फुलांच मनोगत

Submitted by मिरिंडा on 28 November, 2022 - 01:30

माणसांनी स्वतःचा जसा दर्जा ठरवलेला असतो. तसा वनस्पतींनीही स्वतःचा दर्जा ठरवला असावा.तो पुढील प्रमाणे असावा, असं मला तरी वाटतं.

१) गुलाब
---------
गुलाब हा जंगली झाडांपैकी एक असावा. तो घरात त्याच्या वासामुळे आला असावा. गुलाबाला गर्व. असावा.माझ्यासारखा मीच. माझ्यासारखा सुगंध दुसऱ्या कोणाचाही नाही. मी घरात येईन,जगेन, पण माझ्या मर्जीने.तुम्ही कितीही खतपाणी घाला,उन्हात ठेवा.मला फुलायचं असेल तरच मी फुलेन.वाटलं तर मला काढून टाका. पण फुलांच्या विश्वात माझी स्वतःची जागा आहे,हे लक्षात ठेवा.माझे. रंगही अनेक आहेत.माझ्यापासून अत्तरही तयार होतं.

२)मोगरा:-
--------
तसा मी सर्वसामान्यांसारखा आहे. पण कायमचा आणि हंगामातही फुलेनच असं नाही. माझा वास मादक आहे. मी मादक वर्गातील आहे.मी फुले देणं बंद केलं तरी मरणार नाही. क्वचित प्रसंगी माझं वेलातही रुपांतर होतं.मग तर मी वाढत राहीन.पण फुलं देणार नाही.

३)जास्वंद :-
---------
मी नेहमीच फुलं देते.हिरव्या पानांवर लालबुंद फूल,म्हणजे कॉन्ट्रास्ट मॅचिंगच. म्हणून तर मी गणपतीलाही आवडते. मला फक्त कापू नका आणि पांढऱ्या रोगापासून जपा.नाहीतर मी मरेन.माझेसुद्धा अनेक रंग आहेत.मला भाव खाण्याची संवय
नाही.मला सहसा कोणी उपटून टाकीत नाही

४)चाफा:-
---------
मी खासम् खास आहे. माझा रंग सोनेरी पिवळा व लोभसवाणा आहे. मी सहजासहजी घरात वाढणार नाही.मात्र मला कवटीचाफा म्हंटलेलं अजिबात आवडत नाही.
अशी वाईट तुलना तुम्ही माणसंच करु शकता.माझ्यापासून अत्तर निघतं.जे स्वस्त नाही.माझा औषधी उपयोगही आहे. माणसांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करण्याचं काम आम्ही सुवासिक फुलं करतो. माझ्या वासात मादकपणा आणि गोडवा सुद्धा आहे.तसा मी बाजारात फार किंमती आहे.

५)रातराणी :-
________
माझी पांढरी ,गोड व मधाळ वास असलेली फुलं रात्रीच फुलत असल्याने माझ्याबद्दल प्रवाद निर्माण झाले आहेत. मी अतिशय साधी भोळी आहे.मला देवांसाठी वापरीत नाहीत. मैं तो
" नामसे बदनाम हूं " . माझी तुलना उगाचंच बाजाराशी करतात. मला घरात लावायला माणसं राजी नसतात.त्यामुळे कोणाच्याही दाराशी मी सर्रास सापडत नाही. जी माणसं माझी सात्विकता ओळखतात तेच मला घरात लावतात. प्रेमाने लावली तर मीही चांगली दिसते आणि दिल खुष करते.माझा उपयोग कुठेच करीत नाहीत.हेच तर माझं
दु:ख आहे.एखाद्या परित्यक्तेप्रमाणे मला वागवतात.

