लंडनचा पाऊस
कोणत्याही गावातला पाऊस मला खूप आवडतो. कोकणातला आठ आठ दिवस संतत धार धरणारा पाऊस तर सर्वात आवडता. ठाण्याचा ही आवडतोच पण तो फक्त घरात बसून बघायला. आपल्याकडे पावसाळा हा सेपरेट ऋतू आहे आणि साधारण त्याच काळात आपण पाऊस अनुभूवू शकतो. लंडन मध्ये ही ऑक्टोबर ते जानेवारी असा ऑफिशियली पावसाळा जाहीर केलेला असला तरी इथे पाऊस वर्षभर आणि कधी ही पडतो. पावसामुळे क्रिकेटच्या किंवा विम्बल्डनच्या मॅच वर पाणी फिरल्याचे आपण अनेक वेळा बघितलं आहेच. तरी ही लंडनचा पाऊस ही अनुभवण्या सारखीच गोष्ट आहे म्हणून हा लेखन प्रपंच.
हा आमच्या कोकणातला
इथे बरेच वेळा आकाशात ढगांचीच गर्दी असते त्यामुळे आकाश ही करड्या रंगाचंच दिसतं. विमानातून खाली पाहताना ही ढगांचा पडदा दूर सारून विमान खूप खाली आल्याशिवाय भर शहरातून नागमोडी वळणे घेत जाणारी लंडनची टेम्स नदी, मोकळी मैदानं, एका लायनीत एक सारखी दिसणारी एक मजली लाल कौलारू घरं, सरळ सोट जाणारे मोटार वेज आणि त्यावर खेळातल्या गाड्यांसारख्या दिसणाऱ्या सुर्रकन जाणाऱ्या गाड्या हे काहीही आपल्याला पहाता येत नाही.
लंडनचं आकाश नितळ निळं क्वचितच दिसतं. स्वच्छ ऊन ही गोष्ट लंडनमध्ये तशी दुर्मिळच आहे. त्यामुळे Sun is shining bright च टोपीकराना फारच अप्रूप. अर्थात हवा कशी ही असली तरी त्याबद्दल तक्रार करणं हा लंडनकारांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. असो. बहुतांश वेळा हवा ढगाळ असल्यामुळे खूप जणांना ते डिप्रेसिंग ही वाटतं पण मला अशी हवा मनापासून आवडते. अश्या हवेत अगदी भर दुपारी फिरायला गेलं तरी उन्हाचा त्रास होत नाही. दुपारी बारा वाजता सुदधा मागच्या अंगणात गरम गरम कॉफी घेत एखादं पुस्तक वाचण्याची मजा काही वेगळीच असते. किंवा काही ही न करता मनात कोणताही आकार धरला तरी आकाशातल्या ढगात तो लगेच तयार होण्याचा खेळ तर किती ही वेळ खेळला तरी कंटाळा येत नाही मला.
कधीतरीच दिसणारं नितळ निळ आकाश
इकडे जनरली पाऊस खूप वेळ आणि अगदी धो धो असा पडतच नाही. थंड हवेमुळे आणि कमी सूर्यप्रकाश असल्याने जमीन एवढी तापत नाही आणि जरी तापत असती तरी जमीन हा प्रकारच इंग्रज लोकांनी आपल्या गावात ठेवलेला नाहीये. सर्वत्र सिमेंटचे रस्ते, हिरवळ किंवा मग छोटे छोटे दगड तरी घातलेले मोकळ्या जागी. त्यामुळे पावसा बरोबर येणाऱ्या मृदगंधाला मात्र इथली मंडळी मुकली आहेत. " अत्तराचे भाव आज पार कोसळले..." हा पहिल्या पावसात आपल्याकडे फिरणारा मेसेज ही इथे व्हायरल होत नसेल. हाहा
कधीतरी थंडर स्टॉर्म ची वॉर्निंग येते, आपण विजांचा कडकडाट आणि धो धो पावसाची अपेक्षा करतो पण आपला अगदीच भ्रमनिरास होतो. थंडरस्टॉर्म म्हटलं तरी विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट नसतोच. दहा पंधरा मिनिटांची एखादी सर पडली की संपलं इथलं थंडरस्टॉर्म. एरवी तर पाऊस अगदीच कळेल न कळेल इतपत पडतो पुण्याच्या पावसासारखा. बाहेर असलो तर छत्री उघडली नाही तरी ही चालते. पण त्याचा फायदा असा होतो की त्यामुळे इथले रस्ते, झाडं, फूटपाथ रोजच नैसर्गिक रित्याच धुवून निघतात.त्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही.
