसभरात चिल्लरच जास्त मिळाली होती. नाही म्हणायला वीसची एक चुरगाळलेली नोट आणि तशाच तीन दहा रुपयांच्या नोटा होत्या. आजच्या दिवसात सत्त्याऐंशी रुपये जमा झाले होते. त्याने दोन रुपये उचलून खिशात मोकळे टाकले. आज खरंतर त्याला चंदूचाचाकडून दहा रुपयाची थंड्याची बाटली घेऊन घसा गार गार करायचा होता, आणि त्याच्या भाषेत 'ऐऽऽश' करायची होती. पण आज हाताशी आलेले पैसे बघून त्यानं आपली इच्छा मारली. उद्या थंडा पिण्याचा बेत नक्की केला. न जाणो किती दिवस त्याचा हा बेत उद्यावर ढकलला जात होता! काहीही नसण्यापेक्षा हे बरं, असा विचार करुन त्याने ते पुडकं तसंच जपून बांधलं, खिशात ठेवलं, आणि रस्त्याच्या कडेने चालू लागला. संध्याकाळचा थंड वारा त्याचा थकवा जरा शांत करत होता. अंगावरचे घामाने भिजलेले कपडे वाळले होते. सूर्य जवळजवळ मावळला, तेव्हा तो चंदूचाचाच्या टपरीपाशी पोहोचला होता. आपल्याच विचारांत तो टपरी ओलांडून पुढे गेला, पण अचानक काहीतरी आठवल्यानं तो मागे वळला. चंदूचाचाच्या टपरीत जाऊन त्याला म्हणाला, " चाचा दो रुपये के पाव " मख्ख चेहर्याच्या चाचाने काहीही न बोलता त्याला चार पाव कागदात बांधून दिले. खिशात मोकळे टाकलेले दोन रुपये त्याने चंदूचाचाच्या हातावर ठेवले, आणि पावाची पुडी दुसऱ्या खिशात कोंबून तो बस्तीकडे चालू लागला.
हिऱ्याच्या नानीची - म्हणजेच बुढीबायची बस्तीत एक पत्र्याची शेड होती. तिकडेच तो कळायला लागल्यापासून वाढला होता. शेडमध्ये राहणारी माणसं दोनच. बुढीबाय आणि हिऱ्या. सारी बस्ती हिऱ्याच्या नानीला बुढीबाय बोलायची, म्हणून कळत नकळत तोही तिला बुढीबाय म्हणूनच हाक मारत होता. बुढीबाय तशी खाष्ट म्हातारी होती. अंगाला गुंडाळलेली, ठिगळं लावलेली मातकट मळकी साडी, पिंजारलेले पांढरट पिंगवे केस, काळे पडके दात, अंगावरच्या सुरकुत्या, वाळकं अंग, काळा वर्ण अशी भयानक दिसणारी म्हातारी. ती वयापेक्षा जास्तच म्हातारी दिसायची. तिच्या तोंडात मुलखाच्या शिव्या असायच्या, आणि त्यांचा प्रत्येकावर प्रयोग करायची. ती पोटासाठी दिवसभर मण्यांच्या माळा करायची, आणि सूर्य मावळतीला आला की तपकीर ओढत किंवा तंबाखू मळत शेडच्या दारात बसून येणाऱ्या-जाणाऱ्यावर खेकसायची. बुढीबायला एक मुलगाही होता, त्याला हिऱ्या मंग्यामामू म्हणून हाक मारायचा. त्याचं शिक्षण तर इतकं काहीच झालं नव्हतं. तो गुंडमवाली लोकांमध्ये वावरायचा. तो सतराशे साठ वेळा नोकरीधंदा बदलायचा. पैसे नसले की बुढीबायशी भांडून तिचे पैसे घेऊन जायचा. एरवी बस्तीला हादरवून सोडणारी बुढीबाय मुलासमोर मात्र काकुळतीला यायची. इथे येऊन राहण्याबद्दल विनवायची. पण तो नेहमीच भांडून आणि म्हातारीच्या डोळ्यांत आसवं आणून निघून जायचा. मंग्यामामूने म्हणे एका परजातीय मुलीशी परस्पर लग्न लावून दूर कुठे संसार थाटला होता. हिऱ्याने त्याच्या मामीला कधीच बघितलं नव्हतं. पण मामू कधीकधी चाॅकलेटस् ची पूडी आणायचा, म्हणून हिऱ्याला मामू आवडायचा.
बस्ती जशी जवळ यायला लागली तसा हिऱ्याने चालायचा वेग कमी केला. बनियान जरा नीट केली, हाफ चड्डी हाताने झटकली. हातावर थुंकी घेतली आणि हात एकमेकांवर चोळून ते मळकटलेल्या, रुक्ष चेहऱ्यावरुन फिरवले. नंतर तेच हात केसांवरुन फिरवले, आणि केस सारखे केले. एकदा हातापायांवरुन नजर फिरवली. घामात जणू आंघोळ झाल्यासारखं वाटत होतं अंग. हिऱ्याला याचा खरेतर तिटकारा यायचा, खासकरुन बस्तीच्या अलिकडे असलेल्या तिठ्यावर. तो यायचा त्या वाटेच्या बरोबर विरुद्ध वाटेनं ती गजरेवाली मुलगी यायची. चमेली नाव तिचं. जवळपास हिऱ्याच्याच वयाची. सावळ्या रंगाची, लहान चणीची, घाऱ्या डोळ्यांची, केसांचा बुचडा बांधलेली, निळा विरलेला फ्राॅक घातलेली. हिऱ्यापेक्षा कितीतरी स्वच्छ वाटायची ती. गेल्याच वर्षी ती तिच्या आईवडिलांसोबत इकडे रहायला आली होती. बुढीबायच्या झोपडीनंतर लगेच पाचव्या झोपडीत. तिची आई तिला गजरे विणून द्यायची आणि ती गजरे विकायची. तिचा आणि हिऱ्याचा बस्तीकडे येण्याचा वेळ एकच होता. आजकाल ती हिऱ्याकडे पाहून हलकंसं स्मितही करायला लागली होती. हे हिऱ्याला भारी वाटायचं. निदान तिच्यासमोर आपण चांगलं दिसावं, असं त्याला मनापासून वाटायचं.
तो तिठ्यापाशी आला. क्षणभर तिथे रेंगाळला. आजही त्याने सवयीनंच पलिकडच्या रस्त्यावर पाहिलं. ती झपझप येत होती. तिला येताना पाहून तो मनोमन खूश झाला. त्याला हात उंचावून तिला हाक मारावीशी वाटली, पण काहीतरी सुचून त्याने वर आणलेला हात तसाच खाली केला. कोणी उगाच काही भलते अर्थ काढू नयेत म्हणून रमतगमत इकडेतिकडे पाहू लागला. ती जवळ आली. त्याने तिच्याकडे ओझरतं पाहिलं. तीही त्याच्याकडेच पाहत होती. क्षणभर नजरानजर झाल्यावर तिनं स्मितहास्य केलं. त्यानेही हलकेच स्मितहास्य केलं आणि दोघंही एकमेकांत अंतर राखून चालू लागले. ती पुढे, तर तो मागे. एकदोन वळणांनंतर बुढीबायची पत्र्याची झोपडी दिसू लागली. पण बुढीबाय नेहमीसारखी दारात बसलेली नव्हती. झोपडीबाहेर बस्तीतल्यांची गर्दी जमली होती. हिऱ्याला वाटून गेलं, बुढ्ढीनं नक्कीच कायतरी झगडा केला असणार! त्यानं चालण्याचा वेग वाढवला. नक्की काय झालंय, याची त्याला उत्सुकता लागली. मनाच्या एका कोपऱ्यात काळजीही दाटून आली होती.
