... रंग माझा वेगळा

Submitted by छन्दिफन्दि on 8 November, 2022 - 13:24

खरं सांगायचं तर रंगांची खरी गम्मत मला खूप उशिरा म्हणजे आता आताच कळायला लागली. पण एकदा त्यातली गम्मत कळल्यावर मग मात्र निळेभोर आकाश, सूर्याप्रमाणे आणि ऋतूनुसार बदलत जाणारा त्याचा रंग, त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र कापसासारखे हलके तरंगणारे ढग, सूर्यकिरणांनी अगदी एखाद्या अव्वल चित्रकाराप्रमाणे त्यावर केलेली कलाकुसर आणि रंगकाम, सूर्यास्ताच्या वेळी नेहेमीचे निळेभोर आकाश आणि पांढरेशुभ्र कापसासारखे ढग लुप्त होऊन कधी कुसुम्बी तर कधी सोनेरी-केशरी रंगांची उधळण, सप्तरंगी इंद्रधनुष्य, पिवळी, पोपटी, ते हिरवीगार- हिरव्या रंगाचं पॅलेट उलगडवून दाखवणारी झाडे, पिवळी, लाल, केशरी, गुलाबी, पांढरी वाऱ्यावर डोलणारी फुले , मधेच अनाकलनीय रंगाची - निळा,आकाशी, पोपटी, जांभळा असे रंग अगदी बाजूबाजूला ठेवल्यावर दिसेल तशा रंगाची - मान असेलेला एखादा चुकार हमिंग बर्ड सगळेच खुणावू लागले. ह्या सगळ्यात रंगांची मुक्त उधळण करणारा खरा ऋतू तो म्हणजे इकडचा Fall, शिशिर ऋतू.

Fall मध्ये, म्हणजेच सप्टेंबर- ऑक्टोबर मध्ये, जसे तुम्ही उत्तरे कडे जाल झाडांच्या पानाचा रंग बदलू लागतो. हिरवीगार पाने, पिवळी,केशरी , गुलाबी, लाल रंगाची होतात. सुकू लागतात आणि वाऱ्याबरोबर गळून जातात- म्हणून तो फॉल. शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत कडक थंडीमध्ये, बर्फामध्ये तगून राहण्यासाठी झाडे तयारी करत असतात आणि त्यासाठीच होतात हे रंगबदल आणि पानगळ. पण ती लाल, केशरी, पिवळी, कुसूमबी झाडे फारच विलोभनीय दिसतात. रंगांवर जीव बसणाऱ्या मनाला ह्या फॉलच्या जादूने भुरळ नाही घातली तरच नवल!

लोकांच्या फॉल कलरच्या पोस्ट्स, फोटो बघून दरवर्षी मनात येणार एकच विचार "आपल्याकडे पण फॉल कलर्स दिसले असते तर ? कधी तरी फक्त त्यासाठी नॉर्थ साईडला जायला पाहिजे."

fall2.png

आज सकाळी काही वाणसामान घ्यायला जवळच्या दुकानात म्हणून चालतच बाहेर पडले, पाऊस पडून गेलेला आणि नुकतच ऊन पडलेलं. आणि पाहिलं लाल पानांनी डवरलेलं झाड दिसलं, लगेच फोनचा कॅमेरा सरसावला.लगेच पुढे पिवळ्या रंगाचं, तर लगेच केशरी, मधेच परत एखाद लाल, तर एखाद कुसूमबी- चॉकलेटी, मातकट झाड दिसतच गेली. अधाशासारखे कैक फोटो काढले. हलकिशी वाऱ्याची झुळूक, हवेतला गारवा, कोवळं सोनेरी ऊन, पावसानंतरचा तो ओला वास, ह्यां मुळे फोटो पेक्षाही प्रत्यक्ष दिसणारं ते दृश्य कितीतरी पटींनी अधिक विलोभनीय होत. साहजिकच पंधरा मिनिटांचा तो रस्ता दीड तासाचा कधी झाला कळलंच नाही.

त्याच वेळी अचपळ मनात, "रोज ज्या रस्त्यांवरून जातो, त्याच रस्त्यावर इतकी विलोभनीय रंगांची उधळण करणारी झाडे आहेत, हा सांक्षात्कार आपल्याला गेल्या दोन वर्षात कसा बर नाही झाला? आपण अशी कोणती झापडं लावून वावरत असतो? आपल्या आजुबाजुला इतकं सुंदर काही असतं पण आपली नजर त्याला दूर कुठेतरी अप्राप्य जागी शोधात असते, आणि ते मिळत नाही, दिसत नाही म्हणून आपण बेचैन. काय गम्मत आहे नाही ?" विचारांची रस्सीखेच.

इकडे मनाच्या दुसऱ्या कप्प्यात अजून अनेक विविध रंगांचे शोध सुरूच! पाय, कॅमेरा, हात फिरतायत, जे जमेल, रुचेल सार काही टिपतायत. प्रत्येक झाड वेगळं,अनोखं दिसत होत, एकाच झाडाची पाने सुद्धा एका रंगाची किंवा एकसारखी नव्हती, आणि अगदी एका पानावरती सुद्धा बहुरंगी छटांची नक्षी दाटून सजली होती. जणू ते प्रत्येक झाड, त्यावरील प्रत्येक पान निक्षून सांगत होतं "... रंग माझा वेगळा !"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात! "रंग माझा वेगळा" हे "ये अबोली लाज गाली" मधलं आहे. यूट्यूबवर हे गाणं पूर्वी शोधलं होतं तेव्हा सगळीकडे "ये अबोली लाज दही" असं होतं. अज्जूनही तसंच आहे! Uhoh (Talk about आनंदावर "विरजण"!!) Happy आता तर सिनेमाही धड दाखवत नाही - हेचं माझं माहेर आणि अरे संसार संसार...का अजून काही... नक्की कशातले आहे???
Screen Shot 2022-11-08 at 4.08.37 PM.png
लेख थोडा मोठा हवा होता. चांगला आहे.

