✪ शाळा सोडून जाणा-या शिक्षिकेद्वारे विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शनाचं आयोजन
✪ ८० हून अधिक मुलं, ३५ हून अधिक पालक, शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग
✪ बलून प्रज्वलनाद्वारे सत्राची सुरुवात!
✪ औरंगाबादच्या लाडसावंगीजवळ गवळीमाथा येथील सुंदर आकाश
✪ ग्रह, तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ आणि "शाळा चांदोबा गुरुजींची"
✪ धुमकेतू बघण्याचा दुर्मिळ अनुभव आणि डोळ्यांची तपासणी!
✪ समंजस ग्रामस्थांचा आणि उत्साही विद्यार्थ्यांचा सहभाग
✪ विद्यार्थी नव्हे, ही तर सावित्रीची लेकरं!
✪ अंधारलेलं आकाश पण अनेक उजळलेल्या चांदण्या
सर्वांना नमस्कार. औरंगाबादमध्ये काल दि. ६ फेब्रुवारी रोजी लाडसावंगीजवळच्या गवळीमाथा वस्तीमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक व इतर ग्रामस्थांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. हे सत्र घेण्याचा अनुभव अगदी वेगळा होता. तो अनुभव आपल्यासोबत ह्या लेखातून शेअर करत आहे. जि. प. गवळीमाथा शाळेतील शिक्षिका सौ. प्रेरणाताई रवींद्र अन्नदाते ह्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सत्राचं आयोजन केलं होतं. प्रेरणा मॅडम गेली १२ वर्षं ह्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि आता त्यांची बदली होणार आहे. जाण्यापूर्वी ह्या सगळ्यांसाठी काही तरी छान भेट देण्याची त्यांची इच्छा होती. ह्या परिसरामध्ये काम करणा-या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी अशा एखाद्या उपक्रमाविषयी विचारलं. ह्या परिसरात मंडळाचे कार्यकर्ते महिला आरोग्य, ग्राम विकास, शिक्षण, पाणलोट विकास, युवकांचे प्रश्न अशा विविध विषयांवर काम करतात. मंडळाचे जीवन भुते सर इथे उज्ज्वल भारत प्रकल्पामध्ये काम करतात व मुलांना आरोग्यदायी सवयी लावणे, आरोग्याची काळजी, मुलांची आरोग्य तपासणी, त्यासाठी विविध खेळ- गाणे- स्पर्धा असे उपक्रम सर घेत असतात. जिल्हा परिषदच्या ९१ शाळांमध्ये हे काम चालतं. तसंच परिसरातच शेतकरी उत्पादक संघही काम करतो. त्यामुळे जीवन भुते सरांचा प्रेरणा मॅडमसोबत चांगला परिचय होता. जीवन भुते सरांनी त्यांना आकाश दर्शनाच्या कार्यक्रमाबद्दल सुचवलं आणि त्यांनी ह्या आकाश दर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं. एखाद्या शिक्षिकेने बदली होताना मुलांसाठी म्हणून असा कार्यक्रम आयोजित करणं, ह्यामधूनच त्या शिक्षिकेचं वेगळेपण दिसतं.
औरंगाबादवरून संध्याकाळी ५.३० वाजता निघालो आणि जालना रोड आणि शेंद्रा एमआयडीसी मार्गे लाडसावंगीकडे निघालो. हळु हळु शहर, इमारती, कंपन्या वगैरे मागे पडल्या. उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यानंतर एकदम खड्डेयुक्त रस्ता लागला! सूर्य मावळल्यानंतर थोड्या वेळातच सेलूदजवळच्या गवळीमाथा वस्तीवर पोहचलो. चोरमारे सरांनी शाळेपासून काही अंतरावरची मोकळी जागा दाखवली. तिथे टेलिस्कोप सेट केला. हळु हळु पश्चिमेचा संधीप्रकाश कमी झाला. पश्चिमेला शुक्र आणि गुरू प्रकाशमान झाले आणि मग तर आकाशातून अनेक मिणमिणते दिवे प्रकटले! इथलं आकाश खूपच सुंदर आहे. अक्षरश: शेकडो तारे आकाशात दिसत आहेत. आज मस्त आकाश बघायला मिळणार! थोड्याच वेळात पूर्वेला लालसर चंद्र उगवला. हळु हळु सगळे मुलंही जमले. खूप वेगळा व मॅडमनी खास आयोजित केलेला कार्यक्रम पुढेही पूर्णपणे वेगळा ठरत गेला. बलून प्रज्ज्वलनाने त्याची सुरुवात झाली! मॅडमनी त्यासाठी खास बलून आणलं होतं. मुलांच्या पुढाकाराने बलूनमध्ये ज्योत पेटवण्यात आली. आणि जशी बलूनमधली हवा गरम झाली, तसं बलूनने झेप घेतली! अगदी साधा असला तरी मुलांच्या उपस्थितीत आणि मुलांच्या आनंदासाठी होणारा हा प्रयोग रोमांचक होता, कारण ते बलून जणू मुलांच्या क्षमता व स्वप्नांचं प्रतीक होतं.
