सच कहुं तो- नीना गुप्ता : थोडा परिचय-थोडं चिंतन

Submitted by अस्मिता. on 1 December, 2022 - 20:45

ह्या पुस्तकाविषयी ऐकलं होतं, पण वाचनाच्या बाबतीत अचानकच रस वाटणं बंद झाल्याने हे आणि इतरही बरीच पुस्तकं मागेमागे पडत गेली. एकदातर ह्या पुस्तकाची १०० पानं पंचेचाळीस मिनिटात वाचली, 'पानं मोजणं' कधी करेन वाटले नव्हते. पण मी त्या अ-वाचकाच्या गर्तेतून बाहेर पडतेयं हेही थोडके नाही. तरीही पूर्वीचा 'राक्षस' परत हवायं. जयश्री गडकरचे 'अशी मी जयश्री' सोडून मी याआधी कुठलेही सिने किंवा नाट्यसृष्टीतल्या लोकांचे आत्मचरित्र वाचलेले नव्हते. दादा कोंडकेचे 'एकटा जीव' आईने सुचवले होते, तेव्हा 'ती तूच आहेस का, जिने मला दादा कोंडकेचा एकही सिनेमा बघू दिला नाही' झाले होते !! एवढंच नाही तर तिने 'फडके - अर्नाळकर' पण गाठोड्यात घालून भिंतीतल्या कपाटात वर टाकून दिले होते. हे सांगायचं कारण की नीनाच्या आईने पण 'लडकी बिगड़ जायेगी' या भीतीपोटी अपार कष्टं घेतले होते. ती तिचं 'बिघडली', आपण आपलं बिघडू. Happy

नीनाच्या प्रेमप्रकरणांमधल्या संभाव्य 'रसाळ' तपशीलामुळे ते पुस्तक हातोहात खपलेही/खपतंही असेल. तिने व्हिवियनची, मसाबाची, सर्वांचीच प्रायव्हसी जपण्यासाठी फार समतोल साधत तरीही वाचकांपर्यंत जास्तीत जास्त प्रामाणिक-फर्स्ट हँड अनुभव पोचवत लिहिलंय. इतकं स्पष्टं-सरळ भाषेत व जिथे अनावश्यक तपशील देण्याची गरज नाही , तिथे 'प्रिय वाचकांनो, मला कुणाचा अनादर करायचा नाही, कुणाच्या भावनाही दुखावयाच्या नाहीत, म्हणून यापेक्षा जास्त सखोल मी लिहू शकले नाही.' असा थेट कबूली जबाब दिलायं. लोकांना फिल्मी लोकं सामान्य लोकांपेक्षा 'उघड्यावर' असल्याने ते व्हल्नरेबल असतात हे माहिती असते. ह्याचं भान तिलाही आहेच. यास्तवं तिने फार 'सशक्तं लक्ष्मणरेषा' आखली आहे. जी अलिप्ततेपेक्षा healing झाल्यावरची वाटली. जितक्या जजमेंट सहन करायची ताकद आहे, तेवढीच माहिती बाहेर येऊ दिली आहे. हा पर्फेक्ट अप्रोच सांभाळूनही साधीसरळ शैली जपलीये.

हे पुस्तक पुस्तक म्हणून असामान्य नाही, ती काही सराईत लेखिकाही नाही. तसा काही आवही आणलेला नाही. तरीही खिळवून ठेवणारं व रंजक आहे. लहान वयात पळून जाऊन केलेले लग्नं मगं वर्षभरातच घेतलेला घटस्फोट, हे कशानं तर आई म्हणत होती 'लग्नं करा व हवं तितकं हिंडा पण आधी असे चाळे नकोत.' नंतर पंडित जसराज यांच्या मुलाशी ठरलेलं लग्न अचानक मोडणं व त्यावर त्या कुटुंबानी प्रचंड घरोबा असतानाही कुठलेही सबळ कारण न देता उडवाउडवीची उत्तरं देणं. इथे नाव बदललं आहे पण फारच सहज लक्षात येतं. व्हिवियनच तर आधीच विवाहित होता. हे माझ्या मनाला टोचलंच. कारण मान किंवा सुख यापैकी एकाच पर्यायाचे स्वातंत्र्य असेल तर मी मानंच निवडेन. जन्मभर असुखी राहीले तर राहीले. अशा नात्यांना भविष्य आणि स्थैर्य दोन्ही लाभत नाही. नीना काहीतरी वेगळीच आहे. तिने या नात्याला फार आदर दिलाय, मसाबाला होऊ देण्याचा तिला काहीही पश्चाताप नाही. I am pro-choice for pregnancy but not-so-much with falling for an already married man. तेही जेव्हा आपण कधीही एकत्र येणार नाहीत ह्याची खात्री असताना. ती आता खूप आनंदात आहे , विवाहित असलेल्या माणसाच्या प्रेमात पडून तो विभक्त झाल्यावर आधीच्या विवाहबाह्य संबंधातून झालेली तरूण मुलगी असताना मगं लग्न केलंय. किती 'आऊट ऑफ द बॉक्स' असावं एकाच माणसानी..! मला एवढे तपशील माहिती नव्हते. पण मी ह्यामुळे तिला लक्षात ठेवणार नाहीये,तिच्या कामामुळेच ठेवेन. तरीही हे माझ्या कंफर्टझोनच्या बाहेरचं होतं.

