अंमली - भाग १५!

Submitted by अज्ञातवासी on 23 July, 2023 - 07:52

अंमली भाग १४ - https://www.maayboli.com/node/83725

ज्याला हव्या तशा, हव्या तितक्या बंदुका प्रत्येकजण उचलून घेऊ लागला.
"बंदुका पुरणार नाही सगळ्यांना." अण्णा म्हणाले...
"...यातल्या सगळ्या बंदुका परत येतील."
"का?"
"कारण यांच्यापैकी कुणालाही रायफल आणि मशीनगन चालवता येत नाही. मलाही नाही."
सगळ्यांनी अक्षरशः लूट केली.
"ओके. सगळ्यांनी ओळीत उभी रहा."
सगळेजण ओळीत उभे राहिले.
"तुमच्यापैकी कुणाला रायफल चालवता येते." हात वर करा.
पाच सहा जणांनी हात वर केले.
"तू. इकडे ये." तो म्हणाला
एक बुटका हसत पुढे आला.
"रायफल चालवता येते?"
"हो."
"अच्छा सांग कशी चालवतात."
त्याने समोर नेम धरला, आणि ट्रिगर दाबायला सुरुवात केली.
"हरामखोर, मॅगझिन तुझा बाप लोड करेल? आण इकडे..." तो चिडला आणि त्याने बंदूक हातात घेतली.
"सगळ्यांनी जशा आणि जिथून बंदुका आणल्या, तशाच ठेवा. एक जरी बंदूक इकडे तिकडे गेली. तर त्याला समोरच्या तोफेच्या तोंडी दिलं जाईल."
सगळेजण घाबरले.
"...सगळ्यांची लवकरच ट्रेनिंग सुरू होईल. तयार रहा... चला निघा... "
सगळेजण व्यवस्थित बंदुका रचून निघाले.
तिथे फक्त अण्णा आणि तो थांबले.
"मीही निघतो." अण्णा म्हणाले.
"थांबा. पार्टनर म्हणून तुम्हाला काही सांगणं मला जरुरी वाटतं."
"बोल."
"आजपर्यंत मी कधीही तुमच्या ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा सप्लाय चेन म्हणा, त्यात पडलो नाही. पण मला माहिती आहे, त्या धंद्यात तुमचे साथीदार कोण आहेत."
गौडाने प्रश्नार्थक मुद्रा केली.
"देवराज जाधव, भारतासाठी... आणि लिओनेल डिसुझा... उरलेल्या जगासाठी..."
गौडा फक्त हसला.
"आश्चर्य नाही वाटलं?"
"नाही. कारण कधी ना कधी तुला हे माहिती पडणारच होतं. पण कळलं कस ते सांग."
"सोपं होतं अण्णा, शेलारांच्या नजरेतून सुटेल, अशी बेकायदा गोष्ट नाशिकमध्ये आजतरी नाहीये. कारण त्याचं कारण आहे त्यांचं नेटवर्क. त्यांची सहा भुते. आणि एवढा माल बाहेर पोहोचवायचा, तर देवराज जाधव शिवाय कुणाचं नेटवर्क एवढं तगडं नाहीये.
डिसुझा मात्र माझ्यासाठी सरप्राइज होता. मला वाटलं नव्हतं कधीही, की डिसुझा यात असेल. पण दारूच्या थेंबाला स्पर्श न करणारा वसंता गौडा, वाईन कॅपिटलला महिन्यातून दोनदा फेऱ्या मारतो म्हटल्यावर, थोडी शंका आली. आणि शंका खरी ठरली."
"तुला एक ना एक दिवस हे मी सांगणार होतो, पण ठीक आहे. आज तुला कळलं. लवकरच तुझी त्या दोघांशी भेट होईल. आता मला एक सांग. देवराज जाधवची मदत न घेता, तू हे चार कंटेनर रशियातून भारतात आणले कसे? हे अशक्य आहे..."
"... कोण म्हणतं हे कंटेनर रशियातून आलेले आहेत?" तो हसला
"काय?" अण्णा चक्रावला.
"काही रहस्ये रहस्येच राहू द्या अण्णा." तो हसत तिथून निघूनही गेला.
******
दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसमध्ये आला.
तेवढ्यात मेसेज वाजला.
