आज कपाट आवरताना जुन्या फोटोंचा अल्बम सापडला. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना अत्यंत लाडका फोटो समोर आलाच, सोळा वर्षांपूर्वीचा. मांडीत घेतलेला सव्वा महिन्याचा सुदृढ हसरा कान्हा, हिरवीगार पैठणी, डायमंडचे कानातले आणि फुललेल्या चेहर्यावरचे कृतार्थ भाव. पहिल्या मुलाच्या बारशाला तिने हौसेने ठरवलेला हॉल, उत्तम कॅटरिंग, कान्ह्याला आईकडे सोपवून एका तासात घाईघाईने एकटीने केलेली पैठणी खरेदी.. किती तरी दिवसांनी होत होतं अगदी तिच्या मनासारखं!
***
चौविसावं लागलं तेव्हाच तीचं लग्न ठरलं. घरातलं पहिलच कार्य. आज्या, मावश्या, आत्या , काका , काकू सगळ्यांच्या उपस्थितीत साखरपुड्याची, लग्नाची तारीख ठरली. महिन्याभरात साखरपुडा पुढच्या दोन महिन्यांनी लग्न.
“अगं ह्या रविवारी सकाळी साखरपुड्याची साडी घ्यायला जा तुम्ही दोघं. तुझ्या आवडीची घे छान!”
”उत्सव मध्ये जावू?”
“हो जा ना!” तिची कळी खुलली. दागदागिन्यांची, कपड्यालत्तायाची तिला फार हौस होती असं नाही. पण ती चिकित्सक मात्र होती.
आई-आजी सुद्धा, “वा वा! मंडळी हौशी आहेत, साखरपुड्याची साडी ती काय? पण तरीही मुलीच्या आवडीचा विचार.
”रविवारी सकाळी दोघांनी जावून छान मरून रंगाची वल्कलम् घेतली. दुपारी सासूबाईंच्या फोन
“अगं, ताई आलिये तर जरा संध्याकाळी दुकानातच भेट.”
दुकानात, “मरून रंगाचा ना जनरली शालू घेतात लग्नात !”
” बघू हो जरा अजुन साड्या” हो नाही करत मरुन वल्कलम् कॅन्सल होऊन शेवटी मोरपिशी रंगाची साडी फायनल झाली. म्हणा तशी ही पण चांगली होती.
“पुढच्या रविवारी अंगठी आणि दागिने करायला टाकूयात, छगनलाल & सन्स मधे भेटूया. तुझ्याच पसंतीने करु सगळं”
”संस्कृतीमध्ये का नाही? तिकडे किती छान डिझाईन्स असतात. छगनलाल काय पकाऊ,” घरी आल्यावर तिची कुरकुर सुरू झाली.
“अगं सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी सगळे आपल्या विश्वासू सोनाराकडेच करतात. समजून घे ना जरा” आईची दटावणी.
छगनलाल आणि सन्स मधे सगळी जुनी ढबोळी डिझाईन्स, काय आणि कसं सिलेक्ट करावं?
” मंगळसूत्र चांगल घसघशीत घे नाही तर नाजूक डिझाईनचं अडकून वाढवतं.” ताई उवाच
लंगेच त्यातल्या त्यात आवडलेलं झिरो साइझ मण्यांचं साधसं मंगळसूत्र तिला नाईलाजाने ठेवून द्याव लागलं.
”बांगड्या सहा तोळ्यांच्या करुन टाका” हिशोबाल्या पक्क्या सासूबाईंची सोनाराला सुचना.
”डायमंड, स्टोन्स लाभतं नाही लाभत नकोच ते. तू आपली सोन्याचीच अंगठी घे.” तिला अजून एक सूचना.
”‘किती ते नाजुक डिझाईन, चांगली घसघशीत करा हं अंगठी” ही सूचना सोनाराला.
शेवटी तीन तासांनी सगळ्यांच्या सोयीनुरुप (ठसठशीत, घसघशीत आणि बोजड) दागिने खरेदी आटोपल्यावर,” काय खुश ना?” ” वा! वा! छान मनासारखी झाली ना खरेदी? ” ह्या सासू-नणंदेच्या अवघड प्रश्नांना “कोणाच्या?” हा (खोचक) प्रतिप्रश्न गिळून टाकताना तिची झालेली तारांबळ . आठवणींने सुद्धा हसू आल चेहर्यावर.
