एक मुलायम स्पर्शक (२)

Submitted by कुमार१ on 4 June, 2023 - 19:56

पूर्वार्ध इथे: https://www.maayboli.com/node/83490
…………………………………………..
उत्तरार्ध

पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत:

१. गर्भनिरोधनातील यशापयश
२. गुप्तरोगांपासून संरक्षण
३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या
४. विल्हेवाट आणि पर्यावरण

गर्भनिरोधनातील यशापयश
जेव्हा एखादे स्त्री-पुरुष जोडपे तात्पुरत्या गर्भनिरोधनासाठी प्रथम निरोधचा वापर सुरू करते, त्या संपूर्ण पहिल्या वर्षातील अनुभवानुसार निरोधचे यशापयश मोजले जाते. हे अपयश टक्केवारीत मांडण्याची प्रथा आहे. त्या आकड्यांकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करतो.

निरोधच्या वापराबाबत दोन शास्त्रीय संज्ञा प्रचलित आहेत:
१. अचूक आणि सातत्यपूर्ण वापर
२. प्रातिनिधीक( टिपिकल) वापर
आता यांचा अर्थ पाहू.

१. अचूक : संबंधित जोडप्याने त्यांच्या प्रत्येक संभोगाचे वेळी निरोध वापरणे आणि प्रत्येक क्रियेदरम्यान तो अथ पासून इतिपर्यंत काळजीपूर्वक हाताळणे.

२. प्रातिनिधीक: इथे अर्थातच मवाळ धोरण स्वीकारलेले दिसते. मासिक ऋतूचक्राच्या “सुरक्षित” कालावधीत निरोध न वापरण्याकडे कल राहतो. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत अ/सुरक्षित कालावधी नक्की किती दिवस आहे हे अचूक सांगणे अवघड असते; त्यात व्यक्तीभिन्नता असतेच.

याखेरीज अन्य काही चुका वापरकर्त्यांकडून होऊ शकतात:
१. Latex निरोधच्या जोडीने योनीमध्ये तेलयुक्त वंगणांचा वापर करणे.
२. निरोध परिधान करण्याची वेळ आणि संभोग समाप्तीनंतर विभक्त होताना घडणाऱ्या चुका.
३. निरोध फाटणे, सरकणे इत्यादी अकस्मात घडलेल्या घटना.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता एखाद्या जोडप्याच्या निरोधच्या पहिल्या वर्षातील वापराचे अपयश अंदाजे असे असते:
* अचूक वापर : 3%
* प्रातिनिधीक वापर: 14%
( निरनिराळ्या संशोधनानुसार या टक्केवारीत थोडाफार फरक पडू शकतो).

गर्भनिरोधनासाठी फक्त निरोधचा वापर करणाऱ्या जोडप्यांनी वरील गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

गुप्तरोगांपासून संरक्षण
ज्या रोगांचा प्रसार लैंगिक क्रियेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस होतो अशा काहींचा आता आढावा घेतो. या आजारांचे तीन मुख्य गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:
१. विषाणूजन्य आजार
२. जिवाणूजन्य आजार
३. इतर

आता एक महत्त्वाचा मुद्दा. वरील आजारांपैकी काही आजार असे आहेत, की ज्यांचे रोगजंतू मूत्रमार्गातून बाहेर पडणाऱ्या स्रावांच्या मार्फत पसरतात. फक्त अशा आजारांच्या बाबतीतच निरोधच्या वापराने मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळते. पण काही आजारांच्या बाबतीत त्यांचा प्रसार, निरोधने झाकले न गेलेल्या शरीराच्या इतर भागांमधून सुद्धा होतो. त्यांच्या बाबतीत अर्थातच संरक्षण कमी राहते.

