माझी अमेरिका डायरी - ८ - नव्याची नवलाई !

Submitted by छन्दिफन्दि on 31 March, 2023 - 23:53

आमच्या नवीन घरात / अपार्टमेंटमध्ये सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघर. ठाणा-मुंबईला सुद्धा कधी प्रशस्त स्वयंपाकघर नसतात, पण हे अगदीच काडेपेटीसारखं होत. ओटा म्हणून जो प्लॅटफॉर्म होता तो लाकडाचा, वरती सन्मयका लावलेला. म्हणजे पाणी टाकून धुवायही प्रश्नच नाही. तस तर म्हणा इकडे सगळंच ड्राय क्लीनिंग असतं Bw . ओट्याला मध्यभागी मोठा छेद दिलेला आणि त्यात कूकिंग रेंज बसवलेला. अनायसे ओव्हन पण मिळाला, त्यामुळे विविध ब्रेड, केक कुकीज करायला मिळणार म्हणून मी खुश झाले. त्याचा नंतर बराच उपयोगही केला, कधी ओघाओघाने तेही देईन. पण त्या कुकिंग रेंजची सर्वात वैतागवाडी म्हणे कॉइल्स. आपल्यासारख्या गॅस च्या शेगड्या इकडे जरा अभावानेच आढळल्या. अपार्टमेंट्स मध्ये तर प्रामुख्याने कॉइल्स, काही ठिकाणी त्यावर ग्लास टॉपींग दिलेले.
ह्या कॉईलीचे बरेच तोटे आहेत. एक तर सकाळी ती तापायला बराच वेळ लागतो, त्यामुळे प्रामुख्याने चहा करायला बराच वेळ लागतो. एकदा गरम झाली की लालम लाल, मग नीट लक्ष देऊन लगेच उतरवावे लागते. त्याची सवय व्हायला थोडा वेळ लागतो. त्यावरती तळण पण खूपच जिकरीचे असतं, कारण जर तेलाचा एखादा थेम्ब जरी पडला तरी ती खटकन पेट घेते. भाकऱ्या, वांगी भाजणे हे देखील आम्ही जाळी वगैरे ठेवून करून बघितले पण ते एव्हढ सहज आणि सोपे नव्हत मग आम्ही नंतर त्याचा नाद सोडला.
पण त्या स्वयंपाक घरातील माझ्यासाठी सगळ्यात नवलाईची गोष्ट म्हणजे “डिश वॉशर”. तसं तर आधी भारतात भांडी घासायला मावशी असल्यामुळे कधी डिश वॉशरच्या चौकशीसाठीही मी गेले नव्हते. पण इकडे मात्र हा बराच उपयोगी पडतो हा लौकीक ऐकून होते. लगेच दुसऱ्या दिवशी वापरलेली सगळी भांडी व्यवस्थित विसळून मांडून ठेवली डिशवॉशर मध्ये. सोप डिस्पेन्सर मध्ये सोपं टाकला. झाकण लावलं. मशीन सुरु केलं. इतकं सोप्प.
पण पाचच मिनिटात मशीन मधून पांढरा पांढरा फेस बाहेर पडायला लागला. हळू हळू पांढरा फेस, पाणी स्वयंपाकघरात तळच साठलं. आम्ही तातडीने अपार्टमेंट मॅनेजरला फोन केला. ती साधारण साठ-एक वर्षांची असावी, उंच, धिप्पाड तिचा नवराही तसाच. दोघे तिथेच एका घरात राहायचे. इकडे बऱ्याच अपार्टमेंट बिल्डींग्स मध्ये असेच त्या बिल्डींग मध्येच मॅनेजर फॅमिली सकट राहतात. आमचा अनुभव, त्यांना काही सांगितले की ते लगेच यायचे आणि लगेच जमणार नसेल तर सांगतील त्या वेळी नक्की यायचे. सामान्यतः लोकं जे बोलतात त्याप्रमाणेच वागतात असा आमचा अनुभव. उगाच आता येतो सांगून दोन दिवस पत्ता नाही असे आमचे आधीचे प्लंबर, रद्दीवाले, इस्त्रीवाले ह्यांचे अनुभव असल्यामुळे सुरुवातीला आम्ही यांच्या “बोले तैसा चाले” रीतीने खूपच इंप्रेस झालो.
हा, तर फोन केल्या केल्या पाचव्या मिनिटाला बंदा हजर. ते सगळं तळ बघून त्याने मला विचारलं,
“बघू कुठला साबण टाकला ?”
मी लगेच त्याला सिट्रस फ्लेवरच्या साबणाची नवीन आणलेली बाटली दाखवली.
“हा डिश वॉश सोप फक्त हातानी भांडी धुवायला वापरायचा. मशीन साठी कॅसकेडचा एक डबा मिळतो, त्यात छोटे पॉड्स असतात. जरा महाग असतो. पण तोच चालतो ह्यात.”
मग त्याने मला तो टारगेट मध्ये ह्या ह्या ठिकाणी मिळेल इथपर्यंत सगळं नीट समजावून सांगितलं. तो सगळा पसारा मी निस्तरला.
इकडे प्रत्येक गोष्टीला वेगळा साबण, एक रिन चा हात सगळीकडे फिरवला असं नाही.

