शिक्केशाही!

Submitted by छन्दिफन्दि on 22 June, 2023 - 23:03

रात्रीचे अकरा वाजून गेलेले तरी आमच्याकडे मात्र दिवे लख्ख चालू. पौराणिक प्रसंगाचं चित्र काढायचं होत, राम, हनुमान, श्रीकृष्ण सगळ्यांचा धावा करून झाला, पण बहुदा सगळेच माझ्यापासून लांब पळत होते जणू. हा आपला पप्रांतच नव्हे अशी माझी पक्की खात्री झाली. शेवटी दया येऊन रांगोळी काढण्यात एक्स्पर्ट असलेली माझी आई द्रोणगिरी उचलून घेऊन जाणारा हवेतला हनुमान रंगवत होती. कारण दुसऱ्या दिवशी सगळ्या sheets शाळेत द्यायच्या होत्या. आणि चित्रकले सारख्या विषयात गटांगळ्या खाण अर्थातच घरच्यांच्या पचनी पडणार नव्हतं.

चित्रकलेत विशेष गती नाही हे माहीत असूनही मुलीला all rounder करायच्या नादात, elementary chya परीक्षेला बसवलं आणि ज्याची भिती होती तेच झालं, मी elementary नापास शिक्का घेऊन बाहेर पडले. आणि त्यानंतर परत कधीही हातात कुंचला धरला नाही ते अगदी आता आता पर्यंत.

इकडे अमेरिकेत आल्यावर कॉलेजमधली जुनी मैत्रीण कितीतरी वर्षांनी भेटली. गप्पांच्या ओघात म्हणाली , "अग, तू पैंटिंग करायला लाग ना! . "
"काहीही काय मी आणि पेंटिंग? एलिमेंटरी फेल आहे ."
"ते शाळेचं जाऊ दे. तुला वाटतं ना कर प्रयत्न नक्की जमेल तुला. "
तिची convincing पॉवर इतकी जबरदस्त, मला काय जमू शकत ह्याचा अंदाज आपल्यापेक्षा हिलाच जास्त असावा ह्याची मला आता खात्रीच पटली.

त्याच दरम्यान आमच्या जवळच्या community सेंटर मध्ये पैंटिंगचे क्लास सुरू होणार होते. काही तरी सहा एक वर्ग एका सेशन मध्ये असणार होते. धीर करून नाव नोंदवलं.ओळख परेड झाली त्यात मी कॅनव्हास कधीच हाताळला नाहीये हे ऐकून सगळ्यांना, इतकं आश्चर्य वाटलं आणि ते बघून मला त्याहुन आश्चर्य वाटलं.

पहिल्याच दिवशी कॅनव्हास पैंटिंग. साधंसच आपण लहानपणापासून काढत आलेलं निसर्ग चित्र काढायचं होत, डोंगर, नदी, सूर्य, आणि झाड. मग त्यातच त्या बाईंनी ( ज्या ८०-८५ वर्षांच्या तरी असाव्यात ) झाडांवर ऊन कस दाखवाल, ढग कसे काढालं असे बरेच बारकावे दाखवले. अगदी पहिली-दुसरीच्या मुलांचं चित्र. पण पांढऱ्या कॅनव्हासवर रंग चढवले, आणि एखाद्या अवखळ मुलाप्रमाणे मन उड्या मारत सैरा वैरा पळू लागल. आकाशातले ते ढग जणू मला माझं स्वतःच वेगळं अवकाश पण असू शकत हे खुणावत होते, तर चित्रातला पिवळाधमक सूर्य आयुष्यात पण किती छान रंग भरता येऊ शकतात ह्याची चुणूक देत होता. त्या दिवसानंतर "elementary fail" हा शिक्का डोक्यातून पुसत व्हायला लागला. नंतर त्या क्लास मध्ये वेगवेगळी माध्यम वापरून अजून ४-५ चित्र काढली.

