मी वसंतराव - गाण्यापलीकडला अनुभव

Submitted by मित्रहो on 28 July, 2023 - 05:18

खूप दिवसांनी का असेना पण मी शेवटी ‘मी वसंतराव’ हा चित्रपट बघितला. थियटेरमधे बघणे झाले नाही पण Jio Cinema वर बघायला सुद्धा उशीरच झाला. उशीरा सिनेमा बघून त्यावर काही लिहिण्यात हा फायदा असतो की बऱ्याच मंडळींनी सिनेमा बघितला असतो त्यामुळे कथानक माहिती असते. अशा वेळेला काही लिहिणे म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर दोन व्यक्तीनी केलेल्या गप्पा असतात तेंव्हा गप्पाच मारु या. चित्रपट तसाही चरित्रपट आहे त्यामुळे शेवटी काय होणार आहे हे माहिती असतेच फक्त हा प्रवास कसा उलगडत जातो तेच बघण्यात खरी मजा आहे. ती मजा चित्रपट बघितल्यानंतरच कळते, तेंव्हा चित्रपट नक्की बघा आता टिव्हीवर देखील येतोय. पुढे काही प्रमाणात कथेचा उलगडा होतो म्हणून चित्रपट बघण्यावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. चरित्रपट नेहमी फ्लॅशबॅकनीच का सुरु होतात ते एक कोडे आहे. हरीशचंद्राची फॅक्टरी अपवाद होता. वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट देखील फ्लॅशबॅक मधेच उलगडत जातो. यातल्या फ्लॅशबॅक मधे एक वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण फार महत्वाचे आहे हे चित्रपट बघितला तर लक्षात येते.

वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावरचा चित्रपट आहे म्हटल्यावर सुरवातीला गाण्यांविषयी बोलायलाच हवे. वसंतराव देशपांडे यांची कितीतरी प्रसिद्ध आणि अजरामर गाणी आहेत परंतु चित्रपटाचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि संगीत दिग्दर्शक राहुल देशपांडे यांचा कल जुनी गाजलेली गाणी वापरण्यापेक्षा नवीन गाणी वापरण्यावर होता. जुनी नाट्यगीते वापरली नाही असे नाही परंतु फक्त चित्रपटाचा प्रवास पुढे न्यायलाच वापरली. तसेच त्यांची गाजलेली भावगीते, चित्रपट गीते वापरण्याचा मोह टाळला. जुनी प्रसिद्ध नाट्यगीते किंवा भावगीते वापरुन सिनेमाला प्रसिद्धि मिळविण्यापेक्षा दोघांचाही कल काहीतरी नवीन करण्यावर होता. यामुळे गंमत अशी झाली का तुमचे लक्ष वसंतराव देशपांडे यांच्या प्रवासावर केंद्रित होते. दुसरा फायदा हा झाला की बरीच नवीन गाणी ऐकायला मिळाली. ललना, राम राम जप करी सदा ही गाणी खूप गाजली मला स्वतःला खूप आवडला तो म्हणजे मारवा. मी स्वतः कितीतरी इनडोअर सायकलींग वर्कआऊट मारवा ऐकत केले. मुळात मी राहुल देशपांडे यांच्या गायनाचा खूप मोठा भक्त, फॅन वगैरे आहे. Rahul Deshpande Collective सुरु झाल्यापासून संगीताच जो मोठा कॅनव्हॉस उपलब्ध करुन दिला ते निव्वळ अप्रतिम. त्यामुळे या चित्रपटाच्या गाण्यांविषयी फार बोलण्याची माझी लायकी नाही. मला राम राम, पुनव रातीचा लावणी, गझल सारेच आवडले. शास्त्रीय संगीताच्या लयीसारखा चित्रपट सरकतो मधेच गायकांनी तानावर ताना घ्याव्या तशा काही घटना घडतात , तर कधी गायकाची एखादी हरकत जशी आवडते तसे पटकन काहाततरी चटका लावून जातं असा हा गायकाचा चित्रपट गायकाची सौंदर्यदृष्टी घेऊनच पुढे सरकतो.

मला सर्वात जास्त आवडले ते नागपूरातील वाडे. मोठे फाटक, ते मधे मंदिर, त्या खिडक्या, आजूबाजूला घरे त्यात राहणारे भाडेकरु किंवा मालक, खचत चाललेल्या भिंती असे खूप वाडे बघितले. साऱेच नातेवाईक महालात वाड्यात राहायचे त्यामुळे अशा खूप वाड्यात राहण्याचा , त्यांना भेट देण्याचा योग आला. ते सिनेमात बघताच त्या साऱ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. काही भाग नागपूरातील चिटणवीसाच्या वाड्यात शूट झाल्याचे वाचले. गेले कित्येक दिवस मी चिटणवीसांच्या वाड्यात गेलो नाही तो योग वसंतराव चित्रपटाने घडवून आणला. बाळकृष्ण मंगल कार्यालय अशी पाटी देखील दिसली. दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे नागपूर भागात वापरली जाणारी भाषा. टिव्ही मालिकांनी बोलीभाषांचा खूप प्रमाणात कचरा केला आहे. आबे, काहून असे शब्द वापरले की झाली नागपूरातील मराठी असा जो एक विचित्र समज पसरला आहे. हे शब्द वैदर्भी भाषेत नाही असे नाही परंतु ते बोलण्याची एक वेगळी पद्धत असते. यात आलोक राजवाडे ज्या पद्धतीने बोलला ना ते मस्त होतं. खूप दिवसांनी काहीतरी व्यवस्थित ऐकतोय असे वाटले. या दोन गोष्टिंमुळे सुरवातीच्या पाच दहा मिनिटातच मी चित्रपटाशी जोडल्या गेलो.

