निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं.
निरंजन या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला.
माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.
आसपास छोटी मोठी मंदिर असणाऱ्या छोट्या गावाच्या जुन्या भागात सगळे बालपण गेले. त्यामुळे ती मंदिरे त्यातले अर्चा विग्रह हे माझ्या आयुष्याचा भाग होते. आपण जसे आपल्या आईवर आपली श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे याचा विचार करत नाही. सहवासाने परमेश्वरा बाबतीत तसेच झाले होते. आयुष्याचा भाग असल्याने आणि सतत द्रुष्टी समोर असल्याने त्याच्या बद्दल प्रेमच वाटायला लागले.
तो सहवास म्हणजे सहज उपलब्ध असलेल्या मोठ्या आनंदापैकी एक होता.
हक्काचे आनंदाचे एक ठिकाण म्हणजे कृष्ण मंदिर. माझी सखी तिथे रहात असे. तासनतास या कृष्ण मंदिरात खेळण्यात जायचे. तिच्या आजोबांनी आयुष्यभर निस्वार्थपणे त्या मंदिराच्या पूजा अर्चेचा भार सांभाळला.
हे एक दोन तीनशे वर्ष जुने मंदिर होते. आमच्या वाड्या जवळ असणारा हा एक वाडा होता. एक मोठा गेरू रंगाचा दिंडी दरवाजा असलेला . ह्यात एक पोटदरवाजाही होता. हा दरवाजा आणि त्याची आगळ दोन्ही अवजड होते. बंद करायला नक्की दोन माणसे लागत असणार म्हणून की काय हा कायम उघडाच असायचा. मी पंधरा वर्षांत हा फक्त दोनदाच बंद होता हे ऐकून होते. एकदा गोदावरीला आलेल्या पुरामुळे आणि दुसर्यांदा अयोध्या राम मंदिर प्रकरणात झालेल्या धर्मिय दंगलींमुळे. मला अर्थातच दोन्ही गोष्टींचे गांभीर्य नव्हते. शाळा नसूनही जाता आले नाही यानेच उदास वाटले.
आत गेल्यावर दगडी अंगण, उजव्या कोपर्यात न्हाणीघर, त्याच्या बाजूला बुजवून टाकलेली विहीर आणि त्याच्या वर असलेले प्राजक्ताचे नाजूक झाड. त्या विहिरीत तळ्यात मळ्यात करताना भारीच गंमत वाटायची. नेहमीच त्या केशरी दांड्यांच्या पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. दोन बोटांमध्ये हलकेच दाबले तर अष्टगंधा सारख्या रंगाची मेंदी उमटायची. आजही चित्रात ते फूल पाहिले तर मन काही क्षण त्या आठवणीतल्या सुगंधात रेंगाळते.
आणखी दोन पावले पुढे गेले की सखीच्या खोल्या. बाहेरच्या खोलीला दारही नव्हते. पण तिथे कुणी नाही असे देखील कधीच झाले नाही.
चार पाच कुटुंबे त्या वाड्यात समाधानाने रहायची. पुढे दोन तीन दगडी पसरट पायर्या.. आणि आत दोन ऊंच ओसर्या मधले अरुंद दगडी अंगण. त्या पैकी एका ओसरी वर भाजी वाले भाज्यांची टोपली ठेवायची.. प्रखर ऊन्हापासून वाचवायला. दुसर्या ओसरीवर आम्ही पत्ते कुटायचो.
अजून काही पावले चालत गेले की मुख्य अंगण.ओट्याच्या बाजूला वडाचे झाड आणि त्याचा ऊंच पार. आणि समोर ओटा मागे गाभारा.
अपूर्व शांती असलेला सुंदर गाभारा. तिथे जाताच मन निरंजन व्हायचे. राधाकृष्णाचे साधारण दोन तीन फुटाचे काळ्या पाषाणात बनवलेले रेखीव अर्चा विग्रह आणि समोर नित्य तेवत असणाऱ्या प्रसन्न समया. अजून काय लागते मन नमन व्हायला.