walmart1_0.png
साबणाच्या २-३ आईल्स तरी असतात. अंगाचा, केसांचा हे तर नॉर्मल झालेच पण त्याव्यतिरिक्त डिशवॉश, हा डिश वॉशरचा, कपड्यांचा, वूलन कपड्यांचा, ड्रायिंग शीट्स, टॉयलेट क्लीनर्स , ग्लास क्लीनर्स, किचन क्लीनर, कार्पेट क्लीनर, वूड फ्लॉअर क्लीनर, ग्रॅनाईट क्लीनर, बाथरूम क्लीनर , टब क्लीनर, टाइल क्लीनर … हुश्श मी लिहितानाच दमले. ह्या प्रत्येक साबणात मग परत वेगवेगळे फ्लेव्हर्स, ब्रॅण्ड्स. ह्या कॅसकेडला मला काही मला अजुन स्पर्धक सापडला नाही. दुसरा पर्याय म्हणजे फक्त ट्रेडर जोचा डिश वाशर सोप. बर ह्या व्यतिरिक्त वेगवेगळे wipes, खालपासून वर पर्यँत सगळ पुसायला, मॅजिक इरेजर ज्याने खरच जवळ जवळ सगळे डाग पुसले जातात.
बर त्यावर कडी म्हणून जर डिश सोपं ची बाटली जर २ डॉलरला मिळाली तर ज्यांनी भांडी घासायची ती फुलं (स्क्रब ) ४-५ डॉलरला. सुरुवातीला असा वात आलेला म्हणून सांगता. पाहिल्या भारताच्या फेरीत वर्षभर पुरतील एव्हढे स्क्रब घेऊन आले आठवणीने. मग नंतर हळूहळू डायझो जपान, चायनीज डॉलर शॉप्स कळली तिकडे तुलनेने ह्या गोष्टी स्वस्त मिळतात.
हे सगळे साबण अतिशय स्ट्रॉंग असतात, त्यांच्या वासाने, स्प्रे ने कधी गुदमरल्यासारखेही होते. मग त्यावर उपाय म्हणजे परत अजून महागडे ऑरगॅनिक प्रोडक्टस. कुठल्याही अपार्टमेंटच्या प्रवेशालाच एक वॉर्निंग दिसते “आम्ही जे क्लीनिंग प्रोडक्टस वापरतो त्याने कॅन्सर होऊ शकतो “ टाईपची.
इकडे काही गोष्टींचं मला राहून राहून आश्चर्य वाटायचं. उठता बसता पेपर वापरला जातो. अगदी सकाळी उठल्यापासून, बाथ टिशू (टॉयलेट पेपर), फेस टिशू (चेहरा पुसायला ), पेपर टॉवेल (किचनमध्ये ), बटर पेपर (फॉईल मध्ये रॅप करायला ), ब्राउन बॅग (लन्च ठेवायला), शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या झिपलॉक बॅग्स ज्या फ्रिझर पासून , मुलांचे स्नॅक्स पॅक करायला रोजच्या उपयोगात मुबलक प्रमाणात असतात. त्याव्यतिरिक्त डिसइन्फेक्टइंग wipes, वेट wipes, फेशिअल wipes, बेबी wipes पेपरचा वापर संपतच नाही.
खार सांगू, आता आठ वर्ष होतील तरीही मला हे सगळे पेपर्स अतिशय महाग वाटतात. त्यातही COSTCO सारख्या होलसेल दुकानांमुळे बाथ टिशू वगैरे थोडे परवडणारे वाटतात.
Covid मध्ये काही महिने टॉयलेट पेपर्स चा इतका तुटवडा पडलेला, लोकांनी भरमसाठ स्टोर करून ठेवलेले , दुप्पट तिप्पट किमतींना विकले जात होते. कधी कशाने तोंडचं पाणी पाळेल सांगता येत नाही.
रोज सकाळी वर्तमानपत्र मात्र येत नाही. क्वचित कुठे स्टॅन्डवरती कॉईन्स टाकले की त्यातून काढता येतात.
पण आपण न मागताही महिन्याच्या महिन्याला जवळच्या दुकानाच्या पत्रिका येत राहतात , त्यात त्यांचे सेल, ऑफर्स ह्यांच्या जाहिराती , व्हाल पॅक म्हणून एक लिफाफा येतो त्यात खूप सारे डिस्काउंट देणारी पत्रक असतात. त्यातील एखादेच खरंच आपल्या कामाचे असते. मग शाळेकडून येणारी फ्लायरस (आता हे बंद झाली कारण इमेल पाठवतात ) , वेगवेगळ्या क्लासेसच्या जाहिराती. जर रद्दीवाला असता तर एकही रुपया(सेन्ट) (पेपरच बिल ) न देता दोनेक किलोची रद्दी नक्कीच झाली असती. तेव्हढाच आपला मध्यम वर्गीय हिशेब!

