भाजीबाजार संपल्यानंतर पुढं मासळीबाजार लागणार हे आता इतकं सवयीचं झालेलं की खिशातील रुमाल काढून भाजीबाजार संपण्याआधीच त्यानं आपोआप नाकाला लावला.
संध्याकाळच्या वेळची अटीतटीची गर्दी. कोंदट जागेत घामेजलेले लोक घासाघीस करत पुढं सरकत होते आणि लोकांना पुढं सरकू न देण्यासाठी दुकानदार मासळीच्या किमतीत हवी ती घट करायला तयार होते. दिवसभर उन्हानं तापलेल्या मासळीच्या आणि समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या एकत्रित वासानं जणू गर्दीला जागीच थिजवलं होतं.
ज्याला-त्याला इथून बाहेर तर निघायचंय प्रत्यक्षात निघता मात्र येत नाही.
मासळी बाजाराच्या कोपऱ्यावर थांबून खांद्यावरची शबनम तपासली आणि त्यानं रस्ता ओलांडला.
हल्ली दर दहा गाड्यांमागं सात टॅक्स्या. काळ्या-पिवळ्या पट्ट्याच्या या टॅक्स्या वाढण्याचं नेमकं कारण काय? पर्यटन? लोकांची वाढती श्रीमंती? का मग मुंबईत आल्यावर चारचाकीत बसून फिरण्याची सामान्यांची हौस? ठोस असं काही सांगता येणार नाही.
समुद्राकाठून वाहणारा पुढचा रस्ता ओलांडताना त्यानं आधी एका – वरच्या माळ्यावर शालेय मुलांची दंगामस्ती चाललेल्या – डबलडेकरला जाऊ दिलं. हात बाहेर काढून आनंदानं ओरडत जाणाऱ्या रंगीबेरंगी पोरांकडं तो पाहत राहीला.
सहल असावी. काय मजेदार वय आहे . . .
रुमाल खिशात टाकून त्यानं दगडी पदपथ पकडला.
ही कडक संध्याकाळ. हवेत दमट गारवा असल्यानं परतीच्या उन्हाचा चटका बसवणारी संध्याकाळ. गजरावाला, लॉटरीवाला, कानसफाई, वजन तपासणी, गोंदण करणारा, चप्पलवाला काय-काय लोक येऊन बसतात इथं. बम्बई मीटरवाला, गोळावाला, भाजलेलं कणीस विकणारा आणि ठेला टाकून उभा असणारा एकमेव रसिक भेळवाला. त्याच्या पायथ्याशी ठेवलेल्या रेडिओतून सूर उमटतात म्हणून तो रसिक.
साऱ्यांना विळखा घालून तो पुढं चालत राहीला.
न तुम हमें जानो
न हम तुम्हें जानें
मगर लगता है कुछ ऐसा
मेरा हमदम मिल गया
गर्दीत एखादा दुसरा भिकारीही. काही क्षण तो गर्दीच्या मधोमध उभा राहिला. सगळ्या प्रकारचा कोलाहल, एका ठराविक लयीत चालणारा.
ये मौसम ये रात चुप है
वो होंठों की बात चुप है
खामोशी सुनाने लगी, है दास्तां
नज़र बन गई है, दिल की ज़बां
गाड्यांचे हॉर्न, लोकांचे कुजबुजणं, त्या लहानगीचं फुग्यासाठी चिरकणं, कोणी फेरीवाला सौंदर्यप्रसाधनांची ओरडून जाहिरात करतोय, समुद्र बघत हिंडत असलेल्या युगूलांची कुजबुज, दोस्तांचं खिदळणं, अधून-मधून सागरी पक्षांचे चित्कार, कोणी आंधळा एकतारी वाजवत काहीतरी गातोय, कोणी तिथं बसून उगाच पुस्तकांची पानं पलटत आहे त्याचाही आवाज, भटक्या विमुक्त कुत्र्यांचं केकाटणं चालू आहे, सगळा मिळून एक नवा आवाज – जिवंतपणाचा. बारक्या दगडी कुंपणावर बरेच जण समुद्राकडं पाहत बसलेले. कारण, त्यापुढं शक्यतो काही नाही, अर्थात, उसळणाऱ्या अथांग पाण्याशिवाय . . .
न तुम हमें जानो
न हम तुम्हें जानें
मगर लगता है कुछ ऐसा
मेरा हमदम मिल गया
तो तसाच पुढे चालत राहिला. माणसांची गर्दी तुरळक झाली तेव्हा दगडी कठडा फुटून तयार झालेल्या चिंचोळ्या जागेतून तो, कोणाच्याही नकळत सराईतपणे, खाली उतरला. खांद्यावरची शबनम सांभाळत गोल-गोल भल्यामोठ्या काळ्याशार दगडांना ओलांडत समुद्राच्या होता होईल तितक्या जवळ पोहोचला.
