अंमली! - भाग २०!

Submitted by अज्ञातवासी on 11 August, 2023 - 08:17

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83832

"जेव्हा तुम्ही तिच्या इतके जवळ होतात, मग दूर जायची गरज का?"
"कारण मी स्वतः वरच नियंत्रण गमावत होतो."
"म्हणजे?"
"म्हणजे असं...की....कसं सांगू?"
"तुमचं नाव ना, नक्की सुवर्णाक्षरात लिहिलं पाहिजे. खरच सांगतेय."
"आय नो. आय नो."
"नो रिजन?"
"शरा इज द रिजन..."
"... म्हणजे?"
"भीती वाटतेय. पुन्हा त्याच चुका होण्याची. पुन्हा तोच वेडेपणा होण्याची, पुन्हा स्वता:वरच नियंत्रण गमावण्याची. आणि यावेळी ती चूक केली ना, आयुष्यभर जळत राहीन... खरच सांगतोय..."
"सर एक सांगू?"
"बोल ना."
"तुमच्याकडे सगळं आहे, सगळं. सगळं. जगातली कुठलीही मुलगी तुमच्या प्रेमात पडेन. पण का, तीच का? सतत ही बेचैनी, सतत तेच ते विचार. तुम्हाला शांतता लाभते का कधी?"
तो हसला.
"ती असली ना समोर, असं वाटतं एखाद्या देवालयात सुंदर मूर्तीसमोर बसलोय, आणि शांतपणे तिच्याकडे बघतोय. माझी शांतता तिच्यात आहे साक्षी."
"...नो कॉमेंटस. आणि ऐका, तुम्ही काही लिहिणार असाल तर मलाही द्या वाचायला. लेखक महोदय."
"नक्कीच."
"बाय सर." ती हसून म्हणाली.
"बाय साक्षी." तो म्हणाला.
******
दुसऱ्या दिवशी तो स्क्रीनरायटींगच्या सेशनला हजर झाला.
...इथे तुरळक मुली होत्या. बाकी सगळी मुले होती. मुले काय, माणसे होती.
"यार, किती बोर होतय," त्याने विचार केला.
डान्सच्या क्लासला किती प्रसन्न वाटायचं. "तूच मूर्खपणा केलास. भोग कर्माची फळे.
तुझा कंट्रोल राहिला असता का, ती पळून गेली असती तुझा वेडेपणा बघून. तू कालच तिला आय लव यू प्राजू, मी जगू शकणार नाही तुझ्याविना, असं म्हणता म्हणता थांबलास."
तो विचारात गढलेलाच होता, तेवढ्यात एक तरुणी आत आली...
"...तू...." त्याला बघून ती ओरडलीच.
त्याचं अचानक लक्ष गेलं.
"यार, नॉट यू..." तो आश्चर्याने उठलाच.
"आय एम टीचर हीयर."
"सिरीयसली?"
लोक आळीपाळीने दोघांकडे बघत होते.
...स्नेहल...
इंजिनियरिंगची सेकंड टॉपर.
जर शरा आणि मनिषची जोडी संपूर्ण कॉलेजमध्ये फेमस असेल...
.... तर स्नेहलचं त्याच्यावर असलेलं प्रेम सगळ्या कॉलेजला माहिती होतं.
स्नेहल स्नेहल नव्हती. स्नेहल अख्या कॉलेजची डॉन होती...
मनिषला अचानक तिला तिचा जुना लूक आठवला.
खांद्याच्या अगदी वर आणि कानाच्या जस्ट खाली कापलेले केस. बाकदार नाक...मोठे डोळे, कमीत कमी पावणेसहा फूट उंची, जाड नाही, पण भक्कम म्हणावा असा बांधा.
कायम शर्ट आणि जीन्सवर असणारी, बाह्या दुमडून फिरणारी...
कधीही मेकप न करणारी.
...जिममध्ये तास आणि तास धावणारी, आणि मुलांच्या बरोबरीने वजन उचलणारी...
जेव्हा मनीष स्टेट लेव्हलला बॉक्सिंगला सेलेक्ट झाला होता, तेव्हा स्नेहल नॅशनल लेव्हलला खेळत होती...
...आणि आज ती त्याच्या समोर होती. अगदी तशीच. काहीही फरक पडला नव्हता.
म्हणायला थोडासा मेकप आला होता, आणि एक हलकीशी लिपस्टिक.
'सगळं जग घे माझं शरा, मला तुझा मनू दे फक्त...' तिने सगळ्यांसमोर केलेली मागणी.
'माझं सगळं जग घे तू, माझा मनू मला राहू दे. आणि बघ, तुझ्याकडून सगळं जग तो जिंकून आणेल.' शराचं उत्तर.
दोघीजणी अक्षरशः जानी दुश्मन म्हणून प्रसिद्ध होत्या.
आणि त्यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मनीष शराचा प्रियकर आणि सगळ्यात जवळचा मित्र असूनही स्नेहलला वेळोवेळी मदत करत असायचा.
शरा त्याच्यावर कित्येकदा चिडली असेल, पण तो हसून वेळ मारून न्यायचा. किंवा शांत रहायचा.
