सॉरी काका, यु आर नॉट वेलकम !

Submitted by छन्दिफन्दि on 3 August, 2023 - 23:44

सॉरी काका, यु आर नॉट वेलकम!
संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ. ती आणि निशा खाली गप्पा मारत उभ्या होत्या. समोरून शेजारच्या बिल्डिंग मधले काका आले. त्यांनी हटकले, "अग, तुला हवं होत ना ते पुस्तक आणलंय. चल येतेस का ? घेऊन जा."
"पुस्तक ???" तेवढ्यात तिला आठवलं की तिला शाळेच्या गॅदरिन्ग मध्ये एक नाट्य उतारा करायचा होता आणि तिने मागच्या आठवड्यात काकूंच्या कानावर घातलेलं की तुमच्या लायब्ररीत मिळालं तर बघाल का म्हणून.
"निशा, चल पट्कन आणूयात ."
"नाही ग मला चिक्कार होम वर्क आहे , मी जाते घरी तू आण जाऊन."
काकांच्या मागोमाग ती गेली. दुसऱ्या मजल्यावरच्या त्यांच्या ब्लॉकच कुलूप उघडून त्यांनी दिवा लावला. तिला बसायला सांगितलं. समोरच कपाट उघडून दोन चॉकलेट तिच्या हातावर टेकवली.
तिनेही "उगाच कशाला ? नको नको" म्हणत पट्कन खिशात टाकली .
"काका, पुस्तक ?"
"अरे हो! थांब हा जरा बघतो काकूंनी कुठे ठेवलय ते ." म्हणत काका आतल्या खोलीत गेले.
दोन मिनिटात हिची चुळबुळ सुरु झाली, पुस्तक मिळालय म्हणून काकांनी आपल्याला न्यायला वर बोलावले आणि आता स्वतः आत जाऊन काय पुस्तक शोधतायत. पण मग काकू असतानाच बोलवायचं ना , म्हणजे शोधावं नसत लागलं.. हा विचार करत असतानाचं काका बाहेर आले तिच्या जवळ जाऊन काही सांगणार तोच बेल वाजली.
डोक्याला आठ्या पाडतच काकांनी दार उघडलं, दारात काकूंना बघून चमकले. आणि तिला घरात बघून काकूंच्या कपाळावर आठी.
"अग ती कुठलंसं पुस्तक मागायला आलेली... " काकांचं वाक्य पूर न करू देता काकूंनी "उद्या घरी पाठवते " सांगत तिची लगेच बोळवण केली.
आणि ती, नक्की पुस्तक आणलय की नाही ह्या स्म्भ्रमात तिकडून सटकली.
***
कॉलेज मधून संध्याकाळी ती परतत होती.
नेहेमीचा रस्ता. पाठीवरच्या ओझ्याची तमा न बाळगता मस्त दुडक्या चालीने चाललेली स्वतःच्याच नादात!
तेव्हढ्यात समोरून एक काका आले. काका तिच्याकडेच बघत चाललेले. तिचं लक्ष जाताच ते तिच्याकडे बघून हसले. तशी ती ही हसली. न जाणो बाबांचे एखादे मित्र असावेत. किंवा आजूबाजूला राहणाऱ्या पैकी कोणी असतील. नाही हसल तर उगाच आगाऊ म्हणायचे. थोडी पुढे आली तस जाणवलं पण काही दिवसांपूर्वी दुसरे एक काका असेच हस्लेले, ओह गेल्या काही महिन्यांत असं चार पाच वेळा तरी झालंय. ते सगळे नक्कीच ओळखीचे, आजूबाजूचे किंवा बाबांचे मित्र नव्हते. आता तिची ट्युब पेटली. अरे हे काका कसले? वरून सभ्य भासणारे हे काका त्यांच्या पेक्षा अर्ध्याहून कमी वयाच्या मुलीशी flirt करू बघत होते.
***
ओळखीचे अस नाही म्हणता येणार कारण ती त्यांच्याशी प्रत्यक्षात कधी बोलली नव्हती, पण नात्यातल्या नात्यात होते ते. कधी वर्षाकाठी एखाद वेळी कार्यात दिसायचे. त्यांची fb वर फ्रेंड रिक्वेस्ट आली. तशी तर ती अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट सरळ decline करायची किंवा दुर्लक्ष करायचं. दूरचे का होईना पण नात्यात असल्यामुळे तिने ती स्वीकारली.
बऱ्याच महिन्यांनी ती, नवरा, मुलगी छान मस्त टूर करून आले. इतके सुंदर डोंगर, गर्द झाडी , निळे भोर आकाश , सोनेरी कोवळी उन्हे. फोटो चा क्लीकक्लीकाट नाही झाला तरच नवल ! 'शास्त्र असत ते' म्हणत लगेच ते FB वर अपलोड झाले, त्यातल्या त्यात छान फोटो प्रोफाइलला लागला.
अचानक दोन दिवसांनी काकांचा FB वर private मेसेज. उगाच सलगी दाखवणारा, वाढवणारा. साहजिकच ती चक्रावली. अरे आपण समोरासमोर कधी बोललो नाही आणि हे सद्गृहस्थ उगाच असे मेसेज का करतायत. बर पब्लिकली फोटोना like करा, कंमेंट करा. सहाजिकच तिने उत्तर दिले नाही. शहाण्याला त्यावरून कळले असते पण काका कसले अजून दोन मेसेज अजून सलगी दाखवणारे.
काका काका म्हणता हा फारच इरसाल निघालाय हे तिला कळून चुकले. दुर्लक्ष हा एकाच पर्याय हातात होता तिच्याकडे.
काहीच दिवसांनी परत एका समारंभाला काका हजर, आपण त्या गावचेच नाही असं दाखवत हसत खिदळत. इकडे त्यांच्या बायको मुलांकडे बघताना हिलाच कानकोंडल्यासारखं व्हायला लागलं. इतकी सोज्वळ बायको, तरणी ताठी सुंदर मुलगी, तरुण मुलगा असणारा हा माणूस इतका फालतूपणा करत असेल याची त्या माउलीला सूतराम कल्पना नाही.
काही दिवसांनी अजून एका ओळखीतल्या ओळखीच्या काकांची friend request आली, ह्यावेळी अनुभवातून शहाण्या झालेल्या तिने ती सरळ इग्नोर केली मनातल्या मनात म्हणाली "सॉरी काका, यु आर नॉट वेलकम !"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे अनुभव नसणारी मुलगी सापडणे अवघड.
यावर एका मर्यादेपलीकडे आळा घालणं देखील अवघड.
एक पुरुष म्हणून आपण कोणाच्या अनुभवाचा भाग बनू नये इतकेच करू शकतो असे वाटते.

