अज्ञातवासी - S02E07 - नाशिक!

Submitted by अज्ञातवासी on 31 December, 2022 - 11:16

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/82829

मध्यरात्री मोक्ष वाड्यावर आला.
वाड्यातील दिवे जळत होते, मध्यभागी खुर्ची ठेवलेली होती.
मोक्ष खुर्चीजवळ आला.
त्याने खुर्चीवर हात फिरवला.
गुळगुळीत अस्सल सागवान.
साधीशी...
अण्णा या खुर्चीवर बसले. बाबा बसले. आता मी बसेन.
तो मागे वळला, आणि निवांत खुर्चीवर बसला.
त्याच्या हृदयाची धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती.
हाताच्या मुठी आता सैल झाल्या होत्या.
त्याने उजव्या पायावर डावा पाय ठेवला, दोन्हीही हात खुर्चीच्या मुठीवर ठेवले.
आणि वाड्याकडे चौफेर नजर टाकली.
"आरंभम!!!!"
तो स्वतःशीच म्हणाला.
*****
सकाळी साडेपाचलाच काकू उठल्या व बाहेर आल्या.
दादासाहेबांच्या खोलीतला दिवा जळत होता.
त्या खोलीकडे निघाल्या.
खोलीचं दार उघडच होतं.
टेबलावर एक डायरी होती, त्यात मोक्ष काहीतरी लिहीत बसला होता.
"आल्या आल्या कामालाही सुरुवात दादा?" काकू म्हणाल्या.
"अरे काकू या ना. झोप लागत नव्हती, मग लिहीत बसलो."
"काय लिहितोय?"
"शेलारांचे उद्योगधंदे, कुठे काय प्रॉपर्टी, गुंतवणूक, उत्पन्न आणि खर्च, बरंच काही. आता तर फक्त अंदाज करून लिहितोय,बघू पुढे."
"आयुष्यभर जरी ताळेबंद मांडत बसलास, तरीही तुला सगळा हिशेब लागणार नाही. आपण शेलार आहोत, कायदा, वह्या, पुस्तकं, हे सगळं कधीच आपण बासनात बांधून ठेवलंय."
"काकू मग हिशेब कसा लावायचा? काहीही माहीत नाही मला."
"कारण तुला कधी या खुर्चीसाठी तयार केलंच नव्हतं.दादासाहेबांच्या मनात तर कुणीतरी वेगळीच व्यक्ती होती."
"कोण?" मोक्षने विचारले.
"श्रेया..." काकू निर्विकारपणे म्हणाल्या.
"कोण, श्रेया? मग त्यादिवशी ती वाड्यात का आली नाही?'
"तूच जाऊन विचार, काही उत्तरे स्वतःच स्वतःची शोधायची असतात." काकू म्हणाल्या.
"ठीक आहे. काकू पण आता तुमच्या हातचा चहा द्या, डोकं दुखतय माझं."
"आणते." काकू हसल्या, आणि तिथून निघून गेल्या.
मोक्ष पुन्हा विचारात गढला. बऱ्याच विचारांती त्याने डायरी मिटली, व तो अंघोळीला गेला.
गरम पाण्याचा शॉवर चालू होता. त्याचं विचारचक्र थांबत नव्हतं.
बाहेर येऊन त्याने केस नीट कोरडे केले, तुळतुळीत दाढी केली, वाढलेल्या मिशाही काढून टाकल्या.
'केस कापायला हवेत,' तो स्वतःशीच म्हणाला.
"चहा आणलाय रे." काकू आत येत म्हणाल्या.
"परफेक्ट." त्याने कप हातात घेतला.
"काकू..." बाहेरून हाक आली.
"कोण... पिंकी?" काकूंनी विचारले.
"हो..."
"पिंकी? बाहेर का उभी आहेस. आत ये." मोक्ष म्हणाला.
"नाही, मला ना फक्त काकूंशी थोडं..."
"तू आधी आत ये." मोक्ष अधिकारवाणीने म्हणाला.
ती बुजतच आत आली.
"तुझ्या या दादाशी बोलायचं नाही असं ठरवलंय?"
ती काहीही बोलली नाही.
मोक्ष तिच्या जवळ आला.
"अग एक लक्षात घे. आणि आयुष्यभर लक्षात ठेव. भावाभावांमध्ये कितीही भांडणं असू दे, आम्ही एकमेकांचा जीवही घेऊ उद्या. चालेल ग...
...पण बहीण बहीण असते. कळलं? आणि मला तर सख्खी बहीण नाही. या घरात तर कुणी लहानही नाही. मग मी मस्ती कुणाबरोबर करणार? जीव कुणाला लावणार? मला राखी कोण बांधणार?" त्याच्या आवाजात हळूहळू ओलावा येऊ लागला.