'Good Morning Sir, will be late by an hour. Kindly allow my sister to also come along with me.'
तो हसला, आणि त्याने फोन फिरवला.
"खाली डीस्पले करा, प्राजक्ता एंटरप्रायजेस वेलकमस शरावती कुलकर्णी. अमूलच्या डार्क चॉकलेटस मागवून ठेवा. ब्लॅक कॉफी, आणि रेग्युलर गुड डे बटर, ब्ल्यू पॅकेट मधला."
"येस सर." तिकडून आवाज आला.
तो उठला आणि समोरच्या काचेसमोर उभा राहिला.
' आज छाती धडधड का करत नाहीये? ' त्याने स्वतःशीच विचार केला.
तेवढ्यात एक कार सिक्युरिटी गेटवर येऊन थांबली.
ही कार तो ओळखत होता.
साक्षीची गाडी.
आणि सोबत शरा होती.
एकेकाळी त्याची असलेली शरा...
जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं ती शरा...
जिच्यावर तो सर्वस्व उधळून लावायला तयार होता.
त्याने निःश्वास सोडला. वेस्टकोटची बटणे लावली. टाय नीट केला.
केस नीटनेटके बसवले, डोळ्यावर डार्क गॉगल चढवला...
...आणि थोडा वेळ विचार करून पुन्हा केस विस्कटून टाकले.
तो गॅलरीत उभा राहिला. खाली विविध लोक काम करत होते.
ती लिफ्टमधून बाहेर आली...
...तो तिच्याकडे बघत होता, निश्चल नजरेने.
मात्र त्याची नजर तिला दिसत नव्हती.
ती नेहमीसारखीच जीन्स, एक बाह्या दुमडलेला टॉप, फ्लॅट कॅनव्हास शूज या अवतारात होती.
तो थोडावेळ तिच्याकडे बघत राहिला, व आत गेला.
तिलाही ते समजलं होतं.
"ताई." साक्षीच्या हाकेने ती भानावर आली.
"माझी केबिन." तिने एका केबिनकडे बोट दाखवत म्हटले.
"मोठी आहे ग."
"कंपनीतील दोन नंबरची मोठी केबिन." "सगळ्यात मोठी वर आहे..."
"हमम."
"ताई तू नर्वस आहेस?"
"थोडीशी..."
"...तू म्हणशील तर आपण परत जाऊयात."
"नाही साक्षी. आलीय तर त्याला भेटूनच जाईन."
"एकस्क्युज मी." एक मुलगी अदबीने त्यांना म्हणाली.
"येस." साक्षी म्हणाली.
"सरांना तुम्हाला भेटायचं आहे."
"हो, सांग त्यांना, मी येतेय."
"नाही. ते येतायेत खाली. तुमच्या केबिनमध्ये."
ती चमकली.
"ओके. वी विल वेट देयर." ती म्हणाली, आणि केबिनमध्ये बसली.
"ही इज अनप्रेडीक्टेबल, एव्हाना तुला कळायला हवं होतं." शरावती म्हणाली.
"मे आय कम इन मॅम." तेवढ्यात मागून आवाज आला.
तो मागे हसत उभा होता.
"हाय सर." साक्षी कसंनुसं हसली.
"सॉरी, आय एम लेट. तू रेजिग्नेशन देतेय तर मला आता काम समजून घ्यायला हवं, त्यातच बिजी होतो."
तो शराकडे वळला.
"हाय मॅम. आय एम हर बॉस. वी विल मिस अ ग्रेट असेट लाईक हर."
तिने फक्त मान हलवली.
"साक्षी, चिटणीसांकडून तुझे काही पेमेंट बाकी असतील, क्लियर करून घे. तोपर्यंत मी मॅमला आपल्या ऑफिसची टूर घडवतो. चला."
शरावती भांबावून त्याच्या सोबत निघाली.
"हे मेन फ्लोर, इथे सगळी टॉप मॅनेजमेंट असते."
तो बोलत होता, ती ऐकत होती.
शेवटी दोघेही त्याच्या केबिनमध्ये आले.
"कसं आहे ऑफिस?"
"वन ऑफ द बेस्ट."
"तू स्वप्न बघितलं होतं तसच ना?"
ती अचानक चक्रावली.
तेवढ्यात कॉफी आणि बिस्किटे आली. सोबतच अमूलची मोठी डार्क चॉकलेट...