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy तो डिश सोप वापरण्याचा उद्योग बहुधा प्रत्येकाने एकदा केला असेल. मी ही केला आहे.

पेपर घरी येणे बंद झाले? काही वर्षांपूर्वीपर्यंत येत असे आमच्याकडे. सॅन होजे मर्क्युरी न्यूज. पाऊस असला की व्यवस्थित प्लॅस्टिक मधे गुंडाळी करून टाकत. पूर्वी रविवारी सकाळी अर्धा पाऊण तास पेपर वाचायची सवय होती. मर्क्युरी न्यूज मधेही तितका मजकूर, लेख ई असत.

बे एरिया मधे अपार्टमेण्ट्स मधे कॉईल्स असतात. त्यावर चहा नीट होत नाही. पण घरांमधे गॅस असेल. बाकी अमेरिकेत गॅसही खूप कॉमन आहे.

पण घरांमधे गॅस असेल. बाकी अमेरिकेत गॅसही खूप कॉमन आहे.>>> असेल. माझ्या ओळखीच्या बऱ्याचशा लोकांच्या घरी / अपार्टमेंट मध्ये कॉईल आहे . बे एरियात गॅस कॉमन का नाही ? किती सोयीचा आहे ?

छान लेख!
कॅलिफॅार्नियात climate change- and pollution-fighting strategy अंतर्गत natural gas appliances विकणे बंद करणार आहेत.

कॅलिफॅार्नियात climate change- and pollution-fighting strategy अंतर्गत natural gas appliances विकणे बंद करणार आहेत.>>> hmm aikalay..
पण ते आता. ह्या कॉइल्स ६०च्या इमारतींमध्ये, घरांमध्ये ही आहेत.

डिशवॉशर मध्ये साधा साबण घालणे हे वैश्विक आहे Proud
नॅचरल गॅसचा स्टोव्ह अनेकांना आवडत नाही. कारणे घरात जळत्या आगीमुळे प्रदुषण होते, लाकडाची घरे असल्याने वापरायला धोकादायक, लहानमुलांपासून दूर ठेवणे शक्य नसते, जुन्या घरात हीटींग ऑईलने होत असेल तर नॅचरल गॅसची पाईपलाईन आलेली नसते, इलेक्टिसिटी असतेच त्यामुळे तो स्टोव्ह बसवणे कमी खर्चिक आहे, निवड... अशी अनेक कारणे असू शकतात.
ईस्टकोस्टला (नॉर्थ ईस्ट म्हणू.. कारण खालच्या राज्यांत असं कितीसं हीटिंग लागणारे समजुन इलेक्टिक हीटिंग असू शकेल. ईस्ट कोस्टला ही जुन्या अपार्टमेंट्स मध्ये गरम पाण्याने हीटिंग आहे. नवीन ठिकाणी नॅचरल गॅस फर्नेस असेल) जरा नव्या घरांमध्ये नॅचरल गॅस हीटिंग होत असल्याने पाईप ऑलरेडी घरात आलेला असतो, आणि वरच्या लिस्ट मधलं एक मोठं कारण नाहिसं होतं.
वर सोनालीने लिहिल्याप्रमाणे एकेक ठिकाणची सरकारं नॅचरल गॅस उपकरणे हळूहळू बंद करू लागली आहेत. लीड अर्थात नेहेमी प्रमाने प्रॉप-६५ राज्याचाच असेल.
माणसला कशाचीही सवय होते. आणि सवय करुन घ्यायची नाही ठरवलं की सगळं खुपतं. Happy
वर्तमानपत्राच्या साईटवर सबस्क्राईब ऑप्शन असतो तिकडे जाऊन होम सबस्क्रिप्शन चालू करता येईल.
कॅस्केड महाग वाटत असेल तर लाखदुखोंकी एक दवा... कॉस्ट्को. कर्ललँड झिंदाबाद! Happy

