नाना चाराच्या एस.टी.नं तालुक्यावरून परतला. एस.टी. स्टॅंडवरून जड पावलांनी घरी यायला चक्क अर्धा तास लागला.
एवढं वय झालं तरी नाना स्टॅंडवरून झपाझप पावलं टाकत १० मिनिटांत घरी पोहचायचा. गुडघ्यापर्यंत धोतर , अंगात बंडी , बंडीला डाव्या छातीवर बटणाचा खिसा, त्यात एक डायरी आणि एक पेन, पायात वहाणा , पाठीचा कणा ताठ, नजर समोर , डोळ्याला गांधींसारखाच गोल भिंगाचा चष्मा.
नाना चालू लागला की बरोबर कोण चालत असेल त्याची तारांबळ उडायची.
अशा नानाला घरी यायला चक्क अर्धा तास लागला. वाटेत चारदोन लोक भेटले. त्यांनी नानाला आदराने रामराम केला. नानाचं कोणाकडेच लक्ष नव्हतं. लोक चकीत होत होतं . एरवी नाना त्यांना अभिवादन करत बरा आहेस ना, असं विचारायचा. पण आज तसं काहीच घडलं नाही. लोक कळून चुकले काहीतरी बिनसलं असावं. नाहीतर हसतमुख मुद्रेने भराभर चालणारा नाना इतकं हळू चाललाय तरी बोलत कसा नाही.
नाना एक करारी स्वातंत्र्यसैनिक. कुठलही पद नसलेला हा माणूस गावाच्या हृदय सिंहासनावर विराजमान होता.
पण खंत याचीच होती की त्यांचं स्वत:च् पोर त्याला गुडांळू पहात होतं.
नानाचा लेक, सून घरी नव्हते. नानाकडं घराची चावी होती. पण घर उघडून आत जावं असं नानाला वाटतच नव्हतं.
नाना घराच्या अंगणात कडूलिंबाच्या खोडाला टेकून बसला. नानाला जेव्हा केव्हा एकटं वाटायचं तेव्हा नाना लिंबाच्या खोडाचा आधार घेऊन बसायचा. त्याला वाटायचं कोणतरी आधारासाठी आहे.
सूर्य मावळतीला गेला. त्याची सोणेरी किरणं लिंबांच्या फांदीतून वाट काढत नानांच्या अंगावर पडली. ते कोवळं उन आत्ता थोड्याच वेळात गळून पडेल. आजूबाजूला लिंबांच्या पिकलेल्या लिंबोळ्यांचा सडा पडलाय. नानाला वाटलं मीच कसा गळत नाही या लिंबोळ्यांसारखा, या उन्हासारखा.
हा दिवसही आज लवकर मावळत नाही.
झाडावर पाखरांचा किलबिलाट . सगळी घराच्या ओढीने परतलेत. पण मलाच कसं घराचं दार उघडवासं वाटत नाही.
किती जीवघेणी कातरवेळ.
लक्ष्मी असती तर ?
असं बसूनच दिलं नसतं हितं.
खरं तर ती असती तर असं झालंच नसतं.
गडद संध्याकाळ झाली.
नानाला कुणीतरी भोवती घुटमळतयं असं वाटलं.
लक्ष्मीच असावी, हा मोग-याचा मंद सुगंध.
तीच , रानात गेली की मोग-याची वेणी माळायची.
नांनांनी आवाज दिला
“लक्ष्मी लय दमलोय वाईच च्यापाण्याचं बघ.”
“नाना कुणाला आवाज देताय.”
“सूनबाई अगं लक्ष्मी बघितली.”
“आवं मामंजी आत्याबाई गेलेल्या वरिस झालं.
आता कुठनं येणार हायती”.
“पर ह्यो मोग-याचा सुगंध.”
“आवं तो व्हय म्याच माळलाय. आज मोगरा यचला अन बाजारात चार करंड पाठवलं.”
असं म्हणून तिनं नानाला ताप तर आला नाही ना हे पाहण्यासाठी कपाळाला हात लावला. पण तसं काही वाटलं नाही.
“मामंजी जरा थांबा मी हातपाय धुते मग च्या देते. मी आताच रानातनं येतेय.”