आकाश दर्शन सत्र घेताना पहिली ते सातवीपर्यंतचे सगळे विद्यार्थी एकत्र आले आहेत. त्यामुळे टेलिस्कोपमधून त्यांना दाखवताना गोंधळ होईल असं वाटतंय. पण जीवन सर, ज्योती मॅडम, प्रेरणा मॅडम, वस्तीशाळेतले श्री. परमेश्वर चोरमारे सर, ज्ञानेश्वर नरवडे सर आणि इतर शिक्षकांच्या सोबतीमुळे कोणताही गोंधळ झाला नाही. मुलांच्या रांगा करून त्यांना एकामागोमाग एक आकाशातल्या गमती दाखवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांची मोठी संख्या असूनही सगळ्यांनी शांततेत शुक्र ग्रह, गुरू ग्रहाचे उपग्रह, मृग नक्षत्रातला तेजोमेघ, कृत्तिका तारकागुच्छ आणि चंद्र बघितले. कृत्तिका तारकागुच्छामधले चमचमणारे तारे बघून सगळ्यांचे चेहरेही चमकत आहेत. इतर ऑब्जेक्टस कितीही सुंदर असले तरी चंद्र हा सर्वाधिक सुंदर आहे, ह्यावर सगळ्यांचं एकमत होईल. दुर्बिणीतून दिसणारा मोठ्ठा चंद्र, त्यावरचे डाग आणि खड्डे बघताना मुलं रोमांचित होत आहेत आणि त्यांना ते दाखवण्याचं समाधान मला मिळतंय.
हे सगळं बघताना प्रत्येकाला शांतपणे कसं बघायचं ते प्रेरणा मॅडम सांगत आहेत आणि समजावत आहेत. इतक्या मोठ्या मुलांना एकत्र दाखवताना खूप ऊर्जा मुलांना शांत करण्यात जाते, असा माझा अनुभव आहे. पण इथे मॅडम त्यांच्या विद्यार्थ्यांना नव्हे मुलांना खूप शांतपणे सांगत अहेत. त्यामुळे टेलिस्कोपने इतक्या जास्त मुलांना सहजपणे बरेच ऑब्जेक्टस दाखवता आले. विशेष म्हणजे बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांशी बोलताना नकळतपणे काहीसे उद्धटपणे बोलतात, अधिकार गाजवतात किंवा आदेश देतात. पण प्रेरणा मॅडम मुलांशी बोलतानासुद्धा आदरार्थी बोलत आहेत. त्यांच्या बोलण्यात त्यांच्या लेकरांबद्दल त्यांना असलेली आपुलकी व माया दिसते आहे. अगदी अंधारातही त्या सगळ्या मुला- मुलींना बरोबर ओळखत आहेत, त्यांच्याशी बोलतही आहेत. गुरू- शिष्यामध्ये हे नातं बघताना छान वाटतंय.
