Reel vs Real

Submitted by nimita on 25 April, 2023 - 09:27

शर्वरीसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. अगदी मनाच्या कुपीत जपून ठेवण्याइतका खास... फक्त तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या पतीच्या- रोहनच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकासाठी! आज रोहनला त्याची हक्काची ओळख मिळणार होती. तब्बल वीस वर्षांनंतर का होईना पण त्याची जीवनगाथा, त्याचं शौर्य आणि तिचा त्याग आज सगळ्या जगाला कळणार होता.

तसं पाहता वीस वर्षांपू्वी देखील सगळ्यांनी रोहनच्या कामाची दखल घेतली होती; ज्याला जसे जमतील तसे- प्रत्येकाने त्याच्या शौर्याचे पोवाडे गायले होते. शर्वरीने त्याला बहाल करण्यात आलेले 'मरणोत्तर' सन्मानही स्वीकारले होते. पण नेहेमीप्रमाणे तो आणि त्याचं बलिदान दोन्हीही हळूहळू काळाच्या पडद्याआड विरून गेले. हळूहळू सगळंच विस्मृतीत गेलं.आयुष्यच ते... त्याच्यावाचूनही पुढे सरकत राहिलं. कारण अगदी साधं,सोपं आणि साहजिक होतं- त्याच्यासारखेच अजून कितीतरी मातृभूमीच्या रक्षणार्थ रोज धारातीर्थी पडत होते; तिच्यासारख्याच अजून कित्येक जणी रोज वीरपत्नी होऊन जगत होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे - हे विदारक सत्य सगळ्यांनीच गृहीत धरलं होतं.

पण कशी कोण जाणे, अचानक रोहनची बलिदान गाथा पुन्हा प्रकाशाच्या झोतात आली. आणि त्याला कारण ठरला- धीरजकुमार - कायम ' हटके ' विषयांवर चित्रपट बनवणारा एक सुविख्यात दिग्दर्शक! एका sensational कहाणीच्या शोधात असताना रोहनची जीवनकहाणी त्याच्या वाचनात आली. रोहनचं शौर्य, त्याचं बलिदान याबद्दल वाचून धीरज चांगलाच भारावून गेला. पण त्याहीपेक्षा जास्त - या real life story मधे त्याला एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची पटकथा दिसत होती. त्याने जेव्हा त्या दृष्टीनी विचार करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर हळूहळू सगळा चित्रपट उलगडत गेला. त्याच्या मनात आलं,'जर सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं तर हा सिनेमा नुसता ब्लॉकबस्टरच नाही तर एक अजरामर शौर्यगाथा म्हणून ओळखला जाईल.' त्याच क्षणी त्याने ठरवलं; रोहनच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरात लवकर लोकांसमोर सादर करायचा. क्षणाचीही उसंत न करता त्याने सगळी सूत्रं हलवायला सुरुवात केली.

आणि एक दिवस सकाळी शर्वरीच्या घरासमोर एक भली मोठी कार येऊन थांबली. धीरजकुमार स्वतः तिच्या भेटीसाठी आले होते. त्यांनी थोडक्यात पण तरीही अगदी मुद्देसूद रित्या तिला या भेटीचं प्रयोजन सांगितलं. 'आपल्या पतीच्या आयुष्यावर, त्याने दिलेल्या सर्वोच्च बलिदानावर आधारित चित्रपट बनतो आहे' - या नुसत्या कल्पनेनेच शर्वरीचा ऊर अभिमानाने भरून आला. साहजिकच तिने तिच्याकडून जमेल ते सगळं सहकार्य करायची तयारी दाखवली. तिची फक्त एकच अट होती, एकच आग्रह होता- चित्रपट वास्तवाला धरून असावा; त्यात उगीच काल्पनिक दृश्यं किंवा नेहेमीचा उथळपणा नसावा. धीरजकुमार ने कोणतेही आढेवेढे न घेता तिची ही अट मान्य केली. चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय नायक -'जतीनकुमार' रुपेरी पडद्यावर रोहनची भूमिका साकारणार होता.