“बरबरं पोरी दमानं दे.”
नानाला लेकीसारखा जीव लावायची सूनबाई. नानाही तिला लेकच मानायचा. पोटचं पोर ऐकण्यात नव्हतं, त्यामुळे सुनबाईचं विशेष कौतुक होतं.
सूनबाईनं समोर चहा आणून ठेवला. नानाला गवती चहाचा छान सुगंध आला. तसा त्याला लक्ष्मीच्या हातचा कडक घट्ट गवती चहा आठवला. पट्टकन पुढ्यातली कपबशी उचलली. थरथरत्या हातानं चहा बशीत ओतला.
तोंडानं फुर्रर आवाज करत गरम, गरम चहा पोटात ढकलला तेव्हा कुठेतरी तरतरी आली.
“लक्ष्मी च्या लई झ्याक झालता गं.”
सूनबाईला समजलं म्हातारं सारखं लक्ष्मी लक्ष्मी असं का म्हणतय ? लेकानं पुन्हा त्यांनां डिवचलं होतं.
नानाला आज लक्ष्मीची तिव्र आठवण येत होती.
तिला ऊमजना म्हातारं दिसभर तालुक्याला काम हाय सांगून गेलं . काय बरं एवढं तातडीचं काम आसल.
ती भराभर रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली.
नाना समोर चार दिवसांपूर्वी मुलगा शंकरने प्रस्ताव ठेवला.
“नाना जमीन इकू आन टुमदार घर बांधू.”
नानाच्या सुनेला देखील नवीन घर नको होते त्याचे कारणही तसेच होते नवीन घर आणि त्यातल्या आधुनिक सुविधा या सगळ्या एक शेतीच्या विक्रीतून होणार होत्या.
नाना म्हणाला
“शंकर आपल्या पूर्वजांचं घर अजून भक्कम हाय. शेत इकून उगा कशाला नवीन घर बांधायचं ईळा मोडून खिळा केल्यागत. मला नाय पटत बाबा. जसजसं पैकं यतील तसं बांधू नायतर ह्याचीच उलशीक डागडुजी करू.”
“मला पैकं येईपर्यंत वाट बघाया यळ न्हाई.” “जमाना बदललाय मला निवडणूक लढवायची हाय. चार कार्यकर्तं, पुढारी मंडळी घरी यतील तव्हा सगळं बैजवार दिसायला हवं.”
“आरं पूर्वीच्या काळी काय कोणी निवडणुका लढवल्या न्हाय का ? कुणाच्या घरी काय पुढारी कार्यकर्तं आलं नाही का? सगळ्यांनी काय नवीन घरं बांधली का तवा”.
“इतरांनी काय केलं ते मला माहित न्हाय पण मला काय हवं ते मला चांगलं कळतं.”
“शेत विकून म्या हे होऊ द्यायचा नाही. तुला काय करायचं ते तुझ्या हिमतीवर कर. नाय तं म्या मेल्याव कर.”
“म्या घर सोडून जाईल मग बसा शेत उरावर घेऊन.”
“जा रं मला धमकावतोय. कुठं जायचं तिथं जा.”
शंकर पारुला म्हणाला
“चल गं माझ्याबरोबर आताच्या आता. हितं राहयचं नाय.”
“तुमाला कुठं जायचं तिकडं जा पण नाना हाय तवर म्या हितंचं रानार.”
शंकर तडातडा निघून गेला. त्याला जाऊन चार दीस झालं. नंतर समजलं पार्टीच्या कामासाठी गेलाय.
नानाच्या शब्दाला गावात मान होता पण लेका जवळ नव्हता. घरात नानाची अवस्था विलक्षण केविलवाणी होती. सूनबाई नानाच्या पक्षाची .
