पाऊस, मरीन ड्राईव्ह आणि एक मुंबईकर.. आमचे एक वेगळेच नाते असते. तिघातले दोघे उपस्थित असलो तरी मेहफिल जमते. सध्या पावसाचा सीजन असल्याने वारंवार तिथे जाणे होते. मोजून सांगायचे झाल्यास, गेल्या तीन महिन्यात पाच वेळा. मी आणि सोबत माझी दोन पोरे. त्यांनाही तिथल्या जादुई वातावरणाची आवड लागली आहे. कधीही ऊठा, जीन्स चढवा आणि निघा. कंटाळा येतच नाही. उलट आला कंटाळा की ऊठा आणि तिथला समुद्र गाठा. नुसता समुद्रच नाही तर त्या भोवती पसरलेला कट्टा, आणि त्या कट्ट्याभोवतीचा पट्टा, कितीही गजबजलेला का असेना कधी गर्दीचा वाटत नाही. मन रमतेच..
तर असेच गेल्या रविवारी तिथे चक्कर टाकणे झाले. सकाळचा पाऊस संध्याकाळी गायबला होता. पण दाटून आलेले ढग हळूहळू सूर्यकिरणांना रस्ता देत होते. जसे मावळू लागले तसे गुलाबी रंगाच्या छटा अश्या काही पसरू लागल्या की कुठलाही फिल्टर न लावता हे असे फोटो निघू लागले.
तिथे फोटो देखील कितीही काढा, मेमरी कार्ड भरते पण मन भरत नाही. पण नेहमीचे जाणे असल्याने मी जास्त फोटो टिपायच्या भानगडीत पडत नाही. मुलांच्या दंगामस्तीचे फोटो मात्र हौसेने काढतो. पण पोज देऊन फोटो काढले असे क्वचित होते. स्पेशली पोरगा कधी फोटोला पोज देतच नाही. मग कितीही स्पेशल डे, स्पेशल ओकेजन का असेना.. पण त्या दिवशी चमत्कार घडला !
त्या दिवशी पोराला ती दिसली. दिसता क्षणीच ती आवडली. खाली लालचुटूक पेहराव. आणि वर तेनु काला चश्मा जचदा ऐ.. बघताक्षणीच त्याच्या मनात भरली. धावत जाऊन तिला तो जवळपास मिठीच मारणार होता. पण तिच्या इतक्या जवळ जाण्यातला धोका ओळखून मी त्याला अडवले. तरी दुरून का होईना अनिमिष नेत्रांनी तो तिला न्याहाळतच होता. मग मी त्याला म्हंटले चल एक छानशी पोज दे. तुझा फोटो काढूया हिच्यासोबत. आणि घरी जाऊन मम्माला दाखवूया तुझी नवी मैत्रीण.. आणि काय जादू, दुसऱ्याच क्षणाला पोरगा पोज देऊन रेडी.. माझीच घाई झाली जे खिशातून चटकन मोबाईल काढत, केमेरा ऑन करत, दोघे व्यवस्थित दिसतील असा अँगल शोधून, ती तिथून निघायच्या आधी त्यांचा जोडीने फोटो काढावा लागला.
काही फोटो वरकरणी तितके स्पेशल वाटत नाहीत, पण त्यासोबत जोडलेल्या आठवणींनी ते स्पेशल बनतात..
हा त्यातलाच एक.. जो काही जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला.
येस्स! डबल डेकर बस!!
मुंबई बेस्टची शान!
जेव्हा इमॅजिका, एस्सेलवर्ल्ड असले अम्युजमेंट पार्क नव्हते तेव्हा मुंबईकरांची खरीखुरी जॉय राईड होती डबलडेकर बस.
अट फक्त एकच. वरच्या मजल्यावर जावे आणि ड्रायव्हरच्या थेट डोक्यावरची पहिल्या क्रमांकाची सीट बूक करावी. समोरची खिडकी सताड उघडी. तिथून जोरदार थंडगार वारा येऊन आपल्या चेहर्यावर आदळणार. बसचा वेग जितका जास्त तितकाच वार्याचा मारा सुखावणारा. जर सोबत पावसाचे तुषार असतील तर क्या बात.! स्वत: अनुभवल्याशिवाय या सुखाची कल्पना अशक्यच.
