पाऊस, मरीन ड्राईव्ह आणि एक मुंबईकर.. आमचे एक वेगळेच नाते असते. तिघातले दोघे उपस्थित असलो तरी मेहफिल जमते. सध्या पावसाचा सीजन असल्याने वारंवार तिथे जाणे होते. मोजून सांगायचे झाल्यास, गेल्या तीन महिन्यात पाच वेळा. मी आणि सोबत माझी दोन पोरे. त्यांनाही तिथल्या जादुई वातावरणाची आवड लागली आहे. कधीही ऊठा, जीन्स चढवा आणि निघा. कंटाळा येतच नाही. उलट आला कंटाळा की ऊठा आणि तिथला समुद्र गाठा. नुसता समुद्रच नाही तर त्या भोवती पसरलेला कट्टा, आणि त्या कट्ट्याभोवतीचा पट्टा, कितीही गजबजलेला का असेना कधी गर्दीचा वाटत नाही. मन रमतेच..
तर असेच गेल्या रविवारी तिथे चक्कर टाकणे झाले. सकाळचा पाऊस संध्याकाळी गायबला होता. पण दाटून आलेले ढग हळूहळू सूर्यकिरणांना रस्ता देत होते. जसे मावळू लागले तसे गुलाबी रंगाच्या छटा अश्या काही पसरू लागल्या की कुठलाही फिल्टर न लावता हे असे फोटो निघू लागले.
तिथे फोटो देखील कितीही काढा, मेमरी कार्ड भरते पण मन भरत नाही. पण नेहमीचे जाणे असल्याने मी जास्त फोटो टिपायच्या भानगडीत पडत नाही. मुलांच्या दंगामस्तीचे फोटो मात्र हौसेने काढतो. पण पोज देऊन फोटो काढले असे क्वचित होते. स्पेशली पोरगा कधी फोटोला पोज देतच नाही. मग कितीही स्पेशल डे, स्पेशल ओकेजन का असेना.. पण त्या दिवशी चमत्कार घडला !
त्या दिवशी पोराला ती दिसली. दिसता क्षणीच ती आवडली. खाली लालचुटूक पेहराव. आणि वर तेनु काला चश्मा जचदा ऐ.. बघताक्षणीच त्याच्या मनात भरली. धावत जाऊन तिला तो जवळपास मिठीच मारणार होता. पण तिच्या इतक्या जवळ जाण्यातला धोका ओळखून मी त्याला अडवले. तरी दुरून का होईना अनिमिष नेत्रांनी तो तिला न्याहाळतच होता. मग मी त्याला म्हंटले चल एक छानशी पोज दे. तुझा फोटो काढूया हिच्यासोबत. आणि घरी जाऊन मम्माला दाखवूया तुझी नवी मैत्रीण.. आणि काय जादू, दुसऱ्याच क्षणाला पोरगा पोज देऊन रेडी.. माझीच घाई झाली जे खिशातून चटकन मोबाईल काढत, केमेरा ऑन करत, दोघे व्यवस्थित दिसतील असा अँगल शोधून, ती तिथून निघायच्या आधी त्यांचा जोडीने फोटो काढावा लागला.
काही फोटो वरकरणी तितके स्पेशल वाटत नाहीत, पण त्यासोबत जोडलेल्या आठवणींनी ते स्पेशल बनतात..
हा त्यातलाच एक.. जो काही जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला.
येस्स! डबल डेकर बस!!
मुंबई बेस्टची शान!
जेव्हा इमॅजिका, एस्सेलवर्ल्ड असले अम्युजमेंट पार्क नव्हते तेव्हा मुंबईकरांची खरीखुरी जॉय राईड होती डबलडेकर बस.
अट फक्त एकच. वरच्या मजल्यावर जावे आणि ड्रायव्हरच्या थेट डोक्यावरची पहिल्या क्रमांकाची सीट बूक करावी. समोरची खिडकी सताड उघडी. तिथून जोरदार थंडगार वारा येऊन आपल्या चेहर्यावर आदळणार. बसचा वेग जितका जास्त तितकाच वार्याचा मारा सुखावणारा. जर सोबत पावसाचे तुषार असतील तर क्या बात.! स्वत: अनुभवल्याशिवाय या सुखाची कल्पना अशक्यच.
