वास्तुशांती ते मनःशांती

Submitted by देवू१५ on 7 February, 2023 - 15:04

मित्राने त्याच्या गावी बऱ्याचदा येण्याचा आग्रह केला होता.
एकतर त्याचे गाव बरेच दूर होते आणि हातात असलेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस सुट्टी काढून जाण्याचा योग येत नव्हता. यावेळेस त्याच्या घराची वास्तुशांती असल्याने त्याचे
आमंत्रण स्वीकारले. त्यानिमित्ताने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष जवळून बघण्याचा अनुभव घ्यायला मिळणार होता. हातातील कामे थोडे जास्त वेळ काम करून पूर्ण केली.

सकाळची सहाची बस पकडली आणि दुपारी दोन वाजता मित्राच्या गावी पोहोचलो. बस स्टॅन्ड पासून त्याचे घर चालत फार तर दहा मिनिटाच्या अंतरावर होते, तरीही मित्राने मला घ्यायला गाडी पाठवली होती. आमची गाडी गावात शिरली, रस्त्याच्या कडेला अनेक कार जीप दाटीवाटीने उभ्या केलेल्या होत्या. गाड्यांची गर्दी पाहून ड्रायव्हरला विचारले कोणाचे लग्न आहे का गावात? आपल्या अण्णांच्या घराची वास्तुशांती आहे त्याची गर्दी आहे.

ड्रायव्हरने एका मोठ्या बंगल्याबाहेर गाडी थांबवली आणि गेटमधून आम्ही हात शिरलो. डोळ्यावर विश्वास बसणार नाही परंतु एका फुटबॉल मैदाना एवढी हिरवळ आणि त्यावर आकर्षक लँडस्केप रंगीबेरंगी फुलांची झाडे आणि कारंजे बघून एखाद्या स्वप्नांना नगरीत आल्यासारखे वाटत होते. बंगल्यातून मंत्रोच्चाराचा आवाज येत होता. इतक्यात मित्र बाहेर आला, आणि मला जिन्याने वरच्या मजल्यावर घेऊन गेला. ड्रायव्हरने मित्राच्या बेडरूम मध्ये माझी बॅग ठेवली. फ्रेश होऊन आम्ही खाली हॉलमध्ये आलो. चांगलाच मोठा होता हॉल . शंभर एक लोक असतील हॉलमध्ये. पाच भटजी पूजा सांगत होते. थोड्या वेळात पूजा आटोपली.

बंगल्याच्या मागच्या बाजूला मोठा मंडप टाकला होता. तेथे टेबल खुर्च्या टाकून जेवणाची सोय केली होती. नोकर चाकर सगळी व्यवस्था बघत असल्याने घरातील सगळे मोकळे होते. घरातील कोणीही धावपळ करताना आढळले नाही. पूजा सांगणारे भटजी पाय मोकळे करायला बाहेर आले. मित्राला बाजूला घेऊन मी विचारले वास्तुशांतीसाठी पूजेला पाच भटजी कशासाठी? अरे त्यांना वास्तुशांतीसाठी मुंबईवरून वडिलांनी आणले आहे. मुंबईतल्या मोठमोठ्या सेलिब्रिटी यांच्याकडून धार्मिक विधी करून घेतात. आपली पूजा सकाळी दहा वाजता सुरू केली. जवळजवळ पाच तास चालली पूजा. आळीपाळीने प्रत्येक जण पूजा सांगत होते. दक्षिणा किती घेतात हे भटजी? मी विचारले. सव्वा लाख रुपये आणि येणार जाण्याचा खर्च आपल्याकडे. पैसे रोखच घेतात. मित्राने एका मागोमाग एक धक्के दिले. मी म्हटले, आमच्यासारख्याला ठाणे मुंबईत एखादा चांगला सुतार, प्लंबर जरी शोधायचा झाला तर लवकर सापडत नाही आणि तुम्हाला भटजी आणि तोही मुंबईच्या सेलिब्रिटींचा कसा काय सापडला? वडिलांचा राजकीय लोकांमध्ये उठबस असल्यामुळे कोणीतरी सुचवतात. खरं सांगायचं तर आमच्याकडे कार्यक्रम कोणताही असो सगळे नियोजन वडीलच बघतात. माणसं लावून काम करून घेतात. आम्हा घरच्यांना काहीच बघावे लागत नाही. आम्ही पूर्णपणे मोकळे असतो.
जस जसा अंधार पडू लागला तसतशी लोकांची गर्दी वाढू लागली पुष्पगुच्छ भेटवस्तूंचा हॉलमध्ये ढीग लागला होता. नातेवाईक घरच्यांना टॉवेल, टोपी, शाल, साड्या भेट देत होते. तीर्थप्रसाद घेऊन लोक जेवण करायल जात होते. रात्री अकरा वाजता शेवटची पंगत उठली. आम्हाला झोपायला रात्रीचा एक वाजला.