मी चौथीला असतानाच स्कॉलरशिपच्या एक्स्ट्रा क्लासमुळे स्कूलबस सोडून बेस्ट बस ने प्रवास करू लागलो. माझगाव ते दादर. थेट बसची फ्रिक्वेन्सी कमी म्हणून दादर ते भायखळा असा प्रवास करायचो. आणि तिथून दुसरी बस. तर या दादर ते भायखळा प्रवासात १ नंबरची बस डबलडेकर होती. भायखळ्यावरून माझगावला जाताना ३ नंबरची बस डबलडेकर होती. ईतक्या शेकडो नंबरच्या बस होत्या मुंबईत, पण आपण १ आणि ३ नंबरच्या बस ने प्रवास करतो हे तेव्हा स्पेशल वाटायचे. पण तरीही खरे कौतुक होते ते बसच्या डबल डेकर असण्याचे. त्यासाठी त्याच मार्गावरच्या ईतर बसेस सोडल्या जायच्या. चालती डबल डेकर बस धावत जाऊन पकडली जायची. घाईघाईत वर जायचो आणि तिथे कोणी आधीच बसले असेल तर त्याला कुठे उतरणार हे विचारून त्या सीटवर आपला क्लेम लावला जायचा. मोठा ग्रूप असला तर त्या सीट वरून भांडणे व्हायची. कंडक्टरकाका ओरडत राहायचे. आमची मस्ती चालूच राहायची..
त्याकाळी आम्हा मुलांच्या सुखाच्या कल्पनाही फार हलक्याफुलक्या असायच्या. छोट्या छोट्या गोष्टीतही फार आनंद मिळायचा. पण तरीही डबल डेकर बसची ती फ्रंट सीट स्पेशलच होती. त्या दिवशी मुलाला जेव्हा डबल डेकर बस बघूनच ईतका आनंद झाला ते बघून मनात विचार आला की पोरांना पहिल्या सीटवर बसायचा आनंद अनुभवायला मिळाला तर किती खुश होतील. लवकरच हा योग जुळवूया असे ठरवले आणि परवाच ही बातमी कानावर आली..
मुंबईची शान असलेली डबल डेकर बस आता बंद होत आहे.
किंबहुना दोनच दिवसांपुर्वी झाली आहे.
तब्बल ८६ वर्षांचा हा प्रवास थांबला आहे.
नव्वदीच्या दशकात तब्बल ९०० डबल डेकर बस मुंबईत धावत होत्या...
पण या १५ सप्टेंबर २०२३ रोजी आगरकर चौक ते सीप्ज रूट वर ४१५ क्रमांकाची शेवटची डिजेल डबल डेकर बस धावली.
शेवटचे या जुन्या डबल डेकर बस मध्ये कधी बसलो हे देखील आता आठवत नाही पण तरी मनात काहीतरी दाटून आले.
आणि हा एक आयकॉनिक फोटो गूगल करून आंतरजालावरून साभार.. जो आजवर मुंबईत न आलेल्यांनी देखील कित्येक चित्रपटात मुंबई दाखवताना पाहिला असेल. कारण व्ही.टी. स्टेशनप्रमाणे डबल डेकर बस सुद्धा मुंबईची एक ओळखच होती.
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
किती मस्त लिहीलय.
किती मस्त लिहीलय. ते फोटोज तर इतके सुंदर आलेत.
>>>>>पाऊस, मरीन ड्राईव्ह आणि एक मुंबईकर.. आमचे एक वेगळेच नाते असते. तिघातले दोघे उपस्थित असलो तरी मेहफिल जमते.
काय मस्त वाक्य आहे. मुंबईकर लवकर का झाले नाही असे वाटवणारे आहे हे वाक्य.
पण कितीही कन्व्हर्टेड मुंबईकर असले तरी मी मूळची पुणेंकर हो. जब चार यार मिल जाये तो बात हो गुलझार - पर्वती, सारसबाग, तुळशीबाग आणि मी.
मस्त लिहिलंय. फोटो पण छान
मस्त लिहिलंय. फोटो पण छान आलेत. गुलाबी छटा अप्रतिम.
परवाच FB वरूनच कळलं की डबलडेकर बसेस बंद होतायत.
अशाच काही छान आठवणी डोक्यात येऊन गेल्या.
मुंबई च म्हणाल तर फोर्ट, चर्चगेट, नरिमन पॉइंट पूर्ण एरियाच अतिशय आवडतो.
सामो, छन्दिफन्दि , धन्यवाद
सामो, छन्दिफन्दि , धन्यवाद
मुंबई च म्हणाल तर फोर्ट, चर्चगेट, नरिमन पॉइंट पूर्ण एरियाच अतिशय आवडतो.
>>>
अगदीच., तिथल्या आठवणींवर खरे तर स्वतंत्र लिहायला हवे..