. .तो कृष्ण मला आमच्यापैकीच एक वाटायला लागला. एकही खेळ नसेल जो तिथे खेळला नाही. कधीही हाकलून दिल्या शिवाय किंवा बोलावणे आल्याशिवाय घरी आलेले आठवत नाही. प्रदक्षिणेसाठी मोकळ्या सोडलेल्या अंधार्या बोळात डोकेही फोडून घेतले होते आम्ही दोघींनी .दुसर्या दिवशी टेंगळासहीत पुन्हा तिथेच खेळत होतो. तो गारवा, एकांत आणि मुग्ध शैशव. कृष्णा समोर आजोबा चंदन उगाळायचे तरी मी एकटक बघत बसायचे. त्यांनी साधेपणाने केलेली या अप्रसिद्ध अशा जुन्या मंदिरातली पूजा माझ्यासाठी रोजचा सोहळा होती. ते दिवस निरंजन झाले.
समोरच्या झाडावर एक मुंजा रहातो. तो कुणाला तरी रात्री शुक् शुक् करुन सरसर झाडावर चढत गेला अशी वदंता होती. ते ऐकल्यापासून आमच्या तिथल्या गप्पांमध्ये भूतांच्या गोष्टींची पण भर पडली. कृष्णाच्या समोर बसून आम्ही भूतांवर गप्पा मारल्या. किती हसला असेल तो.
रोज संध्याकाळी घरी आल्यावर आई विचारायची आज तरी पाया पडलीस का..मी शांतपणे हौदातले पाणी पायावर घेत नाही म्हणायचे. मग तिचे सुरु व्हायचे अग शेकडो वर्षापासूचे जागृत मंदिर आहे ते रोज कस विसरू शकतेस तू. मी काय सांगणार आणि कसे. कधीच आठवायचे नाही. समोरच्या नळावर उगाच पाय धूताना, ओट्यावर बसून पत्ते खेळताना. फूले वेचताना. गप्पा मारताना .तिथे तासनतास असून कधीच लक्षातच यायचे नाही की कृष्णाला नमस्कारही करायला हवा. काही तरी मोहिनीच जणू. आम्हीच कृष्ण व्हायचो कदाचित मग कोण कुणाला नमस्कार करणार.
सगळ्या गप्पांचा, खेळांचा, छोट्या छोट्या भांडणांचा अगदी सगळ्याचा तो सगुण साकार रुपाने साक्षी होता.कृष्णा सोबत त्याची सखी माझ्यासोबत माझी. आमच्या चौघांची ताटातूट होईल कधीच वाटले नव्हते बालमनाला . आज वीस वर्षे झाली त्या मंदिरात जाऊन. पुन्हा जावे तर भीती वाटते तिथली पडझड बघून मनातील हळवी आठवण दुखावेल.
सगुण साकार रुपात त्याचे नेहमीच समोर असणे मी फार ग्रुहीत धरले होते. कारण तो बालपणाच्या अस्तित्वाचा भाग होता. नंतर भौतिक अंतर वाढल्यावर लक्षात आले की तो सर्वव्यापी आहे असे नुसते माहिती असून उपयोग नाही. त्याचे तसे असणे हे जाणीवेचा भाग झाले पाहिजे. बाहेरच्या मंदिरात तो फक्त दिसतो अंतरात तो जाणवतो. त्या जाणीवेला शब्दबद्ध करणारी अवस्था हीच निरंजन. परमानंदा शिवाय काहीच न उरणे हेच निरंजन.
हीच चिरंतन निरंजन अवस्था सर्वांना मिळावी अशी त्या कृष्णाकडे प्रार्थना.
निरंजन
Submitted by अस्मिता. on 27 March, 2020 - 18:39
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धन्यवाद बिपीनसांगळे, kashi
धन्यवाद बिपीनसांगळे, kashvi आणि अज्ञातवासी .
अप्रतिम लिहिलंय.. आवडलं!
अप्रतिम लिहिलंय.. आवडलं!
धन्यवाद मन्या S .
धन्यवाद मन्या S .
वाचताना समाधी लागली! एकदम
वाचताना समाधी लागली! एकदम प्रसन्न वाटतंय. अवर्णनीय लिहीलंय. शब्दच नाहीयेत माझ्याकडे . अजून वाचायला आवडेल.