मी चौथीला असतानाच स्कॉलरशिपच्या एक्स्ट्रा क्लासमुळे स्कूलबस सोडून बेस्ट बस ने प्रवास करू लागलो. माझगाव ते दादर. थेट बसची फ्रिक्वेन्सी कमी म्हणून दादर ते भायखळा असा प्रवास करायचो. आणि तिथून दुसरी बस. तर या दादर ते भायखळा प्रवासात १ नंबरची बस डबलडेकर होती. भायखळ्यावरून माझगावला जाताना ३ नंबरची बस डबलडेकर होती. ईतक्या शेकडो नंबरच्या बस होत्या मुंबईत, पण आपण १ आणि ३ नंबरच्या बस ने प्रवास करतो हे तेव्हा स्पेशल वाटायचे. पण तरीही खरे कौतुक होते ते बसच्या डबल डेकर असण्याचे. त्यासाठी त्याच मार्गावरच्या ईतर बसेस सोडल्या जायच्या. चालती डबल डेकर बस धावत जाऊन पकडली जायची. घाईघाईत वर जायचो आणि तिथे कोणी आधीच बसले असेल तर त्याला कुठे उतरणार हे विचारून त्या सीटवर आपला क्लेम लावला जायचा. मोठा ग्रूप असला तर त्या सीट वरून भांडणे व्हायची. कंडक्टरकाका ओरडत राहायचे. आमची मस्ती चालूच राहायची..
त्याकाळी आम्हा मुलांच्या सुखाच्या कल्पनाही फार हलक्याफुलक्या असायच्या. छोट्या छोट्या गोष्टीतही फार आनंद मिळायचा. पण तरीही डबल डेकर बसची ती फ्रंट सीट स्पेशलच होती. त्या दिवशी मुलाला जेव्हा डबल डेकर बस बघूनच ईतका आनंद झाला ते बघून मनात विचार आला की पोरांना पहिल्या सीटवर बसायचा आनंद अनुभवायला मिळाला तर किती खुश होतील. लवकरच हा योग जुळवूया असे ठरवले आणि परवाच ही बातमी कानावर आली..
मुंबईची शान असलेली डबल डेकर बस आता बंद होत आहे.
किंबहुना दोनच दिवसांपुर्वी झाली आहे.
तब्बल ८६ वर्षांचा हा प्रवास थांबला आहे.
नव्वदीच्या दशकात तब्बल ९०० डबल डेकर बस मुंबईत धावत होत्या...
पण या १५ सप्टेंबर २०२३ रोजी आगरकर चौक ते सीप्ज रूट वर ४१५ क्रमांकाची शेवटची डिजेल डबल डेकर बस धावली.
शेवटचे या जुन्या डबल डेकर बस मध्ये कधी बसलो हे देखील आता आठवत नाही पण तरी मनात काहीतरी दाटून आले.
आणि हा एक आयकॉनिक फोटो गूगल करून आंतरजालावरून साभार.. जो आजवर मुंबईत न आलेल्यांनी देखील कित्येक चित्रपटात मुंबई दाखवताना पाहिला असेल. कारण व्ही.टी. स्टेशनप्रमाणे डबल डेकर बस सुद्धा मुंबईची एक ओळखच होती.
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
बाईंनी सेंट्रल व वेस्टर्न
बाईंनी सेंट्रल व वेस्टर्न दोन्ही जाम केला आहे>>
बाई दवे,
ते बॉल मधले आईसक्रीम आमच्या वेळीही हिट होते. आता कुठे दिसत नाही ते ईथे. आजही हिट गेले असते. कारण मुलांमध्ये किडरजॉय, लिकेबल, जेम्स गोळ्यांचा बॉल अश्या गोष्टींची आजही क्रेझ दिसते.. त्या आईसक्रीम बॉलने नंतर क्रिकेट सुद्ध खेळता यायचे. पण एकच दिवस. मग त्याचे आयुष्य संपायचे..
