https://www.maayboli.com/node/82924
मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -८
ऑफिस सोडून एक आठवडा उलटून गेला होता . नवीन नोकरी शोधून ऍप्लिकेशन टाकण्याचं माझं काम सुरू झालं होतं , आणि एक दिवस जाईचा फोन आला की ऑफिस ला येऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून जा . माझ्या काळजात एक बारीक कळ आली . किती विचित्र असतं मन . मी स्वतः: नाकारलं तेव्हा जेवढं वाईट वाटलं त्यापेक्षा तिकडून तिचा असा फोन आल्याचं किती तरी अधिक दु:ख झालं . खूप गृहीत धरलं होतं मी यु डी ना माझ्याही नकळत .
‘त्या ‘ दिवसानंतर आज पहिल्यांदाच ऑफिसच्या पायऱ्या चढत होते , ह्रदयाचे ठोके एवढे वाढले होते की माझे मला स्प्ष्ट आवाज ऐकू येत होते . वर पोहोचले ,आत्ता यु डी ची ‘लंच’ नंतरची विश्रांती चालू असेल , मीनीनाथ म्हणजे यु डी चा एकनिष्ठ ऑफिस बॉय तो त्यांच्या केबीन बाहेर राखण करत असेल . विचार करत मी दारापाशी पोहोचले , रिसेप्शन ला जाई एकटीच बसली होती ,बाकी सर्वत्र कमालीची शांतता होती . आसपास कोणीही नव्हतं . मी पोहोचताच चाहूल लागून जाई ने मान वर केली , तिचे डोळे किंचित सुजलेले आणि चेहेरा गंभीर होता .मला पाहिल्याबरोबर तिने एक सुस्कारा सोडला आणि न बोलताच मस्टर काढलं , ‘जाई ,एवढी शांतता का आहे सगळीकडे ? स्टुडंट्स चा गोंधळ नाही , लेक्चर्स ची गडबड दिसली नाही आणि ईथेही कोणी दिसत नाही “
“यु डी ऍडमिट आहे त्यामुळे सध्या दोनच बॅचेस चालू आहेत “ तिने तुटक स्वरात उत्तर दिलं
“ क्काय ?..काय झालं त्यांना ? कशामुळे ऍडमिट आहेत ? “ धक्का बसून मी विचारलं ,
, “घाबरू नकोस , आत्महत्या वैगेरे करायचा प्रयत्न केला नाही त्याने ,तेवढा वीक नाहीये तो . एक आठवड्यापूर्वी अचानक तुझा फोन आला की मी आजपासून ऑफिसला येणार नाही, त्यानंतर कोणाशीही काहीही न बोलता यु डी घरी निघून गेला ,दुखावला गेला असेल खूप . रात्रीची बॅच मग मंदारने घेतली. रात्री मी घरी पोहोचले तोवर तो ,न जेवताच झोपलेला दिसला आणि मग मध्यरात्री एकदम त्याच्या रूम मधून धपकन पडल्याचा आवाज आला , म्हणून मी धावत आत गेले तर तो त्याच्या बेडवरून खाली पडला होता , त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता , ताबडतोब रात्री ऍडमिट केलं ,डॉक्टर म्हणाले माईल्ड हार्ट अटॅक आहे . “
तिचे ते उत्तर ऐकून मी मट्कन खाली बसले , पण काय बोलावं ते सुचेना . तीच पुढे बोलली ,
“ आता ठीक आहे तो , एक दोन दिवसांनी डिस्चार्जही देतील .पण महिनाभर बेड रेस्ट सांगितलीये डॉक्टरांनी . त्यामुळे मंदार आणि वैद्य सर क्लासेस घेतायत सध्या “
“ ओह .. आणि हे सर्व माझ्यामुळे ? “
“कशाला एवढं महत्व घेतेस स्वतः:ला ..” कडवट चेहेरा करत जाई ने राहिलेल्या पगाराचा चेक आणि सर्टिफिकेट माझ्यासमोर धरले .