कथानकात दोन पातळीवर संघर्ष आहे. घर, संसार, मुलबाळं आणि संरक्षण खात्यातली नोकरी यात अडकलेली एक सर्वसाधारण व्यक्ती वसंतराव तर या सर्वसाधारण वसंतरावाच्या आता दडलेला असामान्य प्रतिभेचा गायक वसंतराव देशपांडे. हा गायक नोकरपेशा वसंतरावांना स्वस्थ बसू देत नाही. तो गायक सतत सांगत असतो यातून बाहेर पड पण वसंतराव मात्र कितीतरी वर्षे साच्यातच अडकून राहतात. संसार सांभाळायला पैसे लागतात आणि ते गायनातून येणार नाहीत याची त्या वसंतरावांना पूर्ण कल्पना असते. या संघर्षाला खतपाणी घालत असतात ते त्यांचे मित्रमंडळ जे वसंतरावांच्या गायकीचे प्रचंड चाहते असतात. बाहेरचे सांगत असतात पण खरा संघर्ष आत आहे वसंतराव विरुद्ध वसंतराव. ऑफिसला दांडी मारुन गाण्याच्या कार्यक्रमाला जाणे वगैरे चालूच असते. आपण संसारात अडकलोय ही मनात खोल दडलेली खदखद, खंत अरुणाचल मधल्या प्रसंगात प्रकर्षाने जाणवते. गरीबीतून संघर्ष करुन कुणी वर येतो हा संघर्ष खूपदा बघितलाय पण एका व्यक्तीचा स्वतःशीच सुरु असलेला कला विरुद्ध जीवन हा संघर्ष प्रथमच या प्रकारे कोणत्या चित्रपटात आला असेल.

दुसरा संघर्ष आहे तो एका गायकाचा, एका कलाकाराचा, हा संघर्ष दिनानाथ मंगेशकर यांचा होता तोच संघर्ष त्यांच्या शिष्याचा आहे. कुठल्यातरी साच्यात कलेला, गायनाला अडकविणारा समाज तर ती बंधने मोडून मुक्तपणे सर्वत्र संचार करुन बघणारा गायक कलाकार यांच्यातला हा संघर्ष आहे. दिनानाथ मंगेशकर यांना वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायची होती, ख्याल गायकी करायची होते पण लोकांना फक्त नाट्यगीते ऐकायची होती. कदाचित हीच समस्या पुलंची असावी कितीही प्रयत्न केला तरी पुल म्हणजे विनोदी लेखक ही प्रतिमा पुसणे पुलंना देखील जमले नाही. मराठी गायकानी इंग्रजी गाणे गायले तर नाक मुरडणारे येतात तुम्ही मराठीच गात जा. प्रयोगाशिवाय विज्ञान असो की कला पुढे जात नाही ते प्रयोग करायला कलाकार धजावत नाही किंवा कलाकारांनी असे धाडस केले तर ते स्वीकारायला समाज लवकर तयार होत नाही. सिनेमात दाखविले नाही परंतु कालांतराने हाच समाज त्या कलाकाराला हा तेचतेच करतो म्हणून नावे ठेवायला मागे पाहत नाही. साच्यात अडकलेल्या कितीतरी कलांकारांच्या बाबतीत असे घडले आहे म्हणूनच हा निरंतर चालणारा संघर्ष असला तरी कलाकारांनी आपले प्रयोग थांबवू नये असे मला वाटते. मला आवडणारा मारवा हा या संघर्षाचा फार महत्वाचा भाग आहे हे चित्रपट बघितल्यावर कळले. लाहोर मधे गेल्यानंतर वसंतरावांचा मामा सांगतात “आपल्याकडे शिकता येत ते इथे लाहोरला येऊन कशाला शिकायचे? तर इथले काहीतरी शिक.” अशी प्रवृत्ती हवी. मारवा शिकविणारा शिक्षक म्हणतो “तू मला कॉपी करु नको तर तू मारवा समजून घे मग गा.” मग ते शिक्षक मारवा समजावून सांगतात हीच गोष्ट दिनानाथ मंगेशकरांनी देखील सांगितलेली असते. मी पुलंनी वसंतरावांची घेतलेली मुलाखत ऐकली त्यात या प्रसंगाचा उल्लेख आहे. सिनेमा म्हटल्यावर थोडी नाट्यमयता जरी असली तरी तो मारवाचा प्रसंग तसाच घडला होता. एक राग विविध प्रकारे कसा गाता येतो हे गुरुने शिष्याला सांगितले होते यात गुरु अजून पुढची पायरी समजावून सांगतो. या आणि अशा प्रसंगातूनच वसंतरावांची गायकी तयार होत गेली. जी इतरांपेक्षा वेगळी होती म्हणूनच लोकांना स्वीकारायला जड जात होती. वाईट गाणे आणि वेगळे गाणे यात फरक असतो. वेगळा गातो म्हणजे तो वाईट गातो असे म्हणून जो बहिष्कार टाकला जातो तो मुळात लोकांचे कान तयार झाले नाहीत हे सांगणारा असतो. गायकी वाईट नसते. या वाक्यांनी जरी हा संघर्ष चित्रपटापुरता संपत असला ना तरी प्रत्यक्षात हा कधीच न संपणारा संघर्ष आहे. काही वेगळं स्वीकारायला वेळ लागतो हे खरे आहे.