***
आता मुख्य खरेदी साड्यांची!
मस्त हिरवीगार पैठणी, आंबा कलरचे काठ, पदरावर नाचरा मोर मनात चित्र पक्कं होतं.
”उत्सव मधेच जायचं ना?” तिचा उत्साही प्रश्न.
“छे छे. मस्त दादरला जाऊयात. ताईचं स्पेशल दुकान आहे मोठं नेहमीचं. तुला पण आवडतील बघ तिकडे साड्या.”
ती, सासूबाई, ताई, चुलतताई आणि एक-दोघी पोहोचल्या दादरच्या त्या तीन मजली दुकानात. धीर करून तिने सुतोवाच्य केले, “मला शालू नकोय, पैठणी घ्यायचीय.”
” अगं पैठणी काय कधीही घेशील, खूप निमित्तं मिळतील नंतर. आत्ता मस्त शालूच घे.”” नंतर कधीतरी कारण काढून घेण्यापेक्षा आता माझ्या लग्नात माझ्या आवडीचं घेऊ देत ना मला…”वगैरे वगैरे मनातील वाक्य ओठावर काही पटकन आली नाहीत.
तोपर्यंत ताईच्या सांगण्यावर हुकूम दुकानदाराने शालू दाखवायला सुरुवात केली. ते भरजरी मोठे काठ, मोठे बुट्टे काहीच पसंतीस येईनात. कंटाळून जरा बाजूला नजर टाकली तर बाजूच्या गिऱ्हाईकाला दाखवत असलेला एक हिरवागार शालू त्याचे अगदी नाजूक छोटे काठ आणि अंगभर विखुरलेल्या छोट्या चांदण्या अगदीच मनात भरल्या. हळूच किंमत बघितली, अरे बापरे आता बघत असलेल्या साड्यांच्या दुप्पट किंमत आहे. “कोणाकडे काही मागायचे नाही, उगाच हावरटपणा करायचा नाही” हेच बाळकडू मिळाल्याने ती पटकन वळून परत ह्या घोळक्यात सामिल झाली. मग उगाच आपला त्यातल्या त्यात बरा निळा जर्द शालू घेतला. इतर खरेदी ही अशीच आटोपली.
***
दोन वर्षांनी झालेल्या कान्हाच्या बारशाला मात्र तिने आधीच छान तयारी (अगदी आर्थिकही) केली होती.
एक एक तास काढून आई-सासूबाईंना सुंदर साड्या घेतल्या, कधीची मनात भरलेली हिरवीगार पैठणी घेतली. तिला पसंत असलेला, उत्कृष्ट कॅटरींग असणारा हॉल बुक केला. नवर्याने, तिने दोघांनी कधीतरी विंडो शॉपिंग करताना आधीच बघून ठेवलेले डायमंडचे इअरींग गिफ्ट करून अजुनच रंगत आणली.
कितीतरी दिवसांनी खरचं सगळं तिच्या मनासारखं जुळून आलं होतं.
सर्वार्थाने लाडक्या त्या फोटो मध्ये ती हरवून गेली.
तिच्या आवडीचं...!
Submitted by छन्दिफन्दि on 20 July, 2023 - 02:53
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाहाहा! होतं खरंच असं!
हाहाहा! होतं खरंच असं! (म्हणूनच लग्नातल्या महाग भरजरी साड्या नंतर कित्येक वर्षं कपाटाचीच शोभा वाढवतात! नेसायला आवडत नाहीत, कुणाला तरी देऊन टाकू म्हटलं तरी किंमत डोळ्यासमोर दिसत असते. )
सुंदर, अगदी मनातला लिहिलं,
सुंदर, अगदी मनातला लिहिलं, खूप कॉमनली होता हे.
कुणाला तरी देऊन टाकू म्हटलं
कुणाला तरी देऊन टाकू म्हटलं तरी किंमत डोळ्यासमोर दिसत असते. >> हाहा. त्या किंमतीच्या लाजेनेच त्या कधीकधी नेसाव्या पण लागतात.
छान लिहिलंय.बरेचदा असं होतं
छान लिहिलंय.बरेचदा असं होतं खरं.
