प्रिय, आदरणीय स्मिता तळवलकर,
स. न. वि. वि.
पत्रास कारण की, लहानपणापासून तुमचे चित्रपट, मालिका बघत आले. पण ते किती आवडले, त्यामुळे आम्हा प्रेक्षकांना काय मिळालं असा अभिप्राय कधी तुमच्यापर्यंत पोहोचवता आला नाही. आज मराठी भाषा दिना निमित्त कुणालाही पत्र पाठवण्याची संधी आमच्या मायबोलीने दिल्यावर एकदम मनात तुमचंच नाव आलं. तुमच्या एखाद्या चित्रपटाबद्दल पण लिहिता आले असते, पण त्यातही निवड करणं कठीण होतं. म्हणून म्हटलं तुम्हालाच केंद्रस्थानी ठेवून लिहूया म्हणजे तुमच्या अनेक कलाकृतींचा धांडोळा घेता येईल.
स्मिता तळवलकर हे नाव मराठी सिने जगतात अतिशय नावाजलेले आणि आदरणीय. तुम्हाला कल्पना असेलच कदाचित, किती तरी स्त्रिया तुमच्यामुळे या चंदेरी दुनियेत यायला सरावल्या. कारण तुमच्यासारखी ' चांगली ' माणसं पण इथे आहेत हा विश्वास तुम्ही निर्माण केलात. तुमच्या मुलाखतीतून ऐकल्याचे आठवते की तुम्ही करिअर ची सुरुवात आकाशवाणी , मग दूरदर्शन वर साप्ताहिकी संगण्यापासून केलीत. पण मला झालेली तुमची ओळख आठवते ते अंधार झालेल्या प्रेक्षागृहात समोरच्या पडद्यावर अर्धा गर्द केशरी सूर्य दिसतो आणि बरोबर त्याच्या मध्यातून एक पांढरा पक्षी झेप घेऊन उडत जातो आणि त्याखाली पांढरी अक्षरे "अस्मिता चित्र". आता यानंतर पडद्यावर जे जे दिसणार आहे ते असंच साधं, नित्याचं तरीही लक्षवेधी, एक नवा अनुभव आपल्या पदरात टाकणारं असेल असं वाटत राहायचं आणि तसं घडायचं देखील. हा दर्जा तुम्ही कायम राखलात यासाठी तुमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे.
आधी नटी म्हणून, मग दिग्दर्शिका म्हणून आणि निर्माती म्हणून तुम्ही मराठी विश्वात प्रचंड काम केलं. मालिका आणि सिनेमा दोन्ही माध्यमे अगदी समर्थपणे हाताळली. पण प्रत्येक वेळी एक नवा विषय घेऊन! सशक्त कथाबीज हे तुमच्या प्रत्येक कलाकृतीचे मर्म होते. पण त्याहीपेक्षा जास्त श्रेय जाते ते तुमच्या कलाकार निवडीला. प्रत्येक भूमिका कुणाला द्यायची हे तुम्हाला शंभर टक्के अचूक माहिती असायचं आणि खुद्द त्या कलाकाराला स्वतःवर विश्वास नसेल इतकी खात्री तुम्हाला असायची! कमाल आहे. आज तुमच्या पश्चात इतर कलाकार जेव्हा त्या काळातल्या गोष्टी सांगतात, तुमच्या आठवणी सांगतात तेव्हा तुमचं हे मोठेपण , जाणतेपण अधिकच ठळक होत जातं. चौकट राजा मधे दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, अशोक सराफ किंवा सवत माझी लाडकी मधल्या मोहन जोशी, नीना कुळकर्णी, वर्षा उसगावकर यांच्या भूमिका पाहिल्या की तुमच्या पात्रनिवडीचे कौतुक रास्तच वाटते. तुम्ही प्रामुख्याने निर्मितीची धुरा सांभाळत होतात आणि संजय सूरकर दिग्दर्शक. पण तुमच्या सर्वच कलाकृतींमध्ये तुमची स्वत:ची अशी एक छाप दिसते त्यामुळे मी एकंदरीत "तुमचा सिनेमा" असंच म्हणते.
खरंच, किती विविध विषय हाताळले तुम्ही! आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने. मराठी सिनेमा म्हणजे फक्त गावकडल्या गोष्टी, लावण्या, शेती आणि विनोद असं समीकरण बनत असताना, तुम्ही शहरी मराठी मध्यमवर्ग सिनेमात दाखवायला सुरुवात केली. त्यांचे प्रश्न आणि ते गुंते बघताना प्रेक्षकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. मराठी सिनेमा म्हणजे नुसती करमणूक नव्हे तर सामाजिक भान देणारे एक प्रभावी माध्यम आहे याची जाणीव करून दिलीत. मग ती चौकट राजा मधली एका मतिमंद मुलाची मन विदीर्ण करून टाकणारी शोकांतिका असो की सातच्या आत घरात सारखा अतिशय संवेदनशील विषय असो. हे दोन्ही सिनेमे अंगावर येणारे, दु:ख गोल गोल गिरवत राहणारे आणि आपल्या हातात काही नसतं अशा गर्तेत पडता पडता जगायची उर्मी देणारे. याउलट सवत माझी लाडकी चा विषय त्या काळी अशा हलक्या फुलक्या मांडणीने सादर करणे हेच एक धाडस होते. पण किती conviction ने उभी केलीत तुम्ही त्यातली सीमा ! प्रत्यक्ष आयुष्यात कुणी असे करेल असे आज २०२३ मध्येही वाटत नाही पण सीमा मात्र आजही आवडते! हाच विषय पूर्ण १८० अंशात वेगळ्या प्रकारे सादर केला होतात त्यापूर्वी काही वर्षे, कळत नकळत मधे. एका मधे नायिका स्वतः च सवत घरात आणते तर एकात नवऱ्याला घराबाहेर काढते. दोन्ही सिनेमात कसलेले कलाकार. दोन्ही सिनेमे जबरदस्त गाजले. आजही मराठी सिनेमात माईलस्टोन म्हणून पाहिले जातात. हे असं एकाच व्यक्ती बाबत फार क्वचित घडलं असेल. यातूनच तुमची कोणताही विषय कशाही प्रकारे सादर करण्याची ताकद लक्षात येते.