जसा संघर्ष आहे तसेच सुंदर नात्यांच्या वीण देखील चित्रपटात आहे. चित्रपटात दाखविले की वसंतरावांना त्यांच्या आईने आपल्या सासरच्या इस्टेटीला लाथ मारुन वाढविले. त्यामुळे आई हे त्यांच आयुष्य व्यापून टाकणारी व्यक्ती होती या शंकाच नाही. वसंतरावांच्या भल्यावाईट प्रत्येक प्रसंगात त्याच्या आईची सोबत होती. त्यांची आई पण किर्तनात, भजनात गायची त्यामुळे गाण्याचे संस्कार होत गेले. लक्षात राहिला तो टांग्यातला प्रसंग. त्यावेळेला वसंतरावांची आई जे सांगते ते तिने आजवर जे सांगितले असते त्याच्या अगदी उलट असते. तू माझ्या संस्कारांमुळे असा वागतोय ते मला माहिती आहे पण आता मी सांगते यातून बाहेर पड. हीच वेळ आहे तुझ्या मनात जे चालले आहे ते कर, संघर्ष झाला, त्रास झाला तरी चालेल पण बदल स्वतःला, मी जसे शिकविले, सांगितले तसा वागू नको तर तुला हवे तसे वाग. वसंतरावांच्या आईंचा देवावर विश्वास नव्हता परंतु हळूहळू मुलासाठी तेही करायला लागतात. सासूबाई आणि सूनबाईमधला मैत्रीचा धागा तर जबरदस्त आहे.

वसंतरावांची गायकी आवडणारी जी त्यांची मित्रमंडळी असते त्यात एक मोठे नाव असते ते म्हणजे पुल देशपांडे. वसंतराव आणि पुल याच्या मैत्रीचे खूप प्रसंग चित्रपटात आहेत मला त्याहून जास्त आवडले ते वसंतरावांची आई आणि पुल यांच्यातील नाते. ती बाई पुलंना लाटणे फेकून मारायला कमी करीत नाही. गरज पडल्यास तीच बाई पुलंना सांगते ‘ए भाई काहीतरी कर आता’. एक छोटासा प्रसंग माझ्या लक्षात राहिला पुल आणि वसंतराव एका दुकानात काहीतरी विकत घेत असतात. त्याआधी कुणीतरी वसंतरावांना बोललेले असते आणि वसंतरावांच्या डोक्यात तो राग असतो. अशा वेळी कुणीतरी पुलंची स्वाक्षरी घ्यायला येतो. दुसरी व्यक्ती पुलंनी नाटकाच्या दुसऱ्या अंकात काय बदल करायला हवे ते सांगतो आणि पुल त्याला पुढल्या वेळी लक्षात ठेवीन म्हणून टाळतात. पुल वसंतरावांना म्हणतात “हे पुणे आहे इथे प्र्त्येक विषयात प्रत्येकाला मत असते. लोकांच मनावर घेऊन चालत नाही.” पुल आणि वसंतरावांमधला अप्रतिम प्रसंग म्हणजे पुल वसंतरावांना त्यांनी पूर्ण वेळ गायकी करावी असा आग्रह करीत असतात परंतु वसंतराव नाही म्हणतात. शेवटी चिडून वसंतराव म्हणतात “माझ तुझ्यासारख नाही भाई मी नाही सोडू शकत.” त्यानंतर कुणीच काही बोलत नाही आणि ते न बोलणे बरेच काही सांगून जाते. त्यांच्यातल नात हे असेच चाळीस वर्षे होत.