तूर्तास शुभरात्री
माझ्या लहानपणापासून डबलडेकर
माझ्या लहानपणापासून डबलडेकर बसमध्ये बसण्याचा भरपूर अनुभव आहे. सायन बस डेपो जवळच होता आणि तिथून ८५,६६,६३,१६५ या चारही डबलडेकर बसेस सुटत(१९६०). सीटा हव्या त्या मिळत. सुरवातीला पुढची वरच्या मजल्यावरील सीट आवडती होती. नंतर वर जिना चढल्यावर लगेच डावीकडची कुणाला नको असलेली मला आवडू लागली. डावीकडे नंबर लावलेली जागा असते ती. पाय मोकळे ताणून बसता येते. वाराही येतो. शिवाय बस वळण घेते तेव्हा पुढचा भाग वळताना दिसतो ती मजा. डेपोजवळच्या मुख्य रस्त्यावर विक्रोळी, चेंबुर कडून येणाऱ्या ६, ७, ८ मर्यादित यासुद्धा डबलडेकर असत. १९७० मध्ये ८५ नंबर सायन बसडेपोमधून काढून चुनाभट्टी येथून सुरू केली. डबल डेकर काढून ट्रेलरबस आणली. तिथे भरपूर जागा होती ती वळवायला. त्या वेळी म्हणजे '६० मध्ये सायन मधून जाणारी वाहने हळूहळू वाढत होती तरी '७० पर्यंत ट्रेलर बस चालवण्यात काही अडचण नव्हती. एकदा वेग घेतला की दीड दोन किमि.चे स्टाॅप्स परवडायचे आणि सायन ते दादर सहा स्टाॅप्स असत. दादर खोदादाद सर्कलला तो ड्रायवर असा काही मस्त वेगात वळण घ्यायचा आणि टिळक पुलावर बस चढवायचा की मजा यायची. पण एकदा ट्रेलर निसटून मागचा भाग आडवा झाला. ट्रेलर बंद करून टाकली. अशी ट्रेलर पुण्यातही होती म्हणतात. ठाण्यात सिडको पॉइंट ते तुर्भे अशी चाले.
डबलडेकर मध्ये वरच्या मजल्यावर जाण्यात मुले,तरुण अगदी आवडीने जात पण महिलावर्ग टाळे. त्यांच्या आवडत्या सीटा म्हणजे प्रथमच दोन आडव्या टाकलेल्या. सिनीअर लोकही खालीच पसंत करत. तर हे प्रवासी वर जायला तयार ('मागत') नसतं आणि खालचा कंडक्टर रागावून सगळ्यांना वर पाठवे. आताही एसी बस आल्यावरही हाच प्रकार होणार. पूर्वीच्या साध्या बसमध्ये ती भरली आहे किंवा रिकामी आहे हे बाहेरून सहज दिसे तसे आताच्या खिडक्यांना काळ्या काचा लावलेल्या एसीबसमधून पटकन दिसत नाही. दार उघडल्यावर दिसते.
एक मात्र उत्तम गोष्ट म्हणजे कंडक्ट्रर लोकांची ड्युटी सुखद गारेगार होणार.
____________
ऋ'चा धागा येणार हे माहीत होते. मुंबईतील मायबोलीचा ब्रांड अम्बेसेडर 'पोरांसह'. ('छोट्यांसह').
Srd , एकदम रिलेट झाले .
Srd , एकदम रिलेट झाले . मुम्बईची डबल डेकर ही आवडिची खास करुन ट्रेलर बस. वळाताना ट्रेलर आधी वळणार मग बस. बस कशी वळाणार हे दोन्ही मजल्याच्या पहिल्या सिट वर किंवा दरवाज्यातुन बाहेर डोकावुन बघायला खुप मजा यायची. ३, ४, ८५, ६६ आणि ७ मध्ये भरपुर प्रवास केला आहे ७०-८० च्या दशकात ट्र्फिक कमी असल्याने बसेस आणि लोकल प्रवासात तेवढाच वेळ लागायचा. सायन ते वरळी हा माझा आवडता रुट होता. खुल्या खिडक्या असलेली डबल डेकर बस मिस करणार.
लंडन मध्ये काही जुन्या डबल डेकर सिटी सेंटर मध्ये चालु ठेवल्या होत्या (१० वर्षापुर्वी तरी होत्या ) तश्या मुंबईत पण ठेवल्या पाहिजेत.
>>>>>>ऋ'चा धागा येणार हे
>>>>>>ऋ'चा धागा येणार हे माहीत होते. मुंबईतील मायबोलीचा ब्रांड अम्बेसेडर 'पोरांसह'. ('छोट्यांसह').