पार्वतीनं दोन भाक-या केल्या. मेथीची भाजी, वरण, भात केला. नानाला जेवायला वाढलं. वरण, भात पुढ्यात आल्यावर नानाला परत लक्ष्मी आठवली. उपवास सोडायला लक्ष्मी न विसरता वरणभात करायची. नानानं कसंतरी जेवण आटोपलं. खरंतर नानाला आज जेवावसं वाटंना. पण पोरगी रानात राबून आलीय. आपण जेवलं नाही तर तिलाही उपास घडंल या विचाराने तो जेवला आणि खाटेवर जाऊन आडवा झाला. पार्वतीला पुन्हा जाणवलं आज निश्चित काहीतरी बिनसलंय नाहीतर एरवी नाना रोज रात्री जेवल्यावर इकडच्या तिकडच्या गप्प मारत असत.
पार्वतीनं जेवून घेतलं. शंकर पक्ष प्रचारासाठी परगावी गेला होता. भांडीकुंडी केली, घर आवरलं अन अंथरुणावर जाऊन पडल्या बरोबर तिचा डोळा लागला.
नानाला मात्र एकाच गोष्ट खटकत होती. ती म्हणजे आपण इंग्रजांना भीक घातली नाही पण लेकापुढं कसे गुढगे टेकायचे? केवळ वय झाले म्हणून. नाही असे कदापि होणार नाही. कधी वाटायचं नाही तरी माझ्या नंतर तोच मालक. काय करायचंय ते करु द्यावं त्याला. पण मग नानातला स्वातंत्र्य सैनिक जागा व्हायचा.
त्याला शेत का विकू देऊ? याच विचारात नाना खाटंवर या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. खाटही नाना सारखी कुरकुरत होती. न राहवून तो उठून बसला . उशाच्या तांब्यातलं पाणी प्यायला अन आढ्याकडं बघत बसला.
नाना स्वातंत्र्य सैनिक. त्यांनं परकीयांना भीक घातली नाही पण मुलापुढं हार पत्करली तर काय उरलं. नानाला भिती होती मुलगा सुनेचा छळ करेल. तिला ऐकवत राहिल तुझी नानाला फुस आहे. पण आपण तिलाही भक्कम बनवायला हवं. वेळ आली तर एकटीनं जगायला शिकवायला हवं.
नाना चलेजावच्या चळवळीत तुरंगात गेलेलला. तरीही स्वातंत्र्य सैनिकांच्या साठी असलेलं पेंशन घेतलं नाही. नानाची धारणा होती की स्वातंत्र्य समरात कितीतरी हुतात्म्यांनी बलीदान दिले. हसहसत सुळावर चढले. असे कितीतरी जन्म मातृभूमीला अर्पण करु म्हणायचे. त्यांचं घर संसार धुळीला मिळाला. त्यांनी आपलं आयुष्य ओवाळून टाकलं भारतमातेवरुन. आईच्या दुधाची किंमत बलीदान करूनही चुकती होणार नाही. हे सगळं काहीतरी वैयक्तिक लाभासाठी नाही केलं कुणी.
मग मी कशाला पेंशन घेऊ. देवानं शेत दिलंय. राबायला हात दिलेत . अजून काय पाहिजे.
शंकर मात्र नाराज असायचा. तो म्हणायचा “कितीतरी लोकांनी तुरंगात गेल्याचे बनावट दस्तऐवज करून स्वातंत्र्य सैनिक असल्याचे खोटं ताम्रपट मिळवलं. ओघानं येणारं फायदं उपटलं अन आमचं नाना खरंखुरं स्वातंत्र्य सैनिक असून कोरडंच राहिलं. बरं मी शिकलोसवरलो म्हणलं वाईच वळखिनं नोकरीचं बघा तं ते बी नाय. म्हणलं तुझ्या कष्टानं लागली नोकरी तर बघ म्या कुणाला सबूद टाकणार न्हाय. तेव्हाच ठरवलं राजकारणात यायचं. हल्ली सरपंच पण चारचाकीतनं फिरतोयं.”
नानानं शंकरला शिकवला तो नोकरी करेल म्हणून नव्हे तर लिहायला, वाचायला शिकला की माणूस शहाणा होतो म्हणून. पण झालं उलटंच. काळ बदलला नवीन पिढीला स्वातंत्र्य किती कष्टानं मिळालं यात रस नव्हता. त्यांना भोगविलास हवा होता. त्यामुळे राजकारण ही दुषित झालं होतं. यश मिळवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी नानाला पसंत नव्हत्या. राजकारणातून पैसा आणि तो कसाही कमवला तरी कोणी विचारु नये म्हणून सत्ता हे भ्रष्ट समिकरणच झालेलं. मग वाम मार्गानं मिळवून श्रीमंत झालेल्यांना प्रतिष्टा मिळत होती. माणसं इमान गहाण ठेवत होती.