लैंगिक क्रियेद्वारे प्रसार होणारे काही महत्त्वाचे आजार आणि त्यांच्या बाबतीत निरोधने मिळणाऱ्या संरक्षणाचे अंदाजे प्रमाण असे:
१. विषाणूजन्य:
A. HIV, Hepatitis B: >90%
B. CMV: 50 - 90 %
C. HSV-2 (हर्पिस) : 10 - 50 %

D. HPV: लैंगिक क्रियेद्वारे पसरणाऱ्या रोगांमध्ये याचे स्थान सर्वोच्च आहे. याच्या बाबतीत मात्र निरोधने मिळणारे संरक्षण बरेच कमी आहे. या विषाणूच्या दीर्घकालीन संसर्गातून विविध अवयवांचे कर्करोग होऊ शकतात. त्यामध्ये गर्भाशयमुख, योनी, पुरुषलिंग, गुदद्वार आणि घसा यांचा समावेश आहे.

२. जिवाणूजन्य:
a. गनोरिआ: >90%
b. सिफिलीस: 50 - 90 %

संभोगाचे अन्य प्रकार आणि रोगसंरक्षण
योनीसंभोगा व्यतिरिक्त गुद आणि मुखसंभोग हे अन्य पर्याय अस्तित्वात आहेत. त्यांच्या संदर्भात काही विशेष अभ्यास झालेले आहेत. त्यातील ठळक मुद्दे:

१. मुख संभोग: या क्रियेमध्ये योनी संभोगाच्या तुलनेत सातत्याने निरोध वापरण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी राहते. या संभोगातून घशाचा गनोरिआ होण्याचा धोका बरेच पट अधिक असतो.

२. पुरुष समलैंगिकांमध्ये भिन्नलैंगिक जनतेच्या तुलनेत एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण सुमारे 18पट अधिक आहे. या क्रियेदरम्यान जर सातत्याने निरोधचा वापर केला तर मिळणारे संरक्षण 70 ते 87% असते.

दुष्परिणाम आणि वापरसमस्या
१. एलर्जी: Latex निरोधांच्या बाबतीत काही जणांना एलर्जी असू शकते. या समस्येचे सर्वसाधारण समाजातील प्रमाण 4 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान आहे. काहींच्या बाबतीत त्याची लक्षणे ताबडतोब दिसतात तर काहींच्या बाबतीत उशिराने.
विविध लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे, नाकाडोळ्यांना पाणी सुटणे, छातीत दडपणे आणि श्वसनरोध इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येकाच्या शरीरधर्मानुसार ही लक्षणे कमीअधिक स्वरूपात दिसू शकतात.

काही वेळेस वापरकर्त्याबरोबरच त्याच्या जोडीदाराला देखील अशी लक्षणे येऊ शकतात. अजूनही काही निरोधांत शुक्रजंतूमारक रसायने वापरलेली आहेत. काही जणांना या रसायनांची देखील एलर्जी असू शकते. ज्या लोकांना Latexचा त्रास होतो त्यांच्यासाठी PU किंवा प्राणीजन्य नैसर्गिक निरोधांची शिफारस आहे.

२. मानसिक समस्या: निरोधचा वापर करणे हे एखाद्या स्त्री-पुरुष जोडीतील जोडीदारांपैकी एकाला किंवा दोघांनाही पसंत नसते. अशा वेळेस तो बळजबरीने वापरताना मनात नाराजी राहते. त्यातून काही जणांना औदासिन्य वाटते तसेच चिडचिडही होते.

३. निरोधचा चुकीचा वापर : हा होण्यामागे काही परिस्थितीजन्य कारणे असतात. इच्छा नसताना तो मनाविरुद्ध चरफडत वापरावा लागणे किंवा मद्यधुंद अवस्थेत तो वापरणे ही काही महत्त्वाची कारणे. तसेच वेश्यागमन करणाऱ्या लोकांच्या बाबतीत संबंधित पुरुषाने वेश्येकडून स्वतःला निरोध घालून घेणे हे देखील एक दखलपात्र कारण आहे.

विल्हेवाट आणि पर्यावरणपूरकता
वापरुन झालेले निरोध कचऱ्यात कोणत्या पद्धतीने टाकावेत हा एक महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. सर्वप्रथम निरोधच्या वेष्टणाचा मुद्दा. सध्या वापरल्या जाणाऱ्या बहुसंख्य निरोधांचे वेष्टण प्लास्टिकस्वरूप असल्याने ते कोरड्या कचऱ्यातच टाकले गेले पाहिजे.

