सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हजारो प्रश्नांची भेंडोळी उभी राहून मनात संभ्रम निर्माण झाला. >>> Lol खतरनाक प्रश्न आहेत माझेमन Happy

विशेषतः श्रोडिंगरची तुळस, "बाळ" असा जनरल रेफरन्स, भातुकली, "इतकं शिकवलंय" ची फोड हे टोटल लोल आहे.

माझेमन Lol जिज्ञासू वृत्तीने चिकित्सा करत रहा.

'इतकं शिकवलंय' म्हणजे BA पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण असेल. तेच आपल्या पिढीला हुशार मुलं आर्ट्सला जात नाहीत असं बिंबवलेलं.

'इतकं शिकवलंय' म्हणजे BA पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण असेल. >>> नाही - ती त्याच्याच वर्गात असते ना? एमबीबीएस व बीए चे लोक एकत्र ट्रिपला जात आहेत हे अजून बॉलीवूडवाल्यांनाही सुचलेले नाही Happy

'ये जवानी है दिवानी' मधे दीपिका/नैना एमबीबीएसला आहे आणि कबीर बहुतेक एमबिएची तयारी करत असलेला बीए आहे. पण तिला बच्चनची गाणी येतात, त्यामुळे ती 'चतुरस्र' ठरते. Happy

'ये जवानी है दिवानी' मधे दीपिका/नैना एमबीबीएसला आहे आणि कबीर बहुतेक बीए आहे. >> रिअली? Lol हे लक्षात नव्हते आले. Bollywood is stranger than fiction!

ये जवानी है दिवानी' मधे दीपिका/नैना एमबीबीएसला आहे आणि कबीर बहुतेक बीए आहे. >> हे खरंच लक्षात नव्हतं आलं. महान!

विगोच्या विचारांची उत्तुंगता वगैरे दाखवायला विगोला बहुधा टेबलावर ऊभा करून खालच्या लेव्हल ने कॅमेरा लावलाय.
>>> Lol Lol

विगोच्या विचारांची उत्तुंगता वगैरे दाखवायला विगोला बहुधा टेबलावर ऊभा करून खालच्या लेव्हल ने कॅमेरा लावलाय.
>>>> Lol
मी मनातल्या मनातच हसले, इथं राहून गेलं होतं.

इथल्या पीअर प्रेशरमुळे बघितलाच बंदीवान मी Lol
टोटल लोल... सगळ्या कमेंट्स आठवत होत्या तो तो सीन बघताना... !! लाल डोळ्याचा पाटील, आगलाव्या काकू, दोडकी काकू, केशव दगड , निफु सगळे एक से एक महान. दुरदर्शन काळात आपण सोशिक, सहनशील होतो हे आत्ता कळतंय.

अरे किती काय काय लिहिता, भयकर फोमो झालाय माझा ...किमान १२ पान वाचायची शिल्लक आहे...टायटल बोले तो... शॉल्लीड

विगोच्या विचारांची उत्तुंगता वगैरे दाखवायला विगोला बहुधा टेबलावर ऊभा करून खालच्या लेव्हल ने कॅमेरा लावलाय. >> Rofl

माझे मन अफाट प्रश्न, इतकी हसले की बास.
लंपन तुम्हाला खरच पीएचडी द्यायला हवी आहे, ओरिजनल रिसर्च, अटेंशन टु डिटेल्स सगळे एकदम पर्फेक्ट!

बाकी ते मेडिकल कॉलेज चे असे आहे त्या काळी (म्हणजे कोणे एके काळी, स्वातंत्र्य पुर्व भारतात) मेडिकल कॉलेज मध्ये लोक पहिली डिग्री (बॅचलर्स) करुन जात. मी ना ही फडक्यांच्या एका कादंबरीत वाचले होते. त्यांचा हुशार नायक बीए करुन मेडिकल ला जाऊन डॉ होतो आणि मग फडक्यांचा नायक असल्याने माजी गुरुवर्यांना भेटायला जाऊन त्यांच्या आजी विद्यार्थीनीच्या प्रेमात पडतो. सद्य चित्रपटाचे लेखक त्या काळात शिकलेले असावेत.

विगोच्या विचारांची उत्तुंगता वगैरे दाखवायला विगोला बहुधा टेबलावर ऊभा करून खालच्या लेव्हल ने कॅमेरा लावलाय.>> Lol हे मला आठवलं म्हणजे हा चित्रपट मी पाहिला आहे???
की अजून कुठला चित्रपट आहे तो - त्यात मुलीच्या बापाला हा कीती विशाल हृदयाचा आहे असे वाटून कौतुकाने पहातो तेव्हा विगो दोन की तीन टप्प्यात आकाराने मोठा मोठा होत गेलेला दाखवले आहे?

मापृ , बहुतेक हा तोच पिक्चर. त्यानंतर लागू मुलीला ' आजतक मैने तुम्हे जो सच नाही बताया वो ' सांगतो आणि रागावतो.

बंदिवान सिनेमा संपत आला..पंधरा मिनटाचा बाकी आहे..
बघितल्यानंतर परत परिक्षण वाचलं....परत मजा आली वाचायला....लाल डोळ्याच्या पाटलाला लाल काजळ लावल्यासारखं वाटतंय..त्या गावात सगळे तिरपागडी लोक राहतात वाटतं.टेलर, किराणावाला, पाटलाचे चमचे....