थोडक्यात
इथे फुलांना मरण जन्मता
दगडाला पण चिरंजीविता
बोरिबाभळी उगाच जगती चंदनमाथि कुठार !
उद्धवा अजब तुझे सरकार
लबाड जोडिति इमले माड्या
गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !
उद्धवा अजब तुझे सरकार
रात्र कलली. पहाट झाली तरी नाना विचारांच्या तंद्रीत हरवला होता. पार्वती उठली. तिला बसलेला नाना दिसला . तिला वाटलं उठला असेल नेहमी सारखा.
पार्वतीनं झाडलोट केली. आंघोळ केली. नानाला अंघोळीसाठी गरम पाणी काढले न्हानीच्या कठड्यावर अंग पुसायला टॉवेल आणि कपडे ठेवले. न्हानीतल्या घंगाळ्यात गरम आणि थंड पाणी ओतले. एक साबणाची वडीही ठेवली. नानाला आवाज दिला…
“मामंजी आंघोळ करून घ्या.”
“व्हय पोरी.”
नाना खाटंवरुन उठला. अंगातली कोपरी काढून खाटंवर ठेवली. आणि न्हानीत आंघोळीला गेला. आंघोळ करताना हरीपाठ म्हणू लागला. आंघोळ करून बाहेर आला तरी हरीपाठ संपला नव्हता तो देवपूजा करताना संपला.
तोवर सूनबाईनं चहा दिला. नानानं चहा पीला आणि पार्वतीला म्हणाला
“सूनबाई मी न्याहरी मळ्यात करीन.”
“बरं मामंजी तुम्हाला जसं जमल तसं करा. हितं पायजे तं हितं वाढते. मळ्यात पायजे तं मळ्यात आणते.”
नाना मळ्याच्या वाटेला लागला.
पार्वतीनं पटापट चार भाक-या केल्या. कालवण केलं. चुल विझवली. घर आवरलं.
भाक-या, शेंगदाणा चटणी, कांदा फडक्यात गुंडाळलं. एका तवलीत कालवण भरलं. एक रिकामा तांब्या, ताटली, भाक-या सगळं एका टोपल्यात ठेवलं. एका जुनेराची चुंबळ केली. पार्वतीनं अंगणातली शेरंडं करडं सोडली. पटकन घरात जाऊन चुंबळ डोक्यावर ठेवली. त्यावर टोपलं अलगद ठेवलं. शेळ्यांच्या पाठी चालत ती मळ्याच्या वाटेला लागली.
नानानं पंप चालू करून वाटण्यात पाणी सोडलं होतं. तो वाटाण्यात दारं धरत होता. हिरवागार वाटाणा फुलाला आला होता. त्यावर सुंदर फुलं फुलत होती. थोड्याच दिवसात त्याच्या अंगाखांद्यावर कोवळ्या गोड शेंगा खेळतील. नाना भूतकाळात गेला. लक्ष्मीशी नानाचं लग्न झालं. दोघांनी शेतात सोनं पिकवलं.
नाना तेव्हा मोटं हाणायचा. लक्ष्मी पाटाचं पाणी धरायची. जरा काही हसण्या सारखं झालं तर पाटातल्या खळाळत्या पाण्यासारखं गोड खळखळून हसायची लक्ष्मी. नाना कुठल्या बंधनात न अडकणारा उधाणवारा. लक्ष्मीच्या हास्यात सहज विरघळला. लक्ष्मीला दाखवण्याच्या कार्यक्रमात तिला एका बुजुर्गानं विचारलं
“काय पोरी पसंद हाय का पोरगा?”
ती फक्त गालातल्या गालात हसली.
तेव्हा पासून नानाचं मन लगीन होईस्तोवर था-यावर नव्हतं.