प्रत्यक्ष वापरलेला निरोध व्यवस्थित कागदात (टिशू) गुंडाळून ओल्या कचऱ्यात टाकावा हे ठीक आहे. परंतु ओल्या कचऱ्यातील गोष्टी नैसर्गिकरित्या विघटित होणे अपेक्षित असते. निरोधच्या बाबतीतली परिस्थिती त्याच्या उत्पादन-प्रकारानुसार अशी आहे:

१. शुद्ध स्वरूपातील latex आणि प्राणीजन्य निरोध विघटनशील आहेत.
परंतु, बाजारात उपलब्ध असलेल्या बहुसंख्य latex निरोधांमध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम रबर अशा दोन्ही पर्यायांचे मिश्रण असते. तसेच बहुसंख्य निरोधांत वेगवेगळी वंगणे आणि रसायने घातलेली असतात; त्यांच्यामुळे विघटनात अडथळा येतो. अशा निरोधांचे नैसर्गिक विघटन अत्यंत मंद गतीने होते; त्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात.

२. PU आणि स्त्रीनिरोध हे प्लास्टिकसदृश्य गोष्टीपासून तयार केलेले असल्याने ते विघटनशील नाहीत.

३. अलीकडे शुद्ध नैसर्गिक स्वरूपातील latex पासून तयार केलेले आणि रसायनविरहित काही निरोध अल्प प्रमाणात का होईना बाजारात आलेले आहेत. अशा निरोधांचे वेष्टण देखील एक प्रकारच्या विघटनशील कागदाचे केलेले आहे.

प्राचीन काळी संभोगादरम्यान गुप्तरोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी निरोध या संकल्पनेचा उगम झाला. कालांतराने आधुनिक जीवनशैलीत त्याला गर्भनिरोधनाचे स्थानही प्राप्त झाले. निरोधच्या उत्पादनात होत गेलेला तांत्रिक विकास आपण पाहिला. एकोणीसाव्या व विसाव्या शतकात निरोधचे समर्थन आणि त्याचा विरोध या दोन्ही गोष्टींनी हातात हात घालून प्रवास केला.

आजच्या घडीला विविध प्रकारचे आकर्षक निरोध वापरासाठी उपलब्ध आहेत. पुरुष निरोध हे वापरण्यास अत्यंत सुटसुटीत आहेत. या उलट स्त्री-निरोध योग्य प्रकारे बसवणे हे काहीसे कटकटीचे काम आहे आणि त्यामुळे ते फारसे वापरात नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत. त्यातले काही कुतूहलजनक आहेत. भविष्यात पूर्णपणे पर्यावरणपूरक निरोधांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाची उत्सुकता आहे.

निरोधची ही कूळकथा वाचकांना उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे.
************************************************************************************
समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुख संभोग: या क्रियेमध्ये योनी संभोगाच्या तुलनेत सातत्याने निरोध वापरण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी राहते >>> यातही वापरतात हीच माहिती माझ्यासाठी नवीन आहे. आपण खरेच फार बावळट असतो या एकूणच विषयाबाबत.. ओवरऑल छान माहिती. ज्ञानात भर पडली.

प्रतिसाद उद्घाटनाबद्दल धन्यवाद !

यातही वापरतात हीच माहिती
रोगापासून जास्तीत जास्त संरक्षण हवे असेल तर प्रत्येक प्रकारच्या क्रियेत निरोध वापरणे आवश्यक ठरते

हा भाग सुद्धा छान माहितीपूर्ण झाला आहे.
>>>>HPV: लैंगिक क्रियेद्वारे पसरणाऱ्या रोगांमध्ये याचे स्थान सर्वोच्च आहे. याच्या बाबतीत मात्र निरोधने मिळणारे संरक्षण बरेच कमी आहे. >>>
ही नवी माहिती मिळाली.

चांगली माहिती देत आहात, धन्यवाद.

