हा मधुमास नवा
ह्या वर्षी स्प्रिंगच्या अगदी सुरवातीपासूनच लंडन मुक्कामी आहे आणि इथला स्प्रिंग अनुभवते आहे. आपल्याकडे आपण जशी “नेमेची येणाऱ्या पावसाची” आतुरतेने वाट बघत असतो तसंच इथे कायम रहाणारी मंडळी ही वाट बघत असतील कदाचित स्प्रिंगची पण माझा अनुभव पहिलाच असल्याने मला तर खूपच अप्रूप वाटतय.
साधारण मार्च अखेरीस इथली वेधशाळा घड्याळं मागे का पुढे कुठे तरी करून हिवाळा संपल्याचं जाहीर करते. सूर्योदय एक तास लवकर होतो आणि सूर्यास्त एक तास उशीरा, त्यामुळे दिवस चांगलाच मोठा होतो. असो. ऑफिशियली जरी हिवाळा गेला असं जाहीर केलं असलं तरी ह्या वर्षी अजून थंडी खूप आहे. रात्री तपमान शून्यापर्यंत खाली जातंय आणि दिवसा कोट घातल्या शिवाय बाहेर जाता येत नाहीये. उन्हं पडतायत पण त्याला तितकासा जोर नाहीये.कधी कधी पाऊस ही आहे. एकदा दुपारी तडतड गारांचे गोळे ही पडले पाच मिनिटं. मुंबईला कधी गारा बघायला नव्हत्या मिळाल्या त्या इथे बघितल्या . मजा आली. बच्चा पार्टी “ स्नोबेरीज स्नोबेरीज “ करत छत्री घेऊन अंगणात गेली. त्यांना गारा कश्या मटकवायच्या हे सांगताना माझ्या मनातला बालभाव जपत मी ही टाकली एक तोंडात. रच्याकने गारांना " स्नो बेरीज " हा शब्द मला फारच आवडला आहे.
गारांनी अंगण भरून गेलं
एक दिवस पाऊस नव्हता, छान सूर्यप्रकाश होता म्हणून चक्कर मारायला बाहेर पडले. साधारण दुपार होती तरी थंड हवा आणि निस्तेज सूर्यप्रकाश ह्यामुळे पाखरांची किलबिल ऐकू येत होती. कबुतरं, मैना, कावळे, चिमण्या उडताना ही दिसत होते. त्यातच पांढऱ्या पोटाचा जांभळा / काळा मॅगपाय आपले v आकाराची पांढरी नक्षी असलेले पंख फडफडवत त्याच्या निमुळत्या लांब शेपटीच्या साहाय्याने हलकेच झोके घेत आकाशात भरारी घेताना दिसला तेव्हा तर फारच मस्त वाटलं.
वाडी बाहेर पडून जेव्हा मेन रोड ला लागले तेव्हा आश्चर्याने डोळे विस्फारलेच गेले माझे. नेहमीचाच परिसर पण ओळखू येणार नाही इतका वेगळा आणि सुंदर दिसत होता. रस्त्याच्या कडेला उगवलेल्या गवतावर मोठी मोठी शेवंती सारखी दिसणारी पिवळी डँडीलायन फारच उठून दिसत होती. काही झाडं सर्व संग परित्याग करून अजून ही समाधी अवस्थेत होती. काही आपले कळ्यांचे डोळे चोळत हळू हळू जागी होत होती आणि काही मात्र नखशिखांत पांढऱ्या / गुलाबी रंगात सजली होती. एखाद्या यक्षाने जादूच्या कांडीने सामान्य रूपाच्या मुलीचं परिवर्तन सुंदर परीमध्ये करावं असंच वाटत होतं त्यांच्या कडे बघून. तो पांढरा / गुलाबी रंग जणू आसमंतात ही फाकला होता. पूर्ण फुललेली ती पांढरी झाडं वाऱ्यावर डुलताना पाहून जणू आकाशातून झरा वाहतोय असं वाटत होतं. आणि उंचच उंच वाढलेल्या, पांढऱ्या फुलांचा साज चढवून उभ्या असलेल्या झाडांकडे पाहून भर दुपारी आकाशात चांदण्या चमकतायत असा भास होत होता.
चेरी ब्लॉसम
बुंध्यापासून अशी फुलं उमलली होती.
