(मी मार्गींचा ‘आत्या नावाची जिव्हाळ्याची स्पेस’ हा धागा अगदीच correlate करू शकतो. खर तर त्यावर प्रतिसाद लिहायला गेलो पण तो जरा लांबला. त्यामुळे स्वतंत्र लेखच झाला).
परवा (१४ फेब्रुवारी) संध्याकाळी मी योगा क्लासहून आल्यानंतर जरावेळ शांतपणे बसलो आणि हातपाय धुवायला गेलो. दरम्यान चार-पाच कॉल आलेले दिसले म्हणून मी कॉलबॅक केला आणि मामेभावाने अगदी अनपेक्षित व अविश्वसनीय बातमी दिली. कुणालाही काहीही संधी न देता माझी मोठीआई (आईच्या थोरल्या बहिणीला मोठीआई म्हणण्याची नागपूरकडे पद्धत आहे) हार्टअटॅकने गेली होती. आदल्या दिवशी (१३ फेब्रुवारी) छातीत हलकेसे दुखते म्हणून दुसऱ्या दिवशी (१४ फेब्रुवारी) डॉक्टर असलेल्या मुलाकडे गेली होती पण त्याने तपासणी केली असतांना सर्व नॉर्मल आढळले. डॉक्टरच असलेल्या सुनबाईंनी (माझी वहीनी) आज घरी जाऊ नका, इकडेच रहा म्हणून आग्रह केल्यावर तिकडेच थांबली. संध्याकाळी वहीनीने बरे वाटत असल्यास टीव्ही बघता बघता मटार सोलून देण्याची विनंती केली आणि ती काहीतरी करायला दुसऱ्या खोलीत गेली. तेवढ्यात हॉलमधून भांडी पडल्याचा जोरदार आवाज आला म्हणून लगेच बाहेर येऊन बघते तर मोठीआईने कोचावरच प्राण सोडला होता.
मी कार्यालयीन अपरिहार्य जबाबदारींमुळे मुंबईहून जाऊ शकलो नाही आणि आज तिचे रक्षाविसर्जन सुरू असेल. पिंडाला कावळाही शिवला असेल. तेराव्यालाही तेच होतंय. एका यूनिवर्सिटीकडून एक्सटर्नल एक्सामिनर म्हणून बोलावले आहे; आधी माझ्या यूनिवर्सिटीने नाकारलेली परवानगी खूप खटाटोप करून मिळवली. त्यांना होकार कळवला आणि आता त्याच दिवशी तेराव/चौदाव येतंय. आईबाबा, बहीण व मावसभावांनी काम जास्त महत्वाचे आहे; जाणारा जीव तर गेलाय त्यामुळे सवडीने ये असे समजावले. तरी बहीण तेराव्याला जाणार आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा माझी आई २० दिवस व्हेंटिलेटरवर होती आणि आश्चर्यरित्या वाचली (दिवंगत विक्रम गोखलेंच्या मृत्यूच्या खोट्या/खोडसाळ बातम्या जेव्हा पसरल्या होत्या तेव्हा मायबोलीवरील एका धाग्यावर ह्याबद्दल लिहिलंय) तेव्हा माझी मोठीआईच आमच्या सोबत होती. जेव्हा जेव्हा आमच्या वर संकट आली (आईचे परत दुसरे आजारपण, व बाबांचे दोन अपघात तेव्हा हिम्मत द्यायला ती निश्चितपणे सोबत असायची). खूप मोठ्या आजारपणांतून वाचलेले माझे आईबाबा दोघेही आहेत पण अनपेक्षितपणे मोठीआई सोडून गेली. मला केवळ एका गोष्टीचेच समाधान आहे की ख्रिसमसच्या सुट्टीत नागपूरजवळच्या आमच्या मूळ गावी कुलदेवतेच्या पूजेचा घाट घातला असतांना तिच्या सोबत मनमोकळ्या व सविस्तर गप्पा झाल्या होत्या. तत्पूर्वी नोव्हेंबर मध्ये काही तातडीच्या कामानिमित्त नागपूरला जाणे झाले असतांना मी, आईबाबा, व आमचे एक स्नेही तिच्याकडे गेलो होतो, तेव्हा मी नाही म्हणत असतांना देखील मला आवडतात म्हणून तिच्या सुनबाईंना (वहिनीला) कांदेपोहे करायला सांगितले.