कॅलितल्या अपार्टेमेंट्समध्ये कॉईल सहन केल्यानंतर न्यूजर्सीमध्ये फ्लेमचा स्टोवटॉप बघितल्यावर अपार आनंद झाला होता. हो आणि प्रत्येक खोलीत कार्पेट नव्हते ते बघूनही हायसे वाटलेले Happy

माणसला कशाचीही सवय होते. >>>> सवय होणे आणि करून घेणे एका बाजूला आणि पसंती दुसऱ्या
होम सबस्क्रिप्शन चालू करता येईल.>>> हो. करायला तर अंगणात दगड मांडून चूल पेटवून त्यावर भाकऱ्या, वांगी भाजता येतील Lol Lol Lol

लाखदुखोंकी एक दवा... कॉस्ट्को>>> १०० %

प्रत्येक खोलीत कार्पेट नव्हते ते बघूनही हायसे वाटलेले >>> खरी गोष्ट आहे.
आता इकडे जुन्या अपार्टमेंट मध्ये बाहेरच्या खॊलीत कार्पेट ऐवजी वूडन ठेवण्याचा प्रयत्न करतायत, दणकून भाडं वाढवायला मोकळे ना मग?

कुणाला अतिशयोक्ती वाटेल किंवा राग पण येईल पण असेही काही लोक आहेत की तिकडचे (भारतातले) मोठ्या आणि चांगल्या कॉम्प्लेक्स मधले ब्लॉक सोडून इकडे कार्पेट, कॉईल असलेल्या , जुन्या छोट्या (?) , काही ठिकाणी कुलिंग नसलेल्या पण तरी खूप जास्त भाडं असलेल्या अपार्टमेंट मध्ये / घरांमध्ये रहाव लागतंय म्हणून वैतागलेले होते . मला वाटतं हि गोष्ट जास्त एरिया स्पेसिफिक असावी. (साऊथ बे - cupertino, सनीवेल इतकं)

माझ्या २ भारतभेटीत मला जाणवलेली गोष्ट कि तिकडे अतिशय वेगाने बदल होतायत (प्रगतिशील देश )आणि त्या मानाने अमेरिकेत (आधीच प्रगत असल्यामुळे असेल ) विशेष बदल झालेले नाहीत.

गेल्या आठ वर्षात इकडे EV कार्स आणि चार्जिंग स्टेशन हा एकमेव ठळक बदल.

आजकाल भारतात नवीन बांधकामांत स्वैपाकघर हे घराच्या दारातच असणे, त्यात कुकिंग रेंज असणे, शेगडीजवळ कुठलीही खिडकी नसणे, पण वरती रेंजहूडवाला एक्झोस्ट असणे, ओटा सन्मायकाचा असणे - असले सगळे प्रकार करत आहेत आणि 'वेस्टर्न स्टाईल'च्या नावाखाली भरमसाठ पैसे आकारत आहेत. महाराष्ट्रात वर्षाचे जवळपास सर्वच महिने दारं - खिडक्या सताड उघड्या टाकायची सोय असते, त्यात आपला रोज फोडण्या/तळण/आलं-मिरची-कांदा-लसूण असलेला स्वैपाक असतो, तिथे स्वयंपाकघर खिडकीच्या जवळ हवं; अगदी खिडकीत ओटा नसला तरी. पण अश्या घरांत खिडकी अगदी दुसर्‍या टोकाला असते. स्वैपाकाचा वास घरात कोंडून राहतो. घरभर कार्पेट असेल तर त्यात दिवसेंदिवस तो शोषला जातो. भारतात अजिबात गरजेचं नसताना हा प्रकार येतो आहे. त्या त्या देश-कालपरत्वे योग्य ठरेल असं बांधकाम करावं हे यांना कुणीतरी शिकवायची गरज आहे.

मूर्खपणा आहे! आमच्या इथे कडेकोट बंदोबस्ताची घरं अत्यावश्यक असतात कारण तापमान सहा महिने उणे असतं. तरी उन्हाळा यायची आणि खिडक्या उघड्या टाकायची लोक वाट बघत असतात. कार्पेट कमी/ नाहीसं करुन हार्डवुड / टाईल्स फ्लोर करण्याकडेही लोकांचा कल असतो. कारण कार्पेट सगळ्यात स्वस्त पडलं तरी ते तापदायक असतं.