जीवन सरांनी प्रेरणा मॅडम आणि चोरमारे सरांनी शाळेमध्ये केलेल्या कामाची माहिती दिली. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले. मुलांना शिकवण्याबरोबरच इथे झाडं लावले, मुलांसाठी प्रसंगी स्वत: खर्च करून सुविधा आणल्या. इथल्या विद्यार्थ्यांनीही त्यानुसार मेहनत घेतली. मॅडमच्या आवाहनाला त्यांनीही प्रतिसाद दिला. आकाश दर्शनामध्येही विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग घेतला. ग्रामस्थांनीही हा उपक्रम नक्की काय आहे, कसा आहे व विद्यार्थ्यांच्या कशा उपयोगाचा आहे हे समजून घेतलं. अनेकदा अशा उपक्रमाबद्दल अनेक जण चेष्टाही करतात किंवा नावं ठेवतात. अनेकदा लोक शंकाकुशंका घेतात. पण इथे वेगळं चित्र आहे. गवळीमाथाच्या ग्रामस्थांच्या बोलण्यातून जाणवत आहे की, विद्यार्थ्यांसाठी हा चांगला उपक्रम सुरू आहे ह्याची त्यांना कल्पना आहे. त्यांनीही त्यामध्ये नंतर सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचं बघून झाल्यानंतर पालक विद्यार्थ्यांना घेऊन गेले. ज्यांना पुढेही थांबायचं होतं, असे काही विद्यार्थी व दहावीच्या पुढचे काही मुलं व ग्रामस्थ नंतर थांबले. परत जाणारे मुलं मॅडमना सांगून जात आहेत. त्यांचं त्यांच्या प्रत्येक लेकराकडे लक्ष आहे.
पोर्णिमेच्या चंद्रप्रकाशातलं जेवण अर्थात् मूनलाईट डिनर झालं! चोरमारे सरांच्या मॅडमनी घरी केलेला डबा सगळ्यांसाठी पाठवला आहे. त्या खरं तर तीन कामांमध्ये व्यस्त होत्या. तरीही त्यांनी वेळ काढून स्वत: डबा पाठवला. अशा सगळ्या गोष्टींमुळे ह्या कार्यक्रमाची रंगत अजून वाढत जाते आहे. शिवाय डोक्यावर अतिशय सुंदर आकाश आहेच!
लहान वयोगटातील विद्यार्थी गेल्यानंतर उरलेल्यांसाठी सत्राचा दुसरा भाग सुरू झाला. ह्यावेळी सध्या आकाशात दिसणारा धुमकेतू- C/2022 E3 (ZTF) दुर्बिणीमध्ये सेट केला. गेले काही दिवस रोज ह्या धुमकेतूला बघत असल्यामुळे आणि तो सारथी तारकासमूहात ब्रह्महृदय ता-याजवळ असल्यामुळे लगेचच सापडला. अतिशय अंधुकसा दिसतोय. मला नेहमी बघत असल्यामुळे सवय आहे. पण ज्यांना अंधुक गोष्टी बघायची सवय नाहीय, त्यांना बघायला कठीण जातोय. तरीही अनेकांनी प्रयत्न करून व संयम ठेवून धुमकेतू बघितला. विद्यार्थ्यांनीही averted vision चा वापर करून म्हणजे बाजूच्या ता-याकडे बघून धुमकेतू बघितला. अतिशय अंधुक पुंजका! सूर्यमालेत ५०,००० वर्षांनी सूर्याला भेटायला आलेला आणि आता परत निघालेला पाहुणा! जवळजवळ चार कोटी किलोमीटर अंतरावरून पुसटसा दिसणारा धुमकेतू! धुमकेतू प्रत्यक्षात बघणं ही दुर्मिळ संधी असते. सगळ्यांनी धुमकेतू शांतपणे बघितला. काही जणांच्या बाबतीत त्यामुळे डोळे तपासणीही झाली! टीव्ही- मोबाईल जास्त बघणा-यांना धुमकेतू बघायला कठीण गेला. चोरमारे सरांना धुमकेतू अगदी स्पष्ट दिसला. तेव्हा त्यांना म्हणालो की, सर तुमची दृष्टी खूप चांगली आहे आणि कदाचित अंधुक गोष्टी बघण्याचा सरावही तुम्हांला कधी झालेला आहे. त्यावर सर म्हणाले की, ते टीव्ही बघत नाहीत आणि त्यांनी सुई- दो-याचं काम काही काळ केलं आहे! हा धुमकेतू आकाशात रोज तीन- चार अंश सरकतो आहे, त्यामुळे तासाभरानंतर धुमकेतूचीही स्थिती ता-यांच्या पार्श्वभूमीवर किंचित बदललेली दिसली!