सकाळी आम्ही मित्राच्या शेतावर गेलो. मित्राने दुरवरची झाडे, विद्युत खांब दाखवून त्याच्या शेताची सीमा दाखवली. किती एकर आहे हे क्षेत्र ? मी विचारले. साठ एकर मित्र म्हणाला. एक एकर म्हणजे किती असते? मी विचारले. चल दाखवतो तुला, असे म्हणून त्याने मला पॉलिहाऊसमध्ये नेले , जेथे विविध प्रकारची फुलझाडे वाढवली होती. हे संपूर्ण पॉलिहाऊस एक एकरचे आहे. एक एकर इतके प्रचंड असते? मी आश्चर्याने विचारले आणि साठ एकरचा अंदाज लावायचा प्रयत्न केला. आम्ही पॉलिहाऊसमधून बाहेर आलो, बाजूलाच दोन मोठ्या विहिरी होत्या. त्यावर सोलर पंप लावले होते. एक मोठ्या खोलीत पाण्याचा फिल्टर प्लांट होता, ते पाणी कॉम्पुटरने नियंत्रित करून ड्रिपद्वारे पिकाला दिले जात होते. मजुरांना बाजूलाच राहण्यासाठी पक्क्या चाळीत सोय केली होती.

शेतालाच लागून नदी होती. आम्ही रस्त्याने नदीकडे निघालो, रस्त्यात १०-१२ वर्षाची चार पाच मुले बांबूची मोठी टोपली घेऊन येताना दिसले. किती पकडले आज? मित्राने त्यांना विचारले. तीस सापडले. मुले खुश होऊन म्हणाली. टोपलीत काय पकडून आणले? मी विचारले. नदिकडील शेतात भरपूर तितर येतात, ही मुलं फास लावून पकडतात, तितर खाण्यासाठी. मित्र म्हणाला.

थोड्याच वेळात आम्ही नदीवर पोहोचलो. भरपूर पाणी होते नदीला. मित्राला म्हटले चल आपण कडेने नदीत उतरू. मित्र म्हणाला अजिबात नको. कडेलाच नदी दहा बारा फूट खोल आहे. पूर्वी नदीकिनारी वाळूची चौपाटी होती, परंतु पुढे बंधारा बांधल्याने संपूर्ण चौपाटी पाण्याखाली गेली. त्यात वाळूचा उपसा झाल्याने नदीची खोली वाढली. इथून नवा हायवे जाणार आहे. त्यात आमची थोडी शेती जाणार आहे. परंतु वडिलांचा येथे हॉटेल आणि बोटींगचा व्यवसाय करण्याचा विचार आहे.

मगाशी मुलांनी तितर पक्षी पकडलेले बघून वाईट वाटले होते. आपण गप्पा मारत असताना अनेक प्रकारचे पक्षी बाजूच्या झुडुपातून उडताना मी बघितले. उद्या येथे बोटिंग आणि हॉटेल व्यवसाय सुरू झाल्यास, पर्यटकांची वर्दळ वाढून येथील शांतता संपुष्टात येईल. हा नदीकिनारा,झाडी झुडपे पक्षांचा हक्काचा अधिवास आहे, त्यास धक्का लागल्यास पक्षी, ही जागा सोडून जातील. त्याचा येथील पर्यावरण व जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होईल. मी माझे विचार मित्रासमोर मांडले. मित्र जरा गंभीर झाला आणि म्हणाला पटतंय तुझे म्हणणे, असा विचार मी केलाच नव्हता.

