सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा, 'अंगाई' अमेरिकेत नाही उपलब्ध. मला रेंट द्या म्हणतेय. वर प्रतिसादात लिहिले आहे.'बॅड कर्मा' दुसरं काय. Lol

अरे लोकहो तुम्ही ऑलरेडी पुढच्या पिक्चरवर? >>> हा धागा गार्डन हेज मेझ झालेला आहे ऑलरेडी.

श्रद्धा, 'अंगाई' अमेरिकेत नाही उपलब्ध. >>> ओह. श्र - मग तुम्ही लोक भारतातून तो वर आणा. म्हणजे प्राइम ने "ट्रेण्डिंग" सदरात दाखवला पाहिजे Happy

हा धागा गार्डन हेज मेझ झालेला आहे ऑलरेडी. >> हो हो. मी विचार केला जरा आधी एक पूर्ण बघू आणि मग इतर चेक करू.

जो मिळेल तो पिक्चर घ्यायचा. भेदभाव नाही करायचा. >> Happy पण कोण कोणत्या पिक्चर मधे काय करते याची संगती लागत नाही मग. आकाचे एक ठीक आहे. ती सगळ्या पिक्चर मधे साधारण तेच करते. पण बाकीची गडबड होते. जितेंद्र, रीना रॉय, रेखा आणि सुलक्षणा पंडित असलेले काही पिक्चर्स जर सतत जम्प करत पाहिले तर नक्की कोण त्याग करते, कोण मरते आणि कोण बाळाला कोणाकडे सोपवते याचा प्रचंड गोंधळ होईल - तसे काहीसे Happy

नायिकेने सफारी/सुट घातलेल्या व ॲटॅची घेतलेल्या वडलांना डॅडी म्हणणंही मस्ट होतं. आई मात्र ‘आई’च असायची डोक्यावर किंवा दोन्ही खांद्यावर पदर घेतलेली, ५० पैशाच्या नाण्याएवढं कुंकू लावलेली. ‘तुमच्या लाडामुळेच बिघडलीय ती’ म्हणणारी. चिरूट किंवा सिगार ओढणार्या वडलांचाही डॉयलॉग ठरलेला ‘मग आपण तिच्यासाठी एखादा राजकुमारच शोधू’ किंवा अमुक तमुक बिझनेसमनचा मुलगा कसा वाटतो तुला आपल्या बेबी/राणीसाठी? नेमकी यावेळी नायिका अगदी खाण्याचे वांधे असलेल्या घरातील स्कॉलर मुलाबरोबर बागेत नाहीतर गाण्याच्या स्पर्धेत/डिबेटमध्ये भाग घेत असायची.

^^^
Lol

गावाकडे गणपतीत नणंद भावजय हा सिनेमा मैदानात दाखवला होता.
यातला नायक ( बहुतेक रविराज) अँबॅसिडर कार मधून गाणं म्हणत घरी येतो. त्या वेळी मराठी हिरोंना चांगल्या कार्स देत नाहीत याचं वाईट वाटलं होतं. त्यातलं नायिकेचं घर हे मॉड दाखवायचं होतं. सुधीर दळवी नायिकेचे पप्पा सतत टी शर्ट मधे गार्डन मधे काम करत असतात, किंवा मग घरात सफारी घालून फिरत असतात.

लग्न लावून दिल्यावर घर भलतंच मॉड आहे हे दाखवण्यासाठी हनीमूनच्या रात्रीच्या सकाळी ( कार्यक्रम संपला = सकाळ झाली असे वाचावे) सगळे नाश्त्याला टेबलवर बसतात. मराठी चित्रपटात डायनिंग टेबल दिसणं हेच क्रांतीकारी असायचं. तर हे सुधीर दळवी पप्पा भलतेच रंगात येऊन मुलीला विचारतात " काय मग आमच्या जावई बापूंनी बँकेत खातं उघडलं कि नाही ?"

Lol
घाऊक अपमान करू नका लोकहो, चुनचुनके बदला घ्या.
#नाव व भागांना नंबर देऊन पिसं काढा. फा आणि श्र ( जमलं तर सगळेच) 'जावयाची जात' प्लीज.

तर हे सुधीर दळवी पप्पा भलतेच रंगात येऊन मुलीला विचारतात " काय मग आमच्या जावई बापूंनी बँकेत खातं उघडलं कि नाही ?" >>> Lol सिरीयसली? इव्हन इंग्रजी पिक्चर्स मधे असा संवाद क्वचितच दिसेल फॅमिली डायनिंग टेबलवर Happy

चिरूट किंवा सिगार ओढणार्या वडलांचाही डॉयलॉग ठरलेला ‘मग आपण तिच्यासाठी एखादा राजकुमारच शोधू’ किंवा अमुक तमुक बिझनेसमनचा मुलगा कसा वाटतो तुला आपल्या बेबी/राणीसाठी? >>> Lol परफेक्ट.