"हे बघ पिंके, एक लक्षात ठेव. मी भलेही सगळ्या जगाला दम देत फिरेन, पण माझ्या बहिणीला साधं खरचटलं जरी ना, मी रक्ताचं पाणी करेन. कळलं? शेवटी आपला परिवार महत्वाचा... आणि तू तर सगळ्यात महत्वाची आहेस."
पिंकीच्या डोळ्यात पाणी होतं.
"यापुढे डोळ्यात पाणी फक्त लग्न करून सासरी जाशील तेव्हा यायला हवं. कळलं? चल तू बोल काकूशी, मी येतो." त्याने चहाचा कप घेतला व तो बाहेर आला.
"घरात मीही लहान आहे म्हटलं." दीती शेजारीच उभी होती.
"मग या घरात तू रहायचं नाहीस. कळलं." मोक्षही शांतपणे म्हणाला.
"म्हणजे?"
"इंजिनीअरिंग पूर्ण कर, एमबीएसाठी जर्मनीला एडमिशन घे. तिथेच सेटल हो."
"मलाही हेच करायचंय." पिंकी बाहेर येत म्हणाली.
"आधी तू जा. मग दिती जाईन. आपण शेलारानी नाशिक जिंकलं, तुम्ही जग जिंका. कळलं? फक्त मोठ्या झाल्यावर भावाला विसरू नका."
"नाही विसरणार. डोन्ट वरी." दोघीजणी मानभावीपणे म्हणाल्या.
"धन्यवाद, धन्यवाद... चला आता नंतर बोलू, बरीच कामे आहेत. बाय." तो आत आला.
काकू अजूनही आत होत्या.
"काय म्हणत होती पिंकी?"
"काही नाही, ती एवढंच म्हणाली की आता काहीही म्हणायची गरज राहिली नाही." काकू म्हणाल्या.
मोक्ष हसला.
"चला निघतो." त्याने घड्याळ चढवलं आणि निघाला.
खाली अप्पा उभे होते.
"अप्पा, ते जोशी का कोण त्यांना उद्या बोलवा, आणि संग्रामलाही सांगा. काय आहे, दादासाहेब गेल्यानंतर हिशेब नावाची गोष्टच उरली नाहीये. तो आणि मी मिळून समजून घेऊ. काय?" पटापट सूचना देऊन तो निघूनही गेला.
अप्पा दातओठ खात त्याच्याकडे बघत राहिले.
भरधाव वेगाने गाडी फिनिक्सकडे निघाली.
गाडी गेटमधून आत घेताना सिक्युरिटीने त्याला बघितलं, आणि घाबरून सलाम ठोकला. मोक्षने गाडी पुढे नेली.
...थोडा पुढे जाऊन तो थांबला, आणि काहीतरी आठवून त्याने गाडी मागे घेतली.
"थांबवलं का नाही?" त्याने प्रश्न.
"क्या?" सिक्युरिटीने घाबरून विचारले.
"मला थांबवलं का नाही?" मोक्षने पुन्हा विचारले.
सिक्युरिटी खुळ्यागत त्याच्याकडे बघतच राहिला.
"ऐक रे, माझी आत्या इथे राहते. कळलं? इथली सिक्युरिटी पूर्ण सुरक्षित पाहिजे. असं पुन्हा कुणालाही आत सोडशील ना, एक दिवस मीच येऊन तुला गोळ्या घालेन."
"हो..." त्याच्या कंठातून शब्द फुटत नव्हता.
"फोन लाव. सांग की मोक्ष शेलार आले आहेत. पाठवू का वर?"
त्याने गडबडीने फोन लावला.
"मॅडम मोक्ष शेलार आले आहेत, नाही वर नाही हो, इथेच गेटवर आहेत. त्यांना पाठवू का तुमच्याकडे? ठीक आहे." त्याने फोन ठेवला.
"साहेब, हो म्हणाल्या त्या."
"गुड." मोक्षने गाडी पुढे नेली.
सिक्युरिटीने निःश्वास सोडला.
पुन्हा गाडी परत आली.
"आता काय..." त्याने कपाळावर हात मारला.
"हाऊ डू यू नो दॅट आय एम समवन होम आय एम क्लेमड टू बी?" मोक्ष मानभावीपणे म्हणाला.
"साहेब, समजेल असं बोला हो." आता सिक्युरिटीने सपशेल शरणागती पत्करली.
"मी मोक्ष शेलारच आहे, हे तुला कसं माहिती?"
सिक्युरिटी वैतागला.
"तुम्हीच सांगा मग, काय करू आता मी?"
"आयडी विचार माझा."
"आयडी द्या."
"नाहीये... सॉरी..."
"मग मी तुम्हाला सोडू शकणार नाही."
"असं?" मोक्ष त्याच्याकडे बघत म्हणाला.
"साहेब जा ना वर, काय गरीबाची चेष्टा लावलीय."
