सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे. Happy
हळुवार स्पर्शाला बरेच वेगळे आयाम आले आहेत.

फा Biggrin

हळुवार स्पर्शाला बरेच वेगळे आयाम आले आहेत. >>>> अगदी .

पण उकि जेव्हा त्याला पदराखाली घेते तेव्हा तिथूनसुद्धा त्याला खेचून काढतात. आता ही म्हातारी काय कुदरत का करिश्मा दाखवते या विचाराने मी धास्तावलो, पण सुदैवाने त्यांनी त्याच्या तोंडात बाटली दिली आणि मी सुस्कारा सोडला. >>>>>>>>>>> जाम हसले . लिट्ररीली इमॅजिन केले .

मोलकरणीच्या अस्तित्वामागे असं काही कारण असेल तर शक्य आहे
>>>> बघितलाय मी हा टॉर्चर बालपणी. दूरदर्शन कृपेने बहुतेक. त्यावेळी कित्ती गं बाई वाईट त्या राधिकाचं नशीब आणि कस्सा तो दुष्ट ऋषी कपूर वगैरे वाटलेलं.
ऋषी कपूर मात्र बेस्ट. टुकारेस्ट चित्रपटात पण पाट्या नाही टाकल्या त्याने…
मायबोलीवरच्या लिजंडसना आवाहन आहे, हा पण बघा व रिव्ह्यू लिहा.

मायबोलीवरच्या लिजंडसना आवाहन आहे >>>.या धाग्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चित्रपटांचा जो उल्लेख आला आहे त्यांचे कृपया पिसे काढून आम्हाला वाचनाचा आनंद द्यावा

पण उकि जेव्हा त्याला पदराखाली घेते तेव्हा तिथूनसुद्धा त्याला खेचून काढतात. आता ही म्हातारी काय कुदरत का करिश्मा दाखवते या विचाराने मी धास्तावलो, पण सुदैवाने त्यांनी त्याच्या तोंडात बाटली दिली आणि मी सुस्कारा सोडला. >>हा पिक्चर मी बघितलाय त्यामुळे एकदम डोळ्यासमोर आला सीन. मी ही खुप हसले हे वाचून.

>>>>>>>>>हळुवार स्पर्शाला बरेच वेगळे आयाम आले आहेत.
होय उघड्या अंगाला कारण आंघोळीनंतर जस्ट. ते ही विसरु नका Wink

>>>>>>>>जाम हसले . लिट्ररीली इमॅजिन केले . पण सुदैवाने त्यांनी त्याच्या तोंडात बाटली दिली आणि मी सुस्कारा सोडला.
मी ही खूप हसले Happy

'बाळा गाऊ कशी अंगाई' कुठं बघितला तुम्ही? मी यूट्यूब वर सर्च केलं तर अक्षयचं 'बाला हो बाला शैतान का सा#' येत आहे. सध्या तरी तेच बघितलं. प्राईमवर रेंटला बालगणेशच्या कपाटात ठेवले आहे. आता काय ट्रेलरची पिसं काढू का ?

म्हणून 'अरे मनमोहना' व 'धुंदीत मस्तीत' गाणी बघितली एकदाची. कोल्हापूरच्या पुढचं तिकीट सुद्धा न काढलेल्या मराठी सिनेमातल्या हिरोहिरवणीला 'कश्मीर की वादियोंमें' हनिमून करताना बघून डोळ्यात टचकन पाणी आलं. भावविवश होवून मी सुद्धा आशीर्वाद दिले 'नांदा धुंदीतमस्तीत सौख्य भरे'.
सगळी निरीक्षणं पर्फेक्ट आहेत.

धाग्यावेताळ जबरीच. Lol
अनु, स्वस्ती, माझेमन आणि फा व श्रद्धा धमाल लिहिले आहे.

बाळा गाऊ नाहीये पण उषा किरण चा बाळा जो जो रे आहे यु ट्युब वर . स्टोरी सेम आहे साधारण ... आईचं भूत ही ...

धन्यवाद ममो.

मी 'जावयाची जात' सुरू केला आहे.
कुलदीप पवार, पद्मा चव्हाण, सरला येवलेकर, तिचा हिरो, धुमाळ, रीमा लागू (चक्क रॅन्डम मैत्रीण)

जावयाची जात #१
पच आणि सये बहिणी आहेत पण पच मॉडर्न आणि उघड्या कारमध्ये स्लिवलेस घालून मैत्रिणींसोबत पिकनिकला जाते जणू ज्वेलथिफची तनुजाच. कॉलेजमध्ये फर्स्टक्लास फर्स्ट येते व आनंद नावाच्या सयेच्या हिरोला जेमतेम पास झाल्यानंतर हिणवते. तुम्ही पुरुष कसे अडाणी वगैरे. त्याकाळी कॉलेजमध्ये जाणारी मुलं नापास होतहोत पुरुष व्हायची. तर तो पुरुष-हिरो म्हणतो 'तुम्ही बायका कितीही शिकलात तरी तुम्हाला तर चूल आणि मूल हेच करायचं आहे. त्यामुळे आम्ही फार शिकलो नाही तरी आपोआपच वरचढ ठरतो'. सगळ्यांचेच विचार 'महान' आहेत.

