आकाशातील गमती जमती- ८/११/२०२२ चे चंद्र ग्रहण!

Submitted by मार्गी on 2 November, 2022 - 05:19

✪ ८ नोव्हेंबर रोजी चंद्र ग्रहण- पूर्ण भारतातून दिसणार
✪ सहजपणे उघड्या डोळ्यांनी बघता येईल
✪ चंद्राच्या जवळच युरेनस- बायनॅक्युलरमधून सहज बघता येईल
✪ सौ फॉरवर्ड नॉलेज की, एक खुद के अनुभव की!
✪ मनोरंजक अनुभवातून विचारांना चालना
✪ ग्रहणात चंद्र लाल का दिसतो?
✪ माझं दु:ख सर्वांत मोठं! नक्की ना?

सर्वांना नमस्कार. मागच्या आठवड्यात झालेल्या सूर्यग्रहणानंतर येत्या पूर्णिमेला- ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी चंद्र ग्रहण दिसणार आहे. ह्या निमित्ताने सतत स्पर्धा आणि परफॉर्मंसचं दडपण असलेल्या मुलांना आणि मोठ्यांनाही एक वेगळा अनुभव घेण्याची संधी आहे. सूर्यग्रहण बघताना डोळ्यांची काळजी घ्यावी लागते व थेट सूर्याकडे बघता येत नाही. पण चंद्र ग्रहणामध्ये डोळ्यांना त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे सहजपणे चंद्रग्रहण बघता येतं. नुसत्या डोळ्यांनीही त्या दिवशी उगवलेल्या चंद्राचा वरचा भाग किंचित लालसर असल्याचं बघता येईल. फक्त ते बघण्यासाठी पूर्व क्षितिज नीट दिसेल- चंद्र उगवताना दिसेल अशी जागा हवी. एक- दोन दिवस आधी चंद्र उगवण्याची जागा बघून ठेवल्यास उत्तम. त्याशिवाय आकाशात दक्षिण- पूर्वेला काही उंचीवर असलेला ठळक गुरू बघता येईल. दक्षिणेला शनी हा ग्रह आणि माथ्यावर श्रवण आणि पश्चिमेला अभिजीत असेही ठळक तारे बघता येतील.

भारतातून दिसताना चंद्र बिंब पृथ्वीच्या उपछायेमधून (penumbra) जात असेल. भारतात संध्याकाळी चंद्र उगवेल तेव्हा त्याच्यावर पृथ्वीची उपछाया असेल व त्यामुळे तो किंचितसा लालसर दिसेल. न्युझीलंड, रशिया व इतर काही ठिकाणांहून चंद्र बिंब पृथ्वीच्या प्रच्छायेतून (umbra) जाताना दिसेल व त्यामुळे तिथे चंद्र अगदी फिकट झालेला दिसेल. पण भारतामधून बघताना चंद्र पृथ्वीच्या उपछायेतूनच जाणार असल्यामुळे तो किंचित लालसर दिसेल आणि उगवल्यानंतर साधारण सव्वा तासामध्ये हे ग्रहण संपेल. त्यानंतर नेहमीच्या पूर्णिमेसारखा चंद्र तेजस्वी दिसेल.

(ग्रहणाच्या दिवशी चंद्र- युरेनस स्थिती व चंद्राचे विवर- खड्डे, गुरूचे उपग्रह, शनीची कडी, गुरू- शनीची महायुती, चंद्र- मंगळ पिधान, शुक्राची कोर, सूर्यावरचे डाग व सूर्य ग्रहण आणि तारकागुच्छ ह्यांचे मी घेतलेले टेलिस्कोपिक फोटो http://niranjan-vichar.blogspot.com/2022/11/wonders-of-sky-lunar-eclipse... इथे बघता येतील. आकाश दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संपर्क: निरंजन वेलणकर 09422108376)

युरेनस!