खरं तर माझे आई बाबा देवांचे फारसं करत नाहीत, आम्ही कधी कुलदैवतेलाही जात नसू. पण माझी आई आजारी असतांना मोठीआई आम्ही कुलदेवतेला अगदीच वाऱ्यावर सोडले आहे म्हणून सारखा त्रागा करायची. दरम्यान डॉक्टरांनी आई वाचण्याची काहीही शाश्वती नाही, केवळ एखादा चमत्कारच तिला वाचवू शकेल असे विधान केले होते (मी सविस्तरपणे ह्याआधीही लिहिलंय). तेव्हा मोठीआईने माझ्या आईसाठी कुलदेवतेच्या पूजेचा घाट घालायला सांगितले. पुढे आई बरी झाली पण प्रत्येक वेळी सर्वांच्या तारखा जुळून न आल्याने पूजेचा मुहूर्त लांबत गेला. त्यातच कोविड-१९ महामारीची दोन-अडीच वर्ष गेली. दरम्यान जेव्हाही मोठीआई भेटली की पूजेची आठवण करून द्यायची. शेवटी डिसेंबर २०२२ मध्ये सर्व काही जुळून आल्याने कुलदेवतेची पूजा निर्विघ्नपणे पार पडली. अगदी लांबून लांबून नातेवाईक व स्नेही येऊन गेले. मोठीआई सर्वांना ओळखत असल्याने प्रत्येकाला आवर्जून भेटली, त्यांची चौकशी केली आणि परवा इहलोकाच्या यात्रेला गेली (मोठीआई, माझी आई व इतर २ मावश्या ह्या माझ्या बाबांच्या सख्ख्या मामेबहिणी आहेत (किंवा बाबा त्यांचे आतेभाऊ). त्यामुळे आईबाबांचे वेगळे असे नातेवाईक नाहीतच; जे आईचे तेच बाबांचे आहेत. त्यातच मोठीआई व माझ्या बाबांमध्ये एक वेगळाच बॉन्ड होता. त्यामुळे कधीही अडचण आली की बाबा तिला कळवायला सांगतात(चे)).
मोठीआई (७० वर्षे) वा माझी आई (६७ वर्षे) निरपेक्ष भावनेने जीवन जगल्या. ह्या दोघीनंतर दुसऱ्या दोन मावश्यांमध्ये दहा वर्षांचा फरक आहे. त्यामुळे मोठीआई व आईचा एक गट, तर धाकट्या दोघींचा दुसरा गट पडत असे, आणि मधल्या मामाची गोची होत असे. माझे आप्पा(जी) अत्यंत कडक व मोजके बोलणारे होते. त्यांचा खूप धाक होता, परिणामी त्यांच्यापुढे कुणीही ब्र ही काढू शकत नसे. त्यामुळे मोठीआई बालपणापासून अत्यंत सोशिक व समंजस होती, समोरच्या परिस्थितीशी जुळवून घेणारी, किंबहुना शरण जाणारी होती. माझी आईही काहीशी तशीच असली तरी ती शिक्षणामुळे आणि सासरच्या (माझ्या बाबांकडे) मोकळ्या वातावरणामुळे जरा अन्याय झाला तर कसलाही मुलाहिजा न बाळगता किंचित तरी आवाज उठवते. पुढे मुलीच्या प्रतीक्षेत ४ मूलेच झालेली व ८ नातवंडे असलेल्या मोठीआईचा अगदी आतापर्यंत सासुरवास झाला. वयाच्या ९५ वर्षांपर्यंत टुणटुणीत असलेल्या तिच्या सासूबाई अगदी क्षुल्लक निमित्त होऊन २०२१ च्या शेवटी गेल्या. अत्यंत जहाल व खाष्ट असलेल्या सासुबाईंनी एकमेव सून असलेल्या मोठीआईचा शेवटपर्यंत छळ व तिच्याकडून सेवा करून घेतली (मात्र एकाही नातसुनेला छळले नाही कारण नव्या पिढीतल्या अरेला कारे करणाऱ्या आहेत). कदाचित इहलोकांत तिला कुणी भेटले नसावे म्हणून आपल्या सुनबाईंना (मोठीआईला) बोलावून घेतले असावे. सुदैवाने मोठीआईच्या चारही सुना (माझ्या वहिन्या) उत्तम आहेत (होत्या). त्यांनी तिला कधीही काडीचाही त्रास दिल्याचे पाहीले वा तिच्याकडून ऐकले नाही.