"ती हसली."
"तू बरा आहेस ना आता?"
"कसा दिसतोय?"
"अगदी कॉलेजमधला... वेस्टकोट काढलास तर."
"त्याने स्मितहास्य केलं."
थोडावेळ कुणीही काहीही बोललं नाही.
"कधी परत आलीस? मला कळलंच नाही."
"आपला कॉन्टॅक्टच राहिला नव्हता."
"अजूनही नाहीये शरा, आणि तो रहावा यासाठी मी तुला बोलावलं नाहीये."
"मग का बोलावलं आहेस? तुझं हे वैभव दाखवायला?"
"नाही. तुला हे सांगण्यासाठी, की मी जगलो शरा. मी वेडा झालो नाही. जसं तू प्रेडीक्ट केलं होतं."
"तसा तू होतास. तसाच तू होतास. तुझं माझ्यासाठीच वेड एकतर तुला जीवघेणं ठरलं असतं, नाहीतर मला."
"माझी चूक काय होती शरा?"
ती अचानक बोलायची थांबली.
"माझी चूक काय होती? अचानक एक दिवशी सगळं संपलं ग. मला आजपर्यंत कळलं नाही, माझी चूक काय होती."
"आपण पुन्हा वाद घालायचे आहेत आता?"
"नाही. मला सॉरी म्हणायचंय तुला."
"तू खूपदा म्हटला आहेस हे."
"पण आज तू परत यावीस, म्हणून सॉरी म्हणत नाहीये शरा. किंबहुना आयुष्यात खूप पुढे निघून आलोय म्हणून म्हणतोय."
ती शांत राहिली.
"कॉफी घे." त्याने कप पुढे केला.
"खूप फेस केलं, डिप्रेशन, ओबेसिटी, अनएम्पलॉयमेंट... आता सगळं नीट होत आलंय. शरा तुझ्यापेक्षाही जास्त मी कुणाच्या प्रेमात पडलोय. पण..."
"... पण काय?"
"गील्ट आहे. आपली मैत्री आपण जगातली सगळ्यात सुंदर मैत्री म्हणायचो. ती का संपली? आणि इतक्या वाईट पद्धतीने? नाही ग. असं नाही चालत मैत्रीत. गेले काही वर्ष हाच गिल्ट खात आलाय..."
...ती काहीही बोलली नाही.
"शरा. आई काय म्हटली होती आठवतंय? ज्याच्या आयुष्यातून लक्ष्मी जाते, त्याचं आयुष्य भकास होतं. तू गेलीस आणि सगळं भकास होतं गेलं. पण आता बहुतेक येईन लक्ष्मी परत. जिच्यासाठी हे सगळं करतोय, मिळेन मला ती. पण त्याआधी सगळं जुनं नीट करायचंय. म्हणून मी तुझी माफी मागतो. माझं काहीही चुकलं असेल, माफ कर. मी मनापासून तुझी माफी मागतोय. तुला वचन दिलं होतं, तू आल्याशिवाय नाही दिसणार तुला. म्हणून आज तू आलीस, आणि..."
"गप्प बस. अगदी अगदी गप्प बस." ती अक्षरशः ओरडलीच.
तो गप्प बसला.
"का, का असं वागतोस? सांग ना? का वचने द्यायची आणि पाळायची असतात, जीव जाईल इतकी? का?
तू मूर्ख आहेस. खरच खूप मोठा मूर्ख. आणि मला कधीकधी तुझी कीव येते.
इतकं मोठं साम्राज्य उभारलं, नजर पुरत नाही इतकी मोठी बिल्डिंग बांधलीस. ज्या मुलीला तू बघितलंही नाहीस, तिच्यावर सर्वस्व उधळून लावतोय, तरीही फक्त एका गील्टमुळे स्वतःला बांधून ठेवतोय?"
"तुला सगळं सांगितलं साक्षीने?"
"एकूण एक शब्द, आणि मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. आहेसच तू इतका वेडा. माहितीये मला. पण काळजी वाटत होती."
"शरा एक सांगू?"
"बोल ना."