हाहाहा
----------------------
मी विद्याविहारहून दादरला जायचे डबल डेकरमधून. माझं बाळ व मी एकदम वरती, एकदम पुढे बसून गेलेलो माझ्या लक्षात आहे.
अगदीच., तिथल्या आठवणींवर खरे
अगदीच., तिथल्या आठवणींवर खरे तर स्वतंत्र लिहायला हवे.. >>> काढा धागा
Srd, छान माहिती, अनुभव!
Srd आणि साहील मस्त पोस्ट..
Srd आणि साहील मस्त पोस्ट.. जे माझ्या काळाचे होते तिथे अगदी अगदी झाले..
माझा रुमाल.. चहा पिऊन येतो
ऋ, मस्त लिहिलं आहेस. माझं ही
ऋ, मस्त लिहिलं आहेस. माझं ही डबल डेकर बसशी खूप घट्ट नातं आहे.
मी रहायला गिरगावात होते अनेक वर्ष. त्यामुळे रोजच बसनेच जात येत असे फोर्टमध्ये ऑफिसला.
६६ नंबरच्या डबल डेकर बसने वरच्या मजल्यावर सर्वात पुढे कधी बसलं तर मेट्रो पास करून बस चिरा बाजार ला लागली रेसी . Area सुरू झाल्याने सगळ चित्रच बदलून जात असे. अरुंद रस्ते त्यात दुशीकडे पार्क केलेली वाहने, त्यातच हातगाडीवाले, सायकलवाले, दोन्ही बाजूला फेरीवाले, भाजीवाले, मधूनच बाजूच्या लेन मधून मेन रॉड वर येणारा एखादा टेम्पो, घरी निघालेली शाळेतली मुलं, त्यांच्या आया खुप गर्दी असे रस्त्यावर. गर्दीला शिस्त नाही अजिबात. आलं मनात केला रस्ता क्रॉस किंवा वेगात जाणारी आपल्या पुढची गाडी काही ही सिग्नल न देता थांबली अचानक अस चित्र दिसत असे वरच्या मजल्यावरून बघताना. कधी कधी माझ्याच काळजाचा ठोका चुकत असे तर त्या ड्रायव्हर दादांचं काय होत असेल ह्याची कल्पना ही करवत नाही. ह्या चक्रव्यूहातून सुखरूपपणे घरी आणून सोडलं म्हणून उतरताना मनोमन रोज त्यांचे आभार मानत असे . असो.
पुढे wtc ला बदली झाल्यावर १३८ नंबर बसने वरच्या सर्वात पुढच्या खिडकीत बसून WTC हून पावसाळ्यात cst ला येणे हा मात्र एक नितांत सुंदर अनुभव होता.
प्रेसिडेंट हॉटेल, कफ परेडच्या तेव्हा अप्रूप असलेल्या बहुमजली इमारती, पुढे मंत्रालय, आमदारांचे टुमदार बंगले अस पास करत गाडी मारून ड्राईव्ह ला वळली की समुद्राच दर्शन होई आणि एकदम मोकळ मोकळं वाटे. भरून आलेलं आभाळ, हवेतला थोडासा गारवा, रिमझिम किंवा मुसळधार पडणारा पाऊस, खवळलेला समुद्र, कठड्यावर आदळणाऱ्या फेसाळ लाटा, अमिताभ मौसमी च्या रिमझिम गिरे ची आठवण करून देणारी पावसात भिजणारी किंवा एका छत्रीत चालणारी तरुणाई , पावसात तसाच कुडकुडत उभा राहून कणसं, चहा विकणारा एखादा गरीब मुलगा , त्याचे रसरसलेले कोळसे, तिथल्या आर्ट डेको बिल्डिंग मधल्या बाल्कनीत उभा राहून समुद्र बघत गरम चहाचे घोट घेणारा कोणी एक पारशी बाबा, लांबवर धूसर दिसणारी मलबार हिल आणि राणीच्या गळ्यातला हार ... सगळचं कायम मनात घर करून राहिलेलं. ह्यातून मिळालेल्या आनंद इतका असे की पुढे सीएसटी आल्यावर झेलावे लागणारे गाड्यांचे गोंधळ , गर्दी, उशीर घाण, चिखल वैगेरेच काही वाटत नसे.
आज हीघराच्या गॅलरीतून पाऊस बघताना ही कधी कधी मनाने मी ही १३८ ची सफर करून येते आणि ताजी तवानी होते.
