"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी पेपरात 'गजाआड' हा शब्द वाचून मला वाटायचं की हत्तीच्या आड कुणाला तरी लपवत आहेत म्हणून.

लहानपणी पेपरात 'गजाआड' हा शब्द वाचून मला वाटायचं की हत्तीच्या आड कुणाला तरी लपवत आहेत म्हणून >> Lol Lol Lol

माझ्या लहानपणी 'परदेशी बनावटीच्या आलिशान' हा मराठी वृत्तपत्रांचा आवडता शब्दप्रयोग होता. 'राजेश खन्नाचे परदेशी बनावटीच्या आलिशान मोटारीतून आगमन झाले' किंवा अमक्या तमक्या स्मग्लरकडून पोलिसांनी परदेशी बनावटीची आलिशान मोटार जप्त केली अशा टाईपच्या बातम्या नेहमी यायच्या. ते वाचून हे लोक एवढे श्रीमंत असून बनावट मोटारी का वापरतात, असा प्रश्न पडायचा.

“ बनावट मोटारी” - Lol डिट्टो मोरोबा! बातम्यांमधे कुठल्यातरी रशियन बनावटीची शस्त्रास्त्र भारताने विकत घेतल्याची बातमी वाचून भारताच्या सुरक्षेची बालसुलभ काळजी वाटल्याचा प्रसंग आठवला. Happy

काळजी नको, ती परंपरा अजूनही चालू आहे. साधं, सरळ, सोप्या भाषेतलं लेखन डाऊनमार्केट समजतात.
>>> हो कुठच्याही भाषेत

नॉर्वेला मध्यरात्रीचा सुर्य दिसतो - भुगोलच्या पुस्तकात वाचुन कायच्याकाय वाटायचे. मध्यरात्री सगळे झोपले असताना तिकडे अचानक डोक्यावर १२ वाजताचा सुर्य दिसायला लागतो असेच वाटुन हे अचानक कसे घडत असणार याचे खुप औत्सुक्य वाटत राहायचे.

नंतर कळले मध्यरात्रीचा सुर्य कशाला म्हणतात ते. सहा महिने रात्र असते हे ऐकल्यावर तर तिकडे कधी न गेलेले बरे असे वाटायला लागले. रात्रंदिवस जिथे फक्त रात्रच अशा ठिकाणी दिवस कसे काढायचे???? Happy

नॉर्वेला मध्यरात्रीचा सुर्य दिसतो - भुगोलच्या पुस्तकात वाचुन कायच्याकाय वाटायचे<<<< मलाही Happy Happy Happy

साधं, सरळ, सोप्या भाषेतलं लेखन डाऊनमार्केट समजतात.<<< Uhoh

>> गजाआड आणि
>> परदेशी बनावटीच्या

+१११ अगदी अगदी Lol Lol

मला तो शब्द प्रिंटींग मिस्टेक वाटून मी तो गंजाआड असा वाचायचो. कारण आमच्याकडे स्टीलचा गंज होता. त्याच्याशी संबंध जोडून अर्थ लावायचा आटोकाट पण निष्फळ प्रयत्न केला होता.

याशिवाय "थोरांची ओळख" पुस्तकात "मायेची पाखर" धडा होता. पाखर सुद्धा प्रिंटींग मिस्टेक समजून "पाखरं" करून अर्थ लावायचा आटोकाट पण निष्फळ प्रयत्न Lol याच पुस्तकात अजून काही शब्दांबाबत असे गैरसमज झाले होते.

बनावटीच्या बाबत मात्र अगदी सहमत.

बाकी या धाग्यामुळे एरवी कधीच व कुठेच व्यक्त झाल्या नसत्या अशा आठवणी जागवल्या जात आहेत इतक्या दशकांनी.

बनावटी Lol

शब्दावरुन वेगळाच अर्थ वाटलेला किस्सा काही वर्षांपुर्वी झाला. मोठेपणीची समजुत या सदराखाली चालवुन घ्या. दु:खी घटना आहे. कोणत्यातरी देवीच्या देवळात अतीप्रचंड गर्दी व चेंगराचेंगरी झाल्याने बरीच प्राणहानी झाली होती. तेव्हा युट्युबवर हिंदी बातमीचा मथळा, ‘भगदड में ५० लोगों का मृत्यु‘ असा होता. मला चुकुन भगदड म्हणजे भगदाड वाटलं. आणि त्यामुळे देवळाबाहेर रांगेत उभे असलेले लोक कोणत्यातरी मोठ्या भगदाडात पडले व जिवाला मुकले असं वाटलं. अर्थात बातमी ऐकल्यावर उलगडा झाला म्हणा.

सुर्यग्रहणाचा प्रचंड धसका घेतलेली ती रात्र अजून आठवते. आठवणीतले पहिले सुर्यग्रहण. मोठया माणसांनी इतकी भीती घातली होती की उद्या चुकूनही नजर जर सूर्याकडे गेली तर जाग्यावरच डोळे जाऊन झटकन आंधळेपण येईल या विचारांनी रात्रभर भयंकर ग्रासले होते. तो त्या काळातला नाईट लॅम्प (आठवतो का तो काळा प्लास्टिकचा गड्डा वर असायचा व खाली बॅटरीची बल्ब त्यावर निळी हिरवी काच). रात्री दचकून आली तेंव्हा त्या लॅम्पकडे बघायचे सुद्धा धाडस होत नव्हते. खूप खूप जुनी गोष्ट पण अजून स्पष्ट जसेच्या तसे सगळे आठवते.

जिल्हा शल्यचिकित्सक

बस मधून जाता येता एका इमारतीवर ही पाटी दिसायची "जिल्हा शल्यचिकित्सक". पण हे नक्की काय करतात कळायचे नाही. शाळेच्या मराठी पुस्तकात कुठेतरी "याचं शल्य त्याला बोचत होतं" अशा प्रकारचे वाक्य असायचं. त्यावरून शल्य म्हणजे दु:ख किंवा मनाला लागलेली गोष्ट इतके कळले होते. मग शल्यचिकित्सक म्हणजे दु:खाची चिकित्सा करणारे असतील का? जिल्ह्यात कुणालाही दु:ख झाले कि यांच्याकडे जायचे Lol "जिल्हा शल्यचिकित्सक" चा काहीही बोध होत नव्हता.

अतुल Lol

माझा लहानपणी 'बुड्ढी के बाल' म्हणुन मिळणारा खाऊ म्हणजे 'म्हातारीचे केसच' असतात ही समजुत बरेच दिवस होती.

ए एडक्यातला. हा 'एडका' फक्त अंकलिपीतच बघायला मिळाला. व्यवहारी भाषेत आजवर शेळी, मेंढी, मेंढा, बकरी, बकरा, पालवं, बोकड इत्यादी सगळे ऐकायला मिळाले पण एडका कधीच नाही. मेंढा म्हणजेच एडका म्हणतात काही लोक, पण नक्की माहिती नाही.

चंद्रावर जाण्यासाठी समुद्रातून पोहत जायला लागतो (क्षितिजावर चंद्र पाहिल्यावर झालेली मनधारणा).

Pages

Back to top