नाना आताही पाटाच्या पाण्यात उभ्या उभ्या एकटाच हसत होता. एकदा न्याहरीला बसल्यावर नाना कांदा फोडत होता पण लक्ष लक्ष्मीच्या चेह-यावर. कांदा बाजूलाच अन नानानं हातावर बुक्की हाणली. तशी लक्ष्मी खळाळून हासली.
वाटाण्याची सफेद फुलं पाहता पाहता नानाला ती हासतेय असं वाटलं. नानानं हलकेच एका वेलीवरच्या फुलांना कुरवाळलं.
त्याला धावंवर बैल मागेपुढे सरताना दिसले. मोट रिचताना पाण्याचा उडालेला फेस दिसला.
एवढ्यात पार्वतीनं नानाला हाक मारली तसा तो भानावर आला.
“मामंजी न्ह्याहरी करून घ्या. म्या धरते पाणी तवर.”
“व्हय पोरी आंब्याखाली सावलीला टोपलं ठेव.”
पार्वतीनं शिदोरी आंब्याखाली ठेवली आणि दारं धरायला आली.
नाना थारोळ्यात आला. पंपाच्या धबधब्याखाली हात पाय धुतलं. तोंडावर पाणी मारलं.
आंब्याखाली सपई जागा बघून फडक्यातली भाकर ताटलीत वाढून घेतली. एक खड्याचं वटकावणं लावलं ताटलीला आन कोरड्यास वतून घेतलं. लोणच्याची फोड, मिरची ताटलीच्या एका कोप-यात ठेवली. पाण्याचा तांब्या पाटातून भरुन घेतला. आचमन केलं आणि जेवू लागला. दोनचार घास खाऊन झाले तेवढ्यात एक फिरीस्तं कुत्र आलं . नानानं अर्धी भाकरी त्याला दिली.
नानाची न्याहरी होईस्तोवर वाटाणा भिजवून झाला.
पार्वतीनं पंप बंद केला पाटातल्या पाण्यात हातपाय धुतले अन आंब्याखाली न्ह्याहरी करायला आली.
नानानं विचारलं
“झालं व्हय भिजवून?”
“झालं मामंजी.”
“बर भाकर कुटका खाऊन घे. भूकेली अशशील तू बी.”
पार्वतीनं नानाची खरकटी ताटली पाटातल्या पाण्यात विसळली अन तितच जेवायला घेतलं. मघाचं कुत्रं अजूनही अवतीभवती आशाळभूतपणे घुटमळत होतं. पार्वतीनं त्याला एक भाकरी घातली. तसं ते खाण्यात रमलं. खाताना हलणारी शेपटी समाधान दर्शवत होती. पार्वतीनं जेवायला सुरुवात केली.
समोर नाना डोकं खाजवत बसला होता. आंब्याच्या झाडावर पाखरांची किलबिल चालू होती. ऊन्हं चांगली वर आली होती. निरभ्र आभाळ, ऊन्हाला कसली आडकाठी नव्हती. बिनदिक्कत शिवारात उंडरत होतं. लक्ष्मीची शेरडं करडं पाटाचं पाणी पिऊन आंब्याच्या आश्रयाला आली पण कुत्र पाहून बसायला धजली नाही. जराशा जवळ असलेल्या लिंबाखाली जावून बसली.
नानाचं आत्तापर्यंत लक्ष शेरडांवर होतं पण आता नाना दूर शेताकडं एकटक पहात होता.
त्याच्या डोळ्यासमोर लक्ष्मी, बैलजोडी आणि तो शेतात वेगवेळी कामं करतायेत अशी रमणीय दृश्य दिसू लागली. त्यात तो कितीतरी वेळ हरवून गेला.
पार्वती जेवताना एकाएकी जोरात ओरडली
“आवं मामंजी वाईच शेरडा हाकला वाटाण्यात तोंड घालतील.”
तसा नाना उठला. शेरडांना बाजूच्या मोकळ्या वावरात हाकलून लावलं. शेरडं चारा खाण्यात दंग झाली आणि नाना पुन्हा विचारात गढून गेला.
