खोली

Submitted by VD on 1 July, 2023 - 06:47

खोलीत आलो, दार बंद केलं,
की प्रवेश होतो माझा माझ्या अथांग जगात.

मावेल खिडकीत, इतके आकाश;
जाणवेल प्रतिबिंब, इतकाच प्रकाश

जरा चंद्र जरा सूर्य, काही तासांचे;
एखाद-दोन चांदणे, अनंत कल्पनांचे;

पाऊस थोडा, काचेवर ओघळणारा
कधी संथ कधी रुद्र, येतो जातो लहरी वारा

जागी स्वप्ने अनेक, अजूनही उश्याशी;
ओढण्यासाठी चादर एक एकांताची;

अस्ताव्यस्त भावना मांडलेली, एक मेज खोलीतली;
कोपऱ्यात धूळ जराशी, पुस्तकांच्या शब्दात माखलेली;

झकण्यास नग्नता, कपाटातील वल्कले,
भडक काही, बेरंग काही, काही स्वछ धुतलेले, काही चुरगळलेले;

पावले मळकी, इतरांच्या जगातली
पुसण्या पायपुसणी, उंबरठ्यातली;

अलिप्ततेच्या चार भिंती, छप्पर अस्तित्वाचे
एवढेसेच माझे जग अथांग, खोल खोलीतले

एवढ्याश्याच या अथांग जगात,
शोधत राहतो मी मला, माझ्याच पसाऱ्यात.

खोलीत आलो, दार बंद केलं,
की प्रवेश होतो माझा माझ्या अथांग जगात.

-VD

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.