त्याला आलेलं बघून लोकांनी त्याला वाट करुन दिली. आतून बुढीबायच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. हिऱ्याच्या मनात चर्र झालं. तो झप्पकन आत शिरला. त्यानं पाहिलं, बुढीबायला खाली, एका फाटक्या चादरीवर झोपवलं होतं. तिची साडी गुडघ्याखाली मातीत, घाणीत माखली होती. तिचं सुरकुतलेलं अंग थरथरत होतं, ती कण्हत होती. तिच्या आजुबाजूला बस्तीतल्या बायका बसल्या होत्या. हिऱ्याला आलेलं पाहून चमेलीची आई- फिजामौसी म्हणाली,
" देखो बुढीबाय गटर में फिसल के गिरी.. राशन लेने गई थी.. हड्डी टूटी हय लगता.. "
हिऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शेवटी बुढीबाय त्याचा आधार होती. आईच्या मृत्यूनंतर जेव्हा हिऱ्याला त्याचा बाप बुढीबायकडे सोडून गेला तेव्हा तो जेमतेम वर्षाचा होता. त्यानंतर बुढीबायनेच त्याचा सांभाळ केला होता. खाऊ घातलं होतं. जगण्याची रीत शिकवली होती. तिचे हिऱ्यावर अगणित उपकार होते. त्यामुळे तिच्याविषयी त्याच्या मनात एक हळवा कोपरा होताच, जो आज असा अचानक वर आला होता. तो बुढीबायच्या उशाशी बसला. तिच्या डोक्यावरुन हात फिरवत कापऱ्या स्वरात म्हणाला,
" बोहत दुख रा हे बुढीबाय? कैसा हुवा ये? कुछ चाहीये तूमे? "
बुढीबायला हिऱ्या आल्याचं कळलं, तेव्हा तिने डोळे किंचीत उघडले. डोळ्यांत मायाळू भाव होते. काही वर्षांपूर्वी हिऱ्या महिनाभर साथीच्या तापाने फणफणला होता, तेव्हा त्याला पेज भरवताना बुढीबायच्या नजरेत भाव होते, तस्सेच! पण तेव्हा हिऱ्या झोपलेला होता, अन् आता ती. ती थरथरत्या आवाजात हिऱ्याला म्हणाली, " प.. प.. पा.. नी!"
हिऱ्या पाणी घ्यायला उठणार, इतक्यात फिजामौसीच्या बाजूला बसलेली चमेली लगबगीने उठली आणि पेल्यात मडक्यातलं पाणी भरुन तो पेला हिऱ्यासमोर धरला. चमेली आत कधी आली, हे हिऱ्याला कळलंही नव्हतं. क्षणभर स्तब्धच झालेल्या हिऱ्याने भानावर येऊन तिच्याकडून पेला घेतला आणि तो हलकेच बुढीबायच्या ओठाला लावला. ती आस्ते आस्ते दोन घोट पाणी प्यायली. तिला जरा बरं वाटलं असावं. तिनं जरासा हलण्याचा प्रयत्न केला, पण दुखऱ्या हाडाची हालचाल झाल्याने तिला अगदी जीव जाईस्तोवर कळ आली. अंगभर मुंग्या धावल्या. हिऱ्याने तिला सावरलं. काळजीच्या स्वरात म्हणाला, " बुढीबाय.. बुढीबाय लेटी रय.. आराम कर.. फोकट मे हिल मत.. "
इतक्यात शेजारचा बब्याभाई धापा टाकतच आला. हा मंग्यामामूचा मित्र. त्याच्या चेहऱ्यावर नुसता गुस्सा दिसत होता. त्याने मला बाहेर ओढलं आणि बडबडायला लागला, " मादर*द हय मंग्या! ये बुढीको जनम के बाद ही कुतिया के गोद मे छोडना चहीये था भ*वे को! उस को बताने गया था मै.. पैसा लगेगा समझा तो गां**टीका दूर जाने लगा. बोलता मेरा क्या मतलब, तेरेको भी कायकू बुढ्ढीपर प्यार आ रहा.. *टू स्साला! उसको बुढ्ढी मरी या रही, कुछ नही! हिऱ्या तेरकोही करना पडता बुढीका.. "
मामू अशा वेळीही सख्ख्या आईशी असं वागतोय, याचं हिऱ्याला वाईट वाटलं. आता बुढीबायचे आधार आपणच आहोत, या विचाराने त्याचं मन चेतावून गेलं, अंगात कसलासा जोश संचारला, उरलंसुरलं बाळपण गळून पडलं. तो उठला, बब्याभाईला म्हणाला, " भाय तू अमीनचाचाकी रिक्षा बुला.. मै बुढीबाय को हास्पिटल लेके जाता है.. "
बब्याभाई झटकन गेला. लोकं कुजबुजली. काही हुशार लोकांनी आधीच काढता पाय घेतला. बुढ्ढी काय म्हातारी, आज ना उद्या मरणारच! जिला स्वतःचा मुलगाही विचारत नाही, तिच्यासाठी हिऱ्यानं हाॅस्पिटलचा खर्च करणं हा निव्वळ वेडेपणा वाटत होता. हिऱ्याकडे तरी पैसे कुठून येणार! तो आता जमलेल्या बस्तीतल्या लोकांसमोरच हात पसरेल, हे कळून चुकल्यानं बघे म्हणून जमलेले काहीजण मागच्या मागे निघून गेले. हिऱ्याच्याही ते लक्षात आलं. त्याला फारच असहाय्य, अगतिक असल्यासारखं वाटलं. अखेर त्याने सगळ्यांपुढे हात जोडून त्यांना जायला सांगितलं. फिजामौसी आणि चमेली तेवढी थांबली. काहीवेळाने मौसी चमेलीच्या कानात काहीतरी कुजबुजली, आणि हिऱ्याकडे बघतच चमेली तिच्या झोपडीत गेली. बुढीबाय कण्हतच होती. अंगात हळूहळू ताप चढत होता. लवकर उपचार करणं गरजेचं होतं. तिला बरंच खरचटलंही होतं. जखमांतून रक्त येत होतं. हिऱ्यानं जखमांवर टाकायला बाहेरुन माती आणली. तो काय करणार, हे लक्षात येताच फिजामौसी कडाडली,
" हिरा! मत डाल! दाक्टर डाटता हय! इलाज नई करता! "
मग त्याने ती माती बाहेर नेऊन टाकली. बुढीबायच्या केसांवरुन हात फिरवला. तिला परत एकदा पाणी पाजलं. हिराच्या मनात विचार आला, आणि झोपडीच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या चारपाच भांड्यांमध्ये खुडबुड करु लागला. अपेक्षेप्रमाणे त्याला एका फुटक्या डब्यात ती गोष्ट सापडलीच. प्लास्टिकच्या पिशवीत बुढीबायनं तिचे पैसे जमवले होते. त्याने पिशवी उघडली, तिथेच कोपर्यात ओतली, आणि पैसे मोजू लागला. फक्त चारशे रुपये होते. काल रात्री ती पैसे मोजत होती, तेव्हातर जास्त होते! अचानक कुठे गेले! त्याने स्वतःचंही पुडकं त्या पिशवीत ठेवलं, आणि तिची सांभाळून घडी घातली. तो बुढीबायसमोर बसला, त्याने काहीसा उलगडा झाल्यासारखं तिला अचानक विचारलं, " मामू आया था क्या आज? "
तिच्या चेहऱ्यावरचे झर्रकन बदलत गेलेले भाव त्याच्या नजरेतून सुटले नाहीत. ती मिनिटभरानंतर हुंकारली. मग तिला दिलासा देण्यासाठी तिच्या नजरेसमोर पिशवी नाचवत तो म्हणाला, " चिन्ता मत करो बुढीबाय, हम इस पैसे में तेरा इलाज करेंगे. मेने मेरा पैसा भी डाला हय! "
यावर ती अगदी केविलवाणं, वेगळंच हसली. ते हास्य नक्की कसलं होतं हे हिऱ्याला उमजलं नाही..