या ठिकाणी शक्यतो फारसं कोणी नाही. इथंच कुठेतरी बसावं. मासेमारी करणाऱ्या कोळ्यांची काही आगारं आहेत तेवढीच. संध्याकाळच्या वेळी एकट्यानं समुद्र पाहायचा झालाच, तर तो याठिकाणी! मात्र तरीही आजूबाजूला क्षुल्लक प्रमाणात माणसं आढळतातच.
समुद्राचा खारा वास छातीत भरून घेतला आणि पाण्याच्या रेघेवर रेलत निवांत क्षितिजाकडे निघालेल्या लालबुंद गोळ्याकडं तो बराच वेळ पाहत उभा राहिला. नंतर अचानक काहीतरी आठवल्याप्रमाणं त्यानं ढगळ्या मळकट पांढऱ्या नेहरू सदऱ्याच्या खिशातून विडीचा बंडल आणि काडेपेटी काढली. मग वाऱ्याच्या प्रतिकारला हाताच्या ओंजळीनं अडवत एक विडी शिलगावली . . .
चपलांतून वाळू पायांच्या तळव्यावर सरकली तसं त्यांनं चपला काढून हातात घेतल्या. उरल्या-सुरल्या, पण अस्ताव्यस्त वाढलेल्या, केसांतून वार धावला तेव्हा घामानं चिकटलेले ते केस विलग होऊन भुरुभुरु उडायला लागले. किडकिडीत शरीर, काळ्या-सफेद दाढीच्या खुंटांचं वयोमान साधारण आठवडाभराचं, त्यानं पुन्हा विडी ओठांवर टेकवली. पक्ष्यांचा केका इथं तीव्र पद्धतीनं जाणवला.
त्याच्या पुढंच ओहोटीमुळं उघड्या पडलेल्या खडबडीत कातळावर जोडपं बसलेलं.
नुकतंच लग्न झालं असावं.
लहान चणीची ती आणि साधारण धिप्पाड अंगाचा म्हणता येईल असा तो. दोघांच्या देहबोली ग्रामीण.
पहिली आठवण साजरा करण्यासाठी, मुंबई पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी, माणसापेक्षा खूप-खूप मोठं, चिरंतन, खोल, खळबळजनक, अस्थिर आणि तरीही कमालीचं शांत असं काहीतरी या जगात अस्तित्वात आहे हे पाहण्यासाठी, समुद्र पाहण्यासाठी आले असावेत कदाचित. नाही कोणी म्हणावं. कदाचित आता मुंबईतच राहूयात म्हणत असतील.
त्यांची आपली कुजबूज चालली होती.
नका रे बाबांनो ती चूक करू नका. ही मुंबई फक्त दिखावा आहे, छळ आहे, ही फक्त येणाऱ्यांसाठी खुली आहे, जाणाऱ्यांसाठी नाही. इथून कोणीही जाऊ शकत नाही आणि गेला तरी मुंबई त्यांच्यातून जात नाही. ती कधी-ना-कधी खेचत माघारी आणतेच मग! तुम्ही आपले जिथून आला आहात तिथं माघारी जा. स्वप्नांना उराशी घेऊन इथं राहण्यात काही हशील नाही. परत फिरा . . .
मावळतीच्या सूर्याकडं – का मग आपल्याकडं? – तोंड करून बसलेल्या दोन भिन्नलिंगी काळसर आकृत्या. निश्चल. जणूकाही त्यांची हालचाल हा आपलाच भास असल्याचा भास.
त्याच्या विनोदावर किंवा कोणत्या कल्पनेवर तिनं मान सौम्य झटका देऊन त्याच्या खांद्यावर टेकवली. मग एकाएकी उकाडा असह्य झाल्यानं तिनं वेणी मोकळी केली आणि मोकळे झालेले कुरळे केस वाऱ्यावर भिरभिरायला लागले . . .
आता इथं थांबणं योग्य नाही.
तो जुन्या आठवणींचं उसणं काढायला समुद्रकिनारी आलेला नाही. निदान आज तरी नाहीच. तो आणखी दूर गेला.
सगळे परतले तरी चमचमणाऱ्या तांबड्या पाण्यात दूरवर त्याला एकटी होडी दिसते – एकटीच. पाण्याच्या प्रवाहावर निघालेली, अलीकडे फार दुर्मिळ झालेली, शिडाची होडी.
