सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकाग्रहास्तव (हट्टीपणा होता खरंतर) शीर्षक बदलले आहे. बंदिवानने बोहणी झाली होती म्हणून त्याला मधेच टाकणं आवश्यक वाटलं. आता माझा 'गंगाराम आणि गाढव' करू नका. Lol

सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या नणंद भावजयीच्या माहेरची माणसं जेव्हा लागली छळू तेव्हा काय हो चमत्कार धावून आली कुलस्वामिनी अंबाबाई पण ही विसरली नाही जोजो आणि अंगाई >>> perfect! Lol

हट्टीपणा होता खरंतर <<<<< _/|\_ अस्मिता, होऊ कशी उतराई?

सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या नणंद भावजयीच्या माहेरची माणसं जेव्हा लागली छळू तेव्हा काय हो चमत्कार धावून आली कुलस्वामिनी अंबाबाई पण ही विसरली नाही जोजो आणि अंगाई <<<<< Rofl
जोजो वांछील तो ते लाहो!

सती चव्हाण >>> भारी

सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या नणंद भावजयीच्या माहेरची माणसं जेव्हा लागली छळू तेव्हा काय हो चमत्कार धावून आली कुलस्वामिनी अंबाबाई पण ही विसरली नाही जोजो आणि अंगाई >>> Lol

सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या नणंद भावजयीच्या माहेरची माणसं जेव्हा लागली छळू तेव्हा काय हो चमत्कार धावून आली कुलस्वामिनी अंबाबाई पण ही चोळी परत मागायची विसरली पण विसरली नाही जोजो आणि अंगाई
एवढा एक बारीकसा बदल करून घ्या

लोलच लोल चाललय इथे.
>>>>>>>पण ही चोळी परत मागायची विसरली पण विसरली नाही जोजो आणि अंगाई
Lol Lol Lol

अस्मिता, हा धागा समजायला कोणकोणते शिनेमे पहाणे जरूरी आहे? कारण नुसते वाचुन संदर्भ लागत नाहिये व त्यामुळे जोक्स डोक्यात शिरत नाहियेत. म्हणजे ५-१० वर्षात ते पाहीन व मग इथे येते. Proud

कोणताही नाही बघितलास तरी चालेल सुनिधी, हे सगळं वाचलं की बघितल्यापेक्षाही जास्त होईल. पण फारच वाटलं तर सुरुवात 'बंदिवान' पासून कर, तेही सोसलं नाही तर आशा काळे ऊर्फ 'आका' यांचा कुठलाही बघ. Happy

काय भारी प्रिस्क्रिप्शन आहे Lol

मला इथे एका पिक्चरबद्दल लिहायला आवडलं असतं पण वांधा असा आहे की तो पिक्चर यूट्यूबवरून गायबलाय आणि मला तो नीट नीट आठवत नाहीये. पिक्चरचं नाव आहे 'आपली माणसं'. याच नावाचा एक अशोक सराफचा पिक्चर यूट्यूबवर आहे. पण हा तो नव्हेच! मी म्हणतेय त्या पिक्चरात विगो आहे, श्रीराम लागू आहेत आणि नटी कोण आहे देव जाणे. यात ते 'जीवनगाणे गातच र्‍हावे' गाणं आहे.
जेवढं आठवतंय त्याप्रमाणे विगो डॉक्टर असतो. हिरवीण त्याच्या प्रेमात पडते आणि म्हणून सतत त्याच्या दवाखान्यात पडीक राहते. मग लग्न होतं. विगो डॉ असल्याने सतत बिजी. बायको त्रागा करते. विगो तिला घेऊन ट्रीपला जातो. परत आल्यावर तरी तुणतुणं चालूच. वर बाई खूप संशयी. शिवाय विगोच्या घरची परिस्थिती फार काही ग्रेट नसते. मग काकू थेट माहेरच्या पैशांनी फर्निचर आणि काय काय घेतात. टोमणे मारतात. सासरच्यांना सासुरवास करतात. मग ट्विस्ट. ते काही फार महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते हे की या पिक्चरमधे विगोने गुलाबी रंगाच्या विविध शेड्सच्या पँट्स घातल्या आहेत Proud कधीकधी त्यावर गुलाबी शर्ट पण आहे. त्याचा कपडेपट पहायला तरी मला हा पिक्चर परत पहायचा आहे Wink

बरं Happy

श्रीराम लागू आहेत आणि नटी कोण आहे देव जाणे >> नयन भडभडे (रीमा लागू)
https://www.youtube.com/watch?v=xHg7BIgKqpU

मिसेस अग्निहोत्री लहान आहेत यात.

