"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणीच्या अजून काही समजुती (ज्या कदाचित कॉमन असाव्यात)

१. दुकानदाराचा स्वतःचा कारखाना असतो दुकानातल्या सर्व वस्तू बनवण्याचा

२. एसटीचा ड्रायव्हर म्हणजे सगळ्यात नशीबवान. कारण फुकट गावं फिरायला मिळतात Lol

३. कंडक्टरची मात्र दया यायची. खच्चून भरलेल्या गाडीत बिचाऱ्याला गर्दीतून तिकीट काढत फिरताना प्रवासाचा आनंद घेता यायचा नाही. शिवाय एखाद्या गावचे तिकीट जसजसे ते गाव जवळ येईल तसतसे कमी कमी होत जाते. हे सगळे तो कसे लक्षात ठेवत असेल असे वाटायचे.

शिवाय एखाद्या गावचे तिकीट जसजसे ते गाव जवळ येईल तसतसे कमी कमी होत जाते. हे सगळे तो कसे लक्षात ठेवत असेल असे वाटायचे.
>>>>> Lol

किल्ल्यांचा जुडगा Lol

मला वाटायचं मुरमुरे वाला 'मुरमुरे, मुरमुरे' का ओरडत फिरत असतो. तर आईने सांगितले की मुरमुरे विकून तो त्या पैशातून डाळ- तांदूळ आणून खातो. मला वाटायचं दिवसभर वणवण करण्यापेक्षा सरळ मुरमुरेचं का खात नाही. कारण काय तर पोहे किंवा मुरमुरे खात चिं. वि.जोशींची पुस्तकं वाचणं ही माझी निर्वाणाची व्याख्या होती. मगं मुSरमुरेSSS आरोळी ऐकू आली की मी घरातून 'तूssssच खा' ही आरोळी देणे बंद केले. Proud

नोकरीसाठी interviewला जाताना सगळी certificates घेऊन जायची असतात आणि तिथे general knowledge चे प्रश्न विचारतात , म्हणून interview ला जाताना त्या दिवसाचं वर्तमान पत्र वाचून जाणं आवश्यक असतं.
आई बाबांनी माझी अगदी सिनीयर केजी पासूनची certificates आणि प्रगतीपुस्तके कौतुकाने जमा करून ठेवली होती , मला वाटायचं ही माझ्या नोकरीची तयारी आहे.

मला Nobel laureate हा शब्दप्रयोग कॉलेजला जाईपर्यंत माहित नव्हता. एकदा मित्रांच्यात गप्पा सुरु असताना कुणीतरी तो शब्द वापरला तेंव्हा मी विचारले. "कोण आहे हा?" मला वाटले होते Laureate आडनावाचा कोणी मनुष्य असेल Proud

किल्यांचा जुडगा... हहपुवा...!!!

एखाद्याला मरणोत्तर काहीतरी पदवी किंवा मेडल मिळते. त्याला इंग्रजीत posthumously awarded असे म्हणतात. लहानपणी म्हणजे चांगलेच ८-९वीत असताना कोठेतरी वाचले की "xyz was posthumously awarded ". मला काही दिवस त्या व्यक्तीला posthumously नावाचे अवार्ड मिळाले असे वाटत होते. posthumously म्हणजे मरणोत्तर हे माहीत नव्हते.

मला Nobel laureate हा शब्दप्रयोग कॉलेजला जाईपर्यंत माहित नव्हता. एकदा मित्रांच्यात गप्पा सुरु असताना कुणीतरी तो शब्द वापरला तेंव्हा मी विचारले. "कोण आहे हा?" मला वाटले होते Laureate आडनावाचा कोणी मनुष्य असेल
हहपुवा... पण असे बर्‍याचदा होते. कॉलेजात असताना रॅगिंगच्या वेळी कोणीतरी एकाला तुला एलिझाबेथ टेलर माहित आहे का ते विचारले तर तो म्हणाला की आमच्या घरचे एलिझाबेथ टेलरकडे नाही, दुसर्‍या टेलरकडून कपडे शिवून घेतात.

एकेक कसले महान किस्से आहेत, हाहाहा.

एलिझाबेथ टेलर नाव वाचून मलाही लहानपणी कपडे शिवून देणारी असेल वाटलेलं, म टा ला चित्रपश्चिमा मध्ये इंग्रजी पिक्चर स्टोरी असायच्या आणि कंसात नाव असायचं कलाकाराचं, मी अगदी चौथीत वगैरे असेन तेव्हा.