आणि एकदा ती अति चिडल्यावर त्याने दिलेलं स्पष्टीकरण त्याला अजूनही आठवत होतं.
"हे बघ शरा, प्रेम तर मी फक्त तुझ्यावर करू शकतो, आणि करत राहीन. नाही करू शकत मी प्रेम कुणा दुसऱ्यावर...पण मी तिचा आदर करतो. शी इज वन ऑफ द मोस्ट स्ट्राँगेस्ट वूमन आय एवर सीन. जर प्रेम मिळणार नाहीये, तरीही ती करत असेल ना, तर तिला प्रेम नाही तर कमीत कमी आदर मी देऊच शकतो."
त्यानंतर शराने तो विषय काढला नव्हता.
स्नेहल तिच्याच जगातली महाराणी होती, तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलांचीही संख्या कमी नव्हती. पण ते सांगायची कुणाची हिंमत नव्हती.
...मात्र या अशा स्नेहलचा एक हळूवार कोपरादेखील होता...
एक असा कोपरा, जो फक्त मनिषला माहिती होता.
ती लिहायची. खूप लिहायची, भरभरून लिहायची.
अगदी अगदी जीव टाकावा अशी लिहायची.
...त्या दोघांचं नातंच अजब होतं. एक प्रोफेशनल मैत्री. एक आदराची भावना.
एकदा शांतपणे तिला दोन तास ऐकून तो म्हणाला,
"इतकं बोर कुणी असूच कसं शकतं?" आणि खळखळून हसायला लागला.
तेव्हा तिच्या डोळ्यात आलेलं पाणी तो बघू शकला नव्हता.
...त्याच्या आयुष्यात तेव्हा फक्त शरा होती.
...आणि आज प्राजक्तावर शरा पेक्षाही जास्त प्रेम करताना, ती पुन्हा त्याच्यासमोर आली होती.
मनिष शांतपणे जागेवर बसला.
तीही रिलॅक्स झाली.
"ओके... सगळ्यांनी लक्ष द्या." तिने बोलायला सुरुवात केली.
मात्र ना तिचं शिकवण्यात लक्ष होतं, ना त्याचं ऐकण्यात...
...बेल होताच तो पळाला. थियेटरकडे.
आज प्राजक्ता लांब बसली होती.
तो तिच्याकडे बघून हसला...
...ती उठली, आणि त्याच्या जवळ आली.
"मनू..."
"आईशपथ." त्याच्या छातीत एक कळ आली.
"माझ्या मुलाला मी कधीकधी मनूच म्हणते."
क्षणार्धात तो जमिनीवर आला.
"तर मनूशेठ, काही लिहिलं की नाही..."
"... अगं आज पहिला दिवस. काय लिहू?"
"लिहायला काही दिवस लागतो होय? आणि कुणी चांगली मुलगी सापडली का नाही? की इकडेच मुक्काम?"
"मी तर फक्त तुझ्यासाठी येतो, प्राजक्ता."
"पुरे. अजून काय विशेष."
"माझी एक जुनी मैत्रीणच तिथे टीचर आहे."
"काय?"
"हो..."
"म्हणजे तुझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणी परत येण्याचा सीजन आलाय का?" ती म्हणाली.
"माहिती नाही. आता तू आलीस, तशी तिही आली."
"तू वेडा आहेस का? काहीही बोलत राहतोस."
"तू पहिल्यांदा मला दिसलीस, त्या काचेच्या देवीच्या मंदिरात प्राजक्ता. दुसऱ्यांदा राम मंदिरात दिसलीस. मगच आलीस ना?"
"राम माझा जीव आहे मनिष, राम माझा प्राण आहे. जितका जीव माझा माझ्या नवऱ्यावर आहे ना, तितकाच रामावर."
"आणि माझा जितका जीव तुझ्यावर आहे ना, तितका कुणावरही नाही." तो पुटपुटला.
"काय?"
"काही नाही. अशीच बडबड."
"ठीक आहे. चल मी येते... उद्या जमलं ते काहीतरी लिही. मला वाचायला खूप आवडतं."
"नक्की लिहीन." तो हसला.
ती निघाली. तो उठला.
त्याला मागून कुणीतरी बघत असल्याची जाणीव झाली.
स्नेहल तिथे उभी होती.
...त्याने इकडे तिकडे बघितले, आणि तो चुळबुळ करत उभा राहिला.
ती त्याच्या जवळ येऊ लागली.
"कसा आहेस?"
पाच रुपये सुट्टे द्या, मध्ये जितका जिव्हाळा असतो, तितक्या जिव्हाळ्याने तिने हा प्रश्न विचारला.
"मस्त मजेत." तो म्हणाला.
थोडावेळ कुणी काहीही बोललं नाही.
"तू जिवंत आहेस हे बघून छान वाटलं." ती म्हणाली.
हा खास स्नेहल टच होता... स्नेहल पंच...
...तो हसला. खळखळून हसला.
ती तोपर्यंत निघूनही गेली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users