>>> पुरुष समलैंगिकांमध्ये भिन्नलैंगिक जनतेच्या तुलनेत एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण सुमारे 18पट अधिक आहे.
हे अनप्रोटेक्टेड संबंधांमुळे की अन्य काही कारण आहे?
('जर सातत्याने निरोधचा वापर केला तर मिळणारे संरक्षण 70 ते 87% असते' असं म्हटलं आहे, जे भिन्नलिंगी संभोगातील >९०% पेक्षा कमी दिसतं आहे, म्हणून शंका.)

धन्यवाद !
हे अनप्रोटेक्टेड संबंधांमुळे की अन्य काही कारण आहे?
चांगला प्रश्न.

योनीसंभोगाशी तुलना करता पुरुष समलैंगिकांच्या गुदसंभोगातून एचआयव्हीचा प्रसार होण्याची शक्यता ८ पट अधिक असते. याला शास्त्रीय कारण आहे.
गुदाशयाच्या आतील थर खूप पातळ असतो; त्यामुळे त्यातून विषाणू सहज आत शिरू शकतो. इथे अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे.
समलैंगिक पुरुषांमध्ये जो पुरुष स्वीकारत्या (receptive) स्थितीत असतो त्याला सक्रीय पुरुषापेक्षा अधिक धोका असतो.

पुरुष संभोगामध्ये मुळातच असा धोका अधिक असल्याने निरोधपासून मिळणारे संरक्षणही योनीसंभोगाच्या तुलनेत कमी राहते.

दुसरा भागही छान डॉक.

… यातही वापरतात हीच माहिती माझ्यासाठी नवीन आहे. …..

मग इतके फ़्लेवरर्ड कंडोम आणखी कशासाठी असतात ? Happy

बादवे हे edible खरच food grade आणि सुरक्षित असतात का याबद्दल शंका वाटते.

. धन्यवाद.
स्वादयुक्त निरोध>>> चांगला मुद्दा.

मुळात या प्रकारचे निरोध मुखमैथुनासाठी तयार केले गेले. आज वापरल्या जाणाऱ्या निरोधांमध्ये latex चा वाटा सर्वाधिक आहे. त्याची अंगभूत चव किंवा वास विचित्र असतात. ते झाकण्यासाठी म्हणून त्यावर गोड पदार्थ आणि अन्य काही रसायने वापरून हे नवे निरोध तयार केले गेले.
एक गोष्ट महत्त्वाची आहे.

या प्रकारचे निरोध योनीसंभोगासाठी वापरू नयेत. त्यातील रसायनांमुळे दाह किंवा जंतूसंसर्ग होण्याचा धोका संभवतो.

मुळात स्वादयुक्त निरोध हा विषय जाहिरात माध्यमांमध्येच जास्त चर्चिला गेलेला आहे. या संबंधातील शास्त्रीय विवेचन किंवा अधिकृत संदर्भ सहज उपलब्ध नाहीत.

डॉक, चांगली माहिती देत आहात.
>>>गुदाशयाच्या आतील थर खूप पातळ असतो; त्यामुळे त्यातून विषाणू सहज आत शिरू शकतो.>> हे महत्वाचे.

निरोधची ही कूळकथा वाचकांना उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे.
==>सर,
खूपच !!

या प्रकारचे निरोध योनीसंभोगासाठी वापरू नयेत. त्यातील रसायनांमुळे दाह किंवा जंतूसंसर्ग होण्याचा धोका संभवतो. -- नवीन

पुरुषांमध्ये जो पुरुष स्वीकारत्या (receptive) स्थितीत असतो त्याला सक्रीय पुरुषापेक्षा अधिक धोका असतो.
==> हे भिन्नलैंगिक बाबतीतही लागू पड्ते का ?

HPV: लैंगिक क्रियेद्वारे पसरणाऱ्या रोगांमध्ये याचे स्थान सर्वोच्च आहे. ==>
मानव प्राण्याच्या प्रचंड वाढीला नियंत्रण करण्याकरिता निसर्गाची उपाययोना असावी.