वल्हवणं आणि लाटांतून जन्मणाऱ्या वाऱ्याच्या बळावर होडी चालवणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी, वेगळ्या कला. होडी वल्हवणारा कधी खलाशी होऊ शकत नाही . . . खलाशी!
त्याच्या बोटांना विडीच्या थोटकाचा चटका बसला. त्यानं घाईत हात झटकला. वाऱ्याच्या झोतानं संपलेली विडी वाळूत पडून राहिली. हाताला हुबेहूब बसलेले असे आणखी भरपूर चटके, त्यातच आत्ताचा एक.
आज त्याचं इकडं येण्याचं कारण त्याला उमगलं. खांद्यावर अडकवलेल्या शबनम मधून त्यानं भलीमोठी, बनवून घेतल्यासारखी, मजबूत बाइंडिंगची वही बाहेर काढली, बाडचं जणू. बऱ्याच वर्षांचा परिचय असावा अशा पद्धतीनं मग एका हातात चपला आणि दुसऱ्यात ती वही घेऊन तो समोरच्या दगडाकडं रवाना झाला.
चपलांवर मांडी घालून बसताना पायजम्याच्या खिशात काहीतरी दुमडल्याचं जाणवलं. तो वेगात उभा राहीला. यावेळी बसताना खिशातून काढलेलं मध्यात किंचीत दुमडलेलं पत्र आणि बाड मांडीवर घेतली.
गडद पिवळ्या रंगाचं कोरं पोस्टकार्ड . . .
लाटा शांत झाल्या असल्या तरी पाण्याचे तुषार अंगावर येत होते. तो किनार्याकडं येण्यासाठी धडपडणाऱ्या त्या शिडाच्या होडीकडं पाहत बसला.
जोपर्यंत लाटांची मर्जी नाही, समुद्राची मर्जी नाही तोपर्यंत ती किनाऱ्याला लागू शकत नाही. वास्तवही असंच आहे. वल्हे मारता येत नसतील, तर आपण किनाऱ्याला लागतो की नाही हे आपल्या कौशल्यापेक्षा इतरांवर जास्त अवलंबून आहे. तसंही वल्हे मारण्यात काय मजा? वल्हवून जे ठिकाण आधी माहिती असतं फक्त तिथंच जाता येतं. अनपेक्षित, अनभिज्ञ काही हवं असेल तर स्वतःला या रत्नाकराकडं सोपवून द्यावं लागतं – शिडाच्या होडीसारखं. आयुष्यात आपल्यालाही कधीतरी खलाशी व्हायचं होतं. हे स्वप्न फार पूर्वीचं, लहानपणीचं. पण आपल्याला व्हायचं होतं – कोणत्यातरी अनुवादित इंग्रजी गोष्टीत वाचलेल्या धाडसी खलाशासारखं . . . पोहता न येणारा खलाशी . . .
तो स्वतःशीच मोठ्यानं हसला. इथं त्याचा आवाज ऐकणारं कोण आहे? कोणीच नाही.
हातानं त्यानं मुद्दाम डावा डोळा झाकला. एका डोळ्यानं पाहणाऱ्या खलाशाच्या नजरेतून त्यानं दूर उभा दीपस्तंभ, नारळाची झाडं, नारळाच्या झावळ्या, निवांत एका ओळीत शिस्तीनं उभ्या होड्या, एका माशासाठी भांडणारे बेशिस्त पक्षी, मगाचं जोडपं, ती हेलकावे खाणारी शिडाची होडी, थंड होत चाललेली तप्त वाळू, क्षितीजावर चालणारा तांबडा गोळा, आणि बरंच काही पाहिलं.
वही सरळ करून मोठ्या कष्टानं त्यानं ती उघडली. पहीलंच पान होतं – मी खलाशी झालो तर . . . समासाच्या कोपऱ्यात अतिशय घाणेरड्या अक्षरात लिहिलेलं होतं ‘मोठ्यापणी मी खलाशी होणार’ खालचं काही वाचण्यावर डोळ्यांचं व मेंदूचं एकमत होण्याआधीच त्यानं ते पान टरकन फाडलं.
चार घड्या घालून त्याची होडी बनवली.
मांडीवरची वही बाजूला टाकून तो दगडाच्या तोंडाशी पोहोचला. तिथं त्यानं हळूवारपणे ती होडी लाटांवर सोडली . . . दुसऱ्याच क्षणाला ती माघारी दगडावर आपटली. ती उचलून व्यवस्थित सरळ करून पुन्हा लाटांवर ठेवली . . . यावेळी मात्र दगडावर आपटून तिचा लगदा झाला आणि पाण्यात बुडून ती लाटेसह निघून गेली.