मित्र गावातील जुन्या घरी घेऊन गेला. घर कसले , तीस एक खोल्यांचा एकमजली मोठा वाडा होता. मोठे अंगण, कोपऱ्यात विहीर, प्रशस्त व्हरांडा होता. मुख्य म्हणजे वाडा अगदी सुस्थितीत होता. मित्राला विचारले इतका छान वाडा असताना गावाबाहेर का गेले तुम्ही राहायला?

जिल्हा परिषदेच्या एका निवडणुकीत वडिलांचा पराभव झाला. आतापर्यंत आजोबांपासून वडीलांपर्यंत , ग्रामपंचायत असो वा जि. प. निवडणूक असो त्यांनी पराभव कधी बघितला नाही. त्यात नेमके त्याच वर्षी मोठी गारपीट झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतीच्या नुकसानीपेक्षा जि.प. निवडणुकीचा पराभव वडिलांना जिव्हारी लागला. त्यात कोणीतरी त्यांना सांगितले तुमच्या वास्तूत दोष आहे. घराचे प्रवेशद्वार सोडल्यास ,विहिरीची जागा आणि घरातील इतर वास्तुदोष तुमच्या प्रगतीत अडथळा आणत आहे. बरेच वास्तूदोष उपाय सुचवणारे येऊन गेले. त्यांनी बांधकामात अनेक बदल सुचवले. दगड, विटा आणि लाकडाचे बांधकाम असल्याने बरीच तोडफोड करावी लागणार होती. आर्किटेक्टने असे बदल केल्यास वाड्याचा बांधकामास धोका पोहोचू शकतो असे सांगितले. हे ऐकून वडिलांनी नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला.

मी म्हटले , जर ह्या वास्तूत दोष असता तर तुझ्या आजोबांचा, वडिलांचा, तुमचा उत्कर्ष झाला असता का? तुझा मोठा भाऊ CA, बहीण डॉक्टर, तू आय आय टी इंजिनियर, हे सर्व ह्या घरात असतानाच झाले ना? केवळ एका निवडणुकीत पराभव आणि नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे खापर ह्या घरावर फोडणे हे मनाला पटत नाही. आम्ही हे सर्व वडिलांना समजावून सांगितले होते. वडील सोडल्यास कोणाचीच वाडा सोडायची ईच्छा नव्हती. परंतु वडिलांच्या हट्टापुढे कुणाचेच चालले नाही.

गावातून घरी आलो तर हॉलमध्ये साड्या, टॉवेल, टोप्या , शाली ह्यांचे व्यवस्थित पॅकींग करून, दोन माणसं मोठाले खोके भरत होते. सर्व खोके भरुन झाल्यावर बाहेर एका टेम्पोमध्ये हे खोके चढवून ते टेम्पो घेऊन गेले. हे कोण होते? आणि कुठे घेऊन गेले हे सर्व? मी मित्राला विचारले. " रिसायकल " असे म्हणून तो गालातल्या गालात हसला. रिसायकल म्हणजे? मी भाबडेपणाने विचारले. हे आलेले कपडे कोण वापरणार म्हणून वडिलांनी त्यांना फुकट देऊन टाकले. त्यांचे गावात दुकान आहे, ते पुन्हा त्याची विक्री करतात. काहीजण ह्या कपड्याची विक्री होऊ नये म्हणून, त्याला कुंकू लावतात. देण्याघेण्यासाठी स्वस्त मिळतात म्हणून लोकही त्याच्याकडून खरेदी करतात. अरे! बरे झाले , देण्याघेण्यावरून आठवण झाली. उद्या गावात xxx च्या मुलाचे दहावे आहे. सकाळी आठला जावे लागेल.

मला नदी घाटाच्या वरच्या पायरीवर बसायला सांगून मित्र पायऱ्या उतरून जेथे दशक्रिया विधी चालू होता तिथे गेला. बरीच गर्दी होती घाटावर. पिंडदानाचा विधी चालू होता, बाजूला एका बुवांचे प्रवचन चालू होते. लोकं शांतपणे ते ऐकत होते, इतक्यात एका मोबाईलच्या कर्कश रिंगटोनने शांतता भंग पावली. पांढरे कपडे घातलेल्या त्या तरुणाने मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. " काय झाले आता? , xxx ला सांग " तात्यांशी " बोलून घे , आणि ट्रक सोडायला सांग, नाही ऐकले तर अंगावर घाल ट्रक. इकडे व वाटी वाटीने वाळू काढतोय, आणि ह्यांची तोंड वासतच चाललीय , " एक घाणेरडी शिवी देऊन त्याने फोन कट केला.