मोठीआईला, मोठेबाबांनीही फार त्रास दिला. अतोनात संपत्ती व मालमत्ता असली तरी त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होते, साऱ्या पंचक्रोशीत व नातेवाईकांत कुप्रसिद्ध होते. कुणीही (अगदी आम्हीही) त्यांच्याकडे जायला धजावत नसत. दारूच्या नशेत अनेकदा मोठीआईवर हात उचलत आणि ती निमूटपणे सहन करत असे. सुदैवाने मोठीआईच्या सासरेबुवांनी सर्व संपत्ती व मालमत्ता शेवटपर्यंत सांभाळली, वाढवली. किंबहुना नुकसान होऊ दिले नाही. ते स्वत: खाष्ट बायकोमुळे (मोठीआईची सासू), जहाबाज मुलगी व जावयामुळे (मोठीआईची नणंद व नणंदेचे यजमान) आणि मोठेबाबांच्या दारूच्या व्यसनाने प्रचंड त्रस्त होते, शेवटी त्या धक्क्यानेच गेले. एव्हाना माझ्या थोरल्या मावसभावाचे वैद्यकीय शिक्षण आटोपून तो मार्गी लागला होता, पाठोपाठची इतर ३ भावंडही जम बसवण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे मोठीआई आपल्या सासरेबुवांचे सदैव आभार मानत असे, त्यांच्या दूरदृष्टीनेच थोरला डॉक्टर झाला असे तिचे मत होते (मोठ्या बाबांनी मुलांकडे फारसे लक्ष दिलेच नाही. मात्र जेव्हा मूल यशस्वीरीत्या आपापल्या आयुष्याला लागली, तेव्हा मिशीला पीळ देऊन कौतुक करत असत).
खरे तर आईबाबा, व बहीण (आता भाचे मंडळी) सोडून मला लोकांमध्ये फारसे रमायला व गुंतून जायला आवडत नाही, जेवढयास तेवढेच संबंध आवडतात. त्यामुळे मोठीआईशी माझे नाते खूप विलक्षण, घट्ट वा अतूट होते असे नव्हे. बरीच वर्षे तिच्या सोबत दिवाळीत किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीतच माझ्या आजोळी भेट होत असे. पुढे डॉक्टर असलेली थोरली सून आल्यावर तिच्या धाकाने मोठेबाबांचे दारूचे व्यसन सुटले, आणि आमचेही मोठीआईकडे जाणे सुरू झाले. माझा बालपणी जरा जिद्दी स्वभाव, शीघ्रसंतापी (बाबांकडून) व चिडका स्वभाव होता (आई व बाबा दोघांकडूनही आलाय). त्यामुळे माझी आजोळी किंवा आमच्या मूळ गावी इतरांसह क्षुल्लक कारणांहुन प्रचंड भांडणे होत असत; मात्र मी सर्वांचा अत्यंत लाडका असल्याने (आत्ताही तेवढेच लाड पुरवले जातात) मला कुणीही काहीही बोलत वा रागवत नसत. मग मला भांडणासाठी आणखी हुरूप येत असे.