मला आपलं छोटीमोठी पण छान कामं करणारी, आता या(?) वयात कारकीर्द भरभराटीस आलेली आत्मविश्वासू वावर असणारी अभिनेत्री हीच ओळख होती. 'मसाबा- मसाबा' सिरीज मला फार आवडली होती, त्यातलं मायलेकीचं नातं भन्नाट वाटलं होतं. असेही मला मिक्सड-रेस लोक अफाट खास वाटतात, पण या सिरीजमुळे जी 'वास्तवाधारित काल्पनिका' म्हणता येईल, त्याने मला मसाबाही सुंदर, कल्पक, हुशार, जबाबदार आणि मेहनती वाटायला लागली.
1ca9b15c-c7e4-4be3-9bfe-8779d51a9148.__CR0,0,300,300_PT0_SX300_V1___.jpg

या पुस्तकातला मला आवडलेला भाग म्हणजे 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' आणि त्यातल्या गमतीजमती व शैक्षणिक प्रकिया. यात आवर्जून व पुन्हापुन्हा आलेली नावं म्हणजे सतीश कौशिक, ओम पूरी, इला अरूण, अनिता कँवर आणि इब्राहिम अल्काझी. ह्या शिवाय यात्रा, बहादुरशहा जफर, खानदान या दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा उल्लेख, तसेच 'मंडी' सिनेमातले धमाल किस्से , शाम बेनेगेल यांच्याकडून मिळालेले रीतसर शिक्षण व त्यांची शिस्त. ऍटनबरोंच्या 'गांधी'मधे आभाची भूमिका. 'लल्लू लडकी' ची व्यक्तिरेखा का केलीस हा गिरीश कर्नाडांचा रोखटोक सवाल , त्यानंतर टाईपकास्ट झाल्याने खरोखरचं चांगली कामं मिळायची बंद होणे व नंतर दूरदर्शनमुळे झालेली मदत. स्वतःचा 'बाजार सीताराम' ह्या दिल्लीतल्या पूर्वजांच्या घरावर बेतलेली पूर्णपणे स्वनिर्मित नाटीका व त्याला मिळालेला नॅशनल अवार्ड. तरीही कामाबाबत अनिश्चितता. डेव्हिड धवनच्या सिनेमात मिळालेला व कुठलाही संवाद नसलेला भिकारणीचा रोल ,'किमान एका वाक्याचा संवाद तरी द्या' म्हटल्यावर झालेली कुत्सित हेटाळणी. 'चोली के पिछे' गाण्यामुळे मिळालेले स्टेज शोज, त्यातले बरेवाईट अनुभव. सतत दुय्यम भूमिकांचा आलेला वीट. सप्तपदीच्या सीनमधे पॉलिस्टर कपड्यात यज्ञवेदीजवळील दृष्यादरम्यानच्या चित्रिकरणात 'टीपू सुलतान'च्या सेटवर लागलेली प्रचंड आग व त्यातून मसाबाला पाजवायला काढता पाय घेतल्याने थोडक्यात बचावलेला जीव. एकता कपूरच्या मालिकांच्या लाटेत स्टार प्लसने रद्दबातल केलेले अनेक कार्यक्रम , त्यामुळे बसलेला मानसिक धक्का. अचानक मिळालेल्या 'बधाई हो' व 'पंचायत' आणि 'द लास्ट कलर' सिनेमातल्या गमतीजमती व कारकिर्दीला अनपेक्षितपणे मिळालेली कलाटणी. असे आणि इतरही रंजक-रोमांचक किस्से आहेत.
article-l-2022615412263744797000.jpg
सतत छोटीछोटी कामं करावीच लागणं कारण घर चालवण्यासाठी पर्याय नसणे, शिवाय हा निर्णय आईवडिलांच्या मनाविरूद्ध घेतलेला असल्याने , शक्यतो सगळ्या गरजा भागवणे हे नीनाला अगणित वेळा करावे लागलेयं. सोसायटीच्या सचिवानी नीनाचे चारित्र्यहनन केल्याने तिच्या बाबांनी त्याच्याविरूद्ध आवाज उठवून स्वतः सहभागी होऊन निवडणूका घेऊन त्याला पदावरून निलंबित केले, हे मला फार कौतुकास्पद वाटले. असे सगळे असूनही तिचे आईवडील अत्यंत सपोर्टीव्ह वाटले मला, कारण त्यांनी तिला मुंबईत घरं घेऊन दिली, मसाबाच्या वेळीही हट्ट धरला नाही, आईपश्चात बाबांनी तिचे बाळंतपण केले, ते व्हिवियनलाही अत्यंत आदराने वागवायचे, मसाबालाही अगदी मायेने वाढवलं. आधी जो काळजीपोटी विरोध असायचा तो त्यांनी कधीही ताणून धरलायं असं वाटलं नाही. तो विरोधही विरोध नसून ती तिच्या निर्णयांवर किती ठाम आहे याची चाचपणी वाटली. ती संस्कृतमधे एम फिल आहे. सुविद्य व बुद्धिमान मुलगी असल्याने तिच्या आईची इच्छा होती की तिने आपले PhD पूर्ण करून चांगल्या संस्थेत प्रोफेसर किंवा IAS व्हावे व या बेभरवशाच्या क्षेत्रात आपले आयुष्य लोटू नये. ही पालक म्हणून उच्चं तरीही अवाजवी नसलेली अपेक्षा आहे. वडिलांचा अजून एक संसार असल्याने आईला प्रचंड मनस्ताप व्हायचा , ह्यावर मोकळेपणाने सांगितले आहे. याकरिता त्यांच्या मृत्यूपश्चातचं लिहायचे धाडस तिने केलेयं.