कदाचित समुद्रात कागदाची होडी दूरपर्यंत जाताना बघण्याची त्याची कल्पना पूर्ण होणार नाही.
तरीही जे करायलो आलो आहोत ते करायला हवं.
माघारी येऊन चपलांवर बसत त्यानं वही उचलली. पहिलं पान अगदी विचित्र पद्धतीने फाटलेलं होतं. पुढचं पान असं फाडता कामा नये. ‘खलाशी झाल्यानंतर काय करायाचं याची स्वप्नं’ – पुन्हा तेच अक्षर. हे पान जरा काळजीपुर्वक फाडलं आणि त्यानं नवी होडी बनवली . . . नंतर काही पैशांचा हिशेब वगैरे होता – याही पानानं समुद्रात धाव घेतली. कसल्यातरी घराचं चित्र – तेही गेलं. स्वप्नांच्या दुनियेतील एकतरी होडी, पैलतीरी ना का लागेना पण, सुखानं क्षितिजाकडं जाताना पाहिल्याशिवाय त्याचं समाधान होणार नव्हतं. पानं भरपूर होती.
आपली पहिली कविता . . .
कविता वाचण्याच्या भानगडीत न पडता त्यानं बंडलातून विडी काढली. निवांत बसून विडी संपूर्ण रिचवून त्यानं हे पान घडी घालून अतिशय सावकाश फाडलं – अगदी तंतोतंत – आणि मग त्याची होडी बनवली. कवितेच्या पानाची होडी उसळत्या पाण्यात सोडण्याचं धैर्य त्याच्यात नव्हतं. त्यानंतर बराच वेळ तो होडी हातात धरून बसून राहिला. आणखी एक विडी संपवली मात्र धैर्य येईना. शेवटी पुन्हा ती होडी उसवून त्या कवितेचा कागद त्यानं घडी करून अलगद वहीत ठेवला.
नारळाच्या झावळ्यात लपलेल्या, बाजूच्या एका दुसऱ्या दगडावर बरीच गडबड सुरू होती. कोणी आसपास येऊ नये म्हणून दोऱ्या वगैरे बांधलेल्या होत्या, वीस-तीस जणांचा जमाव होता आणि त्यांच्या घोळक्यात चार-दोन कॅमेरे. दगडावर मधोमध थांबलेली पुरुषासारखी एक आकृती. मग पायघोळ झग्याची दुसरी आकृती धावत ठेवून त्याला बिलगते.
ही बहुदा स्त्री.
ते काही क्षण स्तब्धतेत जातात. नंतर मागाहून, हसण्याचे, टाळ्यांचे, आनंदाचे अस्पष्ट आवाज. सर्वजण एकमेकांना आलिंगन देत राहतात. चारही दिशांनी कॅमेरे. त्याच्या हळूहळू सर्व लक्षात येतं.
काय साले पटकथा लिहितात भंगारछाप. नायक-नायिका एकत्र येतात आणि शेवट होतो – भंकस.
त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं. क्षितिजावर शेवटची आडवी पिवळी लकेर उरली होती. तो डोळे मिटून शांत बसला. आणि तेव्हाच त्याला जणूकाही नवी कल्पना सुचली आहे असा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दाटला. दुसऱ्याच क्षणी दुःख, वेदना.
त्यानं आणखी एक विडी पेटवली. तसाच तो लांटाजवळ गेला. बोटांवरील विडी भाजल्याच्या जखमा, टरारलेले ते फोड पाहून त्याला मानसिक चटका बसला. चवड्यांवर बसून त्यानं पेटती विडी पाण्यात फेकली. नंतर अचानक खिशातून विडीचा बंडल काढला आणि एका पाठोपाठ एक विडी लाटांवर तरंगत जाताना पाहिली . . .
चला आजपूरतं इतकं ठीक आहे म्हणत त्यानं चपला पायात सरकवल्या, पोस्टकार्ड खिशात टाकलं.
लांटावर हिंडणारी शिडाची होडी किनाऱ्याला लागली होती.
रस्त्यावरची गर्दी हटली नव्हती फक्त चेहरे बदलले होते. निवांतपणे समुद्राची गाज ऐकत फिरणाऱ्यांचा जथ्था. रस्त्याच्या कोपऱ्यावरचे मंद पिवळसर दिवे आणि गाड्यांचे वेगात धावणारे दिवे इतकाच काय तो प्रकाश शिल्लक होता. त्याला घरी जायचं होतं; मात्र घरीही जायचं नव्हतं. जे सुचलंय ते नाकारण्याच्या नादात त्याची विचित्र कोंडी. त्याला या कोंडीतून निघण्याचा पर्याय सापडतो.