"कुणालाच माझी ही बाजू माहिती नाहीये. सगळ्या जगासाठी मी अक्षरशः एक सुपरस्टार आहे. सक्सेसफुल, रीच इत्यादी इत्यादी. पण मी इन्सिक्युर आहे. खूप. मला भविष्याची काळजी लागलेली असते कायम. जर ती मला मिळाली नाही, तर मी जगेन की नाही? किंवा मी पुन्हा त्याच मोडमध्ये परत जाईन. डिप्रेशन, ओबेसिटी, सगळं फेस केलं मी. आता काटा येतो अंगावर. कधीकधी असं वाटतं, आता फाईट न करता काहीतरी तरी सहजरीत्या मिळू दे."
"शक्य आहे का ते? यू आर फायटर. बॉर्न फायटर. तुझ्या ह्याच एटीट्यूडवर मी फिदा झाले होते, आठवतय? सहज मिळालं तर तुलाच नको असेल."
तो हसला.
"कशाचीही माफी मागू नकोस. माफी मागाव असं तू काहीही केलेलं नाहीस. प्रेम केलंस माझ्यावर फक्त. गिल्ट असेल, तर काढून टाक. मोकळेपणाने जग. कुणालाही तू आयुष्यात हवाच असशील रे. प्रेमासाठी काहीही अपेक्षा न करता सर्वस्व उधळणारे खूप असतात."
"शरा मी सगळ्या जगाशी फाईट करू शकत होतो ग."
"पण माझ्यासाठी डोळ्यात पाणीही आणू शकत होतास. शीघ्रकोपी, पुढचा मागचा विचार न करणारा, पण तितकाच समजदार, प्रेमळ आणि हळवा देखील."
"शरा. या जगात मला दोनच व्यक्ती समजावू शकतात. एक माझी आई, आणि दुसरी तू. काय होतीस ग तू कॉलेजमध्ये. मोस्ट स्टायलिश, आणि ब्युटीफूल... शरा तुझा रॅम्प वॉक मला अजूनही आठवतोय. तुझे घारे डोळे माझ्यावर रोखलेले."
"...गुड ओल्ड डेज." ती हसली. "आता काहीही राहिलेलं नाही माझ्यात."
"ये गप. अजूनही तू तितकीच छान दिसतेय."
"नाही रे. मी स्वतःला नाही समजत सुंदर. मीही खूप सोसलं. तू विचार करू शकत नाहीस. लग्न झालं, आणि कळलं तो गे आहे. ही वॉन्ट टू शेयर मी विथ हिज बाय फ्रेंड्स. आले निघून. काहीही करू शकले नाही. डिप्रेशन मध्ये होते, सावरलं स्वतःला आणि आता फ्रिलांसर बनले."
"कधी वाटलं नाही शरा, माझ्याशी बोलावं? माझ्याकडे परत यावं?"
"खूपदा वाटायचं. पण नाही रे, भीती वाटते सगळ्यांची. एकदा तू देवीच्या मंदिराजवळ बसलेला दिसला होतास. तुझी अवस्था बघून खरच सांगते, रडू आलं होतं."
"आणि आता..."
"आय एम हॅप्पी. खरच मी खूप खूप खुश आहे तुझी प्रगती बघून."
"शरा, तुझा आशिर्वाद मागितला होता ना मी जाताना? तुझा आशिर्वाद, दुसरं काय."
"मग आता पुन्हा आशीर्वाद देते, तुझी प्राजक्ता तुला नक्की मिळेल."
"शरा, थँक यू सो मच... खरच खूप खूप..."
"गप्प बस. आणि आशीर्वादाच्या बदल्यात मला काय देणार?"
"तू हवं ते माग, फक्त मला सोडून."
"बघ बरं, मी काहीही मागेन." तिने त्याच्याकडे रोखून बघितले...
त्याने थोडावेळ विचार केला..
"...चल वचन देतो. तू काहीही माग, जर ते माझं असेन तर मी देईन..."
ती हसली.
तेवढयात त्याचा फोन वाजला.
"सर, त्या मुलीची माहिती कळाली. प्राजक्ताच नाव आहे तिचं. जेजे कॉलेज ऑफ आर्ट्स" तिकडून विलास शिंदे बोलत होता...
...त्याचा फोन हातातून गळून पडला...
...तो हर्षरितेकाने स्तब्ध राहिला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरो जबरदस्त!
'आशीर्वाद' च्या ऐवजी 'शुभेच्छा' हवं होतं..

छान