हे पुस्तक प्रामाणिक आणि प्रांजळ वाटले. ना स्त्री मुक्तीचा आवेश- ना प्रसिद्धीचा अभिनिवेष ! ना चोरटेपणा- ना खाजगी बाबींचा चव्हाटा , ना उथळ- ना फार गंभीर. गुजगोष्टी केल्यासारखे पण संग्रही असू द्यावे असे सखोलही नाही. एकदा वाचताना कंटाळा येणार नाही इतके रोचक आणि सोप्या इंग्रजी भाषेत.

मला प्रवाहाविरूद्ध पोहणाऱ्यांची उत्सुकता वाटते ते या निर्णयांच्या परिणामांना कसे सामोरे गेले असतील म्हणून..! ती ताकद कोठून येते..! त्यांच्यात असं काय असतं जे माझ्यासारख्यांत नाही. चूक-बरोबरपेक्षा मला अधिक काही तरी हवं असतं, जे मला माझे तथाकथित "नियम" मोडायला लावेल. शूर नाही तर किमान मला समृद्ध तरी करेल. लेबल लावणं सोपं आहे पण त्याने आपलीच वाढ कुठेतरी खुंटते. मला माणसं फार आवडतात, त्यांच्याशी असलेल्या साधर्म्याने त्यांची सोबत वाटते व त्यांच्यातल्या वेगळेपणाने त्यातल्या समृद्धीची ओढ. फक्त निरिक्षकाच्या भूमिकेत रहायचं !!

मी काढलेला सारांश हा की नीना ही मुलीसाठी अतोनात कष्टं उपसणारी एक 'आधुनिक हिरकणी' आहे.

©अस्मिता
चित्र # साभार बॉलीवुड शादी आणि अमेझॉनवरची पुस्तक प्रसिद्धी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती छान परिक्षण लिहिलं आहेस अस्मिता आणि तुझं स्वगतही आवडलं.. तु पुस्तकांच्या धाग्यावर लिहिल्यापासून हे वाचायची उत्सुकता वाढली होतीच, आता अजूनच. Happy

फारएन्ड, हो तसेच आहे.
एवढे हिंदी किंवा भारतीय संदर्भ आहेत की अभारतीय व्यक्तीला तितकं कळणार नाही असं मला वाटतं पण पुस्तक मात्र इंग्रजीत लिहिलेलं आहे. Happy

ज्यांनी चिंतन व शेवटचा परिच्छेद आवडल्याचं आवर्जून लिहिलंय त्यांचेही आभार. Happy

अतुल,
माध्यमे उथळ आहेत, _______करत आली आहेत. >>>खरं आहे.
खुशवंत सिंहांबद्दलची माहिती रोचकयं. सविस्तर आणि मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार. प्रतिसाद आवडला. Happy

ऋन्मेष , प्रतिसाद आवडला. Happy

अनिंद्य,
बहुदा नॅशनल फिल्म फेस्ट मध्ये बघितली होती दिल्लीत, आता नीट आठवत नाही.>>> किती मस्त Happy
ही 'बाजार सीतारामची'लिंक. कुणाला हवी असल्यास पहाता यावी म्हणून देतेयं.

आरती ,
त्याकाळी unwed mother टॅग घेऊन वावरणे, इंडस्ट्री मध्ये कामे करणं व मुलीला वाढवणे हे खरोखरच धैर्याचे काम होते. >>>अगदी खरयं.

हर्पा,
नीनाच्या स्वतःच्या अनुभवाला समांतर अशी ती भूमिका असली तर प्रत्यक्ष आयुष्यात तिने अपत्याला सोडून न देता वाढवली. कमाल! >>>सहमत आहे.

विजय कुलकर्णी, फारएन्ड, अंजली , अंजूताई , वंदना धन्यवाद. Happy

पुस्तक वाचलेलं नाही .
पण एकुणात जेव्हा सज्ञान लोकं आपल्या मर्जीप्रमाणे आयुष्यात निर्णय घेतात किंवा घेवु शकतात, मग त्यांच्या त्या निवडीमुळे जर त्यांना संघर्ष झेलावा लागला तर इतकं कौतुक कशाला?
त्यांनी त्या संघर्षाबद्दल बोलु नये वा लिहु नये हा मुद्दा नाही. पण इतकं कौतुक करण्याबद्दल कमाल वाटते. लोकं हेमा मालिनी वगैरेचे पण कौतुक करतात? आं? कशासाठी?
स्वतःच्या मर्जीने लग्न केलय वा मुलांना जन्म देवून वाढवलय त्यांना तिने हवं तसं. त्यात डोबलाचं कौतुक कशाला?