मस्त फोटो आणि वर्णन. मधे
मस्त फोटो आणि वर्णन. मधे फेबुवर "मुंबईत डबल डेकर बस सुरू झाली" अशी एक जुनी आठवण असलेली पोस्ट पाहिली त्याची तारीखही साधारण १५ सप्टें च्या आसपासच होती.
बरीच वर्षे झाली डबलडेकर मधे बसून. अमित - तू ते निरूद्देश भटकण्याबद्दल लिहीले आहेस ते माझेही फॅसिनेशन आहे. मुंबई, न्यू यॉर्क, लंडन ई ठिकाणी. मुंबईत एकदा हा उद्योग केलेला आहे पण अजूनही इंटरेस्ट आहे. लहानपणी कायम मुंबईत गेलो की उपनगरात राहिल्याने व्हीटी, फाउन्टन ई. एरियाचे खूप अप्रूप होते. मग एकदा कामानिमित्तच संधी आली. "रीगल" मागच्या एका हॉटेलात राहायचे व फाउण्टनला ऑफिस. असे दीड महिना होतो. तेव्हा भरपूर फिरलो संध्याकाळी निरूद्देश. एकदा चर्चगेट का फाउण्टन कोठेतरी डबलडेकर पकडली. वरची सीट मिळाली. ती बहुधा थेट दादरपर्यंत जाणारी होती. पुलंची ती "साली सा नंबरची ट्राम तरी ठेवायची" ती याच रूट वर पूर्वी ट्राम असावी आणि नंतर बस सुरू केली असावी. महंमदली रोडवरून गेली होती आणि भायखळ्याच्या अलीकडे पुलावरून ती रेल्वेलाइनच्या त्या बाजूला गेली असे अंधुक लक्षात आहे. तेव्हा लोकलनेही खूप फिरलो होतो.
ट्रेलर बस म्हणजे पुढे कॅब असायची ती का? पुण्यातही पाहिली आहे. पुण्यात कॉर्पोरेशनहून चिंचवडला जात डबलडेकर्स. कॉर्पोरेशनहून शहरात आत जात नसत. इव्हन डेक्कनला येत नसत.
Joy ice cream ball होते का?
Joy ice cream ball होते का?
मला पांढऱ्या प्लास्टिक बॉल वर लाल J letter असं काहीस आठवतंय.
छान लेख.
छान लेख.
मी डबल डेकर ३४० आणि ३९२ नी प्रवास केलं आहे.
३४० नी तर कायम टॉप फ्लोर फ्रंट सीट नी प्रवास करायचो कारण ३४० ची फ्रीक्वेंसी जास्त होती.
३९२ नी प्रवास करत होतो तेव्हा टॉप फ्लोर फ्रंट सीट मिळाली तर परमोच्च आनंद, कारण पवई लेक चा रस्ता तेव्हा फार ट्राफिक नसायचं , वरच्या डेक वरुन पवई लेक पाहणे आणि मस्त गार वारं झेलणे हा स्वर्गीय सुख होतं
टाऊन साईड ला जायचं असेल तर नो ट्रेन, अंधेरी (प) हुन टाऊन ला जाणारी बस पकडायचो.
पहिल्या च वेळी ती बस बघताना
पहिल्या च वेळी ती बस बघताना नवीन माणसाच्या डोक्यात हा विचार यायचंच .
त्या बस ची उंची बघून .
"वळणावर ही बस कलांडणार तर नाही ना?"
जाणत्या माणसाला हा प्रश्न विचारला की मग तो कहाणी सांगायचं बस निर्मिती करणाऱ्या कंपनीने बक्षीस ठेवले आहे कोणी ड्रायव्हर नी ही बस कशी ही चालवावी आणि वळणावर पलटी करून दाखवावी
हेमंत जाणते माणूस आपणच... या
हेमंत जाणते माणूस आपणच... या बक्षीसाबद्दल माहीत नव्हते, नाहीतर ट्राय केले असते.. खालचा मजला रिकामा आणि वरचा पुर्ण भरलेला.. झाल्यास वर उभेही करावे लोकांना.. मग पलटण्याचे चान्सेस वाढले असते.. पण वरती उभे राहायला परवानगी नव्हती. वरचा मजला भरला की कंडक्टर जिन्यात येऊन उभा राहायचा आणि लोकांना वर जाण्यास अडवायचा.. मग आम्हीही तिथेच घुटमळत राहायचो, वरचे कोणी उतरतेय का याची वाट बघत.