“यु डी ने कालच सांगितले होते , की उल्का चा पगार देऊन टाक तिला घरी विचारत असतील “
पुन्हा एकदा अपराधी चेहेरा आणि भरलेले डोळे घेऊन मी तिच्यासमोर उभी राहिले .
“सॉरी जाई मला माहिती नव्हतं हे असं काही घडेल “
“काय माहिती नव्हतं उल्का ? तुला हे माहिती नाही की सुपर्णा मॅम चं आणि यु डी चं वैवाहिक आयुष्य गंडल्यामुळे तो एकाकी पडलाय ?, तुला हे माहिती नाही की तुझ्यात तो किती गुंतलाय ? तुला हे माहिती नव्हतं की सदा न कदा तो तुझ्याच काळजीत असतो ? तुला ccd मध्ये सांगितलं ना त्या दिवशी यु डी ने सारं काही ? तरीही तु त्याला निष्ठुर पणे उडवून लावलंस . “
“ निष्ठुर पणे ? आणि हे तुझ्यापर्यंत कसं पोहोचलं ? “ यावर जाई ने ‘हा काय बावळट प्रश्न ? अशा पद्धतीचा एक कटाक्ष टाकला. मी त्याकडे दुर्लक्ष करून म्हणाले
“ म्हणजे माझंच चुकलंय असं तुम्हा सगळ्यांना वाटतं , माझं लग्न झालंय जाई ,हे तुम्ही सगळेच दृष्टीआड करताय , मला खरच नवल वाटतं याचं . जाई तु एक स्त्री आहेस , तुला कळत नाहीये माझी घालमेल ? स्वतः:च्या स्वार्थासाठी मी नाही असं आततायी पाऊल उचलू शकत .”
“अगं पण त्याने तुला असं मागितलंच काय होतं ? जे तुझ्या लग्नाच्या आड येणार होतं ?”
“ पण जाई हे अयोग्य नाही का ? “
“योग्य काय आणि अयोग्य काय हे कुणी ठरवायचं उल्का ? काय मेजरमेंट्स लावतेस तु त्यासाठी ? माणूस म्हणून तुझ्याकडे न बघता केवळ पैसे कमावण्याचं साधन म्हणून बघणारी , शिवाय तुला जितक्या आणि जेवढ्या प्रकारे वापरून घेता येईल तेव्हड्या प्रकारे वापरून पुन्हा घरातल्या लोकांसाठी एवढं केलंच पाहिजे , तुझं कर्तव्यच आहे असं म्हणणारी तुझ्या सासरची मंडळी योग्य आहेत का ? का ? कारण तुझ्या गळ्यात त्यांच्या मुलाने अधिकृत पणे मंगळसूत्र घातलंय म्हणून ? यु डी च्या पैशाचा हक्काने उपभोग घेऊन पुन्हा त्याच्यामागे डिटेक्टिव्ह गिरी करत फिरणारी सुपर्णा योग्य आहे , का? कारण पुन्हा तेच, अधिकृत पणे लायसन्स आहे तिच्या गळ्यात यु डी च्या नावाचं म्हणून ? प्रेमाने आपल्या माणसाला जिकंता येऊ शकतं हे या लोकांना कळत नाही. हक्क वसूल करायचा कळतो , यात योग्य कोण आणि अयोग्य कोण हे कसं ठरवणार ?
“ पण मी नकार दिला हे तुझ्यासाठी बरंच झालंय ना एकप्रकारे ? तुझं आणि यु डी चं ही प्रेम आहे ना ? मग तु ? आय मीन .. मला तुझी मेन्टॅलिटी कळत नाहीये .”