वावे, उर्मिला, चिन्मयी, आणि
वावे, उर्मिला, चिन्मयी, आणि अनु धन्यवाद,
लग्नातल्या महाग भरजरी साड्या नंतर कित्येक वर्षं कपाटाचीच शोभा वाढवतात,
किंमतीच्या लाजेनेच त्या कधीकधी नेसाव्या पण लागतात.
दोन्हीशी सहमत.
आताच थोपू वर वाचलं हे लिखाण
आताच थोपू वर वाचलं हे लिखाण
छान लिहिलंय
छान. त्या नायिकेस, अशीच
छान. त्या नायिकेस, अशीच हिरवाईने, बहरत रहा.
धन्यवाद किल्ली!
धन्यवाद किल्ली!
सुंदर!!
सुंदर!!
नुकतीच माझ्याकडे दागिने.. पैठणीची खरेदी (येणाऱ्या मुलीकरता) झाली.
दागिने घेतांना तर मला अक्षरक्ष: लाज वाटत होती, कारण ते एवढे नाजुक आहेत, की डबीत पण जेमतेम दिसत होते. (लोक काय म्हणतील.. अगदीच बारकं काहीतरी घेतलं.. माझी मनातली भीती..). पण ‘मुझे ऐसे ही गहने पसंद है..’ असं म्हणत सुनेने पाठवलेले तसेच फोटो, आणी ‘अगं.. हल्ली मुली असेच नं दिसणारे दागिने घालतात..’ इति मैत्रिणींचा अनुभव.
शर्मिला, धन्यवाद!
शर्मिला, धन्यवाद!
दागिने घेतांना तर मला अक्षरक्ष: लाज वाटत होती, कारण ते एवढे नाजुक आहेत, की डबीत पण जेमतेम दिसत होते. (लोक काय म्हणतील.. अगदीच बारकं काहीतरी घेतलं.. माझी मनातली भीती..). पण ‘मुझे ऐसे ही गहने पसंद है..’ असं म्हणत सुनेने पाठवलेले तसेच फोटो, आणी ‘अगं.. हल्ली मुली असेच नं दिसणारे दागिने घालतात.. <<< लोक काय म्हणतच असतात, किती मनावर घ्यायच आपण?
मस्तच. अगदी अगदी झालं बरेच
मस्तच. अगदी अगदी झालं बरेच ठिकाणी.
. अगदी अगदी झालं बरेच ठिकाणी>
. अगदी अगदी झालं बरेच ठिकाणी>>>
धन्यवाद अन्जु!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
लग्नातल्या एवढ्या भरजरी साड्या कुठे घालायच्या हाही एक प्रश्न असतो. माझ्या एका मैत्रिणीने भाच्याच्या लग्नात स्वतःच्या लग्नातली साडी नेसली तर वधुमाय आणि वरमाय यांच्या साड्यांहून ती भारी दिसत होती.
त्यामुळे इतरांच्या कार्याला हा प्रॉब्लेम आणि स्वतःच्या घराच्या कार्याला जनरली नवीन साडी घेतली जातेच.
खरंय. पण तरी आवडीची असेल तर
खरंय. पण तरी आवडीची असेल तर जरा तरी नेसली जाते.
धन्यवाद पीनी!
मस्तं लिहिलय! मनातलं गोड!
मस्तं लिहिलय! मनातलं गोड!
धन्यवाद Aashu!
धन्यवाद Aashu!
माझा आरोप आहे मायबोलीकरांवर !
माझा आरोप आहे मायबोलीकरांवर ! इतर कोणत्याही कथेला आठवड्याभरात किमान १२ - १३ कमेंट्स असतात ; पण मी महिन्या दीड महिन्यात ३ कथा लिहील्या एकीलाही १० कमेंट्स सुद्धा नाहीत. माझ्या लेख वा कथेवर ज्या अनुकूल आणि ( 'आणि.' ' किंवा ' नाही ) प्रतिकूल प्रतिक्रिया, अभिप्राय असतील त्यांचं मनापासून स्वागतच आहे. फक्त टीका करताना चूका काढताना, सबळ, अर्थपूर्ण कारण असावं एवढीच अपेक्षा ; पण माझ्या लेख, कथांकडे चक्क दुर्लक्ष करण्यात येत आहे. कारण काय तर ' हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास ' या माझ्या लेखावर झालेल्या अर्थहीन टीकांना मी उत्तरे दिली हे ?? हे कितपत योग्य आहे ?