हा पांढरा
वाऱ्यामुळे पाकळ्यांची पखरण
हे जवळून
गुलाबी झाड
भर दिवसा चांदण्या चमकतायत
लंडन हे एक महानगर असलं तरी खेडं किंवा कन्ट्री साईड हा ह्या शहराचा आत्मा आहे. इथल्या लोकांना त्या जीवन शैलीची मनापासून आवड आहे त्यामुळे उपनगरे ही एखाद्या खेड्यासारखीच वाटतात मला इथली, फक्त जरा जास्त परिपूर्ण एवढंच. सगळी एक मजली घरं आणि प्रत्येकाच्या घरासमोर बाग. सध्या स्प्रिंगमुळे त्या बागातली फुलं ही फुलली आहेत आणि इथे घराला कुंपण जवळ जवळ नसल्यानेच तिथे उमललेली ट्युलिप्स, डॅफोडील्स आणि इतर ही अनेक फुलं परिसराची शोभा वाढवतच होती.
डॅफोडील्स
ट्युलिप्स
..
नागरी वस्तीतील हे निसर्ग चित्र भान हरपून पहात असतानाच एका घरासमोर माझी नजर गेली आणि मी अक्षरशः भरून पावले. आज अनेक वर्षे मी समर मध्ये हे झाड पहात होते आणि साधारण अनंतासारखी पाने असलेलं अगदीच सामान्य दिसणारं हे झाड मालकाने बागेच्या इतक्या मध्यभागी का बरं लावलं असेल ह्या विचाराने चक्रावून ही जात होते. आज त्या कोड्याचं उत्तर मला मिळालं होतं. कमळाच्या आकाराच्या टपोऱ्या कळ्यानी आणि तळहाताएवढ्या गुलाबीसर पांढरट फुलांनी बहरलेला मॅग्नोलिया माझ्या समोर उभा होता. स्वच्छ सूर्यप्रकाशात निळ्याशार आकाशाखाली गोल घुमटाकार आकाराचा आणि बेताच्या उंचीचा मॅग्नोलिया नितांत सुंदर दिसत होता. हे सुलक्षणी झाड दारात असणं म्हणे भाग्याचं समजलं जातं जे अगदीच नैसर्गिक आहे. दारात मॅग्नोलिया असेल तर त्या घराची किंमत ही वाढते म्हणतात. असो. मी ह्याचे आधी फोटो बघितले होते, फोटो बघूनच हरखून ही गेले होते पण मला स्वप्नात ही कधी वाटलं नव्हतं की मी हे फुललेलं झाड कधी प्रत्यक्षात बघू शकेन. अश्या निखळ आनंद देणाऱ्या क्षणांची अजून ही आस असणे ह्यालाच जीवनेच्छा म्हणत असतील का ?
मॅग्नोलिया
हा जवळून
थंडी वारा पाऊस काही ही असलं तरी हल्ली मला छंद च लागलाय रोज चक्कर मारायला जाण्याचा. रोजचा नजारा वेगळा असतो. कधी थंडीमुळे डँडीलायनचे कळे दुपार झाली तरी उमललेले नसतात , कधी वाऱ्यामुळे फुलांच्या पाकळ्यांच्या रस्त्यावर पायघड्या घातलेल्या असतात. कधी खारुताई धिटाईने कुंपणावर आलेली दिसते. काही झाडांचा बहर ओसरून त्याना नवीन पालवी फुटायला लागलेली असते तर काही झाडं फुलायला लागलेली दिसतात. टप्पोऱ्या कळ्यानी डवरलेल्या एका झाडवर आता कोणत्या रंगाची फुल येतायत म्हणून रोज लक्ष ठेवून होते , पण माझा होरा साफ चुकला. त्याला फुलं येण्याऐवजी हिरवट चंदेरी पानांचीच फुल आली, आता हळू हळू ती मोठी होऊन झाड हिरव्या चंदेरी पानांनी भरून गेलंय.
पानांच्या कळ्या
आपल्याकडे ह्या दिवसात उकाडा असतो, गरम होतं असतच पण तरी फुललेले बहावा, गुलमोहर पाहून डोळ्याचं पारणं फिटतं . जीव शांत होतो. कोकणात आमच्या देवळाजवळचा पांढरा चाफा उन्हाळ्यात हातचं काही न राखता बहरतो. आंबे, फणस, कोकमं, करवंदं उन्हाची काहिली सुसह्य करतात आणि रसना तृप्ती ही करतात. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हाय वे वरचा विक्रोळी पट्टा गुलाबी चेरी ब्लॉसममुळे ह्या दिवसात नितांत सुंदर दिसतो. पिंपळाला नवी कोवळी तांबूस पालवी ह्याच दिवसात येते. आमच्या गल्लीच्या तोंडावर असलेला भला मोठा करंज ही ह्या दिवसात नव्या तुकतुकीत पानांनी आणि थोडा कडसर वास असलेल्या छोट्या छोट्या पांढऱ्या लालट फुलांनी सजतो. ह्या सगळ्या तिकडच्या आठवणी येत आहेतच. पण इथले हवामान खूपच वेगळे असल्याने नित्य नवा अनुभव देणारे सृष्टीचे नवे विभ्रम सध्या अनुभवते आहे...