मुझ को इस रात की तनहाई में आवाज़ न दो
आवाज़ न दो आवाज़ न दो
जिसकी आवाज़ रुला दे मुझे वो साज़ न दो
वो साज़ न दो आवाज़ न दो
“एक सुकी भेळ.”
“पंधरा रुपये.”
“दहाची कर.”
“दहा रुपयांची कशी जमणार साहेब?”
“अरे धंदेवाला माणूस तू . . . थोडी कमी बनवशील, झालं तर.”
ठेलावाल्याच्या पाठीवर थाप मारून त्यानं चपलांतील वाळू झटकली, शबनम खांद्यावर नीट अडकवली. विचारात हरवलेल्या त्यानं मुद्दाम भेळवल्याजवळ मोर्चा वळवला होता.
किस कदर जल्द किया मुझसे कनारा तुमने
कोई भटकेगा अकेला ये न सोचा तुमने
छुप गए हो तो कभी याद ही आया न करो
आवाज़ न दो
“एक सुकी भेळ.”
भेळवाल्याच्या आवाजानं जाग आल्यावर त्याच्या हातावर दहा रुपये टेकवले आणि तो तिथून निघाला. सुकी भेळ घेऊन उगाच इथं-तिथं फिरत राहिला, आजूबाजूच्या जोडप्यांचं निरीक्षण करत राहिला. रस्त्यावर भिकाऱ्यांची वर्दळ होतीच. अर्धीमुर्दी उरलेली भेळ त्यानं भीक मागायला आलेल्या एका लहानग्याच्या हवाली केली. का माहिती नाही; पण त्याला ती संपूर्ण समोर बसून खायलाही लावली. त्यानंतर त्याला सोडलं.
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
ज़हर चुपके से दवा जानके खाया होगा
ज़ुल्फ़ ज़िद करके किसी ने जो बनाई होगी
और भी ग़म की घटा मुखड़े पे छाई होगी
बिजली नज़रों ने कई दिन न गिराई होगी
रंग चहरे पे कई रोज़ न आया होगा
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
ज़हर चुपके से दवा जानके खाया होगा
होके मजबूर . . .
शेवटचं गाणं गाऊन तो गाणारा आंधळा कलाकार निघून गेला.
त्याला द्यायलाही जवळ काही नाही.
घरी जाण्याची बरीच टाळाटाळ केली, तरी पाठीला एकाक्षणी अंथरुणाची गरज भासली. नव्यानं बांधलेल्या घरांच्या गल्ल्या-गल्ल्यांतून तो एका जुनाट घरासमोर उभा राहिला. मोगऱ्याच्या बुडातली चावी उचलली. मोगरा सुकत चालला होता.
मोगऱ्याला पाणी घालण्याची आठवण दररोज याचं वेळी होते. ठीक आहे उद्या नक्की घालावं.
नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन त्यानं कुलूप उघडलं. कडीत कोणत्यातरी कागदाची सुरळी अडकली होती. सवयीनुसार त्यानं मनोभावे तो कागद वाचला.
‘उत्कृष्ट दामात घर विकत घेऊ. सोबतच उभ्या राहिलेल्या नव्या सोसायटीत मूळ मालकास दोन फ्लॅट.’
चप्पल काढून घरात आल्यावर जाहिरातीचा कागद त्यानं, न चुरगळता, दरवाजाच्या पाठीमागं पद्धतशीर रचलेल्या कागदाच्या रिमवर ठेवला. एकवार सर्व कागद उचलून पाहिले.
लवकरच एक किलो रद्दी भरेल.
शबनम बॅग आणि सदरा अलगद टेबलावर सोडले. पायजम्यातलं पोस्टकार्ड उडून जाऊ नये म्हणून शबनमखाली सारलं. खिडकी सताड उघडली . . .
समुद्राकडून येणारं खारं वारं . . . या घरात कायम समुद्र असतो. कडाक्याची थंडी पडली कधी तर समुद्राची मंजूळ गाजही ऐकू येते, म्हणून, कज्जेदलाल या घरामागं हात धुवून लागले आहेत. पण त्यांना हे कधीच मिळणार नाही.
चंद्रप्रकाशाचा तुरळक उजेड दुर्लक्षित ठेवला तर पुर्ण अंधार. वेळेची शाश्वती नव्हती. अंधारात विनाशर्टचा गादीवर उघडा झोपलेला तो . . . जे विसरण्याचा प्रयत्न केला होता ते डोक्यात अजून तसंच होतं. त्याला झोप येत नसते. झोप येण्याचा प्रश्नच नाही. कारण, नजरचुकेनं त्या जोडप्यातील तिचे हळुवार उडणारे कुरळे केस त्यानं पहिलेले असतात. त्याचा आणि त्या कुरळ्या केसांचा खरंतर काहीच संबंध नसतो तरीही पुर्ण संबंध असतो!