इतक्यात बाहेरुन बब्याभाईचा आवाज आला. " हिराऽऽ रिक्षा आयी.. चल.. " हिऱ्याने हातातली ती पिशवी खिशात जपून ठेवली. हलक्या हाताने बुढीबायला भिंतीला टेकवून बसवलं. तिला जीवघेणी कळ आली. इतक्यात बब्याभाई आत आला. दोघांनी मिळून तिला उठवलं, आणि दोन बाजूंनी पकडून तिला आधार देत बाहेर आणलं. दोघांनी तिला खांद्यातून पकडत बस्तीबाहेर आणलं. अरुंद गल्लीबोळांमुळे रिक्षा बस्तीच्या बाहेर उभी होती. सावकाश म्हातारीला रिक्षात बसवलं. हिऱ्या एका बाजूला बसला. बब्याभाई न सांगताही दुसर्या बाजूने बसला आणि समोर बसलेल्या अमीनचाचांना निघण्याची खूण केली. रिक्षा सुरु होणार इतक्यात " रुकोऽऽ रुकोऽऽ" असं ओरडत, जोरजोरात हात हलवत चमेली धावत येताना दिसली. हिरा, बब्याभाई तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले. ती मान खाली घालून म्हणाली, " वो उधर हास्पिटलमे रुकना पडा तो.. इसलिये" आणि असं म्हणून तिने तिच्या हातात एक वर्तमानपत्राच्या भेंडोळीत लपेटलेली उबदार गोष्ट होती, ती हिऱ्याच्या हातात दिली. तो तिला काहीतरी विचारणार, त्याआधीच ती मागे वळून वाऱ्याच्या वेगात निघून गेली. हिऱ्यानं कागद उलगडून पाहिलं, त्यात चार गरम रोट्या बांधलेल्या होत्या. रोट्यांच्या काळपटपणावरून आणि आकारावरुन त्या चमेलीनंच बनवल्या असाव्यात, असा अंदाज हिऱ्यानं बांधला. " सयानी लडकी हय.. " बब्याभाई पुटपुटला. हिऱ्या भानावर आला न् त्यानं रिक्षा सुरु करायला सांगितलं.
अमीनचाचांनी रिक्षा चालू केली, आणि सांभाळून चालवत जवळच्या हॉस्पिटलमध्ये रिक्षा आणली. बब्याभाई आणि हिऱ्याने हलकेच बुढीबायला खाली उतरवलं. हिऱ्या चाचांना म्हणाला, " चाचा, कितना पैसा दू? " यावर चाचा मान हलवत म्हणाले, " अरे तू बुढीमौसीका देख.. मुझे मत देना पैसा.. चाहीये तो बुढीमौसी ठिक होगी तब फस्सकिल्लास रिक्षा चकाचक करके दे..! चल मे चलता है.. खुदा हाफिज! " हिऱ्याने नकळत हात जोडले. हिऱ्याने आणि बब्याभाईने बुढीबायला हळूहळू चालवत हाॅस्पिटलात नेलं. बब्याभाईने या दोघांना खुर्चीवर बसवलं, आणि तो बुढीबायचा नंबर लावून आला. थोड्याच वेळात बुढीबायचा नंबर लागला. हिऱ्या आणि बब्याभाई तिला आत घेऊन गेले. डाॅक्टरांनी तिला तपासलं. तिची अवस्था बघून आजचा दिवस तिला तिथेच अॅडमिट करायला सांगितलं. नर्स ने जखमा धुवून ड्रेसिंग केलं. डाॅक्टरांनी एक्सरे काढायला सांगितला, तात्पुरती पट्टी बांधली आणि औषधं लिहून दिली.
हिऱ्या नको म्हणत असतानाही औषधांची यादी बब्याभाईने त्याच्याकडे घेतली. औषधांचा कागद खिशात घालून तो कुठेतरी निघून गेला. तो दोन-तीन तासांत औषधं घेऊन परत आला. ही औषधं त्याने कशी आणली असतील देव जाणो! इतक्या वेळात इकडे हिऱ्याने बुढीबायचा एक्स रे काढून घेतला. काढलेला एक्सरे डाॅक्टरांना दाखवला. डाॅक्टर बराच वेळ एक्सरेकडे पाहत होते. खरंंतर हिऱ्याला डाॅक्टरांना विचारायचं होतं, ' बुढीबाय किती दिवसांत बरी होईल? किती लागलंय तिला? ' पण त्याची काही हिंमत झाली नाही. उच्चशिक्षित डाॅक्टरांच्या पांढरपेशा वागण्यात, हाॅस्पिटलच्या पांढऱ्या भिंतींत, औषधांच्या वासात आणि रोगट वातावरणात तो पार बुजून गेला होता. तो काहीच न बोलता डाॅक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या स्तब्ध, चेहऱ्यावरची रेषही न हलणाऱ्या चेहऱ्यावरुन त्याला काहीच निष्पन्न झालं नाही. थोड्यावेळात डाॅक्टरच म्हणाले, " हाड बरंच तुटलंय. तिची हाडं ठिसूळ झाल्याने पायाच्या हाडाचा एकेठिकाणी चुरा झालाय. एकतर म्हातारी बाई. राॅड घालावी लागेल. काही गोष्टी बाहेरून आणाव्या लागतील.. पैसा लागेल! "
पैसा! हिऱ्याच्या मनात चिंतेने घर केलं. किती लागतील पैसे..? आपल्याकडच्या चिरमिरीच्या पुंजीत काम होईल का.. नक्कीच नाही.. विचारात पडून तो गयावया करत डाॅक्टरांना म्हणाला, " साब हम गरीब हय! कुछ जमेगा ऐसा पैसा बताव ना! बुढीको बहुत दुखरेलाय. कुछ करो ना साब! मै पैर पकडताय साब!" डाॅक्टर म्हणाले, "हं वाटलंच मला. मी देतोय तो फाॅर्म भरुन आणा. त्यात सांगितलेल्या कागदांच्या प्रती आणा. काही पैसे कमी होतील. जे करायचंय ते लवकर करा, म्हातारी सिरीयस आहे."