इथे आहे उपलब्ध
https://www.airtelxstream.in/movies/aapli-manse/HUNGAMA_MOVIE_52096610

#बाळागाऊकशीअंगाई
#आताबाळाचंकायहोणार
काल भारतातून प्राईमवर हा चित्रपट पाहिला. हजारो प्रश्नांची भेंडोळी उभी राहून मनात संभ्रम निर्माण झाला.
१. माझी स्वपीडनातून आनंद मिळवण्याची प्रवृत्ती आहे का?
२. पुण्यासारख्या शहरात मव कुटुंबात वाढलेली आका एस.एस.सी.च्यापुढे शिकत का नाही? बरं ती घरातच आहे तर वसंता येण्यापूर्वी तिचे आईवडील तिच्या लग्नाचं का बघत नाहीत?
३. भातुकलीच्या खेळात जनरली बाहुला बाहुलीचे लग्न करतात ना? का लहान मुलं-मुलींचे करतात? बरे केलेच तर लग्नाच्या वयाच्या मुलीसमोर हा विषय कोण काढते?
४. रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे वडील पहिल्या सीनमधे शिकारी ट्राउझर्स का घालतात?
५. ती तुळस श्रोडिंजरच्या मांजरासारखी आहे का? किंवा श्रोडिंजरच्या मांजरासारखी का आहे?
६. कॉलेजच्या ट्रिपवर काश्मिरला आलोच आहोत तर हनिमुनही आटपून घ्यावा, न जाणो, लग्नानंतर जमलं नाही तर (काश्मिरला जाणं म्हणतेय मी) अश्या विचाराचे स्टुडंट असताना त्यांच्यावर लक्ष ठेवायला शिक्षक का नाहीयेत?
७. मुलाला सतत तृतीयपुरूषी, एकवचनी ‘बाळ’ म्हणून रेफर करणारे लोक कहांसे आते है? बबडू, सोनू, राजू, चिंटू, पिंटू इ. मराठीतल्या सर्वनामांना दिग्दर्शक विसरले काय?
८. वसंता बालमैत्रिणीशी फक्त फ्रेंडली वागत असताना, वत्सलाकाकूंना कुठल्या दिव्यदृष्टीने ‘वसंतालाही तिच्याविषयी ओढ जाणवताना’ दिसली?
९. वसंता डॉक्टरकीच्या पहिल्या वर्षाला आहे व अलका त्याच्या बरोबरीची असावी पण ती आत्ता शिकत नाहीये. मग ‘माझ्या वडलांनी मला इतकं शिकवलंय’ म्हणजे नक्की किती शिकवलंय तिला?
१०. आपल्या केअरमधे असताना एखादं मुल गेलंय नी त्यामुळे त्याच्या आईवडीलांचा संसार ऑलमोस्ट उध्वस्त झालाय असं असताना, ‘तू पुन्हा लग्न कर’ असं त्यातल्या बाप्याला सांगायला किती धार्ष्ट्य/बिनडोकपणा लागत असावा?
११. उद्विग्न मनस्थितीत असताना एखाद्याने अतिशय कटू आरोप केला व नंतर माफीही मागितली तरी ‘तुझ्या बोलण्यामुळे माझं मन मेलंय. मेलेल्या मनानं मी कुणाशीही संसार करेन’ असं म्हणणं मानभावीपणा नाही का?
१२. कोणती आई बाळाला बाहेर नेताना फक्त अंगावरच्या कपड्यासरशी नेते, तेही प्री-डायपर काळात?
अ. कोणती आई बाळाला मनोरूग्णालयात असलेल्या मानसिकदृष्ट्या अस्थिर बाईकडे सोपवून निघून जाते?
ब. काही दिवस माहेरी जाऊन पेरेंटल सुपरव्हिजनखाली अलकाला मुल भेटवून सुधारणा होतेय का बघता आलं नसतं का?
क. कोणते डॉक्टर मनोरुग्ण स्त्रीकडे अचानक एक बाळ येऊन ती ठीक झाली म्हणून तिला व बाळाला एकाच दिवसात घरी जाऊ देतात, तेही नातेवाईकांना न सांगता?
१३. आपली तरणीताठी, गुणी (म्हणवली जाणारी) तान्हं मुल असलेली मुलगी गेली असताना तर कोणता बाप कालेलकरी संवाद झाडत जावयाला माहिती देईल? मुळात अश्या कामावर बापाला कोण धाडेल?
१४. आकाने त्याग स्क्वेअर केला. अलकानेही समजूतदार होऊन बाळाला परत केलं. #आताबाळाचंकायहोणार ? त्याला आईची ममता कोण देणार?
१५. भूताने ‘कुदरत का करिश्मा’ दाखवून बाळाला अंगावर पाजलं. #आताबाळाचंकायहोणार ?
१६. वसंत, श्रीधर, अलकाचे बाबा, बंडू, फॉर लार्ज पार्ट ऑफ इट वत्सलाबाई ही पात्रं कन्सिस्टंट वागत असताना तोरडमल व आका अनहिंज्ड का आहेत? नर्चर व नेचर दोन्हीविषयी वाद होऊ नये म्हणून केलेली सोय आहे का?

