नास्तिक (२)

Submitted by कॉमी on 3 May, 2023 - 01:46

आपल्याला जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे नक्की माहिती नाही. पहिला एकपेशीय जीव कसा तयार झाला ह्याबद्दल पुरेशी माहिती नाही. तुलनेने सरळसाध्या एकपेशीय जीवापासून अतिशय गुंतागुंतीचे जीव कसे तयार झाले ह्याबद्दल पुरेशी माहिती नाही. ह्या गोष्टींचे उत्तर देव नाही हे तू कशावरून सांगू शकतोस ?
- तुझे वैज्ञानिक दावे ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकार व्यक्तीकडून एकदा तपासून घे. मी त्यातला तज्ञ नाही त्यामुळे तुझ्याशी बोलताबोलता प्राथमिक वाचन करून सुद्धा उत्तर देऊ शकत नाही. आणि, तसेही मला पूर्ण संदर्भासहित उत्तरे मिळवणे शक्य नाही कारण माझा तितका अभ्यास नाही.
बर, पण उत्तरासाठी असे समजू की तू सांगितलेल्या वैज्ञानिक ज्ञानाच्या आत्ताच्या सीमा बरोबर आहेत. पण मी ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या साठी "देव" हे उत्तर मान्य करणार नाही. माणसाला एके काळी पाऊस का पडतो हे माहीत नव्हते. माणसाच्या समुहांनी त्याची वेगवेगळी उत्तरे शोधली- पर्जन्यदेव, पृथ्वी आणि आकाशाच्या वर पाण्याचा अनंत साठा आहे आणि त्याची दारे उघडली की पाऊस पडतो, पाऊस ही देवांकडून भेट आहे इत्यादी. उत्तरे माहीत नसताना गाळलेल्या जागा भरण्यासाठी सगळीकडे "देव" असे खरडणे आजिबात उपयोगाचे नाही. असे करण्याने आपल्याला सृष्टिबद्दल कसलेही नवीन ज्ञान मिळत नाही, विश्वाच्या कामकाजाबाबत काहीही नवीन साक्षात्कार होत नाहीत, आपल्या समजुतीच्या पातळीत तसूभरही वाढ होत नाही. उलट त्याने माणसामधली उत्सुकता मारली जाऊ शकते.

पण जर तू देव ही संकल्पना मान्य केलीस तर सगळे जिगसॉ कोड्यासारखे फिट बसते. हा पुरावा नाही का देव असण्याचा ?
- नाही. अंतर्गत संलग्नता हा पुरावा नाही. अंतर्गत संलग्नता ही एक कसोटी जरूर आहे, तुम्ही दोन परस्परविरोधी विश्वास एकाच वेळी ठेऊ शकत नाही. आपल्या सगळ्या विश्वासांना ही कसोटी पार पाडावी लागते. पण ती एकमेव कसोटी नाही. अंतर्गत संलग्नता पुराव्याला पर्याय नाही. ह्याचे आपण एक उदाहरण बघूया. कालचे राजू संजू आठवतायत का ?

हो, आठवतायत. राजू विरुद्ध खून केल्याचा कसलाही पुरावा नाही, आणि तो निर्दोष असल्याचा सुद्धा कसलाही पुरावा नाही.
- बरोबर. आता समज, पोलिसांनी अशी एक थिअरी मांडली, की "राजुने संजुचा चाकूने खून केला, चाकू कदापि सापडणार नाही अश्या ठिकाणी टाकून दिला." तर तू केवळ पोलिसांच्या थियरी वर विश्वास ठेऊन राजूला दोषी मानण्यास तयार आहेस का ? आता ही थियरी स्वसंलग्न (internally consistent) आहे. पण सुसंगत थियरी म्हणजे पुरावा आहे का ? नाही. प्रत्येक विश्वास स्वसंलग्न असायलाच हवा, पण त्यासोबत पुरावा पण हवा.

देव नसेल तर "काहीही नाही" मधुन काहीतरी कसे येऊ शकेल ?
- काहीही नसणे ही संकल्पना आपण फक्त कल्पू शकतो. ही संकल्पना तपासणे शक्य नसल्याने, "काही नाही" ही स्थिती शक्य आहे का हे सुद्धा आपण ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे "काही नाही" मधुन काहीतरी येऊ शकते का नाही ह्याबद्दल आपण काहीही माहिती मिळवू शकत नाही, कारण काही नाही ही स्थिती शक्य आहे का हे आपल्याला माहीत नाही.

"काही नाही" अशी स्थिती अस्तित्वात असणारच ना खरं. जर आपण जगातली एक एक गोष्ट कमी करत गेलो तर कधीना काही नाही पर्यंत पोहोचू.
- पण गोष्ट कमी करू शकतो का आपण ? आपण केवळ एका पदार्थाचा दुसरा पदार्थ बनवू शकतो. त्यामुळे तू सुचवलेला प्रयोग पूर्णपणे काल्पनिक आहे, आणि त्यात करायची क्रिया (गोष्टी कमी करणे) शक्य आहे का नाही हेच आपल्याला माहीत नाही.