इतक्यात बब्याभाई आला. तो डाॅक्टरांशी काहीतरी बोलला. मग हिऱ्याजवळ येऊन म्हणाला, " अरे देख.. बुढीको भोत लगा हय.. मै ये फार्म भरके कल सुबेको लाता हय.. साथमे बस्तीवालोंके पास पैसेका कुछ होता है क्या देखताय.. भोत रात हुई रे. मै जाता हय. तू इधरीच रुक, बुढीके पास. किधर मत जा. और सुन, कल तूभी जरा बाकीके पैसे का देख.. कुछ भी कर, कलतक पैसा ला. जितना जल्दी आपरेशन होएंगा उतना जलदी बुढी ठिक होएंगी.. समजा? "
हिऱ्यानं मान डोलावली. बब्याभाई गेला. बुढीबाय डोळे मिटून पडून होती. तिला जरा आराम पडला असावा. खरंच खूप रात्र झाली होती. रात्रपाळीचे डाॅक्टर मघाशीच तपासून गेले होते. खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यावरची गिचाड गर्दी आताकुठे ओसरली होती. हाॅस्पिटलमधला लोकांचा पायरवसुद्धा थांबला होता. सगळं सामसुम होतं. नाही म्हणायला मोठ्या घड्याळाची टिकटिक, घोरण्याचे आणि कण्हण्याचे संमिश्र आवाज, पंख्याची घरघर अविरत चालूच होती. या शांततेत हिऱ्या सुन्न झाला होता. बुढीबाय जराशी हलली. लगेच तिच्या तोंडातून कण्हण्याचा आवाज बाहेर पडला. " मत हिल बुढीबाय! कुछ चाईये क्या? रुक तेरेको पानी देता हूं", हिऱ्या पुटपुटत म्हणाला. तो उठला. त्याने इकडेतिकडे पाहिलं. तो पलिकडे गेला. थोड्याच वेळाने कुठूनतरी पाणीभरला प्लास्टिकचा ग्लास घेऊन आला. तो बुढीबायच्या उशाशी बसला. तिला थोडं पाणी पाजलं. जरावेळानं तिला कोरडी भाकरी तुकडातुकडा करत भरवली. परत जरा पाणी पाजलं.
काय करावं काहीच कळत नव्हतं त्याला. 'पैसा कुठून आणायचा! विकण्यासारखंही काही नाही जवळ. मंग्यामामूशिवाय दुसरं कोणी नात्याचं नव्हतं आणि मंग्यामामू काही मदत करणार नव्हता. वस्तीतल्यांकडे मागूनही जास्त काही पैसे जमा होणार नव्हते. गाड्या पुसून इतके पैसे येणं अशक्य होतं. काय करावं! मग बुढीबायला असंच मरुन द्यावं? आपल्या अजाणत्या वयात तिनेही असा स्वार्थी विचार केला असता तर! ' हिऱ्याचं डोकं भिरभिरु लागलं होतं. सगळं जग त्याच्याभोवती फिरतंय आणि त्याला काहीच सुचत नाहीये. जसा वेळ चाललाय तसं हातातून काहीतरी निसटून जातंय, अशी अनामिक भावना वाढत चालली आहे...
अचानक हिऱ्या काहीतरी निश्चय करुन उठला. 'जे होईल ते बघितलं जाईल, आपण प्रयत्नांना तर सुरुवात करायला हवी' असं मनात ठेवून. त्याच्या चेहऱ्यावर निश्चयाची ठळक रेषा स्पष्ट दिसत होती. बालिशपणाची उरलीसुरली सालही गळून पडत होती. काॅटवर पडलेली बुढीबाय जराशी हलली. औषधांच्या अंमलामुळे तिला तीन तास शांत झोप लागली होती. तिची जरा चाळवाचाळव झाली, तिच्यात हलायचेही त्राण नव्हते. तिने सावकाश डोळे उघडले. प्रथम तिला अनोळखी परिसर पाहून बावरल्यासारखे झाले, पण हळूहळू तिला सारे आठवले. सावकाश तिची नजर हिऱ्यावर खिळली अन् त्या जिवघेण्या दुखण्यातही तिच्या चेहर्यावरच्या आक्रसलेल्या रेषांवर जरा सैलपणा आला. आपल्या कोरड्या ओठांतून तिला हिऱ्याला प्रेमभराने हाक मारायची होती, पण बाहेर पडला फक्त एक हुंकार. हिऱ्यानं तिच्याकडे पाहिलं. दिलासा देण्यासाठी तिचा हात घट्ट
पकडून तिला विचारलं, " क्या चहिये बुढीबाय? " तिने डोळ्यांची उघडझाप करुन 'काही नको' असं सांगितलं अन् ती परत डोळे मिटून पडली. तिचं आक्रसलेलं अंग, चेहर्यावर आलेल्या सुरकुत्या अन् हाताच्या घट्ट वळलेल्या मुठी पाहून हिऱ्याला तिच्या वेदनांची जरा कल्पना आली आणि त्याचा चेहरा आणखी पडला. आपण हिच्या वेदना का कमी करु शकत नाही, याची बोच त्याच्या मनाला सलत होती.
सारखं सारखं न राहवून हिऱ्याच्या मनात त्याच घडलेल्या प्रसंगाचं मळभ दाटून येत होतं. कुठेतरी आत वाटत होतं की हे काळं स्वप्नं असू दे.. कालपरवा पर्यंत ठणठणीत असणारी बुढीबाय नेहमीसारखं राशन आणायला जाते काय न् पाय घसरुन पडते काय..
तेही एवढं जिवावरचं लागून.. अचानक त्याला काहीतरी सुचलं. त्यानं अलगदपणे बुढीबायला साद घातली. तिच्या तोंडातून लगेच कण्हण्याचा आवाज आला. म्हणजे ती जागी होती तर.
तो हळुवार कापऱ्या स्वरात म्हणाला, "बुढीबाय, ए बुढीबाय, ले दो घूट पानी पी.. "
त्यानं तिच्या तोंडात चमचाभर पाणी ओतलं, चारदोन थेंब वगळता बाकीचं पाणी तिच्या घशाखाली गेलं. हिऱ्यानं तिला अलगद थोपटलं.
तो म्हणाला, " तू फिसल के गिरी तब मामु था क्या तेरे साथ? "
हे शब्द ऐकून म्हातारी अस्वस्थशी वाटायला लागली.. तिने चारीकडे नजर फिरवली. तिच्या डोळ्यांत लाचारी स्पष्ट दिसत होती. पण हिऱ्याची सत्यशोधक नजर तिच्याकडे खिळली होती, आणि म्हणूनच की काय ती खोटं वागू शकली नाही.. तिने तोंडातून होकारयुक्त हुंकार बाहेर काढला.. अन् मागोमाग एक असहाय हुंदका..