मीही चर्चेगेट ते वर्ल्ड
मीही चर्चेगेट ते वर्ल्ड ट्रेड सेंटर असा प्रवास डबल डेकर बसने करीत असे. पण ऑफिसात येताजाताना केलेला प्रवास म्हणून त्यातला आनंद लुटणं राहून गेलं. सुरुवातीच्या दिवसांत अप्रूप वाटलं असेल. भरपूर कामाच्या भरपूर ताणाचे दिवस होते ते.
माझा एक मॅनेजर लखनौवरून आला होता. आणि आम ची संस्था त्याच्यासाठी प्रवासातला एक टप्पा होता. त्यामुळे तो ऑफिसातला वेळ आणि प्रवासही एंजॉय करीत असे.
संध्याकाळीरात्री उशिरा निघताना १३८ च्या वरच्या डेकवर सगळ्यात पहिल्या उलट्या सीटवर बसून वारा खात जाणं तो एंजॉय करी आणि त्याच्यासोबत मीही काही वेळा गेलो.सगळ्यांनी छान लिहिलंय. आता
सगळ्यांनी छान लिहिलंय. आता फक्त मायबोलीवर मारियो मिरांडा चित्रकार हवाय.
तर आमचं आता व्हर्चुअल गेट टुगेदर झालं डबलडेकर बस प्रवासाचं.
हाइकोर्टासमोरच्या डबलडेकर बस मधलं कॅन्टिन फक्त बस ड्राइवर कंडक्टरांसाठी होतं. ते आणखी एक सर्वांसाठी असायला हवं होतं. मग सेल्फीसाठी किती गर्दी झाली असती!
एनसीपीए टाटा प्रदर्शन पाहण्यासाठी १३८ ने जावं लागायचं.
आता नव्या बसेस येतील तेव्हा येवोत एसी बस/ट्रेनमधून फोटो काढणे शक्य नाही.
जर्मनीत पाण्यातून जाणारी डबलडेकर बस आहे ती इथे आणणार होते पण........ गेटवेच्या बाजूला पाण्यात उतरण्याचा रॅम्प द्यायला नेविने Navy नकार दिला.
डबल डेकरशी लहानपणीच्या खूप
डबल डेकरशी लहानपणीच्या खूप आठवणी आहेत
तसा बसशी फार संबंध येत नसे. पण जेव्हा कधी जुहू चौपाटीला जायचे असल्यास दहिसर पुल ते जुहू चौपाटी अशी २०३ नंबरची डबल डेकर बस होती. त्यात वरच्या माळ्यावर पहिल्या सीटवर बसून जुहू चौपाटीला जाणे हा अत्यानंद असे.
गेल्या खेपेला मुद्दामुन डबल
गेल्या खेपेला मुद्दामुन डबल डेकरने जाऊन आलेलो तेव्हाचे फोटो.
बंद होणार माहित असतं तर अंधेरी किंवा कुर्ल्याला जाऊन डबलडेकर रांगेने उभ्या असलेल्या, सिग्नलला उभ्या असलेल्या, डेपोत उभ्या असे फोटो घेतले असते.
एसी डबलडेकर चालू असणार आहेत हे चांगलंच आहे. आमच्या इथे आहेत एसी डबलडेकर. त्यात पण मजा येते जाताना.
लहान असताना जुहू किंवा गिरगाव चौपाटीला (हल्ली लोक बीच म्हणतात) कितीही गर्दी असली तरी डबल डेकरनेच गेलेलं आठवतंय. आईला पण डबलडेकर आवडायची. तिचं बालपण दादर आणि चेंबुरला गेलंलं, त्यामुळे डबलडेकरने खूप वेळा फिरलोय. डबलडेकर मध्येच एकदा चौपाटीवरुन येताना बाबांचं पाकिट मारलेलं, ते पण आठवलं त्या निमित्ताने.
एकदा आजी बरोबर दादरला गेलेलो. सेनाभवन किंवा कॅडल रोडला असेल, चौकात बस सिग्नलला उभी होती, आजीने लांबून बघितली आणि मला म्हणाली पळ, सिग्नल सुटायला वेळ आहे. मिळेल आपल्याला. चढल्यावर कंडक्टर मलाच ओरडला. म्हातार्या माणसांना असं रस्त्याच्या मध्ये धावत आणतात का! काही झालं असतं तर! त्याला कुठे सांगू आजीच मला धावत घेऊन आलेली ते! इतकं होऊन आजी मला म्हणते चल, वरती रिकामी दिसत्येय वरतीच जाऊ.
लेख आणि फोटो मस्तच.
लेख आणि फोटो मस्तच. मुलाचा फोटो आणि बॅकग्राऊंड जाम भारी.
प्रतिसादही मस्त, माहितीपूर्ण.