पुन्हा एक विचित्र कोंडी.
अंधार असह्य झाल्यावरही तो तसाच झोपलेला. शेवटी भूतकाळातील त्यानं सोडलेली कोणतीतरी संधी आठवते, म्हणजे थोडक्यात अपराधचं जुना एखादा . . . उठून माठातलं थंड पानी पिऊन तशा दमट हवामानात त्यानं खुर्चीवर बस्तान मांडलं.
जे दाटलंय ते डोक्यातून निघाल्याशिवाय झोप अशी येणार नाही. वर्षानुवर्षांची सवय आहे.
पोस्टकार्ड त्यावर ठेवून सदरा टेबलाच्या कोपऱ्यात सारला. सदऱ्याच्या खिशातल्या काडेपेटीनी कंदील पेटवला. वहीतलं कोरं पान काढलं, पेन्सिल उचलली.
‘ओहोटीच्या लाटा’
ओहोटीच्या लाटा अस्तित्वात असतात? असतात. मग त्यांचं प्रयोजन काय?
केवळ दोन शब्द लिहून विचार खुंटले. विझण्याआधी दिवा फडफडतो तशी त्याची फडफड सुरू होती. इतका वेळ जे डोक्यात स्पष्ट होतं ते आता विरून गेल्यानं शब्द जुळत नव्हते.
ही जी भावना जाणवते आहे ती नक्की निराशा आहे की राग? माहिती नाही. विडी पाहिजे.
मेंदूत तलफ दाटली तेव्हा समुद्रात विड्या बुडवण्याच्या प्रताप आठवला.
गादीवरून उठायला नको होतं.
कंदील विझवून बराच वेळ तो तसाच निश्चल बसून राहीला. खुर्ची दोन-चार ठिकाणी हलवून पाहिली मात्र कोठूनही चंद्र दिसत नव्हता. शेवटी तलफ किंवा विचारांची कोंडी असह्य झाली तेव्हा माठातलं तांब्याभर पाणी मोगऱ्याच्या बुडात घालून त्यानं सदरा चढवला, पोस्टकार्ड खिशात घातलं, घराला कुलूप लावलं.
रात्रीच्या वेळेचा अजूनही अंदाज नाही. कोणतंच दुकान उघडं नाही. घरासमोरील गाळ्यातच दुकान असलं म्हणून काय झालं; पण कोपऱ्यावरच्या मारवाड्याला रात्री घरी जाऊन उठवणं बरोबर नाही. ओळखीचा असल्यानं तसा तो नाही म्हणणार नाही आणि आपल्याला त्याच्याशिवाय कोणी उधार विडी देणारही नाही . . .
शेवटी हो नाही करत तो मारवाड्याच्या दारात उभा राहिला. मात्र कडी वाजवण्याचं धैर्य झालं नाही. तसाच तो समुद्राकडं निघाला. मासळीबाजारात, जिथं मुनिसिपाल्टीचे दिवे होते, तिथं काही कोळी लोकांच्या माशांची बोली लागत होती.
ही माणसं कधी झोपतात की नाही?
यावेळी रुमालाविना श्वास घेता येत होता.
त्या ओहोटीच्या लाटांना भरती आली होती. मगाच्या ठिकाणी पोहचणं अशक्य होतं. दगडी कुंपणावर उभं राहून तो बराच वेळ दीपस्तंभाचा त्रिकोणी, सावकाश भिंगणारा, प्रकाश पाहत राहिला. भरती आली होती. बाकी – त्याच्या पुर्णत्वात नसला तरी – चंद्र सुरेख दिसत होता.
इथल्या गोल दगडांवर बसावं.
समजावुनी व्यथेला समजावता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
अंधारातून गाण्याचा किंचित भसाडा पण पहाडी आवाज घुमत होता. आवाजाचं निश्चीत ठिकाण सापडत नव्हतं.
“काय उडी मारायचा विचार आहे का पाण्यात?”
“नाही तर.” अंधारामुळं आवाज कुठून येत होता काही कळत नव्हतं. तरी त्यानं उत्तर दिलं.
अचानक काडेपेटीची काडी पेटल्याचा उजेड झाला. त्यामागोमाग दिसू लागलेल्या छोट्या लालबुंद ठिपक्याच्या आधारानं तो तिथपर्यंत पोहचला.
“हं?” गोल दगडांवर उघड्याबंब अवस्थेत बसलेल्या अनोळखी म्हाताऱ्यानं विडीचा बंडल पुढ्यात धरला.
“एकच पुरेल.” यानं विडी पेटवली.