ह्यावेळी चंद्राच्या अगदी जवळ आणि किंचित पश्चिमेला जेमतेम दिड अंशावर (म्हणजे हात लांब केल्यावर जेमतेम बोटाच्या रुंदीइतक्या अंतरावर) युरेनस हा ग्रह आहे. हा नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाही, पण छोट्या बायनॅक्युलरमध्ये चंद्राला बघितलं आणि त्याला केंद्रस्थानी ठेवलं तर वरच्या बाजूला युरेनस दिसेल. ट्रायपॉडच्या मदतीने नुसत्या मोबाईलने चंद्राचा फोटो घेताना pro mode वापरून जर शटर स्पीड 3-4 सेकंद इतकी वाढवली आणि ISO 800 किंवा 1600 असं ठेवलं तर फोटोमध्ये चंद्र फार जास्त चमेकल पण युरेनससुद्धा फोटोमध्ये कॅपचर होऊ शकेल. असा फोटो घेणार असाल तर त्यामध्ये 3-5 सेकंद टायमर नक्की ठेवा, ज्यामुळे फोटो क्लिक केल्यामुळे होणरं हाताचं व्हायब्रेशन निघून जाईल आणि फोटो स्थिर येईल. चंद्राचा चांगला फोटो घेण्यासाठी pro mode मध्ये शटर स्पीड 1/4 सेकंद आणि ISO 100- 200 असं ठेवून बघू शकता. चंद्र छान व स्पष्ट येईल, पण युरेनस त्यावेळी फोटोत येणार नाही.

सौ फॉरवर्ड नॉलेज की, एक खुद के अनुभव की!

आकाशामध्ये अशा घटना नेहमी घडत असतात. ह्या निमित्ताने आपल्याला मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देता येते. सध्या फॉरवर्ड- उधार ज्ञान आणि माहितीचा स्फोट इतका प्रचंड आहे. पण जेव्हा मुलं अशा प्रत्यक्ष गोष्टीचा अनुभव घेतात, स्वत: प्रयत्न करतात आणि शोधतात तेव्हा त्यांना जास्त आनंद मिळतो. त्याबरोबर विज्ञानातली गंमत पण नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या प्रकारे त्यांना अनुभवता येऊ शकते. कोणतंही बर्डन किंवा स्पर्धेचा ताण नसताना वेगळी गंमत अनुभवण्याचा आनंद ते घेऊ शकतात. अशा छोट्या छोट्या अनुभवांमधून मुलांना त्यांचे कल आणि आवडी- निवडी कळायला मदत होऊ शकते.

ग्रहणात चंद्र लालसर का दिसतो?

चंद्र ग्रहणात अगदी खग्रास स्थिती दिसतानाही चंद्र पूर्ण अदृश्य होत नाही. फिकट लालसर दिसत राहतो. आणि खंडग्रास स्थितीमध्येही तो किंचित लालसर दिसतो. त्याचं कारण असं की, जरी चंद्र पृथ्वीच्या प्रच्छायेच्या आतमध्ये असला तरी पृथ्वीवर असलेल्या वातावरणामधून विखुरलेले सूर्याचे काही प्रकाश किरण चंद्रापर्यंत पोहचत असतात. त्यामुळे सावलीत असला तरी चंद्रावर काही प्रमाणात प्रकाश पोहचत असतो. त्यामुळे तो फिकट लालसर दिसतो. आणि लालसर असण्याचं कारण म्हणजे सूर्यप्रकाशातले निळा- हिरवा- पिवळा अशा रंगांची तरंगलांबी (wavelength) कमी असल्यामुळे ते इतक्या अंतरामध्ये विखरून जातात आणि लाल रंगाची तरंगलांबी जास्त असल्यामुळे तोच न विखुरता काही प्रमाणात दिसतो. त्यामुळेच वातावरणातून विखुरलेला सूर्यप्रकाश चंद्रावर पोहचताना लालसर होतो आणि चंद्रही लालसर होतो (त्याला त्याचा स्वत:चा प्रकाश नाही आहे)! आणि ह्याच कारणामुळे उगवताना- मावळतानाही प्रकाश जास्त हवा ओलांडून येत असल्यामुळे चंद्र- सूर्य आणि ग्रहसुद्धा लालसर दिसतात. आणि लाल रंगाची तरंगलांबी जास्त असल्यामुळेच ट्रॅफिक सिग्नल आणि रेल्वेचे सिग्नलही लाल असतात! आणि दिवसा आकाश निळं दिसतं ह्याचं कारण काय असेल?