ये रे घना ये रे घना
आपल्याकडच्या धो धो पडणाऱ्या आणि खिडकीच्या पत्र्यावर ताड ताड ताशे वाजवणाऱ्या पावसाच्या आवाजाची एक मस्त गुंगी येते. धो धो पडणाऱ्या पावसाचा आवाज हा सगळ्या white noise मध्ये लोकप्रिय आहे ते उगाच नाही. इथे मात्र पावसाला फार जोरच नसतो आणि पावसाबरोबर येणाऱ्या थंडीमुळे खिडक्या
दारं बंदच करावी लागत असल्याने इथला पाऊस अगदी निःशब्द असतो. घरात असलो तर कळत ही नाही बाहेर पाऊस पडतोय ते. अर्थात असा पाऊस ही खिडकीत बसून बघायला छानच वाटतो.
घन ओथंबून आले
मुसळधार वृष्टी होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला की त्या दिवशी चकचकीत ऊन पडतं ह्या पार्श्वभूमीवर इथला अचूक अंदाज ही काही तरी जादूच वाटते. हवामान खात्याच्या अंदाजाला पाऊस कधी धोका देत नाही. एक दिवस सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान पाऊस पडेल असा अंदाज होता. साधारण पावणे दहा झाले तरी पत्ता नव्हता पावसाचा. मला “कसे चुकले हे “ म्हणून थोडा असुरी म्हणतात तसा आनन्द होत होता पण पुढच्या पाचच मिनिटात वातावरण बदललं आणि थोडा का होईना पडला बिचारा. स्वतः पडला पण हवामान खात्याचा अंदाज खोटा नाही पाडलान.
सकाळी ऊन दुपारी ढग आणि संध्याकाळी पाऊस हे एकाच दिवशी दाखवण्याचे कसब लंडनच्या हवेत आहे. ऊन पावसाचा खेळ इथे कायमच सुरू असतो. त्यामुळे इंद्रधनुष्य मात्र खूप वेळा दिसते. थंडीच्या दिवसात सूर्याची किरणं तिरपीच असतात दिवसभर तेव्हा तर भर दुपारी ही इंद्रधनुष्य दिसू शकत. थंडीच्या दिवसात पारा चार अंशाच्या खाली असताना जर पाऊस पडला तर त्याच रूपांतर हिम वृष्टीत होत. अर्थात लंडनला थंडी खूप असली तरी बर्फ मात्र क्वचितच पडतो. असो. कधी कधी संध्याकाळच्या वेळी आकाशातले काळे ढग दूर सारून आसमंतात फाकणारा सोनेरी सूर्यप्रकाश फार सुंदर दिसतो. सर्व परिसर सुवर्ण प्रकाशात झळाळून निघतो.
एक दिवस असाच दिवसभर पाऊस होता. छत्री वैगरे घेऊन मी पाय मोकळे करायला बाहेर पडले होते. ढगाळ हवा, रिमझिम पडणारा पाऊस, हवेतला गारवा, पावसामुळे स्वच्छ झालेली झाडं, फुलं , घरांपुढल्या ताज्यातवान्या झालेल्या बागा, वाऱ्यामुळे भिरभिरत खाली येणारा झाडांचा मोहर , पावसामुळे अचानक रस्त्यावर आलेल्या असंख्य गोगलगायी हे सगळं पहात असतानाच समोरच दृश्य पाहून थबकलेच मी. झुपकेदार शेपटी असलेला एक छोटासा कोल्हा समोरच्या फुटपाथवरून पलीकडच्या वाडीत धावत जाताना दिसला. होय होय , बरोबर वाचताय तुम्ही... कोल्हाच होता तो....