हिऱ्याभोवती सारं जग गोलगोल फिरु लागलं होतं. मामुविषयी त्याच्या मनात भरभरून राग, तुच्छता दाटून आली होती.. पैश्यांसाठी त्यानं असं करावं?! त्याला सुन्न झालं. हळूहळू तो तिच्यात उशाशी खाली टेकून बसला. हलकेच तो तिच्या आधीच पिंजारलेल्या,आणि आता खूप विस्कटलेल्या पांढर्या विरळ केसांतून फिरवू लागला. त्याची नजर शून्यात लागली होती. चेहरा लोखंडाहून कठीण झाला होता. हळूहळू त्याला डोळ्यांसमोरचं सारं भुरकट दिसू लागलं अन् वेगवेगळी वलयं नजरेसमोर तरळू लागली. नानाविध चित्रं. शेकडो प्रसंग. तुंबलेला प्रवाह एकाएकी खळाळून वाहू लागावा, तसे आठवणींचे पाट त्याच्या नजरेसमोरुन जाऊ लागले. त्यांच्यात सुसूत्रता नव्हती, ते क्रमनिवार नव्हते, त्यांचं कसलं वर्गीकरण नव्हतं, त्यांच्यावर ठरावीक संस्करण केलं नव्हतं. वरवर कसलीही संगती न लागणाऱ्या आठवणी, पण त्यांच्यात एक साम्य होतं, बुढीबाय.
त्याच्या आठवणींचं क्षितिज बुढीबायपासूनच सुरु होत होतं. अगदी लहानपणी पाजलेलं पिठाचं पाणी, फुटक्या पत्र्याच्या डब्यात दगड ठेवून त्याच्यासाठी तिने केलेलं खेळणं, कधीतरी हातात ठेवलेली शेंगदाण्याची वडी, आत्ताच तर झालं नाही का हे! पाठीत धपाटा घातल्यावर लगेच पाठ चोळणारी बुढीबाय. अगदी कुरकुर करत का होईना, पण कालपरवापर्यंत त्याच्या आजारपणात जागलेली, मध्येच मध्यरात्री कपाळावर हात ठेवून गेलेली बुढीबाय. त्याच्याच वयाच्या मोटूने चार वर्षांपूर्वी रागाने आपल्या डोक्यात घातलेला दगड, आणि तोच दगड घेऊन अंगात वेड भरल्यासारखी त्याच्या घरासमोर रागाने थयथया नाचणारी बुढीबाय. पीराच्या जत्रेला न चुकता हातावर नाणं ठेवणारी बुढीबाय. ओरडणारी, रागवणारी, पण मनातून मायेचा ओलावा असणारी बुढीबाय. परिस्थितीनं तिला असं तापट, वेडसर केलं होतं, पण ती हिऱ्यावर नकळत माया करत होती. नाही! तिला वाचवायलाच हवं होतं! काहीही करुन! आता हिंमत हरता कामा नये!!
आठवणींच्या प्रपातात हिऱ्याला झोप कधी लागली त्यालाही कळलं नाही. अगदी लहानपणी वीजा कडाडल्यावर तो बुढीबायच्या कुशीत जायचा, नि तेव्हा कशी उबदार झोप लागायची ना, तशीच. जाग आली तेव्हा चांगलं फटफटलं होतं. काही नर्स इकडून तिकडे फिरत होत्या. काहीजण पेशंटना भेटायला येत होते, रात्रभर थांबलेल्या नातेवाईकांत कपडे धुण्यासाठी, आंघोळ, प्रातःविधी उरकण्यासाठी लगबग दिसत होती. एकदोन मावशी सफाई करत होत्या. काल रात्रीहून इथे जरा चेतना जाणवत होती. डोळे चोळतच हिऱ्या उठला. त्यानं एकवार बुढीबायकडे पाहिलं. तिचे डोळे सताड उघडे होते, आढ्याकडे शून्यात बघत होते. तिच्या चेहर्याकडे पाहून त्याला धसकाच बसला. चेहर्यावर त्रासिक आठ्या होत्या, अंग ताठ झालं होतं, आणि पाय तर प्रचंड सुजला होता. जखमांमधला ओलावा जरासा कमी झाला होता, जखमेवरचं रक्त गोठलं होतं. डोळ्याच्या कडेतून तिला हिऱ्याची हालचाल जाणवली असावी. तिने नजर त्याच्याकडे वळवली. तिची नजर तरल झाली होती. डोळ्यात पुसट ओळख होती, दुःख होतं, वेदना होती, अलिप्तता होती, अन् आणखी काही अनामिक असावं जे त्याच्या नजरेतून सुटलं. त्याने एक आवंढा गिळला. इथं आणखी थांबू नये असं वाटू लागलं, अन् तो तोंड धुवायला बाहेरच्या नळाजवळ गेला.
परत येईपर्यंत त्याला जरा वेळच झाला. पाय ओढवत नव्हता. नाही नाही ते विचार फिरुन मनात येत होते अन् त्याला अस्वस्थ करत होते. तो परत आला तेव्हा त्यानं पाहिलं, बब्याभाई आला होता. त्यानं कालचा फाॅर्म भरुन जमा केला होता. बुढीबायच्या खाटेशेजारी तो अस्वस्थपणे येरझाऱ्या घालताना हिऱ्याला दिसला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आॅपरेशनच्या पैशात सूट मिळाली तरी सगळा खर्च मिळून पेलवण्याइतका नव्हताच. तरी बब्याभाई धीर देत होता. बुढीबायच्या सकाळच्या गोळ्या घेऊन ती झोपली होती. तिचं अंग अजून तापलेलं होतं. पायही टम्म फुगून काळानिळा पडला होता. एकदम मलूल, अशक्त दिसत होती ती. चेहरा ओढल्यासारखा वाटत होता. विचारांची गाडी त्या क्रूर क्षणावर जाऊन ठेपू नये म्हणून त्यानं लागलीच नजर फिरवली.
तिची अवस्था पाहून खरंतर हिऱ्याला आधार तुटल्यासारखं झालं होतं. पण तशाही परिस्थितीत त्याच्या मनात आशा होती, की एकदाचं आॅपरेशन झालं की ही बरी होईल. प्रयत्न करायलाच हवा होतं, तरच प्रयत्नाचं यश मिळणार होतं, बुढीबाय बरी होणार होती, हो, ती बरी होणार होती! बब्याभाई थोड्यावेळाने जायला निघाला, तेव्हा तो धीर करुन बब्याभाईला म्हणाला, "मेरेको बस्ती पे लेके चलता है क्या? " बब्याभाईला कारण सांगितल्यावर त्याच्या नजरेत एकाएकी कौतुक दाटून आलं. कारण हिऱ्या आता क्षणाचा विलंब न करता शेडमधून त्याचं मळकं फडकं घेणार होता, आणि सिग्नलला जाऊन थांबणार होता, गाड्या पुसायला. न जाणो आज जास्त पैसे मिळतील. हा एकच मार्ग आता त्याला दिसत होता. जरी हवेत तितके पैसे नाही जमा झाले, तरी तो जमतील तितके सर्व पैसे डाॅक्टरकडे देऊन म्हातारीचा इलाज करुन घेणार होता. बब्याभाईनेही ठरवलं, कुठून उसनवारीने पैसे मिळाले तर पाहूया..डाॅक्टरने तर सालं कायकाय डोक्यावरचं सांगून पार भुर्जी केली... पैसे टाकावे लागतील इतकं मात्र कळलं.. ते काहीही असो पोराचा एकुलता एक आधार आहे बुढ्ढी.. लंगडी का होईना पण हिऱ्याच्या माथ्या़वर हात ठेऊन पाहिजे ती काही वर्षं तरी..