मुंबईत बसने फिरायची वेळ आली तर डबलडेकर आणि वरचा मजला फिक्स. जास्त करून गिरगावात मोठ्या आतेकडे त्यावेळेच्या विटीवरून जाताना बसने जायला मिळायचं. दहीहंडी आणि गिरगाव फिक्स होतं. बाकी माटुंगा रोड किंवा विद्याविहारच्या आतेकडे चालत जायचो पण गिरगावात डबलडेकर बसच हवी असायची. तसं बाबांनी अजून काही ठिकाणी डबलडेकर बसने फिरवलं आहे. एकदा त्यावेळी गुरू तेगबहाद्दूर नगर इथे रहाणाऱ्या मामे आजीनेही बसने फिरवलेलं, वडाळा वगैरे.
ती आता बंद होतेय वाचून हळवी झाले.
अमितव तुमची आजी rocking होती, धमाल किस्सा
धमाल किस्सा आजीचा!
धमाल किस्सा आजीचा!
डबल डेकर त्यात पहिल्या रांगेतील सीट आवडायची.
त्यात इतर मजे सोबत मोहमद अली रोड, चेंबूर कॅम्प वगैरे भागात एवढ्या गर्दीतून ड्रायव्हर बस कशी काढतो याचे कौशल्य दिसून यायचे.
बस क्रमांक ३४० असल्फा व्हिलेज
बस क्रमांक ३४० असल्फा व्हिलेज ते आगरकर चौक, अंधेरी. मध्येच एखादी सिंगल डेकर बस आली तर ती सोडून डबल डेकर वरच्या मजल्यावरुनच प्रवास करायला मज्जा यायची.
आजीचा किस्सा
आजीचा किस्सा
बसचे फोटो देखील मस्त आहेत अमितव
मलाही आधी कल्पना असती तर नक्की काहीतरी जुगाड करून पोरांना हा अनुभव दिला असता पण नेमके दोन दिवस आधी हे समजले आणि मग शक्य नव्हते.
किंबहुना हा धागा देखील ही बातमी समजायच्या आधीच काढायचे डोक्यात होते. कारण मागच्या वीकेंडला पोरगा ती बस बघून खुश झाला तेव्हाच त्याला डबल डेकर मधून फिरवायचे आणि मग आपल्या आठवणी त्यात जोडून लिहायचे असे डोक्यात होते. पण ते राहिलेच. आता एसी डबल डेकर मधून फिरायला हवे. त्यात मी देखील कधी बसलो नाही.
असो, प्रतिसादातले एकेकाचे अनुभव आणि किस्से वाचताना छान वाटत आहे.
१३८ नंबर किंवा जे मरीन ड्राईव्ह इथून डबल डेकरने रोजचा प्रवास करायचे त्यांचा तर नेहमीच हेवा वाटत आला आहे. स्पेशली पावसाळ्यात. आयुष्यात एकदाच हा अनुभव अनपेक्षितपणे मिळाला आहे. त्यामुळे विशेष लक्षात आहे.
Srd
Srd
ऋ'चा धागा येणार हे माहीत होते.>>> या विश्वासाबद्दल धन्यवाद
ट्रेलर बस कुठल्या काळापर्यंत होती.
ट्राम वेगळाच प्रकार ना?
ट्रेलर बस '७१ ते '७५ होती.
ट्रेलर बस '७१ ते '७५ होती. आता मोठे टँकर दिसतात ना तसेच पण मागे बस जोडलेली. त्याला आम्ही डोक्याची बस म्हणायचो. ठाणे सिडको पॉइंटची एकच वर्ष चालली.
ट्राम १९६४ ला बंद झाली. माटुंगा अरोरा सिनेमा ते फाऊंटन, म्युझियम. आता कोलकात्याला जायला लागेल.
प्रिन्सेस स्ट्रीट ते मरीन ड्राईव अशी एक नेहमीची सिंगल डेकर बस होती त्याला वरती ओवरहेडवायरमधून वीज घ्यायची सोय होती. आवाज बिलकूल नसे. पण वर 'चिकटलेला' सांगाडा बस स्टॉपवर फारच कडेला गेली की खाली पडायचा. मग बंद केली /काढली.
आताच्या एसी बसच्या एंजिनाबद्दल कळलं नाही. बॅटरीवर का डिझेलवर आहे.
अमितव , आजीचा किस्सा भारीच.
अमितव , आजीचा किस्सा भारीच.
बस मध्ये सिग्नल ला चढणे खूप वेळा केलं आहे. गर्दीमुळे bpt च्या स्टॉप ला ६६ थांबवली नाही कधी तर पुढे सिग्नल ला धावत जाऊन बरेच वेळा पकडली आहे.