:गंमत मोड ऑन:
Icecream had white plastic
Icecream had white plastic ball with hexagon pattern blue lid and some lettering. I was just too young to read English:)
छान लेख व प्रतिसाद!
छान लेख व प्रतिसाद!
मुंबईत डबल डेकर उलटल्याच मी तरी एकदांच ऐकलंय , (बहुतेक गिरगांव पोर्तुगीज चर्चच्या वळणावर झालं होतं ).
मुंबईच्या गर्दीच्या, अरुंद रस्त्यांवरही अपवादात्मक अपघात नोंदवत सर्रास बसेस चालवणाऱ्या ' बेस्ट ' चालकांना मानलं पाहिजे व डबल डेकरच्या चालकांना तर त्रिवार सलामच !!!
फोटो आणि वर्णन इतकं भारी
फोटो आणि वर्णन इतकं भारी झालंय की बसमध्ये चढताना, पुढे बसताना पाहतेय असं वाटलं. जवळच्या मित्राबद्दल लिहावं इतक्या आत्मीयतेने लिहिलंय.
आणि मज्जाय तुमच्या मुलांची..
सगळ्यांचेच अनुभव वाचताना आनंदाने भारावलेले चेहरे दिसत होते.
खूप छान!
माझ्या डबलडेकरच्या आठवणी:
माझ्या डबलडेकरच्या आठवणी:
अंधेरी (प.) भागात (ओशिवरा आगाराच्या अंतर्गत) पूर्वी अनेक मार्गांवर डबलडेकर बस धावायच्या.
फार पूर्वी मी लहान असतांना २१० मर्या. - यारी मार्ग बस स्थानक ते दहिसर पूल या मार्गावरसुद्धा डबल डेकर बस धावायची, हे अंधुकसे आठवते आहे.
मी अगदी ९-१० वीत असतांना सुद्धा २५१ - अंधेरी बस स्थानक प. ते वेसावे, २६६ - अंधेरी बस स्थानक प. ते स्वामी समर्थ नगर (विस्तारित) या मार्गांवर देखील डबलडेकर धावायची. मी शाळेतून घरी जातांना 'आता घरीच तर जायचे आहे' म्हणून वरच्या मजल्यावरील पुढची सीट रिकामी मिळणार नसेल तर ती बस सोडून नंतरची बस पकडायचो; पण वरच्या मजल्यावर पुढच्या सीटवरुनच प्रवास करायचो.
२००८ - २००९ पर्यंत २०३ - दहिसर पूल ते जुहू बस स्थानक या मार्गावर सुद्धा डबलडेकर धावायची. नंतर मात्र बोरीवली स्थानकाबाहेर स्कायवॉकचे काम सुरु झाले आणि त्याचे निमित्त करून २०३ वरील डबलडेकर बंद केली.
मी अगदी लहान म्हणजे ४-५ वर्षांचा असतानाची आठवण - तेव्हा डबलडेकरच्या जिन्याखालची जागा उघडी असायची. २५१ च्या मार्गावर प्रवास करणाऱ्या कोळी महिला आपल्या माशांच्या टोपल्या, बास्केट आदी त्या जागेत ठेवून मग पुढे जाऊन सीटवर बसायच्या. त्या काळात मी आईसोबत प्रवास करतांना जर बसला खूप गर्दी असेल तर आई दरवाजातून आत आल्यावर समोर असलेल्या जागेत उभी रहायची आणि मला त्या जिन्याखालच्या जागेत पाठवायची! बसमध्ये कितीही गर्दी असली तरी त्या जिन्याखालच्या जागेत मात्र कसलाही त्रास व्हायचा नाही! बाहेर कितीही रणरणते उन असले तरी त्या जागेत मात्र अंधार असायचा, त्यामुळे डोळ्याला गारवा मिळायचा! तिथल्या खालच्या पत्र्याला (बस धुतल्यावर) पाणी जाण्यासाठी काही होल्स किंवा छोटीशी जाळी असायची ज्यातून खालचा रस्ता दिसायचा आणि बसच्या वेगाचा अंदाज यायचा! नंतर मात्र (बहुतेक ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर) त्या जागेत कोणी बॉम्ब वगैरे ठेवू नये म्हणून बेस्ट प्रशासनाने ती जिन्याखालची जागा पत्रा लावून बंद करायला सुरुवात केली!!!