“ काय कळत नाहीये ? हेच की मी आणि यु डी एकत्र रहातो तरीही मी त्याच्याबाजूने तुझं मन वळवायचा प्रयत्न का करतेय ?, मी अनमॅरिड असून यु डी च्या नावाने खोटं मंगळसूत्र का घालते ?, मी त्याच्यासाठी घर सोडून पळून आले आहे तरीही तु त्याच्याबरोबर असावीस म्हणून का धडपडतेय ? ”
“हो … मला हे डायजेस्ट कसं होईल ? किंवा कुणालाही हे कसं होईल ? “
“हे बघ उल्का , मी काही महान होण्यासाठी हे करत नाहीये , रादर मला रागच येतोच तुझा , पण यु डी चं तुझ्यावर प्रेम आहे , आणि त्याने ने माझ्यासाठी जे केलंय त्याच्यापुढे या गोष्टी खूप छोट्या आहेत . मी घर सोडलं तेव्हा त्याने मला समजवायचा खूप प्रयत्न केला पण मी त्याचं प्रेम जिंकून दाखवेन या घमेंडीत घर सोडलं , चूक त्याची नाहीये ,माझी आहे, मी त्याच्यासाठी वेडी झाले होते , आणि स्वतः:च्या प्रेमावर फाजील आत्मविश्वास ठेऊन घर सोडून पळून आले , घरच्यांनी पोलीस कम्प्लेंट केली ,पण २१ वर्षे पूर्ण झाली असल्याने मला कोणी काही विरोध करू शकलं नाही . आणि मग मी त्याच्याकडेच राहिले ,आत्ता त्याच्या माझ्या नात्याला मी नाव देऊ शकत नाही पण यु डी म्हणजे माझी फॅमिली आहे . मला सांग आज पहिल्यांदा त्याला असं माणूस मिळतंय ज्याची त्याने अनेक वर्ष प्रतीक्षा केली तर मी त्याच्यासाठी तुझं मन वळवण्याचा एवढाही प्रयत्न करू नये ? माझं प्रेम अल्लड असेल उल्का पण स्वार्थी नक्कीच नाही .”
“ जाई , एका लग्न झालेल्या स्त्री साठी या गोष्टी अवघड आहेत आणि हे चुकीचं आहे असं मला खूप वाटतं , anyways तुमच्या ईतकी फॉरवर्ड विचारांची मी नाही ,मुख्य म्हणजे माझ्याकडे ते धाडस ही नाही ,तुझे झाले असेल तर मी निघते . “
माझ्या या उदगारांवर मात्र आत्तापर्यंतचा तिने घेतलेला तत्वज्ञानाचा पवित्रा कोसळला आणि भावनिक होऊन ती लहान मुलासारखी रडायला लागली .
“ उल्का तु आयुष्यात आल्यानंतर यु डी केवढा आनंदी झाला होता , खरंच गं ,किती जीवाचा आटापिटा करायचा तुझ्या चेहेऱ्यावर हसू यावं म्हणून. तुला माहिती नाही उल्का तु घरी गेल्यानंतरही तो सतत तुझ्याविषयीच बोलत रहायचा ,कित्ती नावं दिली आहेत तुला त्याने माहितीये , तु म्हणजे राधा ,तु म्हणजे रती , तु म्हणजे ‘ईजाजत ‘ मधली सुधा असंच आणखी काय काय .. आयुष्य खूप आनंदाने जगायचंय गं त्याला ,उल्का यु डी ने आतापर्यंत इतकं सर्वांसाठी केलं आहे की त्याने उद्या आमचा प्राण जरी मागितला तरी आम्ही देऊ त्याला ,पण त्याला जे काही हवंय ते नाही देऊ शकत , ते तूच देऊ शकतेस.”