लंडनचे कोल्हे हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. पण थोडक्यात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर शहराची लोकसंख्या वाढू लागली त्यामुळे जंगलं तोडून तिथे मानवी वसाहती बांधल्या गेल्या. त्या जंगलातले हे मूळ रहिवासी नवीन रहिवाश्यां बरोबर इथेच मुक्कामास राहिले, म्हणून लंडन मध्ये खूप कोल्हे दिसतात. लोकं घरातल उरलं सुरलं मांस वैगरे रात्री त्यांच्यासाठी घराबाहेर ठेवून देतात. त्यांच्या पोटापाण्याची सोय आपोआपच होते त्यामुळे शिकार वैगरे विसरून ते आता माणसाळलेत असं म्हणतात. तरी कोल्हा म्हटलं की थोडी भीती वाटतेच. तरी कोकणात आमच्याकडे कोल्ह्याचं दर्शन हा शुभसंकेत मानला जातो म्हणून थोडं बरं ही वाटलं. असो. लहान मुलांना आपल्या बागुलबुवा सारखी कोल्ह्याची भीती दाखवतात म्हणे.
बघता बघता पावसाचा जोर वाढला . पावसामुळे आणि वाऱ्यामुळे थंडी ही वाढली. माझ्याकडे छत्री आणि स्वेटर दोन्ही असल्याने मी पावसाचा आनन्द घेत मजेत चालत होते. तेवढ्यात माझ्या अगदी जवळ एक गाडी येऊन थांबली. इतक्या जवळ थांबलेली गाडी बघून मी थोडी घाबरलेच पण गाडीचा नंबर बघताच मात्र रिलॅक्स झाले. पावसाचा जोर वाढलेला बघून माझी मुलगी मला न्यायला आली होती. मुलीला आपली एवढी काळजी आहे हे बघून छानच वाटलं पण मानवी मनाला निखळ आनंद घेताच येत नाही.एवढे दिवस आपण तिची कळजी घेत होतो , आता ती आपली घेतेय ह्या रिव्हर्स पेरेंटहुडच्या विचाराने थोडं उदास ही वाटलच.
हेमा वेलणकर
लंडनचा बिनआवाजी पाऊस आवडला
लंडनचा बिनआवाजी पाऊस आवडला ममो.
(आपल्याकडील ताडताशाचा तो आवाज मात्र मला आवडत नाही. त्यामुळे उगाचच जीव दडपतो.)
मस्त लेख!
मस्त लेख!
>>>>>
बहुतांश वेळा हवा ढगाळ असल्यामुळे खूप जणांना ते डिप्रेसिंग ही वाटतं पण मला अशी हवा मनापासून आवडते. अश्या हवेत अगदी भर दुपारी फिरायला गेलं तरी उन्हाचा त्रास होत नाही.
>>>>>
माझं ही सेम असेच मत आहे. मलाही त्यांचे कळत नाही की छान ढगाळ थंडगार पावसाळी ते ही चिखल राडा नसलेले वातावरण सोडून उन कसले एन्जॉय करायचं
कोकणातला पाऊस मात्र सर्वात फेवरेट. पाऊस सुरू झाल्यावर आधी तो कानात पडणारा कौलावरचा टपटप आवाज आणि मग कौलावरून खाली ओघळणारी संततधार बघत राहायची.. ती हात पुढे करून झेलायची.. नाकात मातीचा वास.. नजरेसमोर हिरवेगार वातावरण.. थोडक्यात सारी इंद्रिये एकसाथ सुखावतात.. उरली जीभ.. तिचेही चोचले मग पुरवावेत.. गरमा गरम पिठीभात आणि सुके बोंबील खाऊन
छान लेख....
छान लेख....
शीर्षक वाचून आठवलं...
शालेय जीवनात एक धडा अभ्यासला "लंडनचा पोलीस" त्याला बाॅबी म्हणत. त्यात तो कसा कर्तव्य दक्ष आहे याचं वर्णन होतं...
