बेल वाजली.
खिडकीतून मला बाहेर अडकलेलं कबुतर दिसतंय. फडफड करतंय. कालपासून. हो, काल कधीतरी मला जाणवलं की गॅलरीत एक कबुतर आलंय आत आणि अडकलंय. अभिमन्यू चक्रव्यूहमें फस गया है तू... कधीकाळी ऐकलेल्या गाण्याचे सूर माझ्या डोक्यात घुमले. मी झटकन हॉलचा गॅलरीत जाणारा काचेचा दरवाजा बंद करून घेतला होता. माझ्या खिडकीला जाळी आहे. बंद.
पक्कं अडकलंय ते आता.
खरं तर नुकतंच गॅलरीला नवं कोरं बर्डनेट लावून घेतलंय आप्पांनी. नाही तर ते आधीचं तुटलं होतं, त्यातून तर कायमच कबुतरं आत यायची. आत यायची, आणि सहज बाहेरही जायची. पण आता या नवीन कडेकोट बंदोबस्तानंतरही हे चुकार कबुतर घुसलं कसं? घुसलं तर घुसलं. भोग आता आपल्या कर्माची फळं.
आत आलंच कसं याचा मी विचार करतेय. कुठल्याही सांदीसपाटीतून आत घुसायला जागा नाहीये. हे कुठून आलं? असं अनपेक्षित?
पुन्हा बेल वाजली.
घरात मी एकटी आहे. आणि बेल कुणीही, कितीही वेळा वाजवली तरी मी दरवाजा उघडत नाही. कधीच नाही. नाहीच.
ते कबुतर जाळ्याला धडकून लटकलं. पंखांची नुसतीच फडफड करत होतं. तडफड चालली होती त्याची सुटकेसाठी. त्याला कुठे माहीत होतं की काही जाळी अशी असतात की त्यांतून सुटका नसते. आयुष्यभर, कधीही, कधीच नसते. अगदी मरणापर्यंत.
आज त्याचा आवेश उतरला होता. उडणं कमी झालं होतं. कालपासून व्यर्थ प्रयत्न करून थकलं असणार. मग काय होणारे?
गेले वाटतं ते बेल वाजवणारे.
वरच्या घरातून त्यांच्या खिडकीतून आवाज येत होते मला ऐकायला. त्यांच्या स्वयंपाकघराची खिडकी आमच्या गॅलरीत उघडते ना, त्यामुळे त्यांनाही हे कबुतर दिसत असणार. ती बाई म्हणत होती, आता कसं निघणार हे कबुतर बाहेर? तिला कसली काळजी आलीयए तर कबुतरांची. इथे माणसं जगणं कुजवतायत.. कबुतरांची कसली काळजी करताय. कोणाला कशाची तर कोणाला कशाची काळजी. मेलं तर मेलं. आपल्या कर्मानं मरेल ना? माझ्यासारखं नशिबानं नाही ना?
आणि ती.. ती मेली कबुतरीण. ती मारतीये चकरा जाळीच्या बाहेर. कालपासून. भलतंच प्रेम आलंय. हा इकडून जाळीला लटकतो, अन् ती तिकडून. मरा दोघंही.
ह्या, ह्या कबुतरांमुळे तो काय तो रोग होतो. व्हॉट्सॲप वर काल होता मेसेज. मरायला हवी आहेत कशाला ही कबुतरं. आणि त्या जोड्या. आणखी पैदास वाढवायलाच ना?
आता मला कबुतर दिसत नव्हतं. बसलं असेल त्यांच्या खिडकीच्या ग्रिलवर.
आता वरून आवाज येताहेत. मी उघडलं नाही दार म्हणून आता वरच्यांच्या खिडकीतून प्रयत्न करताहेत. काय हा आचरटपणा. एका कबुतरापाठी किती खटपट. आणि माणसं इथे कुजत बसली आहेत त्याचं कोणाला काही नाही. दरवाजा उघडला नाही म्हणून माझ्या नावानं शिमगा करतायत. ऐकू येतंय मला, रे हलकटांनो! काय माहिती आहे तुम्हाला माझ्याविषयी? कळतंय का तुम्हाला? पण.. पण मी काही बोलणार नाही. माझं हे असलं तोंड नाही दाखवायचं मला कोणाला. मन आक्रंदतंय. आ..आ...आई, आईऽ, नाहीऽ, नाही. गळा आवळून घेईन पण आवाज निघू देणार नाही.
नव्हते मी अशी. होतं माझंही आयुष्य बहरलेलं. पण आता काहीच उरलं नाहीये. काहीच नाही.