तसाच सुंदर धागा आहे तो बेगम अख्तर आणि वसंतराव यांच्यातील मैत्रीचा. अतिशय नाजूक वीण खूप छान हाताळली आहे. तीच गोष्ट पुरुषोत्तम दारव्हेकर आणि वसंतराव यांच्यातल्या दुव्याची. तो चहाच्या टपरीवरील प्रसंग अप्रतिम आहे. हा प्रसंग प्रत्यक्षात घडला की लेखकाने लिहिला हे सांगणे कठीण आहे. वसंतरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रसंग खूप मस्त वाटला. लांब पल्ल्यांच्या संवादांपेक्षा हा चित्रपट अशा छोट्या प्रसंगातून फुलत जातो म्हणूनच चित्रपटातील वसंतरावांचा प्रवास सामान्य माणसांसारखा जिवंत वाटतो कृत्रीम भासत नाही. सप्रे गुरुजींच्या शाळेत वसंतरावांना घालायचा प्रसंग जसा वसंतरावांनी सांगितला तसाच आहे. तो पाऊस पडणे, मुलाने गायन शाळेतील गाणे म्हणणे, शिक्षकांनी मुलाला शिकविणे हल्ली असे शिक्षक भेटणार नाहीत. मला ते वाक्य फार आवडले “माझ्या आयुष्यातील चांगल्या घटना घडल्या तेंव्हा खूप पाऊस आला.” मी स्वतः हे वाक्य बऱ्याचदा म्हणतो. एका शाळेत वसंतराव गायला जातात पण तबलजी आलेले नसतात. तेव्हा तिथल्या एका मुलाला घेऊन वसंतराव गाणं म्हणतात. त्या मुलाला फक्त तीनताल वाजवता येत असतात. तिथे एका मुलाने त्यांचे गाणे ऐकले त्याला त्यांचे गाणे फार आवडले. पुढे जाऊन तो मुलगाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातो. जुन्या पिढिचे कान एका विशिष्ट प्रकारच्या गायकीसाठी तयार झाले होते. नवीन पिढित तसे नव्हते. ते वेगळेपण नावीण्य स्वीकारत गेले आणि त्या पुढच्या पिढिने मग वसंतराव देशपांडे या गायकाला मोठे केले असा संदेश चित्रपट सहज देऊन जातो.

चित्रपटात दोष नाहीत असे नाही पण त बोचत नाही. दोष बोचत नसतील तर काहीतरी दोष लिहायचे म्हणून लिहिण्यात काय अर्थ आहे. कलाकारांनी साजेसा अभिनय व्यवस्थित केला. चित्रपट संपल्यानंतर जर का राहुल देशपांडे यांचा वसंतराव पुष्कराज चिरपुटकर च्या पुलंपेक्षा लक्षात राहिला असता तर ते दिग्दर्शाकाचे आणि कलाकाराचे अपयश ठरले असते. तसे होत नाही त्यामुळेच अभिनय, कलाकार, कॅमेरा या मला न समजणाऱ्या गोष्टिंविषयी मी काही सांगू शकत नाही. गाण्याच्या बाबतीत माझी बोंबाबोंबच आहे त्यामुळे त्याविषयी फार न लिहिलेले बरे. वसंतराव देशपांडे या गायकावरील चित्रपट असल्याने यात तब्बल बावीस गाणी आहेत. चित्रपटात बराच काळ गायन आहे पण ते उगाच वाटत नाही. चित्रपटातील गाण्याइतपत किंबहुना मी म्हणेल त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे आहे ते वसंतराव या व्यक्तीचा प्रवास, संघर्ष समजून घेणे. एक सामान्य माणूस त्याच्या आत दडलेला असामान्य गायक ज्याला फक्त गायचे नाही तर साऱ्या चौकटी मोडून गायचे आहे, त्यांच्या मनातली ही खदखद समजून घेणे अधिक महत्वाचे वाटते. हा संघर्ष जर समजला तरच वसंतराव देशपांडे मोठे गायक का झाले हे समजायला सोपे पडते. त्यासाठी मी वसंतराव हा एक वेगळा अनुभव नक्कीच घ्यायला हवा.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
चित्रपट बघीतला नाहीये अजून.
आता बघेन,

छान परिचय. मी थिएटरमध्ये बघितला होता आणि खूप आवडला होता. अत्यंत परिपूर्ण आणि सर्वांगाने सुंदर असा चित्रपट आहे. दोष मला फक्त २ जाणवले - १. पुलं पात्र आणि २. शेवटची मैफिल. त्या शास्त्रीय गाण्यात निदान राहुलकडून उगाच आ ऊ करणे आणि गायकी सोडून नुसत्या नको त्या करामती करणे ही अपेक्षा नव्हती, म्हणून खटकले. बाकी ठीक आहे. कदाचित ह्यालाच आजकाल टाळ्या मिळतात म्हणून केले असावे. पण हे दोष फारच छोटे आहेत. संपूर्ण चित्रपट अगदी बघण्यासारखा आहे. तुमच्या वरच्या सर्व मुद्यांशी सहमत.

वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल छान माहिती, लेख... मृगनायना आणि बगळ्यांची माळ माझे आवडते...

संरक्षण खात्यामधे नोकरी करायचे हे माहित नव्हते.

मला फारसा नव्हता आवडला. थिएटरमध्येच बघितला होता. पुलंचं पात्र जमलेलं नाही हे एक कारण झालंच, पण भीमसेन जोशींचा आणि वसंतरावांचा चांगला स्नेह होता, तरी त्यांचं पात्र का नाही? अजूनही काही गोष्टी नव्हत्या आवडल्या, पण आता आठवत नाहीत.