प्रेरणा मॅडमचे कुटुंबीयसुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये आले. विशेष म्हणजे त्यांनी सगळ्यांसाठी चहाही आणला आहे. आकाशदर्शन, गुलाबी थंडी आणि गरम चहा! कार्यक्रमाची रंगत अशी सतत वाढतच जातेय. प्रेरणा मॅडमच्या घरच्यांनाही आकाशातल्या गमती दाखवता आल्या. गुरू मावळला आहे, पण त्याऐवजी पुष्य नक्षत्र दाखवता आलं. कृत्तिकासारखाच, पण अंधुकसा हा तारकागुच्छा सगळ्यांनी बघितला. चंद्रसुद्धा सगळ्यांनी परत बघितला. एका अर्थाने ही रात्रीची शाळा "शाळा चांदोबा गुरुजींची" असते. चंद्र बघून सगळ्यांचेच चेहरे उजळून निघाले! अखेर रात्री ११ वाजता सप्तर्षीतला वसिष्ठ जोडतारा बघून नाइलाजाने हा कार्यक्रम आवरावा लागला. औरंगाबादला घरी पोहचेपर्यंत सगळ्यांना अधिक उशीर होऊ नये म्हणून थांबावं लागलं. पण अगदी शेवटपर्यंत मोठ्या वर्गातले विद्यार्थी व ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झालेले होते.
खरं तर अतिशय दुर्गम भागातल्या वस्तीशाळेवर हा कार्यक्रम झाला. एका अर्थाने अनेक समस्या असलेला परिसर. हाल अपेष्टांमध्ये जगणारी माणसं. अनेक प्रकारच्या समस्यांनी पीडित असलेले इथले लोक. पण तरीही ह्या विद्यार्थ्यांना भेटून, इथल्या शिक्षकांना व शाळेला भेटून जाणवलं की, आकाश कितीही अंधारलेलं असलं तरी अनेक मिणमिणते दिवेही पेटलेले आहेत. आकाश काळं असलं तरी सगळाच काही अंधार नाहीय. अनेक तेजाच्या शलाकाही आहेत. अनेक पलितेही पेटलेले आहेत. मॅडम आणि सर, विद्यार्थी, सावित्रीबाई मंडळाचे कार्यकर्ते असे अनेक दिवे इथे प्रज्वलित झालेले आहेत. समस्या असल्या तरी त्यावर कामही सुरू आहे. ही प्रेरणा ह्या सगळ्यांकडून नक्की घेण्यासारखी आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी व त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. अनुभव पूर्ण वाचल्याबद्दल आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद.
(निरंजन वेलणकर. आकाश दर्शन सत्र व मुलांसाठी फन- लर्न सत्र. तसेच मोठ्यांसाठी फिटनेस व ध्यान सत्र आयोजन. 09422108376)
मस्त अनुभव आहे. मुंबईत असे
मस्त अनुभव आहे. मुंबईत असे काही कार्यक्रम होतात का? याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.
वा! छान कार्यक्रम आणि वर्णन.
वा! छान कार्यक्रम आणि वर्णन.
छान लिहीले आहे आणि छान अनुभव.
छान लिहीले आहे आणि छान अनुभव. त्या बाईंना सुद्धा क्रेडिट. भेट म्हणून उगाच काही वस्तू वगैरे न देता हे केल्याबद्दल.
सुंदर अनुभव कथन! मुलांना इतकी
सुंदर अनुभव कथन! मुलांना इतकी छान भेट देणार्या प्रेरणा मॅडमचे कौतुक वाटले.
अतिशय सुंदर आणि सुरेख. फोटो
अतिशय सुंदर आणि सुरेख. फोटो अपलोड करता आले तर खूपच मजा आली आ
छान कार्यक्रम आणि वर्णन.
छान कार्यक्रम आणि वर्णन.
वाचल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल
वाचल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!
मॅडमचं कौतुक आहे असा विचार करून प्रत्यक्षात आणल्याबद्दल. त्या मॅडम, तिथले इतर सर व सावित्रीबाई फुले मंडळ सर्वांचं काम प्रेरणादायी आहे.