सुट्टी आटोपून जेव्हा आम्ही आजोळाहून परत निघायचो तेव्हा मोठी आई आंजारून गोंजारून जवळ घ्यायची, खाऊ खायला जवळचे पैसे द्यायची. तिच्या नऊवारीची ऊब अजूनही जाणवत आहे. आता शहाण्या मुलासारखे वागत जा, हट्टीपणा सोड, त्यामुळे तुझेच नुकसान होतंय. आज सगळी मंडळी खूप लाड पुरवत असली तरी पुढे तेच तुझ्या तिरस्कार करतील म्हणून सांगायची. तथापि आता वयानुसार माझ्यात खूप फरक पडला असला (आज कितीतरी लोकांना मी कधीकाळी खूप हट्टी, शीघ्रकोपी, व चिडका होता हे अजिबात पटत नाही किंवा जे मला जवळून ओळखतात त्यांना माझ्यातला मवाळपणा बघून आश्चर्य वाटते) तरी तेव्हा मी त्रास दिलेले काही लोक अजूनही डूख धरून आहेत. पुढे शिक्षणामुळे (वैद्यकीय शिक्षण व पीएचडी) मी लग्नाकडे दुर्लक्ष केले आणि आता मी चाळिशीच्या उंबरठ्यावर असलो तरी अजूनही झाले नाही. ह्यादरम्यान विशेषत: आईच्या आजारपणात तिने माझ्या लग्नाचे टेंशन घेऊन तब्येत बिघडवली असे मोठीआई सारखी मला बोलत असे आणि मी दुर्लक्ष करत असे. आई हॉस्पिटलहून घरी आल्यावर जी जी मंडळी तिला भेटायला येत असत त्यांना मोठीआई माझ्यासाठी स्थळ सुचवायला सांगत असे.
किंबहुना पीएचडीहून लक्ष विचलित होऊ नये म्हणून पूर्ण होईस्तोवर मला लग्न करायचे नव्हते आणि मी स्पष्टपणे आईबाबांनाही सांगितले होते. त्यांचा मला पाठींबाच होता आणि कदाचित मोठीआईला हे कळत असले तरी तिला माझे वाढते वय व आईचे आजारपण ह्यामुळे काळजी वाटत असावी. त्यामुळे पुढे मी तिचे फोनही उचलणे बंद केले, तिचा व मोठेबाबा दोघांचाही नंबर ब्लॉक केला. मग ते दोघे, नातवंड वा वहिनींकडून फोन करत असत आणि जर त्यांची नाव माझ्याकडे सेव्ड असल्यास मी तेही उचलत नसे. हे करत असतांना मला तेव्हाही खूप त्रास होत असे, पण का कुणास ठाऊक मला त्यांच्याशी बोलायचे नव्हते. त्यांची माझ्याबद्दलची काळजी मला कळतही होती पण वाटायचे त्यांना लग्नाचा विषय सोडून इतर काही बोलायचेच नसते. ह्याशिवाय आमच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाने माझेबाबा व माझा मामा ह्यात गैरसमज पसरवले होते. त्यामुळे मामाकडील मंडळींनी आमच्यावर अघोषित बहिष्कार टाकला होता. परिणामी आईला माहेरी जाता येत नव्हते (तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात होती). विशेषतः मोठीआईला सर्व सत्य परिस्थिती माहीत असूनही ती मामाच्या बाजूने होती. त्यामुळे माझा तिच्यावरचा राग आणखी वाढला होता. तशी ती आमच्या संपर्कात होतीच आणि तिचे मला कधीतरी माझ्या आईबाबा वा बहिणीकडून स्थळ सुचवणे सुरूच होते.
पुढे लॉकडाऊन मध्ये मी व आईबाबा बहीणीकडे अडकलो (मीही गोवंडीहून आईबाबांना भेटायला बहीणीकडे नवी मुंबईत आलो आणि लॉकडाऊन सुरू झाला). पहिल्या लाटेतील मुंबईतील बातम्या ऐकून ती व्यथित होऊन नियमितपणे आईबाबा वा बहिणीला फोन करत असे. एव्हाना मी त्यांचे नंबर ब्लॉक केल्याचे सर्वांनाच समजल्याने, अनब्लॉक केले. तेव्हापासून मी मोठीआईशी अगदी चार-पाच वेळाच भेटलो. अनलॉक सुरु झाल्यानंतर आम्ही जेव्हा नागपूरला परतलो तेव्हा ती आम्हाला आवर्जून भेटायला आली. माझ्या आईला प्रत्येक भाऊबीजेला (२०२०, २१, व २२) मामाकडे बोलवायची. जर त्याच्याकडे यायला जमत नसेल तर स्वतःच्या घरी किंवा तिच्या मुलांकडे बोलवायची. पण दोनदा आई मृत्यूच्या दारातून परत आल्याने, तिने आता खूप धास्ती घेतली आहे. विशेषतः कोविड-१९ महामारीपासून ती एकही कार्यक्रमांना ती जात नव्हती. किंबहुना जेव्हा तिला मोठीआईच्या मरणाला जायची वेळ आली तर ती खूप घाबरली होती.