पण विश्वाला काहीतरी सुरुवात असणारच ना ? मग त्याआधी काहीही नसणार.
- विश्वाला सुरुवात आहे हे सुद्धा निराधार वक्तव्य आहे. विश्वास सुरुवात किंवा शेवट आहे हे आपण सिद्ध करू शकलो नाही आहोत. बिग बँग ज्या प्रक्रियेला म्हणतात तिचा आजचे आपल्याला माहीत असलेले जग तयार होण्यात वाटा होता इतकेच आपण सांगू शकतो. पण बिग बँग ही अस्तित्वाची सुरुवात आहे असे म्हणायला पुरावा नाही. बिग बँग म्हणजे आपले विश्व एका बिंदुमध्ये सामावलेले होते, आणि ते प्रसरण पावण्यास सुरू झाले ती प्रक्रिया. ह्यात "काहीही नाही" नाहीये. उलट "काहीतरी आहे".

आता इतक्या गुंतागुंती मध्ये आपण आत शिरलोच आहोत तर गुंतागुत आणखी वाढवण्यास हरकत नाही.
तर्कशास्त्रात जेव्हा एक तर्क त्या तार्किक निष्कर्षावर पुन्हा पुन्हा लावला जातो तेव्हा त्याला infinite regression म्हणतात.
खालील काही उदाहरणे आहेत -

१. कोणत्याही घटनेस काहीतरी कारण असते.आणि त्या कारणास कारण असते. आणि त्या कारणास. आणि त्या कारणास (...)

२. काहीही नाही मधुन काहीतरी (a) येऊ शकत नाही. त्यामुळे त्याआधी काहीतरी (b) असायला हवे. काहीही नाही मधुन काहीतरी (b) येऊ शकत नाही. त्यामुळे त्याआधी काहीतरी (c) असायला हवे. (...)

१३ व्या शतकातला तत्वज्ञ आणि कॅथोलिक धर्मगुरू थॉमस अक्वायनस इन्फिनिट रिग्रेशन अशक्य आहे असे मांडतो. ह्याचे कारण की तो इन्फिनिटी, अनंत अशक्य आहे असे मानतो. पण, अनंत सुद्धा काही नाही सारखेच आहे. आपण काही नाही, आणि अनंत असल्याचे निरीक्षण करू शकत नाही, आणि त्यामुळे ते आहे की नाही ह्यावर ठाम मत देऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे गृहितक सिद्ध नाही होऊ शकत.
आणि, इन्फिनिट रिग्रेशन सोडवायला तो "पहिली तत्वं, पहीली कारणं, पहिले अस्तित्व" असणार असे मांडतो. पहिले कारण म्हणजे सर्व कारणांचे मूळ, त्यापुढे का, किंवा काय ह्या प्रश्नाचे उत्तर नाही.
पण, त्याही पुढे जाऊन, त्यानं पहिल्या तत्वास उद्देश, स्व ची जाणिव देऊन एक being बनवले, देव बनवले. हे पूर्णपणे काल्पनिक आहे. हे attributes (स्व जाणिव आणि उद्देश) पहिल्या तत्वाला लागू होतील असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही.
ह्या विचारातून येणारी अनेक अशी arguments आहेत. त्याला cosmological arguments म्हणतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विचार प्रवर्तक लेख/माहिती/प्रश्नोत्तरे.

पृथ्वी स्थिर नसुन सुर्याभोवती फिरते ह्याचा साक्षात्कार आधुनिक विज्ञानाला लागायला शेकडो वर्षे लागली. तद्वत ह्या प्रश्नांची उत्तरे मिळायला अजुन काही शेकडो वर्षे जातील. तोवर कमकुवत मनाच्या माणसाने स्वतःच स्वतःला धीर देण्यासाठी ज्या अनंत प्रतिमा निर्माण करुन ठेवल्यात त्या नष्ट होणार नाही.

छान लेख.
मला वाटतं काही प्रश्न माणसाने सोडून च दिले पाहिजेत.
१), विश्वाची निर्मिती कशी झाली.
२), पृथ्वी वर जीवसृष्टी निर्माण कशी झाली.
३), विश्व अनंत आहे की मर्यादित.
त्या पेक्षा.
१), जे आता अस्तित्वात आहे ते टिकवणे.
२),जी काही जीवसृष्टी आहे,वनस्पती आहेत,वातावरण आहे,जल चक्र आहे .
त्याचा अभ्यास करून ते पहिल्या पेक्षा पण जास्त कार्यक्षम बनवावे .
विज्ञान च वापर करून .
पण जे शक्य आहे.
ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहीत आहेत(, उदा पावूस कसा पडतो)
त्यांचा दर्जा आपल्याला अजून पण सुधारता yet नाही.
पावूस अनियमित असतो.
नियमित पावूस पडण्याचे उपाय आपल्या कडे नाहीत.
जलचक
माहीत आहे.
पण ते divsondivas बिघडत आहे.
वातावरण म्हणजे काय माहीत आहे.
पण त्याचा विनाश होण्यास सुरुवात झाली आहे.
आपण ते सुधारू शकत नाही.
ह्याचा अर्थ हा आहे
आपले सर्व दावे चुकीचे आहेत.
आपल्याला काहीच माहीत नाही
अगदी पावूस कसा पडतो हे पण माहीत नाही