आपल्याला चंद्रग्रहण दिसतं तेव्हा चंद्रावरून सूर्य ग्रहण दिसतं. कारण चंद्रावरून बघताना पृथ्वी सूर्याच्या मध्ये आलेली दिसेल. पृथ्वीला वातावरण असल्यामुळे सूर्य एकदम झाकला जाणार नाही व पूर्ण अंधार होणार नाही. त्याउलट आपण पृथ्वीवरून सूर्यग्रहण बघतो तेव्हा चंद्रावर वातावरण नाही व प्रकाश विखुरला जाईल अशी शक्यता नाही, त्यामुळे खग्रास सूर्यग्रहणात पूर्ण अंधार होतो!

माझं दु:ख सर्वांत मोठं! नक्की ना?

तेव्हा ह्या थोड्या विज्ञानातील गमतींचा आनंद घेऊया आणि मुलांना हा अनुभव देऊया. मुलांसाठी हे जितकं आनंददायक आहे, तितकंच ते मोठ्यांसाठीही असू शकतं. अनेकदा आपल्याला वाटतं की, आपलं दु:ख जगातलं सगळ्यांत मोठं दु:ख आहे आणि आपल्या समस्या सर्वांत मोठ्या. पण जेव्हा आपण हे कोट्यवधी किलोमीटर्स अंतरावरचे (गुरू तुम्ही पाहाल तेव्हा तो ६० कोटी किलोमीटर्सपेक्षा लांब असेल आणि शनी १६० कोटी किलोमीटर्सपेक्षा लांब) ग्रह आणि शेकडो प्रकाशवर्ष लांब अंतरावरचे तारे बघताना आपण, आपला अहंकार आणि आपलं दु:ख किती छोटे आहोत, आपण किती नगण्य आहोत ही जाणीवही होत जाते! आणि आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी आपण हे अतिदूरचे ग्रह- तारे बघू शकतो, हा केवढा मोठा चमत्कार आहे, हेही कळतं!

(माझे आकाश दर्शन, हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील व असं सेशन आपल्याकडे आयोजित करायचं असेल तर संपर्क करू शकता. धन्यवाद.)

Group content visibility: 
Use group defaults

अरे आताच एक ग्रहण झालेले ना.. मला वाटले तोच धागा आहे.. ग्रहणाचा सीजन चालू आहे Happy

लेख छान
शेवटच्या पॅराशीही सहमत. ग्रहतार्‍यांचा विचार करता आपले अस्तित्व खुजे वाटू लागते. दु:खच नाही तर सारे अहंकारही गळून पडतात

छान लेख.. पण...
काल वरील लेखात दिल्यानुसार मोबाईल कॅमेराचे PRO MODE setting करून चंद्र आणि त्याच्या शेजारी दिसणाऱ्या गुरू ग्रहाचे फोटो फोटो काढून बघितले आणि जरा विचित्रच आला फोटो . हे बघा.. हा चंद्र आणि गुरूIMG_20221103_204604.jpg

आणि हा गुरूचा क्लोजअप.. तोच फोटो झूम केला असता
IMG_20221103_210705.png

सर्वांना नमस्कार आणि खूप धन्यवाद !