आज माझ्या वागण्याला कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण वा समर्थन नाही, किंबहुना पश्चातापच होत आहे (तेव्हाही होता आणि सदैव असेल). हल्ली लग्नासाठी स्थळ बघत असल्याचेही सांगितल्यावर मोठीआई खूप सुखावली होती पण ओलांडलेले वय व अन्य कारणांनी थेट नकार येत ऐकून धीर देऊ लागली. तथापि, ज्या दोन मोठ्या आईंना (दुसरी आमची शेजारची काकू होती, पण मी तिलाही मोठीआईच म्हणत असे) माझ्या लग्नाची सर्वात जास्त उत्सुकता होती त्याच सोडून गेल्या. माझेच दुर्दैव! आणखी काय. आणखी काय लिहू? भरल्या घरातून सुवासिनी गेली. पुढचा जन्म असतो का माहीत नाही? असलाच तर तीच पुनः माझी मोठीआई असू देत. मात्र आता ती सोशीक व समंजस असली तरी लढवय्यी असावी. तिला फार शिकता न आल्याची खंत होती, त्यामुळे ती शिकलेली असावी. जिथे असशील तिथे सुखी असावी हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. तथापि तिला माझी काळजी नसावी, मी सुयोग्य स्थळ आले की लग्नही करेल आणि आईबाबांचीही काळजीही घेईल असे मोठीआईला वचन देतो. जरी तिच्या नऊवारीतील ऊब मला आता कधीच भेटणार नसली तरी सदैव तिचा आशीर्वाद माझ्या पाठीशी रहावा हीच माझी इच्छा आहे.
(टीप: सदर लेखाद्वारे मी माझ्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हयाद्वारे व्यसनाधीतेचे, स्त्रीच्या सोशीकपणाचे, तिच्यावरील अत्याचारचे, व हिंसेचे मुळीच समर्थन करत नाही. ह्याशिवाय मोठी आईच्या सासूबाईं व नणंदेचे जे वर्णन आहे, ते केवळ परिस्थितीजन्य आहे. माझ्यावर बालपणापासून स्त्रीपुरुषसमानतेची बीजे रोवली आहेत. किंबहुना माझे पीएचडीचे इंस्टीट्यूट आपल्या देशाच्या लोकसंख्या धोरणाची दिशा ठरवते. त्यामुळे इंस्टीट्यूट लिंगभावा (Gender) समानतेची सुरुवात स्वतपासून करावी असा संदेश देते. आमच्या ईकडे मूला-मुलीची स्वतंत्र वस्तीगृहे, किंवा एकाच वस्तीगृहात वेगवेगळे मजले नाहीत. दोन/तीन मुले असलेल्या खोलीशेजारी दोन/तीन मुलींची खोली असू शकते. त्यामुळे स्त्रीपुरुष समानतेची माझी मते अजून मजबूत झाली आहेत)
प्रामाणिक भावनेने लिहिलंय...
प्रामाणिक भावनेने लिहिलंय...
पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हांला....
छान लिहिलंय ! पु ले शु
छान लिहिलंय !
पु ले शु
मला आवडले आत्मकथन. या
मला आवडले आत्मकथन. या घडलेल्या गोष्टीच आयुष्य शिकवत असतात.
पूर्वीच्या १८५०-१९००-१९५० या काळांतील चरित्रे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येते की नातेवाईक एकमेकांना , भाचे,पुतणे यांना किती संभाळत होते.
भावना पोहोचल्या राहुल.
छान. प्रामाणिक लिहीलेय. तळटीप
छान. प्रामाणिक लिहीलेय. तळटीप लिहीलीत ते बरे झाले.
मोठ्या आईबद्दल वाचून फार वाईट
मोठ्या आईबद्दल वाचून फार वाईट वाटलं, केवढं सहन केलं त्यांनी, ह्या सर्वांतून मुलं आणि सुनांमुळे चांगले दिवस आले ही त्यातल्यात्यात जमेची बाजू.