*******************************
संध्याकाळ कलत आली होती. आभाळ लालभडक झालं होतं. जणू कसलीतरी चेतावणी देत असावं. रोजच्यासारख्या मोठाल्या इमारती स्वतःतच मग्न असल्याप्रमाणे तिथेच उभ्या होत्या. वातावरण धूळ, धूराने गच्च भरुन गेलं होतं. गाड्यांना कसली पर्वा नव्हती, त्या स्वतःतच मश्गूल असल्यासारख्या भर्रकन निघून जात होत्या न् दिसेनाश्या होत होत्या. हिऱ्या नेहमीसारखा रोजच्या जागी उभा राहून गाड्या थांबायची वाट पाहत होता. पण आज त्याच्या चेहर्यावर तो नेहमीचा बिंधास्तपणा नव्हता. त्याच्या चेहर्यावर एक प्रकारचं दडपण, अस्वस्थपणा, चिंता काचेसारखं लख्ख दिसत होतं. त्याच्या सोबत असणाऱ्या वस्तीतील सोबत्यांमध्ये नाना प्रकारची कुजबुज सुरु होती. त्या अस्पष्ट शब्दांपैकी हिऱ्याला दिलासाजनक फार थोडे होते, अन् त्याच्या काळजात धस्स करणारेच जास्त होते. आणि तिच्या अपघाताबद्दल तर कोणीही शेंबडं पोर येऊन मनाला येईल ते बोलत होतं. कोण बोलत होतं बुढ्ढीला वेड्याचा झटका येऊन ती वेड्यासारखी धावत सुटली आणि घसरून पडली... कोणी म्हणत होतं अनजान भुकेल्या भिकाऱ्याने राशन चोरण्यासाठी तिला ढकललं... पण वस्तीतल्या विचारी लोकांचं बोट मंग्यामामूकडेच जात होतं.. त्याचा स्वभाव आणि बुढीबद्दलचे विचार जाणणारे तर आपल्या मताबद्दल ठाम होते. काल वस्तीभर बुढीबायचाच ज्वलंत विषय असावा.
हिऱ्या प्रयत्नपूर्वक सारे विषय टाळत होता.. कोणाशी जास्तकमी बोलणं टाळत होता. सकाळी आल्यापासून त्याने काही आपलं बूड जमिनीला टेकवलं नव्हतं, की काही खाल्लंप्यायलं नव्हतं. आज सुदैवाने गाड्यांची गर्दीही होती. हिऱ्या एखाद्या मशिनीसारखा काम करत चालला होता. गाडी पुसायची, केविलवाण्या नजरेने पैसे मागायचे, जितके मिळतील तितके मुठीत गच्च पकडून पुढल्या गाडीची काच पुसायची. माणसाचं मन चांगलं असल्यास त्याला समोरच्याचं दुःख न सांगता दिसत असावं का.. म्हणूनच की काय घाईत असलेली चांगली माणसंही हीऱ्याच्या हातात वीस, पन्नास ची नोट ठेऊन जात होती. पण एक खरं, हिऱ्यासारख्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरचे भावना दाबून ठेवलेले यांत्रिक भाव पाहून जो तो चकीत होत होता.
तसे पहायला गेले तर हिऱ्याकडे रोजच्यापेक्षा जास्त पैसे जमले होते, पण बुढीच्या इलाजासाठी ते कमीच होते. तो हताश नजरेने जमलेल्या पैशांच्या पुडक्याकडे बघत होता, आणि पुढचा सिग्नल पडायची वाट बघत होता. तसं तर दिवसभर हिऱ्या इकडे असताना बब्याभाईची धावपळ सुरूच होती. बुढीचं खायचंप्यायचं बघून तिच्या तब्बेतीबद्दल हिऱ्याला आश्वासन देण्यासाठी तो एकदा सिग्नलपाशीही आला होता. इतका वेळ काहीही न खातापिता घामाच्या धारांत आंघोळ झालेल्या हिऱ्याला त्याने बळेच दोन घासही खायला लावले होते. बब्याभाईला बुढ्ढी बरी होईल असं वाटत नव्हतं पण त्याने हिऱ्यासमोर चकारही काढला नाही. बुढ्ढीची अवस्था फारच वाईट होती पण तरीही माणसाच्या मनात कुठेतरी एक आशेचा किरण असतोच.
बघता बघता काळोख झाला. म्युन्सिप्ल्टीचे दिवे लागले. हिऱ्यासोबत सिग्नलवर वस्तू विकणारे हळूहळू पांगायला लागले होते. त्याच्या काही चांगल्या मित्रांनी आजच्या जमलेल्या पैशांतले काही पैसेही त्याला देऊ केले. कामावरून येणाऱ्यांची गर्दी आता कमी झाली होती आणि आता काहीच वेळाने सिग्नला न जुमानता वेगाने जाणाऱ्या गाड्या सुरू झाल्या असत्या. दारू पिऊन स्वतःच्याच धुंदीत गाडी चालवणारेही दिसले असते. त्यामुळे आता थांबूनही काही फायदा नव्हता. या वेळेला मवाली गुंड लोक, बेवडे लोक यांचा पायाखालचा रस्ता हाच होता आणि काहीही करून हिऱ्याला आपल्याकडचे पैसे गमवायचे नव्हते. त्याने पैसे सांभाळून ठेवले आणि हाॅस्पिटलच्या दिशेने चालू लागला.
********************************
बुढीबाय दिवसभर हाॅस्पिटलच्या खाटेवरच पडून होती. तिला फार वेदना होत होत्या. तिचा पाय टम्म सुजला होता. हाताचा स्नायू सैल झालासा वाटत होता आणि पाठीत उसण भरली होती. तिला काही सुचत नव्हतं. ती अर्धवट गुंगीतच होती. तिचे हाल खरंच बघवत नव्हते. डाॅक्टर दोनदा तपासून गेले होते, नर्सने येऊन औषधंही दिली होती. बब्याभाई एकदोनदा येऊन गेला होता. पण बुढीबायला काहीच इतकं आठवत नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर फक्त तरळत होती आठवणीतली चित्रं. त्यांचा काहीच क्रम नव्हता पण बुढीबायला वेदना विसरायला मदत होत होती. लहानपण, तरुणपण, हिऱ्याच्या आईचा- रोशनीचा जन्म, नंतर मंग्याचा जन्म, नुकत्याच वारलेल्या दाल्ल्याचं दुःख विसरायला मंग्यात लावलेला जीव, मंग्याचं तिच्यावरचं प्रेम कमी होत जाणं, त्याची संगत, सवयी, हिऱ्याच्या जन्मानंतर लगेचच कुठल्यातरी आजाराने वारलेली रोशनी आणि कायमचा बुढीकडे आलेला इवलासा हिऱ्या. सगळं कालकाल घडल्यासारखं. हिऱ्याचं आधी तर तिला ओझंच वाटलं होतं, पण समजूतदार हिऱ्याने तिला खोटं ठरवलं होतं. तो खूप गुणी मुलगा होता. बुढीबायलाही मनातून तेच वाटायचं. तो बुढीबायच्या मनातली मंग्याची जागा घेऊ शकला नव्हता पण त्याच्याबद्दलही तिच्या मनात एक मायेचा कोपरा होता.