हेमा वेलणकर
थॅंक्यु सगळयांना. अमितव आणि
थॅंक्यु सगळयांना. अमितव आणि वावे interesting माहिती.
बहावा, सावर, पांढरा चाफा गुलमोहर ही झाडं निष्पर्ण होऊन बहरतात त्यामागे ही हेच लॉजिक असेल का
मी इथे गोकर्णाच्या बिया आणून लावल्या ही आहेत बघू रुजतायत का ते ...
वावे , मॅग्नोलिया ची पानं अनंता सारखीच आहेत. कदाचित अनंत ही त्याच जातकुळीतील असेल, ह्यात पण प्रकार असू शकतील.
वावे, अनंत म्हणजे “
वावे, अनंत म्हणजे “ गार्डेनिया”. गार्डेनियाच्या फुलाचा वास साधारण मोगर्यासारखाच असतो. दिसायलाही मोट्ठ्या मोगर्यासारखे फुल असते.
अमित, किरमिजी म्हणजे जांभळा पण जरा गुलाबी रंगाकडे झुकणारा रंग. मनिमोहोरने टाकलेल्या त्या फोटोतल्या फुलाला मी अॅपल फोनला आयडेंटीफाय करायला सांगीतले. उत्तर आले- रॉक क्रेस फ्लॉवर. पण फुलांच्या पाकळ्यांचा शेप व्हिंका( सदाफुली) फुला सारखाच दिसतो.
या सगळ्या स्प्रिंग फ्लॉवरींग झाडे व श्रब बाबत माझी एकच तक्रार आहे! हा सगळा बहर झाडावर फक्त १० ते १५ दिवसच असतो. बाकी वर्षाचे ३५० दिवस फक्त पानेच( विंटरमधे फक्त फांद्याच!) पण बहर जेव्हा असतो तेव्हा मात्र या बहराचा शोईनेस मनाला मंत्रमुग्ध करतो.
मनिमोहोर, इथे अमेरिकेत सदर्न मॅग्नोलियाच्या ( चाफा) फुलांचा वास इतका सुवासिक असतो म्हणुन सांगु!
माझे अजुन एक आवडते स्प्रिंग ब्लॉसमींग फुलझाड म्हणजे डॉगवुड! पिंक फ्लॉवरींग व रेड फ्लॉवरींग डॉगवुड झाडांची नावे गुगल इमेजेस मधे बघाच! केवळ अप्रतिम! मला आमच्या यार्डमधे लावायची होती पण आमच्या घराच्या यार्ड मधे नेहमीच संपुर्ण उन असते. डॉगवुड झाडाला पार्शिअल शेड लागते.
अमेरिकेत वॉशिंग्टन डी. सी च्या जवळ राहणार्यांसाठी पोटोमॅक नदि किनार्यावर दर एप्रिल महिन्यात होणार्या ( जॅपनिज ) चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल मुळे एक नेत्रसुखद परवणी असते! पोटोमॅक नदिच्या किनार्यावरचे कॅपिटल मॉलवरचे , टायडल बेसीनवरचे ते हजारो जॅपनिज चेरी व्रुक्ष जपानने १९१०-१९२० दरम्यान अमेरिकेला दिलेली भेट आहे.तत्कालिन अमेरिकन अध्यक्ष विलिअम टाफ्ट याची बायको हेलेन टाफ्ट हिने हे टोकियोवरुन भेट म्हणुन आलेले योशिनो चेरीजचे वृक्ष लिंकन मेमोरिअल व जेफरसन मेमोरिअल व त्याच्या आजुबाजुच्या संपुर्ण टायडल बेसीन वर व पोटोमॅक नदिच्या किनार्यावर लावण्यात पुढाकार घेतला होता. इथला दर वसंत रुतुमधे एकाच वेळेला ३००० पेक्षा जास्त योशिनो चेरीज वृक्षांना आलेला गुलाबीसर पांढर्या फुलांचा चेरी ब्लॉसम डोळ्यांना, मनाला व आत्म्याला सुख देउन जातो! डी सी च्या आसपास राहण्यार्या कोणी मायबोलिकरांनी अनुभवला आहे का हा चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल?