---------------------------------------------------------------------------------------------------
आता काही दिवसांपूर्वी १५ सप्टेंबर २०२३ रोजी बंद झालेल्या डबल डेकर बसचे संग्राह्य तिकीट (WhatsApp वर आलेला फोटो) :
----------------------------------------------------------------------------------------------------
'बेस्ट'प्रेमींसाठी आणिक आगार येथे 'बेस्ट संग्रहालय' उभारण्यात आलेले आहे. येथे स्वातंत्र्यपूर्व काळात बेस्टची स्थापना झाल्यापासून आजतागायत ज्या ज्या प्रकारच्या ट्राम, बसेस वापरल्या गेल्या त्यांची मॉडेल्स आहेत, तसेच बसमध्ये दिली जाणारी विविध प्रकारची तिकिटेसुद्धा जतन करून ठेवली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात बसची तिकिटे लंडन येथे छापली जायची!!! वेगवेगळ्या प्रकारच्या ट्राम, बसचे विविध भाग - उदा. रेडीएटर, सीट्स, खिडक्या जतन केल्या आहेत. बसमध्ये पूर्वी जे कापडी डिस्प्ले बोर्ड वापरले जायचे तो सुद्धा ठेवला आहे आणि तो आपल्याला handle फिरवून बस नंबर कसा बदलला जायचा हाही अनुभव घेता येतो! बसमध्ये असणारी बेल, बसचा हॉर्न सुद्धा वापरून पाहता येतो! ७ ऑगस्ट रोजी 'बेस्ट दिनाच्या' पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना प्रवेश खुला असतो. इतर वेळी जायचे असल्यास त्यांना फोन करून appointment घ्यावी लागते.
----------------------------------------------------------------------------------------------------
btw कोणाला तो काळ आठवतो का, जेव्हा साध्या बस (काळ्या background वर पांढऱ्या रंगात क्रमांक) पेक्षा मर्यादित बसचे (पांढऱ्या background वर लाल रंगात क्रमांक) भाडे जास्त असायचे! मी साधारण २००३-२००४ मध्ये सातबंगला बस स्थानक ते यारीमार्ग बस स्थानक या प्रवासासाठी २४९ मिळाली नाही (जिचे तिकीट ३ रु. होते) म्हणून २१० मर्या. ने गेल्याचे आठवते आहे (जिचे तिकीट ३.५ रु. होते)!!!
काळ्यावर पांढर्या पाटीच्या
काळ्यावर पांढर्या पाटीच्या साध्या बसचे आणि पांढर्यावर लाल लिमिटेड बसच्या तिकिटात कायमच फरक असायचा ना? का नाही?
आयआयटी हुन ४२२/ ४२४ (महाराणा प्रताप चौक मुलुंड ते वांद्रे बस स्थानक किंवा ओशिवरा डेपो) या साध्या होत्या. आणि ३९६, ४९६ इ. लिमिटेड होत्या. आता नक्की आठवत नाही पण भाड्यात फरक होता असं वाटतं.
हो, लिमिटेडचे भाडे जास्त
हो, लिमिटेडचे भाडे जास्त असायचे. त्यामुळे शाळेत असताना आम्ही त्या सोडायचो..
पूर्वी जे कापडी डिस्प्ले
पूर्वी जे कापडी डिस्प्ले बोर्ड वापरले जायचे तो सुद्धा ठेवला आहे आणि तो आपल्याला handle फिरवून बस नंबर कसा बदलला जायचा हाही अनुभव घेता येतो!
