अज्ञातवासी S02E06 - चाल!

Submitted by अज्ञातवासी on 29 December, 2022 - 20:26

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/82822

अंधारी रात्र!
जळणारी खुर्ची!
खुर्चीवर दादासाहेब बसले होते...
समोर मोक्ष मागे हात बांधून उभा होता.
"काय मिळवलंस?" गंभीर आवाजात दादासाहेबांनी प्रश्न केला.
"सर्वकाही..." मोक्षने उत्तर दिले.
"काय गमावलंस?" ते विषण्ण हसले.
"सर्वकाही..." मोक्षच्या आवाजात कंप होता.
"राज्य करा महाराजा." अचानक मागून पिंगळा ओरडला.
... मोक्ष तंद्रीतून जागा झाला.
बाहेर ढोल - ताशे वाजत होते.
"दादा, चल, किती वेळ इथे बसणार?" शुभम आत येत म्हणाला.
"अरे तू कधी आलास?" मोक्ष आश्चर्यचकित झाला.
"परवाच. चल..."
मोक्ष बाहेर निघाला.
बाहेर तुफान गर्दी जमलेली होती...
दादासाहेबानंतर कोण या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं होतं.
'अरे एकच वादा, मोक्षदादा.' कुणीतरी घोषणा दिली.
मोक्षला हसू आलं.
"अभिनंदन दादा," शेखावत मोक्षकडे येत म्हणाला.
"अभिनंदन तुमचं, काका..." मोक्ष म्हणाला.
"या काकाची जाण ठेवा दादा, कधीही अंतर पडू देऊ नका."
"कधीही नाही." मोक्ष प्रसन्नपणे हसला.
"दादा, चला बसा खुर्चीवर." पांडे मोक्षकडे येत म्हणाला.
"हो आलोच." मोक्ष म्हणाला.
अचानक त्याचं विचारचक्र चालू झालं.
'शरा कुठे असेल, काय करत असेल?
किती पुढे आलो आपण, शरा?
आज ती हवी होती, सोबत.
...ती निष्पाप होती, निरागस...
आणि मी आता राक्षस झालोय.
आता शरा नाही. जुना मोक्ष मेलाय.
माझी गन कुठे आहे? उझी, एके ५६, कुठे आहे.
झोया... माझी गन कुठे आहे?'
तो अचानक तंद्रीतून बाहेर आला आणि त्याने खिसे चपापले.
"शेखावतसा," त्याने हाक मारली.
बोला.
मला एक गन हवीय, लोडेड, लगेच.
शेखावत चक्रावला.
"काय झालं दादा."
"काही नाही. गन द्या." मोक्ष म्हणाला.
"अरविंद, तुझी गन दे." शेखावतने एकाची गन घेतली.
मोक्षने ती गन घेऊन पँटमध्ये खोसली तेव्हा त्याच्या जीवात जीव आला.
"व्यसन लागतं बंदुकीचं, मोक्षसाहेब."
"मला ती चालवायचं व्यसन लागलंय शेखावतसा." मोक्ष म्हणाला.
समोर अस्मिता आणि काकू उभ्या होत्या. मोक्ष त्यांच्याकडे गेला, आणि खाली वाकला.
"आशीर्वाद द्या."
"ऑलरेडी दिलाय." अस्मिता म्हणाल्या
"मग आता वचन द्या."
"कसलं वचन?"
"या खुर्चीवर तुम्ही आधी बसणार, मग मी." मोक्ष म्हणाला.
"कधीही इमोशनल होऊ नकोस मोक्षा, कधीही नाही. ही खुर्ची तुझी आहे. तुझीच राहील असं वाग. ही खुर्ची माझी कधीही नव्हती. होता फक्त राग. आणि तोही संपला."
मोक्ष हसला.
"आणि जुनं सगळं विसरून जा, असं समज की जुना डाव तू जिंकलास. आता नवीन डाव मांड. दादाने माणसं जोडली, त्यांना सोबत घेतलं आणि त्यांच्या बळावर राज्य केलं. तूही तसाच हो."
"नक्की."
"आयुष्मान भव." अस्मिता समाधानाने हसल्या.
"यशस्वी हो बाळा." काकू म्हणाल्या.
"सत्यभामा, आजपासून हा तुझ्या ताब्यात. तूच याची आई, आणि बापही. कळलं?"
"ती तर मी आधीपासूनच आहे."काकू हसल्या.