यावर एका मर्यादेपलीकडे आळा घालणं देखील अवघड.
एक पुरुष म्हणून आपण कोणाच्या अनुभवाचा भाग बनू नये इतकेच करू शकतो असे वाटते>>≥ असा विचार जास्तीत जास्त लोकांनी केला तर कदाचित आळा घालणं शक्य!

हाहाहा.
लिहीत नाही कारण पुढे काका कॉमेंट्स नको हे धागे येणार आहेत.

या प्रकारचे काका आदीम काळापासून असावेत. अलीकडे यांचं प्रमाण वाढल्यासारखं वाटतंय.

या प्रकारचे काका आदीम काळापासून असावेत. अलीकडे यांचं प्रमाण वाढल्यासारखं वाटतंय>>> आता वेगवेगळ्या आयडी आडून तीर मारता येतात ना! आणि पूर्वी गोष्टी दडपून ताजण्याकडे कल होता, त्यामुळे त्याची विशेष चर्चा होत नसे. म्हणूनही ह्या गोष्टी विशेष होत नव्हत्या असे आपल्याला वाटते.

प्रेमाला वय नसते हेच ते...

Submitted by च्रप्स on 9 August, 2023 - 23:0>>>>

प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेऊ नये, आणि त्याला फाटे फोडू नयेत ही एक छोटी अपेक्षा.

सिरियसली सांगा मग-
रस्त्यात चालताना क्रॉस केले तेंव्हा स्माईल करणे म्हणजे फ्लर्टींग असते ??