मुकुंद, मस्त माहिती, धन्यवाद.
मुकुंद, मस्त माहिती, धन्यवाद.
आहाहा अप्रतिम हेमाताई .
आहाहा अप्रतिम हेमाताई .
सर्वांचेच फोटो अप्रतिम आहेत. >>> मम.
छान लेख आणि फोटो!
छान लेख आणि फोटो!
मुकुंद, सुंदर फोटो!
वसंत ऋतूत आधी फुले आणि मग पाने येणारी झाडे म्हणजे ओल्ड वुड ब्लुमर्स. यात फुलांच्या कळ्या आदल्या वर्षी तयार होतात. समर आणि फॉलमधे फुलणारी झाडे ही बहुतेक न्यु वुड ब्लुमर्स असतात. यात आधी पाने मग कळ्या -फुले असे सगळे त्याच वर्षात होते.
अनंत म्हणजे “ गार्डेनिया” >>
अनंत म्हणजे “ गार्डेनिया” >> अच्छा! धन्यवाद मुकुंद
ओल्ड वुड ब्लूमर्स आणि न्यू वुड ब्लूमर्स हा प्रकार रोचक आहे.
आपल्याकडे गुलमोहराला पुढच्या वर्षी शेंगा येतात ना?
मस्त! लेख, फोटो सगळेच मस्त!
मस्त! लेख, फोटो सगळेच मस्त!
छान लेख आणि फोटो एकसे बढकर एक
छान लेख आणि फोटो एकसे बढकर एक . पुन्हा पुन्हा स्क्रोल करून पाहिले. प्रतिसदातले फोटोही सुंदर.
सुंदर फोटो बघून डोळे निवले
सुंदर फोटो बघून डोळे निवले अगदी.
मुकुंद, तुम्ही एक स्वतंत्र लेखच का लिहिनात.
सुंदर प्रचि
सुंदर प्रचि
सुंदर लेख, अप्रतिम
सुंदर लेख, अप्रतिम प्रकाशचित्रे
फोटो व लेख सुरेख !
फोटो व लेख सुरेख !
मुकुंद यांचे फोटोही अप्रतिम.
(No subject)
हा मॅग्नोलिया इथला.
बाकी फोटो इथे आहेत.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
स्वाती २ मस्त आणि इंटरेस्टिंग माहिती.
अस्मिता पांढरा magnolia ही छान दिसतोय, लिंक मधले फोटो ही छानच आहेत.
इथे मी कमळाच्या गुलाबी रंगाचा , सिंगल कलरचा मॅग्नोलिया ही पाहिला छान दिसत होतं ते झाड ही पण फोटो नाहीये.
सुंदर! मला आधी वाटलं होतं की
सुंदर! मला आधी वाटलं होतं की फुलराणी पिक्चर बद्दल आहे, म्हणून उघडला नव्हता. सर्व प्रतिमा अप्रतिम आल्या आहेत.
एक से एक फोटो आहेत.. अप्रतिम
एक से एक फोटो आहेत.. अप्रतिम सौंदर्य आहे सगळ्याच फुलांचे.
नोट- "एका पेक्षा एक" फोटो असे लिहिणे मुद्दाम टाळले आहे..
हरपा आणि धनवंती धन्यवाद.
हरपा आणि धनवंती धन्यवाद.
मला आधी वाटलं होतं की फुलराणी पिक्चर बद्दल आहे, म्हणून उघडला नव्हता >> ओ ... अस झालं का ? ते गाणं आवडतं म्हणून हे नाव दिलंय.
"एका पेक्षा एक" फोटो असे लिहिणे मुद्दाम टाळले >> येस्स येस्स , noted
अस्मिता., तुझा फोटो
अस्मिता., तुझा फोटो प्लुमेरिया (आपला देवचाफा) चा दिसतो आहे.
पानांवरून - मॅग्नोलियाज चाफ्याचेच भाऊबंद, पण त्यांची पानं निराळी दिसतात.
इथले सगळे फोटो मस्त आहेत
पण कुंड्याखाली मॅग्नोलिया
पण कुंड्याखाली मॅग्नोलिया लिहिले होते. असेल असेल. कदाचित म्हणूनच याला विशेष गंधच नव्हता.
लेख आणि फोटो खूप छान आहेत.
लेख आणि फोटो खूप छान आहेत. मुकुंद ह्यांनी टाकलेले फोटोही सुंदर.