"चला, मी निघतो आता. एक अधुरं काम पूर्ण करायचं आहे." तो म्हणाला.
"अरे पण आधी खुर्चीवर तर बस."
"नंतर. माझी माणसं माझी वाट बघतायेत." तो घाईत निघाला
*****
खानसाहेबांकडे आक्रोश सुरू होता. एका रात्रीत अक्षरशः त्यांचे निम्मे लोक संपले होते.
आक्रोश थांबत नव्हता. खानसाहेब सुन्न बसून होते.
"किसके लिये खान?" एका म्हाताऱ्याने त्यांना विचारले.
खानसाहेब काहीही बोलले नाही.
हळूहळू एक एक जनाजा निघत होता.
त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी बघितलं...
एका प्रेताला मोक्ष खांदा देत होता.
त्यांनी डोळे पुसले...
"आपको अभी कुर्सी पर होना चाहिए." ते ओरडले.
"माझा परिवार सोडून मी या खुर्चीवर बसू? शक्य नाही खानसाहेब."
खानसाहेब असहायपणे त्याच्याकडे बघत राहिले.
"इथला प्रत्येक माणूस माझा परिवार आहे. आणि आज मीसुद्धा खूप काही गमावलंय. पण लक्षात ठेवा, इथे आयुष्यभर कुणालाही काहीही कमी पडणार नाही, हे मोक्ष शेलारच वचन आहे."
"इसके लिये चाचा," खानसाहेब त्या माणसाकडे वळून म्हणाले.
"नेक है, पाक है, दिल का साफ है, खुदा का बंदा लगता है." म्हातारा म्हणाला.
"दादासाहेब का बेटा है, वैसाही होगा." खानसाहेब म्हणाले.
*****
"अप्पा, घात झालाय माझा."
"मग? काय करावं या अप्पाने?"
"माझ्याकडे शेकडो माणसे आहेत, खिमा करतील त्याचा." संग्राम म्हणाला.
"पन्नास लोक एका रात्रीत मारलीत त्याने, त्याचा केसही वाकडा झाला नाही."
"अप्पा.. अजूनही वेळ गेलेली नाही."
"मुस्काट फोडीन आता." अप्पा रागावले. "मूर्ख माणसा, अजूनही अक्कल आली नाही? तुझ्याकडे शेकड्याने लोक आहेत, पण त्याचाकडे फौज आहे. सगळं जुनं नाशिक त्याच्या बाजूने आहे, आणि सगळ्यात शेवटचं..."
अप्पा बोलता बोलता थांबले...
"...त्याचा बाप जरी दादा असला, तरी त्याची आई मुमताज होती..."
"अहो, गप्प बसा, काय बोलताय."
"आई बोलू दे त्यांना."
"तू गप्प बस. आणि घे माझी शपथ, थोडे दिवस शांत राहशील. घे माझी शपथ..."
संग्राम दातओठ खात बाहेर निघून गेला.
इकडे काकासाहेब आपल्या खोलीत निवांत बसले होते. शुभम आणि दिती मोबाईलमध्ये गर्क होते.
"अहो, खेळ कसा फिरला, मी खरच महादेवाला साकडं घातलं होतं." काकू खुशीतच आत आल्या.
"अगं, तू आत असायला हवी होतीस. माझी हिम्मत बघून खुश झाली असतीस." काका गर्वाने म्हणाले.
"सांगितलं ताईंनी मला. असंच कायम ठाम राहिले असता, तर आज कुठल्याकुठे पोहोचला असता." काकू म्हणाल्या.
"तुला माझं कौतुकच नाही."
"पुरे. पण दादा दुपारपासून घरी नाहीये." शुभम म्हणाला.
"त्याच्या दुसऱ्या घरी गेलाय तो. खूप वाईट झालं रे. किड्यासारखी माणसं मेलीत. पोरांनो, काहीही करा, पण या वाड्यात आता परत येऊ नका. मोक्ष आलाय, तुमच्या भविष्यासाठी जे काही करायचं ते सगळं तो करेल, पण तुम्ही वाड्यात यायचं नाही." काकू तळमळीने म्हणाल्या.
"आपण कुठे जायचं सत्यभामा?" काकांनी विचारले.
"आपण इथेच राहायचं, आणि इथेच मातीत मिसळायचं." काकू म्हणाल्या.
काका हसले.
*****
रात्री अकरा साडेअकरा झाले होते.