.” सिनेमा कितीही मनाला भावला तरी तो खोट्या पडद्यावर असतो, माझ्या दृष्टीने हे पाप आहे . राहता राहिल्या यु डी बद्दलच्या माझ्या भावना , तर त्या माझ्यापाशीच राहू दे , सुदैवाने मन मारायची मला सवय आहे ,प्लीज मला कसलीही गळ घालू नकोस , !.. “
मी उठून निघाले आणि घरी आले .घरी आले तरी मन:स्थिती खूप उदास होती ,यु डी ला फोन करावा असं वारंवार मनात येत होतं , ते मी निग्रहाने परतून लावलं , ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्या गावाच्या नावाची पाटी तरी कशाला बघा ? पुन्हा नवीन नोकरी शोधायची आणि जुनं आयुष्य सुरू करायचं मी ठरवलं , पण , मला वाटलं तितकं ते सोपं नव्हतं . नवीन नोकरी शोधायला मी सुरूवात केली पण लवकर मिळेना , असाच अख्खा महिना गेला , एवढी चांगली नोकरी हिने का सोडली या वरून सर्वांची मतमतांतरे सुरू झाली , मानस चे आणि माझे वाद -विवाद तर कायमचेच होते .अशातच माझा वाढिदवस आला . तेरा सप्टेंबर !.. , लग्न झाल्यानंतर दरवर्षी तो आला आणि गेला , मानस चा मूड असेल तर आम्ही दोघे एखाद्या वेळेस बाहेर जेवायला जायचो , एरवी साधं विश करायचे कष्ट कुणी घेत नसत , आजही त्यात काही बदल नव्हता . सकाळी बहिणींचे , आई बाबांचे असे दोन-तीन फोन येऊन गेले , त्यावरून सासूबाईना कळलं होतं पण नेहेमीसारखा त्यांनी कानाडोळा करण्यात समाधान मानलं. आज रविवार होता ,सुटीच्या दिवशी जाऊबाईंचा हक्काचा विश्रांतीचा वार त्यामुळे त्या अंघोळ करून झाली की नंतर थेट दुपारी जेवायच्या वेळेसच खोलीच्या बाहेर येत. रविवारी बहुतेक आमच्याकडे वरण फळं केली जात . मी स्वयंपाक आटोपून , मानस ला वाढून , बाहेरच्या हॉलमध्ये निशी ला वरण भात भरवत होते .तितक्यात मानस ने मला जोरात हाक मारली ,त्याचा चिडलेला स्वर ऐकून निशीला भरवायला घेतलेला घास हातातच घेऊन मी पळत आत गेले , वरण फळाच्या भांड्यावरचं झाकण उघडून तो उभा होता , काय झालं रे ? मी विचारलं , तसं तो एकदम बरसला , “उल्का तुला माहिती नाही आपण घरात किती लोकं आहोत ? “
“म्हणजे ? “
“केवढीशी केलीयेत वरणफळं , अजून सगळे जेवायचेत , अक्कल नाहीये का ? लक्ष कुठे असतं तुझं ?“
“चांगली मोठं पातेलंभर आहेत , नेहेमी सारखीच , पुरतील व्यवस्थित , तु तुझं जेव , मी बघते कुणाला पुरतंय की नाही ते “ मी ही रागाने धुमसत म्हणाले .
तेव्हढ्यात सासूबाई आल्याचं , त्यांनीही पाहिलं , कधी नव्हे ते बाजू घेऊन त्याही म्हणाल्या “अरे पुरतील की एवढं काय पण , नाही अंदाज येत कधी कधी . कमी पडली तर बघू, भात आहे ,मेतकूट आहे , पापड , कोशिंबीर,लोणचं , बाकीच्या गोष्टी आहेतच “
पण मानस चा राग शांत झाला नाही , त्याने त्यावरून खूप तणतण केली . मग मी ही चिडले , मी म्हटलं जोवर सगळ्यांची जेवणं होत नाहीत मी जेवणार नाही ,मग तर पुरतील ? त्यावर कोणीच काही म्हटलं नाही . मात्र सगळ्यांनी जेऊन घेतलं, ती वरणफळं सगळ्यांनी खाऊनही नंतर भरपूर उरली होती . दुपारी मोलकरणीला सासूबाईंनी आग्रह करू खाऊ घातली , पण मला मात्र एकदाही जेव म्हणाल्या नाहीत .