"फोन कर मॅडमला, सांग की त्यांच्याकडे आयडी नाहीये, तुम्ही प्लीज सिक्युरिटी कॅमेरात बघून चेक करा."
त्याने फोन लावला, व कॅमेरात बघायला लावले.
"साहेब, कन्फर्म केलंय त्यांनी, जा आता. त्याने हात जोडले."
"नाइस." मोक्षने गाडी पुढे घेतली व पार्किंगमध्ये लावून तो लिफ्टमध्ये शिरला. वर जाऊन त्याने फ्लॅटची बेल दाबली.
श्रेयाने दार उघडलं.
"खाली काय गोंधळ चालू होता?" ती हसून म्हणाली.
"सिक्युरिटी मॅडम, सिक्युरिटी. खूप लूपहोल्स शोधले आज मी."
"ते लूपहोल्स फक्त तुझ्यासाठी होते मोक्ष, नाहीतर फीनिक्समध्ये विनापरवानगी पोलिसांनादेखील प्रवेश नाही."
"नाइस. माझी चिंता मिटली." मोक्ष म्हणाला.
तिने भुवया आकसल्या.
"सॉरी."
"फाईन. इतक्या सकाळी का आला आहेस?"
"ओके, मुद्यावर येतो. काल रात्रीपासून मी शेलारांचा ताळेबंद चेक करतोय, पण कशाचीही कशाची संगती लागत नाहीये. शेवटी काकूंनी सुचवलं, की मी तुला भेटावं. आफ्टर ऑल..."
तो बोलायचा थांबला.
"आफ्टर ऑल काय?"
"बाबांनी तुलाच खुर्चीसाठी निवडलं होतं." तो म्हणाला.
"अच्छा, यासाठी तू आला आहेस. चल तुला खरं तर कळलं."
"हो. मग तू त्यादिवशी वाड्यात का आली नाहीस?"
"असच, तुम्हा दोघांच्या भांडणात मी का पडू?"
"पण हा हक्क तुझा होता, आमच्या दोघांचाही नाही."
"पण मला नको होता. कळलं?"
मोक्ष गप्प बसला.
"जेव्हा मी अकरावीत गेले, तेव्हा दादासाहेबांनी मला इथे आणलं. तेव्हापासून डॉक्टरेट करेपर्यंत मी त्यांच्यासोबत होते."
"हो मला माहितीये ते. बाबा बोलायचे तुझ्याविषयी."
"मग हे नाही सांगितलं, की संग्राम नाही, तर खुर्चीसाठी त्यांनी मला निवडलं होतं?"
"नाही."
"कारण त्यांना कलह नको होता. वेळेवर घोषणा करणारच होते. पण त्याआधीच..."
श्रेया बोलायची थांबली.
मोक्षही थोडावेळ गप्प बसला.
"आत्या कुठे आहे?" त्याने विचारले.
धुळ्याला गेलीये. येईन उद्या परत.
मोक्ष गप्पच बसला.
"तुझ्याकडे डायरी आहे राईट?"
"हो."
"काढ आणि लिहायला सुरुवात कर."
श्रेयाने तिचा मोबाईल काढला, आणि टीव्हीवर कास्ट केला.
"आता पुढील अर्धा तास, फक्त मी बोलेन."
मोक्षने मान हलवली.
"आर्थिकदृष्ट्या म्हणशील, तर देशात नाही, पण महाराष्ट्रात तरी शेलार परिवार पहिल्या दहामध्ये असेल. आता हे कशावरून, ते नीट लक्षात घे.
नाशिक जिल्ह्यात कमीत कमी दीडशे पेट्रोल पंप आहेत, तिथला सरासरी नफा प्रत्येकी तीन ते पाच हजार दिवसाला. हो, हे सगळे पंप आपलेच आहेत, समशेर सिंग वेगवेगळ्या नावाने चालवतो. दर महिन्याला एक पेट्रोल पंप सरासरी दीड लाख तरी निव्वळ नफा काढतो. निव्वळ वार्षिक नफा... दोनशे पंचवीस कोटी!" श्रेया म्हणाली.
"भारतात सोन्याची खाण केजीएफ मध्ये आहे, पण खरी सोन्याची खाण आहे... हे पेट्रोलपंप..." मोक्ष न राहवून म्हणाला.
"नाही." श्रेया शांतपणे म्हणाली.
"मग?" मोक्ष आश्चर्यचकित झाला.
"म्हणून मी सांगत होते. मध्ये बोलू नकोस. द वाईन कॅपिटल माहितीये?"
"डिसुझाची वायनरी?"
"शेलारांची वायनरी. डिसुझा तिचा सगळा कारभार बघतो. तिचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे आठ हजार कोटी."
"आठ हजार?"
"येस. आणि निव्वळ वार्षिक नफा सहाशे कोटी. सर्व सेटलमेंट जाऊन चारशे कोटी."
"अच्छा ही खरी खाण म्हणतेय तू..."
"पुन्हा नाही..."
"अग मग अजून उरलंय तरी काय???"