हे कसं काय सुटलं होतं कोण
हे कसं काय सुटलं होतं कोण जाणे ?
पण अप्रतिम लिहीलय . कुठलाही अभिनिवेश नसणार, मनाला भिडणार, शांत प्रसन्न लेखन !
प्रतिसाद ही सगळेच लेखाला चार चांद लावणारे.
धन्यवाद द्वादशांगुला आणि
धन्यवाद द्वादशांगुला आणि मनिमोहोर !
मायबोलीवरच्या भारंभार
मायबोलीवरच्या भारंभार धाग्यामुळे हा धागा खाली गेला आणि आज दिसला . किती सुंदर लिहिले आहे .
प्रतिसाद पण किती छान आहेत .
धन्यवाद कटप्पा
धन्यवाद कटप्पा
सुंदर लेख अस्मिता.. तुझं
सुंदर लेख अस्मिता.. तुझं बालपण अगदी डोळ्यांसमोर उभं केलसं. सर्वांचे प्रतिसाद पण सुंदर..
अस्मिता तुम्ही खूप छान लिहिता
अस्मिता तुम्ही खूप छान लिहिता..
धन्यवाद रूपाली आणि श्रवु .
धन्यवाद रूपाली आणि श्रवु .
खूप सुन्दर !"आम्हीच कृष्ण
खूप सुन्दर !"आम्हीच कृष्ण होऊन जायचो कदाचित मग कोण कोणाला नमस्कार करणार ".. वा.. वा.. खूप सुंदर.. सर्वांच्या प्रतिक्रियाही खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासू आहेत, धन्यवाद !
सुरेख लेख. प्रतिसादामुळे
सुरेख लेख. प्रतिसादामुळे आणखीनच सुंदर.
अप्रतिम लेखन अपरिचित असुन ही
अप्रतिम लेखन अपरिचित असुन ही वाचन केल्यानंतर असं जाणवत की मनातील भावना व्यक्त कराव्या का कुणास ठाऊक परिचय नसतांना देखील एकमेकांना दिलेल्या सदिच्छा कामी आल्या.
अनेक संकटांचा सामना संघर्ष करत आज जिवनात आनंद आहे कदाचित अबोल मैत्री आणि त्यांच्या सदिच्छा तसेच कुलदैवत चा आशीर्वाद जणू पाठीशी आहेत असाच भास होत आहे .
हां हा लेख प्रचंड सुंदर आहे.
हां हा लेख प्रचंड सुंदर आहे. मी माझ्या प्रायव्हेट कले क्शनमध्ये सेव्ह केलेला आहे. आणि कृष्णडोह पूर्ण मालाच सुंदर आहे.
आज अचानक समोर आला हा लेख.
आज अचानक समोर आला हा लेख..अगदी छान लिहीला आहेस..ह्या निरंजन शब्दात काही जादू आहे खास! कमालीचा आश्वासक्,आणि प्रेमळ ह्याच भावना दाटून येतात तो शब्द उच्चारला की..
हो. लेख वर आला म्हणून मी
हो. लेख वर आला म्हणून मी पुन्हा वाचला. अर्चा विग्रह शब्द मनात ठसला. मूर्तीसाठी विग्रह हा शब्द सध्या मराठीत फारसा वापरला जात नाही. पण जुन्या साहित्यात दिसतो आणि दक्षिण भारतात तो बऱ्यापैकी प्रचारात आहे. पूजाअर्चेसाठी केलेली मूर्ती. छानच.
मन न - मन झाले हे आणखी एक माणिक रत्न. इतकी शांतता मिळाली, मन आतून इतके शांत झाले की कुठलेही विकार विचार उरलेच नाहीत. मनच मुळी उरले नाही. पुरता मनोलय झाला. एका शब्दात खूप मोठी भावावस्था वर्णन केली आहे तुम्ही.
आता प्रत्येक वेळी लेख वर आला की नवीन काही सापडेलच.