@ मनिम्याऊ जी, प्रयत्न केला हे छानच. पण ट्रायपॉड होता का? आणि जितकी शटर स्पीड निवडली असेल- ४ किंवा ८ सेकंद वगैरे, तितका वेळ मोबाईल स्थिर ठेवावा लागेल. तुम्ही तसं केलं तर गुरूच्या बाजूचे अनेक फिकट तारेही सहज दिसतील. आणि चंद्र मात्र प्रकाशाने ओसांडून वाहेल. चंद्रासाठी वेगळ सेटिंग करावं लागेल. पण असे फोटोज झूम होत नाहीत/ मोठे येत नाहीत. आत्ता तुम्ही घेतलाय तो हलल्यामुळे ब्लर आलेला दिसतो.

IMG-20221105-WA0010.jpg
आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास काढलेला हा गुरूचा फोटो. गुरूच्या बाजूला जे उपग्रह दिसतायत, ते वरून खाली क्रमाने गनीमीड, युरोपा आणि कॅलिस्टो असे आहेत.

आता हा खालचा फोटो आजच रात्री साडेनऊच्या सुमारास काढलाय. यात गुरूला अगदी लागून आयो हा अजून एक उपग्रह दिसतोय. गुरूभोवती परिभ्रमण करत असल्याने तो आधी गुरूच्या पुढे आला होता आणि त्यामुळे दिसत नव्हता. नंतर तो दिसायला लागला.
IMG-20221105-WA0011.jpg

मी पहिला फोटो काढल्यावर कुठला उपग्रह कुठे आहे हे पाहण्यासाठी स्टेलारियम app उघडली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आयो थोड्या वेळाने दिसायला लागेल. म्हणून परत थोड्या वेळाने काढला फोटो.

@ विशाखा- वावे जी, फोटोज अप्रतिम नव्हे अद्भुत आहेत! तुम्ही खूप् अनुभवी आहात, असं‌ वाटतंय. फोटोज डीएसएलआरने किंवा डिएसएलआर + मोठा टेलिस्कोप असे काढलेले वाटतात. खूपच छान आलेत. माझे गुरूच्या उपग्रहांचे फोटो इतके शार्प कधीच आले नाहीत आजवर.

धन्यवाद मार्गी. खूप अनुभवी वगैरे नाही मी. Happy
फोटो निकॉन P900 या कॅमेऱ्याने काढलेत. टेलिस्कोप नाही वापरलेला.

(विशाखा-वावे हा माझाच आयडी आहे. वावे या आयडीची फोटोंसाठीची जागा भरल्यामुळे हा दुसरा आयडी काढला आहे.)

वेळाने काढला फोटो.

नवीन Submitted by विशाखा-वावे on 5 November, 2022 - 13:3

वाह किती सुरेख !!!!! माझ्या राशीच्या स्वामींचे व त्यांच्या उपग्रहांचे फोटो एकदम झकास !!!

काल ग्रहण तर नाही दिसलं. चंद्र उगवताना ढगच होते.
थोड्या वेळानंतर काढलेला हा फोटो. सिल्व्हर ओकच्या पानांची फोरग्राऊंड आहे.

मस्त फोटो वावे जी! फक्त शटर स्पीड किंवा ISO कमी केलं असतं तर चंद्र अजून स्पष्ट आला असता.

पुण्यात ढग होते, त्यामुळे चंद्रग्रहण बघताच आलं नाही ह्यावेळी.

धन्यवाद सर्वांना Happy
ह. पा., होय. उत्तरपत्रिका भरल्यामुळे पुरवणी लावली आहे Happy मुख्यतः फोटोंसाठी.

मस्त फोटो. विशाखा वावे. एखाद्या भय कथांच्या संग्रहाला मुख् पृ ष्ठ म्हणून मस्त फिट होईल.