बघता बघता चित्रपट आकार घेऊ लागला. एकंदरीतच चित्रपट यशस्वी व्हावा; नुसता यशस्वीच नाही तर super duper hit व्हावा म्हणून सगळेच खूप मेहनत घेत होते. अभिनेता जतीन तर तासन् तास शर्वरीला रोहन बद्दल वेगवेगळे प्रश्न विचारून त्याच्याबद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. रोहन चे फोटो, त्याचे काही videos वारंवार बघत होता; रोहनच्या हालचाली, त्याच्या लकबी हुबेहूब आत्मसात करायचा प्रयत्न करत होता.

पण या सगळ्या घडामोडींमुळे शर्वरीची मनस्थिती मात्र खूपच दोलायमान होत होती. तिच्या मनात एकीकडे कृतार्थतेचे भाव गर्दी करत होते; पण त्याचवेळी गतस्मृतीच्या जखमांवरच्या खपल्या निघाल्यामुळे तिचं मन पुनःपुन्हा घायाळ होत होतं. तरीही केवळ रोहनच्या बलिदानाला न्याय मिळावा म्हणून तिने पुन्हा एकदा आपलं मन घट्ट केलं होतं.

काही महिन्यांच्या प्रदीर्घ परिश्रमानंतर शेवटी एकदाचा चित्रपट पूर्ण झाला. एक दोन दृश्यांचे अपवाद वगळता संपूर्ण चित्रपट खरंच वास्तववादी होता. पाहणाऱ्याच्या मनावर रोहनच्या पराक्रमाची, त्याच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची छाप पाडण्याइतका प्रभावी होता. इतकी वर्षं काळाच्या पडद्याआड गेलेला रोहन आणि त्याचा जीवनपट आत्ताच्या नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणास्रोत ठरणार होता. इतकंच नव्हे तर चित्रपटात शर्वरीच्या त्यागाचं, तिने दाखवलेल्या मनोधैर्याचं देखील अगदी यथार्थ दर्शन घडवून आणण्यात आलं होतं. थोडक्यात म्हणजे- चित्रपट सर्वच अंगांनी परिपूर्ण होता. धीरजकुमारनी ठरवल्या प्रमाणे हा चित्रपट नक्कीच एक वेगळाच इतिहास घडवून आणणार यात कोणालाच शंका नव्हती.

आता शर्वरीला चित्रपट प्रदर्शित होण्याचे वेध लागले. त्यादृष्टीने सुद्धा धीरजकुमारनी आधीच विचार करून ठेवला होता. वीस वर्षांपूर्वी ज्या तारखेला रोहनने आपल्या प्राणांची आहुती दिली होती त्याच तारखेला आता तब्बल वीस वर्षांनंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

आणि आज तो दिवस उजाडला होता. आजच्या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून शर्वरीला खास आमंत्रण देण्यात आलं होतं. आजचा हा दिवस शर्वरीसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार होता. तिच्या रोहनचं नाव आता देशाच्या कानाकोपऱ्यात, घराघरात जाऊन पोचणार होतं.

ठरल्याप्रमाणे धीरजकुमार स्वतः शर्वरीला आपल्या बरोबर घेऊन गेले. चित्रपट गृहात आणि बाहेरच्या परिसरात लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. चित्रपट गृहाच्या बाहेरील मोकळ्या जागेत एक भव्य मंच उभारण्यात आला होता. चित्रपटाचा नायक जतीन स्वतः जातीने शर्वरीला त्या मंचावर घेऊन गेला. मंचावर मध्यभागी रोहनचा एक life size फोटो ठेवला होता. शर्वरीच्या हस्ते रोहनच्या फोटोला पुष्पहार घालून श्रध्दांजली वाहण्यात आली. धीरजकुमार, जतीन आणि इतर प्रतिष्ठित आमंत्रित एक एक करून रोहनच्या शौर्याबद्दल, त्याच्या बलिदानाबद्दल आणि मुख्यत्वे करून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाबद्दल बोलू लागले. लोकांच्या आग्रहास्तव शर्वरीने देखील रोहनच्या कितीतरी आठवणी, त्याच्या शौर्याचे कितीतरी किस्से अगदी सविस्तर सांगितले. लाऊड स्पीकर वरून ऐकू येणारी देशभक्तीपर गाणी आणि तिथलं एकंदर वातावरण बघून उपस्थितांच्या मनात आपोआपच देशप्रेम उफाळून येत होतं.