"नाशिक जिल्ह्यात लहान मोठ्या कमीत कमी सहा हजार कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीत पांडेची माणसे आहेत. सरासरी वार्षिक खंडणी म्हण, किंवा गूडविल म्हण, एक लाख रुपये पर कंपनी. सहाशे कोटी..."
"अजून काही उरलंय?" त्याने डोक्याला हात लावला.
"हो." ती शांतपणे म्हणाली.
"सिरीयसली?" त्याने आश्चर्याने विचारले.
तिने एक दीर्घ श्वास घेतला, आणि बोलायला सुरुवात केली.
"शेलारांचा सगळ्यात मोठा बिजनेस म्हणजे शेलार फायरवर्क्स. शेखावत सांभाळतो. लोकांना असं वाटतं, इथे फटाके बनतात, पण मागच्या वर्षी कमीत कमी सहाशे टन स्टील आणि स्टील अलोय आपण चीन, आफ्रिका आणि नायजेरियातून इम्पोर्ट केले होते, कुठल्याही कागदपत्राविना..."
"कसं शक्य आहे?" मोक्षच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"जिथे देवराज जाधव आहे, तिथे जगातली कुठलीही वस्तू कुठूनही आपल्याकडे येऊ शकते, आणि आपल्याकडून कुठेही जाऊ शकते. आता एक एके ४७ चं वजन साडेतीन किलो असतं, तर पाचशे टनमध्ये किती रायफली तयार होतील?"
"एक लाख चाळीस हजार." मोक्ष उत्तरला.
"स्क्रॅप पकडून बारा हजार. फक्त एक रायफल पंचवीस हजारात विकली जाते, आणि आपण ती बनवतो दहा हजारात. पंधरा हजार निव्वळ नफा."
"आणि पूर्ण नफा..?" मोक्ष म्हणताच...
"सरासरी अठराशे कोटी रुपये, प्रत्येक वर्षी... श्रेया म्हणाली. फक्त बुलेट्समधून नफा, दोनशे कोटी..."
मोक्ष डोळे विस्फारून बघतच राहिला.
"यात दोनशे कोटी फक्त आणि फक्त हे सगळं निर्धोक पार पाडण्यासाठी राखीव असतात. उरले किती?" श्रेयाने प्रश्न विचारला.
"एक हजार आठशे कोटी..." मोक्ष अक्षरशः अचंबित होऊन म्हणाला.
"येस. संपूर्ण फॅक्ट्रीची किंमत लावायची झाली, तर दहा हजार कोटी. कमीत कमी."
मोक्ष थोडावेळ शांत राहिला...
"म्हणजे, आपलं केजीएफ शेलार फायरवर्क्स आहे तर... "
"नाही मोक्ष."
आता तिचा स्वर बदलला होता.
ती सोफ्यावर बसली. पायांवर पाय ठेवून त्यांची घडी घातली,
आता तिच्या आवाजात एक वेगळीच जरब आली होती...
मोक्ष जीवाचे कान करून तिचं बोलणं ऐकण्यासाठी आतुर झाला होता.
"आपलं केजीएफ आहे... हे संपूर्ण नाशिक...."

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभ्यास बराच केलाय या कादंबरीसाठी..
बराच मोठा खंड पडला तरी पुन्हा हे लिखाण सुरू केल्याबद्दल धन्यवाद...

@धनवंती- धन्यवाद... एवढा अभ्यास परीक्षेत केला असता, तर आज आय ए एस नक्की राहिलो असतो Lol
खंड तर पडला आहेच, पण आता संपूर्ण प्लॉट डोक्यात आहे, आणि लिहायचाही मूड आहे, त्यामुळे आता पटापट लिहीनच.
आपण इतकं आवर्जून वाचताय, आणि प्रतिसाद देताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
पुढील भाग, पुढील वर्षी. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

खूपच छान, उत्कंठा वाढतेय, प्रत्येक भागागणिक!
खूप शुभेच्छा.. पुढील भागांसाठी! नव्या लेखनासाठी!
नवीन वर्षासाठी!

@गौरी - धन्यवाद. माझीही उत्सुकता वाढते आहेच. नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!
@आबा - धन्यवाद! नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा
@sharadg - धन्यवाद! हो कादंबरी छापण्याचा मानस आहेच. नक्की कळवेन...