तुम्हाला म्हणून सांगते, ही ट्रिक मी लंडन मध्ये ही ट्राय केली होती. सेंट्रल लंडन मध्ये पाय तुटेस्तोवर चालून झालं होत त्या दिवशी आणि घरी निघाले होते. समोरच सिग्नल वरच माझ्या घराकडे जाणारी बस उभी होती. तिकडे दरवाजे बंद असतात बसचे म्हणून ड्रायवर ला नजरेनेच विचारल होत " येऊ का" असं . पण त्याने दरवाजा उघडला नाही. . "पुढे बस स्टॉपवर या" अशी खूण केली. आत्ता पर्यंत कोणाला सांगितलं नव्हत मी हे आज इथे लिहिलय. मुलं नव्हती बरोबर आणि एकटीच होते म्हणून डेअरिंग करू शकले.
अमितव १३८ बस बघून जीव शांत झाला. २ लिमिटेड फास्ट जायची पण आतून कूपरेज वरून जायचीत्यामुळे व्ह्यू नाही मिळायचा काही. १३८ चा रूट चांगला होता पण क्राउड चांगला नसे. Wtc च्या पुढे सगळी झोपडपट्टी होती आणि
तिचं तिकीट ही कमी होत म्हणून. त्यामुळे १३८ मध्ये छान सीट मिळाली तरच मजा यायची.
बस च्या रूट वर अवलंबून असतो क्राउड. ८३ , ८१ चा कॅडल रोड , शिवाजी पार्क चा पॉश, ६६ चा गिरगाव बॉम्बे सेंट्रल भागातला मधून वर्गीय वैगरे ... अर्थात हे माझं निरीक्षण आहे असो.
लेख आणि फोटो मस्त !
लेख आणि फोटो मस्त !
चर्चगेट स्टेशन १ नंबर
चर्चगेट स्टेशन १ नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या रस्त्यावरून वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि एन सी पी ए साठी बसेस सुटायच्या. त्यांचे नंबर कोणाच्या लक्षात आहेत का?
१२१
१२१
Android app
Android app
Mindicator app मध्ये बसेसचे
BEST मुंबई,
NMMT नवी मुंबई,
TMT ठाणे
सर्व रूटस बरोबर आहेत. स्टॉप्सची जुनी नवी नावेही सापडतील. चर्चगेट म्हणजे अहिल्याबाई होळकर चौक.
रूटची यादी दिसली की स्क्रीनशॉट घ्यायचा.
AS म्हणजे AC service.
______________
iPhone असेल तर
https://go4mumbai.com/m/Mumbai-and-suburban-Bus-Route.php?best=1&nmmt=1&...
या पेजवर बस मिळतात.
साईट वापरा ब्राउजरमधून.
नाही १२१ नव्हती. त्या
नाही १२१ नव्हती. त्या चर्चगेट स्टेशनच्या बाहेरून सुटायच्या. म्हणजे तिथूनच सुरू व्हायच्या. आणि एकीचा शेवटचा स्टॉप वर्ल्ड ट्रेड सेंटर.
एम इंडिकेटर माहीत आहे. त्यावर स्पेशल ८ आणि स्पेशल ९ या बसेस दिसल्या चर्चगेट - > वर्ल्ड ट्रेड सेंटर / एन सी पी ए. मलाही वाटतंय त्या बसेसना नंबर नसावेत.
वर्ल्ड ट्रेड सेंटर हून चर्चगेटला जाणार्या बसेस सात साडेसातपर्यंतच असत. नंतर १३८ घ्यावी लागे.
मला वाटतय त्यांचे नंबर ८ आणि
मला वाटतय त्यांचे नंबर ८ आणि ९ स्पेशल असे होते. नॉर्मल ८ व्ही टी ते मलबार हिल जायची.
V T ते wtc आणि नरिमन पॉइंट अश्या ही स्पेशल बस होत्या त्यांचे नंबर २आणि १ स्पेशल असे होते. दोन नंबर ही फक्त पीक अवर लाच असे , एरवी १३८ च घ्यावी लागे.
अगदी लहानपणी ट्रेलर बसने ही
अगदी लहानपणी ट्रेलर बसने ही गेलेलं आठवतंय. मुंबईच्या बंद झाल्यावर पुण्याला ही ट्रेलर बस होती काहीकाळ असं आठवतं.