मी पण परवाच पाहिला हा. लांब आहे जरा पण छान घेतला आहे. मराठीत हल्ली निघणार्‍या बटबटीत आणि आळशी कन्टेन्ट पेक्षा फार उजवा आहे. सगळी कॅरेक्टर्स जेन्युइन वाटतात. राहुल देशपांडेचे गाणे आवडतेच पण यात पडद्यावर वावर पण सहज वाटला. पुलंचे पात्र पण कार्टूनिश - विदुषकी न घेता ह्यूमन घेतले आहे ते मला अ‍ॅक्चुअली आवडले. अनिता दाते - त्यांच्या आईचे कॅरेक्टर पण आवडले. गाणी पण मस्त.
भीमसेन जोशी, कुमार गंधर्व ही पात्रे पुलंच्या सिनेमात बघायला आवडली होती. इथे ती दिसली नाहीत.

धन्यवाद हर्पेन, हरचंद पालव, उदय, सायो, वावे, maitreyee
चित्रपट उद्या कलर्स टिव्हीवर दिसणार आहे. तसेच जियो सिनेमावर कधीही बघू शकता. काही आंतरराष्टिय विमानात देखील आहे.

भीमसेन जोशींचे पात्र का नाही हा प्रश्न मलाही पडला. कदाचित जो प्रवास दाखवायचा होता त्यात ते नसतील. तरीही काही समकालीन कलाकारांचे नांव यायला हवे होते. चित्रपट चांगला आहे. अवश्य बघा. मेहनत घेऊन बनवलाय. दोष आहेत ते तितके बोचत नाहीत.

मला सिनेमा आवडला. अशा मोठ्या कलाकारांनाही पोटाची भ्रांत चुकत नाही. पूर्वीचे राजे कलाकारांना राजाश्रय देत असत, तसं आता आधुनिक युगात शक्य नाही. त्यामुळे ह्या 'देवाघरचे देणे' मिळालेल्या नशीबवान मंडळींना कला बाजूला ठेवून गरगरीत वाटोळ्या रूपयाची आराधना करावी लागणार.
बेगम अख्तर गझल गात असताना पडदे उडत असतात. सिनेमात गझल गाताना शमादानं आणि उडते पडदे असावेच लागतात बहुतेक.
वसंतरावांच्या तरूणपणी पु.ल. पुण्यात होते का? तेव्हा ते मुंबई, बेळगाव, दिल्ली असे कुठेकुठे असतील बहुतेक. लावणी गाणाऱ्या बाईंकडे जाताना पु.ल. ड्रायव्हर सीटकडे जाताना दाखवले आहेत. पु.ल. कधीही ड्रायव्हिंग करत नव्हते. ही एक बारीकशी चूक.
राहुल देशपांडेचं गाणं खूप आवडतं. ह्या सिनेमातली गाणी आवडली. पण कट्यारमधली गाणी जशी लक्षात राहिली, तशी ह्यातली राहिली नाहीत. वसंतरावांचं आयुष्य जास्त लक्षात राहिलं.

धन्यवाद अनया
पुलं गाडी चालवत नव्हत ही माहीती मला नव्हती. वसंतरावांच्या तरुणपणी पुलं पुण्यात होते का माहित नाही. परंतु वसंतराव आणि पुलं यांच्या स्नेह चाळीस वर्षाचा होता असे स्वतः वसंतरावांनी मुलाखतीत सांगितले होते. तेंव्हा पुल आणि वसंतराव यांची भेट वसंतराव २३ वर्षाचे होते तेंव्हापासून तरी असला पाहिजे. भेटी होत असतील. ते पुण्यातच असतील असे नाही. सिनेमात तसे दाखविले असेल.

कट्यारमधली काही गाणी कट्यार नाटकातील होती आणि दुसरे म्हणजे झी टिव्हीने दिवसरात्र चोवीस तास ती गाणी वाजविली. गाणी यातलीही लक्षात राहण्यासारखीच आहे.

त्यातला तो लाहोरच्या गुरूंनी शिकवलेला मारवा फार छान आहे. त्या मुलाचही काम उत्तम झालं आहे. त्याची चेहरेपट्टी लहानपणीचा राहुल देशपांडे वाटेल अशीच आहे. अभिनय उत्तम हे जास्त महत्त्वाचं.

मारवा फारच छान आहे. मी नंतर युट्यूबवर बऱ्याच जणांचा मारवा ऐकला.
मित्रहो, तुम्ही सुनिताबाईंचं 'आहे मनोहर तरी' वाचा. त्यात सुनिताबाईंच्या ड्रायव्हिंगबद्दल आणि पु.लं.च्या ड्रायव्हिंग न करण्याबद्दलचे किस्से आहेत.
पु.ल. आणि वसंतराव दोघांची अगदी जुनी आणि घट्ट मैत्री होती. पु.लं.नी 'वसंतखाँ देशपांडे ' असा लेख त्यांच्यावर लिहीला आहे. बहुधा 'गुण गाईन आवडी' पुस्तकात आहे.

वसंतरावांबद्दल मला खुप ममत्व आहे व त्यामुळे राहुलबद्दलही.