आलं खालती ते फडफड करत. सुटलं ना त्यांच्या तावडीतून! आणि तो वरचा म्हणतोय कसा, त्याला इजा तर करायची नाहीये. जीवच वाचवायचा आहे त्याचा. बडे आये है जान बचानेवाले. तो, तो वरचा तो बसलाय ना जगवायला, मारायला, सडवायला, कुजवायला...
आता मी नाही मारतेय कोणाला. जो तो आपल्या नशिबानं जगतो आणि मरतो. मी दरवाजा उघडणार नाही आणि ते कबुतर मरणं याचा काय लावायचा तो अर्थ लावा तुम्ही. पण माझ्या असण्याचा अर्थ काय लावायचा तो लावणारे तुम्ही कोण? मीच लावणार तो अर्थ. लोकांच्या नजरांनी सांगितलाय तो अर्थ मला, पुन्हा, पुन्हा, पुन्हा. तिरस्कार, अस्वीकार, तुच्छता, भयाण नकार!
मावळत्या सूर्याच्या उन्हाच्या तिरीपीत दिसतंय मला ते कबुतर गॅलरीतल्या शेल्फवर बसलेलं. थकलेलं, निस्तेज. त्याच्या डोळ्यांतच आता प्राण साठले आहेत. शरीराचा रंग उतरायला लागलाय. ते पंख विस्कटले आहेत. नेटवर धडका मारून, त्यात अडकून विसविशीत झाले आहेत. कष्टानं उडतंय. रंग गेलाय. हो, तोच पांढुरका रंग दिसू लागलाय. पांढरा. पंडू. रंगहीन त्वचा, चट्टे. डाग. डोळ्यांत प्राण पण तोंडावर डाग. आयुष्यावर डाग. डाग. काळ्यावर पांढरे. पांढुरके.
बघता बघता त्या तरण्याताठ्या कबुतराची ही अवस्था झाली आहे. हो, माझंही तारुण्य असंच झळाळतं होतं. माझीही स्वप्नं होती. माझ्याही उर्मी उसळत्या होत्या. पण एक डाग उठला. दुसरा आला, आणि बघताबघता माझ्या स्वत्वाला ग्रहण लागलं. एक पांढरी छाया माझ्या अस्तित्वाला घेरून बसली आहे. आणि त्या गर्तेत मी गोते खाते आहे. दिवाभितासारखी घरात दडून बसले आहे. भिती, जनलज्जेची भिती माझ्या मनाभोवती जाळं विणून बसली आहे. ह्या बर्डनेटसारखंच. मी अडकवून घेतलंय स्वतःला या जाळ्यात. जन्मठेप.
तुम्ही मला नका सांगू की मी घाबरट आहे. की मी उगाच भितेय. मी, मी, नाही देऊ शकत तोंड याला. मी गच्चीत येऊ शकत नाही, खिडकीत उभी राहू शकत नाही. नाही राहू शकत. आहे मी भित्री, कमकुवत, भ्याड आहे. आहे. आहे. आहेऽऽऽ
हे कबुतर सुखी आहे. त्याला उद्या सकाळपर्यंत येईल.... मृत्यू. पण मला ही जन्मठेप भोगायची आहे, आजन्मठेप. त्या मृत्यूची वाट पहात. उन्हापासून दडून, चेहेरा, अंग झाकून घेऊन, एका बंद दरवाज्याआड, लोकनिंदेचे चटके झेलत, आईवडिलांसाठी शापवत ठरत... का? का माझ्या माथी हे प्राक्तन आलंय?
त्याची फडफड शांत होतेय. माझी तडफड शांत? शांतऽ? शांतऽऽ?
छान आहे.
छान आहे.
अध्या एव्हढेच लिहितो की आवडली आहे.
थोडी कळाली थोडी नाही.
थोडी कळाली थोडी नाही.
निवेदिका जिवंत आहे का मृत?
निवेदिका जिवंत आहे का मृत? तिचा प्राणपखेरु उडून गेला आहे कि अजून जाळ्यात तडफडतो आहे?
बहुतेक कोड आलेली नायिका असावी
बहुतेक कोड आलेली नायिका असावी,पण शेवटी ती पण मरते का ते समजलं नाही.
बहुतेक कोड आलेली नायिका असावी
बहुतेक कोड आलेली नायिका असावी.>>>
हे नवीन. आधी लक्षात आले नव्हते.
थॅॅक्स आदू .
बापरे! भयंकर आहे.
बापरे! भयंकर आहे.
मलाही 'कोड' हीच शंका आली.
बाप रे!!! वेगळाच प्रश्न
बाप रे!!! वेगळाच प्रश्न साहित्यिक दृष्टीतून छान हाताळलात.