Fakemytrip by Mukund
म्हणजे (काही खरे काही खोटे)
वाट..की रस्ता
अगदी असाच वैताग आला होता मला..तुमच्यासारखाच. घरातून बाहेर पडलं की जो रस्ता आहे त्याच्या डावीकडे गेलो की पुढे एका देवळाजवळ तो संपतो.उजवीकडे गेलो तर स्टेशनकडे किंवा हायवेकडे असे पर्याय आहेत पण येऊन जाऊन कसेही जा..परत घराकडे याल. पुणे, नाशिक, सिल्वासा...त्याच दिशा..तेच रस्ते.. तीच वळणे.पार कंटाळा आला होता त्याच त्याच रस्त्याने पुन्हा पुन्हा जाऊन.अगदी चक्रात अडकल्यासारखे झाले होते.
असाच बाहेर पडलो आणि चक्क लोकलने माथेरान गाठले...आणि हा रस्ता "वाटेत" भेटला.
निवांत बसलोय त्याच्याकाठी.मला नवा आहे पण त्याचा मला कुठे पोहोचवण्याचा आग्रह देखील जाणवत नाहीय.बस तो आहे आणि मी आहे.
नेमका काय फरक आहे.. वाट कधी म्हणायचं आणि रस्ता कधी म्हणायचं? प्रथम भेटतो तेव्हा अनोळखी रस्ता असतो.आपण त्यावरून रोज ये जा करू लागतो आणि त्याची "वाट" होते.आणि सतत एकाच वाटेवरून चालताना एक दिवस प्रचंड कंटाळा येतो आणि पावले नव्या रस्त्याच्या शोधात निघतात.जेव्हा तो सापडतो तेव्हा त्याच्या गंतव्य स्थानाबद्दलची अनभिज्ञता,कुतूहल मनाला आनंद देते...
नाही.. मी इतक्यात उठणार नाहीय. अजून काही काळ तरी मी त्याची "वाट" करणार नाही.अज्ञात दिशेला नेणारा हा रस्ता मनाच्या मातीत रमला आहे..राहूदे असाच.
आपल्या मनात उमटणाऱ्या विचारांचे देखील असेच आहे बहुतेक.चाकोरीत अडकायला लागले की आपण कंटाळतो आणि मग नव्याने शोधू लागतो नवा विचार...नवी कृती.
येताय का सोबत.. वाट सोडून रस्ते शोधायला?
मुकुंद इंगळे
सगळ्यांना बोलवू नका. मग रस्ते
सगळ्यांना बोलवू नका. मग रस्ते शोधण्याची वहीवाट सुरू होईल अन सगळ्या वाटाच उरतील
फोटो छान आहे, रस्ता खुणावतोय. असे रस्ते रोज नव्या ठिकाणी नेणारे असते तर!!
वाह खूपच सुंदर लिहिलं आहेत!
वाह खूपच सुंदर लिहिलं आहेत!
लेख सुंदर. अनेक संदर्भ आठवले
लेख सुंदर. अनेक संदर्भ आठवले.
' ही वाट दूर जाते..' किंवा, ' गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट, वळणावर आंब्याचे झाड वाकडे ' किंवा, ' पाऊले चालती पंढरीची वाट '..
वाट हा शब्द पथ वरून आला असावा. ( पथ आणि पाथ, किती साम्य!) रस्ता, मार्ग, पथ ह्यापेक्षा वाट ही आपलीशी वाटणारी, ज्ञातापासून अज्ञाताकडे नेणारी, कधी धूसर, कधी दवाने ओलसर , कधी बिकट, कधी खडतर. तिच्याकडे डोळे लावून बसायला लावणारी.
रस्ता हा हिंदीत राह बनून येतो तेव्हा खूप आपलासा वाटतो. 'राह बनी खुद मंझिल..'
एक संस्कृत श्लोक आठवतोय, पण नंतर कधीतरी.