शेखावत त्याच्या बंगल्यासमोर बसला होता.
"डिसुझा, चूक केलीस."
"सोड रे शेखावत, माझ्याकडे प्लॅन बी रेडी होता."
"काय प्लॅन बी?"
"गफूरभाई शंभरची फौज घेऊन उद्याच येतोय मुंबईहून. साला, सगळा किस्साच संपवून टाकू. खानला सावरायला आता महिनाभर तरी लागेल. त्याची फौज निम्मी कमी झालीय. इकडे संग्रामचीही बरीच माणसे मारली गेलीत. संपवून टाकू सगळ्यांना."
शेखावत हसला.
"तू धोका का दिलास?" तो म्हणाला.
"कुणाला, मोक्षाला?" डिसुझा हसला.
"मला." शेखावतने त्याच्याकडे रोखून बघितले.
"अरे, दादासाहेब असताना एक ग्रॅम चरस मला नाशिकमध्ये विकता आलं नाही. विचार कर, संग्रामने खुल्ली ऑफर दिली होती, जितका माल विकायचा तेवढा विका. मी आड येणार नाही. त्याचं फक्त दहा टक्के कमिशन. नाशिकला मी भारताचं ड्रग कॅपिटल बनवलं असतं."
"...आणि त्याच्या आत संग्रामने तुझा खात्मा केला असता."
"त्याच्याही आधी मी त्याला संपवलं असतं. हे बघ शेखावत, अजूनही वेळ गेलेली नाही, तू फक्त शांत रहा, आणि माझा खेळ बघ."
"तुझा खेळ? अरे या गफुरला मुंबईत जाऊन त्याच्याच नागपाड्यामध्ये दादासाहेबांनी लाथानी तुडवला होता, त्याचा तू भरवसा ठेवतो?"
"काळ बदललाय शेखावत. चल मी निघतो... उद्याची तयारी करायचीय."
"अलविदा... डिसुझा..." शेखावत हसला.
"फिर मिलेंगे..." डिसुझा म्हणाला.
डिसुझा उठला आणि शेखावतही.
शेखावतने अचानक त्याची गळाभेट घेतली.
"तू दोस्त था मारा." शेखावत म्हणाला.
डिसुझा चक्रावला आणि तिथून निघून गेला.
शेखावत त्याच्याकडे बघतच राहिला.
तो गेल्यानंतर समोरच पडलेल्या फोनकडे कित्येक वेळ तो बघत राहिला.
शेवटी त्याने फोन उचलला...
'प्लस नाईन सेवन वन...' तो पुढचा नंबर डायल करू लागला.
शेखावतच्या ह्रदयाची धडधड प्रचंड वाढली...
त्याचे हात कंप पावू लागले.
रिंग जात होती...
तिकडून फोन उचलला गेला.
कुणीही थोडावेळ काहीही बोललं नाही.
"जे तुम्हाला हवं होतं तेच झालं. खुर्चीचा नवीन वारसदार, मोक्ष शेलार!!!"
तिकडून फक्त हसण्याचा आवाज आला...
शेखावतने फोन ठेवला, व गलितगात्र झाल्यासारखा तो बसून राहिला.
रात्र अजूनच भेसूर झाली होती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगाने पुढे चाललयं कथानक..!
लेखक पण जोमात आहेत. उत्साह असाच टिको..
शुभेच्छा पुढील भागास..!

एक नंबर लिहिताय...
असं वाटतंय की कुठुनतरी ही कादंबरी मिळवावी आणि बकाबका वाचुन काढावं पुढचं सगळं Wink Wink
लिहा ओ प्लीज लवकर लवकर....

@ धनवंती - धन्यवाद! तुमचा प्रतिसाद नेहमी हुरूप वाढवतो. Happy
@ रूपाली - धन्यवाद! आय होप सो!
@स्मिता श्रीपाद - धन्यवाद! मीच अजून लिहिलेली नाही पूर्ण, पण येस, ही कादंबरी पूर्ण व्हायला वर्षही लागेल. अजून दहा टक्केही प्लॉट कव्हर झालेला नाही.
@गौरी - धन्यवाद!
@झकासराव - धन्यवाद. अजून तर खूप काही व्हायचंय.
@आबा - धन्यवाद. बघुयात कोण असेल Wink

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद! नवीन भाग आता पुढच्याच वर्षी येईल!