६) तुळस :-
--------
माझ्या पवित्रतेचा पुरावा देण्याची गरजच नाही.मी फार प्राचीन आणि देवांनी गौरवलेली वनस्पती आहे . माझा औषधी उपयोगही खूप आहे. आयुर्वेदात मला फार महत्त्वाचं स्थान आहे. पण थंडी,वारा आणि पावसापासून माझं नीट संरक्षण केलं तरच मी कायमची ही टिकते. मी अशी वनस्पती आहे,जी प्राणवायू सोडते आणि हवा शुद्ध ठेवते. जवळपास सगळ्याच पुजांमधे मी अग्रभागी असते. श्रीकृष्णाची तर मी लाडकी आहे. मला तर त्याने गळ्यातील जागा दिली आहे.
मला साधेपणा आणि सात्विकता आवडते. आणि मी तशी आहे पण.

७) झेंडू व निशिगंध
---------------------
आम्हाला तर दोघांना हारातच जागा दिली आहे. आम्ही जितक्या सन्मानाने देवांच्या गळ्यात,वधुवरांच्या गळ्यात अथवा एखाद्या सत्कारमूर्तीचा गळा सजवतो, तितक्याच निर्विकारतेने पार्थिवाच्या गळ्यातही पडतो.
माझा भाऊ झेंडू हा तर बऱ्याच देवांचा लाडका आहे. मुख्य म्हणजे त्याला नवरात्रात तर डोक्यावर घेतात. कारण महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी यांचं माझ्याशिवाय चालतच नाहीत. आमचं दु:ख एकच आहे,की आमचा उपयोग संपला की माणसं आम्हाला पायदळीही तुडवतात.

अरूण कोर्डे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबोली (Aboli, Firecracker, Crossandra infundibuliformis):
गावठी भाषेत आबोली. नारिंगी रंगाची फिक्कट अशी चार पाकळ्यांची साधी फुले. पण जत्रेत वळेसार व गजरे यांच फुलांचे. एक फुल तसं आकर्षक नसतं. पण त्याच्या दोन बाजूला दोन अशा पध्दतीने केळीच्या धाग्यांमध्ये ओवलेला वळेसार त्यातील अंबाडीचा नक्षीची पात्रे व कलाबूत एक वेगळेच आकर्षण निर्माण करतो. भरपुर फुलांचा गजरा डोक्यात असला की इतर फुलांची गरजच पडणार नाही.
कोकणातील सुवासिक फुले
https://malvani.com/flowers-in-kokan/ वरून साभार

केशवकूल आपण लिहिलेले बरोबर आहे.काही फुलं एकटी आकर्षित करीत नाहीत तर त्यांचे गजरे आणि वेण्या छान दिसतात. मी सहमत आहे .

लेख आणि केशवकूल यांनी दिलेली लिंकही छान आहे. पण काही काही फोटो चुकलेत. केवड्याला सोनचाफ्याचा फोटो वाटतोय आणि कागदीला केवड्याचा. नंतर खाली कण्हेरीलापण बिट्टीच्या फुलांचा फोटो लावलाय. माहीती चांगलीयपण.

यात अजून सोनटक्का, पारिजात, कोरांटी, दगडी तगर, मधुमालती, बुचाची फुले अशी यादी वाढवता येइल. सगळे सुगंध वेगवेगळे आणि तरीही आवडणारे.

निकु आपलं म्हणणं पटलं. अजूनही बरीच सुवासिक फुलं आहेत. त्यांच्या वापराचीही माहिती हवी. साधारणपणे जी फुलं वापरली जातात त्यांच्याबद्दलच लिहिलं गेलं आहे.

माझ्या वडिलांनी गावाहून कोकणातून अनंत नावाच्या अत्यंत सुवासिक फुलांचे रोपटे आणले होते. आता आमच्या सोसायटीत दोन तीन रोपटी आहेत. सध्या सिझन दिसतो आहे. खूप फुले आली आहेत.
कुणीतरी प्लीज फोटो टाकारे.

आ हा! किती सुंदर . मी चिन्मयी आभार.
मिरिंडा
सांगायचे एव्हढेच कि ह्या फुलांचेही मनोगत लिहा. कदाचित दुसऱ्या भागात?