हे किस्से म्हणजे ते, अमेरीकेतील मुलगा करायचा एखाद्या शिकलेल्या मुलीने स्व्तःच्या मर्जीने , मग इथे येवून टाहो फोडायचा प्रकार करतात कि त्यांना कसा संघर्ष आहे डिग्री असून अमेरीकेत घरी बसायला लागते? आणि बाकीच्या मुली ज्या स्वतःच्या वीसावर येवून कष्ट करतात त्यांना लेबलं लावणार ह्या मुली की, त्या एकटे राहून मजा करतात अशी तुलना कारयचा प्रकार...

कित्येक लोकांवर, दुसर्यांचे निर्णय ठोपले जातात , त्यातही ती लोकं लढाई करतात व ऊभरतात. त्यांचे कौतुक समजू शकते.

ज्यांना स्वतःचे निर्णय सुद्धा मांडायची मुभा नसते त्यांचे काय? त्यांच्या संघर्षाचे काय?
असा आपला प्रश्न पडतो.

खूप सुंदर आणि प्रांजळ आत्मचिंतन, अस्मिता.
तुझ्या लिखाणातून जाणवणारी प्रगल्भता आणि सौंदर्य मन मोहित करणारे आहे.
झंपी तुमचे उदाहरण फारच वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी स्पेसिफिक वाटले... Happy
जगात सगळ्या प्रकारचे लोक सगळीकडे भेटतात...!!!

उदाहरणं भरपूर आहेत पण ईथे म्हणून एकच दिलेय. आणि आता ते प्रत्येकाच्या अनुभवावर आहे आणि समजूतीनुसार आहे.
पण बरीच लोकं पाहिलीत, जी मन्मर्जीने निर्णय घेवून, मी किती कष्ट काढले ह्याचा ढोल पिटत असतात.

“take everything in your stride, when you make a decision“ असे कमीच लोकं असतात.

सुरेख परिचय अस्मिता! नीना गुप्ता ह्या संस्कृत विदुषी आहेत हे माहीत नव्हते. त्यांचा अभिनय नेहमीच आवडतो.

झंपी तुमचा मुद्दा कळला नाही. चाकोरी बाहेरचे निर्णय घेण्याची आणि नंतर आयुष्यात त्यांचे बरेवाईट परिणाम सहन करण्याची क्षमता सगळ्यांमध्ये असतेच असे नाही. असे धैर्य दाखवणार्या व्यक्ती चे कौतुक होणे हे सहाजिकच आहे. नीना गुप्ता ह्यांनी जेव्हा मुलीला जन्म दिला तेव्हा प्रचंड गाॅसिप झाले असणार तेव्हा त्यांनी त्यांनी कुठलही स्पष्टिकरण दिलं नाही आता जेव्हा संबंध आयुष्याचा आढावा घेतला तेव्हा त्या निर्णयामागील पार्श्वभूमी व इतर तपशील वाचकांना सांगितले तर त्यावर आक्षेप कशासाठी? ह्या तर्काने तर कुणीच आत्मचरित्र लिहायला नको कारण लिहिणारी व्यक्ती स्वतःच्या अनुभव आणि दृष्टिकोनावरच भाष्य करणार.

ती व्हिविअन च्या प्रेमात पडली होती का? व्हिविअनचा , मसाबाच्या जडणघडणीत काही वाटा राहीला का? की उगाचच एक हाय प्रोफाईल वन-नाईट स्टँड करुन ती जबाबदारी घेउन बसली?
याबद्दल आहे का त्या पुस्तकात काही? जर चुकून गर्भ राहीलेला तिने पाडला नसेल तर तो निर्णय धाडसी आहे.

झंपी,
या पुस्तकात ढोल वगैरे अजिबात पिटलेले नाहीत. तिनशेपानी पुस्तकात दहा पानं ह्यानी व्यापलेली असतील-नसतील. तिचे तर तेव्हाही कौतुक झालेयं असं वाटलं नाही. बहुतेक पुस्तक तिची कौटुंबिक पार्श्वभूमी, तिचे लहानपण , तिची जडणघडण, तिला शाळाकॉलेजात आलेले बरे वाईट अनुभव, पहिले लैंगिक शोषण, पितृसत्ताकपद्धती वरचं तिचं भाष्यं, तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी बघितलेली स्वप्नं, अचानक निवडलेली अभिनयाची वाट, ह्या क्षेत्रातील बरेवाईट अनुभव,
छोटीमोठी प्रेमप्रकरणं, मुंबईत नवीन असताना आलेले वेगवेगळे अनुभव ई नी व्यापलेलं आहे.

उलट हे एवढं सोडलं तर ती कुठेतरी आपल्यासारखीच आहे हेच अधोरेखित केलेयं. एखाद्याला एखाद्या निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले म्हणून संघर्षात सूट मिळाली असेही होत नाही. ती स्वतः मूव्ह ऑन झाली आहे. मनासारखी नवनवीन व मुख्य भूमिका असलेली कामही करतेंय. तिच्या मुलीलाही स्वतंत्र आयुष्य आहे, तिही यशस्वी आहे. आता या स्टेजला तिला गवगवा करून किंवा लक्ष वेधून उपयोगही नाही. तिला लॉकडाऊन मधे मिळालेला वेळ व आयुष्याला एकदाचं मिळालेलं स्थैर्य या दोहोंचाही उपयोग करून एका थेरपी सारखं लिहिलंय. अर्थात हे माझं मत आहे.