असो. Btw कथा छानच आहे. फक्त ' मांडीत घेतलेला ' नाही तर ' मांडीवर घेतलेला सव्वा महिन्याचा कान्हा ' असं असायला हवं.
असो. Btw कथा छानच आहे. >>>
असो. Btw कथा छानच आहे. >>> धन्यवाद!
फक्त ' मांडीत घेतलेला ' नाही तर ' मांडीवर घेतलेला सव्वा महिन्याचा कान्हा ' असं असायला हवं.>>>> मांडीवर ठेवणे किंवा मांडीत घेणे दोन्ही प्रचलित असावेत. मी 'मांडीत घे' अस ऐकलंय.
माझा आरोप आहे मायबोलीकरांवर !
माझा आरोप आहे मायबोलीकरांवर ! इतर कोणत्याही कथेला आठवड्याभरात किमान १२ - १३ कमेंट्स असतात ; पण मी महिन्या दीड महिन्यात ३ कथा लिहील्या एकीलाही १० कमेंट्स सुद्धा नाहीत. माझ्या लेख वा कथेवर ज्या अनुकूल आणि ( 'आणि.' ' किंवा ' नाही ) प्रतिकूल प्रतिक्रिया, अभिप्राय असतील त्यांचं मनापासून स्वागतच आहे. फक्त टीका करताना चूका काढताना, सबळ, अर्थपूर्ण कारण असावं एवढीच अपेक्षा ; पण माझ्या लेख, कथांकडे चक्क दुर्लक्ष करण्यात येत आहे. कारण काय तर ' हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास ' या माझ्या लेखावर झालेल्या अर्थहीन टीकांना मी उत्तरे दिली हे ?? हे कितपत योग्य आहे ?>>>>
अस फक्त तुमच्या बरोबरच होत अस नाही. इतरांनी पण अनुभवलं आहे.
आता मी तुमचा संगीत प्रवासाचा लेख वाचला, आणि थोड्याफार कॉमेंट्स ही वाचल्या. मला काय लिहावे सुचले नाही म्हणून मी कॉमेंट केली नाही.
इकडे मा बो वर सदस्य संख्या काही शे त असावी (माझा अंदाज) तर अक्टिव मेंबर्स शंभर च्या आसपास असावेत.
बरेचसे सदस्य १५-२० वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ आहेत. थोडक्यात त्यांचे कंपू झालेले आहेत. कंपुतल्या एखाद्या सदस्यांवर तुम्ही टीका केली की अख्खा कंपू धावून येतो आणि तुटून पडल्या सारखे करतात. ती ह्या प्लॅटफॉर्म ची एकंदर पद्धत आहे हे झाले माझे निरीक्षण.
दुसरं कधीकधी comment काय द्यावी हे ही सुचत नसेल
इकडे लाईक किंवा किती जणांनी वाचले असे काही trackers नाहीयेत.
जे आपल्याला वाटत ते आपण लिहितो, तस ज्यांना वाचायचं ते वाचतील. दुर्लक्ष करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे ( ते योग्य आहे अस नाही पण प्रत्येक जण त्याच्या समजे नुसार ( अस पर their maturity level) वागतो . ते त्यांचे स्वातंत्र्य आहे
कदाचीत ते वाचत असतील पण कॉमेंट्स देत नसतील असा विचार करावा.
.
काही काही मायबोलीकर कमेण्ट्स
काही काही मायबोलीकर कमेण्ट्स करायचे पैसे घेतात असे ऐकून आहे. खखोदेजा.
पण एका माबोकराने तर कमेंट करून भारतात प्रॉपर्टीज घेतल्यात. मलाही एकदा कविता /गझल वर कमेंट करायची ऑफर मिळाली होती. कुतूहल म्हणून मी बँक अकाऊंट नंबर कळवला होता. एकच कमेंट केली, तीत माझ्या सेक्रेटरीसाठी हिर्याची अंगठी घेतली. पण नेमकीच बायकोने पाहिली आणि "अय्या ! कसल भारी सर प्राईज !" म्हणत बळकावली सुद्धा !
एका माबोकराने तर कमेंट करून
एका माबोकराने तर कमेंट करून भारतात प्रॉपर्टीज घेतल्यात. मलाही एकदा कविता /गझल वर कमेंट करायची ऑफर मिळाली होती. >>> तरीच एव्हढ्या शेकडोंनी(?) कॉमेंट्स पडत असतात.