पार्वतीनं जेवन आटोपलं. ताटली पाण्यानं विसळली. फडक्यात ताटली, तांब्या, तवली बांधली आणि टोपल्यात ठेवलं.
नाना जवळ आली आणि म्हणाली
“मामंजी जावा आंब्याच्या सावलीला बसा. म्या बघती शेरडं.”
“आता कसली सावली आन कसला मळा बाय.”
“आसं काय बोलता मामंजी.”
“खरं तेच बोलतूया पोरी. हे वैभव फकस्त सहा महिने. नतंर नाही.”
“का?”
“पोरी तुझा नवरा आन माझा दिवटा, अवलक्षणी हा मळा इकायला टपून बसलाय ससाण्यागत. कवा घास घील नेम नाय.”
“व्हय मला माहित हाय की मामंजी.”
“मी जीवंत असे तोवर तरी त्याला तसं करु देणार नाय.”
“नकाच करु देऊ म्या हाय तुमच्या जोडीला.”
“आगं आजूबाजूच्या मळ्यातलं शेतकरीही म्हणालं नाना लाईटीचा लय ताप होतोय . कवा बी यती आन जाती. रातचं शेताला पाणी देयाचं जोखमीचं काम. ईच्चू काट्याचं भ्या असतया. आन बील बी वाटेल तसं येतंय. वायरमन रिडींग घेत नाय. अदमासी लावतं काय बी. आपून बी बघतोय पावसाळ्यात पंप बंद असतो तरी बिल अव्वाच्या सव्वा.”
“पण आपूण काय करु शकतो. ह्यो तर समद्यांचा परश्न हाय.” पार्वतीनं म्हणनं मांडलं.
“नाय पोरी म्या ठरवलय आपली जमीन शासनाला भाड्यान द्यायची. शासन इथं सुर्य प्रकाशाच्या सहाय्यानं वीज तयार करणार हाय. सगळ्यांना दिवसा ईज मिळल.”
“हे काय कळलं नाय मला मामंजी.”
“सुर्यप्रकाशा पासून वीज तयार व्हती. त्याला काचंच मोठं छप्पर असतया ते सुर्यप्रकाश पडला की वीज करतया.”
“आत्ता कळलं बया ऊलशीक.”
“आपल्याकडं कोकणातल्या सारखा जोरदार पाऊस नसतो. भरपूर सुर्यप्रकाश असतो. त्यामुळं कायम वीज मिळल. जास्तीची वीज शासन विकत घेतं. त्याचे पैसे देतं.”
“पण आपल्याला काय मिळल ह्यात. आपली तं जमीन जाणार.”
“जमीनीची मालकी आपलीच राहिल. हो पण कायमस्वरुपी भाडं मिळलं.
सरकार आपल्याला भाडं देईल. पोरी चार लोकांना आजूबाजूला वीज मिळलं. आन मुख्य मंजी तुझ्या नव-याच्या डोक्यात जमीन विकायचा विचार येणार नाही. अनेक आर्थिक सकंटं आली पण कधी जमीन विकायचा विचार डोक्यात आलाच नाही पोरी. ती आपली आईच गं. आईला कोण विकतं का?”
पार्वतीनं आवंढा गिळला.
“पोरी मी किती दिस जगल. आज हाय तर उद्या नाय. शंकर माझ्याशी बोलयचा बंद झाला. त्या दिवशी मी तालुक्याला गेलो अन सगळं ठरवून आलो. आता तुला कायतरी काम असावं म्हणून एकरभर बागाईत ठेवलं. सगळी शेती माझ्या नावावर राहिल. मी देवाघरी गेल्यावर ती मृत्यू पत्रात लिवल्या परमानं तुझ्या नावावर होईल. मला वचन दे ती तू विकणार नाही किंवा शंकरला विकू देणार नाही. मला खूप लळा या रानाचा. हेच आमच्या सुखदुःखाचं सोबती झालं. लक्ष्मी लय राबली ह्या मातीत. ह्या मातीचे आन आपले पिढीजात ऋणानुबंध . हितं माझा बा, आजा, पणजा, आजी, पणजी सगळे राबले. या मातीशी घट्ट नाळ जुडली ती अशी सहजासहजी कशी तुटलं.”