बाकी पर्णिकाशी सहमत.

तुझ्या लिखाणातून जाणवणारी प्रगल्भता आणि सौंदर्य मन मोहित करणारे आहे.
>>>आंबट गोड, मी हरबऱ्याच्या झाडावर चढून बसले आहे. Happy

लेखावरील प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद पर्णिका आणि आंबटगोड. Happy

सामो, Happy
ती प्रेमात पडली होती. हे फ्लिंग किंवा वन नाईट स्टँड नव्हतं. काही वर्षं हे असं लॉन्ग डिस्टंस चाललं व मसाबा ३-४ वर्षांची असताना, अगदी क्षुल्लक कारणावरून व्हिवियनने संबंध तोडून टाकले. अनप्लॅनड् किंवा चुकूनच झाले होते. पण तिला आई होण्याची दुर्दम्य इच्छा होती, त्यामुळे तिने कुणाचाही सल्ला जुमानला नाही. तिला ती जे करतेयं ते योग्यच वाटले, आणि ती या निर्णयाबाबत पूर्ण समाधानी होती आणि आहे.

हे झेपलं नाही. नीना किंवा तिच्यासारख्या स्त्रिया जे वागतात त्याला 'धाडस' लागत नाही. टोकाचा स्वार्थीपणा आणि कोडगेपणा लागतो. तो तिच्याकडे आहे इतकंच.
एखादी सिंगल स्त्री विवाहित पुरुषाच्या मोहात अडकत नसेल तर ते ती घाबरत असते किंवा धाडसी नसते म्हणून नाही. तर तिचा moral compass असतो म्हणूनही असू शकेल. मोहात न सापडायला जास्त धाडस लागतं कदाचित.
या लॉजिकने ड्रग युझर्स, चोर , वेश्यागमन करणारे- सगळे 'धाडसी' ठरतील! प्रवाहाविरोधात पोहणं याची इतकी सोपी cheap व्याख्या करू नका. गॅलिलिओपासून ते महाराष्ट्रातील सुधारकांनी जे केलं त्याला प्रवाहाविरुद्ध पोहणं म्हणता येईल. पण त्यांचा उद्देश योग्य, उदात्त होता.
मुलीला जन्म देणं यातही धाडस काय ते कळलं नाही. म्हणजे पुन्हा judge करणं की बघा बघा तिने गर्भपात करून घेतला नाही. म्हणजे गर्भपात करणाऱ्या वाईट! Unwed mother हा tag अचानक लागला तर गोष्ट वेगळी- त्या केसमध्ये त्या स्त्रीबद्दल सहानुभूती वाटेल पण या बाई तर ठरवूनच रिचर्डसची mistress बनून राहत होत्या. अशा हजारो बायका श्रीमंत पुरुषांचं दुसरं तिसरं प्रकरण बनून शेकडो वर्षे राहत आहेत. त्यात काय जगावेगळं! पुढे त्याने टाकल्यावर हिला एकटीने राहावं लागलं पण त्यातही आईवडील पैसेवाले होते आणि तिने नवीन विवाहित पुरुष पुढेही शोधलेच.
चूल, मूल, पुरुषावर अवलंबून राहणं यापेक्षा वेगळे पर्याय स्त्रीमुक्ती चळवळीने दिले. तरीही कोणी त्याच जुन्या वाटेने जात असेल तर त्यात काय कौतुक.

WHITEHAT,
एखादी सिंगल स्त्री विवाहित पुरुषाच्या मोहात अडकत नसेल तर ते ती घाबरत असते किंवा धाडसी नसते म्हणून नाही. तर तिचा moral compass असतो म्हणूनही असू शकेल. >>>> ????? सिरीअसली??
तुम्हाला नीना गुप्ता आवडत नाही, ठीक आहे. तिनं जे काही केलं (तिचे व्यक्तीगत निर्णय) ते तुम्हाला धाडसी वाटत नसतील किंवा तुमच्या मोराल कंपासच्या गोलात बसत नसतील. तुमचं मत आहे. पण ते मांडण्यासाठी तिच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवलेच पाहिजेत का? का? ती बाई आहे म्हणून की पब्लिक फिगर आहे तर तिचं चारीत्र्यहनन करणं सोपं आहे म्हणून? एकीकडे जज करायचं नाही म्हणत तुम्हीच तिला वाईट प्रकारे जज करताय.
आणि "प्रवाहाविरोधात पोहणंयाची इतकी सोपी cheap व्याख्या करू नका. " हे म्हणताना प्रवाहाविरूद्ध पोहणार्‍यानां तुमचे नियम लावून एका ठराविक चौकटीत बसवलंत तुम्ही. पण परत ते तुमचे मत. ते मांडताना कुणाच्या - स्पेशली बाईच्या - चारीत्र्यावर टिपणी करताना आपण कुठल्या मोराल कंपासच्या गोलात बसतो बघायला हवं.
आणि हो... शास्त्र / सायंस नुसार मूल जन्माला येण्यासाठी बाई आणि पुरूषाची आवश्यकता असते. तिनं मूल वाढवायचं ठरवलं तर ती वाईट. पण त्यानं जबाबदारी झटकली तर तो त्याचा चॉईस??? रीचर्डस बद्दल कुठेच काहीच वाईट वाचायला मिळत नाही की त्याचा मोराल कंपास लूझ आहे असं कोणी म्हणत नाही.