. महत्त्वाचं आहे ते हे की या पिक्चरमधे विगोने गुलाबी रंगाच्या विविध शेड्सच्या पँट्स घातल्या आहेत
>>>> तेव्हाचा मेट्रोसेक्शुअल माणूस दाखवायचा असेल ग त्यांना....पण हा चित्रपट बघणे मस्ट आहे आता.

कविता किरण >>अच्छा.
थोडीशीच उशिरा आली असती तर क्रश या पदावर नेमणूक करता आली असती.

डेंजर आणि खरे प्रश्न आहेत माझेमन. >>>> + १००००
इथे वाचून वाचून मला ही फार ईच्छा झाली बघायची . आता सुरु केलाय .

१. आका ईतका भोचकपणा करते . विगो बेळगावला जाणार म्हणतो तर लगेच त्याची बॅग भरून देते आणि तो ही काही चेक न करता बॅग उचलून चालू पडतो . अरे नीट भरली आहे की नाही ते तर बघायच ना .
२. विगो कॉलेजमधून आल्यावर , ही त्याच्या हातातली पुस्तके घेते , तो फ्रेश व्हायला गेल्यावर त्याच्यामागोमाग त्याच्या खोलीत जाते , त्याचे कपडे नीट उचलून कपाटात ठेवते . ऑफिसला जाताना त्याच्यासाठी कपडे निवडून ठेवते , तो तयार होत असताना तिथेच पडद्यामागे लपून राहते . so creepy . आणि हे सगळे घरातल्या कोणालाच वावगं वाटतं नाही .

आका ईतका भोचकपणा करते >>>
हो फारच भोचक.....हाईट म्हणजे एक दिवस अलका डॉक्टरकडे जाते त्यावेळी ही वसंताचे कपडे व शूज तयार ठेवते... अरे रिप्लेसमेंट बायको आहेस का तू? आणि घर तुमचे आहे मान्य. पण आता ती रूम व कपाट त्यांना दिलेय ना वापरायला? काय प्रायव्हसी आहे कि नाही?

मनमोहना गाणे पाहिले. म्हणजे म्युट करून जर पाहिले तर अशक्य हसायला आलं. काही काही स्टेप्स 'या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या ' टायप आहेत. अजून एक.. त्या सहा साईड डान्सरची continuity नाही बहुदा. एक दोन तर नक्कीच वेगळ्या भासत आहेत.. यु ट्युब वर ३ मिनिट १७ सेकंद ते ३ मिनिट २४ सेकंद मध्ये उजवी कडची पहिली आणि डावीकडची /कडचा शेवटची / चा बघा प्लीज. Proud

" मला वाटलं तुम्हाला केळफुलाची भाजी आवडत असेल ?? "
सिरियसली ??? . ती काय बटाटा की वांग्याची भाजी आहे .

Mazeman Lol

अगं पण म्हणून दुसरे रंगच वापरायचे नाहीत? ये नाइन्साफी हय. त्यात पुन्हा क्लायमॅक्सला विगोच्या विचारांची उत्तुंगता वगैरे दाखवायला विगोला बहुधा टेबलावर ऊभा करून खालच्या लेव्हल ने कॅमेरा लावलाय. जाम हसू येतं तेव्हा.

थोडीशीच उशिरा आली असती तर क्रश या पदावर नेमणूक करता आली असती. >>> चालायचंच. तिच्या ऐवजी तृप्ती तोरडमल चालतेय का पाहा Proud

Pages