मुकुंद, चेरीच्या झाडांची माहिती कळली. धन्यवाद!
इकडे California त बऱ्याच वर्षांनी छान पाऊस आणि गारवा राहिल्याने पॉपी flowers , आणि इतर वाइल्ड flowers चा बहर आला आहे. बऱ्याच लोकांच्या अंगणात बहरलेले poppies खूप छान दिसतात. जमले तर फोटो टाकेन.
हर्पेन, खर तर मनिमोहोरच्या या
हर्पेन, खर तर मनिमोहोरच्या या सुंदर फोटोलेखात माझे फोटो टाकु की नको या संभ्रमात होतो मी. पण विषयाला धरुन फोटो होते म्हणुन दुसरा धागा काढावासा वाटला नाही. होप मनिमोहोरची हरकत नसावी.
स्वाती मस्तच माहीती दिलीस. फोरसिथिया व अझेलिया हे तु सांगीतलेस तसे ओल्ड वुड ब्लुमर्स स्प्रिंग फ्लॉवरींग श्रब्स असावेत. कारण पहिल्या वर्षी जेव्हा मी ते घरासमोर लावले होते तेव्हा स्प्रिंग मधे त्यांना मस्त बहर येउन गेल्यावर फॉल क्लिनींगमधे त्या दोन्ही श्रब्सची जमीनीपर्यंत काटछाट करुन टाकली. पुढच्या स्प्रिंगमधे दोन्ही श्रब्सना अजिबात फुले आली नाहीत. नंतर मला कोणीतरी सांगीतले की पुढच्या वर्षीच्या बहराच्या कळ्या या वर्षीच्या बहरानंतर लगेच बसतात. त्यांची फॉलमधे काटछाट करायची नसते!
अस्मिता, तुझ्या फोटोच्या लिंकमधे कुठले बोटॅनिकल गार्डन आहे? ( कुणी नॅशव्हिल, टेनेसीमधले ग्रँड ऑप्री होटेलमधले भले मोठे ग्लास डोम मधले इनडोअर बोटॅनिकल गार्डन पाहीले आहे का? कधी तिकडे गेलात किंवा इफ यु आर पासींग बाय नॅशव्हिल, जरुर बघा)
आता स्प्रिंग संपुन समरची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे. समर फ्लॉवरींग सिझनच्या फोटोबद्दल कुठला धागा आहे का मायबोलीवर?
अस्मिता., तुझा फोटो
अस्मिता., तुझा फोटो प्लुमेरिया (आपला देवचाफा) चा दिसतो आहे.
पानांवरून - मॅग्नोलियाज चाफ्याचेच भाऊबंद, पण त्यांची पानं निराळी दिसतात. >> होय , एक पानं न झडता फुलणारा पांढरा चाफा असतो तशीच दिसतायत पानं आणि फुलं. त्यांनी चुकीचं लेबलिंग केलं बहुत करून. असो. स्वाती बरं झालं सांगितलंस इथे ते...
आता नवीन नवीन फुलं यायला लागली आहेत . Indian horse chest nut च्या समया अफाट फुलल्या आहेत सगळीकडे , रस्त्याच्या कडेने असणारी झाड मस्त दिसतायत. काढता आला फोटो तर दाखवीन इथे.
मुकुंद , तुम्ही नवीन धागा काढलात किंवा इथेच दाखवलेत फोटो either way मी ओके आहे. पण नवीन नवीन आणि भरपूर असतील फोटो तर नवा धागा काढला तर भविष्यात शोधणे सोपं होऊ शकता का ?
माझा एक आकाश कंदिलाचा धागा आहे, त्यावर घरी केलेले कंदिल दाखवत असतात मंडळी.
मुकुंद, San Antonio चे
मुकुंद, San Antonio चे botanical garden आहे.
माझ्या ब्लॉगवर तीन भागात फोटो दिले आहेत.
नॅशव्हिलला गेले तर नक्की जाईन. धन्यवाद.
धन्यवाद ममो
मस्त फोटो.
मस्त फोटो.
धन्यवाद खळखळाट
धन्यवाद खळखळाट
सुंदर फोटो, त्यातही पांढर्या
सुंदर फोटो, त्यातही पांढर्या फुलांच्या पुर्ण झाडांचे तर फारच सुंदर. मुकुंद यांचे फोटोही सुंदर. स्प्रिंग हा सगळीकडे कोणत्याही प्रदेशात भारावुन टाकणारा असतो.
सुनिधी, धन्यवाद.
सुनिधी, धन्यवाद.
Pages