वसंतवारांबद्दल वाचले ते पुलंच्या लिखाणातच. त्या दोघांची भेट बहुधा दोघांच्याही ऐन तारुण्यात झाली असावी. त्या पहिल्या भेटीचे वर्णन एका लेखात आहे, पुलं तेव्हा गायन करत व वसंतराव तबला वाजवत. पण लवकरच दोघांनीही ही चुक दुरुस्त केली व पुणेकरांना एका मोठ्या मनस्तापातुन वाचवले असे त्यांनी लिहुन ठेवलेय. मिलिटरीच्या पे व अकाऊंट्समध्ये कारकुनी करत वसंतरावांनी दिवस काढले, तिथल्या लोकांनी प्रचंड मनस्ताप दिला, दुरगावी बदल्या केल्या, त्यामुळे काही आजार कायमचे गळ्यात पडले पण आईला दिलेल्या वचनामुळे त्यांनी आई असेतो नोकरी सोडली नाही हेही पुलंनी लिहुन ठेवले आहे. वसंतराव गेले तेव्हा भारतीय संगीतातले ब्रम्हकमळ असा उल्लेख असलेला मथळा लोकसत्तातल्या पहिल्या पानावर वाचलेला आठवतो. पुलंचा तेव्हा एक विस्तृत लेखही बहुतेक लोकसत्ताने छापला होता (तेव्हाचा तो साहित्यप्रधान लोकसत्ता कधीच गतप्राण झाला).

यातले चित्रपटात किती आलेय माहित नाही. रिलिज झाला तेव्हा थेटरात जाऊन बघणे शक्य नव्हते. नंतर विस्मरणात गेला. या लेखामुळे आठवण झाली. आता नक्की पाहिन. लेखासाठी धन्यवाद..

खूप छान लेख लिहिलाय. तुमच्या लेखनातले बहुतेक मुद्दे चित्रपट पाहताना पोचले. विशेषतः वसंतरावांची गाणी न वापरता नवी गाणी बनवणं आणि त्यातूनही वसंतराव पोचवणं हे शिवधनुष्य उत्तम पेललं आहे.
आणि आज हा चित्रपट टीव्हीवर आहे हे लिहिलंत , त्यामुळे सकाळी लेख वाचला आणि आता चित्रपट पाहता आला. त्यासाठी खास धन्यवाद.

माझ्या आठवणीत ज्या कलाकारांच्या जाण्याने धक्का बसला ते वसंतराव आणि दुसरा संजीवकुमार.
वसंतरावांचा दूरदर्शनवरचा नाट्यसंगीतावरचा आशा खाडिलकरला घेऊन केलेला कार्यक्रम अजूनही लक्षात आहेत. त्यांची गाणी तर अविस्मरणीयच आहेत. पुरुषोत्तम दारव्हेकरांचं पात्र त्यांच्यासारखं दिसलंय आणि शेवटी मानवंदना घेताना पं.जितेंद्र अभिषेकींही उभे केलेत.

आता न आवडलेल्या काही गोष्टी - पु ल तितकेसे जमले नाहीत असं वाटलं. दुर्गा जसराजची अख्तरीबाईही नाही आवडली. बेगम अख्तरच चेहरा खूप काही सोसलेल्या बाईचा वाटतो आणि तरीही आवाजात एक गुर्मी आहे.
चित्रपटातील पात्रांचं धन्यवाद म्हणणं. वसंतरावांच्या आईने चहा घेणार की कॉफी असं विचारल्यावर त्या काळात आणि त्यांच्या परिस्थितीत कॉफी खटकलं. काही संवाद अगदी आजच्यासारख्या पद्धतीने आलेत आणि म्हटलेत. पुलंच्या तोंडचा रसिक श्रोतेच काय ते करतील यातलं रसिक श्रोते पुस्तकी वाटलं. वसंतरावांनी चित्रपटासाठी गातलेल्या गाण्यांचा उल्लेखही झाला नाही.

संध्याकाळी पुन्हा असेल तर पुन्हा पाहीन.

खूप धन्यवाद हरचंद पालव, साधना, भरत
@भरत माझा लेख वाचून तुम्ही चित्रपट बघितला हे वाचून खूप आनंद झाला. चहा की कॉफी हे त्या काळात नव्हते माहित नाही. परिस्थितीत कॉफी खटकले हे बरोबर. कदाचित नागपूरच्या भाषेचा अभ्यास केला तसा पुण्यातील भाषा समजण्यात राहिला असेल. तुमची निरीक्षण शक्ती प्रचंड आहे.

@ साधना चित्रपट आज कलर्स मराठीवर होता. तसेच चित्रपट जियो सिनेमावर उपलब्ध आहे. केव्हाही बघू शकता. तु्मही उल्लेखलेल्या दोन गोष्टी चित्रपटात नाही ते सिनेमा बघितला तर लक्षात येईल. बाकी सारे आहे. एक गोष्ट काहीशी प्रतिकात्मक पद्धतीने आहे.

मला आणखीन एक जाणवले मी जी मुलाखत बघितली होती त्यात वसंतरावांचे त्यांच्या चुलत्याशी नंतरही संपर्क होता पण चित्रपटात तसे नाही. सिनेमा आयुष्याप्रमाणे अगदी जसाच्या तसा दाखविता येत नाही.

गायक, संगीतकार आणि मुख्य अभिनेता म्हणून राहुलने अप्रतिम काम केलं. शिवधनुष्याची उपमा मगाशी वापरून झाली. तीच पुन्हा सुचली.