भटजीने दगडी चोथऱ्यावर घास ठेवायला सांगितला. बुवाने आपले प्रवचन थांबवले. पिंडाला कावळा शिवायची सर्वजण वाट बघत होते. बाजूच्या पिंपळाच्या झाडावर बरेच कावळे होते, परंतु एकही खाली येत नव्हता. मृताच्या घरातली एक एक जण येऊन पिंडाला पाणी देऊन नमस्कार करून येत होते, परंतु एकही कावळा पिंडाकडे फिरकत नव्हता.

एका वयस्कर बाईने मृत मुलाच्या आईला पिंडाला पाणी द्यायला उठवले, त्या माऊलीने जोरात हंबरडा फोडला. तितक्याच जोराने ती वयस्कर बाई माऊलीवर खेकसली. " गप्प बस ! आवाजाने कावळे उडून जातील ". माऊली एकदम शांत झाली. " दारूची बाटली ठेवा पिंडाजवळ, दारू पिऊन नदीत बुडाला तेव्हा खिशात अख्खी भरलेली बाटली होती". पांढऱ्या कपडेवाल्याने आजूबाजूच्या लोकांकडे बघत कुत्सितपणे म्हटले. परंतु कोणीच त्याला गप्प बसवले नाही.

माऊली शांतपणे पिंडाकडे चालत गेली. पिंडाला पाणी देऊन नमस्कार केला, आणि माघारी येऊन बसली. कावळा काही आलाच नाही. आता भटजीने कोणालातरी गाय आणायला सांगितली. कावळा पिंडाला न शिवल्याने मृतात्म्यास शांती प्राप्त होण्यासाठी घरच्यांनी वर्षभर कोणते विधी करायचे ह्याचे बुवांनी मार्गदर्शन केले. गायीने एका घासात सगळे मट्ट करून टाकले. ह्यावेळी माऊलीने हंबरडा फोडला नाही, तिच्या चेहऱ्यावर अपराधी भावना होती, त्यात आजूबाजूच्या बायकांच्या कुजबुजीने भरच पडत होती.

गावातल्या मोठ्या हॉलमध्ये जेवणाचा आणि दुखावट्याचा कार्यक्रम सुरू झाला. लग्नासारख्या पंगती उठत होत्या. शाल, टॉवेल, टोपी आणि साड्या पोत्यांमध्ये भरले जात होते. मित्राला विचारले, हे ही " रिसायकल " का? तो फक्त हसला.

दुसऱ्या दिवशी ठाण्याला बसने निघालो. संपूर्ण प्रवासात त्या माऊलीचा चेहरा समोर येत होता. असे प्रसंग कधीच बघितले नसल्याने मन अस्वस्थ होते. घरी पोहोचल्यावर मित्राला फोन केला. मित्र म्हणाला एक चांगली बातमी आहे, वडिलांशी बोलल्यावर त्यांनी नदीवरील जागेत हॉटेल आणि बोटींग सुरू करण्याचा विचार सोडून दिला. हे ऐकून अस्वस्थपणा बराच दूर झाला.

xxx

Group content visibility: 
Use group defaults

लेख वाचला.वास्तव आहे खरं.वाळू माफिया चं वाचून वाईट वाटलं.ट्रक अंगावर घालणं ही इतकी सहजपणे केली जाणारी गोष्ट आहे Sad
रिसायकल होणाऱ्या रुमाल टॉवेल टोप्या.खूप मोठा समारंभ, खूप जास्त प्रमाणात या वस्तू येणार असतील तर साहजिकच आहे.आपल्या घरात जवळचे नातेवाईक देतात अश्या प्रसंगात, आपण कधीच रिसायकल चा विचार करत नाही.भावनेला महत्व.

फार मोठ्या समाजसंख्येचे हेच वास्तव आहे.

खोटा बडेजाव, भपकेबाज समारंभ, खर्चिक कर्मकांडात अडकलेला समाज. थोरांचे बघून स्वतःला परवडत नसले तरी लोक अनुकरण करतात आणि चक्र सुरु राहते. सो बॅड.