तुमच्यामुळे लंडनचा पाऊस समजला. ऊनपाऊस म्हणजे मनभावन श्रावण, बालकवींची आठवण.
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणांत फिरुनी ऊन पडे
पुणेरी पाऊस लंडनमध्ये असा मथळा ठेवायला हरकत नाही
छान लेख, आवडला.
छान लेख, आवडला.
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
>>>>>
बहुतांश वेळा हवा ढगाळ असल्यामुळे खूप जणांना ते डिप्रेसिंग ही वाटतं पण मला अशी हवा मनापासून आवडते. अश्या हवेत अगदी भर दुपारी फिरायला गेलं तरी उन्हाचा त्रास होत नाही.
>>>>>
मम...
छान. इथे आम्ही गवताला पाणी
छान. इथे आम्ही गवताला पाणी घालायचं विसरून/ कंटाळा करून चांगली जमीन तापवतो की मातीचा सुगंध येतो. पण इथे आल्यापासून पावसाला कंटाळायला शिकलोय.
फक्त पारा शून्याच्या खाली गेला की स्नो पडेल ना? शाकाद्या: चारला पाण्याची घनता सर्वात जास्त असल्याने ते पाणी तलावाच्या तळाला जाते आणि हिवाळ्यात तलाव गोठत नाही.
छान लिहिलंय...
छान लिहिलंय...
आवडला लंडनचा पाऊस
आवडला लंडनचा पाऊस
छान लेख.
छान लेख. मला पण ढगाळ हवा आणि जोराचा पाऊस खूप आवडतात. पावसामुळे येणारा मातीचा सुगंध मात्र दुर्दैवाने आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे.
छान लिहिलं आहे ममो!
छान लिहिलं आहे ममो!
मला दिवसभर ढगाळ वातावरण आणि पाऊस नाही/जेमतेम पाऊस अशी हवा रोज रोज नाही आवडत. कधीतरी ठीक आहे.. चालतं. पण पाऊस चांगला पडून गेला की बरं वाटतं. नाही तर मग स्वच्छ ऊन तरी हवं!
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
(आपल्याकडील ताडताशाचा तो आवाज मात्र मला आवडत नाही. त्यामुळे उगाचच जीव दडपतो.)>प्राचीन मला तर त्या आवाजाने गुंगी येते.
ऋ,कोकणातला पाऊस पंचेंद्रिय सुखावतो अगदी परफेक्ट लिहिलं आहेस, फक्त ते चुलीत भाजलेले बोंबील वगळून.
पुणेरी पाऊस लंडनमध्ये असा मथळा ठेवायला हरकत नाही Happy > दत्तात्रय साळुंके मस्तच.
इथे आम्ही गवताला पाणी घालायचं विसरून/ कंटाळा करून चांगली जमीन तापवतो की मातीचा सुगंध येतो. Lol >> भारी आयडिया अमितव
ते हिमवृष्टी च मी लिहिलय त्याबद्दल साशंक होतेच लिहिलं तेव्हा ही. त्यामुळे ते असेल ही चूक मला काही एवढं माहीत नाही. तुम्ही लिहिलय तेच जास्त लॉजिकल वाटतय आता.
पावसामुळे येणारा मातीचा सुगंध मात्र दुर्दैवाने आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे.> उ बो, खर आहे.
ढगाळ हवा आवडणारे माझ्या सारखे आहेत अजून ही म्हणून छान वाटतय. वावे बंगलोरला तुमच्याकडे ही बरेच वेळा मळभच असतं म्हणून कंटाळा येत असेल तुला एखाद वेळेस अश्या हवेचा.
फक्त ते चुलीत भाजलेले बोंबील
फक्त ते चुलीत भाजलेले बोंबील वगळून. Happy
>>>>>
मग तिथे तुम्ही आपला आवडीचा मेन्यू घ्या मला पावसात पिठी भातासोबत भाजलेले सुके बोंबील किंवा जवळा आवडतो.. किंवा भात आणि अंड्याचे कालवण ज्यात थेट उकळत्या रश्यात अंडे फोडतात (आता तेच खाऊन ही पोस्ट लिहितोय)
मस्त!