तुम्ही प्रामाणिकपणे तुमची चूक मांडलीत. त्या असताना त्यांची गाठभेट घेतलीत हे फार छान झालं, नाहीतर खंत लागून राहिली असती.
आत्म चिंतन आणि त्यातून
आत्म चिंतन आणि त्यातून तुम्हांला झालेले आत्मदर्शन फारच आवडले.
मला खात्री आहे, ह्या लेखामध्ये प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी आत्मदर्शन होईल. आपल्या आयुष्याच्या एखाद्या तरी कोपऱ्याचे
प्रतिबिंब ह्यात उमटले आहे असे वाटेल. कारण आपण सारेच एकाच सूत्रात गोवलेले असतो. आणि जेव्हा दुरून एखाद्या घंटेचा मृत्यु नाद ऐकू येतो, तेव्हा तो आपल्यासाठीसुद्धा असतो.
लेख वाचून एक सुंदर जीवनानुभव मिळाला, त्यासाठी आभार!
खूप नितळ लिहिलं आहे..
खूप नितळ लिहिलं आहे..
स्वतःचे चुकलेले देखील तटस्थपणे लिहिणे आवडले.
प्रामाणिक भावनेने लिहिलंय...
प्रामाणिक भावनेने लिहिलंय...
पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हांला.......+१.
हीरा यांचा प्रतिसाद उत्तम आहे.
सर्वांचे मनापासून आभार!
सर्वांचे मनापासून आभार!
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण व आता नोकरीनिमित्त मी आईबाबांपासून लांब राहत आहे आणि आम्ही महत्वाच्या कामाशिवाय फोनही करत नाही. कित्येकदा आठवडाभर संपर्काबाहेर असतो. मात्र पहिल्यांदा आई जेव्हा व्हेंटीलेटरवर होती, तेव्हा कित्येक रात्री भिंतीला टेकून जागत काढल्या आहेत. मी आईबाबांशिवाय एका क्षणाचीही कल्पना करू शकत नव्हतो/नाही. तेव्हाच मोठीआई सोबत होती, तीही मनातून हादरली होती, आई वाचणार नाही असे तिलाही वाटत होते. पण ती आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली.
देवकी,
देवकी,
आपल्या सभोवतालंच्या काही
आपल्या सभोवतालंच्या काही व्यक्तींच्या असण्याने किंवा नसण्याने इतरांना फारसा फरक पडत नाही. तरीही ह्या व्यक्ती अबोल, अव्यक्त व मूकपणे जीवन जगत असतात. प्रसंगी कुणी अपमान केल्यासही तो गिळून शुद्ध व निर्मळ मनाने त्यांच्याशी आपुलकीनेच वागतात. अशीच मोठीआई होती. आधी वडिलांच्या व नंतर यजमान, व सासूबाईंच्या धाकात वाढली. तिला सदैव वाटत असे की जर ती आणखी शिकू शकली असती तर कदाचित तिला मत व निर्णय स्वातंत्र्य मिळाले असते. त्यामुळे तिच्या नंतरच्या पिढीतल्या मुलींच्या शिक्षणाला व त्यांच्या स्वातंत्र्याला तिचा पूर्णपणे पाठिंबा होता. माझी आई सत्तराव्या दशकाच्या सुरुवातीस इयत्ता दहावीत बोर्डातून मेरिट आली होती, त्यामुळे माझ्या आईचे तिला फार कौतुक होते. मात्र उच्च शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी येऊनही आईने पुढे गृहिणीच राहणे पसंद केल्याने मोठीआई तिला नेहमी रागवत असे. मोठीआईला स्वतःला मुलीची खूप आस होती, पण त्या प्रतीक्षेत तिला चारही मुलेच आणि पुढच्या पिढीत एकूण आठ नातूच झाले.
छान लिहिलं आहे. अनाहूत सल्ला:
छान लिहिलं आहे. अनाहूत सल्ला: सुट्टी काढून दहाव्या बाराव्याला गावाला जा. आपल्या लोकांत गेल्यामुळे तुम्हाला ही बरं वाटेल आणि आत्मा वगैरे अश्या काही गोष्टी खऱ्या असतील तर त्यांनाही बरं वाटेल.