इतकी वर्षं ज्याचं नावही कोणाच्या लक्षात नव्हतं तो रोहन आता तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी श्रध्दास्थान बनला होता.

हे सगळं बघून, अनुभवून शर्वरीचा ऊर मात्र अभिमानाने भरून आला होता. तिच्या मनात आलं - ' जर आत्ताच या सगळ्यांची ही अवस्था आहे तर चित्रपट बघितल्यानंतर काय होईल? आत्ता त्यांनी रोहन बद्दल नुसतं ऐकलंय; जेव्हा त्याच्या शौर्याचे किस्से चित्रपटात प्रत्यक्ष बघतील तेव्हा तर नक्कीच माझ्या रोहनच्या नावाचा उदोउदो करतील हे सगळे!'

तिने कृतार्थ नजरेनी रोहनच्या फोटोकडे बघितलं. पापण्यांच्या आड गर्दी करणारी आसवं कशीबशी थोपवून धरत ती मंचावरून खाली उतरली. प्रेक्षकांच्या गर्दीतून वाट काढत धीरजकुमार तिला सन्मानाने चित्रपट गृहात घेऊन गेला.

थोड्याच वेळात चित्रपट सुरू झाला. जतीनकुमार ने रोहनच्या भूमिकेला अगदी पुरेपूर न्याय दिला होता. धीरजकुमार नी म्हटल्याप्रमाणे हा चित्रपट खरोखरच block buster ठरणार होता. साहजिकच चित्रपटाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शर्वरी पण खूप आनंदात होती; पण त्याहीपेक्षा तिच्या चेहेऱ्यावर असीम समाधान आणि स्वप्नपूर्तीचे तृप्त भाव झळकत होते. आज तिच्या रोहनचं बलिदान आणि तिचा त्याग सार्थकी लागला होता.

जेव्हा चित्रपट संपला तेव्हा संपूर्ण चित्रपटगृहात एक निःशब्द शांतता पसरली.भारावलेले प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जणू काही स्तब्ध झाले होते. पण पुढच्या काही क्षणांतच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला आणि संपूर्ण चित्रपटगृहात रोहनच्या नावाचा जयजकार घुमू लागला.

धीरजकुमार आणि जतीन बरोबर शर्वरी पुन्हा एकदा बाहेर उभारलेल्या मंचावर जाऊन पोचली. तिथला रोहनचा तो भलामोठा फोटो बघत असताना क्षणभर शर्वरीला वाटलं की जणू काही रोहन तिच्याकडे बघून हसतोय. कोणाला काही कळायच्या आत प्रेक्षकांचा प्रचंड लोंढा त्या मंचाच्या दिशेनी यायला लागला. त्यांच्या त्या अनावर उत्साहाला आळा घालणं कोणालाच शक्य नव्हतं. प्रेक्षकांचं इतकं उत्स्फूर्त प्रेम बघून शर्वरी पुन्हा भावनाविवश झाली.तिच्याही नकळत ती रोहनच्या फोटो शेजारी जाऊन उभी राहिली. जणू काही दोघं अगदी जोडीने उभे होते - लोकांच्या अभिनंदनाचा, त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करायला!

आणि बघता बघता प्रेक्षकांनी त्या भव्य मंचावर गर्दी केली. प्रत्येक जण आपापल्या हातातले मोबाईल फोन सरसावून selfie घेण्यासाठी धडपडत होता. मीडियाचे वार्ताहर आपापले कॅमेरे घेऊन सज्जच होते. एकच झुंबड उडाली होती. शर्वरीच्या मनावर दडपण आलं; हे असं 'centre of attraction' असणं तिने आजपर्यंत कधीच अनुभवलं नव्हतं. तिने काही क्षण आपले डोळे मिटून घेतले. तिच्या त्या मिटलेल्या डोळ्यांसमोर रोहनचा हसरा चेहरा तरळला आणि तिच्या मनावरचं दडपण कुठल्या कुठे पळून गेलं. तिने हसत हसत डोळे उघडले आणि दोन्ही हात जोडून लोकांचं अभिवादन स्वीकारायला सज्ज झाली.