मस्त!
या पावसाचा अनुभव घेतला आहे. बकिंगहॅम पॅलेसचा चेंज ऑफ गार्ड सेरेमनी बघायला गेलो होतो तेव्हा आधी लख्ख उन होते. नंतर वारा, पाऊस व थोड्या वेळाने गारा. नंतर पुन्हा लख्ख उन. हे सगळे तेथे उभे असतानाच्या तासा दीडतासात झाले होते.
लेख आवडला.
लेख आवडला.
वावे यांच्या सारखे मला पावसाशिवाय ढगाळ वातावरण नाही आवडत, भर उन्हाळ्यात कधी ठीक. पण अगदीच भुरभर नाही पण रिमझिम ते मुसळधार पाऊस आठ दहा दिवस सलग मजा वाटते. पावसात भिजत फिरायला (निदान तास भर तरी) आवडते.
मी लंडन - मिल्टन किन्स मध्ये ऑक्टोबर महिना अखेरीस होतो दहा दिवस पण बाहेर फिरताना पाऊस नशिबी आला नाही.
मस्त लेख ! लंडन च्या वाटेल
मस्त लेख ! लंडन च्या वाटेल त्या वेळी पडणाऱ्या चिरचिर पावसावर लेख लिहावा वाटलं हे त्या पावसाचंच भाग्य म्हणायचं !
मला पाऊस आवडतो पण त्यासोबत येणारी थंडी नाही आवडत म्हणून मग पाऊस ही आताशा नाही आवडत. त्यातलेत्यात भारतात मजा येते पावसात, मस्त मुसळधार आडवा तिडवा पडतो!! इथे(जर्मनीत) ऋतू बदलताना हमखास पाऊस पडतो sept आणि एप्रिल मे तर त्याचे हक्काचे महिने .. पण याचं म्हणजे दिवसभर एक संथ ताल धरून चिरचिर पिरपिर करत कंटाळवाणा पडतो आणि लगेच थंडी वाजायला लागते.. क्वचित थंडरस्टॉर्म ही होतेच ५-१० मिन साठी..
मळभ तर कायम असतंच.. त्यामुळे सूर्य मावळत जरी उशिरा असला तरी light लावायला लागतोच !! आता समर आहे तरी गेले १५ दिवस रोज पाऊस आहे.. व गारठा ही..
मला श्रावणातला थंडावलेला पाऊस
लेख नेहमीप्रमाणेच सुंदर. सदा चिरचिर किरकिर करणाऱ्या पावसावर इतका सुंदर लेख तुम्हीच लिहावा...
मला श्रावणातला थंडावलेला पाऊस (शिरवे) पडताना आवडतो खरा पण त्यापेक्षा तो पडून गेल्यावर झालेले मोकळे आकाश आणि त्यानंतर पडणारे स्वच्छ ताजे कोवळे सौम्य उन्ह हे अधिक आवडते. झाडावरून टपटप गळणारे ओथंबे ऐकायला आणि पाहायला आवडतात.
मस्त लेख. आत्ता बाहेर पावसाळी
मस्त लेख. आत्ता बाहेर पावसाळी वातावरण आहे त्यात हा लेख वाचायला मजा आली.
दोन गीतांच्या सुरुवातीच्या
दोन गीतांच्या सुरुवातीच्या ओळी वाचून "सिंगिंग इन द रेन" चित्रपट आठवला.
छान लेख. मी पॅरिस मध्ये होते
छान लेख. मी पॅरिस मध्ये होते तेव्हा पण असाच पावसाळी मौसम होता. रिमझिम गोड पाउस. ऐकायला सैराटची गाणी समोर रस्त्यातून पुढे गेले की ब्रिज व त्यावरून दिसणारा आयफेल टावर. पार दहा अकरा परेन्त असणा रा रुपेरी उजेड. मन वेडे होउन गेले. स्वच्छ रस्त्याव र पडणारे स्वच्छ पाणी बघून अगदी मोहरून जायला होते.
सिंगापूर मध्ये पण असा स्वच्छ पाउस अनुभवला. किती गोड अनुभव.