सरला येवलेकर ही धुमाळची धाकटी लेक , ही शालीन आहे व पद्मा अक्कांपुढे 'हे काही बरोबर नाही ताई' असं म्हणत असते. बाईच्या जातीने कसं असावं हे हिला माहिती आहे म्हणून ही कॉलेजात नऊवारी साडी घालून जाते. अक्का सोबत "मैं चली मैं चली देखो प्यार की गली" करत पिकनिकला जात नाही ,कॉलेजच्या मागेच प्रियकराला भेटत असते व परिक्षेत नापास होते. मग आनंदा हिला म्हणतो 'तूच माझ्या दिलाची राणी बयो, बरं झालं नापास झालीस . आता आपण लगीन करू. तुझ्या ताईसारखी पास झाली असतीस तर मी लगीन कुणाशी करणार, न्हायका?'!!!

अजून नाट्यमय प्रसंग पेरण्यासाठी पद्माक्कांना हिरो म्हणून कुलदीप हा रांगडा-खेडवळ गडी वगैरे दिला आहे. पण पद्माक्कांपुढे कुणीही रांगडे आले तरी काय 'हुमा कुरेशीची मावशी' टाईप ह्यांची देहबोली आहे. मला दांडग्या मुली आवडतात लोकहो.

पिकनिकला जाताना अर्थात कारचं इंजिन खराब होऊन कार बंद पडते. मग पाचच मिनिटांपूर्वी तिथे मोठ्याने केलेली नारेबाजी (नवरेशाही मुर्दाबाद, बायकोशाही जिंदाबाद) हे साफ विसरतात. समोरून फेटेवाला कुलदीप पवार बैलगाडीतून येत असतो तो हिला मदत करतो. ही आधी म्हणते, 'जो ही गाडी दुरुस्त करुन देईल. मी त्याला काही तरी देईन'. असं संदिग्ध बोलू नये कधीही, त्याने समोरच्या माणसाला चावट गोष्टी मागायला वाव मिळतो. गाडी दुरुस्त झाली की 'तो तुझ्या वठाची लाली वगैरे दे' की म्हणतो. आली का पंचाईत... ! पर्समधलं लिपस्टिक काढून द्यायचं तिला सुचत नाही. नुसतं फर्स्टक्लास फर्स्ट येऊन उपयोग नाही. चंटपणा असायला हवा नाही तर .... असो. तो तिचा हात पिरगाळतो , पण तिला विशेष यातना होत नाहीत. हे दृष्य पाहून 'निक्कर और टीसर्ट पहनके आया सायकलोन हां निक्कर और टीसर्ट पहनके आया सायकलोन....' आठवून कुठं 'दंगल' सुरू होते की काय वाटलं. पण हाय रे माझ्या कर्मा, हिरविन कितीही बलवान असली तरी तिला डायरेक्टरच्या रस्त्यावरुन जावं लागतं.

‘उन्हात चांदणं पडलं गं’ हे गाणं यातच आहे ना? कुलदीप पवार हॅंडसम दिसतो आणि शेवटी पद्मा चव्हाणचं नववारीतल्या भारतिय नारीत ट्रान्सफॉर्मेशन झाल्यावर तीही चांगली (म्हणजे धट्टी कट्टी कर्तबगार बाई) दिसते. स्लीवलेसमधली रिमाही आठवतेय. पण तिला काय फारसा स्कोप नाही.

फुलपाखरं आली सहलीवर ते गाणं यातच आहे का ?

आणि प्राण गेला तरी प्राण ला आणणारच एव्हढा पंच मारण्यासाठी पंधरा मिनिटांचा गॅदरिंगचा तमाशा, पिकनिक.

त्या वेळच्या मराठी चित्रपटातली पिकनिक ठरलेली असायची. मागच्याच आठवड्यात तमाशाच्या फडावर नाचत असलेल्या मुली यात बेलबॉटम घातलेल्या असत. त्याच्यावर केसात पिना खोवून मानेच्या खाली सुतळीने बांधून तो प्रकार सोडून दिलेला असायचा. बेलबॉटम मधे प्यांटीचा बॉटम मोठा, पण वर फ्रॉक सारखा काही तरी प्रकार, ज्याला शर्ट म्हणणे जिवावर आलेले.

पोरं म्हणजे जन्मतःच चाळिशीच्या पुढची दिसायला असलेली. त्यात जाड भिवया , दात पुढे आलेले. त्यातला एखादा दात दाखवत हसत उजव्या हाताची तर्जनी अंगठ्याला जोडत, एक नंबरची खूण करत हिरोला दाद देत असणार. बाकिच्यांच्या केसांचा लाटालाटावाला उमेश भेंडे कट. त्यावर मुंबईला फूटपाथवर मिळालेले स्वस्तातले मोठ्या फ्रेम्सचे गॉगल्स !