हातात कुन्चला घेतल्यावरचे पहिले चित्र
P_20180618_202019.jpg
-----
IMG_20181226_011111869.jpg
----
Screenshot_20230527-105507~2_0.png

----
IMG_20201207_093401424~2.jpg

-------
IMG_20210725_005439182.jpg

या सगळ्यात मला ऍक्रॅलिक मध्यम वापरायला आणि हाताळायला थोडे सोपे वाटले शिवाय त्याचा निखारही खूप छान येत होता. एकदा धागा मिळाला की या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कशाची कमी आहे ? YouTube वर मग नवनवीन ट्युटोरिअल शोधत गेले. आर्ट शेर्पा, अँजेला अँडरसन, चक ब्लॅक यांसारखे विविध गुरु मिळाले. बॉब रॉस तर ह्याच्यातला द्रोणाचार्यच! बॉब रॉसचे कित्येक videos बघितले पण अजून त्याच एकही पैंटिंग करायला जमल नाहीये हा भाग वेगळा.
असो! तर FB वरती माझ्यासारख्या नवशिक्यांसाठीचे अनेक पेटिंगचे ग्रुप्स मिळाले. त्यांची चित्रे बघता बघता मला माझी चित्रे त्यांच्याबरोबर शेअर करण्याचा धीर येऊ लागला. मग त्यातीलच काही तज्ञ किंवा अनुभवी चित्रकारांकडून काही सूचना, टिपण्या तर कधी प्रोत्साहनपर दोन शब्द मिळत गेले. मग हळू हळू नवीन blending technics, वेगवेगळे प्रकार हाताळायचेही धैर्य यायला लागल.
त्याबरोबरच कधी ढग मनासारखे आले नाहीत किंवा सूर्यास्ताच्या छटा जमल्या नाहीत म्हणून खट्टू होणे, तर कधी एखादा पक्षी छान जमला म्हणून मन पाखरू होणे हे सगळं नित्याच झालं.
मग रस्त्याने जाताना, सिग्नलवर गाडी थांबली असताना, ढगांचे आकार, त्यांची घनता, सूर्यास्ताचे रंग, बदलणारी प्रभा, उन्हात न्हाऊन निघालेली झाडे, रस्त्याच्या कडेला उगवलेली फुले, पाखरं , पक्षी सगळेच रंग खुणावू लागले. आणि मला एक वेगळीच दृष्टी गवसली जी आतपर्यंत कुंभकर्णासारखी झोप घेत होती.

मी चित्रकार आहे का? निश्चित नाही. कधी होईन का ? बहुदा नाही. मग कसला अट्टाहास?

तर हा सगळा प्रवास, त्या निमित्ताने मीच माझ्यात अनुभवलेले बदल, त्या विषयातील वाढत जाणारी समज किंवा त्यातील कळत जाणारे बारकावे, स्वत्व विसरून भान हरपून त्यात स्वतःला झोकून देणं, अणि शेवटी मिळणारा सृजनाचा आनंद! या सगळ्यावर कडी म्हणजे त्यातून साकारणारे ते चित्र, जे आतापर्यंत कधीच अचूक झाले नाही. "पण चूक झाली तरी हरकत नाही. त्यातून शिका आणि नवीन चुका करायला पुढे चला."
हा दृष्टिकोन मला आयुष्यात पहिल्यांदाच गवसला. परिणामाची काळजी करण्याच्या नादात, इष्ट स्थळी पोचण्याच्या घाईत आपण प्रवासातील गंमत घ्यायला विसरून जातो आणि मग इष्ट स्थळी पोहोचायला विलंब झाला, किंवा जमले नाही तर पदरी पडते ती फक्त निराशा .
फक्त चित्रांपुरतच नाही तर एकूणच आयुष्यात त्याने आमूलाग्र बदल झाला. आणि शिक्क्याच्या दबावातून अलगद स्वतःला मुक्त करविले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही elementary fail Sad
चित्रे छान काढता यायची मला पण रंग देणं जमल नाही.

आवडलं लेखन आणि चित्रं सुध्दा .

मी ही elementary fail Sad >>>>>माझ्यानंतर तुमचच पहिले ऐकलं मी.
चित्रे छान काढता यायची .>> Bw

ते ढग तर इतके अलवार चितारले आहेत की त्यांचं तरंगणं जाणवतंय>>>> धन्यवाद!

पण ते माझ्या मनासारखे झाले नव्हते.. मला कापसासारखे हवे होते.. ते नंतर शिकले . पुढच्या चित्रात आलेत तसे.

सामो. आणि स्वाती धन्यवाद!

तुझी एक शैली बनवायचा प्रयत्न कर किंवा आपोआपच होइल बघ.>>> नक्की!

छान लेख.

मला calla lily खूप आवडली.

अरे कसली भारी चित्र आहेत ....

आणि काय एलिमेंटरी फेल .. मी तर एलिमेंटरी इंटरमिजिएट दोन्ही पास आहे.. पण या कलेच्या आसपास सुद्धा नाही Proud