सतीचं वाण हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यथावकाश आमच्या तालुक्याच्या एकमेव थेटरात अवतरला तेव्हा आजुबाजुच्या भोळ्याभाबड्या बायांमध्ये खुपच फेमस झालेला. दिवसभर तीच चर्चा.. मला सती चव्हाण असे ऐकायला यायचे, कोण ही सती चव्हाण असे वाटायचे पण तिला पडद्यावर भेटायचे भाग्य तेव्हा लाभले नाही. नंतर कधीतरी दु द कृपेने पाहिला असणार.. सोशिक सुन आणि दुष्ट सासु हा बेस ठेऊन इतके मराठी चित्रपट बनलेत की किती नावे लक्षात ठेवणार.. सुनेचा कसा छळ केला या विषयात काही नाविन्य असेल तर तेवढेच.. बाकी सगळीकडे पडद्यावर तेच दळण आणि बघुन रडणार्‍या बायाही त्याच…

माहेरची साडी गाजत होता तेव्हा अलका कुबल भाजी आणायला जात तेव्हा भाजीवाल्या महिला त्यांना एखादे वांगे जास्त देत व म्हणत 'घे बाई, सासू किती छळ करते तुझा, बिचारी' असे म्हणत ही आठवण त्यांनीच सांगितली आहे. बहुदा उषा नाडकर्णींना एखादे वांगे कमी देत असतील.

ओह! Lol

वांग कमी दिलं तर लक्षात येतं, त्यांनी निवडुन दिलेली एक दोन वांगी बदलून किडकी वांगी देत असतील, तोलताना.

ओह! Lol

वांग कमी दिलं तर लक्षात येतं, त्यांनी निवडुन दिलेली एक दोन वांगी बदलून किडकी वांगी देत असतील, तोलताना.

नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 17 September, 2023 - 09:01 >>>>>>>>>> सो फनी ........

इथे "माहेरची माणसं" येउन गेली आहेत का? सापडले नाही त्याबद्दल. मला यू ट्यूबने त्यांचा ब्रिलियंट अल्गॉरिदम वापरून सजेस्ट केला.

आशा काळे म्हणजे एक पॅकेज डील आहे. काही क्वालिटीज आपोआप येतात. लहानपणीच कोणाशीतरी लग्न. इथेही आहे. रवींद्र महाजनीशी. मागे कोणीतरी लिहीले होते तोच प्रश्न मलाही पडला - असे कोणत्या दुनियेत बाहुला-बाहुलीचे लग्न न लावता आपले स्वतःचेच लग्न लावतात मुले? दुसरी क्वालिटी तुळशी वृंदावन. फक्त "अंगाई" बद्दल माझेमन यांनी लिहीले तशी ती श्रोडिंगरची तुळस नाही. खरीच आहे. स्टॅटलाच सीन आहे. तिसरी म्हणजे इतरांच्या रूम्स मधे घुसून त्यांचे कपडे आवरणे. इथे घर स्वतःचे असले तरी खोली मुलाची-सुनेची आहे.

ऑफिस किंवा मॉडर्न फॅमिली सिरीज मधे जसे एखादे पात्र मधेच प्रेक्षकांना नॅरेट करते, तशी दर १०-१५ मिनीटांनी आका च्या चेहर्‍यावर एकदम क्लोज-अप घेउन ती जीवनविषयक कॉमेण्ट मारते.

"अंगाई" च्या गाण्यात ती मोकळी खुर्ची मला बग करत होती तसा इथे एक सीन कसा घडला ते बग करत आहे. आका च्या धाकट्या मुलाकरता तो जिच्या प्रेमात असतो ती मुलगी व तिचे वडील "दाखवण्याच्या" कार्यक्रमाला आलेले असतात. सीन सुरू होतो तेव्हा सगळे बसलेले आहेत व ऑलरेडी चहा घेत आहेत. आता इथे ते एकमेकांची ओळख करून घेतात. म्हणजे हे अनोळखी लोक घरात आले, हॉल मधल्या सोफ्यावर बसले. तेथे आका व तिचा थोरला मुलगा येउन बसला. मग चहा आला. साधारण थोडाफार चहा प्रत्येकाने घेतला. मग ओळख परेड सुरू. म्हणजे तोपर्यंत हे सगळे ओळख बिळख न करून घेता अगदी सहजपणे फक्त एकमेकांच्या चेहर्‍याकडे बघत बसले होते का? Happy

भिंतीवर अरूण सरनाईकचा फोटो आहे. तो एकदा प्रिया तेंडुलकर काढून टाकते. मग तिलाच पुन्हा तो लावायला लावतात. मग नंतर आकाच तो घेउन निघते कोठेतरी जायला. तो बेत रद्द झाल्यावर तो फोटो पुन्हा जागेवर लावत असेल. तो अरूण सरनाईक म्हणत असेल हे लोक मेल्यावरही भिंतीवर स्वस्थ बसू देत नाहीत Happy

अशक्य हसले...
असे पिक्चर का काढत असावेत? हा मला अगदी लहानपणा पासून प्रश्न पडलेला होता. रविवारची दुपारी मुलांना खेळू न देता गुपचूप बसवून असले पिक्चर मोठी माणसे बघत.
आता मला कळले भविष्यात माबो वर पिसे काढण्यासाठी.. ह्या पिक्चर ची निर्मिती करण्यात येत असावी.

मला हे असे सिनेमे भाबडे वाटतात. त्यांची दया येते एक प्रकारची. ज्या सिनेमात कुठला तरी आव आणलेला असतो त्यांचा राग येतो आणि/किंवा चेष्टा करावीशी वाटते. उदाहरणार्थ राजवाडे अँड सन्स.

मग हे बघा. मराठीतील सूरज हुआ मद्धम.
https://www.youtube.com/watch?v=VXqh1oGmywk

हीरो कधी अल्लू अर्जुन वाटतो तर कधी इंझमाम चा लहानपणीचा रोल करतोय असे वाटते. मास्टर मयूर सारखा.

Pages