“हो मामंजी तुम्हाला तुमच्या लेकीचं वचन हाय मी जमीन ईकणार नाय. बापाची मया लावली तुमी मला. कधी सासुरवास काय असतो हे पण माहित होऊ दिलं नाही. तुम्ही फक्त हुकुम करा.”
“पोरी मी गेल्यावर माझी राख या मातीत मिसळ. मला चिरनिद्रा घ्यायची माझ्या काळ्या आईच्या कुशीत.”
दिवस मावळतीला गेला.
हळूहळू सांज होऊ लागली. तशी पार्वती उठली. नानाला खांद्यात आधार देत उठवलं. शेरडं सोडली. टोपली डोक्यावर ठेवली आणि सारे घरच्या वाटेला लागले. नानाचा पाय जडावला होता. पाय ओढत कसातरी चालत होता. पार्वतीला शेरडांच्या ओढीने धावायला लागत होतं. आता काही महिन्यात ग्रीडचं काम होणार होतं. आपण काहीतरी हरवलं असं नानाला वाटत होतं. पण दुस-या क्षणी नाना स्वत:ला समजावत होता. स्वत: साठी जगलास तर मेलास. दुस-यासाठी जगलास तरच जगलास.
© दत्तात्रय साळुंके
आवडली!
आवडली!
स्वत: साठी जगलास तर मेलास.
स्वत: साठी जगलास तर मेलास. दुस-यासाठी जगलास तरच जगलास.
कथा पटली.
छान आहे कथा
छान आहे कथा
Practical solution शोधलं नानांनी
छान आहे गोष्ट.
छान आहे गोष्ट.
कथा आवडली ...
कथा आवडली ...
आवडली
आवडली
छान आहे कथा.
छान आहे कथा.
Khup Sundar..!!
Khup Sundar..!!
मस्त.. खूप आवडली कथा ..
मस्त.. खूप आवडली कथा ..
काही शब्द कळले नाहीत. पण
काही शब्द कळले नाहीत. पण कथेचा आशय समजला. अतिशय सुंदर कथा. मला ग्रामीण भाषेतील कथा आवडत /कळत नाहीत, पण तुमच्या कथा अतिशय आवडतात. फार सुंदर लिहिता. आणि त्यामुळे आता ग्रामीण भाषा पण गोड वाटायला लागली आहे. बोलताना विशिष्ट हेल काढून बोलतात त्यामुळे बऱ्याचदा कळत नाही, पण वाचताना 90% समजते आहे. आणि मागील पुढील संदर्भामुळे शब्द देखील समजतात.
छान कथा.. आवडली!
छान कथा.. आवडली!
आंबा
आंबा
मीरा
अनघा
दुसापूजा
एस
urmilas
मन्या S
सामो
manya
केशवकूल
वावे
तुम्हा सर्वांचे प्रेरणादायी प्रतिसादासाठी अनेकानेक धन्यवाद...
मीरा....
मीरा....
तुमचा प्रतिसाद माझं वेडंवाकडं लिखाण तुमच्यापर्यंत पोहचतयं यांची एक सुंदर दाद आहे.
ग्रामीण कथेत बरेच ग्रामीण शब्द येतात. तुम्हाला कुठले शब्द कठीण वाटतात ते सांगितलं तर अर्थ सांगू शकतो...
मतितार्थ समजला तरी कथा समजेल... तुम्हाला ग्रामीण भाषेची समस्या असूनही माझ्या कथा आवडतात यातच मी भरुन पावलो.
खूप धन्यवाद...
कथा डोळ्यांसमोर घडते आहे असं
कथा डोळ्यांसमोर घडते आहे असं वाटेल इतकं परिणामकारक लिहिता तुम्ही.
छान कथा! स्वाती +१, फार मस्त
छान कथा! स्वाती +१, फार मस्त वातावरणनिर्मिती करता तुम्ही!
फार मस्त वातावरणनिर्मिती करता
फार मस्त वातावरणनिर्मिती करता तुम्ही!......>>>> +1
सुंदर आहे कथा. चित्रदर्शी.
सुंदर आहे कथा. चित्रदर्शी.