इंजिनियरिंग झाल्यावर अगदी थोडा काळ सीप्झ मध्ये काम केलंय. तेव्हा अंधेरी स्थानक पूर्व/ आगरकर चौक - सीप्झ ४१५ डबल डेकरने प्रवास केला आहे. तेव्हा मरोळ आगारात भरपूर बस नुसत्या लांबून बघायला ही मस्त वाटायचं.
आत्ता लिहिताना डबल डेकर थांबताना किंवा सुटताना अशी थोडी मागे-पुढे, मागे - पुढे व्हायची ते आठवलं.
ममो, मी पण टोरांटोला केलं असेल तसं. ड्रायव्हर नाही उघडत दार
आमच्या टोरांटो ला स्ट्रीट कार (ट्राम), सबवे ( अंडर ग्राउंड ट्रेन) आणि बस यांचं छान जाळं आहे. तिकडे एका तिकिटात ठराविक काळ कितीही ट्रान्स्फर घेऊन फिरता येतं. मुंबईत उभं आडवं मनाला येईल तसं मनसोक्त दिवसेंदिवस फिरायची अपुरी इच्छा टोरांटो मध्ये डे पास, आणि जेव्हा काम करत होतो तेव्हा मंथली पास काढून पूर्ण केली.
अजूनही टोरांटोला गेलो की गाडी कुठे तरी पार्क करून टीटीसीने भटकायला भयंकर आवडतं. सेम विथ San Francisco. पण मुंबई किंवा टोरांटो सारखा जिव्हाळा/ आपलेपणा संनफ्रान्सिस्कोला नाही वाटत. सगळं अलिप्त वाटत रहातं.
न्यूयॉर्क सिटी मध्ये महिनाभर अपार्टमेंट/ एअर बी एन बी रेंट करून असाच पास घेऊन फक्त निरुद्देश फिरायचं हे अजून पूर्ण न केलेलं बकेट लिस्ट स्वप्न आहे.
>>>>>>न्यूयॉर्क सिटी मध्ये
>>>>>>न्यूयॉर्क सिटी मध्ये महिनाभर अपार्टमेंट/ एअर बी एन बी रेंट करून असाच पास घेऊन फक्त निरुद्देश फिरायचं हे अजून पूर्ण न केलेलं बकेट लिस्ट स्वप्न आहे. Happy
सुंदर!!!!
आजीचा किस्स फार मस्त. रंगवुन एक धागा करायचात ना. व्यक्तीचित्रण लिहू शकता.
>>>>>San Francisco
San Francisco मध्ये तर बघण्यासारखं केवढं आहे. एक रेस्टॉरंट आहे - त्यांनी अजुनही जुनी पद्धत ठेवलेली आहे. टेबलवरती एक यंत्र असतं, त्यात एक क्वार्टर टाकून हवे ते जुने गाणे निवडायचे. ते त्या रेस्टॉरंटमधे, प्ले होते
परदेशात कमी वेळात जास्त स्थळं
परदेशात कमी वेळात जास्त स्थळं पाहण्यासाठी असलेल्या सिटी टूर्सच्या बस ह्याही डबल डेकर असतात, एक दोन दिवसाचा पास काढला की कितीही वेळा फिरा. कुठल्याही थांब्यावर उतरा, कुठूनही चढा. वरच्या माळ्यावर बसून मस्त फोटो काढता येतात. तसेच इअर फोनने आजूबाजूच्या भागाची माहिती ऐकता येते.
मुंबईत पण अशी मुंबई दर्शन ची नीलांबरी ओपन डेक डबल डेकर आहे ना अजून, त्याने प्रवास करण्याचा योग नाही आला अजून.
अमितव आज्जींचा किस्सा मस्त.
न्यूयॉर्क सिटी मध्ये महिनाभर अपार्टमेंट/ एअर बी एन बी रेंट करून असाच पास घेऊन फक्त निरुद्देश फिरायचं हे अजून पूर्ण न केलेलं बकेट लिस्ट स्वप्न आहे.>>>> भारी कल्पना.
<<<त्याला वरती ओवरहेडवायरमधून
<<<त्याला वरती ओवरहेडवायरमधून वीज घ्यायची सोय होती. आवाज बिलकूल नसे. पण वर 'चिकटलेला' सांगाडा बस स्टॉपवर फारच कडेला गेली की खाली पडायचा. मग बंद केली /काढली.>>>
अशा बसेस मुंबईत/भारतात तेव्हा होत्या हे माहीत नव्हते.
मी पहिल्यांदा बघितल्या झ्यूरीक मध्ये. तेव्हा वाटले मुंबईतली ट्राम बंद केली त्या जागी अशा बसेस आणायच्या असत्या.
Pages