पैसे मिळत असतील तर आम्ही पण एक पायावर तैयार कॉमेंट्स टाकायला. तेवढीच एखादी पैठणी येईल त्यात.
एका माबोकराने तर कमेंट करून
एका माबोकराने तर कमेंट करून भारतात प्रॉपर्टीज घेतल्यात. मलाही एकदा कविता /गझल वर कमेंट करायची ऑफर मिळाली होती. >>> तरीच एव्हढ्या शेकडोंनी(?) कॉमेंट्स पडत असतात.
पैसे मिळत असतील तर आम्ही पण एक पायावर तैयार कॉमेंट्स टाकायला. तेवढीच एखादी पैठणी येईल त्यात.
एका माबोकराने तर कमेंट करून
एका माबोकराने तर कमेंट करून भारतात प्रॉपर्टीज घेतल्यात. मलाही एकदा कविता /गझल वर कमेंट करायची ऑफर मिळाली होती. >>> तरीच एव्हढ्या शेकडोंनी(?) कॉमेंट्स पडत असतात.
पैसे मिळत असतील तर आम्ही पण एक पायावर तैयार कॉमेंट्स टाकायला. तेवढीच एखादी पैठणी येईल त्यात.
अरे ! तीनदा कमेंट म्हणजे
अरे ! तीनदा कमेंट म्हणजे तिप्पट उत्पन्न !!
स्मार्ट थिंकिंग
खरच काही platforms असे आहेत.
खरच काही platforms असे आहेत. पण लोकांनी कॉमेंट्स टाकल्या की लेखकाला पैसे मिळतात.
माबो ने पण असा एखादा विचार करायला हरकत नाही.
तेव्हढेच लेखकांचे कॉमेंट्स वाचून आणि त्याला उत्तरे देता ना होणाऱ्या dokedukhivarachi औषधे तरी सुटतील.
मी दोन्ही बाजूंनी तैय्यार!
हो ना !
हो ना !
बघा ना लॅपटॉपची किंमत, हप्ते, वीजेचं बिल, वायफायचा खर्च, दरमहा फीस, मोबाईलची किंमत. ऑपरेटरला जणारे पैसे एव्हढा तरी खर्च नको का निघायला ?
तरी वेळेचा हिशेब नाही यात. नाहीतर शेअरबाजारात तासाला पाच दह हजार सहजच सुटतात. शेअर बाजार बंद झाला कि कल्याण मटका.
एव्हढं उत्पन्न बुडवून कमेंट करायची म्हटल्यावर लेखकांनी सहानुभूतीने नको का विचार करायला ?
मांडीवर ठेवणे किंवा मांडीत
मांडीवर ठेवणे किंवा मांडीत घेणे दोन्ही प्रचलित
असावेत. मी 'मांडीत घे' अस ऐकलंय. >> अच्छा. तसंही असेल. कीप इट अप् सर. छान लिहिता.
कीप इट अप् सर>>>> sir NAHI
कीप इट अप् सर>>>> sir NAHI pan madam hi nako. छंदीफंदी
चालेल.
धन्यवाद!
हिंदी चित्रपट संगीत प्रवास
हिंदी चित्रपट संगीत प्रवास वरच्या सुरुवातीच्या कमेंट्स अगदी सहज , मवाळ सुरातल्या होत्या . त्यावर लेखकाने पहिल्यांदा निष्कारण वाद उकरून काढायचा असल्यासारख्या प्रतिक्रिया दिल्या . त्यानंतर जी काही चर्चा झाली ती झाली . तिथे तर मुळातच टीकेचा असा स्वर नव्हता , आता कथेवर काही निगेटिव्ह रिमार्क दिला भले चांगल्या हेतूने तरी लेखकाची तशीच प्रतिक्रिया झाली तर ? फुकट हात दाखवून अवलक्षण .. त्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं , ज्यांना आवडतील कथा त्यांना देऊ देत प्रतिसाद / कथा आवडेल तेव्हा देऊच जरूर प्रतिसाद असा विचार वाचकांकडून होण्याची शक्यता आहे .
मुख्य लेख छान आहे .
मुख्य लेख छान आहे .
Pages