हे भिन्नलैंगिक बाबतीतही लागू पड्ते का ?
होय.
हा प्रश्न चांगला आहे आणि त्याचे सविस्तर उत्तर दोन टप्प्यांमध्ये घेतो

उदाहरण 1.
स्त्री-पुरुष (असुरक्षित) योनीसंभोग

सर्वसाधारणपणे या प्रकारात पुरुषाकडून स्त्रीला रोगप्रसार होण्याची शक्यता दुप्पट असते.
आता याचे कारण पाहू.
या प्रकारात पुरुष हा सक्रिय आणि स्त्री स्वीकारत्या भूमिकेत असे समजू.

पुरुष लिंगाच्या तुलनेत स्त्रीच्या योनीचा अंतर्भाग बराच मोठा असतो. त्यामुळे जंतू प्रसार आणि जंतूंच्या वाढीला बरीच मोठी जागा उपलब्ध होते. त्यातून जर स्त्रीचे वय 17 वर्षांपेक्षा कमी असेल तर योनीमधील mucus संरक्षणाचा भाग देखील अविकसित असतो.

उदाहरण 2.
स्त्री-पुरुष (असुरक्षित) गुदसंभोग
अर्थात स्त्री स्वीकारत्या भूमिकेत.

इथे आपण स्त्रीच्या योनी आणि गुदाशय यांची तुलना करू.
योनीतल्या द्रवामध्ये रोगप्रतिबंधक antibodies बऱ्यापैकी असतात. हे महत्त्वाचे संरक्षक कवच आहे.
या उलट गुदाशयात या प्रकारचे संरक्षण नाही.

सारांश :
Receptive anal sex is the riskiest type of sex for getting HIV.

निसर्गाने तिथे पुरेसे प्रोटेक्शन दिले नाही याचा अर्थ anal sex अनैसर्गिक म्हणता येईल का? हेच ओरल बाबतही म्हणता येईल का? पण मग ते करण्यात सर्वसामान्यांना नैसर्गिक भावनेतून मजाही यायला नको होती.

समलैंगिक संबंधात होणारे रोग हे सुद्धा त्यांना अनैसर्गिक ठरवण्याच्या मुद्द्यात असते.

समलैंगिक संबंध यावर सिनेमे,नाटक,कथा वाढत आहेत. तर त्या प्रमाणात भारतात प्रसार आहे का उगाच तिकडे चालतेय मग आपण मागे पडायला नको अशी स्थिती आहे?
बाकी शीर्षक ललित वाटले तरी लेख माहितीपूर्ण आहे. इतर लेखांमध्ये सामान्य रोगांचं निरूपण केलेलं आहे तसं यातही आहे.

१. नैसर्गिक/ अनैसर्गिक संभोग कशाला म्हणायचे ?
या प्रश्नाचे उत्तर देणे वाटते तितके सोपे नाही. विशेषता गेल्या दशकात यावर जगभरात भरपूर मल्लिनाथी झालेली आहे.
निव्वळ जीवशास्त्राच्या दृष्टीने बघायचे झाल्यास फक्त लिंग योनी संभोग हा नैसर्गिक वाटू शकतो. परंतु हे जेव्हा गृहीत धरले होते तेव्हा समलैंगिकांचा फारसा विचार केला जात नव्हता किंवा एकंदरीतच तो निषिद्ध विषय असायचा.
एकदा का आपण समलैंगिक संबंध नैसर्गिक आहेत असे म्हटले, तर मग त्यांचा संभोगही नैसर्गिक ठरतो.

https://www.legalserviceindia.com/legal/article-9196-unnatural-sexual-of.... इथे एक कायद्याचा संदर्भ आहे. त्यात त्यांनी Black’s कायद्याच्या शब्दकोशाचा उल्लेख करून वरचेच मत मांडलेले आहे.

परंतु, संभोगांपैकी नक्की कुठला अनैसर्गिक, याचे सध्याचे उत्तर प्रत्येक देशातील कायद्यानुसार बदलेल असे वाटते.
या संदर्भात जीवशास्त्र आणि कायदा यांचे दृष्टिकोन कदाचित भिन्नच राहतील.

जगातील सर्वांचे एकमत होईल असे या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड वाटते.

२. . तर त्या प्रमाणात भारतात प्रसार आहे का ?
यावर अधिक खोलात जाण्यासाठी अधिकृत विदा आणि अन्य काही गोष्टी शांतपणे शोधाव्या लागतील.