दिसायला साठीपारचा वाटत असला तरी तो माणूस भलताच जाडजूड होता.
“तुम्हाला कसं माहिती मला विडी हवी होती?”
“डोक्यात कितीही ताण असला तरी तलफच आहे जी माणसाला रात्री इथं घेऊन येते. एकतर तलफ पाहिजे, अपूर्ण स्वप्नं पाहिजे किंवा . . . एकटेपणा पाहिजे. तरंच माणूस यावेळी इथं येतो. तू कशानं आला आहेस?”
“माहिती नाही . . . माहिती करूनही घ्यायचं नाही.”
समजावुनी व्यथेला समजावता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
पुन्हा त्याच ओळी. दोघं लांटांची जादू अनुभवत निवांत विडी पित राहीले.
“जर लांबून कोणी खलाशानं पाहिलं तर किनाऱ्यावर दोन लाल डोळ्यांचा राक्षस बसलाय असंच त्याला वाटेल.”
“खलाशी?”
“हो. लहाणपणीचं स्वप्न होतं माझं खलाशी होण्याचं.”
“हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ मस्त मस्त. पाण्यावर प्रवास करणारा खलाशी. मात्र खलाशाचं जीवनही फारसं आनंदी असतं असं नाही.”
“तसंही असेल आणि माझं फक्त स्वप्न होतं. प्रत्यक्षात आता मला संधी आली तरी मी खलाशी होईनच असं नाही.”
“का?”
“कारण मला पोहता येत नाही.”
“हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ पोहता न येणारा खलाशी – मस्त मस्त.”
चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले
उभं राहून सदऱ्याच्या खिशातलं पोस्टकार्ड त्यानं हातात धरलं आणि ते कोरं पोस्टकार्ड उलटं-सुलटं करून त्याकडं पाहत राहीला.
“ही काहीतरी सोडण्याची जागा आहे.”
“म्हणजे?”
“माणसाणं काहीतरी सोडल्याशिवाय समुद्र त्याला सोडत नाही. इथून माघारी जाताना हरेकजण काहीतरी सोडून जात असतो. तू काय सोडणार आहेस?”
“तुम्ही काय सोडलंय?”
“मी? मला काही सोडता आलं नाही. अगदी ती शिडाची होडी सुद्धा . . . म्हणूनच मी अजूनही इथंच आहे. स्वप्नं, स्वप्नं म्हणून ठीक असतात मात्र हे आयुष्य आहे. यात स्वप्नांचा हट्ट नको, जाच नको, आवडी-निवडी नकोत . . . आयुष्यात पुढं सरकायचं म्हणलं की त्याग आलाच आणि या जगात सर्वात सोपा त्याग कोणता असेल तर तो स्वतःच्या स्वप्नांचाच . . . हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ”
“चला बाबा मी निघतो.” उभं राहून त्यानं उरलेल्या विडीचं थोटूक चिरडलं.
“आणखी एक?” पुन्हा विडीबंडल पुढं केला.
“बर द्या.” त्यानं उभ्यानंच दुसरी विडी पेटवली.
“या जगात प्रेम किंवा आनंद या भावना सर्वात चिरंतन नाहीत. सर्वात चिरंतन आहे ते एकटेपण . . .”
“म्हणजे?”
“अर्थाचा शोध तू लाव . . . पोहता न येणारा खलाशी . . . हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ . . . मस्त मस्त . . .”
केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखेर माझे मज टाळता न आले
समजावुनी व्यथेला समजावता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
माघारी येताना तो, त्यामानानं, जरा लवकरच आला. घरी पोहोचल्यावर परत तलफ झाली तर सोबतीला असावी म्हणून त्यानं उरलेली विडी निम्म्या रस्त्यातच विझवली होती.
घामानं ओला झालेला सदरा वाळण्यासाठी टेबलावर अंथरुण तो गरम झळा मारणाऱ्या खाटेवर आडवा झाला. झोप लागणार नव्हती. पडल्या-पडल्या रिकामं पोस्टकार्ड बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
भरपूर लिहायचं होतं, कवटीत कोंडलेलं सगळं फुटून बाहेर यावं म्हणलं तर पत्रावर तितकी जागा नाही. पोस्टकार्ड लिहीलं तरी त्याचा फायदा असा कितपत होणार होता?
शेवटी उठून कंदील पेटवायच्या भानगडीत न पडता उभ्यानंच त्यानं चंद्र प्रकाशात एक ओळी लिहीली. पोस्टकार्ड शबनमखाली दाबून तो परत खाटेवर सरकला.