अंजलीला प्रचंड अनुमोदन. इथे अजून चघळणे होऊ नये असं वाटतं.
बाकी पुस्तक न वाचताच आपल्या मनाने काही कल्पून मनातल्या झुडपाला झोडपण्याची मज्जा कायम आहे तर. काही गोष्टी कधीच बदलत नाहीत.

परिचय आणि चिंतन दोन्ही आवडले. मसाबा मसाबा आणि तिचा चित्रपट पाहिले नाहीत. साँस पाहिली होती. आता आठवते त्यानुसार त्या वेळच्या मालिकांच्या तुलनेत तरी उजवीच होती.
ओम पुरी सोबतचा फोटो मंडीच्या सेटवरचा वाटतोय. पाहून खूप काळ झालाय त्यामुळे तिचं काम आठवत नाही. शबाना-स्मिता- ओम -नसीर हे समांतर सिनेमाचे खंदे शिलेदार एकाच सिनेमात. बाकीही नावं कसली भारी आहेत

त्रिकाल या चित्रपटातलाही तिची भूमिका लक्षात राहिली.

आणि एक अगदी वेगळी , थोडीशी विनोदी भूमिका बुनियाद मधली. यात तिची जोडी मजहर खान सोबत होती.
एकंदरित एक likeable character.

अंजली, चारित्र्यहनन' केलेलं नाही. रिचर्डसचं कौतुकही अजिबात केलेलं नाही.
विवाहित पुरुषांची अशी विवाहबाह्य प्रकरणं, ती enable करणाऱ्या नीनासारख्या स्त्रिया, त्यातून मुलं जन्माला घालणं हे सर्व तुम्हाला फार भारी व धैर्याचं प्रतीक वाटत असल्यास ते तुमचं मत झालं. मध्ययुगात हे कॉमन होतंच. नंतर उगाच स्त्रीपुरुष समानता वगैरे fads आली होती.
विरोधी मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्यानुसार ते केलं. इथे यावर अधिक चर्चा नको पण वेगळं मत नोंदवणं मला गरजेचं वाटलं.
अमितव- ad hominem वर उतरलात याबद्दल धन्यवाद Happy

विवाहित पुरुषांची अशी विवाहबाह्य प्रकरणं, ती enable करणाऱ्या नीनासारख्या स्त्रिया, त्यातून मुलं जन्माला घालणं हे सर्व तुम्हाला फार भारी व धैर्याचं प्रतीक वाटत असल्यास >>> मला तिच्याबद्दल वा तिच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय याबद्दल मी अजून माझं मत व्यक्त केलेलं नाही. ते मत व्यक्त करताना कुणाचंही चारीत्र्यहनन करण्याची वा कुणाला ग्लोरीफाय करायची मला गरज वाटणार नाही हे नक्की.
तुमचं विरोधी मत व्यक्त करण्याबद्दल आक्षेप नाही. त्याबद्दल ते तुमचं मत असं म्हटलं आहे. पण ते व्यक्त करताना कुणाच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवणं यावर आक्षेप आहे. विशेषतः ती व्यक्ती एक पब्लिक फिगर आणि स्त्री आहे म्हणून.

Whitehat,
मी म्हणूनच प्रो चॉईस व कंफर्टझोनच्या बाहेरचं हे शब्दही लिहिलेयंत की, तिचं आत्मपरिक्षण वाचलं म्हणजे मी तिला आता पूर्ण ओळखते आणि स्वार्थी/ निस्वार्थी ,कोडगी/ निस्पृह वगैरे लेबलं लावायला मोकळी झाले असं मला वाटत नाही. मी तिचं कौतुक करण्यापेक्षा तिला समजून घ्यायचा माझा जो प्रयत्न होता तो मांडलायं. त्यामुळे तिला जे वाटलं ते तिनं केलं व समाजाला भीक घातली नाही हा मुद्दा आहे, तिने गर्भपाताबद्दल लिहिले असते तरी मी कौतुकच केले असते. It is not about the decision itself but about not caring about what other people think, and taking responsibility. ती खरोखरचं एक चांगली आई वाटते मला. 'टाकल्यावर' हा शब्द अजिबात आवडला नाहीये. यात 'भोगवस्तू' अर्थ ध्वनित होतो. सर्वच स्त्रियांना हीन लेखल्यासारखे वाटते. शिवाय विवाहीत स्त्रियांवरही मालकीहक्कं असल्याचा संदेश जातोयं. माझ्या माहितीचा सोर्स नीना नाही, हे पुस्तक व तिने मांडलेले सत्य आहे. ड्रग अब्यूज, चोरी , वेश्यागमन हे सेल्फ डिस्ट्रक्टीव्ह बिहेविअर, इग्नोरंट व गुन्हेगारी प्रवृत्ती असू शकते , प्रवाहाविरूद्ध जाणे नाही. ही तुलना अस्थानि आहे. प्रवाहाविरूद्ध जाण्याची तुमची आणि माझी व्याख्या वेगळी आहे.या मर्यादेच्या बाहेर लिहिणे तर गॉसिप होईल , परिक्षण नाही. त्यामुळे पूर्णविराम Happy