पण त्या मधल्या काही क्षणांत समोरचं चित्र पूर्णपणे पालटून गेलं होतं. मंचावर येणारे प्रेक्षक रोहनच्या दिशेनी न येता जतीनकुमारच्या अवतीभोवती गर्दी करत होते. त्याच्याबरोबर आपला एक तरी फोटो काढायला मिळावा; त्याच्याशी बोलायला मिळावं; अगदीच काही नाही तर निदान त्याच्याशी हस्तांदोलन तरी करता यावं- यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. कोणालाही काहीही कळायच्या आत मंचावर इतकी गर्दी जमली की रोहनचा फोटो झाकला गेला. साहजिकच त्या फोटोशेजारी उभी असलेली शर्वरी देखील कोणालाच दिसत नव्हती... दिसत नव्हती म्हणण्यापेक्षा तिच्याकडे आणि रोहनकडे लक्ष द्यायला आता कोणालाच वेळ नव्हता आणि बहुदा त्या बाबतीत फारसं स्वारस्यही नव्हतं.

त्या क्षणी शर्वरीला एक सत्य अगदी प्रकर्षाने जाणवलं...

आज एका 'Reel Life' अभिनेत्या समोर एक 'Real Life' हिरो फ्लॉप ठरला होता!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कथा
>>>>आज एका 'Reel Life' अभिनेत्या समोर एक 'Real Life' हिरो फ्लॉप ठरला होता!>>>>>
ही दुर्दैवी सत्य स्थिती आहे

प्रसिद्धीच्या गंगेत हात धुतांना शर्वरी वाहवत गेली.

आमीरखान आणि महावीर फोगट एका स्टेजवर असतील तर लोक फोगटांबद्दल आदर बाळगून राहतील पण फॅन्सचा गराडा, सेल्फी, अटेंशन, प्रसिद्धी, पैसा आमीरखानच्याच वाट्याला येणार.... कारण पब्लिक त्याच्याशी चांगले कनेक्ट करू शकते.

ह्याऊलट धोनी आणि सुशांतसिंग एका स्टेजवर असतील तर लोक सुशांतपेक्षा धोनीभोवती जमणार. जो लोकांसमोर जास्त वेळ दिसतो त्याच्याशी लोक जास्त चांगले कनेक्ट होतात आणि त्याचे फॅन बनतात. नैसर्गिक आहे ते त्यात हिट्/फ्लॉप वगैरे काही नाही. दोघांचेही कर्तुत्व आपल्याजागी महान आहे.

आज एका 'Reel Life' अभिनेत्या समोर एक 'Real Life' हिरो फ्लॉप ठरला होता >>>ही भावना ईमॅच्युअर आणि सेल्फ पिटी वाली आहे.
सैनिकासाठी त्यांच्या पराक्रम आणि बलिदानाला वंदन म्हणून देशाकडून शौर्यपदक मिळणे हा सर्वोच्च्य सन्मान आहे ना.
सेल्फी बिल्फी वरून हिट फ्लॉप ठरवणे अगदीच वरवरच्या भावना वाटल्या.

>>>>सेल्फी बिल्फी वरून हिट फ्लॉप ठरवणे अगदीच वरवरच्या भावना वाटल्या.
पण एका पत्नीच्या भावना म्हणुन मला योग्य वाटल्या. नवर्‍याचं भरभरुन कौतुक होणार ही एका पत्नीची अपेक्षा रास्त आहे. हा अपेक्षाभंगाचा धक्का म्हणुन ती , अमा म्हणतात तशी सेल्फ-पिटी मध्ये जाणेदेखील नॅचरल वाटले मला.