आज वसंत खाँ देशपांडेंचा ४०वा स्मृतिदिन. फेसबुकवर एका परिचिताने सुनीताबाईंनी वसंतरावांबद्दल लिहिलेला मजकूर शेअर केला (सुनीताबाई, पुलंच्या लेखनातले अंश अपलोड करणारी पेजेस आहेत, त्याद्वारे) तेव्हा कळलं.
कलर्स मराठीने चांगले औचित्य साधले.

चित्रपटातील पात्रांचं धन्यवाद म्हणणं >> अगदी अगदी. परवाच पुलंची एक मुलाखत बघितली. त्यात ते म्हणाले की 'मराठीत थँक्यूसाठी शब्द नाही. मराठीत थँक्यू हे चेहऱ्यावर दिसतं. ते म्हणून दाखवलं तर ते कृत्रिम वाटतं.' आता त्याच पुलंच्या तोंडी ह्या सिनेमात धन्यवाद बघून त्याची प्रचिती येते.

भालोचा अर्थ वेगळा आहे ना? छान, चांगलं - असा?
होय. पण धन्यवादपेक्षा बरा वाटतो.
पुलं बंगाली शिकले. मग भालो घेऊ.

बाकी पुलंनी वसंताला नोकरी सोडण्याचा आग्रह केला असेल तर चुकलेच. "मला हवं तसंच गाईन" हे कायम रेटता आलं असतं.

धन्यवाद अनया हो आहे मनोहर तरी खूप दिवसांचे वाचायचे आहे. नक्की वाचील.
धन्यवाद म्हणण आजही योग्य वाटत नाही तेंव्हा तरी नक्कीच नाही. मला मात्र ते जाणवल्याचे आठवत नाही. परत बघावे लागेल.

वडापाव तरी होता आता पुण्यात होता की नाही ते माहित नाही.

धन्यवाद भ्रमर SRD
धन्यवाद भरत मला सुद्धा काल फेसबुक की इंस्टावर वसंतराव देशपांडे यांचा स्मृती दिन होता हे कळले. कदाचित तेच औचित्य साधून कलर्स ने काल सिनेमा दाखविला असेल.

"मला हवं तसंच गाईन" हे कायम रेटता आलं असतं.
>>मला वाटत हे नंतरही बऱ्यापैकी रेटणं जमलं असेल. ते तसच राहिलं असत तर आज चित्रपट बनला नसता, ना गाणी खूप ऐकली असती ना आपण इथे चर्चा केली असती.

नोकरीतल्या पैशाने अधिक पुलंच्या हितचिंतकाकडून पैसे जमवून वर्षभरात दोन कार्यक्रम सहज ठोकता आले असते. आणि निमंत्रित ठेवायचे नाहीत. तिकिटं विकत घेऊन पाहून मग मांडू द्यावी मतं. नेटाने मार्केटिंग करता आलं असतं.
_________
अवांतर सुरू
(सुधीर फडके स्मृती कार्यक्रम श्रीधर फडके आणि मंडळींनी फुकट ठेवला तेव्हा रस्त्यावरून गर्दी करून ऐकणाऱ्यांनी खूप टीका केली होती -"ढिसाळ नियोजन". )चार हजारच्या सभागृहांत सात हजार कसे बसणार? अवांतर समाप्त.

मला वाटत या जरतरच्या गोष्टी तो काळ समजल्याशिवाय कळणार नाही. तो काळ कसा होता, परिस्थिती काय होती माहिती नाही. सत्य हे आहे वसंतरावांनी नोकरी केली मग कालांतराने संपूर्ण गायनात उडी घेतली. ते आधी मैफिलीत गात नव्हते असे नाही तसे असते तर त्यांची आणि बेगम अख्तर यांची ओळख कशी झाली असती. तसेही आज या जरतरच्या गोष्टी आहेत त्याला काही अर्थ नाही.

छान लिहिलंय... मी कालच जिओ सिनेमावर पाहिला. (फ्री आहे असं दिसलं, म्हणून लगेच पाहिला.)

तुम्ही लिहिलेले सगळे मुद्दे पटले. गाणी वेगळी घेतल्यामुळे वसंतरावांवर लक्ष केंद्रित होतं, हे तर फारच!
फ्लॅशबॅकमध्ये गोष्ट सांगतानाच्या संवादातल्या दुसर्‍या पात्राची कल्पनाही आवडली. ते पात्र कोण असेल याचा आधी अंदाज येत नाही. (मला तरी नाही आला.)
आपल्याकडे चांगले बायोपिक्स तसे दुर्मिळच. त्यात हा वेगळा आणि त्यातल्या त्यात जमलेला वाटला.
मात्र राहुल देशपांडेच्या ऐवजी कुणीतरी चांगला कसलेला अभिनेता हवा होता, असं सतत वाटत होतं. फक्त प्लेबॅकला रा.दे. हवा होता. काही कळीच्या प्रसंगांमध्ये - उदा. नेफामधली घालमेल, बाप परत येऊन भेटतो, बापाला वसंतराव खोलीवर जाऊन भेटतात, बिदागीचं ३५० चं पाकीट - रा.दे. फारच कमी पडलाय.
पु.ल. पात्र मला आवडलं. त्यांच्या जनमानसातल्या इमेजमधून बाहेर काढलेलं पात्र वाटलं.