>>> त्या प्रमाणात भारतात प्रसार आहे का उगाच तिकडे चालतेय मग आपण मागे पडायला नको अशी स्थिती आहे
'प्रसार' व्हायला समलैंगिकता हा काही रोग किंवा फॅशन नाही, आणि भारतात नवीनही नाही.

मग इतके फ़्लेवरर्ड कंडोम आणखी कशासाठी असतात >>>हाच प्रश्न पडायचा नेहमी त्या add बघितल्यावर, (लिहायला लाज वाटतेय पण फ्लेवर च्या add बघितल्यावर डोक्यात यायचं अरे हे काय चॉकलेट नि स्ट्रॉबेरी ते काय खायचं आहे का?)आज उत्तर मिळालं
नेहमीप्रमाणे च उत्तम लेख डॉ

<< संभोगांपैकी नक्की कुठला अनैसर्गिक, याचे सध्याचे उत्तर प्रत्येक देशातील कायद्यानुसार बदलेल असे वाटते. >>

मुळात नैसर्गिक म्हणजे काय? जे निसर्गाच्या नियमानुसार होते, ते नैसर्गिक की कायदा ज्याला नैसर्गिक मानतो ते नैसर्गिक?

निसर्गाचा एक नियम म्हणजे पुनरोत्पादन करणे आणि त्यासाठी निसर्गाने संभोगाची सोय केली आहे. त्याला नैसर्गिक म्हणणार की कायद्यानुसार केलेला संभोग नैसर्गिक मानणार?
Reproduction (or procreation or breeding) is the biological process by which new individual organisms – "offspring" – are produced from their "parent" or parents. Reproduction is a fundamental feature of all known life; each individual organism exists as the result of reproduction.

<< संभोगांपैकी नक्की कुठला अनैसर्गिक, याचे सध्याचे उत्तर प्रत्येक देशातील कायद्यानुसार बदलेल असे वाटते. >>

मुळात नैसर्गिक म्हणजे काय? जे निसर्गाच्या नियमानुसार होते, ते नैसर्गिक की कायदा ज्याला नैसर्गिक मानतो ते नैसर्गिक?

निसर्गाचा एक नियम म्हणजे पुनरोत्पादन करणे आणि त्यासाठी निसर्गाने संभोगाची सोय केली आहे. त्याला नैसर्गिक म्हणणार की कायद्यानुसार केलेला संभोग नैसर्गिक मानणार?
Reproduction (or procreation or breeding) is the biological process by which new individual organisms – "offspring" – are produced from their "parent" or parents. Reproduction is a fundamental feature of all known life; each individual organism exists as the result of reproduction.

Human reproduction is sexual reproduction that results in human fertilization to produce a human offspring. It typically involves sexual intercourse between a sexually mature human male and female.

नैसर्गिक आणि अनैसर्गिक या शब्दांबाबत अनेक क्षेत्रातल्या तज्ञांचे एकमत नाही असे गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या चर्चांवरून दिसून आलेले आहे.

माझ्या मते या लेखाचा विषय लक्षात घेता तो मुद्दा इथे महत्त्वाचा नाही.
इथला महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतो :

सर्व प्रकारच्या संभोगांमध्ये (असुरक्षित) गुदसंभोग हा गुप्तरोग होण्याच्या दृष्टीने सर्वात धोकादायक आहे. याचे वैद्यकीय कारण वर दिलेले आहे.

उपाशी बोका, तुम्ही उलट बाजूने - व्यत्यासाचा विचार करा.
पुनरुत्पादनासाठी संभोग आवश्यक आहे, हे उघड आहे. पण संभोग केला म्हणजे पुनरुत्पादन केलेचे पाहिजे असे नाही. निरोध वापरण्याचे एक महत्त्वाचे कारण ते आहे. अन्यथा एकमेकांशी एकनिष्ठ असलेल्या जोडप्याला निरोध कशाला हवा?
तुम्हांला हवी तितकी मुले जन्माला आल्यावर तुम्ही संभोग करायचं थांबवता का?

अवांतराबद्दल क्षमस्व डॉक्टर. आता थांबतो.

Pages