Dilip Kumar and Saira Banu (22 Years), Dharmendra and Hema Malini (13 Years), Rajesh Khanna and Dimple Kapadia (16 Years), Kabir Bedi and Parveen Dusanj (29 Years)

असले काका, मामा, आजोबा बरेच पाहिले. काही अनुभवलेत सुद्धा.
आता काही नाठाळ लोकांना पडतीलच प्रश्ण, सगळेच कसे अनुभव येतात तुम्हाला? तर त्याचे उत्तर हेच की अश्याच त्यांच्यासारख्यांची भरती असेल तर काय करणार. मायबोलीवरच बरेच आढळलेत असे. Wink

असले काका, मामा, आजोबा बरेच पाहिले. काही अनुभवलेत सुद्धा.
आता काही नाठाळ लोकांना पडतीलच प्रश्ण, सगळेच कसे अनुभव येतात तुम्हाला? तर त्याचे उत्तर हेच की अश्याच त्यांच्यासारख्यांची भरती असेल तर काय करणार. मायबोलीवरच बरेच आढळलेत असे. Wink

नवीन Submitted by झंपी on 11 August, 2023 - 19:27>>>>> Proud Proud Proud
काय बोललयत. सौ टके की बात!

प्रेमाला वय नसते हेच ते... << काकांच प्रेम होतं, अस का??
Submitted by अदिति on 11 August, 2023 - 14:31 >>>> Bw

काकांचं काकांच्या मुलीवर प्रेम होते
Submitted by अज्ञानी on 11 August, 2023 - 14:56

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
क्रिपी काकांचं आणि मिलिंद सोमणचं सेम असतं
Submitted by मोरोबा on 11 August, 2023 - 15:07

Dilip Kumar and Saira Banu (22 Years), Dharmendra and Hema Malini (13 Years), Rajesh Khanna and Dimple Kapadia (16 Years), Kabir Bedi and Parveen Dusanj (29 Years)
Submitted by च्रप्स on 11 August, 2023 - 15:42

>>>> वेड पान्घरून पेडगावला जाणे ह्यालाच म्हणत असावेत!

सिरियसली सांगा मग-
रस्त्यात चालताना क्रॉस केले तेंव्हा स्माईल करणे म्हणजे फ्लर्टींग असते ??
,
Submitted by च्रप्स on 11 August, 2023 - 13:44>>> कोण, कधी, कोणाला, कुठे, कुठल्यावेळी बघून हसले आणि मुख्य म्हणजे जिच्या/ज्याच्याकडे बघून हसले त्या व्यक्तीच्या मतावर ते ठरते.

mutual consent vs imposing something

वाचाल तर वाचाल!

तेव्हढ्यात समोरून एक काका आले. काका तिच्याकडेच बघत चाललेले. तिचं लक्ष जाताच ते तिच्याकडे बघून हसले. तशी ती ही हसली.
>>> यात चुकीचे काय आहे...

स्त्रियांमधला मूलभूत चांगुलपणा , ममता आणि दुसऱ्याच्या कुटुंबाचा विचार करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती या गोष्टी त्यांना असल्या लोकांचे मुखवटे फाडून काढण्यापासून रोखतात . इनबॉक्स मधले स्क्रीनशॉट्स जर पोस्ट केले तर त्या माणसाची ( जर खऱ्या नावाने अकाउंट असेल तर ) आजवर कमावलेली सगळी इज्जत क्षणात मातीला मिळू शकते . पण स्त्रिया विचार करतात की ह्यात त्याच्या मुलांची काय चूक , त्याच्या सालस बायकोची काय चूक , त्यांना कशाला आयुष्यभराचा मनस्ताप द्या .. शिवाय इतकी लाज सोडून वागणारा तो माणूस - त्याच्याही बद्दल एक करुणेची भावना असते की कशाला याचं त्याच्या घरातलं , मुलाबाळांच्या मनातलं स्थान धुळीला मिळवायचं , कशाला पब्लिक प्लॅटफॉर्मवर नाव उघड करून लक्तरं वेशीवर टांगायची .. एवढी मोठी शिक्षा नकोच ... त्यापेक्षा ब्लॉक करणं पुरेसं आहे . या मऊपणाचा अर्थ या लोकांना समजत नाही .. ब्लॉकचा एक अर्थ आपली परस्पर काळजी घेतली गेली , त्यातून धडा घेऊन सुधरावं हे लक्षात न घेता पुढच्या बाईच्या अकाउंटकडे मोर्चा वळवतात .

Pages