सिरीयसली? इव्हन इंग्रजी पिक्चर्स मधे असा संवाद क्वचितच दिसेल फॅमिली डायनिंग टेबलवर >>एक्झॅक्टली. संवाद लिहीणारा, दिग्दर्शक, निर्माता हे बालगंधर्वच्या समोर गंधर्व मधे एक चहा कटिंग पिणारे. ते कल्पनाशक्तीनेच मॉड घरात कसे बोलत असतील असा विचार करून सीन लिहीत असतील. बरं, प्रेक्षकांना पण मॉडर्न म्हणजे असेल पण बाबा असलं काही तरी म्हणून ते पटायचं.

ते कल्पनाशक्तीनेच मॉड घरात कसे बोलत असतील असा विचार करून सीन लिहीत असतील >> हो Happy म्हणजे मटा किंवा लोकसत्तेच्या "युवा स्पंदन" टाइप पुरवणीतील तरूणांची कल्पित मराठी Happy "फ्रेण्ड्स मी आज तुम्हाला माझ्या व्हेकेशनचा प्रोग्रॅम सांगणार आहे" ई.

एका तासात एवढे पोस्ट बघून चौकशीला आलो. ग्रुप वॉच करताय की काय?
धागाताई, कृपया धाग्याचं नाव बदलून 'मराठी चित्रपट - एक सामुदायिक रोस्ट' असं सर्वसमावेशक ठेवा. हा धागा आता आशा काळेंचं ऑर्बिट सोडून डीप स्पेसमध्ये घुसलाय.

जावयाची जात भारी पिक्चर आहे. मी २ वेळा पाहिलाय. कुठल्या पॉइंटला आहेस , अस्मि? Happy

हिट आई हॉट >>> भरत दादा, तुम्ही आईने अकबरीच्या मार्गाने चाललात बरं का Proud

आशा काळे आणि (सासू आणि नणंद बाईंनी) संपवलेले जेवण झालाय का विषय?????? म्हंजे हा पण फार टिपिकल सीन आहे त्या बऱ्याच सिनेमात.. आणि नंतर ह्या बाई पाणी पिऊन झोपतात. आणि पाणी पिऊन झालं की पदर मानेला लावून घाम पुसतात, आता पाणी पिऊन ह्यांना घाम का यावा? Proud

आईये पायस जी. आपकीही कमी थी Happy मात्र सुरूवात बंदिवान पासून कर. एकवेळ मार्व्हल्/डीसी/हॅपॉ कोणत्याही क्रमाने पाहिले तरी चालतील पण इथे नाही Happy

डन वेताळदादा. Happy
रमड, लावणीपर्यंत बघितला. Happy
आईये पायस जी. आपकीही कमी थी>>> +१
क्रम फार महत्त्वाचा आहे. Lol

हे प्रकरण 'भस्मासूर' होईल वाटलं नव्हतं.

अरे , ते बंदीवान मी या संसारी असे आर्त शीर्षक आणि आत मात्र धुडगूस हे काँबो डेंजर वाटत होतं.
दाखवताना मुलगी अलका कुबल दाखवायची आणि लग्नात आंतरपाटाच्या पलिकडे राखी सावंतला उभी करावी असं झालेलं.

@अस्मिता...."वेडा म्हणजे सपशेल नाही, 'धुंदीत -मस्तीत' जायला अक्षम. बायको-नयनतारा वेडी, विगो हा 'शुभमंगल सावधान' सिनेमातल्या चहात बुडवलेल्या बिस्किटासारखा, मग दुभाषींना 'विकी डोनर' करून आशा काळेंनी इप्सित साध्य केलं आहे. त्यामुळे वेडं कोण तर प्रेक्षक हेच उत्तर बरोबर आहे. आता मला सिनेमा न बघताही उद्धार करता यायला लागला आहे. Yey....
शाल व श्रीफळासाठी धन्यवाद. असं वारंवार झाल्यावर लोक कुठं नारळ शोधत फिरणार म्हणून मी माझ्या कुत्र्याचं नावच 'नारळ' ठेवलं आहे. Proud">>>>>>>

अशक्य लिहिलं आहे..रात्री १२ वाजता एकटीच वेड्यासारखी हसत होते हे वाचून...

आईये पायस जी. आपकीही कमी थी >> Lol
मी जखमी कुंकूचा विषय काढावा का या विचारात होतो पण क्रमाने जायचं म्हटल्यावर लावलाच बंदिवान एका बाजूला!
निफु आणि आकाचा लग्नाचा सीन हहपुवा आहे. अंतरपाट खाली घेतल्यानंतर दोघांची नजरानजर होते तेव्हा निफुला बघून आशेची कशी निराशा झाली हे ठसणे अभिप्रेत असावे. पण प्रत्यक्षात निफुच भूत बघितल्यासारखा दचकला आहे - हायला, आशा काळे!

संपवत आणलास की मग पिक्चर!