मंग्या. किती लाडप्यार करून तिने त्याला वाढवलं होतं. कशाची कमी भासून दिली नव्हती. कोणी त्याच्या अंगावर हात जरी उचचला तरी वाघीणीसारखी धावून जायची. एककाळ तिनं स्वतःला न् रोशनीला उपाशी ठेऊनही मंग्याला खायला घातलं होतं. त्याचंही आईवर फार प्रेम होतं. पण तो मनाने तिच्यापासून दूर का आणि केव्हा गेला ते तिलाही कळलं नाही. गोड गुलाबासारख्या नात्यात वादाचे काटे आड येऊ लागले आणि शेवटी मंग्याने घर सोडलं. पण बुढीकडून पैसे घेऊन जाणं नाही सोडलं. कधी गोडीगुलाबीने, कधी खोटी आश्वासनं करत, तर कधी चक्क धमक्या देऊन तो बुढीकडून पैसे घेऊन जायचा. तिला कालपरवापर्यंत आशा होती की तो बदलेल. पण त्याच्यातलं मेलेलं माणूसपण तिला काल दिसलं.
ती राशन आणायला निघाली होती इतक्यात मंग्या हजर. दारू प्यालेला वाटत होता. तो वेडावाकडा चालत बुढीसमोर आला न् पैसे मागू लागला. तिनं हो नाही करता करता थोडे पैसे काढून दिले आणि ती त्याला जायला सांगून राशन आणायला निघाली. तिला आज का माहीत त्याला टाळावसं वाटत होतं. ती लगबगीतच निघाली. पण तिला आधी हे माहीत नव्हतं की मंग्या तिच्या मागाहून येतोय. तिनं थोडं अंतर पार केलं, इतक्यात तिला मागून आवाज आला,
" ब् बुढ्ढी क्क ..किधर जा रही... म् मेरा सौतेला ब्बाप बैठा क्क्या उधर ? " मागून अचकट हसण्याचा आवाज.
बुढीबायनं एकदा रागानं त्याच्याकडे बघितलं आणि तोंडातल्या तोंडात शिव्यांची बरसात करत अजून वेगात चालायला लागली. पण म्हातारीला तो वेग किती.
वस्तीपासून काही अंतर दूर असलेल्या नाल्यापाशी आली अन् मंग्याने तिच्या हातातला डबा खेचून फेकून दिला अन् तिला जोरात ढकललं. ती गटारात जाऊन पडली. आदळलीच जवळपास! तिला प्रथम एकदम सुन्न झाल्यासारखं वाटलं. आजूबाजूचं जग गोल फिरलंय असं वाटलं अन् पायातून थेट मस्तकात जाणाऱ्या जिवघेण्या कळा सुरू झाल्या. तिची शुद्ध हरपली. मंग्याने कधीच तिच्या कनवटीचा पैशांचा बटवा काढून घेऊन पोबारा केला होता.
तिला स्वतःच्या जगण्याची शाश्वतीच वाटत नव्हती. लवकर या वेदना कायमच्या संपून जाव्यात असं तिला वाटत होतं. मनाच्या वेदना, शरीराच्या वेदना, आयुष्याच्या वेदना! तिनं खरंतर हार मानली होती. तिच्या नजरेसमोर अचानक हिऱ्याचा चेहरा आला. छोटा निरागस हसरा चेहरा. तिच्यावर प्रेम करणारा. तिला जाणवलं, तिच्या उपचारासाठीही हे इवलंसं पोरगं धडपड करत होतं. तिला त्याच्याबद्दल खूप प्रेम दाटून आलं. ती अस्पष्ट पुटपुटत राहिली,
' ...ह्.. हि.. ऱ्या.. हि.. ऱ्या.. मे..रा..... ब... च्..च्चा .. '
*******************************
हिऱ्या रस्त्यावरून भरभरा चालत होता. खरंतर त्याच्यात आज बिलकूल त्राण नव्हते; पण त्याला याचं काहीच वाटत नव्हतं. शरीरापेक्षा मनावर आलेला ताणच जास्त होता. आतापर्यंत कसेतरी दडपून ठेवलेले विचार आता भरतीच्या लाटांसारखे कोसळत होते. बुढीबायला दिवसभर खूप दुखत असेल ना.. तिला झोप लागली असेल का.. बब्याभाईने तर सांगितलं होतं की ती बरीय कालपेक्षा, पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता हिऱ्याच्या नजरेतून सुटली नव्हती. म्हणून तो आणखीनच घाबरला होता. खरंतर त्याला वाटत होतं की दिवसभर तिच्या बाजूला बसून रहावं, तिला थोपटावं, पण ते शक्य नव्हतं. बब्याभाई संध्याकाळी एक त्यातल्या त्यात चांगली बातमी घेऊन आला होता. वस्तीचा भाई खर्चाचे अर्धे पैसे उसनवारी देईन, असं म्हणाला होता. आजच्याइतके पैसे रोज काही दिवस मिळाले तर तिच्या इलाजाचा खर्च पूर्ण होणार होता.
*******************************
बब्याभाई मंग्याचा एकेकाळचा खूप जवळचा मित्र होता. दोघं लहानपणापासूनच सोबत वाढलेले. त्याचं कायम मंग्याकडे येणंजाणं असायचं. त्यामुळे बुढीबायचं मंग्यावरचं प्रेम तो खूप जवळून ओळखत होता. त्याला राहून राहून वाटायचं, की मंग्या इतका कसा वाईट विचाराचा झाला, की त्याला बुढीबायची माया दिसली नाही. नंतर नंतर मंग्या पैसे मागायला यायचा तेव्हा बुढीबायचं त्याच्यासमोर लाचार होणं, ईकडे रहायला येण्याबद्दल विनवणं पाहून त्याला फार वाईट वाटायचं. वाटायचं की एsक चांगली मंग्याच्या कानाखाली वाजवून द्यावी. पण हे त्याच्या स्वभावात बसणारं नव्हतं. त्याच्या लहानपणी त्याचा बाप आईला मारायचा तेही त्याने निमूट सहन केलं अन् रागावलेल्या आईचा मारही ! त्याच्या आईने कधी त्याला असा जीव लावला नाही, म्हणून कदाचित बुढीबायचं प्रेम त्याला ठळक जाणवत असावं. मनातून त्याला वाटायचं, की मंग्याऐवजी तो तिच्यापोटी जन्मला असता तर कधीच तो तिच्याशी असं वागला नसता.
बब्याभाईला माहीत होतं की हिऱ्या फार गुणी पोरगा आहे. त्याला लहानपणापासून तो बघत होता. कोणाशी मस्ती नाही, मारामारी नाही, शांतपणे आपलं काम करत राहणार. हा पोरगा तल्लख बुध्दीचा होता आणि तो खूप मोठा व्हावा असं त्याला मनोमन वाटायचं. बुढीबायच्या इलाजाची जबाबदारी या इवल्याशा पोराने उचलणं एक अप्रूपच होतं. त्यामुळे बब्याभाईने ठरवलं, जमेल तितकी मदत याला करायची. शेवटी हिऱ्याला जवळची अशी एकटी बुढीबायच होती. त्याने स्वतःचे पैसे टाकून काही औषधं आणून दिली, खाणं आणलं. स्वतःच्या कामावर रजा घेऊन वस्तीच्या भाईला भेटायला गेला आणि त्याला पैसे उसनवारी देण्याची विनंती केली. पहिल्यांदा हिऱ्याच्या भरवशावर इतके पैसे देण्यासाठी तो तयारच झाला नाही; पण मग बब्याभाईने सांगितलं की छोकरा इतके पैसे कमवू शकला नाही तर तो स्वतः पैसे परत करेल. तेव्हा कुठे भाई राजी झाला.