मीही आज देवळात जाताना,
मीही आज देवळात जाताना, कारमध्ये, शांतपणे हा लेख वाचला. प्रतिसादांसकट. प्रचंड सुंदर भावावस्था अनुभवली. अगदी शांत. अजुन एक म्हणजे मला ज्या दिवशी देवळात जाते त्या दिवशी सुंदर स्वप्न पडतेच हा अनुभव आजही आला. म्हणजे मला वाटतं १०-११ वेळा हे अनुभवलेले आहे. 'गुरुद्वारा' च्या माझ्या लेखात हे नमूद केलेले आहे. नेपच्यून हा स्वप्नांचा कारक आहे.
अवांतराबद्दल क्षमस्व.
आज स्तोत्रे वाचताना, या
आज स्तोत्रे वाचताना, या लेखाची आठवण झाली. रामस्तवराज मध्ये 'अकल्मषम' या शब्दामुळे निरंजन शब्द आठवला आणि तो शब्द आठवला की हा आणि हाच आरस्पानी लेख आठवतो. _/\_
किती छान लेख आणि प्रतिक्रिया!
किती छान लेख आणि प्रतिक्रिया!
कसा काय राहिला होता वाचायचा कोण जाणे!
अप्रतिम
होळी आहे का गं तो भाग? तुझ्या लहानपणीचा अस्मिता?
हीरा, सामो आणि किल्ली,
देवकी तै, नादिशा, वृषाली, हीरा, सामो आणि किल्ली धन्यवाद.
रामस्तवराज मध्ये 'अकल्मषम' >>> आवडलं.
मूर्तीसाठी विग्रह हा शब्द सध्या मराठीत फारसा वापरला जात नाही>>>
हा शब्द मी राधानाथ स्वामी यांच्या आत्मचरित्रात (The journey home) वृंदावनातील गोपीजनवल्लभ आणि त्यांचे विग्रह यावरील प्रकरणात वाचला होता. तिथे विग्रहांना सजीव-सचेतन मानतात. प्रत्येक मूर्ती ही 'विग्रह' नसते, फक्त पूजेची मूर्ती 'विग्रह' असते. इंग्रजी Idol शब्दाला हाच शब्द समर्पक वाटतो. Statue आणि Idol साठी वेगवेगळे मराठी शब्द आहेत, आपण त्यातला एक हरवायला नको. मी माझ्या पुरतं तरी हा शब्द वापरत रहाणार आहे.
लेख बुकमार्क करून ठेवला आहे.
लेख बुकमार्क करून ठेवला आहे.
'अकल्मषम' >>> याचा अर्थ सांगा
'अकल्मषम' >>> याचा अर्थ सांगा अस्मिता किंवा सामो.
अकल्मष/अकिल्मिष - कुठलंही
अकल्मष/अकिल्मिष - कुठलंही किल्मिष नसलेलं - शुद्ध.
किल्मिष म्हणजे अशुद्धी, जाळं- जळमट, काजळी.
निरंजन=निर् +अंजन म्हणजे निर्गतः अंजनः यस्यः सः .
ज्याचे किल्मिष किंवा काजळी निघून गेली आहे असे सर्वात शुद्ध रूप.
https://stotrasamhita.net
https://stotrasamhita.net/wiki/Rama_Stavaraja_Stotram
कौसल्येयं कलामूर्तिं काकुत्स्थं कमलाप्रियम्।
सिंहासने समासीनं नित्यव्रतमकल्मषम्॥४१॥
होय देवकी कल्मष म्हणजे मळ/मलीनता मला वाटतं. मायेमुळे आलेली मलीनता, जी की षडविकारांमुळे आपल्या मनावर पुटन पुटं चढत असतात जी की नामस्मरणाने निघून जाते.
भरीऐ हथु पैरु तनु देह ॥
When the hands and the feet and the body are dirty,
पाणी धोतै उतरसु खेह ॥
water can wash away the dirt.
मूत पलीती कपड़ु होइ ॥
When the clothes are soiled and stained by urine,
दे साबूणु लईऐ ओहु धोइ ॥
soap can wash them clean.
भरीऐ मति पापा कै संगि ॥
But when the intellect is stained and polluted by sin,
ओहु धोपै नावै कै रंगि ॥
it can only be cleansed by the Love of the Name.