छान आवडली कथा
छान आवडली कथा
वातावरणनिर्मिती +७८६
सामो नाही सायो
सामो नाही सायो
मी अजुन वाचली नाही. नंतर वाचणारे.
सुंदर लिहीता तुम्ही. केवढं
सुंदर लिहीता तुम्ही. केवढं शब्दवैभव आहे तुमच्याकडे. लिहीत रहा. आणि निर्मळ असतात कथा. म्हणजे वाचकाला सकारात्मक दृष्टी देणारं. खरच देवाची देण आहे.
>>>सामो नाही सायो >>>
>>>सामो नाही सायो >>>
खूप धन्यवाद सामो लक्षात आणून दिल्याबद्दल पण कदाचित मला आतून खात्री असावी की तुम्ही कथा वाचणारच म्हणून आधीच आपले ऋण मान्य केले .
आता याच प्रतिसादात सायो यांचे अनेकानेक धन्यवाद...
सामो प्रोत्साहनासाठी शत शत नमन....
>>>>कथा डोळ्यांसमोर घडते आहे
>>>>कथा डोळ्यांसमोर घडते आहे असं वाटेल इतकं परिणामकारक लिहिता तुम्ही.>>>>
स्वातीताई खूप, खूप धन्यवाद...
ही सर्व गाजलेल्या मराठी, हिंदी कथाकारांची किमया.... मी सतत शिकत असतो त्यांच्याकडून ...त्यांचा वाटा खूप मोठा आहे.
maitreyee
punekarp
rmd
ऋन्मेSSष
तुमचा प्रतिसादही माझ्यासाठी बहुमोल आहे....
खूप, खूप धन्यवाद...
"sunshine venture" आवडलं!
"sunshine venture" आवडलं!
नेहेमीप्रमाणेच अप्रतीम लेखन.
नेहेमीप्रमाणेच अप्रतीम लेखन. मला कळते ग्रामिण भाषा. गावात राहीलो तरी आजूबाजूचे शेतकरी व इतर लोक मराठी + अहीराणी अशी मिक्स भाषा बोलायचे. ती पण समजायची.
आवडली कथा. नाना छा गये.
अनन्त_यात्री
अनन्त_यात्री
अनेक धन्यवाद....
@ रश्मीताई.... खूप धन्यवाद...
मला माहित आहे अगदी सुरवातीपासून तुम्ही माझ्या कथा वाचून आवडल्याचे आवर्जून कळवता. असेच आपल्याला रुचेल असे लिखाण व्हावे.
मला बोलीभाषा खूप आवडतात. अहिराणी तर विशेष. बहिणाई आपल्या सर्वांच्या आवडत्या कवयित्री...
इतर ज्या ज्या बोलीभाषा कानावर पडतात त्या अंशतः कळाल्या तरी त्यांच्या प्रेमात पडतो.
सातारी, कोल्हापूरी, मालवणी, कोंकणी, विदर्भातली, औरंगाबादची, हैद्राबादची अगदी जुन्नरची जुन्नरी सगळं गोड वाटतं ऐकायला.
छान आहे कथा.
छान आहे कथा.
स्वत: साठी जगलास तर मेलास.
स्वत: साठी जगलास तर मेलास. दुस-यासाठी जगलास तरच जगलास>>>>
दोन मेणबत्त्या - अनंत कणेकर. (यत्ता दहावी १९९६ - लघु निबंध)
@लुटुपुटुचा खेळीया....
@लुटुपुटुचा खेळीया....
बरोबर हे वाक्य अनंत काणेकरांच्या दोन मेनबत्त्या या रुपकातलं आहे... हे मला १९७३ सालीच वाचनात आले...जे जे उत्तम उदात्त उन्नत ते मलाही भावते...
मला हे वैश्विक सत्य आहे असं वाटतं ( Universal Truth) ..तुम्ही स्वतःसाठी कितीही केलं तरी असमाधानीच असाल....
धन्यवाद....
@अमुपुरी... खूप धन्यवाद
Khupch Sunder
Khupch Sunder
Naru2022
Naru2022
खूप धन्यवाद आवर्जून दिलेल्या सुंदर प्रतिसादासाठी...
Pages