आणि गाणं बनवताना संगीतकाराचा घाम निघालेला. तो आणि गीतकार आयुष्यात कधी कॉलेजच्या सहलीला न गेलेले. त्यामुळं सहलीला कसलं गाणं म्हणतात इथपासून सुरूवात असायची.

हे गाणं पाहताना याच चित्रपटातलं सरला येवलेकरचं गाणं दिसलं. तिचा बॉयफ्रेंड रविराज आहे. दोस्त असावा तर असा , जावई विकत घेणे आहे आणि hold your breath अचानकमधला विनोद खन्नाच्या बायकोचा प्रियकर. आणि माझी आठवण दगा देत नसेल तर मराठीतल्या हिट आई हॉट नाटकांचा हिरो.
या सिनेमासाठी हिंदी चित्रपटांचा कपडेपट उचलून आणलेला दिसतो. त्या गाण्यात रविराजने राजेश खन्नाचा गुरुशर्ट आणि देवळातल्या प्रचंड घटेवरून बेतलेली बेल बॉटम घातलेत.

पाहिलं गाणं.
सौंदर्याचा अ‍ॅटमबाँब असं वर्णन व्हायचं पच चं. यात ती बाऊन्सर दिसतेय.
नयन भडभडे छान.

ती कार कुलदीप पवारच्या पिताश्रींची आहे. कोल्हापूरला शूटींग ला आलेले निर्माते त्यांच्याशी संपर्क करायचे. मग त्यांच्याकडच्या आलिशान कार्स शूटींगसाठी मोफत मिळायच्या, शिवाय राहण्याची व्यवस्था पण व्हायची. त्या बदल्यात एखादा छोटा रोल मिळायचा.

मी 'जावयाची जात' सुरू केला आहे.>>>> बघितलाय हा खूप आधी.. अस्मिता प्रतिसाद Lol वाचून आठवले सगळे सिन्स.

सहलीला कसलं गाणं म्हणतात >>>
मुळात सहलीला गाणं कोण म्हणतं? भेंड्या होतात, एखाद्या चांगल्या गाणार्या-रीला आग्रह होऊन एखाद गाणं ऐकवलं जातं. पण समुहगीत?

पण नायिका बडे बाप की बेटी आहे हे दाखवण्यासाठी तिने कारने पिकनिकला जाणं आणि गाणं मस्ट होतं. आणि नायिका एकटीच श्रीमंत बरं का! मैत्रिणी साध्यासुध्या घरातल्या. त्यामुळे त्या ऐपतीप्रमाणे बेलबॉटम, पंजाबी ड्रेस किंवा साडीत असायच्या. त्या मव किंवा गरीब असल्याने मॉरल हाय ग्राउंडवर असायच्याच. प्रसंगी नायिकेला चार शब्द सुनवून योग्य मार्गावरही आणायच्या.
आणि मित्रांसोबत पिकनिक असेल तर नायकाच्या मित्रांकडे स्कुटर पाहिजेच.

>>>>>>>>त्या मव किंवा गरीब असल्याने मॉरल हाय ग्राउंडवर असायच्याच.
Lol Lol त्या लाडाने बिघडलेल्या नसणार.

अरे लोकहो तुम्ही ऑलरेडी पुढच्या पिक्चरवर? अंगाई पिक्चरचे १-२ भागच दिसत आहेत यू ट्यूबवर. तुम्ही कोठे पाहात आहात?

https://youtu.be/sFexWxRQ6PY?si=uJzOyF0lVoAwFHFw नसीब अपना अपना >>> इथे अवांतर होईल पण तिची वेणी काय आहे ते कसले खतरनाक आहे? गर्रकन वळाली तर टी-रेक्स च्या शेपटीने उडवल्यासारखा बाजूचा माणूस फेकला जाईल.

आणि नायिका एकटीच श्रीमंत बरं का! मैत्रिणी साध्यासुध्या घरातल्या. त्यामुळे त्या ऐपतीप्रमाणे बेलबॉटम, पंजाबी ड्रेस किंवा साडीत असायच्या. त्या मव किंवा गरीब असल्याने मॉरल हाय ग्राउंडवर असायच्याच. प्रसंगी नायिकेला चार शब्द सुनवून योग्य मार्गावरही आणायच्या.
आणि मित्रांसोबत पिकनिक असेल तर नायकाच्या मित्रांकडे स्कुटर पाहिजेच. >>> अचूक निरीक्षण.

नाही आचार्य हे गाणं नाही त्यात. निरीक्षणं चपखल. Lol
वर झबलं आणि खाली पायघोळ पलाझो. सगळ्यात वैताग म्हणजे शर्टाची बटणं फक्त शेवटची दोन लावलीत.

नाही हे गाणं अजून तरी आलं नाही माझेमन. Lol

फा, 'अनकंडिशनल भक्ती' करायला हवी. असं अडून बसून कसं चालेल. जो मिळेल तो पिक्चर घ्यायचा. भेदभाव नाही करायचा. Lol

तिचा बॉयफ्रेंड रविराज आहे >>>> ओके. मला हे माहीत नव्हते.

Pages