त्याच काय कुणीही म्हटलं नाही. तो संबंध दिवस मी उपाशी राहिले , भांडण झालं हे कारण मानस ला पुरल्यामुळे त्याने नेहेमीसारखा अबोला धरला. मीही पोटभर रडून घेतलं .वाढदिवसाचं माझ्यासकट कोणालाच सोयर -सुतक नव्हतं , त्या रात्री उशिरा कामं आटोपल्यानंतर नोकरीसाठी काही जाहिराती आहेत का हे बघायला ,मी ‘सकाळ ‘ उघडला , आणि एकदम एका बातमीवर नजर गेली ,‘यशोदीप गर्ग “ ‘या गज़ल गायकाचा आज स्टेज शो होता , स्पॉन्सर केला होता ,’ उदयन सहस्त्रबुद्धे ‘यांनी . मी निस्तब्ध झाले !..
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आठवली , यु डी आम्हा सर्वांना घेऊन लोणी जवळच्या एका रिसॉर्टला गेला होता , तिथे या गायकाचा म्हणजे ‘यशोदीप ‘चा गजल्स चा कार्यक्रम होता , काही जुन्या गजल गायकांच्या अप्रतिम रचना तेव्हा त्याने अतिशय तयारीने सादर केल्या होत्या .प्रोग्राम संपला आणि गाडीतून येताना आम्ही सगळे त्यावर चर्चा करत होतो त्यावेळी बोलताना मी म्हणाले की या अशा गुणी गायकाला स्टेज वर परफॉर्म करायची संधी कुणी तरी दिली पाहिजे . ते एक वाक्य लक्षात ठेऊन , माझ्या वाढिदवसाचं औचित्य साधून ,यु डी . ने ‘यशोदीप ‘ चा बालगंधर्व ला ‘शो’ ठेवला होता. एक अख्खा प्रोग्रॅम त्याने स्पॉन्सर केला होता . कोणासाठी तर ज्याच्या आर्जवांना भीक न घालता निघून गेलेल्या माझ्यासारख्या समाजाला घाबरणाऱ्या एका स्वार्थी स्त्री साठी !.
दर वेळेला यु डी मला असाच भेटत असे , माझ्या मनावर घरच्यांनी मारलेल्या जखमांवर धन्वतरींसारखा मलमपट्टी घेऊन .. काय देणं -घेणं होतं त्याचं माझं ? समोरचा पेपर धूसर दिसू लागला, भरलेले डोळे टपटप करत त्या पानावर पडत राहिले …. आणि मी to be not to be .. च्या भोवऱ्यात पुन्हा गरगरत राहिले.
मस्त चाललीये कथा, आता नायिका
मस्त चाललीये कथा, आता नायिका काय निर्णय घेतेय त्याची उत्सुकता ...
छान सुरू आहे. थोडे मोठे भाग
छान सुरू आहे. थोडे मोठे भाग हवे होते
हा पण भाग छान आहे.
हा पण भाग छान आहे.
उल्का च्या आयुष्याला पुढे कस वळण लागलं ह्याची उत्सुकता आहे
पण हा यु. डी. नेमका काय आहे? सखाराम बाईंडर चा नवीन अवतार तर नाही ना?
मस्त चाललीये कथा!!
मस्त चाललीये कथा!!
छान चाललीये कथा !
छान चाललीये कथा !
चांगली चालू आहे कथा!
चांगली चालू आहे कथा!
अनघा , चैत्रगंधा , manya,
अनघा , चैत्रगंधा , manya, TI , आबा आणि वावे मनापासून आभार !..
manya : यु डी हे पात्र सखाराम बाईंडर सारखे नाही , ते आल्यामुळेच उल्का च्या आयुष्याला एका वेगळ्या पद्धतीचे वळण लागले हे कथेत दाखवायचे आहे .
छान सुरु आहे कथा!
छान सुरु आहे कथा!