@मार्गी
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहे
बर झाल हा धागा सुरू केला, माझ्याकडचे काही फोटो पोस्ट करायचे होते पण मुद्दाम त्या साठी वेगळा धागा कशाला म्हणून राहिल
आता इथे ते पोस्ट करतो, ह्या महिन्यात नाही टिपता आल ग्रहण, खूप ढगाळ होत पण पूर्वीचे काही फोटो आहेत हे
सगळे DSLR ने काढलेत, ट्रायपॉड आणि केबल remote release वापरल्याने प्रत्येक फोटो साठी exposure time apperture सेट करून अपेक्षित फोटो घेता आला
ग्रहणाचे फोटो थोड्या थोड्या वेळाने वेगवेगळ्या सेटिंगला काढून मग एकत्र कोलाज एडिट केलं
चंद्र, गुरू, शनी आणि शुक्र असा सुंदर योग २०२१ डिसेंबर मधे होता, ते एकाच फ्रेम मधे घेताना exposure apperture सेटिंग साठी थोडी धडपड झाली.

२०१४ चंद्रग्रहण
lunar eclipse 2014.jpg
२०१४ चंद्रग्रहण
lunar eclipse 2014-2.jpg

२०२१ चंद्रग्रहण
lunar eclipse 2021.jpg

चंद्र शुक्र आणि मंगळ युती २०१५
moon-venus-mars 2015.jpg

चंद्र गुरू शुक्र शनी युती २०२१
moon-venus-saturn-jupiter 2021.jpg

खंडग्रास सूर्यग्रहण २०१२
solar eclipse 2012.jpg

@ वावे
गुरू आणि उपग्रह अतिशय सुंदर
कुठली लेन्स? का telescope ला कॅमेरा लावला होता?
३०० मिमी लेन्स मधून फक्त एकच उपग्रह दिसत होता

धन्यवाद manya.
तुमचेही सर्व फोटो सुंदर आहेत.
मी टेलिस्कोप नाही वापरलेला. निकॉन कूलपिक्स ९०० या कॅमेऱ्याला 83X झूम आहे त्यामुळे यात गुरूचे चंद्र दिसू शकतात.
माझ्या 'दोन चंद्र' या लेखात अजून काही फोटो आहेत.
दोन चंद्र

@ मन्या जी, निव्वळ अप्रतिम. किती किती सुंदर फोटोज आणि बारकाईचं चित्रण!

गुरू शनी महायुती अद्भुत दिसली होती. एका टेलिस्कोपिक व्ह्यूमध्ये दोघंही मावत होते. शनीची कडी व गुरूचे उपग्रह असा फोटो काढता आला होता. तेव्हा इथेही पोस्ट केलं होतं.

@ मन्या जी, निव्वळ अप्रतिम. किती किती सुंदर फोटोज आणि बारकाईचं चित्रण!
+१
वावेचा फोटो ही अद्भुत.

मार्गी, लेख व फोटो आवडले.
ब्रह्मांडात क्षुद्र वाटलं की आपोआपच मन ताळ्यावर येतं, हे खरंय. अवकाश फक्त मूर्त भौतिकशास्त्र वा गणित नाही, काही तरी अमूर्त अस्तित्व आहे. एक तत्त्वज्ञान आहे अवकाशात, मला व्यवस्थित जाणवतं हे कनेक्शन !!

धन्यवाद वावे
Nikon Coolpix मी वापरला नाही पण तुमच्या पोस्ट नंतर specifications बघितले. 83x optical zoom (2400mm),compact camera, ISO 6400.... अतिशय उपयुक्त instrument आहे, अर्थात सगळ instrument वर नसतं, कॅमेरा मागचे हात तेवढेच कुशाग्र हवेत. तुमचा दोन चंद्र लेख वाचला, तुमच्या फोटो सारखच तुमचं लिखाणही प्रभावी आहे. खूप छान माहिती मिळतेय.

धन्यवाद मार्गी, अस्मिता
माझी फोटोग्राफी ची हौस २० वर्षां पूर्वीपासून, फिल्म SLR चे काही फोटो पोस्ट केलेत
फील्मबाजी

पण सध्या कामानिमित्त imaging फक्त microscope वरच होतंय
इथे येऊन भरपूर माहिती मिळतेय, पुन्हा एकदा पूर्वीची हौस थोडीशी सीरियसली घेता येईल.

कृपया नावापुढे जी लावू नका, अजून म्हातारा झाल्या सारखं वाटत हो Happy

Pages