जे त्या गटात येत नाहीत , त्यांच्याबद्दल मी का स्पष्टीकरण देऊ , हे त्यांचे आत्मपरिक्षण नाहीये. त्यांना involuntarily कमी लेखले जातेय हा तर्क तर अजबच वाटला.

मूळ लेखात "धाडस" चा उल्लेख फक्त वडलांबद्दल लिहीण्याबाबत आहे. रिचर्ड्सबरोबरच्या अफेअर बद्दल कोठे आहे? त्या अफेअर बद्दल धाडस वगैरे तारीफ करायची गरज नाही (या लेखात तसे काही म्हंटलेलेही नाही) आणि त्यावर तिला जज करायचीही. दोन अ‍ॅडल्ट लोक परस्परसंमतीने काय करतील ते त्यांचा मामला आहे. पुस्तक अजून वाचलेले नाही पण लेखावरून तरी असे वाटते की तिचा आव बघा मी कशी भारी/वेगळी आहे असा नसून जे सांगायचे आहे ते प्रांजळपणे सांगण्याचा आहे. त्यातही उगाच लोकांना चघळायला बाइट्स न देता इतरांची प्रायव्हसी जपण्याचे तारतम्य "...म्हणून मी यापेक्षा सखोल लिहू शकले नाही" मधे दिसते.

धाडस नक्की आहे ते मुलीला जन्म देण्याच्या निर्णयात. अमेरिकेत यात काही नावीन्य नाही. पण भारतातील ८०-९० च्या दशकातील सामाजिक प्रेशर पाहता हे करणे धाडसाचेच होते. बापाचा पत्ता नाही, आई सिनेव्यवसायात (आणि पब्लिक इमेज "चोली के पीछे क्या है" वाली) - जनरल पब्लिकचा याबाबत एकूण अ‍ॅप्रोच कसा असतो ते उघड आहे.

मात्र वरची आणखी माहिती वाचून रिचर्ड्सबद्दलचा एक माणूस म्हणून आदर नक्की कमी झाला. माझा आधी समज होता की त्याने तिला कधीच कसलीच कमिटमेण्ट दिली नव्हती. पण बराच काळ दोघे प्रेमात वगैरे होते असे दिसते. त्यामुळे मुलीबद्दलची जबाबदारी त्याने नंतर झटकल्यासारखे दिसत आहे. अगदी इथल्या हर्शेल वॉकर सारखे नाही पण साधारण तसेच.

पुढे त्याने टाकल्यावर हिला एकटीने राहावं लागलं
>>>>

हे वाक्य कुठल्याही स्त्रीला खटकल्यास नवल नाही. पण मला एक पुरुष म्हणून यात एका पुरुषाचे म्हणजे रिचर्डचेही चारीत्र्यहनन दिसत आहे. बायकांना टाकणारा पुरुष वगैरे..

त्यांचे प्रेम, त्यांचे संबंध, त्यांची वेगळे होण्याची वैयक्तिक कारणे.. पण ते केवळ पब्लिक फिगर असल्याने आपण बिनधास्त त्यावर गॉसिप करणे हा आपला हक्क समजतो. याची कल्पना असूनही जे सेलेब्रेटी ईमेज जपायचे ढोंग न करता किंवा यातून मिळणाऱ्या सवंग प्रसिद्धीमागेही न धावता प्रामाणिकपणे आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगतात मला त्यांचे नेहमीच कौतुक वाटते. ईनफॅक्ट मी त्यातून ईन्स्पिरेशन घेतो. हे आपल्यालाही जमायला हवे. कारण या समस्या सामान्य माणसांना नसतात असे नाही. उद्या आपला डिव्हॉर्स होऊ शकतो, आपला जोडीदार कोणाचा तरी हात धरून पळून जाऊ शकतो, आपल्या मुलांच्या आयुष्यात असे काही होऊ शकते. या सगळ्यात आपल्या ओळखीची लोकं गॉसिपचा आनंद घेणारच, तर फार ओळखीच्या नसलेल्या लोकांमध्येही आपल्याला जज करायची चढाओढ लागणारच. त्यांची पर्वा न करता आपल्याला आपले आयुष्य जगता यायला हवे. आणि यासाठी धाडसच लागते. जे कैक लोकांकडे नसते.

आता हेच बघा ना. वर अस्मिताने म्हटल्याप्रमाणे ३०० पानांच्या पुस्तकात दहा पाने या प्रकरणावर आहेत. पण तरीही लोकांना ईंटरेस्ट यावर चर्चा करण्यातच आहे, सामान्य लोकांना तिची ओळख या प्रकरणामुळेच आहे. आणि आज तिने पुस्तक लिहूनही तिचे शिल्लक २९० पानांचे आयुष्य काय होते आणि त्यातून ती कशी आहे हे जाणून न घेता रिचर्डची मिस्ट्रेस हा एकच लेबल लाऊन कित्येक लोकांनी तिची फाईल क्लोज केली असेल.