सुंदर विवेचन सामो _/\_
सुंदर विवेचन सामो _/\_
मूत पलीती कपड़ु होइ ॥
दे साबूणु लईऐ ओहु धोइ ॥
भरीऐ मति पापा कै संगि ॥
ओहु धोपै नावै कै रंगि ॥ >> तुकोबा पण साबणाचा उल्लेख करतात.
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण
तैसे चित्तशुद्धी नाहीं । तेथें बोध करील काई ॥
त्या काळात साबण म्हणजे काय असेल बरं? मला तुकोबा साबणाची वडी फासून अंघोळ करत आहेत हे इमॅजिन होत नाही. साबणाचे गुणधर्म असलेला चुरा वगैरे काही वापरत असतील का ते?
सर्व प्रतिक्रिया उत्तम आहेत,
सर्व प्रतिक्रिया उत्तम आहेत, संग्राह्य धागा.
माझ्या निवडक १० मध्ये
हळवं करणारं काही असेल या
हळवं करणारं काही असेल या भीतीने वाचायचे तीन चारदा राहून गेले.
नितांतसुंदर असे पण म्हणवत नाही कारण शेवटचा पॅरा हळवं करून गेला. आपल्या आयुष्यातल्या त्या कालखंडातल्या प्रतिमा, त्यांच्याशी निगडीत स्मृती आणि त्यात बांधलेली प्रियजनांची आठवण ! प्रतिमा प्रत्येकाच्या बदलतील. त्यांच्याशी असले ऋणानुबंध हे खास असतात. ते इतक्या सुंदर शब्दबद्ध करण्याचे सामर्थ्य प्रत्येकाकडे नसेल. पण भावना याच ! त्यामुळे जवळजवळ प्रत्येकाला आपले वाटेल असे काही सापडले.
दक्षिणेपासून ते हिमालयापर्यंत सर्वत्र मंदिरं पाहिली. जिथे बजबज आहे, अस्वच्छता, गलका आहे ती कधीच आवडली नाहीत. दक्षिणेच्या मंदीरातली कमालीची शिस्त,गदीचे व्यवस्थापन आणि मंदीरांची स्वच्छता हे पाहिल्याक्षणीच भावले. नास्तिक असूनही मंदीरं आवडली. बद्रीनाथाच्या पुढे असलेली बजबज, अलकनंदेत टाकलेले निर्माल्य आणि आजूबाजूच्या हॉस्टेल्समधून सोडलेली घाण हे काहीच आवडले नाही. त्या ऐवजी पुढे चीन सीमेवरचे एक निवांत मंदीर आवडले. सोबतचा एक जण पहाटे पाच वाजता अलकनंदेत स्नानासाठी उतरला. थंडी उणे सेल्सिअसम्मधे मी म्हणत असताना. त्या वेळी त्याला थांबवावेसे वाटले नाही. त्याला बरं वाटतंय तर करू देत असे वाटले.
अगदी एखाद्या नास्तिकाने नाजूक क्षणात देवाला नमस्कार केला म्हणून त्याने बुद्धी गहाण टाकली असे कधीच वाटले नाही. कदाचित ही कृती त्याला मानसिक बळ देईल जे एखादा मानसोपचार तज्ञ सुद्धा देऊ शकला नसता असे वाटते...
परिस्थिती माणसाला खूप शिकवते.
जुन्या आठवणीही शिकवतात. परीक्षा घेतात....
आपण घडत जातो. घट्ट होत जातो. तटस्थपणे पहायला शिकतो.
आवडला लेख.
खूपच सुंदर लिखाण. अगदी मनाला
खूपच सुंदर लिखाण. अगदी मनाला स्पर्षून जाणारे.
आणि वर म्हटलंय तसं.. जवळजवळ प्रत्येकाला आपले वाटेल असे काही सापडले.
अस्मिता.... फार सुंदर आहेस तू!
रघू आचार्य खूप फिरलायत की
रघू आचार्य खूप फिरलायत की तुम्ही. छान लिहीले आहे.
हपा धन्यवाद.
Pages