पण प्रश्न बुढीबायच्या तब्येतीचा होता. डाॅक्टर म्हणाले होते की आज तिला जास्तकमी झालं नाही तर उद्याच आॅपरेशन करून ती बरी होईल. अन्यथा काही सांगता येत नव्हतं. कसंबसं त्याने डाॅक्टरांना विनवून अर्धे पैसे देऊन उद्याच आॅपरेशन करून घ्यायला राजी केलं होतं. बाकीचे पैसे नंतर काहीच दिवसांत परत करायचे होते. फक्त काय,तर बुढीने हिंमत ठेवायला हवी होती. तिच्या नाजूक अवस्थेकडे बघून हे फारच कठीण वाटत होतं. तिला आजुबाजूचं भान उरलं नव्हतं. तिची नाडी हळूहळू मंदावत चालली होती, श्वास धिमा होत चालला होता. तिचा नाजूक जीव या असह्य वेदनेतून सुटू पाहत होता, आणि त्यासाठी तिची प्राणांतिक तडफड चालली होती. कितीही काळजी घेतली तरी ती आजची रात्र काढेल याची कोणालाच शाश्वती वाटतं नव्हती.
******************************
आता मुख्य रस्त्यावरून एक गल्ली ओलांडली की हाॅस्पिटल. यांत्रिक चालीने हिऱ्या चालत होता. त्याच्या मनात विचारांचं मोहोळ उठलं होतं. त्याचं मन गच्च भरून गेलं होतं. वयाच्या मानानं तो फार विचारी होता. त्याच्या कोवळ्या मनाला त्यामुळे फार जखमा होत होत्या. बुढीबाय वाचेल की नाही, हे त्याला दिवसभर छळत होतं. अचानक मनामध्ये वाकडा विचार येई अन् त्याच्या छातीत धस्स होई. त्याला खूप एकटं वाटत होतं. एकुलती एक बूढीबायही आपल्यापासून दूर चालली आहे की काय, असा प्रश्न न राहवून त्याच्या मनात येत होता.
त्याचे डोळे उघडे असूनही त्याला काही दिसत नव्हतं. त्याचे कान उघडे असूनही त्याला काही ऐकू येत नव्हतं. मनात नुसता बुढीबायच्या तब्येतीचा आणि पैशांचा विचार होता. आजुबाजूने दुचाकी, चारचाकी गाड्या सुस्साट चालल्या होत्या. ना त्यांना या पायी चालणाऱ्या छोट्या मुलाची पर्वा होती, आणि हिऱ्यालाही या गाड्यांचं काही वैशम्य नव्हतं. तो मनातून कधीच हाॅस्पिटलमध्ये बुढीबायच्या उशाशी बसला होता आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. विचारांच्या ओघात त्याच्या थकल्या पावलांनी फुटपाथ ओलांडून रस्त्याच्या मधून चालायला सुरूवात कधी केली हे त्यालाही कळलं नाही. गाड्यांच्या हाॅर्नचा आवाज, गाडीवाल्यांचं बडबडणं त्याच्या कानात जात होतं,पण मेंदूत शिरत नव्हतं. पण इतक्यात.....
सुर्रssssssss कच्चssssssss
एका क्षणासाठी एकदम भानावर आलेला हिऱ्या आणि त्यापाठोपाठ काही वेळ हवेत तरंगल्याची जाणीव, अन् लागोपाठ डोक्यात आलेली जिवघेणी कळ. शुद्ध हरपताना त्याचा रक्तबंबाळ चेहरा हाॅस्पिटलच्या दिशेला होता. इकडे रस्त्यावर हिऱ्यापाशी तर तिकडे हाॅस्पिटलमध्ये बुढीबायपाशी लोकांची गर्दी झाली होती.
*************************************
छान जमली आहे कथा
छान जमली आहे कथा
सुन्न!!
सुन्न!!
बापरे.
बापरे.
मनिम्याऊ, king of net, मी
मनिम्याऊ, king of net, मी चिन्मयी प्रतिसादाकरता धन्यवाद
शेवट अगदी सुन्न करणारा..
शेवट अगदी सुन्न करणारा.. कथेची बांधणी खुप छान झालीय.
धन्यवाद आबा.
धन्यवाद आबा.
अरेरे
अरेरे
खूप दिवसांनी दिसलीस जुई
शेवट फारच दुःखी केलात .
शेवट फारच दुःखी केलात .
>>शेवट अगदी सुन्न करणारा..
>>शेवट अगदी सुन्न करणारा.. कथेची बांधणी खुप छान झालीय.>>+१
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद किल्लीतै, Ajnabi जी , स्वातीमॅम
खूप दिवसांनी दिसलीस जुई>> हो.
खूप दिवसांनी दिसलीस जुई>> हो.. गायब होते काॅलेजमुळं.. आता सहज डोकावले आणि जुने दिवस आठवले. लागल्या हाती कथापण पोस्टून टाकली
शेवट फारच दुःखी केलात>> होय.. कथानकाला साजेसा वाटला.. जास्तच दुःखी आहे.. पण मला वाटतं यामुळं पात्रांची हतबलता आणि नशीबाचा खेळ चांगला मांडता आला.
गुंतुन जायला झालं कथा वाचताना
गुंतुन जायला झालं कथा वाचताना, शेवट काहीतरी चांगला होईल वाटत असताना करुण झाला. छान जमलीय कथा.
तुम्ही पुन्हा आलात अन लिहिलंत
तुम्ही पुन्हा आलात अन लिहिलंत , ते उत्तम .
कथा वाचून नंतर प्रतिक्रिया देतो .
तुम्ही पुन्हा आलात अन लिहिलंत
तुम्ही पुन्हा आलात अन लिहिलंत , ते उत्तम .
कथा वाचून नंतर प्रतिक्रिया देतो .
आई गं.. शेवट वाचवत नाही.
आई गं..
शेवट वाचवत नाही.
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत .
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत ..
प्रतिसादासाठी खूप धन्यवाद
प्रतिसादासाठी खूप धन्यवाद वर्णिता जी, बिपिन जी, रोहिणी जी, ऋन्मेषभाऊ
तुम्ही पुन्हा आलात अन लिहिलंत , ते उत्तम . >> खास आभार! कथेवर तुमची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल
छान लिहिली आहे कथा डोळ्यासमोर
छान लिहिली आहे कथा डोळ्यासमोर चित्र उभे राहते.
खूप वर्षांपूर्वी एक शॉर्ट फिल्म पहिली होती तीन लहान मुलांची जी गरीब विस्कळीत घरातील बालकामगार असतात .खडतर जीवन जगतानाचा एक मुलाचा शेवटचा आधारही जेव्हा कोलमडून पडतो तेव्हा पुढे काय हा प्रश्न उभा असतानाच ती मुलं कामावरून येताना मुसळधार पावसात अपघाताने जागीच मरण पावतात.आणि आपण सुन्न होऊन पाहात राहतो व कदाचित सुटकेचा निश्वास टाकतो .
त्याची आठवण झाली कथा वाचून.