किती सुरेख लेख!
किती सुरेख लेख!
कोकणातला संततधार, मुसळधार कसाही असला तरी पाऊस ऑलटाईम लाडका. पुण्यात मात्र किरकिरा पाऊस आणि मागून येणारी थंडी हे माझ्यासाठी डेडली कॉम्बिनेशन. असा पाऊस मला अज्जिबात आवडत नाही.
लंडनचा पाऊस मात्र छान वाटतोय.
*किती सुरेख लेख!* - 100% सहमत
*किती सुरेख लेख!* - 100% सहमत !
*सकाळी ऊन दुपारी ढग आणि संध्याकाळी पाऊस हे एकाच दिवशी दाखवण्याचे कसब लंडनच्या हवेत आहे* - हे कसब माथेरानच्या हवेतही आहे ( किंबहुना, अजूनही असावं! ) . पूर्वी, पावसाळा संपता संपता आमचा कंपू नियमितपणे माथेरानला एक आठवडा जात असे. दिवसा ऊन व संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान न चुकता पाऊस छान हजेरी लावायचाच !!
पाऊस आवडत नाही पण लेख आवडला
पाऊस आवडत नाही पण लेख आवडला
मस्त ओलाचिंब भास होणारा लेख.
मस्त ओलाचिंब भास होणारा लेख. निळे गगन प्रचि फारच सुंदर. लेकीमुळे पुढचा पाऊस अनुभवता आला नाही. निराशेच्या मनस्थितीत सहभागी.
ऋ, फारएंड, मानव, anjali
ऋ, फारएंड, मानव, anjali _cool, हीरा, मामी, revati 1980, pradnya, अनिंद्य, भाऊ, अमा झकासराव सर्वांना धन्यवाद.
ऋ, मी भाजलेल्या बोंबला ऐवजी भाजलेला पापड घेईन. गरम गरम कु पी आणि गरम गरम भात, हे माझं ही मुसळधार पावसातल comfort food आहे.
फारएंड गारा पण म्हणजे कमाल आहे. मुंबई ला कधी गारा पडत नाहीत , गारा मी लंडन लाच पाहिल्या.
मानव फिरताना पाऊस नाही मिळाला ते बरच झालं पण लंडनचा पाऊस फिरण्यात बाधा आणत नाही हे ही तेवढंच खरं.
अंजली, मस्त लिहिलं आहेस.
सदा चिरचिर किरकिर करणाऱ्या पावसावर इतका सुंदर लेख तुम्हीच लिहावा...>>हीरा, धन्यवाद
भाऊ पावसाळ्यात माथेरान ही खूपच सुंदर असत.
प्रज्ञा मला पुण्याचा ही पाऊस खूप म्हणजे खूप आवडतो.
Revati
अमा मस्त लिहिलं आहे.
पाऊस आवडत नाही पण लेख आवडला Happy >> अनिंद्य, स्पेशल धन्यवाद.
निराशेच्या मनस्थितीत सहभागी.>> किशोर मुंढे धन्यवाद
वावे चा प्रिय मृद्गंधास लेखही जरूर वाचा खूप सुंदर आहे .
सुंदर फोटो छान ललित
सुंदर फोटो
छान ललित
छान लेख नेहेमीप्रमाणे.
छान लेख नेहेमीप्रमाणे. लहानपणीच्या वाड्यातल्या पावसाची आठवण आली, पुढच्या अंगणात / चौकात पत्र्याना पन्हाळी लागत आणि त्याकडे एकटक बघण्यात बराच वेळ जात असे. मागच्या अंगणात मोठा पांढरा चाफा असल्याने कितीही पाऊस असला तरी झिरपत झिरपत अंगणात पडे.
वाह मस्त वर्णन आणि फोटोही
वाह मस्त वर्णन आणि फोटोही सुरेख.
लंपन , अंजू धन्यवाद
लंपन , अंजू धन्यवाद
छान लेख, आवडला.
छान लेख, आवडला.
SharmilaR धन्यवाद....
SharmilaR धन्यवाद....
Pages