ये अबोली लाज दही >> Lol

लेख थोडा मोठा हवा होता. चांगला आहे. >> +१

परदेशात हा ऋतू हिवाळ्यापूर्वी येतो. पण भारतात हा ऋतू नक्की कधी असतो? शिशीर म्हणजे हिवाळ्याचा शेवट आणि गर्मीच्या आधी (वसंताच्या आधी) असंच ना? म्हणजे आपले फॉल आणि स्प्रिंग (शिशीर आणि वसंत) पाठोपाठ येतात अगदी. विकीवरती शरदृतूला ऑटम (फॉल) म्हटले आहे. महाराष्ट्रात शरदात (ऑक्टोबर?) कुठे पानगळ होते काय?

तिकडे आमच्या घरासमोरचा पिंपळ थंडीत आणि थंडीपूर्वीही हिरवा डवरलेलाच असतो. साधारण मार्चच्या आसपास त्याची पानगळ सुरू होते (इथे पिंपळपाने रंगीत नसतात). साधारण २-३ आठवडे फक्त तो पूर्ण निष्पर्ण असतो. मग त्यावर शेंदरी/लाल रंगाची पालवी फुटते. साधारण आठवड्याभरात संपूर्ण झाड लाल दिसतं, जणू हा परदेशातला फॉल सीझनच. पण हा लाल फॉलचा नसून स्प्रिंगचा, म्हणजे वासंतिक लाल असतो. ती पानं पुढे एखाद आठवड्यात कोवळी हिरवी आणि मग गडद हिरवी होऊन जातात.

छान लेख...

Barcelona
"रंग माझा वेगळा " हा सुरेश भटांचा एक कविता संग्रह आठवला...त्यात ही सुंदर गझल आहे...
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा
देवकी पंडीत यांनी खूप सुंदर गायलीय.
https://youtu.be/yuPGcQ7oqqM
हरचंद पालव
शिशीर ऋतुचा स्वच्छंद वात आला
कर्णी पर्णाच्या लागूनी म्हणाला
माळरानावर दूर एकवेळा
चला माझ्यासह खेळ खेळण्याला

असे काही तरी आठवले...

हपा आमच्या कॉलेज मध्येही एक गुलमोहराचे झाड होते, लाल फुलांनी डवरलेले. त्याची आठवण झाली.
महाराष्ट्रात शरदात (ऑक्टोबर?) कुठे पानगळ होते काय?<< मला वाटतं महाराष्ट्रात पानगळ वसंत ऋतूच्या आधी म्हणजे होळी दरम्याने होत असावी.

एक पाठ्य पुस्तकातली कविता आठवली,
आला शिशिर संपत
पान गळती सरली

मग त्यावर शेंदरी/लाल रंगाची पालवी फुटते. साधारण आठवड्याभरात संपूर्ण झाड लाल दिसतं, जणू हा परदेशातला फॉल सीझनच. पण हा लाल फॉलचा नसून स्प्रिंगचा, म्हणजे वासंतिक लाल असतो.<<< सुंदर माहिती. थँक यू

वा! सुंदर कविता दत्तात्रयराव. कुणाची आहे? पूर्ण कविता असेल तर द्याल का प्लीज?<<< +१

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा<<< माझ्याही मनात ते रंग बघून हीच ओळ आली म्हणून हे शीर्षक दिले
झाडे पाने लाल , पिवळी, तपकिरी, कुसुम्बी, गुलाबी अशी विविध रंगांची होतात. मला इथे ते सगळे फोटो टाकता नाही आले.

बार्सिलोना, दत्तात्रय साळुंके आणि हरचंद पालव तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद .

अवल Happy
ही भटांची कविता माहिती होती. मी दत्तात्रय साळुंके यांनी टाकलेली 'शिशीर ऋतुचा स्वच्छंद वात आला' ह्या कवितेबद्दल विचारत होतो.

हरचंदजी माफ करा...
मलाही ही कविता हवी आहे...
प्राथमिक शाळेत असताना वाचनात आलेली. क्रमिक पुस्तकात नव्हती. मला संपूर्ण कविता आठवत नाही...

खूप छान लिहिलंय!
मलापण रविवारी लाँग ड्राइव ला गेल्यावर निसर्गाची निस्सीम, लोभस दृष्ये अशीच खुणावत रहातात.. गुंगून टाकतात .
भारतात अशी रंगांची उधळण फेब्रुवारीपासून (पांढरा चाफा , तांबडा पळस), मे( पिवळा धमक बहावा , विविध रंगांच्या बोगनवेली ) ,जूनपर्यंत (नाव सार्थ करणारा नीलमोहोर , तांबडा गुलमोहोर)पहायला मिळते.. . याच काळात आकाशही सूर्योदय आणि सूर्यास्ताला रंगीत होऊन सजत असते.

srd Thank you

.