>>>>
हा अनुभव आम्ही राणीबाग डेपोचे कंडक्टर ओळखीचे झाल्याने लाईव्ह मध्ये घ्यायचो
काळ्यावर पांढर्या पाटीच्या
काळ्यावर पांढर्या पाटीच्या साध्या बसचे आणि पांढर्यावर लाल लिमिटेड बसच्या तिकिटात कायमच फरक असायचा ना? का नाही?
पूर्वी असायचा, नंतर दोघांचेही तिकीटदर सारखेच केले.
नंतरच्या काळात C series (corridor) चे मार्ग सुरु झाले. उदा. C-12 त्याचे तिकीटदर जास्त असायचे. त्यामुळे दैनंदिन मॅजिक पास (५० रुपयात दिवसभर प्रवास) त्या C series बसला नाही चालायचा. आता चालतो.
२०१९ मध्ये AC बसचे तिकीटदर लक्षणीयरित्या कमी केल्यावर मॅजिक पास ५० रुपये non-AC आणि ६० रुपये AC/non- AC असा होता. आता तर ५० रुपयात AC / नॉन एसी कोणत्याही बसने प्रवास करता येतो (एअरपोर्ट बस सर्व्हिस आणि chalo बस सोडून)
-------------------------------------------------
.......त्यामुळे शाळेत असताना आम्ही त्या सोडायचो..
आम्ही शाळेजवळचा बस stop सोडून एक stop पुढे यायचो आणि बस पकडायचो. कारण शाळेजवळच्या stop वर एकाच मार्गावरची बस मिळायची तर पुढे आल्यावर ३-४ मार्गावरच्या बस मिळायच्या. शिवाय १ रुपया पण वाचायचा!!! खरंच तेव्हा १ रुपयाला पण किंमत होती आणि आपण कमवत नसलो तरी आपल्याला १ रुपयाची किंमत कळायची!!!
-------------------------------------------------
आत्ताच संगणकात मिळालेला जुना फोटो:
बेस्टच्या ताफ्यात जुन्या AC बस असतांनाचे AC बसचे तिकीटदर !
एसी बसचे कमीतकमी भाडे ३० रुपये! जे आता फक्त ६ रुपये आहे!!!
या बसला पुढे चालकाच्या इथे दरवाजा असायचा जो नेहमी उघडा असायचा आणि त्यातून आत गेल्यावर अजून एक दरवाजा असायचा ज्याला hydrolic door closer असायचा. चालकाला एसीची हवा अजिबातच नाही मिळायची. (आत्ताच्या ST च्या शिवशाही सारखी रचना)
Handle फिरवून पाटी एन एम एम
Handle फिरवून पाटी एन एम एम टी बदलली आहे. वाशीला कॉलेजला जायचो ती चार वर्षे वाशी डेपोला बसची वाट बघत अर्ध्या अर्ध्या मिनिटाला बस ये जा करीत ते बघत बसायला आवडायचं. तोच अनुभव नंतर टोरांटो ला घेता आला. खूप बस सतत ये जा करीत आहेत, व्हीटी ला लोकल येजा करत आहेत. फार म्हणजे फार मजा येते बघायला.
मग San Francisco ला दरवर्षी जुन्या ट्राम आणि बस एका वीकेंडला बाहेर काढतात आणि त्यातून तुम्हाला फिरायला मिळतं. ते दोन तीन वर्षे केलं तेव्हा तिकडचा जुना बोर्ड पण फिरवलेला.
विविधभारती मुंबईचे उद्गोषक
विविधभारती मुंबईचे उद्गोषक युनुस खान यांनी डबल डेकर बस बद्दल लिहिलं आहे.https://fb.watch/ncRlayux4Q/
आता एसी डबल डेकर बस असल्या तरी त्यांचा काचा कायम बंद असणार.
सुना है अब नई इलेक्ट्रिक डबल डेकर आएंगी। वातानुकूलित। उनमें समंदर से आती नम हवा का स्पर्श ना होगा। बारिश की फुहारें उनकी खिड़की से आकर आपको भिगो ना सकेंगी। गाड़ियों का शोर सुनाई नहीं देगा। हां डबल डेकर होगी। एसी के ठंडेपन और सन्नाटे वाली।
हम एक ठंडे दौर में हैं जहां जज़्बात की धड़कन कम है।
Pages