धन्यवाद आश्विनीमामी, ललिता-प्रीति
@ललिता-प्रीति मला ते ३५० चं पाकीट च्या प्रसंगात काही प्रमाणात जाणवले. इतर ठिकाणी तसे काही वाटले नाही. मलाही ते पात्र कोण असेल याचा अंदाज आला नाही. चांगले बॉयोपिक्स दुर्मिळ याचे एक कारण हे असते की एखादी व्यक्ती रंगवताना त्याचे इतके चांगले गुण रंगवले जातात की ते खरे वाटत नाही. त्या तुलनेत यातले वसंतराव देशपांड एक माणूस वाटतात शेवटपर्यंत म्हणूनच तो संघर्ष larger than life वगैरे न वाटता आपला वाटतो.

जिओवर काल पाहिला. चांगला बनवलाय. तेव्हाचा काळ म्हणजे स्वातंत्र्यपुर्व काळ तितकासा उभा करता आला नाही, विशेषतः भाषेच्या बाबतीत, असे वाटले पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. बायोपिक असल्याने कुठल्या सालातली घटना किंवा कुठले साल सुरु आहे हे दाखवले असते तर काळाचे स्थित्यंतर कळले असते. वसंतरावांनी पुलंच्या चित्रपटात व इतरत्रही गाणी गायलीत. लावणी प्रसंगात पुल त्या प्रकारच्या गायकीचे कौतुक करतात त्यानंतर चित्रपट कारकिर्द येईल असे वाटले होते, कदाचित संकलकाने कात्री चलवली असेल. लांबी अजुन वाढली असती. अर्धा चित्रपट तर नुसत्या गाण्यांनी भरलाय. अर्थात गाणी सुरेख आहेत.

वसंतरावांचा संघर्ष पुलंचे लिखाण सोडुन अन्यत्र वाचला नाहीय. ते नागपुरी हे माहित नव्हते, मला ते लाहोरी वाटले होते. (लाहोरात खुप मराठी कुटुंबे आहेत हे चित्रपटात ऐकुन चिनुक्ष आठवला Happy )

त्यांचा संघर्ष पाहुन वाईट वाटले. त्यांच्या गाण्याविषयी अढी असलेल्या दिग्गजांमुळे त्यांचा प्रवास अधिक खडतर झाला असे वाटले. कट्यार .. त्यांच्या पन्नाशीत आले, म्हणजे उमेदीची सगळी वर्षे अशीच निघुन गेली. ज्या यशावर त्यांचा हक्क होता ते यश त्यांना लाभले नाही पण राहुलच्या नशिबी ते आले यातच आनंद..

चित्रपट तसा चांगला बनवलाय, उगीच लार्जर दॅन लाईफ बाहुल्या उभ्या केल्या नाहीत. ३५० रुच्या प्रसंगात सामान्य माणसाने जशी प्रतिक्रिया दिली असती तशीच ती वसंतरावांकडुन आली असे वाटले. (त्या बाईची वेशभुषा आजची वाटली).

अभिनयात सगळे व्यवस्थीत. पुल पण एकदा सवय झाल्यावर नंतर खटकले नाही. राहुल मात्र काही प्रसंगात कमी पडला, लावणी आणि अजुन एका गाण्यात त्याला लिप-सिंक जमले नाही याचे आश्चर्य वाटले, गाणी त्यानेच गायली असुनही. वडिलांशी झालेल्या भेटीतही त्याच्या भावना निट कळल्या नाहीत.

एकंदर एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले. आवडला. गाण्यांसाठी कदाचित परत पाहिन. कंटाळा येणार नाही.

नोकरीतल्या पैशाने अधिक पुलंच्या हितचिंतकाकडून पैसे जमवून वर्षभरात दोन कार्यक्रम सहज ठोकता आले असते. आणि निमंत्रित ठेवायचे नाहीत. तिकिटं विकत घेऊन पाहून मग मांडू द्यावी मतं. नेटाने मार्केटिंग करता आलं असतं.>>>>>

हे आता वाटते तितके तेव्हा सोपे नसावे.

पुलंच्या नाट्य प्रयोगानंतर नाटकाच्या प्रॉपर्टीच्या ट्रंका परत घरी आणायला वाहन मिळायचे नाही म्हणुन एक सेकंडहँड गाडी घेतली. पण त्या ट्रण्का घरी वर दुसर्‍या का तिसर्‍या मजल्यावर चढवायला माणसे नसत म्हणुन कंटाळुन प्रयोग बंद केले असे ‘आहे मनोहर तरी…’ मध्ये वाचल्याचे आठवतेय. इतक्या बेसिक गोष्टी ज्या काळात कठिण होत्या त्या काळात गाण्याच्या कार्यक्रमाचे मार्केटिंग काय जमणार.. तेव्हाचे बहुतेक गायक खाजगी मैफिली गाजवुनच प्रसिद्ध झाले असे तेव्हाचे उल्लेख वाचुन वाटते. सार्वजनिक मैफिली गणेशोत्सव, शारदोत्सव किंवा मुद्दाम ठेवलेले जाहिर कार्यक्रम याद्वारेच होत होत्या बहुतेक.

Pages