भारतात लोकं अंधानुकरण तर करतातच पण त्याचं सेलिब्रेशन करण्याच्या नादात फार विनोदी काही तरी करतात. हालोईनला इकडे शाळा झाल्यावर संध्याकाळी ट्रिकओट्रीट इ. मजा असते, पण शाळेत कोणी ड्रेसप करत नाही, का कोणाला ड्रेसप करायचं नसलं तर त्याचा मान राखला जातो. आणि केलंच तर शाळेत परेड असली (जी आमच्याकडे नसते) तर परेड पुरतं करतात. भारतात त्याचा इव्हेंट करुन टाकलाय असं समजलं.

भारतात वर पासून खालपर्यंत सगळे अंधानुकरण करतात. माझ्या लहानपणी कोकणचा कॅलिफोर्निया करायचे घाटत होते. अरे कोकणच ठेवा फक्त चांगले कोकण करा ना, पण नाही! त्यात मग अमक्याचे शांघाय , तमक्याचे सिंगापूर वगैरे भरच पडत गेली. गेल्या भारतवारीत 'इथे पण आता तुमच्यासारखे' असे म्हणत बरेच अंधानुकरण बघायला मिळाले, जोडीला भलत्याच गोष्टींचा गर्वही!

अंधानुकरण वरून एक आठवलं
आपल्याकडे औटर ग्लास असलेली ऑफिस असण्याचं एक फॅड वाढीला लागलं आहे
ज्या प्रदेशात थंडी असते सूर्यप्रकाश कमी असतो तिथं ही तिथल्या वातावरणात जुळवून घेण्याची सोय आहे
पण ते कसलं भारी दिसतं म्हणत आपल्याकडं तसेच करतात तेव्हा नवल वाटतं
कारण आपल्या इथल्या कडक सूर्यप्रकाश आणि वातावरणात त्या ग्लास ऑफिस मध्ये जोरदारपणे एसी चालवावा लागतो

भारतीय लोकं परदेशातली शिस्त, लोकांचा सिव्हिक सेन्स, पब्लिक जागा स्वच्छ ठेवण्याची वृत्ती हे सोडून बाकी सगळ्यांचं अंधानुकरण करण्यात धन्यता मानतात.

भारतीय लोकं परदेशातली शिस्त, लोकांचा सिव्हिक सेन्स, पब्लिक जागा स्वच्छ ठेवण्याची वृत्ती हे सोडून बाकी सगळ्यांचं अंधानुकरण करण्यात धन्यता मानतात.>>>
H1B, L1 सोबत आता हे असे सरसकट विधाने करून भारतीयांचा अपमान करण्याची परवानगी पण मिळते बहुदा. शिस्तीचे जाऊद्या, भारतात कोणी असाच उठून शाळेत जाऊन लहान मुलांच्या हत्या करत नाही. परदेशात एवढा सिव्हीक सेन्स आहे तर मग ब्लॅक लाईव्हस मॅटर सारख्या चळवळी कशाला उभ्या राहिल्या असत्या?

मस्त चाललीय ही सिरीज , मी उलट दिशेने वाचतेय सध्या
१०, ९, ८...
अनुभव भारी एकेक .. (यातली खरी गंमत अशी आहे की , तुमच्या स्वाभाविक /नकळत झालेल्या चुका आपणही केल्या आहेत किंवा माहित नसल्यामुळे होणारे गोंधळ /आश्चर्य जनक स्थितीतून आपणही गेलोय हे वाचून हायसं वाटतंय Wink )

पूर्ण लेखमाला वाचली आहे, तुम्ही प्रत्यक्ष अनुभव आणि घडलेल्या गमतीजमती- स्वतः केलेल्या चुकांसकट सहज लिहिता आहात हे आवडले.

हा भाग विशेष. अमेरिकन घरे आणि त्यातील सामानाचा सोस यावर लिहावे तेवढे कमीच. Size obsessed people mostly !

घरबांधणीतील तिकडची एक चांगली बाजू म्हणजे स्टॅण्डर्डायझेशन, त्यामुळे घरांचे मेन्टेनन्स सोपे होत असावे.

मी solitared.com वरचं शब्दकोडं रोज सोडवतो. त्यात गॅस स्टोव्ह या अर्थी रेंज range हा शब्द अनेकदा असतो.

Back to top