भूतांचे पाय उलटे म्हणजे टाच पुढे आणि बोटे मागे हेच डोक्यात होते. >>> सेम.

हिमालय बर्फाचा हे अजूनही वाटतं, हाहाहा.

भूतांचे पाय उलटे म्हणजे टाच पुढे आणि बोटे मागे हेच डोक्यात होते>>

तसे नाही तर कशा प्रकारे उलटे असतात?
अंगठा बाहेरच्या बाजुला आणि लहान बोट आतल्या बाजूला?

<<एलिझाबेथ टेलर नाव वाचून मलाही लहानपणी कपडे शिवून देणारी असेल वाटलेलं>>>>
हा हा हा . आम्ही लहानपणी इंग्लिश नावांचे मराठीकरण करायचो. उदा. एलिझाबेथ शिंपी, टॉम जहाजे, संड्रा बैले, ब्रिटनी भाले, ब्रॅड खड्डे Lol

सगळ्यांच्या समजुती भारी आहेत Lol
मी लहान असताना आमच्याकडे टीव्हीच्या मुंबई केंद्राच्या सिग्नल्समधे पाकिस्तान टीव्हीचे सिग्नल्स घुसायचे आणि टीव्हीवर आडवे पट्टे यायला लागायचे. तेव्हा घरातले म्हणायचे की पाकिस्तान घुसलं. मला वाटायचं की पाकिस्तान म्हणजे आडव्या रेषा. मी एकदा कुठल्यातरी चित्रातल्या आडव्या रेषांना 'पाकिस्तान' म्हटलं तेव्हा घरच्या मंडळींना हसायला आलं आणि माझ्या लक्षात आलं होतं की आपलं काही तरी चुकलं Lol

किल्ल्यांचा जुडगा किस्सा वाचून आठवले. हे मी एकदा गप्पांच्या धाग्यावर लिहून गेलो होतो बहुतेक.
"सोसाट्याचा वारा" म्हणजे नक्की काय कळायचे नाही. गावात एक विविध कार्यकारी सहकारी "सोसायटी" होती. त्या दोन शब्दांत भारीच गोंधळ झाला होता. "सोसाट्याचा वारा" म्हणजे "सोसायटी" कडून येणारा वारा असा समज झाला होता.

बर्याच मोठ्या इमारतींच्या वर ऑटीस किन्वा ओलिम्पस ह्या लिफ्ट्स च्या कम्पनि ने फक्त "ऑटीस", "ओलिम्पस",एवढे च इन्ग्रजी मध्ये लिहिलेली पाटी दिसली की मला लहानपणी वाटायचे की हे जो कोणी ऑटीस किन्वा ओलिम्पस नावाचे इसम आहेत ते फारच श्रीमन्त आहेत. कैक उंच इमारतींमध्ये ह्या दोन बावाजींची घरे असतात. Happy

भूतांचे पाय उलटे म्हणजे टाच पुढे आणि बोटे मागे हेच डोक्यात होते. >>>
मग उलटे म्हणचे नक्की कसे?मी तर अजूनही असेच उलटे समजते

अतुल आणि मानव, महान आहात!

सहज जाता जाता सांगायचं तर, गणिततज्ज्ञ किंवा गणितज्ञ - ह्यापैकी एक वापरा. गणितज्ञ = गणित+ज्ञ = गणित जाणणारा. तज्ज्ञ =तत्+ज्ञ = (शब्दशः सांगायचं तर) ते जाणणारा. तज्ञ असा शब्द नाही. (या धाग्यावर असा आगाऊपणा केल्याबद्दल माफी असावी)

लहानपणी Goods Carrier वाचलं की

Good म्हणजे चांगला

आणि Goods म्हणजे खुपचं चांगला असं वाटायचं

बहुतेक त्यातले अणु-रेणु उलटे असावेत. इलेक्ट्रॉन्स आत आणि प्रोटॉन्स बाहेर घिरट्या घालताहेत. अँटीमॅटर!

भूतांचे पाय उलटे म्हणजे टाच पुढे आणि बोटे मागे हेच डोक्यात होते>>> तसेच आहे ते.

मांस बाहेर काय Lol कायच्या काय चालुये इथे

Pages