बालपणीची बहीण भावाची भांडणं !

Submitted by ढंपस टंपू on 26 July, 2023 - 04:51

लहानपण आपण कधीच विसरत नाही.
बालपण जिथे गेले तिथे खूप वर्षांनी पाय ठेवल्यावर मन भरून येतं.
जिथे खेळ खेळलो त्या जागांकडे नजर जाते.
तिथे काही बदल झाले असतील तर मन खट्टू होतं.

बालपणीची सर्वात सुंदर, मजेशीर आठवण काय असेल ?
ज्यांनी ती अनुभवली नाही त्यांना कळणार नाही कि त्यांनी काय मिस केलं ते !

ती म्हणजे बहीण भावंडांची भांडणं.
अगदी मारामार्‍या पण.
बहीण नेहमी तक्रारी करतेच. पण कधी कधी भाऊ पण तक्रार करायचा.
पण कुणीही तक्रार केली तरी ओरडा त्यालाच पडलाय हे तुमच्याकडे व्हायचं का ?

भावाच्या सततच्या खोड्या. एकच बाथरूम आणि एकच बेडरूम असेल तर मग सततची भांडणं.
कपडे बदलण्यासाठी, अंघोळीला वेळ लागला म्हणून, बाथरूम अडवलं म्हणून.
कुणीच कुणाला समजून घ्यायचं नाही.
एखादे दिवशी भाऊही मुद्दाम करायचा.
पण त्याला मग आईचा ओरडा पडायचा.
"अरे यार, मलाच का बोलतात सगळे ?"
हा भावाचा स्टॅण्डर्ड डायलॉग.

उशीची मारामारी झाली नाही असे भाऊ बहीण विरळाच.

आता ती भांडणं आठवली कि खुदकन हसायला येतं.
डोळ्यात पाणी येतं...

होतं का असं ?
येऊ द्या मग.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेंटी केलेस मित्रा
ना बहीण ना भाऊ .. एकुलता एक जन्माला आलोय.. शेर अकेले आता है वगैरे वगैरे..
पण आता माझ्या पोटी जन्म घेतलेल्या बहीण भावांना कुत्र्या मांजरीसारखे भांडताना बघतो तेव्हा जाणवते काय मिस केले.. म्हणून आता त्यांच्या सोबत भांडणात सामील होऊन ते आयुष्य जगून घेतोय..

एक माझा लहाणपणी चा किस्सा
आम्ही भावंडं सगळे वरणभात खात होतो..माझा चार वर्षांनी लहान भाऊ मला कशावरून तरी चिडवत होता मला इतका राग आला कि काय करावं समजेना आणि वरणभाताचं ताट मी त्याच्या डोक्यावर पालथं केलं होतं.

मला माझा दुष्टपणा आठवतो नेहमी हा विषय निघाला की.

मी घरासमोर पतंग उडवत होतो. माझी धाकटी बहीण पण आली. ती म्हणाली आपण गच्चीवरुन उडवू मस्त. मला पण ती कल्पना आवडली आणि आम्ही गच्चीवर गेलो. पतंग उडाली मस्त पण लगेच समोरच्या पिंपळाच्या झाडाला अडकली. ती मला नीट उडवता येत नाही का म्हणाली आणि मी आधीच पतंग गेल्याच्या दु:खात होतो तो चिडलो आणि तूच मला गच्चीवर आणलं तुझ्यामुळेच अडकली असे म्हणुन तिला एक ठेवून दिली Sad ती रडायला लागली. तो चेहरा आठवला की मलाही रडायला येतं अजूनही, काय हा दुष्टपणा! श्या!

मस्त धागा. भरभरून आठवणी आहेत.

बेडवर बसुन पुस्तकं वाचायला allowed होतं, अभ्यास नाही. आणि कार्पेटवर बसुन इतर activity, art n craft किंवा प्रोजेक्ट करायचो. काही तरी कारणाने भांडणं पेटायची आणि तह झाल्यावर चादर /कार्पेट वरचे डिझाईन मधले चौकोन किंवा फुलं अर्धे अर्धे विभागुन दोन तट पाडले जायचे. Strict warning असायची की एकमेकांच्या हद्दीत जायचं नाही, पण अंगात खोड्या असल्यामुळे बॉर्डर लाईनच्या फुलावर किंवा चौकोनाच्या रेघेवर बोट ठेवायचो आणि मग बोट माझ्या भागात किंचित आलं म्हणून पुन्हा भांडणं. आम्हाला मज्जा यायची. पण मोठ्या लोकांना मात्र वैताग येत असेल.

किंवा मग एकमेकांना बाथरूमची कडी बाहेरुन लावून आत अडकवणे, कोणी तरी वाचत असेल तर AC किंवा lights बंद करून पळुन जाणे. (यासाठी मात्र मला माझा दादा ओढत त्याच्या रूम पर्यंत आणायचा आणि परत माझ्याच बोटाने बटण चालु करायचा. हे मात्र आम्ही अजुन करतो आणि आमची मुलं आम्हाला looks देतात. )

आम्हा भावांना बहीण नाही. चुलत वगैरे लांबूनच. त्या खूप लहान होत्या.
त्यामुळं भांडणं जी काही व्हायची ती आपसातच व्हायची. दोन नंबरचं भावंड व्रात्य असतं असं म्हणतात.
आमचा मधला भाऊ धाकट्याला त्रास द्यायचा. सगळ्यांनाच द्यायचा तसा.
पण भाऊ बहीणीचं भांडण मुलांच्यात बघतोय. वेगळंच असतं हे. Lol

दोन नंबरचं भावंड व्रात्य असतं असं म्हणतात>> बरोबर.. Wink मी १ नं. ची असल्याने सहमति! Wink
लहानपणी एकमेकींना नेहमी प्रमाणे भांडत मारत असताना लहान बहि‍णीने काहीतरी म्हटलं मला इतका राग आला की खदखदा हसणार्या तिला मी गोल फिरवून समोरच्या गोदरेज कपाटा वर (पुर्वी मेटल ची कपाटं वीथ आरसा असायची) आदळलं.
तिचा समोरचा दात (दुधाचा नाही) अर्धा तुटला, कारण ती खिदळत होती.
आरशाला तडा गेला, तरी ती हसतच होती Rofl
मग आई ने जे घडले ते पाहिले आणि माझी पूजा बांधली!

आता मुलं तशीच वैर्या सारखी भांडत असतात Sad

Aashu29 Lol

दोन नंबरचं भावंड व्रात्य असतं असं म्हणतात>> बरोबर>>>माझं पण अनुमोदन...( पण मुलांच्या बाबतीत.. कारण मी एक नंबर आहे आणि मीच लहानपणी जास्त व्रात्य होते)