मोक्ष मुक्ती नको देवा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 11 June, 2023 - 11:18

मोक्ष मुक्ती नको देवा
जन्म पंढरीत व्हावा
तुझ्या नामाची ही गोडी
मज तुजसंगे जोडी

देह कापूर होऊनी
तुझ्या पायाशी जळावा
साधू संत येता दारी
तुझा गाभारा उजळावा

तुझ्या नामाचे सेवन
हरपेल भूक तहान
सरूदे रे देहभान
गळूदे बुध्दीची जाण

तुझी दासी मी होईल
तुझी आरास करील
घालील पंचामृत स्नान
तुज प्रेमाने भरवीन

ऐसी घडू द्यावी सेवा
जन्मोजन्मी हे केशवा
नको संपत्ती वा धन
पायी एकची मागणं

© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका समाधानी भक्ताची देवाची आळवणी आवडली. पण आम्हा लोकांचे काय?
पहा
पतितपावन नाव ऐकोनी आलो तुझिया द्वारा.
पतितपावन नव्हेस म्हणुनी जातो माघारा.

खूपच सुंदर.

शीर्षक वाचून बोरकरांची स्वर्ग नको सुरलोक नको ही कविता आठवली. पण पुढे ती थोडी वेगळी आहे - मज लोभस हा इहलोक हवा - असं ते म्हणतात. पण तुमची कवितासुद्धा छान आहे.

हपा... धन्यवाद
बोरकरांची "स्वर्ग नको" अप्रतिमच...त्यांचं, अफाट वाचन, चिंतन, अनुभव विश्व या आणि इतर कवितांतून जाणवतं... अगदी सार्थ अभिमान होता बोरकरांना कवी असल्याचा. फोन उचलल्यावर पोयट बोरकर स्पीकिंग म्हणायचे.
असलं काही वाचलं की आपण किती भयाण लिहितो असं वाटतं.
खूप धन्यवाद. या कवितेबद्दल तुम्ही लिहिलं त्यामुळे वाचनात आली. माझ्याकडं चांदणवेल आहे पण त्यात ही कविता नाही
मायबोलीकर कविता रसिकांसाठी ही बोरकरांच्या वरील कवितेची लिंक...
https://www.marathimati.com/2012/06/swarga-nako-surlok-nako-marathi-kavi...

केकू
सामो
srd
अस्मिता

खूप खूप धन्यवाद...

sanjana25
-शर्वरी-
कुमार१
कविन
आंबा

खूप धन्यवाद...

आषाढी एकादशीची वातावरणनिर्मिती >> सामो, अगदी बरोबर. भावपूर्ण रचना आहे.. आवडली.