फारएन्ड, अगदी. मला या लेखातून हेच सांगायचे होते. तुम्ही पर्फेक्ट सारांश लिहिलायं.
ऋ, तुझ्या प्रतिसादातले खालचे दोन्ही परिच्छेद फार apt वाटले.
अंजलींनी लिहिलेलंही पटलं.
तिघांनाही थँक्स. Happy

सांस्कृतिक चुकांबद्दल(गुन्हा नाही) विचार करायचं म्हटलं तर संस्कृती प्रवाही असते. जे आज योग्य नाही ते नंतर होईल किंवा शेकडो वर्षांपूर्वी कदाचित योग्यही असेल. सामाजिक संस्कार कृत्रिम असतात, नैसर्गिक आवेगापुढे नेहमीच टिकून राहतील असं नाही. प्रत्येकजणं त्या साच्यात बरोबर बसेल असंही नाही, त्यामुळे त्याला चूक किंवा बरोबर दोन्ही म्हणवत नाही व अधिक योग्य पर्याय काय हेही माहिती नाही !! किमान त्या साच्यात न बसणाऱ्यांना कमी लेखू नये , त्यावरनं त्याचं/तिचं समाजातलं स्थान जोखू नये , एवढं तरी आपण करू शकतो.

धन्यवाद भरत Happy , ती मंडीतल्या कलाकारांची यादी पुस्तकातही आहे व त्रिकालच्या चित्रिकरणातल्या आठवणीही !!

रच्याकने, मी कालच ह्या लेखाची लिंक नीनाला इन्स्टाग्रामवर पाठवून दिलीये, तुला मराठी येत नसेल तरीही गुगल ट्रान्स्लेट वापर पण वाचचं म्हटलंय. Happy मागे गोविंदा वर इथे लिहिले होते, तेव्हा त्यालाही ट्वीटरवर लिंक पाठवली होती पण त्याने काही उत्तर दिले नाही म्हणून आता इन्स्टाग्रामवर Proud

आत्ता वेळ मिळाला तेव्हां शांतपणे वाचून काढला लेख. आवडलेल्या - वाचलेल्या पुस्तकाची भरभरून करून दिलीय ओळख.
ज्याने वाचलेलं नाही त्यालाही वाचायचा मोह होईल असा सुंदर झालाय लेख.
हे एका अभिनेत्रीचं आत्मचरीत्र आहे कि एका स्त्री चं कि एका वादग्रस्त स्त्री चं याची ओळख झाली.
एक अभिनेत्री, यशस्वी स्त्री म्हणून केलेया संघर्षाची कहाणी यापेक्षाही आजही तिच्या त्या वादग्रस्त इमेजची आणि त्याच त्या घटनेचीच चर्चा होतेय हे दुर्दैवी वाटलं. ती केव्हांच ते सर्व पचवून इथवर आलीय. लोक अजूनही तिथेच अडकलेत. अशा सर्वांनी वाचावं नक्कीच.

अस्मिता, मस्त परिचय. पुस्तक वाचायला हवं. नीना गुप्ताच्या हल्लीच्या भुमिका खूप आवडल्या त्यामुळे हे पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे.

<<धाडस नक्की आहे ते मुलीला जन्म देण्याच्या निर्णयात. अमेरिकेत यात काही नावीन्य नाही. पण भारतातील ८०-९० च्या दशकातील सामाजिक प्रेशर पाहता हे करणे धाडसाचेच होते>> बरोबर. सर्व सामान्यांच्या बाबतीत आताही तसे करणे भारतात धाडसाचेच आहे.
त्या काळी नीनाने त्या घेतलेल्या निर्णयाचे मला कौतुक वाटले.
एक नटी यापलीकडे मला तिच्याबद्दल हा लेख वाचण्यापूर्वी
काहीही माहिती नव्हती. तिचे रिचर्ड्स संबंध, तिचा मुलगी होऊ देण्याचा निर्णय योग्य की अयोग्य याबद्दल मला काहीच भाष्य करायचे नाहीय, त्या विषयात रसही नाही.

<<ती केव्हांच ते सर्व पचवून इथवर आलीय. लोक अजूनही तिथेच अडकलेत.> योग्य निरक्षण.

मात्र वरची आणखी माहिती वाचून रिचर्ड्सबद्दलचा एक माणूस म्हणून आदर नक्की कमी झाला.>> हे पण थोडे stereotype वाटते. तो ही बरेच दिवस पैसे देत होता असे वाचलेले ते ही खरे असेल. He may also have his side of the story.

नीना गुप्ताने मुलाखतीत सांगितलं याहे की मूल जन्माला घालायचं की अबोर्शन करायचं हा निर्णय रिचर्डसनेच घेतला. तिने तो म्हणेल तसं केलं. त्याने सांगितलं असतं अबोर्ट कर तर तिने अबोर्ट केलं असतं. सो तो पैसे देत असेल यात नक्कीच तथ्य वाटतं.

Pages