मुळात पच त्याच्याशी लग्न करायला तयारच कशाला होते ते काही नीट समजत नाही. इतक्या शिक्षणाचा उपयोग काय मग? Happy
आणि लग्न झाल्यावर एकदम गुळुमुळू डोक्यावर पदर लाजरी नवरी होते तिची दुसऱ्या दिवशी. तो तिला काहीही खाऊच देत नाही म्हणे २ दिवस. आणि उपाशी राहून तिला सूनत्वाची जाणीवबिणिव होते बहुधा. एकदम चूल फुंकणे सुरू! त्यानंतर थेट मुरकत वडाची पूजा. Full पारंपरिक, गाण्यासहित. ते गुरुजी तिला आंबा देतात तेव्हा निरंजन बाबा आणि काळभोर बाई आठवल्या Proud
पूजा केल्यावर लगेच ग्रेट नवरा मिळाल्याची खूण पटते काकूंना. नवरा घरी आल्यावर पापण्या झुकवून " काय हे किती उशीर " वगैरे. फक्त ४० मिनिटांत काय हो चमत्कार... आपलं... साक्षात्कार!
सासूकडे नवऱ्याची तक्रार करते पच. सासू सांगते सगळं काही तुझ्याच नावावर बँकेत ठेवलंय. मग डायरेक्ट ' चुकले मी सासूबाई '.
आता लावणीच्या पुढचं अस्मिता सांगेल Wink

संपवत आणलास की मग पिक्चर! >>> टोटली. आका विहिरीत पडते कशी व बाहेर येते कशी याचे संशोधन केलेस का? एकतर जुन्या स्टाइलची जंगी विहीर व पाचव्या पंचवार्षिक योजनेतून स्थानिक आमदाराच्या "संकल्पने"तून बांधलेली सरकारी कूपनलिका यांच्या मधल्या साइजची विहीर आहे. नेपथ्यवाल्याला त्या अंगणात बसेल इतकी लहान पाहिजे पण आका पडू शकेल इतकी मोठी पाहिजे अशा स्पेक्स वर विहीर उभी करावी लागली असावी. त्यात बाजूला रहाट आहे. त्यातून आत उडी मारायची ठरवली तरी कोठेतरी माणूस अडकेल असे असताना आका इतक्या सहज पडलीच कशी हा प्रश्न राहतोच.

शुरा.
पलिकडच्या मराठी धाग्यावर पण चक्कर टाका.

फा, माझ्याकडे प्राईम नसल्याने कोणी चाहत्याने इतरत्र कुठे आकाच्या या करामती अपलोड केल्यात का ते शोधत आहे अजून. तोवर माझ्या imagination ला कामाला लावते आहे Wink

सतीचं वाण घेतलेल्या सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं' >>> याला दाद द्यायचं राहून गेलं होतं Lol
श्र, हे cocktail झालं की सांगतेच इथे Wink

अरे हा धागा जोरदार पळतोय. शीर्षक बदलल्यामुळे अनधिकृत बांधकामे अधिकृत करतात तसा अनुभव आला. आता अवांतर होण्याचा धोका नाही.

हपा Lol

सतीचं वाण घेतलेल्या सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं' >>> Lol

बाय द वे - मी अजून त्या अंगाई टायटल साँग पर्यंत पोहोचलो नाही. पण एकाच वाक्यात ती "जगावेगळी अंगाई" गाते हे सांगते आणि पुन्हा विचारते की तिच्या पाडसाला/बाळाला झोप का येत नाही. त्या बाळाला प्रायोगिक तत्त्वावरच्या अंगायांची आवड निर्माण होण्याइतके ते अजून मोठे झालेले नाही. नॉर्मल अंगाई गायिली तर झोपेल एखादेवेळेस. इतक्या लौकर जगावेगळी अंगाई झेलण्याइतके तयार नसेल ते. उद्या उपशीर्षकातून आपल्याला शिकवणारे मराठी पिक्चर लावाल.

जगावेगळी अंगाई Lol

हायला! हायवेमध्ये हुमा कुरेशी आहे हे लक्षातच नव्हतं माझ्या!! बरेच दिवस झाले हा पिक्चर बघून. रिव्हिजन करायला पाहिजे.

घाऊक अपमान करू नका लोकहो, चुनचुनके बदला घ्या. >> Lol

जुन्या स्टाइलची जंगी विहीर व पाचव्या पंचवार्षिक योजनेतून स्थानिक आमदाराच्या "संकल्पने"तून बांधलेली सरकारी कूपनलिका यांच्या मधल्या साइजची विहीर आहे. नेपथ्यवाल्याला त्या अंगणात बसेल इतकी लहान पाहिजे पण आका पडू शकेल इतकी मोठी पाहिजे अशा स्पेक्स वर विहीर उभी करावी लागली असावी >> Lol

फ्रेण्ड्स मी आज तुम्हाला माझ्या व्हेकेशनचा प्रोग्रॅम सांगणार आहे >> Lol

एखादा प्रतिसाद मिस झाला कि पुढे टोटल लागत नही. मध्यंतरी बरंच मिस झालंय. Happy

Pages

Back to top