उकाडा असह्य झाला तेव्हा दुपार झाली होती. घामाच्या धारांत निथळलेल्या तोंडावर पाणी मारलं तेव्हा जरा बरं वाटलं. लघुशंका आटपून पोटभर पाणी पिलं आणि त्यानं पोस्टकार्ड उचललं. रात्री लिहीलेल्या एका ओळीत अजून दोन शब्द हवे होते. ते दोन लिहील्यावर त्यानं टेबलावरची शबनम कपाटावर जवळ-जवळ फेकलीच – आतल्या वहीसकट – टेबलावर अर्धी विझलेली विडी अजूनही तशीच होती . . .
डाकाच्या लाल डब्यासमोर उभं राहून किलकिल्या डोळ्यांनी त्यानं पत्र शेवटदा वाचलं.
मी कविता लिहिणं सोडून काहीतरी काम बघतो आहे. बघ जमल्यास माघारी ये घरी . . . आपल्या . . .
पोस्टकार्ड डब्यात टाकलं आणि तिथून तो समुद्राच्या रस्त्याला लागला . . .
भिजवलंत ओहोटीच्या लाटांनी
भिजवलंत ओहोटीच्या लाटांनी
सुरुवातीपासूनच जो मूड पकडलाय तो अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवलाय.
ते सुरुवातीचे चित्र, मधे मधे पेरलेली समर्पक गाणी; तो मूड अजूनच गडद करताहेत.
लिखाण आवडले हेवेसानल (हे वेगळे सांगणे न लगे)
लिहित रहा.
संपूर्ण लिखाणातून त्याचं दुःख
संपूर्ण लिखाणातून त्याचं दुःख तर भिडलं.
पण पत्रातल्या एका ओळीनं तिचं दुःख, तिची परवड अजूनच भिडली.
सुंदर लिखाण..
पण पत्रातल्या एका ओळीनं तिचं
पण पत्रातल्या एका ओळीनं तिचं दुःख, तिची परवड अजूनच भिडली.
तिला दु:ख झाले असेलही कदाचित पण तिची परवड तरी सुचित होत नाहीये.
मला हर्षलसी ची 'अपुर्ण कविता' आठवली.
https://www.maayboli.com/node/47009
छान लिहिलंय. मधेमधे पेरलेल्या
छान लिहिलंय. मधेमधे पेरलेल्या गाण्यांनी सुशिंच्या दुनियादारीची आठवण करून दिली.
@हर्पेन >> ओहोटीच्या लाटांनी
@हर्पेन >> ओहोटीच्या लाटांनी मला आधी भिजवलं तेव्हा असह्य होऊन कथा खरडली!
धन्यवाद. लिहीत राहीन म्हणण्यापेक्षा म्हणतो 'डिजिटल' करत राहीन. कारण कागदावरून डिजिटल करायचं आधीच भरपूर कंटाळा आहे त्यात खासकरून परीक्षा त्रास देतंच असतात. प्रयत्न राहील.
@अ'निरु'द्ध >> तिला तर कदाचित साहित्याची भाषा येत नसावी म्हणून दरमहा येणाऱ्या किरणाच्या याद्या तिला कलात्मक दृष्टीने नसतील पाहता येत! शेवटी वास्तववाद खरा म्हणून तिची बाजू योग्य, तिची परवड रास्त! धन्यवाद.
@हर्पेन >> तिची बाजू वाचक आपापल्यापरीने मांडेल म्हणून नाही मांडली. आणि ज्या बाबीत सांगण्यासारख काही असतं त्यात मुळात ऐकण्यासारख फार काही असतंच असं नाही.
दुवा जोडलेली कविता फारच मस्त. कवीची अनुदिनी तपासली तर नेमका मरीन ड्राइवचा फोटो! संध्याकाळचा! बाकी साहित्य सुद्धा मस्तच 'हर्षल'च. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
@rmd >> धन्यवाद.
काय अफाट लिहिलय राव. मस्त मूड
काय अफाट लिहिलय राव. मस्त मूड पकडलाय नि अगदी समोर चित्र उभे राहतेय वाक्यांमधून. !!
जबरदस्त. एकदम जी ए कुलकर्णी
जबरदस्त. एकदम जी ए कुलकर्णी शैली ची आठवण झाली.
शेवट आशादायी झाल्याबद्दल विशेष आभार.पोहता न येण्यावरून मनात वेगळीच पाल चुकचुकत होती.
लिखाण आवडले.
लिखाण आवडले.
सुंदर लिहिलं आहे!
सुंदर लिहिलं आहे!
अफाट सुंदर लिहिलय... आवडलं
अफाट सुंदर लिहिलय... आवडलं लेखन.
आपल्याला पण आवडल.
आपल्याला पण आवडल.