तसं लिहिण्यासारखं खूप आहे, पण तू तिथं मी चा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. प्रेमाचं इतकं गोड रूप मी आजवर सिनेमात पाहिलं नाही. रिटायर झालेले आई वडील आणि मुलांच्या गरजा यातली रस्सीखेच हा आणखी एक शहरी प्रश्न . रिटायर झाल्यावर आता निवांत आयुष्य काढायला मी मोकळा म्हणत असतानाच मुलांच्या, त्यांच्या मुलांच्या एकेक जबाबदाऱ्या गळ्यात येऊन पडायला लागतात. त्या झटकताही येत नाहीत पण त्या पार पाडताना आजवर करायच्या राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी खुणावत रहातात. ही मानसिक कुतरओढ किती संयतपणे तुम्ही यात मांडलीत मुरलेल्या समंजस प्रेमाची सोनेरी किनार देऊन. काय सुरेख रंगवला होतात तो सिनेमा. सुहास जोशी आणि मोहन जोशींचा सहज नैसर्गिक अभिनय केवळ अविस्मरणीय. हा सिनेमा झाला नसता तर शप्पत सांगते ते दोघं आज माझे इतके आवडते कलाकार नसतेच! ते काय, दिलीप प्रभावळकर, नीना कुळकर्णी, प्रशांत दामले आवडायची सुरुवात तुमच्या सिनेमांपासून झाली असं प्रामाणिकपणे कबूल करते. म्हणजे ते थोर कलाकार होतेच आहेतच, पण त्यांची थोरवी कळली ती तुमच्यामुळे. तू तिथं मी मधे भुतकरांचा रोल करणारे सुधीर जोशी पण असेच कायम लक्षात राहिले. रिटायर झाल्यावरही कंपनीच्या गेटवर जाऊन बसणारे, मुलाने मला सोडलं तरी मला आईला सोडता येत नाही ओ म्हणत काळजाला घरं पाडणारे. तुमच्या प्रत्येक सिनेमात असं एक छोटंसं पण महत्वाचं काम करणारं पात्र असायचंच, नाही?! खूप बारकावे आहेत लिहायला, पण किती लिहिणार? सिने इंडस्ट्री मधे स्त्री निर्माती म्हणून तुम्ही कशा उभ्या राहिल्यात, किती अडचणींना घरी दारी तोंड दिलं असेल हा सगळा वेगळाच सिनेमा असेल. ते नंतर कधीतरी. पण मालिका अजून राहिल्याच लिहायच्या. राऊ, अवंतिका या दोन तुफान गाजलेल्या. राऊ मधली मस्तानी म्हणून अश्विनी भावे तुम्ही जी काय उभी केलीत ती लोकांच्या इतकी लक्षात आहे की आत्ता बाजीराव मस्तानी आला तेव्हा दीपिका सोबत तिची तुलना केली लोकांनी! काम करावं तर असं. वर्षानुवर्ष लोकांनी नाव घेत राहावं. हीच प्रेरणा आहात तुम्ही माझ्यासाठी. यश अपयश न बघता झोकून देऊन जीव ओतून काम करावं, प्रामाणिक प्रयत्न करत राहावेत हे तुमच्याकडून शिकावं.. मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही उक्ती तुम्ही सार्थ केलीत. सिनेमा, मालिकांच्या माध्यमातून सामान्य शहरी माणसांचे प्रश्न मांडून लोकांना आजूबाजूला डोळसपणे पाहायला शिकवलं.काय चूक काय बरोबर पेक्षा त्या जागी मी असतो तर काय केलं असतं हा विचार मनात रुजवलात. भावना आणि कर्तव्याच्या तराजूमधे समतोल साधता येतो हे अगदी सहज कुठलाही उपदेश न करता अनेक कलाकृतीतून दाखवून दिलंत. मराठी कलाविश्व तुमच्या कलाकृतींनी समृध्द, प्रगल्भ केलेत त्याबद्दल आम्ही प्रेक्षक कायमच तुमचे ऋणी राहू. तुमच्या कर्तृत्वाला एक अभिमानाचा सलाम आणि तुमच्या कार्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
तुमची प्रिय प्रेक्षक.
छान झालेय पत्र.
छान झालेय पत्र.
कै. स्मिता तळवलकरांना पत्र लिहायची कल्पना आवडली.
छान पत्र.
छान पत्र.
खूप छान पत्र.
खूप छान पत्र.
सवत माझी लाडकी मला प्रचंड आवडतो. एकेक प्रसंग आणि संवाद लक्षात राहण्यासारखे आहेत!
स्मिता तळवलकर कॅन्सरमधून पहिल्यांदा बाहेर आल्या होत्या तेव्हा त्यांची एक मुलाखत पाहिली होती. बहुतेक सह्याद्री वाहिनीवर. काय खंबीरपणे बोलल्या होत्या त्या.
वा, अख्ख्या पत्राला मम.
वा, अख्ख्या पत्राला मम.
अख्ख्या पत्राला मम.>>>अनुमोदन
अख्ख्या पत्राला मम.>>>अनुमोदन ☺️☺️