तापमान का वाढते,
हरित वायू इफेक्ट.
हे कारण विज्ञान देते आणि आपण मान डोलवतो
पण जगाचे तापमान प्रतेक वर्षी नवे उच्चांक करत आहे.
आणि आपण काहीच करू शकत नाही
ह्याचा अर्थ ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत च नाही
आपल्याला.
असे बघता बघता .
पृथ्वी वरचे वातावरण नष्ट होईल.
जल चक्र थांबेल.
आणि आम्हाला सर्व माहीत पडले आहे असा दावा करणारा माणूस पण अस्तित्वात राहणार नाही

नास्तिक बनले की जीवनात काय बदल होतात.
नास्तिक माणूस सर्व गोष्टी न ची चिकिस्ता करून च त्या वर विश्वास ठेवतो का?
म्हणजे डॉक्टर कडे गेल्यावर.
ह्या डॉक्टर ची डिग्री नक्की खरी आहे का?
ह्याची चीकिस्ता करतो का?
ह्या डॉक्टर ल खरेच अनुभव आहे का?
ह्याची चिकिस्ता करतो का?

, आस्तिक आणि नास्तिक ह्यांच्या जीवनात काय फरक असतो.
दैनंदिन व्यवहार दोघांचे एक सारखेच असतात.
यशा विषयी कल्पना,शिक्षणाचे महत्व,नवीन स्किल शिकण्याची इच्छा.
कष्ट केल्या शिवाय यश मिळणार नाही.
हे सर्व विचार आस्तिक आणि नास्तिक एक सारखेच करतात .
मग ह्या दोघात फरक काय.
सण ,ustav साजरे करून आस्तिक चार माणसात तरी मिसळतो.
पण सण म्हणटल की नास्तिक लोकांचे डोक उठते.
चांगल्या आनंदाला ते मुकतात

देव आहे ह्यांचे पुरावे नाहीत.
म्हणून देव नाही.
असे मानणारे म्हणजे नास्तिक इतकी सरळ व्याख्या आहे का?
नास्तिक लोकांची.

जीव सृष्टी स्व निर्मित आहे निसर्ग निर्मित आहे ती कोणी निर्माण केली नाही .
म्हणून देव नाही .
परत तेच देव मानत नाहीत ते नास्तिक इतकी सोपी ,सरळ व्याख्या आहे का नास्तिक लोकांची?
नास्तिक.
१)धर्म ग्रंथ मानत नाहीत.
२) फक्त हिंदू धर्माचे तत्व ज्ञान मानत नाहीत.
३) प्राचीन वास्तू कलेत काही सायन्स आहे हे मानत नाहीत
४) हिंदू धर्माचे कोणतेच रीती रीवज मानत नाहीत.
देव ही एक सुखकारक प्रतीक आहे.

५) माणसाच्या ज्ञानइंद्रिय ह्यांना मर्यादा आहे त्या मुळे त्या मर्यादे बाहेर जावून माणूस काहीच सिध्द करू शकत नाही.
देव हे प्रतीक पण त्याच मर्यादे बाहेर आहे.
देव हा निर्विकार आहे त्याला कोणता आकार नाही,
सगुण ,निर्गुण आहे.
त्याला कोणते गुण नाहीत असा आहे.
हे हिंदू धर्मात च सांगितले आहे.
मग तरी पुरावे ध्या हा कोणता हट्ट.
देव मानाण्यामुळे ना कोणाचे नुकसान होत उलट मानसिक आधार च मिळतो.
त्या विषयी आक्षेप नास्तिक लोकांना का असतो.
की हिंदू ना विरोध.
जे देव मानत नाहीत ते त्यांच्या पुरते मर्यादेत असेल तर आस्तिक लोक लक्ष पण देत नाहीत.

चांगलं लिहिलं आहे पण फार क्लिष्ट वाटलं. जाणीवा इतक्या टेक्निकल कशा असतील. आईचं तिच्या लेकरांवरचं प्रेम तिचं पोस्टमार्टम केलं तरी कळणार नाही, नाही का !
विश्वाची सुरुवात बिग बॅन्गने झाली नसावी अशी एक नवी थेअरी आली आहे.

छान ईंटरेस्टींग लेख आहे.
मजा आली वाचायला. शाळेपासूनचे मनात येणारे आणि चर्चा होणारे विचार आहेत. हे विचार स्ट्रेसबस्टर म्हणूनही काम करतात.

बाकी देव आपल्या पृथ्वीवासीयांची कल्पना आहे. विश्वाचा पसारा अमर्याद आहे.